बर्ट्रांड रसल, माझा सर्वात आवडता लेखक

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
21 Aug 2008 - 9:07 pm

<डिस्क्लेमर> बर्ट्रांड रसल (Bertrand Russell) हा माझा सर्वात आवडता लेखक असल्यामुळे माझी मतं आत्यंतिक (चांगली) असण्याची शक्यता वाढते.
मला संदर्भ म्हणून हा लेख लिहायचा नाही, तर फक्त एक ओझरती ओळख म्हणून! माहितीजालावर त्याच्याबद्दल खूप जास्त माहिती अर्थातच आहे आणि अनेक मिपाकरांना रसल आधीच माहित असेल. तर हा लेख त्यांच्यासाठी ज्यांना रसलबद्दल माहिती नाही, किंवा फक्त नावच ऐकून आहेत. थोडी माहिती या माणसाबद्दल आणि थोडी त्याच्या काही पुस्तकांबद्दल! थोडी अशासाठी कारण माझं वाचन अपूर्ण आहे.
<{backslash}डिस्क्लेमर>

मला एकेकाळी अशोक काकांनी बर्ट्रांड रसलची ओळख करून दिली आणि माझा अनेक नव्या गोष्टींशी, खरंतर एका नव्या जगाशीच ओळख झाली. पुस्तकांबद्दल चर्चा करताना (http://misalpav.com/node/3141) बर्ट्रांड रसल हा विषय निघाला आणि काही लोकांनी मला आणखी माहिती विचारली. म्हणून इथे माझ्या आवडत्या लेखकाबद्दल काही शब्द! रसलनी अनेक विषयांचा अभ्यास केला, अनेक पुस्तकं लिहिली, त्याच्या आत्मचरित्राचे तीन खंड उपलब्ध आहेत. त्याचं आयुष्यही वादळी म्हणावं असंच काहीसं होतं, त्याबद्दलही थोडं लिहित आहे.

मागच्या शतकातील काही हुशार आणि अतिप्रसिद्ध व्यक्तिंमधे एक नाव आहे बर्ट्रांड रसल! अनेक विषयांचा अभ्यास करून, अनेकविध पुस्तकं लिहून, समाजासाठी खूप साठा ठेवून जाणारा रसल बालपणी मात्र आयुष्याला कंटाळलेला होता. बर्ट्रांडचे आई-वडील अतिशय हुशार, समाजात प्रतिष्ठीत आणि समाजोपयोगी कामं करणारे, पण त्याबरोबरच अतिशय पुढारलेल्या विचारसरणीचे! त्यावेळच्या इंग्लंडमधे त्यांचे विचार अतिशय जहाल किंवा पुढारलेले मानले जात होते (काळ आणि स्थळ महत्त्वाचं आहे, आज कदाचित ते विचार सर्वमान्य असतील.) इंग्लंडमधे जनननियंत्रण (हा शब्द "बर्थ कंट्रोल"साठी योग्य आहे का?) करणाय्रा काही मोजक्या लोकांमधे बर्ट्रांडचे पालकही होते. बर्ट्रांड आणि त्याचा मोठा भाऊ फ्रँक थोडे मोठे झाल्यावर त्यांना शिकवायला घरी काही हुशार आणि पुरोगामी लोक येत. त्यांच्यातल्या एकाला क्षयरोग झाला होता. याच कारणामुळे त्यानी लग्न केलं नव्हतं. पण त्याला शारिरीक संबंधांपासून वंचित रहायला लागू नये म्हणून बर्ट्रांडच्या आईचे त्याच्या वडीलांच्या माहितीत या शिक्षकाबरोबर संबंध होते. या असल्या गोष्टी त्याच्या आजी-आजोबांना अजिबात खपत नव्हत्या, आणि त्याहीपेक्षा आपल्या नातवंडांवर असे संस्कार व्हावेत हे तर अजिबातच चालण्यासारखं नव्हतं. दुर्दैवाने, बर्ट्रांडचे आईवडील त्याच्या लहानपणीच गेले आणि आजी-आजोबांकडे या मुलांचा ताबा आला.

रसलनी स्वतः असं लिहिलं आहे, की त्याची आजी अतिशय कर्मठ होती तरीही त्याच्यावर देवधर्माची सक्ती झाली नाही. त्याला देवाच्या अस्तित्वाविषयी साशंक (agnostic) असण्यासाठी कधीही आडकाठी झाली नाही. आणि स्वतंत्र बाण्यात आडकाठी न झाल्यामुळे त्याला आजीबद्दलही प्रेम होतं. त्याच काळात त्याला आयुष्य नकोसं झालं होतं. कशासाठी जगायचं हा प्रश्न त्याला अनेकदा पडला आणि अनेकदा त्याने जीव देण्याचाही विचार केला. (सुदैवाने त्यावर अंमलबजावणी केली नाही.) पण एक दिवस मोठ्या भावानी त्याला युक्लीडची भूमिती शिकवायला सुरूवात केली. एकदा युक्लीडशी ओळख झाली आणि मग मात्र जीव देण्याचे विचार मागे पडले. पुढे रसल शिकण्यासाठी केंब्रिजमधे आला आणि त्याला लक्षात आलं की या बाकीच्या इतर विद्यार्थ्यांमध्ये जे नाही ते आपल्यात आहे, गणित! आणि हळूहळू जगासमोर आला गणिती रसल!

तिथेच त्याची ओळख अमेरीकन ऍलिसशी झाली; ती त्याच्यापेक्षा काही वर्षांनी मोठी, पण दोघांनी प्रेमात पडून (त्याच्या आजीच्या इच्छेविरुद्ध) लग्न केलं (पुन्हा, काळ वेगळा होता). लग्नानंतर ७-८ वर्षांनी त्याला असं जाणवलं की त्याचं ऍलिसवर प्रेम नाही. त्यानंतर २० वर्षांनी त्यांनी घटस्फोटाची प्रक्रिया घाईघाईत पूर्ण केली कारण रसलची तेव्हाची मैत्रीण, डोरा ब्लॅक, गरोदर होती म्हणून त्यांना लग्न करायचं होतं. मधल्या काळात अनेक स्त्रियांबरोबर त्याची मैत्री झाली आणि काही वेळा त्याचे एकाच वेळी एकाहून अधिक स्त्रियांशी संबंध होते.

याच मधल्या काळात त्याने Principia Mathematica या ग्रंथाचे तीन खंड प्रकाशित केले (मी वाचले नाहीयेत, पण फार कठीण आहेत असं ऐकलं आहे; याच रसलनी एके काळी आईनस्टाईनच्या सामान्य सापेक्षतावादाबद्दल (general theory of relativity) म्हटलं होतं की जगात तीनच लोकांना त्याचं संपूर्ण गणित फक्त तीन लोकांनाच कळलंय, एक म्हणजे ज्याने ते गणित मांडलं, दुसरा रसल आणि तिसरा कोण ते आता मी विसरले.). त्याच काळात त्याने "जर्मन सोशल डेमॉक्रसी" लिहून त्याचा राजकारण आणि समाजकारणातला रस दाखवून दिला. पहिल्या महायुद्धाच्या काळात त्याने युद्धाला विरोध दाखवून तुरुंगाची सफरही केली.

डोरा ब्लॅकबरोबर त्याने एक शाळाही काढली. तेव्हाची प्रचलित शिक्षणपद्धती त्याला मान्य नव्हती, त्यामुळे स्वतःच्या मुलांसाठी हा शाळेचा प्रयोग त्या दोघांनी केला. पण लोकं त्या शाळेला उनाड आणि फुकट गेलेल्या मुलांना शिस्त लावण्यासाठी एक चांगली जागा अशी समजले आणि त्या शाळेचा प्रयोग व्यर्थ गेला. या सगळ्या प्रयोगात बय्रापैकी पैसा खर्च झाल्यामुळे त्याने Conquest of happiness लिहिलं. पुस्तकाची तडाखेबंद विक्री झाली आणि पुन्हा रसलच्या दारी पैसा आणि कीर्ती उभे राहिले.

डोराबरोबर रसलचं लग्न काही वर्ष टिकलं आणि नंतर त्याने ऑक्सफर्डमधल्या पॅट्रिशिया स्पेन्स बरोबर त्याने पुन्हा एकदा संसार सुरू केला. त्या दोघांचा मुलगा कॉनरॅड पुढे प्रसिद्ध इतिहासकार आणि इंग्लंडमधल्या लिबरल डेमोक्रॅट पक्षाचा नेता झाला.
रसलच्या काही निबंधांमुळे त्याच्यावर बरीच टीका झाली, उदा: Why I am not a Christian, What I believe (या दोन नावांच्या पुस्तकात रसलचे हे दोन आणि इतर काही उत्तम निबंध/लेख संग्राहित केले आहेत.) हे दोन निबंध सुंदर, ओघवत्या शैलीत, अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने रसलचा निरीश्वरवाद (atheism) मांडतात. आणि याच निबंधांमुळे रसलवर न्यूयॉर्कच्या सिटी कॉलेजमधे तत्त्वज्ञान शिकवण्यास बंदी घालण्यात आली. "जो माणूस देवावर विश्वास ठेवत नाही त्याच्या शिकवणीमुळे आमची मुलं वाया जातील", या आणि अशा प्रकारच्या भीतीमुळे पालकांचा रसलला खूप विरोध होता. त्यासंदर्भात न्यायालयात खटला झाला (The Bertrand Russell case या नावाने त्या खटल्याबद्दलच्या माहितीचा संग्रह प्रसिद्ध आहे.) त्यात न्यायाधीशांनी रसल कॉलेजच्या मुलांना शिकवण्यास morally unfit आहे असा निर्वाळा दिला. त्यानंतर रसल परत केंब्रिजमधे ट्रिनिटी महाविद्यालयात परत आला, तिथे त्याने पाश्चिमात्य तत्वज्ञानावर त्याने जी व्याख्याने दिली तीच पुढे The history of western philosophy या पुस्तकाचा आधार ठरली. (दोन वर्षांपूर्वी मी मोठ्या उत्साहाने हा ठोकळा मागवला आणि उघडलाही, पण पुस्तकाचा आकार, भाषा, अगम्य विषय यामुळे लवकरच तो अशोक काकांच्या हातात आणि पुढे त्यांच्याच कपाटात गेला.)

दुसय्रा महायुद्धात मात्र त्याने आधीपेक्षाही जास्त प्रकट विरोध दाखवला. आणि पुन्हा एकदा तुरुंगाची हवा खाऊन आला. पण या सगळ्यात त्याची लोकप्रियता वाढतच गेली. तेव्हा पॅट्रिशियाशी काडीमोड घेऊन त्याने ज्युडिथ फिंचबरोबर लग्नं केलं होतं. त्याच्याच काही वर्ष आधी त्याला ब्रिटीश राजाकडून ऑर्डर ऑफ मेरीट मिळालेलं होतं, तुरुंगात जाऊन येणाय्रा लोकांना राजाकडून सन्मान, हे जरा विचित्रच होतं. आणि त्याच्याच पुढच्या वर्षी त्याला साहित्यातला नोबल पुरस्कारही मिळाला. बी.बी.सी.वर अनेक माहितीपटांत, मुलाखतींमधे रसल दिसायचा. त्यामुळे कोणत्याही (हो अगदी कोणत्याही) विषयावर "तुम्हाला अमुक गोष्टीबद्दल काय वाटतं?" असं त्याला विचारलं जात असे (म्हणजे आपल्याकडची ही प्रथापण इंपोर्टेडच!). एका अपघातातून वाचलेल्या थोडक्या लोकांत तो असल्यामुळे The history of western philosophy ची विक्री वाढली आणि रसलचं उत्पन्न स्थिरावलं.

पुढे शांततेचा पुरस्कर्ता अशी त्याची ओळख जगाला झाली. व्हिएटनाम युद्धाच्या विरोधात आणि संदर्भात रसल आणि आईनस्टाईनने अकरा अणुशस्त्रसज्ज देशांनी ती अस्त्रे निकामी करावीत असा मॅनिफेस्टो (मराठी प्रतिशब्द?) प्रकाशित केला. महात्मा गांधी आणि रसल यांच्यातही अहिंसा, शांतता अशा विषयांवर पत्रांद्वारे चर्चा झाली होती. आयुष्याच्या शेवटच्या वर्षात त्याने आत्मचरीत्राचे तीन खंड लिहिले. शरीर म्हातारं झालं तरी त्याचा मेंदूमात्र मरेपर्यंत पूर्वीसारखाच तल्लख राहिला. अगदी शेवटच्या दिवशीही त्याने टाईम्ससाठी लिखाण केलं.

रसलची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली. (त्यांची माहिती अर्थात जालावर मिळेलंच, पण मी वाचलेली पुस्तकं आणि त्यावर माझी थोडी मतं, ती नाही लिहिली तर मग काय लिहिलं? थोडी मतं "जुनी" आहेत, कारण आता गेल्या पहिलं पुस्तक वाचून पूर्ण झाल्याला पाचेक वर्ष झाली.)
मी रसल वाचायला सुरूवात Why I am not a Christian पासून केली. हे पुस्तक वाचायचं असेल आणि सगळ्या निबंधांचा आस्वाद घ्यायचा असेल तर ख्रिश्चन धर्माबद्दल, १९व्या शतकाचा शेवट आणि २०व्या शतकाची सुरूवात या काळात इंग्लंडमधे कसं वातावरण होतं याची माहिती असेल तर हे माहिती असलं तर बरं. नसेल तरीही बरेचसे निबंध/लेख समजतात. Thomas Paine वरचा लेख मात्र मला (माझ्याच आळसामुळे) नीट समजला नाही.
पण मला सगळ्यात आवडलं ते Science and religion! तडाखेबंद फलंदाजी ... आपलं आर्ग्युमेंट्स! एकेक वाक्य अगदी मोजून मापून, अभ्यास करून लिहिलं आहे (मला असा एक परिच्छेद लिहिता नाही येत). एक शब्द इकडचा तिकडे नाही, कमी नाही की जास्त नाही. यातसुद्धा धर्म म्हणून ख्रिश्चॅनिटीच घेतली आहे, पण थोडे संदर्भ बदलले तर थोड्या-बहुत प्रमाणात सगळीकडे सारखेच लोक दिसतात त्याचं प्रत्यंतर येत रहातं (मी हे वाचलं तेव्हा त्याच्याच देशात होते, म्हणूनही मला असं वाटलं असेल, आणि दोनेक वर्षांपूर्वी वाचलंय त्यामुळे आता खूपसं आठवत नाहीये). हिंदू धर्माबद्दल त्याने जे लिहिलंय त्यात मात्र बय्राच "चुका" वाटतात; करण बहुदा तेव्हाएवढा कर्मठपणा आजच्या हिंदू समाजात नाही, उदा: सती, विधवा केशवपन प्रथा!
Conquest of happiness हे त्याचं पुस्तक सगळ्यात गाजलं. ते त्यानी पैशांसाठीच लिहिलं होतं. वाचताना अगदी ए-वन नाही वाटलं तरी बाजारू वगैरे अजिबातच नाही. याचं मराठी भाषांतर "सुखी माणसाचा सदरा"ही तेवढ्याच ताकदीने करुणा गोखल्यांनी उभं केलंय. गेल्या शतकाच्या सुरवातीच्या कालात लिहिलं गेलेलं हे पुस्तक आजही, आपल्या भारतीय समाजालाही वाचण्यासारखंच आहे. विशेषतः त्याने जे लग्नाचं पिढीनिशी वाढत जाणारं वय, एकटं रहाण्याची, मुलं जबाबदारी वाढवतात म्हणून मुलं होऊ न देण्याची किंवा उशीरा होऊ देण्याची सगळ्यांची वृत्ती, कामाचा अतिरिक्त ताण, त्यांचा माणसाच्या घरावर आणि स्वतःवर होणारा परिणाम या सगळ्यांवर त्याने जवळजवळ १०० वर्षांपूर्वी जे लिहिलंय ते आजही वाचताना तेवढंच लागू पडतं असं वाटतं.
The problems of philosophy आणि The history of western philosophy या दोन पुस्तकांवर माझी काहीही मतं नाहीत. आधी लिहिल्याप्रमाणे, ही दोन पुस्तकं कपाटात ठेऊन द्यायची, लोकांवर इंप्रेशन मारायला! मी The problems of philosophy ची दोन पानं वाचली आहेत, काहीही न समजता, तेव्हा कोणाला त्यात गती असेल तर कृपया मदत करा.
What I believe सध्या माझ्यासाठी "work under construction" आहे, त्यामुळे फार काही लिहिता येणार नाही. पण पुन्हा एकच वर्णन, तडाखेबंद फलंदाजी!
रसलची आणखीनही बरीच पुस्तकं, निबंध वाचण्यासारखे आहेत. त्याचा एक निबंध, In praise of idleness, माझ्यासारख्या आळशी आणि अनेक गोष्टींत रस असणाय्रांना आवडेलसा; त्याचं मराठी भाषांतर इथे आहे. (धन्यवादः बिपीन कार्यकर्ते). आता त्याच्याच विचारांचं, आळशीपणाचं समर्थन करून थांबते.

वाङ्मयइतिहाससाहित्यिकलेखशिफारस

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Aug 2008 - 11:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या लेखातल्या त्रुटींची जबाबदारी माझी नसून माझ्या आळशीपणाची आहे! :-)

अदिती

विसोबा खेचर's picture

30 Aug 2008 - 11:59 pm | विसोबा खेचर

अदिती, धन्य आहे तुझी आणि तुझ्या वाचनव्यासंगाची..!

साला, आपल्याला इतकं विंग्लिश कळतंच नाय तर विंग्रजी लेखक काय वाचणार कप्पाळ?! :)

आम्ही फक्त पुलं, श्रीना आणि जयवंत दळवी वाचतो...! आपल्या मातीशी नातं सांगणारं मायमराठीतलं त्यांचं लेखनच वाचायला बरं वाटतं! :)

आपला,
(वाचनाची फारशी आवड नसलेला) तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Aug 2008 - 12:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तात्या, धन्यवाद! पण खरं सांगायचं तर मलाही काही वर्षांपूर्वी असलं काही वाचायची बिल्कुल हौस नव्हती. तुम्हाला लेख वाचून कळलंच असेल खरं श्रेय अशोक काकांचं आहे ते! घोडीला पाण्यापर्यंत नेण्याचं सगळ्यात कठीण काम त्यांनीच केलं, आता घोडी पाणी पिते त्यात काय नवल?

आणि खरंतर मी श्रीना कधीच वाचले नाहीयेत, जयवंत दळवींचं एक पुस्तक कधीतरी लहानपणी वाचलं होतं, त्यामुळे ठणठणपाळ म्हणालात तर कोणाबद्दल एवढंच मला समजेल.

(लहानपणी रशियन परीकथा वाचणारी) अदिती

नंदन's picture

31 Aug 2008 - 12:08 am | नंदन

लेख, अतिशय आवडला. रसलच्या आयुष्याची आणि त्याच्या पुस्तकांची ओघवती ओळख तुम्ही करून दिली आहे.

बाकी बर्थ कंट्रोलला जनन नियंत्रणाबरोबरच संततिनियमनही चालू शकेल. रसलला समकालीन असणार्‍या आणि भारतात संततिनियमनाचा पुरस्कार असणार्‍या र. धों. कर्व्यांच्या विचारावर रसलचा (किंवा त्याच्या पालकांचा) कितपत प्रभाव होता, हेही जाणून घेणे रोचक ठरेल. (अवांतर - मॅनिफेस्टोला जाहीरनामा हा प्रतिशब्द चालू शकेल.)

रसलचे आत्तापर्यंत 'मॅरेज अँड मॉरल्स' हे एकच पुस्तक वाचले आहे, पण त्यातही तुम्ही लिहिले आहे त्याप्रमाणे त्याची विद्वत्ता, नेमके आणि मोजके शब्द वापरायची शैली जाणवत राहते. त्याच्या आत्मचरित्रातला हा परिच्छेद त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारा ठरावा.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Aug 2008 - 12:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुखी माणसाचा सदरा आणि मॅरेज ऍण्ड मॉरल्स दोन्ही वाचल्यावर मला असं वाटायला लागलंय की मॅरेज.. चं पण भाषांतर व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते विचार पोहोचले पाहिजेत.

अदिती

आणि हो, प्रतिशब्द सुचवल्याबद्दल धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Aug 2008 - 12:23 am | बिपिन कार्यकर्ते

ऍट लास्ट.... अदिती मी बरेच दिवस ह्या लेखाची वाट बघत होतो... विनंतिला मान दिल्याबद्दल धन्यवाद. रसलबद्दल तशी साधारण माहिती होती. तुझ्यालेखात अजून काही डिटेल कळले. आता त्याच्या तुला आवडलेल्या पुस्तकाबद्दल पण लिही...

बिपिन.

धनंजय's picture

31 Aug 2008 - 12:25 am | धनंजय

रसल याच्या आत्मचरित्राचे तीन खंड कॉलेजमध्ये वाचले, आणि हा विनोदी, विचारी लेखक आवडून गेला. रसलचे "The history of western philosophy" हे हल्ली माझ्या बिछान्याशेजारी ठेवलेले आहे - आणि अधूनमधून दोन-दोन चार-चार पाने वाचतो. त्यातली भाषा ओघवती आणि सोपी असल्यामुळे पुस्तक सहज वाचले जाते, पण कल्पना गहन असल्यामुळे नीट समजायला पुन्हापुन्हा कित्ता गिरवावा लागतो.

त्यांच्या लोकाभिमुख विषयांवरील व्याख्यानसंग्रह "Mysticism and Logic" हा माझ्यापाशी आहे, आणि त्यातली व्याख्याने एक-एक करून वाचतो आहे. यातलीही भाषा समजायला तशी सोपी आहे, विचार गहन आहेत. यात अदिती यांनी सांगितलेल्या काही व्याख्यानांचे पुनर्संकलन झालेले आहे.

माझ्याकडचे त्यांचे "Theory of Logical Atomism" पुस्तक मात्र तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांसाठी दिलेल्या व्याख्यानांचा संग्रह आहे. त्यातील आशय मला समजायला बर्‍यापैकी जड जातो आहे. पण जितपत समजतो आहे, पुष्कळ पटतो आहे.

माझ्या वैचारिक पठडीवर रसल यांच्या विचारपद्धतीचा सर्वाधिक प्रभाव आहे, असे मला कित्येकदा लक्षात येते.

माझ्याही या आवडत्या लेखकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद, अदिती.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Aug 2008 - 8:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद धनंजय.

मी अजूनही रसलचं आत्मचरित्र वाचलेलं नाही आहे, पण लवकरच तेही सुरू करेन. Mysticism and Logic आणि Theory of Logical Atomism बद्दल मला माहित नव्हतं. पण आता असं दिसतंय पुन्हा एकदा दुकानाकडे जायला पाहिजे.

अदिती

धनंजय's picture

3 Sep 2008 - 1:45 am | धनंजय

रसेल यांचे थोडे लेखन मी अनुवादित केलेले आहे :
"बल"आदि न्यूटन-संकल्पनांचे आधुनिक भौतिकशास्त्रात स्थान (बर्ट्रंड रसेल यांचे लेखन)

शिवाय त्या ठिकाणी त्यांच्या मूळ इंग्रजी लेखनाचा दुवाही दिलेला आहे.

विकास's picture

31 Aug 2008 - 2:44 am | विकास

रसेलवरील लेख आवडला! अशा विविध विषयांची /व्यक्तींची माहीती वाचताना अजून बरेच काही शिकायचे आहे/जाणून घेयचे आहे हे समजते :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Aug 2008 - 8:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एका अपघातातून वाचलेल्या थोडक्या लोकांत तो असल्यामुळे The history of western philosophy ची विक्री वाढली आणि रसलचं उत्पन्न स्थिरावलं.

या वाक्याचा नीट अर्थबोध होत नाही अशा तक्रारी आल्यामुळे:

एका विमान अपघातात ४८ पैकी २४ प्रवासी वाचले, त्यांतला रसल एक होता. त्यामुळे (सहानुभूतीची लाट येऊन) अपघातापूर्वी तीन वर्ष प्रसिद्ध झालेल्या The history of western philosophy ची विक्री वाढली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2008 - 8:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बर्ट्रांड रसेलच्या आयुष्याविषयी,पुस्तकाविषयींचा लेख माहितीपूर्ण आहे, आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भडकमकर मास्तर's picture

31 Aug 2008 - 9:18 am | भडकमकर मास्तर

एकदम माहितीपूर्ण लेख..
धन्यवाद...

दोनेक वर्षांपूर्वीच्या लोकसत्तेमध्ये ,लोकरंग रविवार पुरवणीत बहुतेक, रसेल आणि टिळक यांच्यात एक थोर गणिती आणि थोर तत्त्वज्ञानी या अर्थाने बरीच साम्ये होती आणि ते तसे समकालीनही होते, याबद्दल लेख होता..... ( कदाचित टिळक एका खटल्याच्या निमित्ताने १९१७ ते १९१९ चुभूद्याघ्या इंग्लंडात होते तेव्हा त्यांची आणि रसेलची भेट व्हायला हवी होती किंवा कदाचित झाली होती , असे काहीसे वाचल्याचे स्मरते...)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मेघना भुस्कुटे's picture

31 Aug 2008 - 9:20 am | मेघना भुस्कुटे

लेखाला प्रतिसाद द्यायच्या आधी हा अवांतर प्रतिसाद -
मग तू 'सुंदर वासालिसा' आणि 'डेनिसच्या गोष्टी - व्हिक्तर द्रागून्स्की'पण वाचलं असशील. वाचलंयस?
आता लेखाबद्दल -
चांगला झाला आहे लेख. आता रसल वाचायची उत्सुकता कितीतरी वाढली आहे.
तू पद्मजा फाटकनं 'गर्भश्रीमंतीचं झाड'मधे रसलवर लिहिलेला लेख मिळवून नक्की वाच. तुला जाम आवडेल.
आणि 'मॅरेज ऍण्ड मॉरल्स'वर काही नाही? मी किती उत्सुकतेनं वाट पाहत होते!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Aug 2008 - 9:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी लेखात लिहिलंय तसंच आता काही पुस्तकं वाचून दोन-तीन वर्ष झाली. पुन्हा एकदा आता ते वाचेनच लवकर आणि प्रत्येक पुस्तकावर हवं तर स्वतंत्र लिहिते.

मी 'गर्भश्रीमंतीचं झाड'बद्दल ऐकलं होतं असं अंधूकसं आठवतंय, आता मिळवायला पाहीजे.

स्वाती दिनेश's picture

1 Sep 2008 - 1:03 pm | स्वाती दिनेश

वा! रसेलबद्दलचा लेख आवडला.
'गर्भश्रीमंतीचं झाड' अगदी गर्भश्रीमंत आहे..जरुर वाच..
स्वाती

सहज's picture

31 Aug 2008 - 10:17 am | सहज

सर्वप्रथम पुस्तकांची आवड आहे पण काम, आळस, वेळेचे गणीत, आंतरजालावर अडकले जाणे व अधुन मधून कमजोर आकलन यांच्यामुळे आपल्यासारखे इतर कोणाचेही वाचन रडतखडत चालले हे बघून जरा बरे वाटले :-)

एकंदर असे वाटु लागले आहे की मुळ इंग्रजी पुस्तकांच्या नादी न लागता जरा अनुवाद, रुपांतर आधी उचलावे. कोणास रसल यांच्या मराठी अनुवादाविषयी माहीती असल्यास कृपया इथे द्यावी.

धन्यवाद संहीता.

अवांतर एक प्रश्न - मानसशास्त्राच्या हिशोबातुन एखाद्या अभ्यासकाला ठीक आहे पण जेव्हा एखाद्याचे लेखन जेव्हा "लेखन" म्हणुन चर्चा केली जाते तेव्हा त्या लेखकाचे आई-वडिल अन्य नातेवाईक यांचे कोणाशी व का शारीरिक संबध होते ह्याचा उल्लेख / चर्चा आवश्यक आहे का? तसे लिहले नसते तर काय एकंदर ह्या लेखात फरक पडला असता का, अपूर्ण वाटला असता का?

मेघना भुस्कुटे's picture

31 Aug 2008 - 11:01 am | मेघना भुस्कुटे

अवांतर उत्तर - या सगळ्याचा लेखनाशी थेट संबंध नाही हे खरंच आहे. पण फक्त मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समीक्षा करणार्‍यालाच हे तपशील माहीत असावेत असं थोडंच आहे. रसलच्या काळाचा विचार करता त्याने जे काही विचार मांडले ते अक्षरशः स्फोटक होते. असे विचार मांडणारी माणसं काही आभाळातून पडत नाहीत. त्यांना त्यांचा इतिहास - भूगोल असतो. काही पार्श्वभूमी असते. त्याचे पडसाद त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर उमटलेले असतात, म्हणून ती माणसं तशी होतात. हे जाणून घेणं मनोरंजक नाही का? दुर्गाबाईंची आई लहानपणीच गेली होती, त्या ज्या आजीजवळ वाढल्या ती उत्तम वाचन असणारी नि आधुनिक विचारांची होती, दुर्गाबाईंना आयुष्यात कधी कुणाचा मिंधेपणा पत्करावा न लागता स्वतंत्र बुद्धीनं अभ्यास करता यावा म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी पोष्टात काहीएक रक्कम ठेवून दिली होती, तसाच लग्न न करण्याचा दुर्गाबाईंचा निर्णय सहजपणे स्वीकारला होता - हे सगळं दुर्गाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काहीच सांगून जात नाही?
रसलच्या आयुष्याच्या या माहितीच्या आधारे मी काही त्याचं मनोविश्लेषण करू शकत नाही. पण त्यामुळे त्याची विचारपद्धती मला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येते, हे मात्र नक्की.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Aug 2008 - 12:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला फक्त रसलची ओळख करून द्यायची होती आणि (मला असं वाटतं की मेघनानी माझं बरंचसं काम केलेलं आहे.) मी त्याच्या पुस्तकांबद्दल आत्ता इथे जास्त लिहिलं नाही आहे आणि मा़झा तो विचारही नव्हता, पण कोणीही त्याची पुस्तकं वाचली (/असतील) तर त्याचे विचार एवढे "आत्यंतिक" कसे झाले याचा अंदाज कदाचित त्याच्या बालपणातून येऊ शकतो. बाकी रसलचेही अनेक स्त्रियांबरोबर संबंध होते जे त्या काळात खूपच वादळी ठरले होते. आजही प्रिंस चार्ल्सचं लग्न घटस्फोटीतेशी झालं तर (ब्रिटीश) मीडीयाने त्याबद्दल प्रचंड धुरळा उडवला होता. तेव्हा अर्ल रसलच्या घरात विचित्र असं काही झालं होतं ....

(अवांतरः अजून १०० वर्षांनी अदिती एवढी विक्षिप्त का होती याबद्दल जेव्हा ब्रिटीश लोक पेलएल.कॉम लिहितील तेव्हा ते मिपाचा उल्लेख नाही का करणार?)

अवलिया's picture

31 Aug 2008 - 11:06 am | अवलिया

ओझरता परिचय सुद्धा आपण बरेच काहि अभ्यासले आहे याची चुणुक देवुन गेला.
अशीच अनेक लेखकांची आमच्या सारख्या मराठी, संस्कृत शिवाय इतर साहित्याशी परिचय नसणा-यांना व्हावी
जेणे करुन दुस-याच्या अनुभवाने तरी का होईना शहाणपण शिकण्याची मनीषा पुर्ण होईल

पुढील लेखनास मनापासुन शुभेच्छा
(दर आठवड्याला एक तरी लेख वाचायला मिळावा असे वाटते)

नाना

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2008 - 11:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद.

>> अशीच अनेक लेखकांची आमच्या सारख्या मराठी, संस्कृत शिवाय इतर साहित्याशी परिचय नसणा-यांना व्हावी
मग आम्हा "असंस्कृत" लोकांसाठीही काही लिहा, नाना!

ओझरता परिचय सुद्धा आपण बरेच काहि अभ्यासले आहे याची चुणुक देवुन गेला.
किंवा तसं नाटक करू शकते! ;-)

अदिती

ऋषिकेश's picture

31 Aug 2008 - 7:59 pm | ऋषिकेश

वा अदिती,
अतिशय माहितीपूर्ण लेख. तितकाच वाचनीय. लेखविषयाला मस्त साजेशी सैली.
मी रसल साहेबांचे काहिच वाचले नाहि आहे. आता जरूर वाचेन.
या सुंदर लेखाबद्द्ल आभार
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

आनंदयात्री's picture

1 Sep 2008 - 11:17 am | आनंदयात्री

छान ओळख, लेखाकाची पार्श्व्भुमी समजल्यावर त्याचे लिखाण जास्त समजुन घेता येते.
धन्यवाद.

मनस्वी's picture

1 Sep 2008 - 11:48 am | मनस्वी

छान ओळख करून दिलीएस अदिती.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

लिखाळ's picture

2 Sep 2008 - 5:06 pm | लिखाळ

रसलची सुंदर पद्धतीने ओळख करुन दिलीत. प्रतिसाद सुद्धा छान आहेत, माहितीत भर पडली.
रसल विषयी अजून काही लिहिलेत तर आनंदाने वाचीन.
आपण दिलेल्या दुव्यावरील अनुवादित लेख सुद्धा वाचला. फार छान आहे.
--लिखाळ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Sep 2008 - 5:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद नंदन, बिपीन, सहज, मेघना, ऋषिकेश, आंद्या, मनस्वी, स्वाती ताई, भडकमकर मास्तर, तात्या, नाना, लिखाळ, धनंजय et al.

रसल विषयी अजून काही लिहिलेत तर आनंदाने वाचीन.
:-)
पुन्हा एकेक पुस्तकं नीट वाचून एकेक पुस्तक परिक्षण लिहिण्याचा विचार आहे, वाचक आहेत असं वाटतंय.
फक्त मी तत्त्वज्ञानाचा नीट अभ्यास केलेला नाही त्यामुळे जाणकार लोक, समजून घ्या जरा!

अदिती

मन's picture

2 Sep 2008 - 7:12 pm | मन

यथोचित ओळख करुन दिलीत.
आता, वरती लिहिल्याप्रमाणं एकेका पुस्तकाचं परिक्षण वगैरे पण लिहा.
पु ले शु.

पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत
आपलाच,
मनोबा

चित्रा's picture

19 Aug 2009 - 8:10 pm | चित्रा

लिखाळ यांनी दिलेल्या http://www.misalpav.com/node/9007 या चर्चेतील दुव्यामुळे हा लेख परत वाचला.

थॉमस पेन यांच्या " दी एज ऑफ रीझन" http://www.infidels.org/library/historical/thomas_paine/age_of_reason/pa... पेन यांचे या पुस्तकात विस्तृत आणि स्पष्ट लेखन सापडेल. ते वाचल्यानंतर रसेल यांचा लेख समजू शकेल. (मी स्वतः रसेल यांचा लेख न वाचल्याने काही लिहू शकत नाही). अ‍ल गोर यांच्या लिखाणात मध्ये पेन यांचा उल्लेख पाहून हे पुस्तक नंतर वाचले होते). यात मुख्य रोख ख्रिश्चन धर्मातील विशेषतः बायबलमधील श्रद्धांवर असला, तरी आपल्याही पुराणे/आणि तत्सम धार्मिक साहित्यास असेच निकष लावता येतील असे वाटले होते.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Aug 2009 - 11:06 am | प्रकाश घाटपांडे

सुंदर परिचय करुन दिल्याबद्दल धन्य. वाद नको.
रसेल ची फलज्योतिषाबद्द्लची मते काय होती? हे कुणी सांगितले तर बरे होईल. सध्या माझे वाचन व उत्साह यांच्याशी जवळीक कमी झाल्याचे प्रकर्षाने जाणवले.असो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

भोचक's picture

20 Aug 2009 - 1:33 pm | भोचक

धन्यवाद अदिती. तु्झ्यामुळे रसेल थोडा का होईना कळला.

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/