गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४३

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
28 Apr 2015 - 10:37 pm

मागिल भाग..
पण त्यांच्या सरकारात-कामाला गेलं,की त्यांचं धोरण पाळणं अटळ असे. कारण जर का ते एकदा जरी चुकलं,की त्यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हायची..ती कायमचीच!
पुढे चालू...
==================================================

या त्र्यंबक गुरुजींच्या सहवासात, मार्केटींग फंडे असं ज्याला हल्ली म्हणतात ते मी अगदी भरपूर म्हणजे भरपूर पहात होतो. पण तरिही मला असं वाटायचं, की खरा व्यावसायिक तोच ज्याच्याजवळ स्वतःचे ग्राहक गोळा होतातं. आणि जातीवंत धंदेवाइक तो की जो स्वतःच गिर्‍हाइकांजवळ गोळा होतो. (प्रसंगी अगदी लोळागोळाही होतो...बरं का! ) पण आता तुम्ही म्हणाल , "आहो आत्मारामभट्ट!!!...हा धर्म आहे हो. सारखं व्यावसायिक/धंदेवाइक, ग्राहक/गिर्‍हाइक ही काय भाषा वापरताय? तुम्हाला काहि वाटतं ...की नाही? " तर मी यावर एकच सांगिन की जगातल्या प्रत्येक धर्मात धंदा असतो,आणि धंद्यातंही धर्म असतो. आणि अश्याही या जगात जाती दोनच , एकिचा - धर्म हाच धंदा आणि दुसरिचा - धंदा हा खरा धर्म! यातला पहिला जो असतो त्याचं वैशिष्ठ्य:- "आपल्याला जे हवे,तेच ग्राहक माथी मारायचे!" आणि दुसर्‍याचं वैशिष्ठ्यः- "ग्राहकाला जे हवे,ते त्याला देण्यास्तव आपण स्विकारायचे!" .

आम्ही यातले दुसर्‍या क्याट्यागरीतले! म्हणजे भटजी असलो..तरिही माणसासारखे वागू..रिअ‍ॅक्ट होऊ. पण यातले पहिले जे महायोगी असतात,ते माणूस असले तरीही कायम भटजी सारखेच वागतात. त्यांना ते स्वतः वजा जाता उरलेलं आख्खं जग कायम "कस्टमर"च्याच रूपात दिसत असतं. हे यांचं अगदी प्रमूख मूलभूत वैशिष्ठ्य! त्यातंही ही जमात नुसत्या वेषावरून ओळखता येत नाही. कारण आमचा धोतर,टोपी,नेहेरुशर्ट हा पारंपारिक ड्रेस, कींवा धोतर आणि वरती अंगावर फक्त उपरण हा प्राचीन सनातनी ड्रेस असो.. कुठच्याहि काळात ह्या-ड्रेसला चिकटून रहाण्यात ही प्रथम जमात अगदी अग्रेसर असते. तसे पुरोहितप्रधान धर्मश्रद्धांच्या आहारी गेलेलेही काहि बिचारे आयुष्यभर धोतरटोपी शिवाय दुसरे कपडे घालत नाहीत,बाहेर कुठेही खातपित देखिल नाहीत. पण तो त्यांच्या भोळ्या आणि धार्मिक मनाचा आविष्कार असतो. उलट ही पहिली जमात मात्र हाच ड्रेसकोड धंदेवाइक प्रवृतीनी अगदी जाणिवपूर्वक स्विकारते. म्हणजे घरातून सकाळी कामाला निघताना संध्यावंदन देवपूजा इत्यादी केलेली असो वा नसो.पण ह्या धोतरटोपी ड्रेस बरोबरच..,अंगावर भस्माचे पट्टे ओढणे,त्यावर सुबक टिळा-काम करणे,..गळ्यात गंडे माळा घालणे, हा मेकअप मात्र हे लोक अगदी न विसरता करतात. यजमानासमोर तोंडातली भाषादेखिल साक्षात ब्रम्हदेवाला लाजवणारी असते. म्हणजे यजमानाच्या घराची बेल वाजवल्यानंतर दार उघडलं गेलं की लगेच त्याच्या तोंडावर "सुप्राभात" सारखे प्रशिक्षित शब्द मोहाच्या पाण्यात घोळवून मारणे. काम संपेपर्यंत यजमानाला मधूनमधून सारखी, "आपण खरच-खरे धार्मिक आहात",किंवा "आपल्या सारख्या लोकांमुळेच हे जग* चाललेलं आहे" अशी वाक्य वेळ पाहून टाकणे. (*काय शब्दवापर आहे, तिच्यामायला!) काम ठरतेवेळी किंवा झाल्यावर यजमान दक्षिणेची विचारणा करू लागताच , "आहो...आपण-देणारे आहात,आपल्या-जवळ काय मागणार आंम्ही?" किंवा "आपण कमी कधिच काहिच देत नाही,असं आंम्ही इथे ऐकून आहोत..त्यामुळे आपल्याकडून का आज कमी दिलं जाईईईईईईल????" अशी वरतून अत्यंत निस्वार्थी दिसणारी हृदयस्पर्शी वाक्य वापरून आतून त्याला अपेक्षीत फास लावणे. ह्या सगळ्या कामात ही जमात अगदी माहिर!

उलट आमची ही जी दुसरी जमात आहे..ती बोलायला रोखठोक. जो आवाज आत तोच बाहेर. भाषा प्रसंगी रुक्ष असली तरी कामामधे कमालीची नम्र दिसेल. बायकापोरांना घेऊन नाटका शिनुमाला गेली किंवा प्रवासाला निघाली.. तरी जाताना मुद्दाम ठरवून अंगावर ड्यूटीचाच तो धोतरटोपी ड्रेस ठेवणार नाही.. आपल्या किंवा घरच्यांची हौस किंवा इच्छेसाठी शर्टपँटही घालेल. आणि महत्वाचं म्हणजे,ह्या दोन्हीचंहि प्रदर्शन कधीच मांडणार नाही. म्हणजे भटजी असले.., तरी अंगावर असतील ते कपडे. त्यांचा अहंकार नव्हे! * पूजेच्या कामाचे पैसे जे आधी ठरलेले असतील्,तेव्हढेच नंतर घेतील!!! कुणी कामाची पद्धती आवडल्यामुळे आपणहून चारपैसे जास्त दिले,तर तेही जवळ ठेवतील,पण तो आपला "हक्क" आहे,असं कधीच समजणार नाहीत..याउलट कोणत्याही कारणानी ठरलेले पैसे बुडाले,किंवा कमी मिळाले..तर चिडतील नक्कीच! पण त्याचा जाहिर तमाशा कधिही मांडणार नाहीत. त्यामुळे गडगंज पैसा असलेली आणि नसलेली अशी दोन्ही मंडळी ह्यात दिसतील...पण ती वखवखलेली कधीच पहायला सापडायची नाहीत. (* :- याच जागी ही वरच्या जमातीतली लोकं धोतरटोपी ड्रेस असला,तर "आंम्ही कशी मूळ धर्मातलं वस्त्रपरिधानशास्त्र पाळतो..पहा!" याचीही जाहिरात करतील,आणि त्या जागी शर्टपँटं घातली,तर "आम्ही आधुनिक वस्त्रंही परिधान करतो,मागास नै कै आम्ही!" याचीही जाहिरात करतील.)

असो...बरच आत्मपुराण लावलं. पण वरती म्हटल्या प्रमाणे ह्या कामात खरी मजा यायला लागते..ती स्वतःचे ग्राहक (पक्षी:-यजमान) जमायला लागल्यावरच. मला तर पहिली तीनएक वर्ष, स्वतःकडे साधा सत्यनारायण जरी ठरला तरी जग जिंकल्याची भावना मनात येत असे. पण लगेच मागून काकाचं ,"आत्मू...सांभाळ बरं..!" हे वाक्य कानावर येत असे. त्यामुळे मी लगेच जमिनीवर .. पण यजमान घरी पाऊल ठेवलं आणि आत गेल्यावर ते लहान पोरांचं सुखावणारं, "गुलुजी आले गुलुजी आले..." किंवा एखाद्या नाजुक आवाजाचं, "गुरुजी..यां हं! बसा!" हे वाक्य आलं.. की क्षणभर का होइ ना? आमचं इमान टेकऑफ व्हायचच. पण शहर पुणे असल्यामुळे मागूनच एखादा खौट म्हातारा किंवा चाणाक्ष आज्जीबाई , "पाय धुवून घेताय ना .. बाथरुम रिकामी आहे!" असा चेंडू टाकायची आणि पुन्हा एकदा आंम्ही परत जमिनीवर. काय असतं ना की दुसर्‍या एखाद्या गुरुजीच्या हताखाली हमालीला गेल्यावर आपल्यावर सदर यजमान ,धार्मिकदृष्ट्या-आनंदी अथवा समाधानी करण्याची विशेष अशी जबाबदारी नसते. तिथे काय..मुख्य गुरुजी सांगेल तो जॉब डन्नं केला की झालं. पण एकदा स्वतःचे यजमान सांभाळणे ह्या प्रांतात आपला शिरकाव झाला,की प्रत्येक पावलागणिक जपून वागावे,चालावे,बोलावे लागते. आता यजमान जमायला सुरवात झाल्याच्या उमेदीच्या काळात ह्या गोष्टींची जाणिव असतेच असं नाही. ती हळूहळू अनुभवानी येत जाते. पण एकदा आपलं काम लोकांच्या पसंतीला उतरु लागलं,की मग मात्र आपली नामप्रसिद्धी खरोखरच उदबत्तीच्या सुगंधासारखी चहुकडे आपोआप दरवळू लागते. कामातला आत्मविश्वास दुणावू लागतो.कित्येकदा (आपले)यजमानच आपलं नाव दुसर्‍या माणसाला आपणहून पुढे सरकवू लागतात. म्हणजे, "आमच्या गुरुजींना बोलाव एकदा,आवाज असा दणदणीत आणि खतरनाक आहे की नै,की एकावेळी तुमच्या वाड्यात बाजुच्या दोन घरातपण गणपती-बसेल!" कींवा "आमच्या गुरुजीला बोलाव...काम परफेक्ट आहे,आणि ठरलेल्या पैश्यात करतो..उगीच हिते 'आता दोनशे ठेवा' ,तिथे 'नंतर शंभर ठेवा' असली अचानक धाड मारत नाय साली!, तुमच्या त्या &^%$%#गुरुजी सारखी!" किंवा तश्याच एखाद्या घरातली आजीबाई , "समजुतदार आहे हो आमचा भटजी..समईला नुसत्याच वाती असल्या,तर आपणहून काड्यापेटी तेल मागून घेऊन लावतो हो समयासुद्धा! " अशी कुठेतरी नकळत प्रसिद्धी करवून जाते.. तर एखादी दक्ष यजमानपत्नी तिच्या महिला-मंडळात, "तुमच्या त्या ह्या गुर्जीपेक्षा आमचा बरा! नुसती मंत्रांची क्यासेट वाजवत नाही..कुठलं?कुठे?काय?कशाला?कसं? ..असा सगळा अर्थ समजावून सांगतो, अगदी व्यवस्थित!" असं आपलं कार्ड-देऊन जाते.

आता एव्हढं सगळं कथाकथन केल्यानंतर आपल्याला स्वाभविक असा प्रश्न पडेल की या पुण्यासारख्या शहरातला गुरुजी लोकांचा कामांचा आणि यजमान-मिळण्याचा काळ कोणता? तर तो कालावधी क्रमांक १ म्हणजे 'श्रावण ते नवरात्र' आणि क्रमांक २ म्हणजे 'दिवाळी ते ज्येष्ठ महिना,म्हणजेच सामान्यतः सप्टेंबर ते मे एंडिंग' यातल्या श्रावणाची चाहुल आषाढात साधारण श्रावणीसत्यनारायण ,मंगळागौरी आणि लघुरुद्र ठरण्याचे फोन येऊ लागले की होते. मनाला अशाअपेक्षांचे पल्लव झुंडीनी फुटतात. सारी भटजमात कामाच्या डायर्‍या आणि पेनं सरसावून बसते. आणि मग उजाडतो तो पहिला श्रावणी शनिवार रविवार सोमवार मंगळवार.. ! दिसायला हे चार वार वेगवेगळे असले,तरी पुरोहितकर्म करणार्‍यांच्या दृष्टीने हा एकची वार असतो. मग शनिवार उजाडतो.ती भली पहाट होते..आणि एरवी बीनकामाच्या दिवसाला सकाळी आठाठ वाजेस्तोवर निद्रीस्त असलेले आंम्ही युद्धावर निघाल्याच्या आविर्भावात बाहेर पडतो. मग सकाळी सहा ते दुपारी दोन किंवा चांगले चार वाजेपर्यंत..एखाद दोन लघुरुद्र आणि साधारणतः तितकेच सत्यनारायण होऊन..आमची गाडी घराकडे सरकते. जरा घरी जाऊन पडणे होत नाही,तर एखादा 'दगा मिळालेला' मिळालेला त्रयस्थ यजमान अचानक कुठून तरी आपला नंबर मिळवून फोन करतो.
त्र.यजमानः- ओ काका* (* ही पुण्यातली, गुरुजी या शब्दाची पर्यायी-तोड आहे! ;) )
आंम्ही:- (झोपेतून वैतागून उठत..) क्काय?
त्र.यजमानः- अत्ता लगीच या (ना!)
आंम्ही:- कशाला?
त्र.यजमानः- कशाला मंजी काय? पूजेला!
आंम्ही:- पण मीच का येऊ?
त्र.यजमानः- आमच्या-काका'नी बांबू दिला ना राव!
आंम्ही:- अरेरे!!! असं झालं का?
त्र.यजमानः- हा ना राव! अचानक येव्हढेच पैशे द्या म्हनायला लागला,आन निस्तं तेव्हडे देतो म्हन्लो तर येत णाय म्हनला !
आंम्ही:- अहो,पण मी अत्ता फार थकलोय.तुम्ही दुसरं कोणीतरी बघा ना!
त्र.यजमानः- दुसरे पन थकलेत!
आंम्ही:- ............
त्र.यजमानः- येता ना म आता!?
आंम्ही:- (हताश होऊन...) सांगा पत्ता, कुठे यायचं त्याचा!
त्र.यजमानः- लोनी इके दाम्ले आळीच्या फुडच्या चौकात बत्तीशशिराळे मावावाल्याच्या दुकाणामागं..मामा सराईतांच्या वाड्यात माडीवर रावसाहेब शिंदेंकडं या!!! कोपर्‍यातली ला...............श्टंची-खोली!
आंम्ही:- बरं बरं... पूजेची तयारी झाली का?
त्र.यजमानः- हा!!!. खुंट बांधूण तयारे! तुमी आले की परसाद करायला घिऊ. (हे वाक्य 'फास लाऊन तयारे,तुम्मी आले की लटकवू!' असे वाचावे.)
आंम्ही:- बरं आलोच मग.

मग आपण आपले लगबगीनी तयार होतो. बायकोला, "ए..चहा टाक गं..जरा" असं वाक्य टाकुन तोंड धुवून फ्रेश्श होतो. आणि धोरताच्या निर्‍या काढता काढता परत त्याच यजमानाचा "आमचा (पहिला) काका आला!" असा भयंकर चीड आणणारा फोन येतो. आणि समजा नाही आला असा फोन,तरी तिकडे गेल्यावर आपलं नवोत्साहीत यजमान संग्राहक मन खरच फासावर जायला सुरवात होते. जे खुंट बांधलेले आहेत्,असं हे महाशय सांगत असतात. ते आपण गेल्यावर तोफेचं तोंड वाकावं,तसे चौरंगावर मान टाकलेले असतात. मग ते रावसाहेब त्या चौरंगाकडे पाहुन..आपल्याला फोन केलेला असतो त्या नोकरावर "ए...गायबान्या..त्ये खुंट गेल्यावर्षी आन्लेवते का?..काड त्ये..आनी जा मंडईला..आनी आन दुसरे.." असा बाँम्ब टाकतात. घर शिटीत असल्यामुळे , मंडई जवळच असते. परंतू हा नोकर तिकडे निघाल्यानंतर मालकिणबाई त्याला, "त्ये सत्यनारायन्चं बॉक्स पन आन येक! आनी पाणं,फुलं,तुळशी,हार,दूर्वा,फळं पन(?) आन" अशी जवळजवळ सगळ्या पूजेच्या यादीचीच ऑर्डर देते. आणी स्वतः आंम्हाला "चा" देऊन, शिरा-करायला जाते. मग आपल्याला या घरी नेहमी येणारा गुर्जी 'डब्बल पैशे' का सांगतो? याचं ज्ञान आणि भान येतं. आणि तो तसला नको असलेला यजमान पुढची तीनेक वर्ष तरी आपल्या गळ्यात-पडून आपली साधारण तेथून एकाच्या जागी दोन तासानी बोळवण होते. आणि घरी आल्यावर आपला चेहेरा पाहून बायकोला 'खरा सत्यनारायण' कुणाचा झाला? याचा अंदाज येतो.

मग शनिवार संपुनी रविवाराची येते अखेर वेळ,आणि श्रावणी रविवार..म्हणजे काय??? अहो... दिवसभर सत्यनारायणाचा खेळ!
सकाळी सातला घर सोडल्यापासून ते दुपारी जेवायच्या वेळेपर्यंत सामान्यतः तीन ते चार सत्यनारायण (आमच्यासह..)खरोखरच धारा-तीर्थी पडतात. आणि मग त्या चमत्कृतीपूर्ण तसेच कंटाळवाण्या कथेच्या नवसागरी धुंदीतून आख्खा दिवस मन बाहेर पडत नाही ते नाहीच . मागे एकदा या कथेवरून वैतागलेला माझा परमंमित्र किश्याच मला म्हणलेला.."आत्म्या..मला जर का शक्य असतं ना तर मी थेट वैकुंठात जाऊन ही कथा लिहिण्याची बुद्धी प्रथम आपल्या कोणा भटास झाली त्याचा स्वर्गातला पत्ता काढून आधी त्याला नरकात पोहोचवला असता!" आता किश्याचं हे मत भावुक आणि टोकाचं असलं,तरी सत्य आहे हो मंडळी. आहो..,या पूजेच्या नावात जे सत्य आहे..ते या कथेत नावाला देखिल नाही हो! आणि तरी आंम्हाला चरख्यात रस संपलेला उस जसा चिपाड होईपर्यंत पिळला जातो,तसं या कथेत स्वतःला पिळून अगदी चोथा करुन घ्यावं लागतं. काय तो साधुवाणी आणि त्याला ते महान तत्वज्ञान सांगणारा तो भगवंत सत्यदेव! पुन्हा आधुनिक टीव्ही मालिकांनाही मागे टाकेल अशी ती एक वाक्य चार अंगानी आपल्या अंगावर फेकणारी ती त्या कथेची वाक्य रचना! अगदी अंतर्मनावर वळ उठविणारी अशी.. निव्वळ महान! "राजाने साधुवाण्याकडे पाहिले..नंतर साधुवाण्याकडे राजाने पाहिले...मग हा बोलला...नंतर त्याने ऐकले.. " हे एक वाक्य चार बाजूनी ढीश्श...ढीश्श... करत फ्लॅश करणं..नाहीतर काय दुसरं!? पण ह्यात त्या कथा रचणार्‍याला तरी आपण किती दोष देणार...?बहुसंख्य पब्लिकला जे आवडणारं असतं..तेच तर मालिकावालेही प्रोजेक्ट करत असतात ना? त्यामुळे यात कुणा एकाला सर्वस्वी दोषी धरता येत नाही ते नाहीच. मग मला, " शेवटी धर्म हे सुरवातीपासून सामाजिक दृष्ट्या दोन बाजू आणि राजकीय दृष्ट्या तिसरी कंगोर्‍याची बाजू असलेलं नाणं आहे"...हे सखाराम काकाचं वाक्यच यातील सत्य सांगून जातं. आणि मग रविवारचा तो सत्यनारायण स्पेशल डे मी पाच सहा नारायणांना पंचामृतानी अंघोळी घालत घालत घरी येऊन संपवतो...तो माझ्या स्वतःच्या अंघोळीनी. शेवटी अंघोळ हा एक मानव जातीवर उपकार करणाराच आचार आहे...दिवसभर थकलेलं विटलेलं तनंही तो साफ करतो,आणि मनंही.

मग आमच्या, स्वानंदेशा ब्रम्हगणेशा गजानना आजी..मानसपूजा सावध चित्ते करितो ती घ्या जी! या गणपतीच्या मानसपूजेच्या चालीवर गाणं रचायला भाग पाडणारा काहिसा आनंददायक श्रावणी सोमवार येतो. लघुरुद्र स्पेशल श्रावणी सोमवार! एकतर हा आनंददायक होतो..याचं प्रमुख कारणं हा सामुहिक कामाचा विधी असतो. आणि सामुहिक मंत्रपठण हे तनामनाला खरोखरच एक आनंददायक अनूभुती देत असतं. त्यामुळे कामाचा मनावर भार असा होत नाही. त्यातील रुद्रपठण हे देखिल एकच एक असलं..तरी त्या सत्यनारायणाच्या टोटल वन म्यान शो सारखं ते अंगावर येत नाही. कारण आपल्या बरोबर दुसराही कोणितरी म्हणत असतो ना! त्यातंही तो लघुरुद्र एखाद्या कमी गर्दाळलेल्या शंकराच्या देवळात असेल..तर त्याच्या मिळणार्‍या पैश्यापेक्षा मनःशांतीच्या दृष्टीनी (यजमानाबरोबरच!) आपल्यालाही अत्यंत लाभदायक. तशीही शिवंशंकर ही देवता माझी अत्यंत लाडकी.(का? .. ते आपणास ठाऊक आहेच! :D ) आणि ती त्या देवालयात शांततेत लाभली तर लहान मुलाला बागेत मोकळा झोपाळा मिळाल्याइतकी आनंददायी. आहाहाहा ! काय तो सीन असतो. सकाळी सहा वाजल्या पासून आपण निरनिराळ्या घरांमधून लघुरुद्र करत करत शेवटच्या पत्त्यावर येतो.. आणि तिथे आल्यावर कळतं की यजमानाच्या सोसायटीत त्यांचं तिथे पूर्वी वाडा असताना असलेलं..शंकराचं देऊळ आहे. यातल्या फक्त एव्हढ्याच बातमीनी माझं दिवसभराचं गाडीवरून शहरभर हिंडून थकलेलं अंग सुखावतं. देवळा बाहेरच्या नळावर चपला काढून पायावर ग्गार पाणी घेण्यापासूनच या मनःशांतीची सुरवात होते.

आत गेल्यावर ४/५ सहकारी गुरुजी लोकंही आलेले असतात. मुख्य गुरुजी आणि यजमान आत गाभार्‍यात पूजेला सुरवात करायच्या बेतात असतात. आणि पुण्यातल्या जुन्यामंदिरांची खासियत असलेल्या त्या डोक्यावर आतून उंच घुमट असलेल्या विशिष्ट रचनेच्या गाभार्‍यात, प्रथम गणपति आणि इष्टकुलंआराध्य दैवतांच्या नावे विडा ठेवायच्या मंत्रात आपण न कळत सहभागी होऊन ते मंत्र म्हणत जातो. दिवसभर थकलेले असल्यामुळे सगळ्यांचाच आवाज खर्जाला आलेला असतो..पण शेवटी तोच खर्ज त्याचे धीरगंभीर पडसाद आपण म्हणलेल्या मंत्रांच्या शारीरंपरिणामरूपानी शरीराच्या त्वचेच्या आतल्या भागापासून ते मेंदूच्या ब्रम्हस्थान म्हणावं अश्या मध्यापर्यंत सर्व काहि अंतर्गत हलका मसाज करावा तशी अद्भुत किमया घडवून देह शांत करतो. आणि जणू काहि हे दिवसाभरातलं पहिलंच काम आहे,असा एक ताजेपणा मनाला काहि क्षणात लाभतो. पुढे रुद्राची आवर्तने अतिशय उत्साहानी होतात..आणि शेवटचे आवर्तन प्रथेप्रमाणे सावकाश ,उच्च स्वरात आणि सामुहिक होते. त्याच्या एंडिंगचं नमःपार्वतीपते हरं हरं महादेव... हे घोषवाक्य परत तसलाच काहिसा सूर मनावर उमटवून जातं..आणि नंतर आरती मंत्रपुष्प कधी होऊन गेला ते कळतंही नाही...इतक्या झटकन हे अंतर मन पार करून जातं. आणि मग येते शेवटी होणारी शिवप्रार्थना .. हा तर लघुरुद्रातला आनंदाचा गाभाच असतो. मग शेवटी कोणी ती शिवस्तुती म्हणो...अथवा रत्नै:कल्पितमासनं.. ही मानसपूजा म्हणो.. दोन्हीच्या नंतर हमखास म्हटलं जाणारं ए़डिंगचं, "करचरणकृतं कायजंकर्मजं वा.." हे भैरवी सारखं सुरु झालं..की अगदी दिवस सार्थकी लागल्याची भावना मनात येते. मग देवळातून बाहेर आल्यावर बाकिच्या पुरोहितां बरोबर 'एकंदर दिवस कसा-गेला?' याची एक लहानशी ठरलेली चर्चा झडते..आणि घोड्याला टाच मारल्यासारखी गाड्यांना किका मारून..आमचं हे काहिसं आनंदी झालेलं देहाचं गाठोडं घराची वाट धरतं! ........
=====================================
क्रमशः
मागिल सर्व भाग:- १.. २.. ३.. ४.. ५.. ६.. ७.. ८.. ९.. १०.. ११.. १२.. १३.. १४.. १५.. १६.. १७..(मंगलाष्टक स्पेशल)१८.. १९.. २०.. २१.. २२.. २३.. २४.. २५.. २६.. २७(यज्ञयाग विशेष!) २८.. २९.. ३०.. ३१.. ३२.. ३३.. ३४(विवाह विशेष-१) ३५(विवाह विशेष-२) ३६ (विवाह विशेष-३) ३७.. ३८.. ३९.. ४०.. ४१ .. (खेडेगावातील नाटक..) ४२..

संस्कृतीसमाजजीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

रेवती's picture

29 Apr 2015 - 12:03 am | रेवती

ग्रेट!

वाह! मन प्रसन्न झाले लेख वाचून.

यशोधरा's picture

29 Apr 2015 - 1:00 am | यशोधरा

आवडले.

खटपट्या's picture

29 Apr 2015 - 1:07 am | खटपट्या

खूप छान

रामपुरी's picture

29 Apr 2015 - 1:50 am | रामपुरी

या सगळ्याचा गुरूजींच्या बाजूने कधी विचारच केला नव्हता. :)

अत्रन्गि पाउस's picture

29 Apr 2015 - 3:44 am | अत्रन्गि पाउस

गुरुजी कधी स्वत:च्या घरी सत्यनारायण करतात का हो ? आणि केला तर स्वत:च पूजा करतात का कुणाला बोलवतात ?

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2015 - 6:50 am | अत्रुप्त आत्मा

हो ! करतात. स्वत:ला येत असल्यामुळे स्वत:च करतात. परंतु या छोट्या गोष्टिंशिवाय इतर कामांना त्यांना ही दुसरे पुरोहित बोलावणे भागच पडते.

सुबोध खरे's picture

29 Apr 2015 - 10:06 am | सुबोध खरे

हे म्हणजे न्हाव्याला आपले केस कापायला दुसर्या न्हाव्याकडे जायला लागते तसे किंवा एका डॉक्टरला सर्टिफिकेट साठी दुसर्या डॉक्टरची सही लागते तसे.
सही आहे

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2015 - 10:20 am | अत्रुप्त आत्मा

न्हाव्याचे उदाहरण जास्त चपखल. न्हावी दाढी स्वत:ची स्वत: करू शकतो, "केस" मात्र दुसरिकडेच सोपवावी लागते! :-D

पॉइंट ब्लँक's picture

29 Apr 2015 - 8:38 am | पॉइंट ब्लँक

लई भारी. तो लघुरुद्राचा भाग मस्त जमलाय :)

स्पा's picture

29 Apr 2015 - 12:09 pm | स्पा

सॉलिड सुरु आहे आत्मुस

सुबोध खरे's picture

29 Apr 2015 - 12:21 pm | सुबोध खरे

बाकी लेख सर्वच उत्तम आहेत. आपण आपल्या धन्द्याची गुपिते अशी उघडी करू नये.ह. घ्या.
उदा. लक्ष्मी रोड वर एक पाटी होती डॉ. काळे आणि बाजूला बाण दाखवून लिहिलेले होते "वर जाण्याचा रस्ता"
आचार्य अत्र्यांनी आपण आपल्या धन्द्याची गुपिते अशी उघडी करू नका असा सल्ला त्यांना दिला होता याची यावरून आठवण झाली.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2015 - 12:34 pm | अत्रुप्त आत्मा

ह्हा ह्हा ह्हा! :-D
अत्रे म्हणजे अत्रेच!

कपिलमुनी's picture

29 Apr 2015 - 2:01 pm | कपिलमुनी

लहानपणी श्रावणात / गणपती विसर्जनादिवशी एका दिवसात १०-१२ सत्यनारायण घालायचे म्हणून एक ओळखीचे गुरुजी मला कथा वाचायला नेत. पूजा झाली की ते पळायचे नंतर मी कथा वाचायचो .
बरेच जण विशेषतः वृद्ध मनोभावे ऐकायचे . मज्जा यायची . स्पेशल वाटायचे मग दुध केळे किंवा जेवण + दक्षिणा मिळायची.( गुर्जींशिवाय त्या वेळी ११ रु म्हणजे लै झाला . २ रब्बरी बॉल यायचे).

गुर्जी : उत्तर पूजा पण करा .. नैतर पुण्यामधले गुर्जी उत्तरपुजेला टांग मारण्यात प्रसिद्ध !

अत्रुप्त आत्मा's picture

30 Apr 2015 - 9:02 am | अत्रुप्त आत्मा

@ गुर्जी : उत्तर पूजा पण करा .. नैतर पुण्यामधले गुर्जी उत्तरपुजेला टांग मारण्यात प्रसिद्ध>>> :-D काय ब्रे उत्तर द्यावे या "पूजेला!?" ;-)
अंssssssssss!! हांss! अहो,अक्षत-ठेवतो की उत्तर पूजेची! म्हणजे यजमानांचा परत दक्षिणेचा खर्च नै का वाचत!? ;-)

नीलमोहर's picture

29 Apr 2015 - 2:27 pm | नीलमोहर

छानच, नेह्मीप्रमाणे !!

स्वधर्म's picture

29 Apr 2015 - 2:45 pm | स्वधर्म

शैलीही सुरेख.

प्रचेतस's picture

29 Apr 2015 - 3:45 pm | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच भारी लिखाण....येकदम बुवास्टैल.

खंडेराव's picture

29 Apr 2015 - 5:37 pm | खंडेराव

मस्त झालाय हा भाग..आता हळुहळु आधीचेही वाचुन काढतो.

अजया's picture

29 Apr 2015 - 7:14 pm | अजया

नेहेमीप्रमाणे छानच!

राही's picture

29 Apr 2015 - 7:51 pm | राही

(तसे सर्वच भाग आवडले, पण) हा भाग खूपच आवडला. विशेषतः ते 'धंदा आणि धर्म'वाले पहिले तीन परिच्छेद.
आणखी निरुपण येऊंदे.

शालेय जीवनात भिकारदास मारूतीमंदीराच्या मागे नारद मंदीरात "भटजी कट्टा" पाहत असे त्याचे गूढ आज उमगले.
जीवनतत्वे फक्त वाचण्यापेक्षा स्वानुभवाने "वेचण्यात"(आणि मिपा वाचकांना देण्यात) आपण एकमात्र बुवा (कुठलीही बुवाबाजी न करणारे)!!!

बुवांच्या लिखाणाचा पंखा
नाखु

विवेकपटाईत's picture

1 May 2015 - 7:56 pm | विवेकपटाईत

वाचताना निखळ आनंद मिळाला. च्ययला 'निखळ' हा मराठी शब्द नुकताच कुठेतरी ऐकला होता. म्हंटले वापरून पाहू.

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2015 - 10:01 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह!!!!!!

योग्य धागी निखळला हो शब्द अगदी! ;-)

सतिश गावडे's picture

1 May 2015 - 10:05 pm | सतिश गावडे

तुम्ही "धू बाई धू" सारख्या कार्यक्रमांचे किंवा "धूवू बाई जोरात" सारख्या नाटकांचे स्क्रिप्ट उत्तम लिहू शकाल.

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2015 - 11:31 pm | अत्रुप्त आत्मा

हो का? व्वाह! फारच छाण "रुमाल" आणलात आपण!
ढणाजि राव वाक् डे! ;-)

सतिश गावडे's picture

2 May 2015 - 10:07 am | सतिश गावडे

अहो तुमच्या कलागुणांचं चीज व्हावं म्हणून मी म्हटलं. अगदी या प्रतिसादातसुद्धा तुम्ही "रुमाल" शब्द वापरुन तुम्ही ते दाखवून दिलंत.

ज्याचं करावं भलं, तो म्हणतो माझंच खरं.

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2015 - 10:41 am | अत्रुप्त आत्मा

@ ज्याचं करावं भलं, तो म्हणतो माझंच खरं.>> खल्लच टुम्मि माज्जं बलच भलं कल्ता! कच कलत नै,,,,,नै??? :P

प्रचेतस's picture

2 May 2015 - 11:04 am | प्रचेतस

भाग ४४ येऊ द्या हो अता.

सतिश गावडे's picture

2 May 2015 - 11:17 am | सतिश गावडे

तुमची प्रतिभा इतकी ओसंडून वाहते त्यामुळे ते शेंबडया पोरालासुद्धा कळेल.

ते जौद्या. वयजूचे पुढे काय झाले ते सांगा. =))

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2015 - 1:45 pm | अत्रुप्त आत्मा

@ त्यामुळे ते शेंबडया पोरालासुद्धा कळेल.>> अरे खरच की!!!! तुम्हालाही कळ्ळच नै का ! :P

सतिश गावडे's picture

2 May 2015 - 2:00 pm | सतिश गावडे

तेच तर म्हणतोय.
तुमच्यासारख्या "धू बाई धू" आणि "धुवू बाई जोरात" सारखे स्क्रिप्ट लिहिण्याची ताकद असलेल्या लेखकापुढे आम्ही काही बाही खरडणारे शेंबडी पोरंच.

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2015 - 2:55 pm | अत्रुप्त आत्मा

चला!!! , रुमाल योग्य जागी लागला,दिल्याचं सार्थक झालं! आता मी कळफ़लक मिटायला मोकळा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 May 2015 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणे मस्त भाग !

पुभाप्र.

गुर्जीगिरीचे खुसखुशीत किस्से मस्त !

जुइ's picture

2 May 2015 - 8:16 pm | जुइ

झक्कास एकदम!!!