परदेशातला संस्कृती संगम

कल्पक's picture
कल्पक in जनातलं, मनातलं
31 Aug 2014 - 1:44 am

गेल्या अनेक शतकांपासून माणूस हा शिक्षण, नोकरी, व्यवसाय, समृद्धी ह्या कारणांसाठी स्थलांतर करतोय आणि नविन प्रदेशाशी जुळवून घेताना आपले खाद्यपदार्थ, भाषा, संगीत, कला आणि संस्कृती ह्यांचं आवर्जून जतन करतोय. आज तंत्रज्ञानामुळे आणि प्रगतीच्या संधींमुळे देशादेशातील अंतर कमी होऊन अनेक संस्कृती एकमेकांमध्ये मिसळत आहेत. आणि जागतिक खेड्यातील ह्या संस्कृतीसंगमामध्ये प्रगतीसाठी धडपड हा एक समान धागा आहे. अशा संस्कृतीसंगमामध्ये खाद्य पदार्थ, भाषा, संगीत, कला, ज्ञान यांची देवाणघेवाण होते आहे. विविध देशांमध्ये वावरताना या संस्कृतीसंगमाचा वारंवार प्रत्यय येतो.

काही वर्षांपूर्वी मलेशियातील क्वालालुम्पूर शहरात 'सर्वाणा भवन' या हॉटेलमध्ये जेवण्याचा योग आला. तिथे खास केळीच्या पानावर अतिशय उत्तम दर्जाचे पारंपरिक दक्षिण भारतीय पदार्थ ग्राहकांना खायला मिळतात. हॉटेलच्या अंतर्गत रचनेमध्ये दक्षिण भारतीय संस्कृतीचं सुंदर दर्शन होते. दक्षिण भारतीय चित्रकला, मूर्तीकला यांनी भिंती सजवलेल्या दिसल्या. तिथे जेवताना अगदी आपण चेन्नईच्या हॉटेलमध्ये जेवतो आहोत असा भास होतो. तिथल्या पदार्थांची खास पारंपरिक अशी चव आणि उत्तम दर्जा पाहून न राहवून मी त्यांना ह्या चवीचं आणि दर्जाचं रहस्य विचारलं, तेव्हा असं कळलं कि 'सर्वाणा भवन' हॉटेलच्या प्रत्येक शाखेतील स्वयंपाकी हे त्यांच्या चेन्नई शाखेतून खास प्रशिक्षण घेतलेले असतात. त्यामुळे जगातील १२ देशात असलेल्या त्यांच्या एकूण ४६ हॉटेल्समध्ये एकाच शैलीची आणि दर्जाची चव चाखायला मिळते. या हॉटेलमध्ये विविध देशातील लोक तमिळ पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेताना दिसले. क्वालालुम्पूरच्या कार्यालयात काम करताना माझे इंग्लिश हस्ताक्षर पाहून एका चिनी माणसाने तू संस्कृत शिकला आहेस का असे विचारले! मला काही कळेचना! तो म्हणाला कि तुझ्या इंग्लिश अक्षराचे वळण संस्कृत लिपीप्रमाणे आहे, मग कळले की त्याला ते देवनागरी लिपीशी साधर्म्य असणारे वाटले. क्वालालुम्पूरमध्ये भारतीय लोकांची संख्या लक्षणीय असल्यामुळे रस्त्यावरून सहज फिरताना दुकानांमध्ये भारतीय सिनेमाच्या सीडी-डीवीडी विक्रीसाठी लावलेल्या दिसतात, अधून मधून हिंदी सिनेमाच्या गाण्यांचे स्वर कानावर पडतात. त्यामुळे आपण भारतातच आहोत असा भास होतो.

नेदरलँडमधील अॅमस्टरडॅम या शहरात केवळ आठवडाभर राहिलो तेव्हा खाण्याचे हाल होण्याची परिस्थिती आली होती. निवासाच्या हॉटेल जवळच एक चिनी हॉटेल सापडले. त्यामुळे थोडे मसालेदार खाण्याची सोय झाली. त्या हॉटेलमध्ये प्रथमदर्शनी बिजिंग शहराचा एक मोठ्ठा फोटो आणि आजूबाजूला चिनी ड्रॅगनची चित्रे आणि चिनी प्रतीके लावली होती. मेनू कार्डच्या चिनी, डच आणि इंग्लिश अशा तीन आवृत्त्या होत्या! चिनी, डच आणि इतर युरोपीय लोक मसालेदार चिनी पदार्थांवर ताव मारत होते. तरी हे पदार्थ भारतातल्या चिनी पदार्थांएवढे मसालेदार नव्हते. त्यामुळे अतिरिक्त मीठ घ्यावे लागले. त्यात मी मागितलेले Salt हे त्या चिनी वेटरला काही केल्या कळेना! शेवटी कागदावर Salt असे लिहून दाखवल्यावर मीठ मिळालं!

लंडनच्या हिथ्रो विमानतळावर अशाच प्रकारचे जागतिक संमेलन अनुभवाला आलं. जगातील बहुतेक सर्व खंड, देश याचं प्रतिनिधित्व त्या विमानतळावर पाहायला मिळालं. गेल्या अनेक शतकांपासून शिक्षण, व्यापार याचे लंडन केंद्र असल्यामुळे तिथे अनेक देशांचे लोक स्थलांतरित झालेले दिसतात. तिथल्या पार्किंगमध्ये हिंदी सिनेमाचं गाणे गुणगुणत उभ्या असलेल्या टक्सी चालकानं "ऒए पाज्जी कित्थे जाना है?" असे विचारल्यावर क्षणभर मुंबईतच आहोत कि काय असं वाटलं.

अमेरिकेतील डेनवर या शहरातील डाऊन टाऊन भागात भारतीय, चिनी, जर्मनी, इटालीअन, ब्राझिली, पेरुअन, थाई, सिंगापुरी, अमेरिकी, मेक्सिकी, जपानी अशा विविध देशातील उपाहारगृहांची मेजवानी अनुभवायला मिळते. प्रत्येक उपाहारगृहात त्या त्या देशातील चित्रे, चिह्ने, शिल्प यांची सजावट पाहायला मिळते. अनेक हॉटेल्समध्ये पारंपरिक संगीत कानावर पडते. थाई हॉटेल्समध्ये थायलंडच्या हत्तींची चित्रे, शिल्पे, बुद्ध मुर्ती असतात. एका जपानी हॉटेलची रचना जपानी घरासारखी केली होती. रस्त्यावरून एक कुंपण, अंगण आणि जपानी शैलीचं कौलारू घर दिसतं आणि आत गेलं की एखाद्या जपानी घरात जेवणाची सोय केली आहे असं वाटतं. आतमध्ये मोट्ठे गोल आकाराचे लाकडी टेबल आणि स्टुलाप्रमाणे असलेल्या खुर्च्या होत्या. घराच्या आत असलेल्या भिंतीवर प्राण्यांचे मुखवटे, जपानी हस्तकला आणि प्रतीके लावली होती. मेनू कार्डाचे डिजाईनसुद्धा जपानी चित्रे-प्रतीके यांनी नटलेले होते. जेवणाच्या पार्श्वभूमीला मंजुळ असे जपानी संगीत ऐकायला मिळाले. एका मंगोलियायी हॉटेलमध्ये ग्राहकांना हवी ती डिश हव्या त्या घटकांची निवड करून प्रत्यक्ष ग्राहकासमोर एका मोठ्ठ्या तव्यावर तयार करून मिळते. म्हणजे ग्राहकांनी हव्या त्या भाज्या, सॉस आणि इतर पदार्थ निवडायचे आणि मग एका मोठ्या तव्यावर आचारी ते पदार्थ एकजीव करून गरम करून देतो. हे करताना आचारी त्या प्रक्रियेचे गमतीशीर वर्णन मोठ्या आवाजात आणि विविध आविर्भावासकट करतो. प्रत्येक ग्राहकाला अशाच तऱ्हेने जेवण मिळते. भारतीय हॉटेल्स मध्ये भारतातली चित्रे लावली असतात आणि हिंदी सिनेमाच्या गाण्यांचे स्वर कानावर पडतात. अशी विविध देशांच्या हॉटेल्समध्ये जेवताना काही क्षणांसाठी त्या देशातील खाद्यपदार्थांबरोबरच त्यांच्या संस्कृतीची झलकच अनुभवायला मिळते. अमेरिकी लोक खूप उत्साहाने अशा विविध देशीय उपाहारगृहात पदार्थांचा आस्वाद घेताना दिसतात. चिनी आणि भारतीय उपाहारगृहात खास मसालेदार पदार्थांसाठी अमेरिकी लोकांची गर्दी असते.

डेनवरच्या कार्यालयात "हा भारतीय पदार्थ कसा करायचा?" "चहा कसा करायचा?" "हा मसाला कोणत्या भारतीय दुकानात मिळेल?" अशी विचारणा अमेरिकन सहकारी करायचे. काही अमेरिकन्स तर रेडी टू इट भारतीय पदार्थ जेवायला घेऊन यायचे. एकदा माझ्या अमेरिकी सहकार्यानं मला इंल्गीशमध्ये विचारलं "आज माझ्या डब्यात काय असेल?…गेस?" मी म्हंटलं "काय बुवा?" तर तो खास अमेरिकन उच्चारात म्हणाला "फनिर ठिख्खा मसाला!" एक अमेरिकन सहकारी प्रत्येक वेळेस भेटला कि "हे भारतीय हॉटेल तू पहिलं आहेस का? मी गेल्या आठवड्यात तिथे गेलो होतो!" असं दर वेळेस मलाच माहित नसलेलं नवीन भारतीय हॉटेल सांगायचा! एकदा तर त्यानं मला विचारले "तू घरून रोज माझ्यासाठी जेवणाचा डबा आणशील का? मी तुला प्रत्येकी $10 देईन!!" हे ऐकून मला हसू आवरेना!

अमेरिकेत सार्वजनिक बसमधून उतरताना वाहकाला Thank you असे म्हणण्याची रीत आहे आणि वाहक त्याला उत्तर म्हणून You are welcome. Have a good evening असे म्हणतात. एकदा मी बसमधून उतरताना वाहकाला Thank you असे म्हणालो तर त्या अमेरिकन वाहकाने चक्क हिंदी भाषेतून मला "शुक्रिया! शुभरात्री!" असे म्हंटले आणि मी उडालोच! नंतर असे कळले कि कोणी भारतीय माणसाने त्याला हे हिंदी शब्द शिकवले होते आणि तो भारतीय प्रवासी उतरला कि असे हिंदी भाषेत उत्तर द्यायचा. किंबहुना तो वाहक अशा प्रकारे बऱ्याच भाषेतील शब्द शिकला होता आणि प्रवासी पाहून तो ते वापरायचा.

डेनवरच्या बँकेत असलेले काही कर्मचारी मी किवा कोणी भारतीय लोक काउंटर गेले कि हात जोडून "नमस्ते" असे म्हणायचे! मुळचा इथोपिअन वंशाचा असलेला माझा अमेरिकन बॉस बरेचदा "नमेस्ते" असे म्हणायचा. माझ्या कार्यालयातले काही सहकारी "आम्ही असे ऐकले आहे कि क्रिकेटमध्ये एकावेळी एकच batsman असतो आणि त्याने मारलेला चेंडू सीमेला लागला तर ४ रन मिळतात हे खरे आहे का?" असे आश्चर्याने विचारायचे. बोस्टनला एकदा एका अमेरिकन माणसाने "सचिन तेंडूलकर कोण आहे?" हे विचारून माझीच विकेट काढली होती. पण अमेरिकन लोकांना क्रिकेटचे असे आकर्षण किवा फार माहिती नसते हे पचवायला मला वेळ लागला!

जॉर्जिया राज्यातल्या अल्फारेट्टा या गावात लक्षणीय प्रमाणात नोकरदार भारतीय लोक राहतात. त्यामुळे तिथे बरीच भारतीय दुकानं, उपहारगृह आहेत. क्रिकेट वर्ल्ड कप सामन्यांच्या काळात या गावात राहण्याचा योग आला.त्यावेळी तिथल्या भारतीय उपहारगृहामध्ये चक्क मोठ्या पडद्यावर अंतिम सामन्याचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं! अंतिम सामना, नाश्ता आणि जेवण असं खास तिकीट होतं आणि सामन्याच्या दोन-तीन दिवस आधीच सगळी तिकिटं विकल्या गेली होती! अमेरिकेतल्या वेळेनुसार पहाटे ४ वाजता वर्ल्ड कप अंतिम सामना असूनसुद्धा त्या उपहारगृहामध्ये इतकी गर्दी झाली कि शेवटी आणखी एक पडदा उपहारगृहाच्या बाहेर लावून लोकांना बाहेर उभे राहून सामना पाहण्याची सोय करण्यात आली!

कॅलिफोर्नियामध्ये तर मिश्र संस्कृतीचे फार अनुभव येतात. इथे स्थलांतरित आशियायी लोकसंख्या बहुसंख्येत आहेत. भारतीय, चीनी, जपानी, मध्यपूर्वेतील लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे. सानफ्रान्सिस्कोला जाणाऱ्या रेल्वेमध्ये तर ७०% भारतीय आणि चीनीच दिसतात. त्यामुळे रेल्वेमध्ये भारतीय आणि चीनी भाषातील गप्पांना उत आला असतो. सानफ्रान्सिस्को हे शहर म्हणजे मुंबईच्या दादरसारखं आहे. तिथे वैविध्यपूर्ण उपहारगृहांची रेलचेल आहे. भारतीय, थाई, चीनी, मध्यपुर्वीय, युरोपीय अशा विविध देशांची वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रशस्त उपहारगृहं आहेत.

मध्यंतरी कॅलिफोर्नियातल्या एका मित्राने नवीन कार घेतली म्हणून फोटो पाठवले होते, कारच्या फोटोसोबत त्याने नारळ फोडला त्याचे फोटो होते. त्याच्या सोसायटीमध्ये चक्क नारळ फोडण्यासाठी एक कायमस्वरूपी ओटा तयार केला आहे आणि तिथे "कोकोनट ब्रेकिंग प्लेस" असं लिहिलं आहे!!

कॅलिफोर्नियातील आमच्या कार्यालयात अमेरिकन, चीनी, जपानी, भारतीय, पाकिस्तानी, युरोपीय असे विविध संस्कृतींचे प्रतिनिधी एकत्र काम करतात. त्यामुळे सहज जाता येता इंग्लिश, मराठी, तेलुगु, हिंदी, उर्दू, जपानी, चीनी अशा भाषा कानावर पडतात. विविध देशांचे पदार्थ कार्यालयाच्या कॅन्टीनमध्ये खायला मिळतात. कॅलिफोर्नियातसुद्धा अमेरिकी लोकांना भारतीय खाद्यपदार्थांचं खूप आकर्षण आहे. माझ्या एका अमेरिकी सहकार्याने गेल्या ख्रिसमसला त्याच्या मित्रांना चक्क गाजर हलवा तयार करून खायला घातला! आणि त्यांना तो खूप आवडलासुद्धा!

मध्यंतरी आमच्या कार्यालयात एक सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात आला. त्यात प्रत्येकाने आपापल्या देशाची वेशभूषा आणि खाद्यपदार्थ यांचं सादरीकरण केलं. सगळ्या देशांचे झेंडे, विविध संस्कृतींची प्रतीके, चित्रे, शिल्पे, खाद्यपदार्थ यांनी कॅन्टीन सजलं होते. भिंतीवर चीनी ड्रॅगन होता, टेबलावर गणपती होता, दुसऱ्या टेबलावर सांताक्लोज होता. सगळेजण आपापल्या पारंपरिक वेशभूषेत विविध देशांच्या खाद्यपदार्थांचे आस्वाद घेत होते. विविध देशांचं संगीत कानावर पडत होतं. संस्कृती, वेश, भाषा, कला, संगीत, खाद्यपदार्थ विविध होते पण सगळ्यांमध्ये प्रगतीचं आणि स्नेहाचं समान सूत्र होतं. एका प्रातिनिधिक विश्वसंस्कृतीचा सकारात्मक संगम तिथे अनुभवायला मिळाला.

निखिल वेलणकर
अल्फारेट्टा

(मूळ लेख दैनिक लोकसत्ताच्या 'लोकरंग' पुरवणीत १७ ऑगस्ट रोजी प्रकाशित झाला)

वावरसंस्कृतीकलासमाजजीवनमानदेशांतरलेख

प्रतिक्रिया

रेवती's picture

31 Aug 2014 - 7:33 am | रेवती

लेख आवडला.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

31 Aug 2014 - 9:55 am | माईसाहेब कुरसूंदीकर

लेख आवडला.पूर्वी मंडळी भल्या मोठ्या बॅगांतून लोणच्याच्या बरण्या,मेतकूट्,पापड,सांबार पावडर असे अनेक जिन्नस अमेरिकेला वा परदेशी नेत.तो जमाना गेला म्हणायचा.
सगळीकडेच आता बर्गर व बटाटेवडे मिळायला लागल्याने खाद्यसंस्कृती संगम झाला म्हणायचा.

दादा कोंडके's picture

31 Aug 2014 - 10:38 am | दादा कोंडके

(मूळ लेख दैनिक लोकसत्ताच्या 'लोकरंग' पुरवणीत १७ ऑगस्ट रोजी प्रकाशित झाला)

खरं तर हा लेख चंपक किंवा तत्त्सम मासिकांमध्ये छापायला योग्य आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

31 Aug 2014 - 10:52 am | माईसाहेब कुरसूंदीकर

तू आमच्यासारखाच भारतात राहणारा दिसतो आहेस.असो.आम्चे वय झाले. पण तुला संधी मिळेल केव्हातरी.

दादा कोंडके's picture

31 Aug 2014 - 11:16 am | दादा कोंडके

;) :D

कवितानागेश's picture

31 Aug 2014 - 2:18 pm | कवितानागेश

दादा, तुम्ही अजूनही चंपक वाचता? :)

रामपुरी's picture

3 Sep 2014 - 4:43 am | रामपुरी

चंपक नसेल तर मुक्तपीठ चालेल काय?

दादा कोंडके's picture

3 Sep 2014 - 9:35 pm | दादा कोंडके

खरच. शोभून दिसेल तिथे.

-(ब्रह्मे) दादा

दिपक.कुवेत's picture

31 Aug 2014 - 2:14 pm | दिपक.कुवेत

आवडला. "कोकोनट ब्रेकिंग प्लेस" तर खासचं.

सखी's picture

3 Sep 2014 - 10:04 pm | सखी

आवडला लेख, कोकोनट ब्रेकिंग प्लेस तर खासच. मंगोलियन बार्बेक्यु हे ब-याच मुलांचेही आवडतं ठिकाण आहे, तिथलं कॅरमल कॉबलर (गरम-गरम अॅपल पाय+वॅनिला आईसक्रिम+व्हीप क्रिम कॉम्बो) मस्त असतं.
गणेश चतुर्थीला मी सुट्टी घेते तर गेल्या वर्षीच ऑफीसातल्या एका अमेरीकनाने मला 'हॅपी गणेश चतुर्थी' अशी इमेल त्यासोबत लालबागच्या गणपतीचा फोटो पाठवला. दुस-या एका मैत्रिणिला उकडीचे मोदक आणि मसालेभात फार आवडतो. जुन्या ऑफिसतल्या एकीने घरी नान बनवण्याचा ध्यास घेतला होता तिला सांगुन थकले की आम्हीसुद्धा घरी नाही बनवत :)).

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Aug 2014 - 2:41 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्तम. असेच अनेक अनुभव येत गेले आणि नजर बदलत गेली.

रमेश आठवले's picture

1 Sep 2014 - 8:35 am | रमेश आठवले

paris मध्ये unesco च्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत भाग घेण्यासाठी गेलो होतो. तेथे त्यांच्या उपहारगृहात हिरव्या मिरचीचा ठेचा मिळायचा. तसेच संध्याकाळच्या जेवणात हॉटेल जवळ असलेल्या माक्डोनाल्ड मध्ये बर्गर घ्यायचो. वेटरला सांस ( sans ) व्हील (veal ) असे फ्रेंच शब्द सांगितल्यावर गोमासाचे ऐवजी चीज घातलेला बर्गर मिळायचा.

विवेकपटाईत's picture

1 Sep 2014 - 11:25 am | विवेकपटाईत

मस्त लेख. विश्व एक घर झाले आहे ही वेदातली संकल्पना आज पूर्ण होताना दिसत आहे. खाण्याच्या बाबतीत तरी निश्चित.

बॅटमॅन's picture

1 Sep 2014 - 12:47 pm | बॅटमॅन

लेख मस्त आवडला.

बाहेर जाउच देत नाही आम्हाला सीमेच्या बाहेर …. म्या पामराला कसं कळावं ह्ये?

मुक्त विहारि's picture

1 Sep 2014 - 11:45 pm | मुक्त विहारि

छान...

मस्त...

अमेरिकेत सार्वजनिक बसमधून उतरताना वाहकाला Thank you असे म्हणण्याची रीत आहे आणि वाहक त्याला उत्तर म्हणून You are welcome. Have a good evening असे म्हणतात.

:-))

भारतात असं काही करायला गेलात तर उतरताच येणार नाही! तुमचं नमस्कार चमत्कार होइपर्यंत खालचे तुम्हाला परत वर ढकलून देतील.

बादवे, सकाळी आठला पण have a good evening असंच म्हणतात का हो? रीत आहे असं म्हणालात म्हणून विचारलं!