कचरा

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
28 Jul 2014 - 4:44 pm

शनिवार-रविवार म्हणजे मॉल. मॉल म्हणजे शॉपिंग. मॉल म्हणजे खादाडी, अशी समीकरणं आता रूढ झालेली आहेत. ठाणे-मुंबईसारख्या जागा म्हणजे तर या दृष्टीने मॉलामाल आहेत. मोठेच्या मोठे मॉल्स, त्यातली लखलख, चकचक, ब्रँडेड वस्तूंची दुकानं, दालनं हेच शनिवार-रविवारचं डेस्टिनेशन झालेलं आहे. या मॉल्समधून असंख्य लोक पैसे खर्च करायच्या उदात्त हेतूने ओसंडून वाहत असतात. याची ‘शहरातली जत्रा’ यापेक्षा समर्पक व्याख्या मला करता येत नाही.

याच जत्रेत येणा-या प्रत्येकाला आनंद वाटावा म्हणून पडद्यामागच्या कलाकाराप्रमाणे प्रामाणिक मेहनत घेणारे अनेक लोकही असतात. उदाहरणार्थ, सफाई कामगार किंवा हाउसकीपिंग पीपल. अतिशय तुटपुंज्या पगारावर, नीट सोयी-सुविधांशिवाय काम करणा-या या मंडळींचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कौतुकच नव्हे, आदर केला पाहिजे. पण सर्वसाधारणपणे ही मंडळी लोकांच्या डाफरण्याचे, ओरडण्याचे, पाडून बोलण्याचेच धनी होत असतात आणि या गोष्टीचा खरंच राग येतो. ते बघताना आपल्याला राग येतो, तर त्यांना स्वत:ला किती येत असेल आणि तो ते किती आणि कसा गिळत असतील, तेच जाणोत.

पण याच अनुषंगाने एक चांगला प्रसंग काही दिवसांपूर्वी बघितला. एका सहकर्मचा-याबरोबर काही निमित्ताने एका मॉलमध्ये जाणं झालं. त्या वेळी फूड कोर्टमध्ये बसून आम्ही खात होतो. संध्याकाळ होत आली होती आणि गर्दी वाढलेली होती. त्यामुळे फूड कोर्टात बसायलाही जागा नव्हती आणि लोकं रांगा लावून उभे होते. काही जण तर उभ्या उभ्याच खात होते. या सगळ्या गडबडीत सफाई कामगार आपलं काम करत होते. आपण खाऊन झाल्यावर ताटली, ट्रे, ग्लास, हात पुसलेले टिशू हे सगळं टेबलावर तसंच सोडून जाणा-या माजोरडया लोकांची खरकटी काढत होते, टेबल पुसत होते, कचरा कचरापेटीत टाकत होते, ताटल्या पुन्हा रचून एका ट्रॉलीमधे ठेवत होते, तिथे उभं असणा-या लोकांचं ‘जल्दी कर ना.. और ठीक से साफ करना.. ये देख यहां गिरा है.. क्या कर रहा है दिखता नही क्या’ इत्यादी करवादणं सहन करत होते.

हे चालू असताना एक बाई मोबाइलवर काही तरी खेळत आणि एका हातात शीतपेयं व बर्गरने भरलेला ट्रे घेऊन आली आणि एका सफाई कामगाराला धडकली. तिच्या हातातला ट्रे खाली पडला. बर्गर सांडला, शीतपेयं सांडलं. त्या बाईने त्या सफाईवाल्यावर ओरडायला सुरुवात केली. ‘बीचमें खडा रहता है.. अंधा है क्या?’ वगरे वगरे. सभ्यपणे बोलणं म्हणजे भ्याडपणाचं समजलं जातं ना आजकाल, त्यामुळे दुस-याला पागल, अंधा, बेहरा वगरे म्हटलं की आपली बाजू बळकट होते. अशाच काहीशा समजुतीने त्या बाईने त्या सफाईवाल्यावर डाफरणं सुरू ठेवलं. सफाई कामगार मान खाली घालून सांडलेलं उचलत होता. इतक्यात बाजूच्या टेबलवर एकटाच बसलेला एक तरुण उठला. त्या बाईसमोर येऊन शांतपणे म्हणाला, ‘उसको उसका काम ठीकसे पता है मॅडम. आपको उसे बोलनेका हक नही है.’ असं म्हणून त्या तरुणाने खाली पडलेला ट्रे, प्लेट, ग्लास उचलून सफाई कामगाराच्या ट्रॉलीत ठेवले. त्याच्या पाठीवर हलकीशी थाप मारून ‘जाने दे’ असं म्हणून तो तरुण आपल्या टेबलावर जाऊन बसला.

त्या तरुणाचं कौतुक करावं तितकं कमी. एवढा जरी समंजसपणा आपल्यात असेल तरी ती फार मोठी गोष्ट ठरते. पण दुर्दैवं असं आहे की त्याच्यासारखे तरुण विरळ आहेत आणि त्या बाईसारखी मंडळी अधिक. तेव्हा हा ‘कचरा’ काढण्याच्या कार्यात आपणही आपला वाटा उचलणं, हाच योग्य उपाय असू शकतो.

वरील लेख प्रहार वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता त्याचा हा दुवा http://prahaar.in/collag/234201

समाजविचारलेख

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

28 Jul 2014 - 4:51 pm | कविता१९७८

छान लेख

केदार-मिसळपाव's picture

28 Jul 2014 - 5:08 pm | केदार-मिसळपाव

त्या तरुणाचं कौतुक करावं तितकं कमी.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 Jul 2014 - 6:40 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

त्या तरूणाचे कौतुक आहे.

आपण खाऊन झाल्यावर ताटली, ट्रे, ग्लास, हात पुसलेले टिशू हे सगळं टेबलावर तसंच सोडून जाणा-या माजोरडया लोकांची खरकटी काढत होते

पूर्वी मॉलमध्ये जाणार्‍यांना आम्ही हे म्हणत असू. असो .काळ बदलला.

यसवायजी's picture

28 Jul 2014 - 8:41 pm | यसवायजी

ह्हा हा.. +१

लेख चांगला आहे. पण काय हो वेल्लाभट, माजोरडे का म्हणे ते लोक्स? फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच धुवायच्या असतात का क्काय?

फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच धुवायच्या असतात का क्काय?

अगदी तसंच नाही पण खाऊन झाल्यानंतर खाताना टेबलावर पडलेले अन्नकण टिशूपेपरने प्लेट्मध्ये गोळाकरुन प्लेट स्वताहून उचलून बाजूच्या प्लेट-रॅक मध्ये ठेवल्यातरीही चालतील. शितपेयं पिण्यासाठी घेतलेले कागदी कप पण कचरापेटीत देखील टाकू शकता.

स्वतःचे काम स्वतः करण्यात लाज का बाळगायची? नाहीतरी आपली भारतीय लोकं (सगळीच नाही) आहेतच मुळात आळशी आणि बेशिस्त. असं माझं वैयक्तिक मत आहे; उगाच अंगावर येण्याची गरज नाही.

रेवती's picture

28 Jul 2014 - 9:30 pm | रेवती

सहमत.

यसवायजी's picture

28 Jul 2014 - 10:00 pm | यसवायजी

लाज तर अज्जेब्बात नाही हो. जिथे सेल्फ सर्वीस आहे, तिथे असेच करणे अपेक्षीत आहे.

आपली भारतीय लोकं (सगळीच नाही) आहेतच मुळात आळशी आणि बेशिस्त
यात फक्त मॉलमध्ये फिरणार्‍या (एसी पब्लिक?) लोकांना शिव्या देण्यात अर्थ नाही. हेच चित्र तुम्हाला सुरुपली बुद्रुक येथल्या टपरीवर पण दिसेल. कल्चर! कल्चर!
माझं निरीक्षण थोडं वेगळं आहे. मोठ्या हॉटेलात, परदेशी, आलिशान मॉलमध्ये गेल्यावर का असेना, भारतीय लोक बरेच चांगले वागतात. (कंपेर्ड टू टपरीवरचे वागणे)

ऑस्ट्रियात एका तलावाजवळ एक पिझ्झाचा बॉक्स पडला होता. आम्हा चार भारतीय मित्रांकडे विचित्र नजरेने बघत एका गोर्‍याने तो बॉक्स डस्टबिनमध्ये फेकला. आमची काही चूक नसताना सुद्धा शरमेने मान खाली गेली होती. नावच खराब झालंय च्यामारी :(

नावच खराब झालंय च्यामारी :(

अगदी खरंय :(

उगाच अंगावर येण्याची गरज नाही.

यसवायजी साहेब वरील विधान तुम्हाला उद्देशून नाही. ते एक जेनरीक स्टेटमेंट होतं.

मोठ्या हॉटेलात, परदेशी, आलिशान मॉलमध्ये गेल्यावर का असेना, भारतीय लोक बरेच चांगले वागतात.

सहमत पण फक्त अश्याच ठिकाणी का? सगळ्याच ठिकाणी हिच वागणूक आंगिकारली तर सगळ्यांच्या दृष्टिनं ते योग्य होईल. अन्यथा अश्या वागण्याला दुट्टपीपणा म्हणता येईल म्हणजे फक्त पॉश ठिकाणी व्यवस्थित वागायचं आणि बाकिच्या ठिकाणी (तुमच्या भाषेतलं) टपरीवरचे वागणं.

पण फक्त अश्याच ठिकाणी का?
जरा अवांतर असलं तरी हेच चित्र हामेरिका ते युरोपातील विमानतळ अशा प्रवासात बरं दिसतं आणि युरोपातील विमानात कचरा करण्याचे लायसेन्स मिळाल्याप्रमाणे मुंबै (किंवा दिल्ली) येईपरेंत पब्लिक पेटलेलं असतं. जरा म्हणून लाज नाही!

वेल्लाभट's picture

28 Jul 2014 - 10:13 pm | वेल्लाभट

हाह ! धुवा बिवायची अपेक्षा नाही फक्त त्या उचलून जवळच्या ट्रॉली किंवा रॅक वर ठेवायच्या असतात. आणि वेष्टनं, खोके हे त्याच रॅकखालच्या डस्टबिनमधे टाकायचे असतात. इतकंच.

काळा पहाड's picture

28 Jul 2014 - 11:41 pm | काळा पहाड

नाहीतरी आपली भारतीय लोकं (सगळीच नाही) आहेतच मुळात आळशी आणि बेशिस्त. असं माझं वैयक्तिक मत आहे; उगाच अंगावर येण्याची गरज नाही.

कशाला तळटीप टाकायची? भारतीय, पाकीस्तानी आणि अरब खरं तर हरामखोर असतात. ९५% लोक्स म्हणजे अगदी संपवून टाकायच्या लायकीचे असतात असं माझं मत आहे. आता बोला अंगावर यायचंय कुणाला?

अनुप ढेरे's picture

28 Jul 2014 - 8:10 pm | अनुप ढेरे

लेख आवडला. माईसाहेबांच्या निनिरिक्षणाही सहमत.

तो तरूण म्हणजेच वेल्लाभट तर नव्हे?

वेल्लाभट's picture

28 Jul 2014 - 10:17 pm | वेल्लाभट

तसा समज नको. मी शक्य तिथे असं फुकटचं प्रबोधन करतो, पण इथे मात्र मी नव्हतो.

कवितानागेश's picture

28 Jul 2014 - 11:12 pm | कवितानागेश

माजोरडेपणा योग्य नाही हे बरोबरच आहे.
सेल्फ सर्व्हिस केंव्हाही चांगली, पण आपल्याकडे सध्यातरी तसे करुन चालणार नाही, असं मला वाटतं.
जर का सगळे लोक आपला आपण कचरा उचलायला लागले तर हे काम करणार्‍या मुलांचे जॉब्स टिकणार नाहीत. आणि त्यांना दुसरी कुठलीही कामं सहजसहजी मिळणार नाहीत.
आपण उरलेले कागद खोकी, कप्स... हे सगळं आपल्याच ट्रेमध्ये ठेउ शकतो पण उचलून डस्ट्बीनमध्ये टाकण्याचे काम त्या मुलांसाठी शिल्लक ठेवावं, असं मला वाटतं.

आपण उरलेले कागद खोकी, कप्स... हे सगळं आपल्याच ट्रेमध्ये ठेउ शकतो पण उचलून डस्ट्बीनमध्ये टाकण्याचे काम त्या मुलांसाठी शिल्लक ठेवावं, असं मला वाटतं.

वरकरणी पाहता उदात्त वगैरे विचार, पण शेवटी त्या मुलांची परिस्थिती सुधारणारच नाही असं कै असलं तर. तस्मात मिसगायडेड वाटतो आहे.

कवितानागेश's picture

29 Jul 2014 - 6:19 pm | कवितानागेश

त्यांची नोकरी गेली तर परिस्थिती सुधारणार आहे का? उलट नोकरी टिकली तरच सुधारेल.
त्यांना दुसरी कुठली नोकरी मिळणार? जे आहे ते कामपण आपण त्यांच्याकडून काढून घेणं बरोबर नाही. पण त्यांच्या डिग्निटीला धक्का लागणार नाही अशा प्रकारे आपण ते काम सोपं करु शकतो.

हा युक्तिवाद अतिशय फसवा आणि चुकीचा आहे. असाच युक्तिवाद सफाई कर्मचारी, इ. बद्दल करून पहा. पिढ्यानपिढ्या त्यांनी त्याच धंद्यात रहावे असे म्हणणे आणि यात फार फरक नाही.

शिवाय आहे ती नोकरी गेली तर काय लगेच मरणार नाहीत. एक पिढी नेहमीपेक्षा जास्त दारिद्र्यात दिवस काढेल, पण शिक्षणाचे महत्त्व कळाले की हळू हळू लोक वर येऊ लागतीलच. ते जास्ती बरं की ठेविले अनंते हे बरं? ज्यांचं चांगलं चाल्लंय त्यांना ठेविले अनंते बरंय हो, पण नाही त्यांचं काय?

कवितानागेश's picture

30 Jul 2014 - 6:57 pm | कवितानागेश

त्यांच्या पिढयांनी हेच करावं असं कुठेही म्हटलेलं नाही. कृपया वितंडवाद घालू नये. उलट त्यांचा आहे तो पगार सुरु राहिला तरच पुढच्या पिढीला काहितरी वेगळं करायला वाव आहे.
आणि ही कामं करणारी मुलं नक्की काय काय नवीन शिकू शकतील असा तुमचा अंदाज आहे?
शिवाय त्यांची डिग्निटी सांभाळून त्यांचे काम सोपे करावं पण काम संपवू नये, ही सूचना वाचायचं विसरलेला दिसताय.

योग्य शंकेला कृपया वितंडवाद असे नाव देऊ नये.

काम सोपे करावं पण काम संपवू नये या वाक्यात त्यांनी तेच काम करत रहावे हे गृहीतक आहेच. मी त्यांच्या नोकर्‍या काढून घ्याव्या असे म्हणत नाहीये, पण दुसरीकडे डायव्हर्ट केले पाहिजे असे म्हणतोय. ते करायचे तर ही स्थितिशीलता कामाची नाही.

बादवे ठाणे मनपा नाले अन गटरी साफ करायला यंदा रोबोट वापरणारे म्हणे, त्यालाही आपला विरोधच असेल ना?

>>पण दुसरीकडे डायव्हर्ट केले पाहिजे असे म्हणतोय.

उदाहरणार्थ?

तुलनेने अजून जरा प्रॉडक्टिव्ह काम. सर्व लेबरसंबंधी कामे काय एकसारखीच नसतात. काही स्किल शिकवली तर बराच फरक पडेलसे वाटते. कुशल आणि अकुशल कामगारांतला फरक पाहता असे करणे अवश्य वाटते खरे.

कवितानागेश's picture

30 Jul 2014 - 11:54 pm | कवितानागेश

तुलनेने अजून जरा प्रॉडक्टिव्ह काम म्हणजे कुठले?
कुणाचा काका बसलाय असं फुकट कुठलंही काम शिकवायला?
इथे जमीनीवर हक्क असलेल्या विस्थापितांना 'स्किल्ड शेतकरी' असून काम मिळत नाही. या बिचार्‍या काहीही विषेश शिकायची संधी न मिळालेल्या मुलामुलींना अजून कोण कधी आणि कुठलं काम देणार आहे? आणि त्यातून त्यांना कितीसे पैसे मिळणार?
मॉलमध्ये निदान पगारतरी जरा बरे असतील.
तसेही 'शिक्षण' ही भरल्यापोटी मिळणारी चैन आहे!
शिवाय गटार साफ करणं आणि जेवणाचं टेबल साफ करणं यात दुसरं काम सुसह्य आहे, निदान मीतरी माझ्या घरी ते बिनबोभाट करते.
पुन्हा पुन्हा अतिशयोक्ती करुन वितंडवाद घालू नये. 'रोजगार मिळण्याचे मह्त्त्व' हा मुद्द लक्षात घ्यावा.

कवितानागेश's picture

31 Jul 2014 - 12:16 am | कवितानागेश

माझा मुद्दा अजून जरा नीट लिहिते. जर का मॉलमध्ये जाणार्‍या काही लोकांनी अशी पूर्ण सेल्फ सर्व्हिस सुरु केली, की जसे टेबल आपले आपण साफ करण्म, ट्रे आपला आपण उचलून कचरा टाकणं, तर अर्थातच काही दिवसात व्यथापकांच्या ते लक्षात येइल. अगदी १०% लोक जरी हे करायल लागले तरी तो फरक सहज लक्षात येउ शकतो. जगातले सर्व व्यवस्थापक कायम 'खर्च' कमी करण्याच्या मागे असतात. सगळ्या फिल्डमधले. लोक आपले आपण काम करतायत म्हटल्यावर व्यवस्थापक विचार करेल की 'आता काम कमी आहे, १५ पोरं कशाला ठेवायची? ८च ठेउ.'
अर्थात ७ मुलांची नोकरी जाईल. ते नोकरी गेल्यावर आपल्याकडे स्किल वाढवण्यासाठी 'मरठी टायपिंग' शिकायला येणार आहेत का? तर नाही! ते दुसरं मिळेल ते काम घेणार. कसं आणी काय मिळेल माहित नाही.
कारण 'नोकरी गेली' अशी परिस्थिती असताना काम देणारे लोक अर्ध्या पगारावर राबवायला बघतात. सगळ्याच फिल्डमध्ये.
उरलेल्या ८ मुलांवर कामाचा ताण पडेल. त्यांना ते झेपणार नाही. त्यामुळे त्यांचीही नोकरी धोक्यात येइल.
हे कल्पनारंजन नाही. हेच चक्र कुठेही सुरु असतं.
तसेही कमी शिकलेल्या लोकांच्या शिक्षणाबरोबरच, सफाईच्या कामाला हलकं समजू नये, यासाठी आपल्यासारख्या शिकलेल्या लोकांचे प्रबोधन करायची जास्त गरज आहे.

हे खरोखरीच आपले विचार आहेत का?

तू सीरियस विनोद बंद कर बरं आधी. ;)

प्रभाकर पेठकर's picture

29 Jul 2014 - 2:48 am | प्रभाकर पेठकर

माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा, १९७८ला, 'सेल्फ सर्व्हिस' सुविधा असलेले उपहारगृह पाहिले/अनुभवले ते म्हणजे चर्चगेट रेल्वे स्थानकावरचे 'रेल्वे कॅन्टीन'. तेंव्हा तिथे अशी पद्धत होती की आपण पैसे देऊन कुपन घ्यायचे आणि ते दाखवून खाद्यपदार्थ घ्यायचा. भिंतीला लागून असलेल्या फळीवर ठेवून उभ्या उभ्या खायचा आणि निघून जायचे. त्यांचा माणूस अशा सगळ्या उष्ट्या ताटल्या उचलून घेऊन जातो आणि फळी स्वच्छ करतो. सेल्फ सर्व्हिसची तीच सवय आंगवळणी पडली आहे. आजही, मुंबई-पुणे किंवा इतर कुठल्याही, द्रुतगती मार्गावरील उपहारगृहांमध्ये हीच पद्धत सुरू आहे. कुपन घेऊन पदार्थ घ्यायचा आणि एखाद्या टेबलावर बसून खाऊन निघून जायचे. आता आपल्या भारतातली 'सेल्फ सर्व्हिस' पद्धत अशी गिर्‍हाईकांच्या अंगवळणी उपहारगृह चालकांनीच पाडली आहे. मग अशा गिर्‍हाईकांना 'माजुरडे' म्हणणे म्हणजे विनाकारण जाणूनबुजून अपमान करणे आहे.
परदेशातील 'सेल्फ सर्व्हिस' सुविधांमध्ये आपले खाऊन झाले की ट्रे, प्लेट्स, चमचे, वगैरे वगैरे सामान तिथे असलेल्या नियोजित जागेवर आपणच ठेवायचे असते. हे मला स्वतःला तरी १९८१ साली परदेशात आल्यानंतर समजले. तेंव्हा पासून मीही तसेच करतो. पण भारतात आल्यावर मुंबई-पुणे महामार्गावरील उपहारगृहात अजूनही खाल्यावर ताटल्या, पेले, चमचे तिथेच सोडून देण्याची पद्धत असल्याने तिथे तसे वागतो.
पण असे करण्यांना 'माजुरडे' म्हणणे रुचले नाही.

प्रभाकर पेठकर's picture

29 Jul 2014 - 2:49 am | प्रभाकर पेठकर

'देश तसा वेष...' असे वाचावे.

तुमचा अभिषेक's picture

29 Jul 2014 - 7:01 pm | तुमचा अभिषेक

हाच विचार पहिला मनात आला, कारण उगाच ते आपल्यालाच कोणीतरी माजोरडे म्हटल्यासारखे वाटले. अन्यथा मला एखादा उष्टाखरकटा कण वा थेंब जरी बाजूला पडला असेल तरी उठताना तो पुसून घ्यायची सवय आहे, टिश्यू नसेल तर हातानेच पुसतो आणि मग हाथ धुतो. पण त्यानंतर ती प्लेट उचलायचे काम जर मॉलच्या पद्धतीनुसार तिथे सतत त्याच कामासाठी नेमलेले आणि आसपास फिरणारे सफाईकामगार करणार असतील तर सर्वांचीच सोय बघत ते त्यांच्यावर सोडावे. कारण मग अश्या ठिकाणी बहुतांश वेळा केराच्या टोपल्याही नसतात किंवा कुठेतरीच एखादी असते.

असो, लेखातील मुलाचे मात्र खरेच कौतुक. अश्यावेळी असा एखादा मुन्नाभाई उठून उभा राहणे खरेच गरजेचे. जर आपल्याला ते जमत नसेल तर अश्यांना एक कडक नापसंतीचा लूक तरी नक्की द्यावा, या आशेवर की त्यांना थोडीफार आपली चूक समजेल, थोडीफार लाज वाटेल आणि पुन्हा असे कृत्य करताना विचार करतील.

एस's picture

29 Jul 2014 - 3:31 pm | एस

इथे फक्त कचरा करण्याच्या आणि इतस्ततः फेकण्याच्या वृत्तीचा प्रश्न नाहीये तर समाजातल्या कामांची विभागणी आणि त्यातील श्रेष्ठकनिष्ठपणाची आपल्या अंगी पडलेली कल्पना हा आहे. कचरा न करणे हा एक भाग झाला. आपण केलेला कचरा स्वतःहून योग्य प्रकारे बाजूला करणे आणि त्यासाठी दुसर्‍या कोणाची वाट बघत न बसणे हेही महत्त्वाचे नाही का? वरील किश्श्यात त्या बाईने स्वतःच्या चुकीचे खापर साळसूदपणे सफाई कर्मचार्‍यावर फोडले. हा त्या बाईचा माजोरडेपणा. त्या बिचार्‍याने ते सगळं गप्प ऐकून घेत साफसफाई सुरू केली, आपल्यावरील अन्यायाला विरोध केला नाही ही त्याची परिस्थितीने आलेली लाचारी. प्रश्न दुहेरी आहे. एकीकडे सत्ता-श्रीमंतीचा माज उतरवून त्या वर्गामध्ये संवेदनशीलता जागवणे आणि दुसरीकडे दुर्बळ, पिचलेल्या वर्गाला संधी आणि आत्मसन्मान देणे हे दोन्ही गरजेचे आहे.

एकीकडे सत्ता-श्रीमंतीचा माज उतरवून त्या वर्गामध्ये संवेदनशीलता जागवणे आणि दुसरीकडे दुर्बळ, पिचलेल्या वर्गाला संधी आणि आत्मसन्मान देणे हे दोन्ही गरजेचे आहे.

+१००००...नेमकं मनातलं बोललात.

तुमचा अभिषेक's picture

29 Jul 2014 - 7:04 pm | तुमचा अभिषेक

+७८६

खास करून आपल्या समाजात जी आर्थिक विषमता / दरी आहे त्यात तर नक्कीच जास्त गरजेचे आहेत हे संस्कार !

वटवट's picture

29 Jul 2014 - 3:37 pm | वटवट

खरंय…