सौदी क्षणचित्रे : ०७ : राजधानी अर् रियाध

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
3 Jun 2014 - 11:11 am

===================================================================

सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...

===================================================================

...पुढच्या भागात आपण राजधानी रियाधला भेट देणार आहोत.

अर् रियाध

अर् रियाध ही सौदी अरेबियाची राजधानी देशाच्या मध्यवर्ती भागात वसलेली आहे. ती जशी देशाची राजधानी आहे तशीच रियाध प्रांताचीही राजधानी आहे. समतल भूमीवर असलेल्या या शहराची लोकसंख्या ५२-५३ लाख आहे. रियाध प्रांताची लोकसंख्या ७० लाख म्हणजे साधारण सर्व देशाच्या एक चथुर्थांश आहे. या देशातल्या तीन (रियाध, दम्माम आणि जेद्दाह्) महानगरांमध्ये रियाध हे सर्वात कर्मठ आणि मुख्यतः व्यावसायिक केंद्र समजेल जाते. कर्मठ पारंपरिक वहाबी संस्कृती आणि आधुनिक / पाश्चिमात्य प्रभाव यांचे एक सुरस रसायन येथे पहायला मिळते. अर्थातच रियाधमध्ये पर्यटनासाठी खास ठिकाणे नाहीत आणि तुमची वेशभूषा आणि सार्वजनिक ठिकाणी वागण्याच्या पद्धतीवर या शहरात वावरताना लक्ष देणे जरूरीचे आहे. मात्र याचा असा अर्थ नाही की तुम्हाला पाश्चिमात्य कपडे घालून अमेरिकन उच्चारात इंग्लिश बोलणारा सौदी तरुण दिसणारच नाही !

बानी हनिफा नावाच्या जमातीने स्थापन केलेल्या या शहराला इस्लामपूर्व काळात हज़र् या नावाने ओळखत असत. त्या काळी ते आधुनिक सौदी अरेबियाचा बहुतेक सर्व मध्य आणि पूर्व भाग व्यापणार्‍या अल् यमामा नावाच्या प्रांताची राजधानी होती. इ स ८६६ साली उखायधिराईट्सनी हा प्रांत अब्बासीद साम्राज्यापासून स्वतंत्र करून त्याची राजधानी जवळच्या अल् खार्ज नावाच्या शहरात हलवली आणि हज़र् ला उतरती कळा आली. या शहराचे हज़र् हे जुने नाव अजूनही स्थानिक कथा-कवितांत येत असते. मात्र चौदाव्या शतकापर्यंत या शहराने आपले महत्त्वाचे स्थान परत मिळवले होते. रियाध या अरबी शब्दाचा अर्थ बागबगिचे असा आहे. चौदाव्या शतकात इब्न बतूता या मोरोक्को (उत्तर आफ्रिका) मधील जगप्रवाश्याने या शहराचे वर्णन "पाण्याचे कालवे आणि झाडे असलेले शहर" असे केलेले आहे.

रियाध या नावाचा पहिला लेखी उल्लेख सतराव्या शतकात लिहिलेल्या १५९० मध्ये झालेल्या एका घटनेच्या संदर्भात केला गेला आहे. मान्फुहा या शेजारच्या प्रांतातील देहाम इब्न दवास या नावाच्या निर्वासिताने रियाधवर कब्जा केला आणि रियाधच्या विखुरलेल्या सर्व वस्त्यांभोवती एक संरक्षक भिंत उभारून त्याला एकसंध शहराचे स्वरूप दिले. नंतर यमामाचा पडता काळ आला आणि शहराचे परत अनेक वस्त्यांच्या रूपात तुकडे झाले. साधारण शंभर वर्षांपूर्वी रियाध साधारण २०,००० वस्तीचे, धुळीने भरलेल्या खजुराच्या लागवडींचे आणि छोट्या ओहोळांवर तगून असलेल्या शेतांचे ठिकाण होते. इ स १९०२ मध्ये राजा अब्दुलअझिझ इब्न सौदने या शहरावर कब्जा केला आणि १९३२ मध्ये आधुनिक सौदी अरेबियाची स्थापना केल्यावर त्याला राजधानी बनवले. खनिजतेलसंपत्ती आल्यानंतर अर्थातच या राजधानीच्या शहराचा एक अत्याधुनिक आणि गगनचुंबी इमारतींनी भरलेल्या शहरात विकास करण्यात येत आहे. वाढत्या समृद्धीबरोबर या शहराची वाढ होत आहे आणि दरवर्षी त्यांत उंच, विशाल अथवा इतर काही वैशिष्ट्यपूर्ण इमारतींची भर पडत आहे.

रियामधिल "राजकन्या नोरा बिंत अबदुलरहमान विद्यापीठ" हे जगातील सर्वात मोठे खास स्त्रियांकरिता राखीव असलेले विद्यापीठ आहे.

तर चला एक फेरी मारू रियाधमध्ये...


रियाधमधला फेरफटका : ०१


रियाधमधला फेरफटका : ०२

.


रियाधमधला फेरफटका : ०३

.


रियाधमधला फेरफटका : ०४

.


रियाधमधला फेरफटका : ०५

.


रियाधमधला फेरफटका : ०६

.


रियाधमधला फेरफटका : ०७

.


रियाधमधला फेरफटका : ०८ : किंग फाहाद मेडिकल सिटीचा स्वागतकक्ष

किंगडम सेंटर

जवळ जवळ सर्व रियाधमधून दिसणारी आणि रियाधमधल्या प्रवासात एक महत्त्वाची खूण म्हणून एका इमारतीचे नाव घेतले जाते, ती म्हणजे बुर्ज अल् ममलकाह् उर्फ किंगडम सेंटर. रियाधमध्ये कोणत्याही बाजूने प्रवेश केला तरी किंगडम सेंटरची इमारत तिच्या उंचीमुळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे नजरेत भरते...


किंगडम सेंटर : ०१

.


किंगडम सेंटर : ०२ (जालावरून साभार)

.

जगातल्या अतिश्रीमंत लोकांमध्ये गणना केल्या गेलेल्या राजपुत्र अल् वलिद बिन तलाल याच्या किंगडम होल्डिंग कंपनीच्या मालकीची ही इमारत रियाध भेटीत बघणे नक्कीच आवश्यक गोष्ट आहे. ही ९९ मजली आणि ३०२ मीटर उंच इमारत ९४,२३० चौ मीटर क्षेत्रफळावर २० कोटी सौदी रियाल (३२०० कोटी रुपये) खर्चून बांधली आहे. २००२ मध्ये या इमारतीला "एंपोरिस स्कायस्क्रेपर पारितोषिक" आणि "त्या वर्षाचा जगातला सर्वोत्तम आराखडा व कार्यप्रणाली बहुमान" मिळाला आहे. ही सौदी अरेबियातील सर्वात उंच इमारत आहे.

या इमारतीत खालच्या तीन मजल्यांवर एक मोठा शॉपिंग मॉल आहे. त्यातला एक मजला स्त्रियांसाठी राखीव आहे...


किंगडम सेंटर : ०३ : शॉपिंग मॉल

मॉलच्या वर फोर सीझन्स हॉटेल रियाध आहे आणि त्यावर ऐषआरामी फ्लॅट्स आहेत. इमारतीचे टोक बॉटल् ओपनरच्या आकाराचे आहे. त्याचे भोक इतके मोठे आहे की त्यातून छोटे विमान आरपार नेण्याचा विक्रम केल्याचे सांगितले जाते. सगळ्यात वरचा भाग म्हणजे ५६ मीटर लांबीचा निरीक्षण पूल (स्कायब्रिज वॉकवे) आहे. किंगडम सेंटरचा गतिमान लिफ्ट आपल्याला ९९ व्या मजल्यावरच्या निरीक्षण पुलावर घेऊन जातो. तर चला या ३०० मीटर उंच पुलावरून रियाधचे विहंगम दृश्य बघायला...


किंगडम सेंटरचा निरीक्षण पूल

.


किंगडम सेंटरच्या निरीक्षण पुलावरून दिसणारे रियाध : ०१

.


किंगडम सेंटरच्या निरीक्षण पुलावरून दिसणारे रियाध : ०२

.


किंगडम सेंटरच्या निरीक्षण पुलावरून दिसणारे रियाध : ०३

अल् फैझलिया सेंटर

रियाधमधली दुसरी वैशिष्ट्यपूर्ण इमारत आहे अल् फैझलिया सेंटर. ही सौदी अरेबियातील दोन क्रमांकाची २६७ मीटर उंचीची इमारत आहे. या इमारतीच्या उंचीमुळे आणि तिच्या टोकावर असलेल्या सोनेरी गोलामुळे ती उठून दिसते. या गोलामध्ये रेस्तराँ आहे आणि त्याच्या खाली निरीक्षण सज्जा आहे...


अल् फैझलिया सेंटर : ०१

.


अल् फैझलिया सेंटर : ०२ : स्वागतकक्ष

रियाध दूरचित्रवाणी मनोरा

हा १७० मीटर उंच आकर्षक दूरचित्रवाणी मनोरा सौदी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आवारात आहे.


रियाध दूरचित्रवाणी मनोरा

रियाधची काही विहंगम दृश्ये


रियाधचे विहंगम दृश्य : ०१ (जालावरून साभार)

.


रियाधचे विहंगम दृश्य : ०२ (जालावरून साभार)

अल् जनाद्रिया महोत्सव

इ स १९८५ पासून राष्ट्रीय संरक्षक सेना (नॅशनल गार्ड) रियाध शेजारच्या एका मोठ्या मैदानात दर वर्षी फेब्रुवारी/मार्चमध्ये दोन आठवडे "संस्कृती आणि वारसा (culture and heritage)" या विषयाला मध्यवर्ती ठेवून एक उत्सव साजरा करते. रौधात सुवेस (Rowdhat Souwais) या फार जुन्या सौदी परंपरेचा हा आधुनिक अवतार आहे. या उत्सवात सौदी सरकारच्या बहुतेक सर्व खात्यांचे विभाग आणि अनेक लहान-मोठ्या खाजगी कंपन्या पंडाल उभारतात. त्याचबरोबर शोभेच्या वस्तू, खेळांचे शामियाने, मौजमजेची आणि खाण्यापिण्याची भरपूर दुकाने असतात. याशिवाय घोड्यांची शर्यत, उंटांची शर्यत, अर्धा व मिझमार हे पारंपरिक सौदी नाच, इ कार्यक्रमही असतात. एकंदरीत आपल्या इथल्या जत्रेचेसारखेच स्वरूप असते. सर्व देशातून दहा लाखांपेक्षा जास्त लोक तेथे या दोन आठवड्यामध्ये मजा करायला येतात.

चला मारूया या सौदी जत्रेत एक चक्कर...


जनाद्रिया महोत्सव : ०१

.


जनाद्रिया महोत्सव : ०२

.


जनाद्रिया महोत्सव : ०३

.


जनाद्रिया महोत्सव : ०४

.


जनाद्रिया महोत्सव : ०५

.


जनाद्रिया महोत्सव : ०६

.


जनाद्रिया महोत्सव : ०७ : सौदी काव्यगायन / शेरोशायरीचा कार्यक्रम

.


जनाद्रिया महोत्सव : ०८

.


जनाद्रिया महोत्सव : ०९

.


जनाद्रिया महोत्सव : १०

.

पुढच्या भागात, जेद्दाह् ची सहल.

क्रमशः

===================================================================

सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...

===================================================================

प्रतिक्रिया

भाते's picture

3 Jun 2014 - 12:36 pm | भाते

मी पयला!

नेहमी 'मी पहिला' म्हणणारा जेपी सहा महिने सुट्टीवर आहे. :)

काका, मस्त सफर चालु आहे.

दिपक.कुवेत's picture

3 Jun 2014 - 12:52 pm | दिपक.कुवेत

तुमची लेखमाला वाचुन सौदि बद्द्लच्या भावना / पुर्वग्रह हळुहळु निवळत चाललेत.

शिद's picture

3 Jun 2014 - 2:21 pm | शिद

तुमची लेखमाला वाचुन सौदि बद्द्लच्या भावना / पुर्वग्रह हळुहळु निवळत चाललेत.

+१११११...पहिल्या भागापासुन अगदी हेचं मनातं येत होतं.

मस्त चालु आहे सफर.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jun 2014 - 1:18 pm | अत्रुप्त आत्मा

फारच छान!

>>>तुमची लेखमाला वाचुन सौदि बद्द्लच्या भावना / पुर्वग्रह हळुहळु निवळत चाललेत.
बरे वाटले, मी सौदित नौकरी करतो असे भारतात सान्गीतले तर बरेच चेहरे बदलायचे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jun 2014 - 2:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

भाते, दिपक.कुवेत, शिद, अत्रुप्त आत्मा आणि बारक्या_पहीलवान : अनेक धन्यवाद !

==============================================================

तुमची लेखमाला वाचुन सौदि बद्द्लच्या भावना / पुर्वग्रह हळुहळु निवळत चाललेत.

या संबद्धी जरा विस्ताराने अगोदरच्या भागात एका प्रतिसादाच्या उत्तरादाखल लिहीले होते. पुनरावृत्तीचा दोष स्विकारून ते इथे परत उद्धृत करणे आवश्यक वाटते...

लोक पुन्हा परत का येतात ? घरच्या लोकांची ओढ ? पण इथे पुण्यात राहणारी मुले सुद्धा शिरुर मधल्या आपल्या आई-वडीलांना महिनोन महिने भेटत नाहीत ही भारतातील वस्तुस्थिती आहे ? तिथे अशी कोणती गोष्ट जाचक आहे की लोक अर्धवट वयात परत येतात ? ( मातृभूमीचे प्रेम ? ..जननि जन्मभूमीश्च..???) हे तितकेसे खरे वाटत नाही !

पाश्चिमात्य देशांसारखे आखाती देशांत नागरिकत्व मिळत नाही किंवा फार फार मोठ्या अभावानेच मिळते. त्यामुळे, तेथे नोकरी करणारा परत येणार हे नक्की असते. मात्र केव्हा परत येणार हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, त्यातील काही...

१. नोकरीच्या कराराची मुदत संपणे / (सरकारी नोकरीतून) निवृत्त होणे.

२. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या अटी जाचक वाटणे... उदा. कुटूंबाचा व्हिसा नसणे, सुटी कमी असणे, इ.

३. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या जागेतले / देशातले वातावरण न आवडणे.

४. आपल्या देशातल्या आणि परदेशातल्या चलाख एजंटनी मोठ्या पगाराची खोटी आश्वासने देवून केलेली फसवणूक हा प्रकार खाडी देशातल्या निम्न स्तरांच्या नोकर्‍यांत दिसतो. तसेच पाश्चिमात्य देशांत मानवी तस्करीच्या मार्गाने जाण्यासाठी मोठी रक्कम एजंटला देणारेही असतात. या दोन फार मोठ्या शोकांतिका आहेत. खरी वस्तुस्थिती समजल्यावर असे लोक काही करून स्वदेशात कसे परतता येईल याची स्वप्ने पाहत असणे स्वाभाविक आहे.

माझा स्वतःचा अनुभव व निरिक्षणे यावरून खालील विधाने करू शकतो...

उत्तम जीवन (स्वर्ग), नीच जीवन (नर्क) आणि त्या दोघांमधले मधले सर्व स्तर (स्पेक्ट्रम) हे जगात सर्वच ठिकाणी (तथाकथित उत्तम-नीच देशात आणि स्वदेश-परदेशात) असतात. प्रत्येक जागेवर, माणसाचे त्या जागेवरचे स्थान, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, त्याच्या आजूबाजूची माणसे, इत्यादीवर तो माणूस स्वर्ग-नर्काच्या कोणत्या स्तरावर आहे हे ठरते. एकाच ठिकाणची परिस्थिती बदलल्यास स्वर्ग-नर्काचा स्तर बदलू शकतो. दर परिस्थितीत प्रत्येक माणसाची सद्य परिस्थितीचा सारासार विचार करून स्वतःला परवडणारा निर्णय घेण्याची आणि तो अमलात आणण्याची पात्रता / धमक त्याच्या सुख-दु:खाचा स्तर ठरवते.

स्पष्टीकरण:

१. स्वदेशात अतिशय नीच अवस्थेत असणारी माणसे विरळ नाहीत हे आजूबाजूला पाहिले तर नक्की दिसेल. याउलट, जगात अत्युत्तम समजल्या जाणार्‍या देशातही फार आनंदात नसलेली स्थानिक / परकिय माणसे कमी नाहीत. "खाटल्यावर आणून देणारे हरी" जितके स्वदेशात विरळ असतात तेवढेच विरळ "छळणारे कंसमामा" परदेशात असतात. मात्र जसे आपण भारतात परदेशांचे गोडवे गातो तसेच आपल्याला परदेशात गेल्यावर देशप्रेमाचा आणि (देशात असताना महिनोमहिने न भेटणार्‍या) मित्र-नातेवाईकांबद्दलच्या प्रेमाचा उमाळा येतो. आपल्या हातात नसलेले खेळणे मुलांना जास्त चांगले वाटते... वय वाढल्यावर खेळण्याचे स्वरूप बदलते, इतकेच !

२. माझा स्वतःचा अनुभव मागे वळून पाहिल्यावर असे दिसते की, भारतात जितक्या समस्या मला आल्या किंवा जितके असुखकारक अनुभव आले त्यापेक्षा कमीच परदेशात आले.

३. स्वदेशातल्या आणि परदेशातल्या दर ठिकाणाला आपापले फायदे-तोटे असतात. आपण आपल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे त्यांची तुलना करून आपल्याला परवडणारा निर्णय घ्यायचा असतो. या जगात १००% फायद्याची जागा कोठेही नाही... जन्मस्थानात, स्वदेशात किंवा परदेशातही.

मुक्त विहारि's picture

3 Jun 2014 - 2:45 pm | मुक्त विहारि

+ १

लेख आवडलाच पण स्पष्टीकरण भावले.

उपाशी बोका's picture

4 Jun 2014 - 3:10 am | उपाशी बोका

स्वदेशातल्या आणि परदेशातल्या दर ठिकाणाला आपापले फायदे-तोटे असतात. आपण आपल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे त्यांची तुलना करून आपल्याला परवडणारा निर्णय घ्यायचा असतो. या जगात १००% फायद्याची जागा कोठेही नाही... जन्मस्थानात, स्वदेशात किंवा परदेशातही.

एकदम सहमत.

पण मला सौदी थोडेफार बकाल आणि रखरखीत वाटले. म्हणजे तिथे पर्यटनासाठीसुद्धा जावे वाटेल, असे ठिकाण काही वाटले नाही. (कायम स्थाईक व्हावे असे तर अजिबात वाटले नाही.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jun 2014 - 12:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

पण मला सौदी थोडेफार बकाल आणि रखरखीत वाटले. म्हणजे तिथे पर्यटनासाठीसुद्धा जावे वाटेल, असे ठिकाण काही वाटले नाही. (कायम स्थाईक व्हावे असे तर अजिबात वाटले नाही.) :)

तुम्हाला तुमची मते असण्याचे स्वातंत्र्य आहे. पण तुमची मते वाचून गम्मत वाटली. कारण, ती अवाजवी आणि अनावश्यक आहेत. केवळ तुमचा व इतरांचा गैरसमज नसावा म्हणून खालील वस्तुस्थितीची माहिती देत आहे:

१. सौदी अरेबियात परदेशी नागरिकाला नागरिकत्व मिळत नाही.

२. सौदी अरेबियात जाण्याचे पर्यटन हे कारण नसते. तिथे जाण्याचा व्हिसा मिळण्याची / मिळवण्याची मुख्य कारणे दोनच (अ) व्यापार / नोकरी करून पैसा कमावणे आणि (आ) मुस्लीम असल्यास हज ही इस्लमिक तिर्थयात्रा करणे. मी जे पर्यटन केले ते नोकरीसाठी मिळालेल्या स्थायी व्हिसावर तेथे राहात असल्यामुळे आणि केवळ माझ्या नवनवीन जागांच्या व संस्कृतींच्याबद्दलच्या कुतुहलामुळे.

३. पर्यटनासाठी कोणी कोठे जावे हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. मला स्वतःला 'रब अल् खाली या वाहत्या वाळूच्या वाळवंटापासून ते उत्तर धृवीय बर्फाळ वाळवंटांपर्यंत' आणि 'पाश्चिमात्य आधुनिक काँक्रीट जंगलापासून ते अंगकोरच्या प्राचीन अवशेषांपर्यंत' अश्या सर्व प्रकारच्या जागांचे कुतुहलपूर्ण आकर्षण आहे. माझी पर्यटनाची व्याख्या "आरामात वातानुकुलीत वातावरणात आणि / किंवा रमतगमत केलेली मजेशीर सहल" अशी नाही तर "मनाला आणि मेंदूला काहितरी नवीन आणि आश्चर्यकारक खाद्य पुरवणार्‍या ठिकाणाची सहल" अशी आहे. दुसर्‍या कोणाची काही वेगळी व्याख्या असल्यास त्याला माझा अजिबात आक्षेप नाही. :) मात्र आपली पर्यटनाची व्याख्या जितकी जास्त संकुचीत तेवढे या पृथ्वीतलावरचे विविध नजारे बघण्यापासून आपण जास्त वंचित होतो असे मला वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jun 2014 - 12:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

अजून थोडेसे राहिलेच...

...बकालपणा...

बकालपणा जगभर पाहिला आहे. आपल्या देशाबद्दल काही सांगायला हवे आहे असे नाही. पण अमेरिकेत न्युयॉर्क व वॉशिंगटन (डी सी) मधल्या घेट्टोंचीही चक्कर मारली आहे आणि संध्याकाळी सात नंतर न्युयॉर्कच्या मान्यवर ग्रँड सेंट्रल टर्मिनलवर केस पिंजारलेली अमलि-धुंद माणसे टाकून दिलेल्या अन्नाकरता डस्ट बिन्स उकरताना पाहीली आहेत.

आता मुद्दा असा आहे की; परदेशात ज्या जागी आपण नोकरी/व्यवसाय करायला अथवा फिरायला जातो, त्या ठिकाणी मला जर त्या जागेवरच्या काही असुखकारक गोष्टींचा त्रास होत नसला आणि त्या गोष्टींना मी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हातभार लावत नसलो तर मला उगाचच नसते फुकाचे उमाळे येत नाहीत. कारणः

१. मी माझे कायदेशीर करार केलेले कर्तव्य योग्य तर्‍हेने करून परदेशातल्या चांगल्या गोष्टींना हातभारच लावत असतो.

पण तरीही..

२. मी तो देश जगातील उत्तम देश बनविण्याचा अधिकार घेउन तेथे गेलो आहे अशी समजूत माझ्या डोक्यात अजिबात नसते. :) (अर्थातच, माझ्या मायभूमीत माझ्या अधिकार आणि कर्तव्य याबाबत माझा विचार वेगळा असेल.)

अनेक प्रकारच्या जागांवर अनेक प्रकारच्या वस्तुस्थितींत वैचारीक समतोल आणि मानसिक आनंद राखायला वरचा हाताळणीचा प्रकार (approach) उपयोगी ठरतो असा माझा अनुभव आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Jun 2014 - 3:51 pm | llपुण्याचे पेशवेll

आधी चीन, व्हीएत्नाम, उत्तरध्रुव, आंकोर आता सौदी. छान लिहीत आहात.

पेट थेरपी's picture

3 Jun 2014 - 4:15 pm | पेट थेरपी

खरेच बायका गाडी चालवू शकत नाहीत? मला तर बोवा जिथे स्कूटर वरून भुर्रकन जायला येते अशीच जागा आवडते. आणि हे लोक्स मेड सर्वंटस ना अब्युज करतात ना? ड्यांजर.

पेट थेरपीजी, भारतात १ दिवस असा जातो का, की रेपची बातमी नाही पेपरला?
जास्त लीहीत नाहि...समजुन घ्या.

रामपुरी's picture

4 Jun 2014 - 3:42 am | रामपुरी

स्पष्टीकरण आवडले. का हो 'तिकडे' रेप च्या बातम्या किती येतात वर्तमानपत्रात? कि 'बाईच आहे. होणारच रेप' अशी मनोवॄत्ती असते?
मनोवॄत्तीत फरक आहे. जास्त लीहीत नाहि...समजुन घ्या.

प्रचेतस's picture

4 Jun 2014 - 8:56 am | प्रचेतस

अत्याधुनिक शहर आहे हे. रियाधचा पूर्वेइतिहासाची माहिती पण आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jun 2014 - 12:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुक्त विहारि, अजया, ॥पुण्याचे पेशव॥, पेट थेरपी, रामपुरी आणि वल्ली : सहलितील सहभागासाठी धन्यवाद !

सगळे फोटू आवडले. इमारतींचे विविध आकार पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही.

बॅटमॅन's picture

4 Jun 2014 - 7:47 pm | बॅटमॅन

मस्त शहर दिसतेय! हा भागही मस्त आवडलाच. तेलामुळे साला काय समृद्धी आलीय सौदीत, खरंच..

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jun 2014 - 11:20 am | डॉ सुहास म्हात्रे

रेवती आणि बॅटमॅन : अनेक धन्यवाद !

पैसा's picture

13 Jun 2014 - 12:05 pm | पैसा

लेख, छायाचित्रे आणि त्या अनुषंगाने आलेल्या प्रतिक्रिया सगळेच नेहमीप्रमाणे आवडले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jun 2014 - 2:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

प्रसाद गोडबोले's picture

13 Jun 2014 - 12:14 pm | प्रसाद गोडबोले

माझं ऑफीस फैजलिया टॉवर मधे होतं ... आणि त्याचे मागे ते वझारे दाखिलिया मिनिस्ट्री ऑफ इन्टेरीयर दिसतय त्याच्या जवळ मी रहायला होतो :)
खरंतर अतिप्रचंड उकाडा , नो अल्कोहोल , नो फ्लर्टींग आणि नो इन्टर्टेन्मेन्ट ह्या तीन चार जाचक गोष्टी सोडल्चा र्तर मला काहीच प्रॉब्लेम वाटला नाही त्या देशात :)

असो, हे फोटो बघुन परत जुन्या आठवणी जाग्या झाल्या :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jun 2014 - 2:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

वा, वा ! एकदम प्रसिद्ध पत्यावर काम करत होतात तर !

रियाधपेक्षा दम्माम बरेच जास्त मोकळे आहे.

आखाती देशांतला उकाडा हा प्रकार जरा तुलनात्मक प्रकार आहे. माझ्या नोकरीत मला इमारतीबाहेर काम (फिल्ड वर्क) करणे जरूर नव्हते. वातानुकुलित कार्यालये, गाड्या आणि घर यामुळे उन्हाचा त्रास नाही म्हणण्याइतकाच झाला. भारतात सुट्टीवर असतानाच उन्हाचा जास्त त्रास झाला ;) अर्थात फिल्ड वर्क असलेली नोकरी कितीही मोठी असली तरी इमारतीबाहेर काम करताना उन्हाचा जाच ही निश्चितच समस्या आहे, हे मात्र खरे.

एंटरटेनमेंटचा मुद्दा आपले मित्रमंडळ जमवून छानपैकी सोडविता येतो. दम्माम्मध्ये तरी विकांताला लोक भरपूर (अर्थात कोरड्या ;) ) पार्ट्या करतात. मराठी मंडळ आणि मित्रपरिवारातील खाजगी मित्र मंडळे यात वेळ मजेत घालवता येतो.

याबाबतीत रियाधच्या तुलनेने दम्माममध्ये अजून एक फार मोठा फायदा आहे. मल्टीपल व्हिसा असल्यास तासाभरात ४५ किमीवरचे (पूर्ण मोकळे-ढाकळे) बहरेन गाठता येते. विकांताला तर तिथल्या सीमेवरच्या इमिग्रेशन पोस्टवर मोठी गर्दी असते. अगदी कामाच्या दिवशीही दु ४:३० ला काम संपवून गाडी सरळ बहरेनच्या दिशेने वळवून एक चित्रपट आणि नंतर जुन्या मनामातल्या एखाद्या फक्कड भारतिय रेस्तराँमध्ये जेवून रात्री १०:३०-११ पर्यंत घरी परतता येते.