सौदी क्षणचित्रे : ०६ : आधुनिक औद्योगिक शहर, अल् जुबेल

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
28 May 2014 - 11:49 am

===================================================================

सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...

===================================================================

... आपली पुढची सफर आहे सौदी अरेबियातील आधुनिक औद्योगिक शहर जुबेलची.

द रॉयल कमिशन फॉर जुबेल अँड यानबू

२१ सप्टेंबर १९७५ साली सौदी राजाच्या वटहुकुमाने "द रॉयल कमिशन फॉर जुबेल अँड यानबू" ची स्थापना झाली. तडक केंद्रीय मंत्रीपरिषदेच्या आधिपत्याखाली असलेल्या या संस्थेचे मुख्य काम होते सौदी अरेबियाच्या अरबी आखाती पूर्व किनार्‍यावरील जुबेल आणि रक्तसमुद्रावरच्या पश्चिम किनार्‍यावरील यानबू या दोन ठिकाणांचा विकास करून तेथे अत्याधुनिक औद्योगिक शहरे वसवणे. ही दोन्ही शहरे तेल उद्योगावर आधारलेल्या सौदी कंपन्यांची माहेरघरे आहेत. उत्तम आराखडे तयार करून व्यापारी व्यवस्थापन तत्त्वावर स्थापन केलेली आणि चालवली जाणारी ही शहरे हा सौदी अरेबियात अस्तित्वात आलेला एक जगावेगळा उपक्रम आहे.

या दोन शहरांचा अनुभव जमेस धरून आता त्यांच्यामध्ये रास अल् खैर या तिसर्‍या जागेची भर टाकली गेली आहे. जुबेलच्या उत्तरेस ६० किलोमीटरवर असलेल्या या ठिकाणी अल्युमिनियम, अमोनिया, फॉस्फरस आणि सल्फर या सौदी खनिज संपत्तीवर आधारीत उद्योग उभारले जाणार आहेत.

अल् जुबेल

दम्मामच्या बाहेर पडून सौदी अरेबियाच्या अरबी आखाताच्या किनारपट्टीला समांतर उत्तरेकडे कुवेतला जाणार्‍या महामार्गावर ९० किलोमीटरवर अल् जुबेल हे अरबी जगतातले सर्वात मोठे औद्योगिक शहर आहे. १९७५ पूर्वी या जागी अल् जुबेल नावाचे एक छोटे खेडेगाव होते. या जागेवरच्या मानवी वस्तीचा इतिहास ७,००० वर्षांपूर्वीच्या दिलमून नावाच्या संस्कृतीपर्यंत मागे जातो. इ स १९३३ मध्ये सौदी अरेबियातील खनिज तेल शोधाचे सर्वप्रथम स्थान म्हणून जुबेलचे नाव नोंदले गेले आहे.

बेचेल (Bechtel) ही जागतिक स्तरावर नावाजलेल्या कंपनीला हे शहर बांधण्याचा आणि व्यवस्थापनाचा प्रकल्प मिळवला आहे. जगातला सर्वात मोठा अभियांत्रिकी प्रकल्प आणि एक उत्तम वसाहतीचा नमुना असलेल्या या शहराचे औद्योगिक आणि रहिवासी असे दोन भाग आहेत. त्यांची आखणी करताना औद्योगिक विभागातील प्रदूषणाचा जुबेलच्या आणि इतर कोणत्याही रहिवासी वस्तींना उपद्रव होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. २०११ च्या गणनेप्रमाणे जुबेलची लोकसंख्या ३,८०,००० होती आणि त्यांत एक तृतियांश सौदी, एक तृतियांश भारतीय आणि उरलेले एक तृतियांश जगातील इतर देशांचे नागरिक होते.

२००४ मध्ये "जुबेल दोन (Jubail II)" हा जुबेलच्या विस्तार करण्याचा US$ ३८० कोटीचा (रु २२,८०० कोटीचा) प्रकल्पही बेचेलला देण्यात आला आहे.

दम्मामची वस्ती सोडली की लगेच सौदी वाळवंटातून जाणार्‍या जलदगती मार्गावरून आपली गाडी वेगाने धावू लागते...

.

तास-सव्वातासाच्या प्रवासानंतर जुबेलमधल्या खनीज तेलावर पायाभूत उद्योगधंद्यांच्या खुणा दिसू लागतात...


पेट्रोकेमिकल व्यवसाय (जालावरून साभार)

.

मात्र शहराच्या रहिवासी भागाच्या वेशीपासूनच आखीव-रेखीव हिरवाईच्या रूपाने जुबेल जवळ आल्याच्या खाणाखुणा डोळ्यांना सुखावू लागतात...

.

.

या शहराचा जुना भाग इतर मध्यम आकाराच्या सौदी शहरांपेक्षा फार वेगळा दिसत नाही...

.

.

मात्र या शहराचा आधुनिक भाग जागतिक स्तरांवरच्या शहरांतही उठून दिसेल असा आहे. तर चला मारूया एक फेरफटका नागरी आयोजनासाठी (civic planning) प्रसिद्ध असलेल्या या शहराचा...

.

.

.

.

जालावरचीही खालील काही चित्रे या शहराच्या आखीव-रेखीवपणाची नीट कल्पना देऊ शकतील...


रॉयल कमिशनची इमारत

.


जुबेलमधिल एक रहिवासी वसाहत

.


जुबेलचे विहंगम दृश्य : ०१

.


जुबेलचे विहंगम दृश्य : ०२

जुबेल कॉर्निश

जुबेलचा समुद्रकिनारा हिरवळ व फुलझाडांनी सुशोभित केलेला आहे आणि तेथे मुलांच्या खेळांची व्यवस्थाही आहे. रोज संध्याकाळी आणि विशेषतः सुट्ट्यांच्या दिवसांना तेथे जुबेलच्या रहिवाशांची आणि पर्यटकांची गर्दी असते...


जुबेल कॉर्निश : ०१

.


जुबेल कॉर्निश : ०२ : रहिवासी भागातील समुद्रकिनार्‍यावरून दिसणारे औद्योगिक विभागातील तेल उद्योगातील कंपन्यांचे मनोरे

.


जुबेल कॉर्निश : ०३ : बोटीच्या आकाराचे रेस्तराँ

.


जुबेल कॉर्निश : ०४

.


जुबेल कॉर्निश : ०५

.


जुबेल कॉर्निश : ०६ : कॉर्निशच्या एका भागाचे विहंगम दृश्य (जालावरून साभार)

.

जुबेल कॉर्निशच्या धक्क्यावरून समुद्रात सफर करण्यासाठी बोटी मिळतात. या बोटींवरून समुद्रात चक्कर मारण्याची आणि भर समुद्रात जेवण करण्याची मजा पर्यटकांना घेता येते...


बोटीतून दिसणारे जुबेल शहर : ०१

.


बोटीतून दिसणारे जुबेल शहर : ०२

जुबेल संग्रहालय

जुबेलमध्ये एक संग्रहालय आहे. त्याच्या इमारतीत वेगवेगळे interactive शात्रीय प्रयोग प्रदर्शित केले आहेत. त्यामुळे खेळाखेळात मुले आणि मोठी माणसेही शास्त्रीय प्रयोगांची मजा घेऊ शकतात. या संग्रहालयाच्या आवारात सौदी सैन्यदलातून निवृत्त केलेले अग्नीबाण, विमाने आणि सैनिकी गस्तीबोट, ठेवले आहेत...


संग्रहालय : ०१

.


संग्रहालय : ०२

वातानुकूलित तंबूतील कट्टा

जुबेलच्या एका फेरीत आमच्या हॉस्पीटलच्या रिक्रिएशन विभागाने गावाबाहेरच्या एका वातानुकूलित तंबूत कट्टा भरवला होता, त्याची काही क्षणचित्रे...

.

.


तंबूतल्या कायम रहिवासी बिबट्या राजाबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरणे कठीण होते !

जुबेल बंदर

जुबेलमध्ये जुबेल वाणिज्य बंदर (Jubail Commercial Seaport), किंग फाहाद औद्योगिक बंदर(King Fahd Industrial Seaport) आणि किंग अब्दुल अझिझ नौदल तळ (King Abdul-Aziz Naval Base) आहेत.


किंग अब्दुल अझिझ नौदल तळ (जालावरून साभार)

जल आणि ऊर्जा प्रकल्प

जुबेलमध्ये जगातला सर्वात मोठा स्वतंत्र जल आणि ऊर्जा प्रकल्प (Independent Water and Power Project) आहे. तेथे दररोज समुद्राच्या पाण्यापासून ८ लाख घनमीटर शुद्ध पाणी आणि २,७४५ मेगॅवॅट वीज निर्माण केली जाते.


जुबेलमधिल समुद्रजल शुद्धीकरण प्रकल्प (डिसलायनेशन प्रोजेक्ट) : ०१ (जालावरून साभार)

.


जुबेलमधिल समुद्रजल शुद्धीकरण प्रकल्प (डिसलायनेशन प्रोजेक्ट) : ०२ (जालावरून साभार)

.

संध्याकाळी परतताना, दिवसा केवळ मनोरे आणि नळ्यांच्या शेवयांचा गुंता दिसणार्‍या तेल उद्योगातील प्रकल्पांवरची रोषणाई मन मोहून घेते...


तेल उद्योगातील (पेट्रोकेमिकल) प्रकल्प : ०१

.


तेल उद्योगातील (पेट्रोकेमिकल) प्रकल्प : ०२

.

पुढच्या भागात आपण राजधानी रियाधला भेट देणार आहोत.

क्रमशः

===================================================================

सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...

===================================================================

प्रतिक्रिया

बारक्या_पहीलवान's picture

28 May 2014 - 3:42 pm | बारक्या_पहीलवान

जेथे राहतो तेथील फोटो बघुन आनन्द झाला. मराठी मानुस नौकरी साठी येथे यावेत असी ईच्छा आहे. माहिति हवि असल्यास जरुर ईमेल पाठवा.

प्रचेतस's picture

28 May 2014 - 4:51 pm | प्रचेतस

सुंदर शहर आहे आणि किती सुनियोजित.
हे दोन शहरांना जोडणारे लांबच लांब निर्मनुष्य महामार्ग सतत वाळूने भरून जात असतील. सौदी सरकार ह्याची काळजी घेत असेलच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2014 - 9:56 am | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीच भूरभूरणारी वाळू गुळगुळीत रस्त्यांवर साठत नाही... वार्‍याबरोबर उडून जाते. मात्र सोसाट्याचा वारा / वादळाने रस्त्यावर साठणारी वाळू यंत्रे आणि माणसांच्या सहाय्याने त्वरीत साफ केली जाते.

मुक्त विहारि's picture

28 May 2014 - 10:24 pm | मुक्त विहारि

आवडला....

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2014 - 9:57 am | डॉ सुहास म्हात्रे

बारक्या_पहीलवान आणि मुक्त विहारि : धन्यवाद !

भाते's picture

29 May 2014 - 12:14 pm | भाते

सविस्तर माहिती आणि फोटो छान आहेत.
खासकरून समुद्र किनाऱ्याचे फोटो आवडले.

विकास जाधव's picture

29 May 2014 - 3:39 pm | विकास जाधव

पाच वर्षे काढली मी तिथे, जुन्या आठवणीना उजाळा मिळाला, धन्यवाद.

वाह! डोळे दिपून गेले. अजस्त्र तेलप्रकल्प, जलशुद्धिकरण केंद्र, आखीव वसाहती पाहून मस्त वाटले.
जुबेलचे डाऊन टाऊन मात्र भारतातल्या मध्यम आकाराच्या गावातला भाग असावा असे आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 May 2014 - 8:32 am | डॉ सुहास म्हात्रे

भाते, विकास जाधव आणि रेवती : अनेक धन्यवाद !

सविता००१'s picture

30 May 2014 - 12:55 pm | सविता००१

आजच सगळे भाग वाचून कढलेत. क्लासिक मालिका झाली आहे.. खूप आवडली

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jun 2014 - 11:27 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

विटेकर's picture

3 Jun 2014 - 11:23 am | विटेकर

ओघवते आणि चित्रदर्शी लेखन ! आवडले !
पण अजूनही एखाद्या माहितीपटासारखे वाटणारे हे लेखन तिथल्या सामाजिक आणि सांस्कॄतिक बाबींवर केव्हा टिप्पणी करते याची वाट पाहात आहे... !
लोक आखाती देशात पैसे मिळवायला जातात असेच आत्तापर्यन्त वाटत होते पण सुंदर आणि उच्च राहणीमान हा ही एक भाग असू शकतो असे आता म्हणता येईल असे वाटते.

आता:-
लोक पुन्हा परत का येतात ? घरच्या लोकांची ओढ ? पण इथे पुण्यात राहणारी मुले सुद्धा शिरुर मधल्या आपल्या आई-वडीलांना महिनोन महिने भेटत नाहीत ही भारतातील वस्तुस्थिती आहे ? तिथे अशी कोणती गोष्ट जाचक आहे की लोक अर्धवट वयात परत येतात ? ( मातृभूमीचे प्रेम ? ..जननि जन्मभूमीश्च..???) हे तितकेसे खरे वाटत नाही !

अन्य आखातातील /परदेशातील लोकांनी ही आपले अनुभव मांडावेत !

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jun 2014 - 12:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

लोक पुन्हा परत का येतात ? घरच्या लोकांची ओढ ? पण इथे पुण्यात राहणारी मुले सुद्धा शिरुर मधल्या आपल्या आई-वडीलांना महिनोन महिने भेटत नाहीत ही भारतातील वस्तुस्थिती आहे ? तिथे अशी कोणती गोष्ट जाचक आहे की लोक अर्धवट वयात परत येतात ? ( मातृभूमीचे प्रेम ? ..जननि जन्मभूमीश्च..???) हे तितकेसे खरे वाटत नाही !

पाश्चिमात्य देशांसारखे आखाती देशांत नागरिकत्व मिळत नाही किंवा फार फार मोठ्या अभावानेच मिळते. त्यामुळे, तेथे नोकरी करणारा परत येणार हे नक्की असते. मात्र केव्हा परत येणार हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, त्यातील काही...

१. नोकरीच्या कराराची मुदत संपणे / (सरकारी नोकरीतून) निवृत्त होणे.

२. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या अटी जाचक वाटणे... उदा. कुटूंबाचा व्हिसा नसणे, सुटी कमी असणे, इ.

३. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या जागेतले / देशातले वातावरण न आवडणे.

४. आपल्या देशातल्या आणि परदेशातल्या चलाख एजंटनी मोठ्या पगाराची खोटी आश्वासने देवून केलेली फसवणूक हा प्रकार खाडी देशातल्या निम्न स्तरांच्या नोकर्‍यांत दिसतो. तसेच पाश्चिमात्य देशांत मानवी तस्करीच्या मार्गाने जाण्यासाठी मोठी रक्कम एजंटला देणारेही असतात. या दोन फार मोठ्या शोकांतिका आहेत. खरी वस्तुस्थिती समजल्यावर असे लोक काही करून स्वदेशात कसे परतता येईल याची स्वप्ने पाहत असणे स्वाभाविक आहे.

माझा स्वतःचा अनुभव व निरिक्षणे यावरून खालील विधाने करू शकतो...

उत्तम जीवन (स्वर्ग), नीच जीवन (नर्क) आणि त्या दोघांमधले मधले सर्व स्तर (स्पेक्ट्रम) हे जगात सर्वच ठिकाणी (तथाकथित उत्तम-नीच देशात आणि स्वदेश-परदेशात) असतात. प्रत्येक जागेवर, माणसाचे त्या जागेवरचे स्थान, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, त्याच्या आजूबाजूची माणसे, इत्यादीवर तो माणूस स्वर्ग-नर्काच्या कोणत्या स्तरावर आहे हे ठरते. एकाच ठिकाणची परिस्थिती बदलल्यास स्वर्ग-नर्काचा स्तर बदलू शकतो. दर परिस्थितीत प्रत्येक माणसाची सद्य परिस्थितीचा सारासार विचार करून स्वतःला परवडणारा निर्णय घेण्याची आणि तो अमलात आणण्याची पात्रता / धमक त्याच्या सुख-दु:खाचा स्तर ठरवते.

स्पष्टीकरण:

१. स्वदेशात अतिशय नीच अवस्थेत असणारी माणसे विरळ नाहीत हे आजूबाजूला पाहिले तर नक्की दिसेल. याउलट, जगात अत्युत्तम समजल्या जाणार्‍या देशातही फार आनंदात नसलेली स्थानिक / परकिय माणसे कमी नाहीत. "खाटल्यावर आणून देणारे हरी" जितके स्वदेशात विरळ असतात तेवढेच विरळ "छळणारे कंसमामा" परदेशात असतात. मात्र जसे आपण भारतात परदेशांचे गोडवे गातो तसेच आपल्याला परदेशात गेल्यावर देशप्रेमाचा आणि (देशात असताना महिनोमहिने न भेटणार्‍या) मित्र-नातेवाईकांबद्दलच्या प्रेमाचा उमाळा येतो. आपल्या हातात नसलेले खेळणे मुलांना जास्त चांगले वाटते... वय वाढल्यावर खेळण्याचे स्वरूप बदलते, इतकेच !

२. माझा स्वतःचा अनुभव मागे वळून पाहिल्यावर असे दिसते की, भारतात जितक्या समस्या मला आल्या किंवा जितके असुखकारक अनुभव आले त्यापेक्षा कमीच परदेशात आले.

३. स्वदेशातल्या आणि परदेशातल्या दर ठिकाणाला आपापले फायदे-तोटे असतात. आपण आपल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे त्यांची तुलना करून आपल्याला परवडणारा निर्णय घ्यायचा असतो. या जगात १००% फायद्याची जागा कोठेही नाही... जन्मस्थानात, स्वदेशात किंवा परदेशातही.

टाळ्या. *clapping*

विटेकर's picture

3 Jun 2014 - 2:16 pm | विटेकर

धन्यवाद इ ए जी,
अतिशय समर्पक आणि मुद्देसूद उत्तर.