सौदी क्षणचित्रे : ०८ : जेद्दाह् (भाग १)

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
5 Jun 2014 - 12:29 am

===================================================================

सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...

===================================================================

...पुढच्या भागात, जेद्दाह् ची सहल.

जेद्दाह्

जेद्दाह् हे सौदी अरेबियाच्या पश्चिमकिनार्‍यावरील रक्तसमुद्रावरचे सर्वात मोठे बंदर आणि सौदी अरेबियातील (राजधानी रियाध खालोखाल) दोन क्रमांकाचे शहर आहे. या शहराची लोकसंख्या ५१ लाख आहे. हे मक्का प्रांतातील सर्वात मोठे शहर आहे आणि मक्केत हज या इस्लामी तीर्थयात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना या शहराच्या मार्गे जावे लागते. या कारणामुळे या शहराला धार्मिक आणि व्यापारी महत्त्व असणे साहजिकच आहे. याशिवाय त्याला आधुनिक वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी जगतात महत्त्वाचे स्थान देण्यासाठी अनेक प्रकल्प चालू आहेत. जेद्दाह् मध्ये अनेक पर्यटक स्थाने (resorts) असून ते सौदी अरेबियाचे प्रथम क्रमांकाचे पर्यटन शहर आहे. Globalization and World Cities Study Group and Network (GaWC) ने या शहराला Gamma world city हा किताब बहाल केला आहे.

या शहराच्या नावाबद्दल अनेक प्रवाद आहेत. त्यातील सर्वात रोचक असा. अरबीत जद्दा म्हणजे आजी. आधुनिक मानवांतली मूळ स्त्री म्हणजेच 'मानवजातीची आजी इव्ह'चे थडगे या शहराजवळ आहे असा पूर्वपार समज येथे आहे. यावरून या जागेला जेद्दाह् असे नाव पडले आहे. कोणाच्याही थडग्याजवळ प्रार्थना करणे इस्लाममध्ये निषिद्ध आहे. त्यामुळे इव्हच्या तथाकथित थडग्याजवळ प्रार्थना करण्याची प्रथा बंद करण्यासाठी १९७५ साली ती जागा कॉन्क्रीटने आच्छादून टाकली आहे. या शहराच्या नावाचे जुद्दा आणि जाद्दा असे उच्चार काही प्रमाणात प्रचलित असले तरी जेद्दाह् हाच उच्चार बहुतांश केला जातो.

उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवरून येथे अश्मयुगात वस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. इ स पूर्व ५०० मध्ये येथे येमेनेमधल्या कुदा नावाच्या जमातीच्या कोळी लोकांचे खेडे होते. अलेक्झांडर (इ स पूर्व ३५६ - ३२३) त्याच्या एका मोहिमेत इथपर्यंत येऊन गेला असे म्हणतात.

इस्लामच्या सुरुवातीच्या काळात मक्केला जाण्यासाठी मुख्यत: अल् शोइबा नावाच्या एका बंदराचा वापर होत असे. इ स ६४७ मध्ये उथमान बिन अफान या तिसऱ्या मुस्लिम खलिफाने जेद्दाह् बंदराचा विकास करून त्याला मक्का तीर्थयात्रेच्या मार्गावरचे मुख्य बंदर बनविले आणि जेद्दाह् ची ऊर्जितावस्था सुरू झाली ती आजतागायत चालू आहे. मात्र त्याच्या याच ऐतिहासिक महत्त्वामुळे या शहरावर सतत आक्रमणे झाली. त्यामुळे जेद्दाह् आणि आजूबाजूचा प्रदेश मिळूम असलेल्या हिजाझ प्रांताच्या मालकीचे अनेकदा हस्तांतरण झाले.

इ स ९६९ मध्ये अल्जेरियाच्या फातीमिद खिलाफतीने इजिप्तचा पाडाव करून रक्तसमुद्राच्या व्यापारावर स्वामित्व स्थापन केले आणि जेद्दाह् मुख्य शहर असलेल्या हिजाझ प्रांतावर वर कब्जा केला. या साम्राज्याने रक्तसमुद्रमार्गे चीनच्या साँग राजघराण्याशी व्यापारी आणि राजकीय संबद्ध स्थापन केले होते. या काळात जेद्दाह् मध्ये पूर्व आफ्रिका, सिंध, दक्षिणपूर्व आशिया, इत्यादी अनेक दूरदेशीच्या दर्यावर्द्यांचा आणि व्यापाऱ्यांचा राबता असे.

इ स ११७१ मध्ये जेरुसालेमचा पाडाव करून सालादीनने स्वत:ला इजिप्तचा राजा घोषित केले आणि फातीमिद साम्राज्य खालसा करून त्यांचा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला. त्याच्या आय्युबीद खिलाफतीचा छोटा कालखंड व्यापारी आणि सांस्कृतिक भरभराटीचा होता. याच काळात आय्युबीद घराण्याने अनेक गावा-शहरांत मदरसे स्थापन करून या भागामध्ये इस्लामच्या सुन्नी तत्त्वांचा वरचष्मा स्थापन केला. इ स १२५४ मध्ये आय्युबीद साम्राज्य मोडकळीला येऊन जेद्दाह् सह हिजाझ प्रांत मामलुक सल्तनतीचा भाग बनले.

नंतर १५१७ मध्ये ऑटोमन तुर्कांनी मामलुक सल्तनतीचा पराभव करून इजिप्त, सिरीया आणि मक्का-जेद्दाह् सह हेजाज प्रांत आपल्या साम्राज्याला जोडला. १५२५ मध्ये पोर्तुगीज सरखेल लोपो सोरेस द अल्बुकर्क ने केलेल्या हल्ल्याला परतवून लावल्यानंतर तुर्कांनी संपूर्ण जेद्दाह् शहराभोवती सहा व्दारे असलेली संरक्षक भिंत बांधली आणि आपली पकड अधिक मजबूत केली.


ऑटोमन साम्राज्याचा नकाशा (जालावरून साभार)

.


संरक्षक भिंतीसह जेद्दाह् शहराचे प्रकाशचित्र (इ स १९३८) (जालावरून साभार)

१८०२ मध्ये स्थानिक नेज्दी लोकांनी उठाव करून मक्का आणि जेद्दाह् ताब्यात घेतले. पण ऑटोमन सुलतानाने हल्ला करून १८१३ च्या जेद्दाह् च्या पहिल्या युद्धात त्यांना परत मिळविले आणि पुढची शंभर वर्षे त्यावर कब्जा कायम ठेवला. पहिल्या महायुद्धाच्या काळातल्या (१९१४ - १८) गडबडीचा फायदा घेऊन स्थानिक सरदार हुसेन अलीने बंडाळी करून सिरीयातील अलेप्पो पासून ते येमेनमधल्या एडनपर्यंतच्या भूभागावर स्वतंत्र अरब राज्य स्थापन केले आणि स्वत:ला त्याचा राजा घोषित केले. १९२४ साली इब्न सौदने त्याच्यापासून मक्का जिंकून घेऊन आधुनिक सौदी अरेबियाची स्थापना करण्यास सुरुवात केली. या युद्धानंतर हुसेन राजगादीवरून पायउतार झाला आणि त्याचा मुलगा अली हुसेन राजा झाला. इब्न सौद बरोबरच्या जेद्दाह् च्या दुसऱ्या युद्धात अली पराभूत झाला आणि तो बगदादला पळून गेला. नंतर पुढे तो अम्मानला जावून स्थायिक झाला. अम्मानला अलीच्या वारसांनी हाशेमाईट घराण्याची राजसत्ता स्थापन केली, ती आधुनिक जॉर्डन देशाच्या रुपाने आजतागायत चालू आहे.

असा वैविध्यपूर्ण इतिहास असलेले आणि अनेक संस्कृतींनी प्रभावीत झालेले शहर बघायची उत्कंठा होतीच. पण दम्मामपासून सरळ रेषेत १५०० किमी दूर असलेल्या या जागी जाण्याचा योग येत नव्हता. अखेरीस तेथे एका परिषदेत भाषणबाजी करायला आमंत्रण मिळाले आणि तो योग आला. योगायोगाने त्या दोन दिवसांना जोडून आठवड्याची दोन दिवसांची सुट्टी आली आणि दुधात साखर पडली. त्यामुळे हे शहर जरा मोकळेपणाने बघायला मिळाले. मक्का प्रांतात असल्याने हे शहर खूप कर्मठ असेल आणि त्यांत पर्यटकांसाठी फारसे काही नसेल या कल्पनेला बऱ्यापैकी धक्का बसण्याइतके हे शहर आधुनिक, मोकळे आणि वैविध्यपूर्ण आहे.

चला तर विविधरंगी जेद्दाह् च्या सहलीला…

विमानतळावरून हॉटेलवर पोहोचलो तेव्हा दुपार उलटून गेली होती. थोडा आराम करून संध्याकाळी पाय मोकळे करण्यासाठी आणि जेवणासाठी बाहेर पडलो.

व्यापारी महत्त्व असलेल्या या शहरात मोठमोठी आकर्षक दुकाने व मॉल नसते तरच आश्चर्य. शहराच्या नवीन भागांत रुंद रस्ते आणि रस्त्यांवर दोन्ही बाजूंना आणि दुभाजकांवर हिरवळ व झाडे आहेत...


ताहलिया रस्ता : ०१

.


ताहलिया रस्ता : ०२

.


ताहलिया रस्ता : ०३

.


ताहलिया रस्ता : ०४

.

दुसर्‍या दिवशी जरा लवकर आटपून मोकळ्या दोन दिवसांचा पुरेपूर उपयोग करायला एक टॅक्सीवाला दिवसाच्या बोलीवर गाठला आणि शहराची भटकंती सुरू केली. कर्मधर्म संयोगाने टॅक्सीवाला मल्याळी निघाला. मग काय ! शहराच्या भटकंतीबरोबर खास मल्याळी ढबीतल्या हिंदीमध्ये जेद्दाची वैशिष्ट्ये आणि गुपिते उघडी होऊ लागली ! :)


किंग फाहाद रस्ता

.


जेद्दाह् मधिल एक रस्ता

.


रस्त्याशेजारचा एक बंगला

.


कापडाचे दुकान

.


मॉल : ०१

.


मॉल : ०२

.


शॉपिंग कॉम्प्लेक्स

.


कॉर्निश रस्ता : ०१

.


कॉर्निश रस्ता : ०२

.


कॉर्निश रस्त्यावरची एक मस्जिद

.


जेद्दाह् कॉर्निशचे रात्रीचे दृश्य

.


जेद्दाह् कॉर्निशच्या एका भागाचे विहंगम दृश्य (जालावरून साभार)

.


जेद्दाह् कॉर्निशचे रात्रीचे विहंगम दृश्य (जालावरून साभार)

जुने जेद्दाह्

जेद्दाह् हे खूप जुन्या काळापासून व्यापार आणि धार्मिक प्रवासाच्या मार्गावरचे महत्त्वाचे ठिकाण असल्याने तेथे जुनी पारंपरिक धाटणीची घरे असणारच. मात्र ती घरे खनिज तेलामुळे आलेल्या समृद्धीच्या सुनामीत वाहून जाऊ लागली होती. त्यांना पाडून नव्या इमारती बांधण्याचा सपाटा सुरू झाला होता...


नूतनीकरणापूर्वीचे जुने जेद्दाह् : ०१ (जालावरून साभार)

.


नूतनीकरणापूर्वीचे जुने जेद्दाह् : ०२ (जालावरून साभार)

.

बरीच जुनी घरे वेगाने वाढणार्‍या शहरामुळे नष्ट झाल्यावर सरकारने हा सांस्कृतिक वारसा जपून ठेवण्यासाठी पुढाकार घेतला. शहराचा एक जुना भाग राखीव ठेवून तेथील जुन्या घरांचे नूतनीकरण केले जात आहे...


नूतनीकरणानंतरचे जुने जेद्दाह् : ०१

.


नूतनीकरणानंतरचे जुने जेद्दाह् : ०२

.


नूतनीकरणानंतरचे जुने जेद्दाह् : ०३

.


नूतनीकरणानंतरचे जुने जेद्दाह् : ०४

.


नूतनीकरणानंतरचे जुने जेद्दाह् : ०५

.


नूतनीकरणानंतरचे जुने जेद्दाह् : ०६

पारंपरिक जेद्दाह् सूक (बाजार)

पारंपरिक स्थानिक बाजाराला अरबीत सूक असे म्हणतात. स्थानिक विशेषांच्या आणि रोजच्या जीवनातल्या वस्तूंची रेलचेल असणार्‍या सूकमधील एक फेरी...


जेद्दाह् सूक : ०१

.


जेद्दाह् सूक : ०२

.


जेद्दाह् सूक : ०३

.


जेद्दाह् सूक : ०४

रिसॉर्ट सिटी जेद्दाह्

व्यापाराच्या आणि धार्मिक प्रवासाच्या निमित्ताने जेद्दाह् मध्ये दर वर्षी २५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी येतात. या वर्दळीचा फायदा घेण्यासाठी जेद्दाह् मध्ये अनेक पर्यटक रिसॉर्ट्स बनविली आहेत. त्यातली नामवंत आहेत दुर्रात अल् आरूस; अल् नवरस मोवेनपिक रिसॉर्ट; क्रिस्टल रिसॉर्ट; रॅडिसन ब्लॉ; द सिग्नेचर अल् मुरजान रिसॉर्ट; अल् नखील व्हिलेज; सँड्स; शेरेटन अभूर; पार्क हयात जेद्दाह् मारीना, क्लब अँड स्पा; इ. यातल्या बर्‍याच रिसॉर्ट्सना त्यांचा स्वतंत्र समुद्रकिनारा आहे. त्यातल्या काही रिसॉर्ट्सची स्वतःच्या मालकीची रक्तसमुद्रातील प्रवाळ बेटे (कोरल रीफ) आहेत.


जेद्दाह् मधील एक रिसॉर्ट : ०१ (जालावरून साभार)

.


जेद्दाह् मधील एक रिसॉर्ट : ०२ (जालावरून साभार)

.


जेद्दाह् मधील एक रिसॉर्ट : ०३ : पार्क हयात जेद्दाह् मरीना, क्लब अँड स्पा

जेद्दामध्ये बघण्यासारखे अजून खूप आहे. यापुढची सफर आपण पुढच्या भागात चालू ठेवूया.

क्रमशः

===================================================================

सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...

===================================================================

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

5 Jun 2014 - 2:01 am | अर्धवटराव

काय प्रचंड श्रीमंती आहे राव. भिती वाटते.

हा भाग देखील आवडला. खरं तर एक्का साहेबांच्या "प्रवासी" धाग्यांना लाइक करणे म्हणजे दुरुक्तीच.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jun 2014 - 2:11 am | अत्रुप्त आत्मा

अतिशय मस्त रोमांचक सफर चाल्लीये! :)
फोटो तो फोटो..आउर इतिहास तो इतिहास.. ;) ऐसा मन केहेता है।

प्रचेतस's picture

5 Jun 2014 - 9:01 am | प्रचेतस

हेच म्हणतो.

सौदी अरेबियामधली स्थलवर्णनं अजिबातच पाहण्यात नाहीत. आपल्या सफरीनिमित्त आम्हालाही ह्या ठिकाणांची माहिती होते आहे.

एस's picture

5 Jun 2014 - 11:15 am | एस

;-)

सुहास झेले's picture

5 Jun 2014 - 7:17 pm | सुहास झेले

ह्येच बोलतो :)

वाह! सगळे फोटू नेत्रदिपक आहेत. रस्त्याशेजारच्या हिरव्या पिवळ्या बंगल्यात एका मनुष्याच्या अनेक बेगमा असणार असे वाटले. ;) एकंदरीतच भव्यदिव्य शहर आणि इमारती आहेत. आखातातल्या बर्‍याच बिल्डींगा या वैशिष्ठ्यपूर्ण असतात असे वाटते. सूक आणि रिसॉर्टची चित्रेही चांगली आहेत. पाईप गुंडाळून ठेवलेली काचेची पात्रे म्हणजे हुक्का आहे का? (शेवटून ६ वा फोटू.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2014 - 11:24 am | डॉ सुहास म्हात्रे

रस्त्याशेजारच्या हिरव्या पिवळ्या बंगल्यात एका मनुष्याच्या अनेक बेगमा असणार असे वाटले. नाही ! :) इस्लामच्या तत्वाप्रमाणे प्रत्येक बायकोला समान गोष्टी (संपत्ती, दागिने, घर, गाडी*, इ) द्यावे लागते... म्हणजे जितक्या बायका तितके बंगले बांधावे लागतात / फ्लॅट घ्यावे लागतात. शिवाय इस्लाममध्ये लग्नात नवर्‍याने बायकोला हुंडा (मेहेर) द्यायचा असतो. सौदी लग्नात मेहेर हा एक फार मोठा खर्च असतो. सौदी मुली आणि मुलींचे पालक या नियमाबाबत आग्रही असतात, त्यामुळे तेथे खूप श्रीमंत असल्याशिवाय अनेक लग्ने करणे शक्य होत नाही.

पण याचा दुसरा परिणाम असा की सर्वसामान्य परिस्थितितल्या अनेक तरूणांना मेहेरचे पैसे जमेपर्यंत बराच काळ अविवाहित रहावे लागते. यावर काही प्रमाणात तोडगा म्हणून सरकारचे बिनव्याजी कर्ज मिळते. पण ती व्यवस्था सर्वानाच मिळते असे नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2014 - 11:34 am | डॉ सुहास म्हात्रे

पाईप गुंडाळून ठेवलेली काचेची पात्रे म्हणजे हुक्का आहे का? (शेवटून ६ वा फोटू.) होय, ती हुक्क्याची पात्रेच आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2014 - 11:49 am | डॉ सुहास म्हात्रे

हे राहिलच की गडबडीत... *pardon*

गाडी* : सौदी अरेबियात महिलांना गाडी चालवायची परवानगी नसली तरी, त्यांच्या नावावर गाडी विकत घ्यायची परवानगी आहे... मात्र ती गाडी नवरा, घरातला इतर पुरूष अथवा ड्रायव्हरला चालवावी लागते :)

उदय के'सागर's picture

5 Jun 2014 - 3:26 pm | उदय के'सागर

हो मागे एकदा डिस्कवरी वर पाहिले/ऐकले होते हे. पण ही सक्ती सौदी स्त्रियांनाच असावी ना? म्हणजे आपण भारतीय तिकडे गेलो तर भारतीय स्त्रिया चालवू शकतात का गाड्या? की ही बंदी सरसकट सर्वच स्त्रियांवर आहे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2014 - 9:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

कोणतीही (सौदी अथवा परदेशी) स्त्री सौदी अरेबियात गाडी चालवू शकत नाही.

उदय के'सागर's picture

6 Jun 2014 - 11:53 am | उदय के'सागर

ओह! धन्यवाद शंकानिरसन केल्याबद्दल.

उदय के'सागर's picture

5 Jun 2014 - 3:28 pm | उदय के'सागर

आश्चर्यच आहे. हुंड्यासाठी(मेहेर) विशेष कर्ज ही मिळतं सरकारकडून :) रोचकच आहे ही माहिती!

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2014 - 11:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

लग्नासाठी मेहेरसाठी पैसे नाहीत म्हणून अविवाहित राहणार्‍या मुलांची संख्या तेथे सामाजिक असंतोषाचे एक कारण बनू लागले आहे.

एक विचारायचं राहिलं. वरील दाखवलेल्या मॉलमध्ये आणि रिसॉर्टमध्ये स्त्रीयांना प्रवेश आहे का? प्रत्येक मॉलला स्त्रीयांचा मजला वेगळा असतो का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2014 - 11:31 am | डॉ सुहास म्हात्रे

प्रत्येक ठिकाणी अशी व्यवस्था असेलच असे नाही. सर्व मॉल्स / दुकानांमध्ये स्त्रीयांना सर्व ठिकाणी प्रवेश असतो. काही मोठ्या मॉल्समध्ये स्त्रियांसाठी राखीव असलेल्या भागात आणि इतर ठिकाणी केवळ स्त्रियांच्या उपयोगाच्या वस्तू विकणार्‍या दुकानांत पुरुषांना मज्जाव असतो.

प्रचंड मॉलचा संपूर्ण मजला स्त्रियांसाठी राखीव असणारे माझ्या माहितीतले एकमेव ठिकाण म्हणजे रियाधचे किंगडम सेंटर.

रेवती's picture

5 Jun 2014 - 4:05 pm | रेवती

अच्छा.

मुक्त विहारि's picture

5 Jun 2014 - 9:46 am | मुक्त विहारि

तुम्ही जेद्दा विषयी, काही तरी सांगालच अशी आशा होती.

म्हणूनच वेळ आणि गाडी असून पण, मुद्दामच जेद्दाला गेलो न्हवतो.

तुमच्या ह्या माहीतीचा मला नक्कीच उपयोग होईल.

आतापर्यंतच्या भागात सगळ्यात आवडलेला भाग.
फोटो तर झक्कास.
त्यातही 'रस्त्याशेजारचा एक बंगला', 'मॉल ०१' आणि 'नूतनीकरणापूर्वीचे जुने जेद्दाह् : ०१' हे फोटो खुपच आवडले.
पुभाप्र

मदनबाण's picture

5 Jun 2014 - 11:00 am | मदनबाण

मस्तच !
माझ्या एका बंगाली मित्राच्या एंगेजमेंट मधे फ्ल्वेवर्ड हुक्क्याची मजा घ्यायची संधी मिळाली होती, ते वरील हुक्क्याच्या चित्रावरुन आठवले. :)

भाते's picture

5 Jun 2014 - 11:36 am | भाते

नूतनीकरणापूर्वीचे जुने जेद्दाह् आणि मॉलचे फोटो आवडले.

तो पहिल्या चित्रातला नकाशा पाहुन शाळेत असतानाचे आठवी नववीतले भूगोलाचे पुस्तक आठवले. अक्षांश रेखांश असले गचाळ शब्द वापरून लिहिलेले ते पुस्तक कधीही ऊघडावेसे सुध्दा वाटले नाही.
आता इतक्या वर्षानंतर त्याच देशांची माहिती वाचताना आणि फोटो बघताना मजा वाटते आहे.
आजच्या मुलांना ते रटाळ धडे वाचायला देण्यापेक्षा एक्का काकांच्या या धाग्यांचे दुवे वाचायला दिले तर किमान त्यांना भूगोल समजेल तरी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2014 - 11:39 am | डॉ सुहास म्हात्रे

अनेक धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2014 - 11:37 am | डॉ सुहास म्हात्रे

अर्धवटराव, अत्रुप्त आत्मा, वल्ली, स्वॅप्स, सौंदाळा आणि मदनबाण : अनेक धन्यवाद ! आपल्या सर्वांच्या सहभागाने सहलिची मजा व्दिगुणीत होत आहे !

विटेकर's picture

5 Jun 2014 - 11:53 am | विटेकर

आणखी एक ...उत्तम लेख !
आवडले हे वेगळे सांगणे न लगे !

प्यारे१'s picture

5 Jun 2014 - 12:51 pm | प्यारे१

प्रवासवर्णन आवडत आहेच्च.

त्या स्पॉन्सर्ड 'वनराज' अ‍ॅण्ड 'सतार' टुर ट्रॅव्हल्स लेखांपेक्षा सतपट सुंदर!

दिपक.कुवेत's picture

5 Jun 2014 - 1:02 pm | दिपक.कुवेत

पुढिल भागांच्या प्रतिक्षेत

अप्रतीम..अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कहाण्यांची आठवण करून देणारी समृद्धी आहे खरी.

बारक्या_पहीलवान's picture

5 Jun 2014 - 3:23 pm | बारक्या_पहीलवान

जेद्दाला गेलो नाही, आता नक्कीच जाइल.
तुमच्या ह्या माहीतीचा मी नक्कीच उपयोग करेल.
गोल्ड मार्केटचे फोटो नाहीत का?
खुप मोठे आहे असे म्हनतात जेद्दाला जाउन आलेले लोक्स.
पुढिल भागांच्या प्रतिक्षेत...

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2014 - 9:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

दुबईचे आणि बाहरेनमध्ये गोल्ड मार्केट बघितले असल्याने आणि सोन्यात फार रुची नसल्याने गोल्ड मार्केटमध्ये गेलो नाही.

हा भाग सुद्धा सुंदर...नेहमीप्रमाणेच. खजुरांची एवढी वरायटी पाहून तोंडाला पाणी सुटलं.

बाकी, वरुन ७ व्या फोटोत वरच्या बाजुला निळसर असा कसला इफेक्ट आलाय? तुम्ही तो फोटो कारमधून घेतला आहे का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2014 - 10:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

बरेचसे फोटो कारमधूनच काढले आहेत. फिरत्या गाडीत दरवेळेस हवा तो नीट कोन मिळेल असे नाही, गाडी पुढे जाण्याच्या आत फोटो घेणे भाग पडते. त्या फोटोतला वरचा निळा रंग कारच्या काचेचा (टिंट) आहे. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2014 - 9:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुहास झेले, अधाशी उदय, विटेकर, प्रशांत आवले, दिपक.कुवेत आणि बॅटमॅन : अनेक धन्यवाद !

खटपट्या's picture

6 Jun 2014 - 12:48 am | खटपट्या

सुंदर माहिती आणि फोटो

मलाबी जत्रंला येवूंद्या की रं!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jun 2014 - 11:23 am | डॉ सुहास म्हात्रे

खटपट्या आणि पाषाणभेद : अनेक धन्यवाद !

पैसा's picture

13 Jun 2014 - 12:25 pm | पैसा

हा भाग पण अतिशय आवडला. मात्र इव्हचे थडगे समजली जाणारी वास्तू बरीच जुनी असणार. त्यावर काँक्रीट घालून त्याची वाट लावण्याच्या वृत्तीची गंमत वाटली.

प्रतिनिमि's picture

13 Jun 2014 - 1:02 pm | प्रतिनिमि

लय भारी

अप्रतिम
*ok*

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jun 2014 - 2:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

पैसा आणि प्रतिनिमि : धन्यवाद !