आंतरराष्ट्रीय भाषा दिनाच्या निमीत्ताने एकुश्येचे मनोगत

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
21 Feb 2014 - 9:02 pm

एकुश्ये म्हणजे बंगाली भाषेत २१. जगाच्या इतिहासात चार वर्षांच्या अंतरात २१ तारीख दोनदा आली जेव्हा लोकांनी मातृभाषेच्या प्रतिष्ठापनेकरीता बलिदान केले पहिली होती एकुश्ये फेब्रुवारी १९५२ जेव्हा बांग्लादेशी हुतात्म्यांनी बंगाली भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा म्हणून पाकीस्तानी गोळ्या छातीवर झेलल्या.(याच १९५२च्या डिसेंबरात पोट्टी श्रीरामलूंनी एक भाषिक राज्याकरता बलिदान केले) चार वर्षांच्याच अंतरानी अजून एक २१ तारीख आली ती होती नव्हेंबर १९५६ची जागा होती मुंबईचे फ्लोरा फाऊंटेन.

इ.स.१९५६ च्या नोव्हेंबरातील २१ तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने खवळून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगार आणि पांढरपेशांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर-सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत पांढरपेशांचा प्रचंड जनसमुदाय, एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे "दिसताक्षणी गोळ्या" घालण्याचे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०५ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती.

संदर्भ

२१ फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय भाषा दिनाच्या निमीत्ताने माझे एकुश्येचे मनोगत खालील प्रमाणे

अशा जगाचे स्वप्न प्रत्यक्षात आणा कि जगातील हव्या त्या प्रत्येक भाषेतील
ज्ञान , माहिती आणि संवाद मराठीत
आणि मराठीतील माहिती , ज्ञान आणि संवाद जगातील प्रत्येक भाषेत तत्काळ आणि मुक्त पणे उपलब्ध होतील .”

संस्कृतीभाषाविचारशुभेच्छासंदर्भ

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

21 Feb 2014 - 9:12 pm | आनन्दा

लिहिण्यासारखे काही नाही, म्हणून परत चाललो होतो, पण एव्हढ्या महत्वाच्या विषयाच्या धाग्याला अनुल्लेखाने मारणे योग्य नाही म्हणून म्हटले एक प्रितिक्रिया टाकावी. दखल म्हणून.

मुक्त विहारि's picture

21 Feb 2014 - 9:19 pm | मुक्त विहारि

+१

अनन्त अवधुत's picture

22 Feb 2014 - 1:47 am | अनन्त अवधुत

२१ फेब्रु. हा आंतरराष्ट्रीय भाषा दिन नसून "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन" आहे, एवढा बदल तपशिलात सुचवतो.
बाकी धाग्यातील भावनेशी सहमत.

घाई अनवधानात बदलते तसे काहीसे झाले. "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन" बरोबर आहे. लक्षवेधण्याकरता आणि प्रतिसादाकरताही धन्यवाद.

धाग्यातील भावनेशी पूर्ण सहमत आहे.

माहितगार's picture

22 Feb 2014 - 8:20 am | माहितगार

आपण आणि आनन्दा तसेच मुक्त विहारि प्रतिसादांकरीता धन्यवाद

१ मे २०१४ पुर्वी मराठी विकिपीडियावरील हुतात्मा चौक, मुंबई ह्या लेखास दर्जेदार ज्ञानकोशीय लेखाचा दर्जा प्राप्त करून देता यावा अशी इच्छा आहे. मिपावर बरीच मुंबईकर मंडळी आहेत. फ्लोरा फाऊंटेन कारंज्याच्या बद्दल परस्पर विरोधी दावे आढळतात. कुणी मुंबईकर जुनी पुस्तके ढुंढाळून माहिती काढू शकल्यास संदर्भासहीत खात्रीलायक माहिती हवी आहे.

१) फ्लोरा फाऊंटेन कारंजे नेमके केव्हा बांधण्यात आले १८६४ कि १८६९ ?

२) ऐतिहासिक दृष्ट्या तसा आलिकडील कालावधी ब्रिटीशांची नोंदी व्यवस्थीत ठेवण्याची सवय तरी सुद्धा फ्लोरा फाऊंटन कारंज्याच्या नेमका का कुणी आणि केव्हा बांधला या बाबत इंटरनेटवरील संदर्भात क्रेडीट घेऊ इच्छित एका पेक्षा अधिक दावेदार मिळताहेत.ब्रिटीश , ज्यू आणि पारसी . फ्लोरा फाऊंटन कारंजे विभागाच्या मांडणीपुढचा हा यक्ष प्रश्न आहे. संदर्भा सहित खात्री लायक माहिती हवी आहे.

३) मराठी विकिपीडियातील हुतात्मा चौक, मुंबई या लेखामधील २१ नव्हेंबरच्या घटनेचा सध्याचा मजकुर वर दिल्या प्रमाणे ललितगम्य शैलीत आहे. त्या मजकूराचे ललित अंग काढून विश्वकोशीय शैलीत संदर्भा सहित लिहून हवा आहे.

४) इंग्रजी विकिपीडियावरील Flora Fountain या लेखात संदर्भांना सुयोग्य दर्जा नाही. त्या करता Talk:Flora Fountain येथील नोंदी पहाव्यात. बांग्लादेशी लोकांनी त्यांच्या भाषिक आंदोलनाला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचा मान मिळवून दिला आहे विकिपीडियावरही नोंदी खुप व्यवस्थीत मांडल्या आहेत. प्रयत्न केल्यास इंग्रजी विकिपीडिया आणि मराठी विकिपीडियातील लेखांचा ज्ञानकोशीय दर्जा सुधारण्यास वाव आहे असे वाटते.