एस. डी. - लताची सर्वोत्कृष्ट पाच गाणी

नंदन's picture
नंदन in जनातलं, मनातलं
4 Nov 2007 - 6:30 am

गेल्या महिन्यातच एस. डी. बर्मन यांचे जन्मशताब्दी वर्ष संपले. हिंदी चित्रपट-संगीताचा सुवर्णकाळ म्हणता येईल, अशा पन्नास ते सत्तरच्या दशकांत एस. डी. आघाडीचे संगीतकार होते आणि लताबाई आघाडीच्या पार्श्वगायिका. यूट्यूबवर भटकताना एस. डीं. नि संगीतबद्ध केलेली आणि लताबाईंनी गायलेली काही गाणी सापडली, त्यातलीच आवडती पाच येथे देत आहे. कृपया केवळ स्मरणरंजन म्हणूनच या लेखाकडे पहावे, कारण या गाण्यांच्या सांगीतिक बाजूबद्दल काही लिहावे एवढा माझा वकूब नाही.

१. तुम न जाने किस जहाँ में खो गये

लताचा एकविशीतला, कोवळा दुःखाने ओथंबलेला आवाज केवळ ऐकत रहावा असा. विशेषतः 'लूट कर मेरा जहाँ' च्या वरच्या पट्टीनंतर येणारा 'छुप' चा होतोय-न होतोय असा हळुवार उच्चार आणि तीनवेळा वाढत्या उत्कटतेने येणारा 'तुम कहाँ?' चा सवाल.

२. फैली हुई है सपनोंकी बाहें

'तुम न जाने...' गायलेल्या गायिकेनंच हे गाणं म्हटलंय का, असा प्रश्न पडावा इतका यात लताबाईंचा आवाज वेगळा लागलाय. रॉबर्ट ब्राऊनिंगची 'पिपाज साँग' म्हणून एक प्रसिद्ध कविता आहे. या गाण्याच्या एकंदर आनंदी आणि (भरपेट पुरणपोळीच्या जेवणानंतर यावा तशा) निवांत मूडमुळे त्या कवितेतल्या 'गॉड इज इन द हेवन, ऑल्ज राईट विथ द वर्ल्ड' [आठवाः चितळे मास्तर] या ओळींची आठवण आल्यावाचून राहत नाही.

साहिरचे शब्द, लताचा केवळ 'स्वर्गीय' म्हणावा असा आवाज आणि त्याला साथ देणारं, गाण्यावर कुठेही अतिक्रमण न करणारं एस. डीं. चं संगीत. आजा चल दे कहीं दूर म्हणताना 'आजा' वरचा गोड हेलकावा काय किंवा गाण्यात सुरुवातीला केवळ चारच सेकंद (००:१६ ते ००:२०) वाजणारा सतारीचा सुंदर तुकडा काय, केवळ अप्रतिम. [फक्त कल्पना कार्तिक ऐवजी या गाण्यात मधुबाला असती तर किती बहार आली असती :)].

वैताग, कंटाळा आला असताना डोळे मिटून हे गाणं ऐकावं आणि 'और सभी गम भूलें' चा प्रत्यय घ्यावा.

३. जायें तो जायें कहाँ

'टॅक्सी ड्रायव्हर' मध्ये तलतने म्हटलेल्या या गाण्याची लताने म्हटलेली आवृत्ती मला तितकीच आवडते. दर्दभरी, दुःखी मूडची गाणी म्हणण्याचा प्रत्येक गायकाचा एक वेगळा ढंग असतो, आणि त्यात त्या त्या गायकाचे व्यक्तिमत्वही डोकावत असतं असं मला वाटतं. बंदिनीमधलं 'अब के बरस भेज भय्या को बाबुल' हे आशाचं बावनकशी, काळजाला हात घालणाऱ्या दुःखाचं गाणं आणि लताची या गाण्यासारखीच दुःखी पण संयत हतबलता व्यक्त करणारी 'उठाये जा उनके सितम' किंवा अगदी पूर्वीचं 'साजन की गलियाँ छोड चले' सारखी गाणी यात हा फरक जाणवतो.

एकीचं दुःख, तिच्या व्यक्तिमत्वासारखंच थेट, हृदयाला पिळवटून टाकणारं तर दुसरीचं बहुधा लहानपणीच अंगावर पडलेल्या जबाबदारीतून आलेल्या अकाली प्रौढत्वामुळे गंभीर, संयत आणि 'समझेगा कौन यहाँ' म्हणणारं. लता आणि आशात श्रेष्ठ कोण, हा वाद बराच जुना आहे. त्यावर काही भाष्य करण्याचा या लेखाचा उद्देशही नाही. पण या वादात आशाकडे अधिक वैविध्य आहे असं सरसकट विधान करताना या शैलीतल्या फरकाकडे बऱ्याचदा लोकांचं दुर्लक्ष होतं, असं खुद्द आशाच एका कार्यक्रमात म्हणाली होती. (पांडुरंग कांती हे गाणं जर दीदीने गायलं, तर ती त्यातले आलाप/ताना कमीत कमी ठेवून कसं म्हणेल हे प्रात्यक्षिक म्हणून गाऊन दाखवल्यानंतर.)

असो. थोडं अवांतर म्हणजे, माझ्या आजोबांच्या वेळची मुंबई कशी होती हेही या गाण्यातून दिसतं हा हे गाणं आवडण्यामागचा अजून एक छोटासा भाग :).

४. मोरा गोरा अंग लई ले

बिमल रॉय यांच्या बंदिनी चित्रपटातली इतर गाणी जरी शैलेंद्रने लिहिली असली, तरी हे एकच गाणं गुलझारने लिहून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. काही वर्षांपूर्वी लोकसत्तेत गुरुवारी रंग-तरंग म्हणून पुरवणी यायची. त्यात एकदा गुलजारला नायिका आपल्याला त्रास देणाऱ्या चंद्राला राहूचे भय दाखवते ही कल्पना खूप दिवसांनी, गाण्याची दोन कडवी मनाजोगती होऊनही गाण्याची पूर्तता कशी करावी या विवंचनेत काही दिवस घालवल्यावर कशी सुचली याचं वर्णन केलं होतं. दुर्दैवाने त्याचे तपशील आता आठवत नाहीत. परंतु, गीतांतून बऱ्याचदा डोकावणारा चंद्र आणि 'कुछ खो दिया है पाईके, कुछ पा दिया गँवाई के' सारख्या ओळी म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसण्यासारखंच असावं.

'पुत्रवती बभूव' झाल्यानंतर (मोहनीश बहल) नूतनचा हा पहिलाच चित्रपट. मर्ढेकरांची उपमा उसनी घेऊन सांगायचं झालं तर, तिचा चेहरा गर्भवतीच्या 'सोज्वळ मोहकतेने' पडदा उजळवून टाकतो. रात्री श्रीकृष्णाच्या भेटीच्या आसेने श्यामरंगी वस्त्रे लेवून निघालेल्या राधेसारखी अभिसारिका नायिका. तिची उत्सुकता आणि तगमग; संकोच आणि मोह यांच्यामध्ये सापडून होणारी द्विधा मनःस्थिती आणि अशावेळी अवचितपणे ढगांतून डोकावून तिचा गौरवर्ण उजळवून टाकणारा, तिला पेचात टाकणारा चंद्र. मग कृतक कोपाने 'तोहे राहू लागे बैरी' म्हणणारी 'बंदिनी' कल्याणी. तीन-चार मिनिटांच्या वेळात वेगवेगळ्या विभ्रमांनी उभी करणारी नूतन; खरंच 'समर्थ' अभिनेत्री.

या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, लता आणि एस. डी. बर्मन यांच्यात निर्माण झालेला काही काळापुरता बेबनाव मिटवून, दोघांनी पुन्हा एकत्र काम करणं सुरू केल्यानंतर आकाराला आलेलं हे पहिलंच गाणं.

५. पिया बिना

अभिमान हा एस. डीं. च्या शेवटच्या चित्रपटांपैकी एक. त्यातली सगळीच गाणी सुरेख आहेत, यात वादच नाही. पण हे एस. डी. - लता जोडगोळीच्या कारकीर्दीचं प्रातिनिधिक गाणं वाटतं. या चित्रपटाच्या आसपास, म्हणजे सत्तरच्या दशकात लक्ष्मीकांत-प्यारेलालनी अनेक वाद्यांचा ऑर्केस्ट्रा लोकप्रिय केला होता. त्याच्या तुलनेत, या गाण्यातली बासरी-तबल्याची साथसंगत हे एस. डीं. चे वैशिष्ट्य म्हणता येईल. किमान वाद्यांनी गाण्याचा मूड पकडण्यातले कौशल्य आणि गायकाला दिलेला पूर्ण स्कोप. कदाचित, त्यामुळेच त्यांची बरीच गाणी लताची, रफीची, आशाची म्हणून अधिक प्रसिद्ध झाली असावीत.

या यादीत गाईड, ज्वेल थीफ मधली गाणी; 'चांद फिर निकला', 'मेघा छाये आधी रात', 'रात का समाँ', 'रंगीला रे' ही गाणी नाहीत. शिवाय, एस. डीं. ची इतर गायिकांनी म्हटलेली 'वक्त ने किया' (गीता दत्त), 'अब के बरस भेज' (आशा) आणि 'ना तुम हमें जानो' (सुमन कल्याणपूर) ही गाजलेली गाणीही नाहीत. पण कुठलीही यादी सर्वानुमते ठरणे जसे अशक्य आहे, तसेच याचेही म्हणता येईल.

संदर्भ -

१. http://www.imdb.com/name/nm0005984/
२. http://www.rediff.com/entertai/2002/feb/28dinesh.htm
३. http://www.gulzaronline.com/
४. http://www.geetmanjusha.com/hindi/musician/8.html

[हाच लेख येथेही वाचता येईल.]

संगीतमौजमजाचित्रपटमाध्यमवेधआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

सहज's picture

4 Nov 2007 - 6:42 am | सहज

गाणी छान आहेत. आजवर असे लेख नुस्ते गाण्याचे नाव व शब्द असलेले पाहीले. यु ट्युब की जय हो!

नंदनमहाराज की जय हो!!

मजा आली..

विसोबा खेचर's picture

4 Nov 2007 - 6:59 am | विसोबा खेचर

ऐन दिवाळी तोंडावर आली असताना आमच्या नंदनशेठचा इतका सुंदर लेख मिसळपाववर यावा हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल..!

नंदनशेठ, आत्ता जरा कामाच्या गडबडीत आहे, नंतर सवडीने विस्तृत प्रतिसाद टाकेन!

तूर्तास,

'मिसळपावचं सार्थक झालं, धन्य झालो!'

एवढंच अगदी मनापासून लिहितो...

आपला
(दिदीचा भक्त) तात्या.

प्रमोद देव's picture

4 Nov 2007 - 9:49 am | प्रमोद देव

नंदन लेख मस्त झालाय. गाण्यांची निवडही छान आहे. दुसरे गाणे मात्र(अपवाद) खास नाही वाटले. तसेच "जाये तो जाये कहां" तलतचेच जास्त आवडते.

चित्रा's picture

4 Nov 2007 - 9:39 pm | चित्रा

गाण्यांची निवड उत्तमच आहे, पण अजूनही गाणी आवडण्यासारखी आहेत. एक माझे आवडते ..

चुकले चुकले, कारण वरचे गाणे लताचे नाही . आता अजून एक लताचे..

विसोबा खेचर's picture

7 Nov 2007 - 8:37 am | विसोबा खेचर

तुझा लेख जरा सवडीने वाचतो असं म्हटलं होतं, आज जरा सवड मिळाली.

तू असं म्हटलं आहेस,

कारण या गाण्यांच्या सांगीतिक बाजूबद्दल काही लिहावे एवढा माझा वकूब नाही.

परंतु,

विशेषतः 'लूट कर मेरा जहाँ' च्या वरच्या पट्टीनंतर येणारा 'छुप' चा होतोय-न होतोय असा हळुवार उच्चार

आजा चल दे कहीं दूर म्हणताना 'आजा' वरचा गोड हेलकावा

वरील वाक्ये वाचून तुझा वकूब नाही असं मला तरी वाटत नाही! :) कारण गाणं खूप बारकाईने आणि 'दिल लगाके' ऐकल्याशिवाय असले बारकावे टिपता येत नाहीत! असो..

असो. थोडं अवांतर म्हणजे, माझ्या आजोबांच्या वेळची मुंबई कशी होती हेही या गाण्यातून दिसतं हा हे गाणं आवडण्यामागचा अजून एक छोटासा भाग :).

क्या बात है....:)

रात्री श्रीकृष्णाच्या भेटीच्या आसेने श्यामरंगी वस्त्रे लेवून निघालेल्या राधेसारखी अभिसारिका नायिका. तिची उत्सुकता आणि तगमग; संकोच आणि मोह यांच्यामध्ये सापडून होणारी द्विधा मनःस्थिती आणि अशावेळी अवचितपणे ढगांतून डोकावून तिचा गौरवर्ण उजळवून टाकणारा, तिला पेचात टाकणारा चंद्र. मग कृतक कोपाने 'तोहे राहू लागे बैरी' म्हणणारी 'बंदिनी' कल्याणी. तीन-चार मिनिटांच्या वेळात वेगवेगळ्या विभ्रमांनी उभी करणारी नूतन; खरंच 'समर्थ' अभिनेत्री.

वा नंदनशेठ! अरे सायबा तुझं किती कौतूक करू?! :) किती सुरेख लिहिलं आहेस! क्या बात है...

इथे मिसळपाववर तुझ्या आवडत्या गाण्यांवरचे अजूनही असेच लेख लिही, अगदी भरभरून!

तुझा,
तात्या.

सर्किट's picture

7 Nov 2007 - 8:58 am | सर्किट (not verified)

खरंच, साहित्याच्या क्षेत्रातली आपली नजर नंदनरावांनी संगीताच्या क्षेत्रात जशीच्या तशी आणली आहे. खरच, कौतुकास्पद आहे.

लता आणि मदन मोहन ह्या कॉंबिनेशनबद्दल असेच काहीतरी मिसळपावावर यावे, ही सदीच्छा.

- सर्किट

नंदनराव,

लेख आणि कल्पना छान आहे. पटकन सुचलेली गाणी खाली देतो. (एकाचा उल्लेख आपण केला आहेच).

यू ट्यूबवर न मिळालेली आणि या संदर्भातील अजून दोन गाणी - चुपके चुपके चल रे कुरवैय्या आणि जैसे राधाने माला जपी शाम की (हे गाणे एम्बेड करायची व्यवस्था काढून टाकली आहे).

ईत्यादि's picture

8 Nov 2007 - 6:28 am | ईत्यादि

अत्यन्त सुन्दर लेख आणि पुरवणी.

ईत्यादि

नंदन's picture

8 Nov 2007 - 8:27 am | नंदन

येथे प्रतिक्रिया देऊन अथवा व्य. नि. पाठवून लेख आवडल्याचे कळवणार्‍या मंडळींचे मनःपूर्वक आभार.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय's picture

8 Nov 2007 - 9:36 am | धनंजय

"तुम ना जाने" मध्ये सुरुवातीला वेगवेगळे गाण्यांचे सांगीतिक तुकडे आहेत. पैकी ०:३६ = -३:१२ ला ऑफेनबाख च्या "बार्कारोल" गाण्याची धुन आहे. ती धुन कधी हिंदी चित्रपटात वापरली गेली आहे काय?

बाकी नंदन यांची गाण्याची निवड मस्तच.

नाना चेंगट's picture

3 Jun 2012 - 4:15 pm | नाना चेंगट

बरेच दिवसांत नंदनचा लेख बोर्डावर दिसला नाही. :)

म्हणून जुनाच वर काढून नंदनचा लेख बोर्डावर पाहिल्याची हौस भागवून घेत आहे ;)

तिमा's picture

3 Jun 2012 - 5:15 pm | तिमा

इतका चांगला लेख लिहिणार्‍या नंदन यांनी २०१२ मधे परत एखादा लेख लिहावा अशी मी विनंती करतो.
'पवन दिवानी' हे गाणंही मला खिळवून ठेवतं.

चित्रगुप्त's picture

21 Feb 2023 - 9:54 am | चित्रगुप्त

जुने जुने सोने खणून वर आणणे

गाणी चालींच्या दृष्टीने उत्कृष्ठ असायची पण बोजड पण असायची. बुझ दिल, देवदास ची गाणी उदाहरणदाखल आठवून पहा. साठ नंतर आर डी वडिलांना ऑर्केस्ट्रेशन मध्ये मदत करू लागला आणि चमत्कार झाला. अगोदरच अफलातून असणाऱ्या चालींना आर डी च्या कल्पक ऑर्केस्ट्राची साथ मिळाली आणि त्या गाण्यांनी अनुभूतीची एक नविनच पातळी गाठली. तलाश मधलं हे https://youtu.be/pOxoXpsTPeY गाणं उदाहरणदाखल ऐकून बघा.

तिमा's picture

22 Feb 2023 - 7:07 am | तिमा

गाणी उत्कृष्टच आहेत तुम्ही निवडलेली. पण तुमच्या वर्तुळातल्या लताद्वेष्ट्या मंडळींना काय वाटत असेल असल्या लेखांनी ?

नंदन's picture

23 Feb 2023 - 1:51 pm | नंदन

ह्या चित्रपटातील हे गाणं हा कदाचित एक पर्याय संभवू शकतो! :)

nutanm's picture

25 Feb 2023 - 9:30 am | nutanm

नंदन यांचा लेख छान त्यात फैली हुई ये सपनोंकी सर्वोत्कृष्ट. मी आताच ४ दा हे गाणे ऐकले. नूतन माझे नाव जिच्यावरून ठेवले ती तर माझी आवडती सुंदर नटी तिच्या चेहर्याची नस नी नस बोलत असते अभिनय करताना , तुलना केल्याशिवाय रहावत नाही पण स्मिता पाटीलचे जसे डेोळे खूप काही सांगायचे व तेच जास्त अभिनय करायचे तशी नूतनच्या चेहर्याची नस नी नस बोलते असे माझे मत.

नूतन खरेच समर्थ नावा प्रमाणेच समर्थ अभिनेत्री होती.

नंदन यांच्या उपमी छान.