पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०३ : पूर्वतयारी - आपले मार्गदर्शक

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
14 Jul 2013 - 6:36 pm

=====================================================================

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...

=====================================================================

...पण त्याआधी आपण आपल्या प्रवासाच्या प्रमुख मार्गदर्शकांची ओळख करून घेऊया. ज्यांच्या भरवशावर प्रवास करायचा त्या वाटाड्यांच्या कर्तबगारीची आणि कामाच्या पद्धतीची माहिती मिळाल्याशिवाय आणि त्यांनी दिलेल्या माहितीची विश्वासार्हता पटल्याशिवाय आपल्याला सहलीची मजा नि:शंकपणे आणि पुरेपूर अनुभवता येणार नाही.

मार्गदर्शक

या अगोदर सांगितलेले पृथ्वीच्या हवामानातले बदल, त्यांत होणारी जीवनाची वाटचाल (अथवा फरफट) आणि आधुनिक मानवाच्या सहलीचा मार्ग शास्त्रीय पुराव्यासकट आपल्याला दाखवणार्‍या काही खास मार्गदर्शकांची ओळख करून घेऊया. कारण त्यामुळे आपल्याला आपला प्रवास खरंच योग्य आणि विश्वासू मार्गाने चालला आहे याची खात्री पटेल आणि मग आपल्याला सहलीची मजा नि:शंकपणे लुटता येईल. यातला प्रत्येक मार्गदर्शकावर अनेक दशके संशोधन झाले आहे आणि शेकडो पुस्तके लिहिली गेली आहेत. विस्तारभयास्तव येथे आपण त्यांची फक्त तोंडओळखच करून घेणार आहोत.

आपल्या सहलीचे मुख्य मार्गदर्शक खालीलप्रमाणे आहेत

१. प्राचीन हवामानामुळे बनलेल्या आणि आजवर शाबूत राहिलेल्या निर्जीव खाणाखूणा
२. प्राचीन प्राण्यांचे आजवर शाबूत राहिलेले अवशेष किंवा त्या अवशेषांचे ठसे (जीवाश्म)
३. १ व २ क्रमांकांच्या मुद्द्यात मिळलेल्या सजीवांच्या अवशेषांचे अथवा निर्जीव खाणाखूणांचे विश्लेषण करण्याच्या पद्धती
४. प्राचीन प्राण्यांपासून (यात मानवही आला) आज अस्तित्वात असणार्‍या प्राण्यांपर्यंत संक्रमित झालेल्या जनुकांतील दुव्यांचे विश्लेषण करणारी जनुकशास्त्राची शाखा
५. वरील सगळ्या आणि इतर पुराव्यांची सांगड घालून विश्वासू शास्त्रीय निष्कर्षांपर्यंत पोहोचवणारे मानववंशशास्त्र (Anthropology)

या सहलीचे आणखीही बरेच छोटेमोठे मार्गदर्शक आहेत. पण या लेखमालिकेच्या व्याप्तीत ते सगळे बसवणे शक्य नाही. तरीसुद्धा आपल्या सहलीतील अनाकलनियता शक्य तेवढी काढून टाकून आणि शक्य तेवढ्या संशयाचे निराकरण करण्यासाठी वरच्या मुख्य मार्गदर्शकांची पुरेशी तोंडओळख करून घेणे जरूर आहे.

१. प्राचीन हवामानामुळे बनलेल्या आणि आजवर शाबूत राहिलेल्या खाणाखूणा

समुद्रात व भूमागावर जमत जाणार्‍या थरांमध्ये प्राचीन काळात तयार झालेल्या आणि नष्ट झालेल्या त्याकालच्या अनेक खाणाखूणा शिल्लक राहतात. उदाहरणार्थ एकमेकावर जमलेले वाळूचे थर दबून बनलेले वालुकाश्म आणि त्यांच्यात अडकलेले त्या त्या वेळेस जिवंत असलेले जीव अथवा मेलेल्या जिवांचे सांगाडे. तसेच ज्वालामुखींच्या उद्रेकांच्या वेळेस उडालेली आणि नंतर वालूकाश्मात अथवा जमिनीच्या थरांत गाडली गेलेली राख आणि इतर द्रव्ये. हे पुरावे अनेक कारणांनी जमिनीखालून बाहेर उघड होतात... उदाहरणार्थ, नदीच्या प्रवाहाने झालेली जमिनीची झीज, हिमनद्यांच्या प्रवाहाने खरवडले जाणारे जमीनीचे प्राचीन थर, उत्खननात किंवा अपघाताने सापडलेले प्राचीन अवशेष, इत्यादी.

हे सगळे पुरावे धृवीय प्रदेशांतल्या हजारो-लाखो वर्षे न वितळलेल्या बर्फातही सापडतात. ध्रुवीय बर्फाचे अनेक मीटर खोलपर्यंतचे नमुने (core samples) काढून त्यांची छाननी करण्याचे तंत्र फार विकसित झालेले आहे. या बर्फात अनेक दशलक्ष वर्षांपुर्वीचे पुरावे अगदी मूळ स्वरूपात बंद आहेत. हेच तत्व वापरून समुद्रतळाचेही नमुने मिळविले जातात. हे दोन्ही प्रकारचे नमुने--- त्यांच्यात प्राचीन काळची परिस्थिती न बदलता बंदिस्त असल्याने--- शास्त्रिय संशोधनात फार महत्वाचे आणि विश्वासू पुरावे ठरले आहेत.

२. प्राचीन प्राण्यांचे आजवर शाबूत राहिलेले अवशेष किंवा त्या अवशेषांचे ठसे (जीवाश्म)

ह्या मार्गदर्शकांची ओळख आपल्याला शाळेच्या पुस्तकात होते. परंतू हे शास्त्र आता इतके पुढे गेले आहे की १९९७ साली इथिओपियातील हेर्टो नावाच्या खेड्याजवळ सापडलेली एका लहान मुलाची कवटी काही शे चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या २०० तुकड्यांपासून पुनःनिर्मीत करण्यात आली. ती कवटी मानवी उत्क्रांतीच्या प्रवासाच्या संशोधनातला एक फार महत्वाचा पडाव ठरली आहे. या एकाच उदाहरणावरून या शात्राच्या वाढलेल्या आवक्याची पुरेशी कल्पना यावी

३. १ व २ क्रमांकांच्या मुद्द्यात मिळलेल्या सजीवांच्या अवशेषांचे अथवा निर्जीव खाणाखूणांचे विश्लेषण करण्याच्या पद्धती

यात अनेक आधुनिक शास्त्रांचा उपयोग केला जातो. या पद्धती आता इतक्या प्रगत झाल्या आहेत की लाखो-करोडो वर्षे जुन्या नमुन्याचे पृथक्करण करून त्याचे रासायनीक, जीवरासायनीक व आण्वीक गुणधर्म व वय (नमुना किती वर्षे जुना आहे) हे ठरवता येते. या प्रकारच्या काही महत्वाच्या पद्धती खालीलप्रमाणे आहेतः

अ) प्राचीन जैवीक पुराव्यातील DNA चे पृथ़क्करण: या पद्ध्तीने तर प्राचीन जैवीक इतिहासाबद्दलचे ज्ञान "केवळ अंदाज / थिअरी" वरून एकदम पुढे आणून "विश्वासू पुरव्यांवर आधारलेला इतिहास" या पाहिरीपर्यंत पोहोचवले आहे.

याबबतीत माहिती येथे रोचक पद्धतीने दिलेली आहे.

ब) रेडिओमेट्रीक डेटींग : प्राचीन पुराव्याचे वय ठरवण्यासाठी या शास्त्राची मदत होते. पृथ्वीवर नैसर्गीकपणे बरीच किर्णोसर्गी मूलद्रव्ये अतीसुक्ष्म प्रमाणात आहेत. किर्णोसर्गामुळे रेणूंच्या अनेक घटकांचे उत्सर्जन होते आणि त्यांचे एका मूलद्रव्यातून दुसर्‍या मूलद्रव्यात परिवर्तन होते. ह्या प्रक्रियेचा वेग मोजून तो रेणू ज्या अवशेषापासून पासून मिळवला होता त्याचे वय ठरवता येते. यासाठी Uranium-lead, Samarium-neodymium, Potassium-argon, Rubidium-strontium, Uranium-thorium आणि Radiocarbon dating अशा अनेक पद्धती विकसीत केलेल्या आहेत. कोणता पदार्थ तपासायचा आहे आणि तो कोणत्या काळातला असावा यावरून कुठली पद्धत जास्त योग्य ते ठरवले जाते.

४. प्राचीन प्राण्यांपासून (यात मानवही आला) आज अस्तित्वात असणार्‍या प्राण्यांपर्यंत संक्रमित झालेल्या जनुकांतील दुव्यांचे विश्लेषण करणारी जनुकशास्त्राची शाखा

मानवाच्या इतिहासात मानवाच्या सहलीच्या मार्गांचे आणि वेळापत्रकाचे खणखणीत पुरावे जनुकशात्राने द्यायला सुरूवात केली आणि मानवाच्या इतिहासातील असंख्य रहस्ये विश्वसनिय पुराव्यांसह उघड झाली. मुख्य म्हणजे मानवी इतिहासातील असंख्य रुढीवादी आणि वंशवादाच्या खोट्या भाकडकथांवर रचलेली अनेक "तथाकथीत थियरींची" असत्ये जनुकशास्त्रीय पुराव्यांनी मोडीत काढली आहेत. अश्या या खास मार्गदर्शकाबद्दल थोडी सुगमशास्त्रीय माहिती घेतल्याने आपल्या बर्‍याच शंकांचे निराकरण होईल.

माणसाच्या शरीरात एकूण ५,००० ते १०,००० कोटी पेशी असतात.

(चित्र जेनुग्राफिक प्रोजेक्टच्या सौजन्याने. Photo courtesy of The Genographic Project.)

माणसात तांबड्या रक्तपेशीचा अपवाद वगळता या सर्व पेशीत पेशीकेंद्र (Nucleus) असते आणि प्रत्येक पेशीच्या पेशीकेंद्रात गुणसूत्रांच्या (chromosomes) एकूण २३ जोड्या असतात.

(चित्र जेनुग्राफिक प्रोजेक्टच्या सौजन्याने. Photo courtesy of The Genographic Project.)

गुणसुत्रे एकाच लांबच लांब DNA च्या अणूंनी बनलेली असतात आणि त्यांचा आकार एखाद्या लांब शिडीला पीळ दिल्यावर कसे दिसेल तसा असतो.

(चित्र जेनुग्राफिक प्रोजेक्टच्या सौजन्याने. Photo courtesy of The Genographic Project.)

गुणसूत्रांतील DNA च्या साखळ्यांध्ये माणसाच्या पेशींना काम करण्यास आवश्यक असणार्‍या प्रोतीन्सचे आणि इतर गुणधर्मांचे (कातडीचा रंग, डोळ्याचा रंग, इ.) आराखडे साठवणारे भाग असतात. त्यांना जनुके (gene) म्हणतात. माणसात २०,००० ते २५,००० जनुके असतात.

हजारो-लाखो वर्षांच्या कालावधीवर होणार्‍या बदलांना तोंड देण्यासाठी एक नैसर्गीक प्रकारे घडणारी एक घटना कामी आहे. ही घटना होते आहे म्हणूनच अगदी एकपेशीय अमिबापासून ते माणसाच्या उत्पत्तीपर्यंत निसर्गाच्या कार्यात कोणताही बाह्य हस्तक्षेप न होऊनही पृथ्वीवरचे जीवन केवळ अबाधित राहिले एवढेच नव्हे तर अधिकाधिक प्रगत प्राण्यांत उत्क्रांत होत गेले आहे.

ती नैसर्गिक घटना म्हणजे एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जाताना प्राणी आणि वनस्पतींच्या जनुकांत (DNA च्या रचनेत) कधीमधी होणारे छोटे छोटे बदल... याला शास्त्रीय भाषेत उत्परिवर्तन (mutation) म्हणतात. ही प्रक्रिया प्रजननासाठी बनविल्या जाणार्‍या पेशींच्या निर्मितीच्या वेळेस सहजपणे होते... तिचा आजूबाजूच्या वातावरणाशी काहीही प्रत्यक्ष संबद्ध नसतो. पण तिचा होणारा अप्रत्यक्ष परिणाम असा की; अश्याप्रकारच्या हजारो-लाखों घटनांमधल्या बहुतेक निरुपयोगी असतात तर काही शरीरीक दोषही निर्माण करतात; पण त्यातले एखादे उत्परिवर्तन नवीन पिढीमध्ये असा काही फरक घडवून आणते की त्यामुळे नविन पिढीला बदललेल्या परिस्थितीला तोंड देणे शक्य होते. त्यामुळे ती पिढी प्रतिकूल परिस्थितीत तगून राहते आणि योग्य परिस्थिती मिळाल्यावर वाढून वरचढ बनते. हे न घडलेल्या प्राण्यांच्या पिढ्या बदलास यशस्वी तोंड न देवू न शकल्याने नष्ट होतात. महत्त्वाची गोष्ट अशी की या प्रक्रियेत केवळ प्राण्याच्या शारीरिक ताकदीला महत्व नसून त्याचा बदललेल्या परिस्थितीचा सामना करण्याच्या सर्वांगीण पात्रतेला महत्व आहे. आणि हीच गोष्ट डार्वीनच्या थियरीचा गाभा आहे.

आवांतरः याला अपवाद सुरू झाला Homo ergaster या प्रजातीपासून ज्यांच्यापासून पुढे नैसर्गिक पद्धतीने होणार्‍या या घटनेच्यावरच केवळ अवलंबून न राहता त्यात स्वतःच्या मेंदूच्या ताकदीची भर घालून साधने बनवायला आणि निसर्गाला सक्रिय तोंड द्यायला सुरुवात केली. पण ही मेंदूची शक्तिही Homo ergaster (आणि पुढच्या सगळ्या Homo ना) या नैसर्गीक घटनेद्वारेच मिळालेली आहे !

या उत्परिवर्तनांचा अजून एक उपयोग आपल्याला झाला आहे. अशी अनेक उत्परिवर्तने एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जात जात आता आस्तित्वात असणार्‍या पिढी पर्यंत पोहोचलेली आहे. यामुळे जर आपण जर आता आस्तित्वात असणार्‍या जागोजागच्या मानवांच्या जनुकांतली उत्परिवर्तने शोधून ती जगाच्या नकाश्यावर मांडली तर त्या उत्परिवर्तनांच्या प्रवासाचा मार्ग म्हणजेच मानवाच्या प्रवासाचा मार्ग रेखांकीत होईल. परंतू हे करण्यात एक फार मोठी समस्या होती. माणसाच्या गुणसूत्राच्या २३ जोड्यांतील दर जोडीतले एक मातेकडून तर दुसरे पित्याकडून मिळते हे आपण सर्व जाणतोच. या गुणसूत्रांचे प्रदान होण्याचा काही हजार पिढ्यांचा हिशेब मांडला तर मग या सर्व गुणसूत्रांची इतकी सरमिसळ होते की शेवटच्या पिढीची जनुके कोठून कोठे कशी आली हे ठरवणे केवळ अशक्यच वाटते नाही का? पण त्यावरही शात्रज्ञांना उपाय सापडला आहे.

शात्रज्ञांनी जी शक्कल शोधून काढलीआहे, ती थोडक्यात अशी:

अ) पेशीकेंद्र सोडून पेशीत अजून एका ठिकाणी, मायटोकाँड्रीया मध्ये, जनुके असतात त्यांना mtDNA म्हणतात. मातेच्या अंड्याचा पित्याच्या शुक्राणूच्या डोक्याबरोबर संयोग होवून अंडे फलीत होते आणि त्या फलीत पेशीतून माणसाची निर्मिती होते, हे आपल्याला माहित आहेच. शुक्राणूंमध्ये फक्त पित्याची गुणसुत्रे असतात, मायटोकाँड्रीया नसतात. याचा अर्थ असा की mtDNA केवळ मातेकडूनच मुलांकडे जातात आणि त्यांतील फक्त मुलीच ते mtDNA पिढी दरपिढी संक्रमीत करू शकतात. याचा अर्थ असा की जर mtDNA वरची उत्परिवर्तने आपण रेखांकीत केली तर मागे जात जात आज जिवंत असणार्‍या मानवांच्या मूळ आईपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि तसेच करून शात्रज्ञ आजच्या सर्व मानवांच्या २ लाख वर्षांपूर्वी आस्तित्वात असणार्‍या केवळ एकाच आईपर्यंत पोहोचले आहेत !

ब) मानवाच्या गुणसूत्राच्या २३ जोड्यांपैकी एक फार खास आहे, ती आहे लिंग ठरवणारी जोडी... यातील दोन गुणसूत्राना X आणि Y असे संबोधतात. पुरुषांमध्ये या जोडीत X आणि Y अशी गुणसूत्रे असतात तर स्त्रियांत X आणि X अशी असतात हे सर्वांना ठावूक आहेच. याचा अर्थ असा की Y गुणसूत्र पुरुषाकडून फक्त पुरूष मुलाकडे जाते... त्याची सरमिसळ होत नाही. त्यामुळे वरच्या सारखेच Y गुणसूत्रावरची उत्परिवर्तने रेखांकीत करत मागे जात जात आज जिवंत असणार्‍या मानवांच्या मूळ पित्यापर्यंत शास्त्रज्ञ पोचले आहेत..

क) स्टॅटिस्टीक्स वापरून या उत्परिवर्तनांचे कालमापन करून कोणते उत्परिवर्तन किती वर्षांपूर्वी झाले असावे हे ही ठरवता येते. त्यामूळे ते उत्परिवर्तन ज्याचात / जिच्यात झाले तो / ती माता / माता केव्हा आस्तित्वात होते हे ठरविले जाते.

हे तंत्रज्ञान वापरून आतापर्यंतच्या पुराव्यांवरून आज जिवंत असणारे जगातील सर्व मानव उत्तरपूर्व आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीत २ लाख वर्षापुवी आस्तित्वात असणार्‍या एक पुरूष आणि एक स्त्री या जोडीपासूनच निर्माण झालेले आहेत.

सद्या एकूण १,५०,००० च्या वर उत्परिवर्तने वापरून हे नकाशावर माडणे चालू आहे. जर कोणाला त्याच्या पुर्वजांनी आताच्या जागेपर्यंत येईपर्यंत कसकसा प्रवास केला हे जाणून घ्यायचे असले तर https://genographic.nationalgeographic.com/ या संस्थळावर संपर्क साधून एक किट मागवून घ्यावे. त्याच्या सहाय्याने स्वतःच्या तोंडातील काही पेशी पाठवल्यास या प्रोजेक्टतर्फे त्या पेशीतील जनुकांचे विश्लेशण करून ती माहिती तुम्हाला दिली जाते. याशिवाय मानवशास्त्राच्या एका फार महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये भाग घेतल्याचे समाधान तुम्हाला मिळेल ते अलाहिदा.

५. वरील सगळ्या आणि इतर सर्व पुराव्यांची सांगड घालून विश्वासू शास्त्रीय निष्कर्षांपर्यंत पोहोचवणारे मानववंशशास्त्र (Anthropology)

माववंशशास्त्र हे आपण अगोदर ओळख करून घेतलेल्या सर्व आणि इतर काही पुरावे पुरवणार्‍या शास्त्रांची सांगड घालून त्यातून मानवाच्या भूतकाळाबद्दल एकसंध उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र आहे. त्यातली काही मह्त्वाची उपशास्त्रे खालील प्रमाणे आहेत.

अ) जनुकीय मानवंशशात्र (Genetic anthropology): याची आपण वर ओळख करून घेतली आहेच. निर्विवाद पुरावे देण्याच्या याच्या क्षमतेने आजच्या घडीला या शात्राने मानववंशशास्त्रातील मानचे पान पटकावले आहे.

ब) पुरातत्त्व मानववंशशास्त्र (Archaeological anthropology): प्राचीन मानवी अवशेषांचे पुरावे आणि जनुकीय पुरावे जर जुळून आले तर मग त्यापेक्षा अधिक विश्वसनीय काय असणार. शिवाय हे जुळणे हे दोन्ही शास्त्रे विश्वासार्ह मार्गावरून चालली आहेत याचा एक मोठा पुरावा असतो.

क) भाषिक मानववंशशास्त्र (Linguistic anthropology): भाषेला मानवी जीवनात आणि संस्कृतीत किती महत्वाचे स्थान आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. प्रवास करताना मानव आपली भाषा बरोबर घेऊन गेला आणि जपत राहिला. त्यामुळे आदिभाषेपासून निर्माण होणार्‍या भाषा आणि त्यांची आधुनिक भाषांपर्यंत झालेली वाटचाल आपल्याला मानवाचा प्रवासाचा अभ्यास करण्यास मदत करतात. आजच्या जगातले ४५% लोक ज्या भाषा बोलतात त्यांना "इंडो-युरोपिअन भाषा" असे म्हणतात. हे का? याचे उत्तर आपल्याला आपल्या प्रवासात मिळेलच !

आपल्या मार्गदर्शकांचा इतका पूर्वपरिचय झाल्यावर आता त्यांच्या विश्वासार्हतेची खात्री पटायला हरकत नाही. त्यामुळे यापुढे प्रवासात जी काही आश्चर्यकारक माहिती मिळणार आहे तिची मजा नि:शंकपणे घेणेही सुकर होईल. तर कसा कंबर आणि पुढच्या भागापासून अनेक सहस्त्र किमी चा आणि २ लाख वर्षांच्या मुदतीचा प्रवास करायला तयार व्हा !

(क्रमशः )

=====================================================================

महत्वाचे दुवे

१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/

=====================================================================

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...

=====================================================================

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

14 Jul 2013 - 8:14 pm | मुक्त विहारि

हा पण भाग चांगला झाला आहे...

राजेश घासकडवी's picture

15 Jul 2013 - 5:06 am | राजेश घासकडवी

हाही भाग माहितीपूर्ण.
काही मांडणी किंचित खटकली.

ती नैसर्गीक तजवीज म्हणजे एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जाताना प्राणी आणि वनस्पतींच्या जनुकांत (DNA च्या रचनेत) कधीमधी होणारे छोटे छोटे बदल...

म्यूटेशन्स होणं ही सोय म्हणणं किंचित चुकीचं आहे. म्यूटेशन्स होतात, तेव्हा त्या डीएने कॉपी करण्याच्या 'चुका' असतात. या चुका टळाव्यात किंवा कमी व्हाव्यात याचीही यंत्रणा जननप्रक्रियेत असते. शेकडा नव्याण्णव वेळा या चुकांमुळे तयार होणाऱ्या प्राण्यात काही ना काही बिघाड असतो. अत्यंत विरळा बाबतीत झालेला बदल हा 'चांगला' ठरतो. त्यामुळे या चुकांना सोय म्हणणं ठीक वाटलं नाही. अर्थातच हा पेडॅंटिक मुद्दा आहे.

२ लाख वर्षापुवी आस्तित्वात असणार्‍या एक पुरूष आणि एक स्त्री या जोडीपासूनच निर्माण झालेले आहेत.

मायटोकॉंड्रिअन इव्ह आणि वाय क्रोमोझोम ऍडम ही जोडी नव्हती. ती सर्वात पहिली माणसं नसून सर्व मानवांचे सर्वात अलिकडचे पूर्वज होते. याचा अर्थ त्याकाळी ते दोघेच होते असा घेतला जाऊ नये.
Mitochondrial Eve is estimated to have lived about 200,000 years ago. Y-chromosomal Adam lived between 237,000 and 581,000 years ago.

शिल्पा ब's picture

15 Jul 2013 - 10:21 am | शिल्पा ब

+१

बाकी हा भागसुद्धा वाचनीय आहे. भाषांबद्दल वाचायला आवडेलच.

किलमाऊस्की's picture

15 Jul 2013 - 7:01 am | किलमाऊस्की

हाही भाग आवडला !

छान मालिक.
ह्या भागात सांगितलेल्या भागाबद्दल अधिक तांतिक, सविस्तर पण सोप्या भाषेतील माहिती इथे मिळेलः-
http://mr.upakram.org/node/2511

अवांतर :-
सध्याचा सर्व मानवजातिचा एकच कॉमन पिता आहे, x क्रोमोझोम एकाच मातेकडून आलाय ही थिअरी मान्य होत असली तरी हे आधुनिक अ‍ॅडम्-ईव्ह एकाच काळातील नाहित.
ह्या थिअरीनुसार, आधुनिक अ‍ॅडम (y क्रोमोझोमचा जनक) व ईव्ह (x क्रोमोझोमची जननी) ह्यांच्यात साठ्-सत्तर हजार वर्षांचा फरक आहे! ते काही खरोखरीचे जोडपे नाही.
.
फुरसतीत अधिक टंकावे म्हणतोय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jul 2013 - 12:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुक्त विहारि, राजेश घासकडवी, शिल्पा ब, हेमांगीके आणि मन१ : अनेक धन्यवाद !

@ राजेश घासकडवी: तजवीज हा शब्द योग्य अर्थ सांगत नाही हे ध्यानात आणून दिल्या बद्दल धन्यवाद ! खरतर म्युटेशन ही नैसर्गीकरित्या घडणारी घटना आहे आणि तिचा निरुपयोगीपणा / चांगले / वाईट परिणाम यापैकी केवळ चांगल्या परिणामांवर उत्क्रांती मुख्यतः अवलंबून असल्याने कदाचित माझ्या लेखनात त्या गोष्टीला झुकते माप मिळाले. आता त्या परिच्छेदात योग्य ते बदल केले आहेत.

@ राजेश घासकडवी, शिल्पा ब आणि मन१: मी माझ्या लिखाणात "मायटोकॉंड्रिअन इव्ह" आणि "वाय क्रोमोसोम अ‍ॅडम" हे शब्द न वापरता मुद्दाम "एक पुरूष" आणि "एक स्त्री" हे शब्द वापरले आहेत.

कारण वाय क्रोमोसोम अ‍ॅडम आस्तित्वात असण्याच्या काळात (२३७,००० आणि ५८१,००० वर्षांपूर्वीच्या कालखंडात) मायटोकॉंड्रिअन इव्ह किंवा आधुनीक मानव आस्तित्वात नव्हता. म्हणजे "वाय क्रोमोसोम ऍडम" हा मानव नव्हता तर आदिमानव होता आणि आधुनिक मानवाचा पूर्वज होता.

मायटोकॉंड्रिअन इव्ह मात्र आधुनिक मानवाच्या उत्पत्तीच्या काळात आस्तित्वात होती. तिचा किंवा तिच्या मुलीचा "वाय क्रोमोसोम ऍडमच्या त्या स्त्रिला समकालीन असणार्‍या पुरुष वारसाशी" संबंध येउन आधुनिक मानव उत्क्रांत झाला हे मात्र नक्की, कारण आधुनिक मानवात या दोघांची जनुके आहेत.

अर्थात याचा असाही अर्थ नाही की त्या काळात हे दोनच मानवप्राणी (एक पुरुष व एक स्त्री) होते... (पुढच्या भागात याचा संदर्भ येईलच, पण इथे मुद्द स्पष्ट करण्यासाठी थोडेसे) २ लाख वर्षांपूर्वी साधारण दहा हजाराच्या आसपासच आधुनिक मानव शिल्लक उरले होते आणि त्यातील फक्त एका जोडीचीच संतत्ती आजच्या घडीला जिवंत आहे (कारण त्यांच्यात "मायटोकॉंड्रिअन इव्ह" आणि "वाय क्रोमोसोम ऍडम" या दोघांचे जीनपूल आहेत) ... इतर वारसरेखा निर्वंश झाल्या आहेत.

म्हणजेच, आजचे सर्व मानव २ लाख वर्षापुवी आस्तित्वात असणार्‍या एक पुरूष आणि एक स्त्री या जोडीपासूनच निर्माण झालेले आहेत.

शिल्पा ब's picture

16 Jul 2013 - 12:31 pm | शिल्पा ब

म्हणजे प्रत्येकाचे जीन्स वेगळे होते - स्त्री अन पुरुष दोघांचेही - अन त्यातली एक जोडी जिच्यात एक्स अन वाय क्रोमोसोम्स होते ते जिवंत राहीले अन पुनरुत्पादन केले असं का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jul 2013 - 12:43 am | डॉ सुहास म्हात्रे

प्रतिकूल हवामानात २ लाख वर्षांपूर्वीपर्यंत तगून राहिलेल्या १०,००० मानवांच्या पुढे अनेक पिढ्या निर्माण झाल्या. पण हळू हळू इतर सर्व पिढ्या निर्वंश झाल्या. फक्त मायटोकाँड्रियल इव्ह अथवा तिच्या मुलीपासून आणि वाय क्रोमोसोम अ‍ॅडमच्या वंशज पुरुषापासून झालेल्या संत्ततीतून आजचे सगळे मानव निर्माण झालेले आहेत.

तर कसा कंबर आणि पुढच्या भागापासून अनेक सहस्त्र किमी चा आणि २ लाख वर्षांच्या मुदतीचा प्रवास करायला तयार व्हा !

म्या हजर है , पॉपकोर्न घेऊन :)

जबरी माहितीपूर्ण आहे हा भाग. इथिओपियातली २०० पार्टवाली कवटी हे बाकी लैच भारी आहे. जेनेटिक्सवाली माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पुढील प्रवासाच्या बेसबरीचे इंतजारात.

अभ्या..'s picture

16 Jul 2013 - 1:43 pm | अभ्या..

+१
येऊ द्या येऊ द्या.
बॅट्या ज्या लिंग्वीस्टीक अँथ्रॉपॉलॉजीची स्पेशली वाट पाहतोय त्याच्या पण प्रतिक्षेत. :)

पैसा's picture

16 Jul 2013 - 3:46 pm | पैसा

खूपच मोठा आवाका असलेली लेखमालिका. त्या आफ्रिकेतल्या "आदिमायेला" ल्युसी असे नाव दिले होते असे वाचल्याचे आठवते आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jul 2013 - 12:23 am | डॉ सुहास म्हात्रे

ल्युसी म्हणजेच AL 288-1 (शास्त्रिय नाव). तिचे वय ३२ लाख वर्षे आणि ती Australopithecus afarensis या प्रजातीची आदिमानव होती.

ल्युसीचे महत्व प्राचीन मानवी इतिहासात फार मोठे आहे आहे. कारण सर्वसाधारणपणे प्राचीन मानवी जीवावशेष किंवा जीवाश्म एखादे हाड अथवा कवटीच्या तुकड्याच्या स्वरूपात सापडतात आणि असे तुटपुंजे पुरावे वापरून शात्रज्ञांना संशोधन करावे लागते. पण १९७४ मध्य हदार (आस्वान दरी, इथियोपिया) मध्ये सापडलेले ल्युसीचे अवशेष म्हणजे एका सांगाड्यातली एकूण ४०% हाडे होती. एका मानवाची / आदिमानवाची एवढी हाडे एकत्र मिळणे म्हणजे शात्रज्ञांच्या दृष्टीने एक खासा जॅकपॉटच होता !

आपली आताच्या लेखातली आधुनीक मानव स्त्री हा जनुकीय शास्त्राने मांडलेला सिद्धांत आहे, जो नंतर मिळालेल्या मानवी अवशेषांनी निर्विवादपणे सिद्ध झालेला आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Jul 2013 - 4:49 pm | ज्ञानोबाचे पैजार

या हिशोबाने आपण सारे एकमेकांचे भाऊ बहिण आहोत का?
असे असले तर निग्रो, युरोपियन, मंगोलियन इत्यादी एकमेकांपेक्षा फार वेगळे कसे दिसतात?

शिल्पा ब's picture

16 Jul 2013 - 9:42 pm | शिल्पा ब

चालायचंच ! थोडाफार फरक असायचाच. एकाच घरात नकटे, कुरळे केस वाले, उंच, बुटके असतातच की !
हजारो वर्षांच्या कालावधीत पब्लिक जिथे कुठे जाउन तिथेच राहीलं तिथं अडजस्ट होणारच. नै का? अफ्रिकेत उन फार त्यामुळे त्वचा काळी पडणं सहाजिक आहे त्याउलट युरोपात. तसंच आहारामुळे पण फरक पडतो. हे सगळं हजारो वर्षांच्या कालावधीत झाल्याने अ‍ॅडजस्टमेंटमुळे प्रजा वेगवेगळी दिसतेय इतकंच.

एकाच कालावधीत राहीलेले नियांड्रोथॉल अन माणुस प्राणी यांच्यातसुद्धा प्रचंड फरक होतेच...दिसणं, बुद्धी वगैरे तसंच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jul 2013 - 9:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

याबाबतचं एक फार महत्वाचं कारण पुढे प्रवासात झालेल्या एका हवामानाच्या प्रकोपात दडलेलं आहे.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Jul 2013 - 8:45 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अत्यंत रोचक प्रकार आहे हा!!
प्रत्येक भाग काही शंका मिटवतोय व नविन निर्माण करतोय.
वाचतोय, येऊ द्या...

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jul 2013 - 9:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्पा, बॅटमॅन, अभ्या.., पैसा, ज्ञानोबाचे पैजार आणि मिसळलेला काव्यप्रेमी: अनेक धन्यवाद !

अर्धवटराव's picture

16 Jul 2013 - 11:28 pm | अर्धवटराव

आजवर प्रसारीत झालेल्या सर्वोत्तम मालिकांपैकी एक अशी हि लेखमाला.
विषय तर जबरी आहेच, पण एक्कारावांची लेखन स्टाईल म्हणजे सोने पे सुहागा.

मला डी.एन.ए क्षेत्राबद्दल तसंही फार कुतुहल वाटतं. एका शरीरातील सर्व डीएनए हॅड टु टेल जोडली तर पृथ्वी ते सूर्य अंतर ७० वेळा येणं-जाणं होईल इतकी त्याची लांबी होते म्हणतात. एव्हढ्या सूक्ष्म लेव्हलला जाऊन त्यातुन निष्कर्ष काढणारे वैज्ञानीक काय कमाल करत असतील... खतरनाक.

पु.भा.प्र.

अर्धवटराव

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jul 2013 - 1:27 am | डॉ सुहास म्हात्रे

मला डी.एन.ए क्षेत्राबद्दल तसंही फार कुतुहल वाटतं. एका शरीरातील सर्व डीएनए हॅड टु टेल जोडली तर पृथ्वी ते सूर्य अंतर ७० वेळा येणं-जाणं होईल इतकी त्याची लांबी होते म्हणतात.
हे आश्चर्यकारक वाटत असेल तर अजून हे एक सत्य बघा:

माणसाच्या शरीरात एकूण ५,००० ते १०,००० कोटी पेशी असतात. तांबड्या रक्तपेशी सोडून इतर प्रत्येक पेशीत पेशिकेंद्र असते. प्रत्येक पेशिकेंद्रात त्या माणसाची इथंभूत माहिती (उंची, रंग, अवयव, इ.)तर असतेच पण त्याशिवाय अंडे फलित झाल्यापासून त्या एका पेशीपासून ५,००० ते १०,००० कोटी पेशींचा संपूर्ण माणूस कसा बनणार, कोणत्या पेशी कोणत्या अवयवात केव्हा रुपांतरीत होणार, तो वयात केव्हा येणार, म्हातारा केव्हा होणार, इत्यादी सर्वांच्या DNA च्या कोडाची आणि तो कोड प्रत्यक्षात आणण्याच्या जवळ जवळ ६० ते ८० वर्षे अथवा जास्त वेळाच्या वेळापत्रकाची एक कॉपी असते. एका पेशिची लांबी १ ते १०० मायक्रोमीटर असते आणि पेशिकेंद्राचा आकार पेशीच्या आकाराच्या १/१० ते १/१०० इतका लहान असतो.

इतक्या लहान जागेत इतकी माहिती साठवणारा आणि ती एवढ्या कालावधीवर ९९.९९% टक्के वेळा बरोबर एक्झीक्यूट करणारा संगणकीय कोड माणसाला कधीपर्यंत बनवता येईल?

हे सगळे प्रचंड आश्चर्यकारक आहे यात शंकाच नाही. अन त्याहीपेक्षा महत्वाचे म्हंजे अतर्क्य आहे.

एक शंका: डी एन ए मध्ये माणसाची इत्थंभूत माहिती असते असे तुम्ही सांगितलेल्या माहितीवरून दिसते. समजा नुकतेच एक बाळ जन्मले आहे. त्याचा डीएनए आपल्याला अ‍ॅनलाईझ करून काय काय माहिती प्रेडिक्ट करता येऊ शकेल ?

पॉसिबल नैसर्गिक आयुष्य? रोग, जण्रल प्रकृती, इ.? म्हंजे काय प्रेडिक्ट करता येऊ शकेल आणि ते किस हद तक?

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jul 2013 - 10:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

एका DNA मध्ये ही सगळी माहिती नसते. पेशीकेंद्रात असणारे ४६ क्रोमोसोम्समध्ये (२३ जोड्या) प्रत्येकी एक DNA चा अणू असतो आणि त्यांत ही माहिती साठवलेली असते. लेखातल्या DNA च्या चित्रात दाखवल्याप्रमाणे हे DNA पिळलेल्या शिडिप्रमाणे असतात. आणखी एक चमत्कारपूर्ण माहिती म्हणजे या शिडीच्या दोन बांबूना फक्त चारच, हो चारच प्रकारच्या अमायनो आसिडचे रेणू एकत्र बांधून ठेवतात आणि त्यातही अडेनाईन फक्त थायमिनबरोबर आणि ग्वानीन फक्त सायटोसाईनबरोबर सांधा करू शकते म्हणजे या चार अमायनो अ‍ॅसिडसच्या दोनच पायाभूत जोड्या (बेस पेअर्स) शक्य असतात. पण एवढी कमी फ्लेक्सिबिलिटी वापरून निसर्गाने ३०० कोटी बेस पेअर्सच्या वेगवेगळ्या लंबीच्या आणि सिक्वेन्सच्या साखळ्या बनवल्या आहेत... अशा प्रत्येक साखळीत एक मानवी गुणधर्म (स्ट्रक्चर / फंक्शन) निर्माण करणार्‍या प्रोटीनचा कोड असतो... संगणकीय परिभाषेत '{' पासून '}' पर्यंतची इन्स्ट्रक्शन असे म्हणायला हरकत नाही ! एका क्रोमोसोममधल्या साखळ्या एकमेकाला जोडून असतात आणि त्या सगळ्या मिळून एका क्रोमोसोममधला एकच एक DNA चा अणू बनतो.

थोडक्यात (अमिनो आसिडस् --> बेस पेअर्स) --> डि एन ए --> जीन --> क्रोमोसोम --> (सगळे ४६ क्रोमोसोम मिळून) ह्युमन जिनोम अशी रचना आहे.

एक महाप्रचंड प्रोजेक्ट करून माणसाच्या सगळ्या जिनोमची रचना मॅप करून झाली आहे (हुश्य्श्य !!!) काही जीन्सचा रोगांशी असलेला संबद्ध फार पूर्वीपासून माहिती होताच. पण आता उरलेल्या प्रत्येक जीनच्या कोडाची आणि त्याच्या माणसातल्या कार्याची छाननी सुरू आहे. ह्यातून पुढे काहितरी प्रचंड क्रांतीकारक (बरे की वाईट जीनास ठावूक ;) ) बाहेर येणार हे नक्की.

आवांतर : याव्यतिरिक्त बाळाला मिळणारे DNA म्हणजे मायटोकाँड्रियल DNA, जे फक्त मातेकडूनच मिळतात आणी पेशीकेंद्रात नसून त्याच्या भोवतीच्या सायटोप्लाझममध्ये असतात हे आपण लेखात जाणून घेतले आहेच. मायटोकाँड्रिया म्हणजे पेशीतली उर्जा निर्माण करणारी जनित्रे (पॉवर जनरेटर) असतात. मायटोकाँड्रियल DNA चे अणू आकाराने पिळलेल्या शिडिसारखे नसून वर्तुळाकार असतात.

जनूकशास्त्रात जेवढे खोलात जावू तेवढे 'डोक्याचे लय भुस्काट' होते हे मात्र खरे ;)

बॅटमॅन's picture

17 Jul 2013 - 11:07 pm | बॅटमॅन

डीटेल माहितीबद्दल बहुत धन्यवाद!!! थोडं थोडं कळालं. म्हणजे माहितीचे बेसिक युनिट डीएनए दिसत नाही. मग ४६ डीएनए मिळवून ही सगळी माहिती मिळू शकेल, बरोबर? अर्थात मायटोकाँड्रियल डीएनए बरोबर घेऊनच.

ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट बद्दल जरासं वाचलं होतं, सगळा खतरनाक प्रकार आहे एकूणच :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jul 2013 - 11:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

डीटेल माहितीबद्दल बहुत धन्यवाद!!! थोडं थोडं कळालं. म्हणजे माहितीचे बेसिक युनिट डीएनए दिसत नाही. मग ४६ डीएनए मिळवून ही सगळी माहिती मिळू शकेल, बरोबर? अर्थात मायटोकाँड्रियल डीएनए बरोबर घेऊनच. बरोबर !

बेसीक युनीट जीन, कारण एक जीन = एक प्रोटीन = एक 'स्ट्रक्चरल / फंक्शनल' गुणधर्म.

हे जीन सलगपणे एकमागे एक जोडून एक DNA चा अणू बनतो.

त्या एकाच अणूची गुंडाळी + थोडे प्रोटीन व RNA चे बायडिंग मिक्चर = क्रोमोसोम.

एका पेशीकेंद्रातल्या क्रोमोसोमच्या २३ जोड्या = जिनोम.

एक ह्युमन जिनोम = २० ते २५,००० जीन

बॅटमॅन's picture

17 Jul 2013 - 11:31 pm | बॅटमॅन

धन्यवाद! कसले खत्रा काँप्लिकेटेड स्ट्रक्चर आहे तेच्यायला...

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jul 2013 - 11:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा अनेक वर्षाच्या वेळापत्रकाप्रमाणे अख्खा माणूस तयार करून त्याला चालवत ठेवणारा एका पेशिकेंद्रातला प्रोग्रॅम, मोठ्या ताकदीचा मायक्रोस्कोप असल्याशिवाय दिसत नाही एवढ्या सूक्ष्म असतो.

बॅटमॅन's picture

18 Jul 2013 - 12:01 am | बॅटमॅन

कल्पनातीत आहे इंडीड!

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jul 2013 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

समजा नुकतेच एक बाळ जन्मले आहे. त्याचा डीएनए आपल्याला अ‍ॅनलाईझ करून काय काय माहिती प्रेडिक्ट करता येऊ शकेल ?
त्याकरिता बाळाच्या जन्मापर्यंत वाट बघायची गरज नसते. बाळ आईच्या पोटात एका पिशवित (amniotic sac) असलेल्या द्रवपदार्थात (Amniotic fluid) तरंगत असते. या द्रवाचा थोडासा भाग सिरिंजने काढून त्यातील बाळाच्या पेशितील पेशिकेंद्रांतून DNA मिळवून त्याची तपासणी करण्याचे तंत्र फार पूर्वी विकसित झाले आहे. जर मातापित्यांमधे अगोदर निदान झालेले जनुकीय दोष असतील आणि त्यांचे संक्रमण होऊन बाळामध्ये काही गंभीर आजार/दोष होण्याची शक्यता असेल तर, ते बाळ आईच्या पोटात असतानाच अशी तपासणी करून त्याचे निदान करता येते व त्यावर बाळास जन्म देणे हे योग्य की अयोग्य हे मातापित्याना ठरवता येते.

हे करावे की नाही आणि केल्यास गर्भारपणाच्या कोणत्या काळात करावे याचे प्रत्येक देशाचे कायदे वेगवेगळे आहेत.

माहितीकरिता धन्यवाद! म्हणजे मेडिकली काही भविष्य वर्तवता येईल. पण अजून स्वभाव इ. वर्तवणे शक्य झालेले नसावे. ते आत्ता शक्य नाही आणि पुढे कधीतरी शक्य होईल अशा टाईपचे आहे की होणेच शक्य नाही अशा टाईपचे आहे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jul 2013 - 3:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

शास्त्राचा आणि शात्रज्ञांचा काsssही भरवसा नाही... काही जणांची तर मिळालेल्या प्राचीन जिनोमवर आधारीत कृत्रिम पद्धतीने नविन जिनोम तयार करून अख्खा जिवंत नियांडरथाल आदिमानव आणि मॅमथ (प्राचीन केसाळ हत्ती) बनवायची तयारी चालली आहे.

"Impossible is something that has not been achived, yet !" :)

हे बाकी खरं! डिस्कव्हरी की जॉग्रफिक आता विसरलो पण दोहोंपैकी कुठेतरी एका ठिकाणी शास्त्रज्ञांनी डायनासोरचा आवाज रिकन्स्ट्रक्ट केलेला दाखवला होता. कैच्याकै करत असतात लोकं एकदम :)

एक प्रश्न.
या लेखात वर्णन केलेले अ‍ॅडम आणि इव्ह, ज्यांच्यापासुन आधुनीक मानव समाजाची निर्मीती झाली आहे, ते तत्कालीन परिस्थितीत केवळ बाय चान्स तगुन राहिले कि त्यांच्या सर्व्हाइव्हलचे चान्सेस इतरांपेक्षा मुळातच जास्त होते?

अर्धवटराव

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jul 2013 - 10:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे का झाले याचा नक्की शात्रिय पुरावा आतापर्यंत तरी मिळालेला नाही.

मराठे's picture

17 Jul 2013 - 10:10 pm | मराठे

अवांतरः
स्टेम सेल मंजे काय हो?
त्याचा वापर करून कृत्रीम रित्या अवयव निर्माण करणे (किडनी, वगैरे) शक्य होते का? कसे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jul 2013 - 10:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

फलित अंड्यापासून तयार झालेल्या पहिल्या काही पेशींप्रमाणे माणसामध्ये कोणतेही विशेष कार्य करणार्‍या पेशीत रुपांतर होण्याची क्षमता असते... म्हणूनच एका फलित अंड्यापासून असंख्य प्रकारच्या वेगवेगळे काम करणार्‍या ५,००० ते १०,००० कोटी पेशीचा अख्खा माणूस तयार होतो. ही ताकद फक्त फलित अंडे आणि त्याच्या पहिल्या काही विभजनातून निर्माण झालेल्या आणि प्लासेंटा इ. मधल्या पेशीत असते. अशा पेशीला स्टेम सेल म्हणतात... अर्थ असा की झाडाची फांदी (स्टेम) जिच्यापासून अनेक अवयव (फांद्या, पाने फुले, फळे, इ) निर्माण होवू शकतात. मानवात एकदा पेशी एका प्रकारात पूर्णपणे विकसित झाली की ती दुसर्‍या प्रकारच्या पेशीत रुपांतरीत होवू शकत नाही... उदा. कातडीची पेशी स्नायुच्या पेशीत अथवा फुफ्फुसाची पेशी मुत्रपिंडाच्या पेशीत रुपांतरीत होवू शकत नाही.

मोदक's picture

18 Jul 2013 - 2:27 am | मोदक

वाचतोय..

सगळंच भारून टाकणारं आहे. वाचताना थांबायला नको वाटावं असं लेखन आहे. जिवाश्म हा शब्द किती वर्षांनी ऐकला. बरे वाटले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2013 - 1:02 am | डॉ सुहास म्हात्रे

मोदक आणि रेवती : अनेक धन्यवाद !