पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ११ : महाप्रवासाचा अंतिम कालखंड

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
31 Aug 2013 - 5:15 pm

=====================================================================

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...

=====================================================================

...ही कला पाहण्यासाठी आणि अधिक माहितीकरिता या दुव्यावर पाहणी करावी. तेथून अजून काही दुवे मिळू शकतील.

उत्तर युरोपमध्ये पुन:प्रसरण

साधारणपणे १०,००० वर्षांपूर्वी आतापर्यंतच्या शेवटच्या हिमयुगाच्या शेवटच्या तुलनेने गरम (interglacial) कालखंडाची सुरुवात झाली... तो कालखंड अजून चालू आहे हे आपण मागे पाहिले आहेच. आता आपण त्या कालखंडाच्या साधारण मध्यावर आहोत... पण खनिज तेलाचा वाढलेला वापर, वातावरणातील ओझोनच्या थराला पडलेले व वाढत चाललेले छिद्र आणि इतर काही कारणांनी हा "गरम" कालखंड लांबला जाऊ शकतो असे शास्त्रज्ञांचे मत आहे !

वाढणार्‍या पावसाच्या प्रमाणाने भूमध्य समुद्राच्या किनार्‍यांवर अनेक ठिकाणी वर्षारण्ये अथवा गवताळ भाग निर्माण झाले. आता जगातले सर्वात मोठे वाळवंट असलेल्या सहारामधील भागात जंगले होती आणि सद्या पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेत दिसणार्‍या प्राण्यांनी भरलेला होता. त्याबाबतचा पुरावा म्हणजे मध्य सहारात त्या काळच्या गवे, हत्ती, गेंडे, पाणघोडे, जिराफ, ऑस्ट्रिच आणि हरिणांची यांची चित्रे आणि खोदकाम असलेली प्रस्तरकला. हे कलाविषय अगदी ५,००० वर्षांपूर्वीपर्यंत, हा भाग वाळवंट बनायला सुरुवात होईपर्यंत चालू होते आणि नंतर त्यांची जागा उंटांच्या चित्रांनी घेतली.

सद्याच्या नायजरमधील जिराफांच्या मूळ आकाराइतकी मोठी आणि सुंदर प्रस्तरचित्रे (वय १०,००० ते ८,००० वर्षे) जालावरून साभार...

वाढणार्‍या तापमानामुळे १०,००० वर्षांपूर्वी उत्तर युरोपचे हवामान सुधारू लागले आणि तेथून पूर्वी पीछेहाट झालेल्या मानवाने परत एकदा तिकडे पसरायला सुरुवात केली...

मॅमथ स्टेप्पेच्या पूर्व भागातले मानव सायबेरियात पसरले तर मध्य आशियातले रशिया आणि पूर्व युरोपमध्ये गेले.

३०-४०,००० वर्षांपूर्वी युरोपात पसरणार्‍यातले काही मानव त्या काळी स्कँडिनेव्हिया व ब्रिटनपर्यंत पोहोचले होते. मात्र हिमयुगाच्या कडाक्याने २५,००० वर्षांपूर्वीपर्यंत त्यातले सर्वजण एकतर नष्ट झाले अथवा परत फिरले होते. यानंतर हा भूभाग १०,००० वर्षांपूर्वीपर्यंत निर्मनुष्य राहिला होता. आता सुधारणार्‍या हवामानाचा फायदा घेत रेनडियरच्या कळपांचा मागोवा घेत काही मानव परत उत्तरेस स्कँडिनेव्हियापर्यंत पोहोचले तर समुद्राच्या पाण्याच्या कमी पातळीचा फायदा घेत काहीजण ब्रिटनमध्ये पोचले.

अशा तर्‍हेने युरोपच्या दक्षिणपूर्व आणि दक्षिणपश्चिमेस असलेल्या रेफुजेसमधल्या मानवांनी पूर्ण युरोप आणि सायबेरिया काबीज केला. पृथ्वीचे असे एकही खंड शिल्लक राहिले नाही की जिथे मानवाचा वावर नव्हता... जगातल्या सर्वात नवीन प्राण्याने सर्व पृथ्वी पादाक्रांत केली आणि दोन लाख वर्षांपूर्वी सुरू झालेली महासफर संपली !

=====================================================================

प्रवासाच्या अंतिम कालखंडात झालेले मानवाच्या जीवनपद्धतीतील क्रांतिकारी बदल

आफ्रिकेतून बाहेर पडल्यावर प्रथम सतत भटकत असल्याने आणि शेवटची काही हजार वर्षे प्रतिकूल हवामानाला तोंड देत रेफुजेसमध्ये वास्तव्य असल्याने आतापर्यंत मानवाची जीवनशैली "छोट्या (१० ते फार फार तर १०० च्या) गटांत राहणारे आणि जमिनीवर नैसर्गिकरीत्या असणार्‍या रानटी वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून मिळणार्‍या अन्नावर गुजारा करणारे प्राणी." अशीच होती. निसर्गावर पूर्णतः अवलंबून असल्याने मानवाचे फार मोठे गट बनणे किंवा फार मोठी लोकसंख्या होणे शक्य झाले नव्हते. हिमयुगाच्या या शेवटच्या तडाख्याने तर अन्नाची अधिकच कमतरता निर्माण होऊन सर्व पृथ्वीवरच्या मानवांची एकूण संख्या काही दशलक्षांतच मोजता येईल इतकी कमी झाली होती.

या काळातील सुधारणार्‍या हवामानाबरोबरच अजून एक नवी वस्तुस्थिती निर्माण झाली होती. पूर्वी गटांच्या लाटांलाटांनी पुढे जाणार्‍या मानवाला आता एका जागेवर (रिफूजेसमध्ये) खूप काळ अडकून पडल्याने एकाच जागेवर टिकून राहण्याचे फायदे कळले होते (? सवय झाली होती). थोडक्यात माणूस केवळ भटक्या न राहता जागा-जमीन यांचा विचार करू लागला. सततची भटकंती आणि नवीन जागेशी मिळवून घेताना होणारी फरपट थांबली. संथ जीवनपद्धतीमुळे प्रसवदर वाढला. अर्थातच जादा अन्नाची आणि ते राहण्याच्या जागेपासून जवळच असण्याची गरज भासू लागली. तसेच 'मिळेल ते आणि मिळेल तेव्हा' अशा प्रकारची अन्नाची अनिश्चितता नाहीशी करण्यासाठी त्याला गरज वाटली असावी. स्वत:च्या संरक्षणातील जमिनीत उपयोगी वनस्पती आणि प्राणी वाढवल्याने हे जमू शकेल हे त्याच्या ध्यानात आले असावे. कोणत्या जमिनीत कोणत्या उपयोगी वनस्पती चांगल्या प्रकारे वाढतात ह्याची नोंद घेतली गेली असेल. त्यांत कोणत्या वनस्पती आणि त्यातही त्यांच्या कोणत्या जाती जास्त उपयोगी हे अनेक वर्षांच्या अनुभवाने आणि काही प्रायोगिक चुकांच्या (trial and error) मार्गाने मानव शिकत गेले असणार. अशा वनस्पतींची उत्तम वाढ ज्या जमिनीत नैसर्गिकपणे होत आहे तिच्यावर मालकी हक्क प्रस्थापित करून अन्नाची सुरक्षित तरतूद होऊ शकते हे हुशार मानवाच्या ध्यानात आले असेल. अर्थात हे सगळे कोणत्या क्रमाने घडले हा वादाचा विषय होऊ शकतो... पण हे सगळे घडत गेले हे मात्र नक्की. यातूनच शेतीचे व्यवस्थापन विकसित झाले. रोजचे अन्न रोज मिळवणारा, हातावर पोट बाळगून भटकणारा मानव हळूहळू एका जागी स्थिर होऊन अन्नाचे जास्त मोठ्या काळासाठीचे (शेतीचे) व्यवस्थापन करण्याकडे वाटचाल करू लागला... अन्नाचा साठा करून तो हवा तेव्हा वापरण्याचे फायदे शिकू लागला. येथूनच धान्याच्या शेतीची आणि फळझाडांच्या लागवडीची सुरुवात झाली.

रोज शिकारीला जाण्यातला धोका आणि अनिश्चितता दूर करण्याच्या दृष्टीने अन्नासाठी काही प्राण्यांचा साठा राहण्याच्या जागेजवळ करण्याची कल्पनाही यातूनच आली असणार. कालांतराने यातले काही प्राणी मानवी सहवासाने निर्धोक होतात (माणसाळतात) आणि त्यांचे प्रजनन होऊन / करवून वास्तव्याच्या ठिकाणाशेजारी कायमची निर्धोक अन्नाची व्यवस्था होऊ शकते हे चलाख माणसाच्या ध्यानात आले नसते तरच नवल होते. शेती करण्यासाठी आणि वाहनासाठी प्राण्यांचा कल्पक उपयोग डोकेबाज (?आळशी) माणसाने शोधला आणि प्राणी पाळण्याला अजून एक नवीन अर्थ निर्माण झाला !

प्रथम पश्चिम आशियात शेळ्या, मेंढ्या, डुकरे व गुरे पाळण्याला आणि नंतर गाढवे, घोडे आणि उंट पाळायला सुरुवात झाली. त्याच सुमारास दक्षिण आणि पूर्व आशियात गुरे, डुकरे आणि कोंबड्या पाळायला सुरुवात झाली. मात्र अमेरिकेत टर्की आणि लामा (दोन्ही शब्द प्राण्याची नावे या अर्थाने) सोडून इतर प्राणी पाळल्याचे दिसत नाही. वर्षारण्ये असलेल्या आफ्रिकेतल्या भूभागात तर अगदी आलिकडच्या काळापर्यंत कोणत्याही प्राण्याला पाळल्याचे दिसत नाही.

संरक्षित क्षेत्रात आणि अन्नाच्या मुबलकतेत राहू लागल्यावर दर गटाची लोकसंख्या वेगाने वाढू लागली आणि वाढणार्‍या तोंडांना अन्न पुरवायला नियोजन करून वनस्पतींची शेती करणे आवश्यक झाले. हे चक्र दर फेरीमागे त्याच्यातल्या कार्यकारणाला (जास्त अन्नसुरक्षा म्हणजे जास्त लोकसंख्या आणि जास्त लोकसंख्या म्हणजे जास्त अन्नाची गरज) अधिकाधिक मजबूत बनवत राहिले.

याबाबतीतला गेल्या १०,००० वर्षांतला तंत्रज्ञान आणि प्रगतीचा आलेख साधारण असा मांडता येईल: (वपू = वर्षांपूर्वी)

१०,००० वपू : शेतीची सुरुवात. १०,००० ते ६,००० वपू च्या कालखंडात हवामानातील बदलामुळे वाढलेल्या मोसमी पावसाने याला बरीच मदत केली.

९,००० वपू : सिरीया आणि टर्कीमध्ये जवस अथवा आळशीची लागवड... याचा दुहेरी उपयोग होता: खोडापासून मिळणार्‍या धाग्यापासून वस्त्रे बनवणे आणि बियांपासून तेल मिळवणे. सन २००९ मध्ये रिपब्लिक ऑफ जॉर्जियामधल्या एका गुहेत जवसापासून तयार केलेले विणलेले आणि गाठी मारलेले धागे सापडले आहेत... त्यांचे वय ३०,००० वर्षे आहे; त्यामुळे जवसाचा इतिहास परत नव्या पद्धतीने लिहिला जाईल असे दिसते !

८,००० वपू : पूर्व भूमध्य समुद्राच्या भागात कडधान्यांचा (Beans) वापर.

७,००० वपू : अमेरिकेत मका, भोपळा, कडधान्ये आणि मिरचीचा वापर.

६,००० वपू : पाकिस्तानात कापसाची पैदास आणि अफगाणिस्तानात द्राक्षांची पैदास.

५,००० वपू : चीनमध्ये सोयाबीन, भात, गहू, बार्ली आणि मिलेट्स (ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी, इ.) ची लागवड.

४,००० वपू : पूर्व भूमध्य समुद्राच्या भागात ऑलिव्ह, पीच आणि अ‍ॅप्रिकॉटची लागवड.

अजून काही थोडे...

३,००० वपू : फिनिशियन लोक भूमध्य समुद्रात आणि पॉलिनेशियन प्रशांत महासागरात सफरी करू लागले.

२,००० वपू : वरच्या खलाश्यांना मोसमी वार्‍यांचा फायदा घेऊन सफरी करणे जमू लागले.

१,००० वपू : जगाची लोकसंख्या अंदाजे २५ ते ३५ कोटीमध्ये असावी.

आता : जगाची लोकसंख्या ७१७ कोटीचा आकडा ओलांडून पुढे गेलेली आहे. जगाची लोकसंख्या मोजणारे घड्याळ आणि प्रत्येक देशाची लोकसंख्या पाहण्यासाठी येथे टिचकी मारा... या क्षणाला असलेली जगाची लोकसंख्या

*****

जसे शेतीमुळे अन्नाची सोय झाली तसेच शेतीसाठी कामासाठी जास्त हातांची गरजही निर्माण झाली. वाढत्या प्रजनन क्षमतेने ही गरज पुरवण्यासाठी हातभार लावला. याचा परिणाम मानवांच्या छोट्या टोळ्या मोठ्या समुदायात रूपांतरित होण्यात झाला. अर्थातच त्यांना एकाच उद्देशाने एकत्रित ठेवून त्यांच्या शारीरिक आणि मानसिक ताकदीचा सकारात्मक उपयोग करण्यासाठी वागण्याचे नियम, नीतिमत्ता, सामाजिक उतरंड, इ. तयार झाल्या असणार. हे सर्व कधी गोडीगुलाबीने पण बर्‍याचदा ताकदीच्या बळावर झाले असणार. स्वत:चे आणि स्वजनांचे संरक्षण करण्यासाठी ताकद लागते हा मानवासाठी काही नवीन धडा नव्हता. इतर सबळ प्राण्यांच्या मानाने जेमतेम किंवा अपुरी शारीरिक ताकद असतानाही आपल्या मेंदूच्या ताकदीच्या बळावरच मानव आतापर्यंत इतर सर्व प्राण्यांना आणि निसर्गाला तोंड देत केवळ तगूनच राहिला नव्हता तर आतापर्यंतचा पृथ्वीवरचा सर्वात प्रबळ प्राणी बनला होता. याच मेंदूचा वापर करून तो सामाजिक प्रगती करू लागला... त्यातूनच गट - मोठा गट - खेडे - शहर - राज्य - साम्राज्य निर्माण होत गेले असणार.

मानवाचा सुपीक मेंदू त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाचा, दगड-माती-झाडे-प्राणी-नद्या-समुद्र-डोंगर-आकाश-तारे यांचा अर्थ आणि संबंद्ध लावायचा प्रयत्न करत राहिला. यातूनच भौतिक आणि आधिभौतिक कल्पना निर्माण होत गेल्या. हुशार मंडळींनी त्यांना समजलेला अर्थ इतरांना सांगून सगळ्यांचा फायदा व्हावा असे पाहिले असेल... तर त्यापेक्षा "जास्त हुशार" मंडळींनी त्या ज्ञानाचा उपयोग करून स्वत:कडे जास्तीत जास्त फायदा कसा राहील / येईल याकरिता केला. याची परिणती वेगवेगळ्या कल्पना - भाषा - धर्म - राज्ये - साम्राज्ये - संस्कृती उभ्या राहण्यात, वाढत राहण्यात, एकमेकाशी चढाओढी करण्यात झाली. त्यातल्या काही काळाच्या ओघात नष्ट झाल्या तर काही आजपर्यंत टिकून आहेत, त्यातल्या काही भविष्यात प्रबळ होतील, काही नाहीश्या होतील तर काही नवीन जन्म घेतील. मानव अस्तित्वात असेपर्यंत हे चक्र असेच चालू राहील. असो.

एकूण काय, संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत करून झाल्यावर मानवाची प्रवासाची संधी कमी झाली आणि मग त्याने आपल्या चळवळ्या शारीरिक आणि बौधिक ताकदीचा जमिनीवर आणि दुसर्‍या मानवांवर हक्क गाजवण्यासाठी उपयोग करायला सुरुवात केली... मानवी जीवनात एक नवीन युग सुरू झाले !

=====================================================================

शेवटचे पान

नमस्कार रसिक वाचकहो !

आज ही लेखमाला पुरी करताना एक खास समाधान मनात आहे. मानववंशशास्त्र हा माझ्या औपचारिक शिक्षणाचा भाग कधीच नव्हता. पण त्याची कधीकाळी (यासाठी एकच प्रसंग सांगता येणार नाही) तोंडओळख झाली आणि तेव्हापासून तो माझ्या मनामध्ये कायम घर करून बसलेले कुतूहल बनून राहिलेला आहे. मी त्याबद्दलचे जे काही थोडे ज्ञानकण जमा केले त्याचे हेच एकमेव कारण.

एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला ममत्व असले की तिच्याबद्दल इतरांशी चर्चा करताना जरा जास्तच मजा येते. या दृष्टीने या लेखमालेच्यामुळे मला आलेली मजा कल्पनातीत आहे. यासाठी तुम्हा सर्व वाचकांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.

माझा लिखाणाचा उत्साह सतत वाढवत ठेवल्याबद्दल सर्व प्रतिसादकर्त्यांना खास धन्यवाद !

ह्या लेखमालेचा विषय जरी मळलेल्या वाटेवरचा नसला आणि गुंतागुंतीचा असला तरी त्याच्याबाबत खूप जणांना कुतूहल आहे हे माहीत होते. त्यामुळे भाषा आणि माहिती या दोन्ही जास्तीतजास्त वाचकांना समजण्यास सोप्याच नव्हे तर रोचकही असाव्या असा प्रयत्न होता. त्याकरिता अनेक ठिकाणी माहितीची काटछाट करावी लागली. मात्र यामुळे झालेल्या त्रुटी चोखंदळ वाचकांनी प्रतिसादातील चर्चा करून भरून काढल्या, त्याबद्दल त्यांचे विशेष धन्यवाद ! त्यांच्या चौकस सहभागाने मला पूर्वी वाचलेले संदर्भ परत चाळण्यासाठी भाग पाडले, ते शोधताना कधीकधी नवीन संदर्भही हाती लागले. त्यामुळे या सतत वेगाने पुढे जात असलेल्या शास्त्राच्या माझ्या ज्ञानाची काही ठिकाणी उजळणी झाली तर काही ठिकाणी त्यात भर पडली... हा अजून एक मोठा फायदाच झाला.

थोडक्यात, या लेखमालेने माझा खूप फायदा झाला आहे. त्यातला काही फायदा, आनंद आणि माझ्या या छंदाचे थोडेसे वेड मी वाचकांपर्यंत पोहोचवू शकलो असेन अशी आशा आहे.

(समाप्त)

=====================================================================

महत्त्वाचे दुवे

१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/

=====================================================================

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...

=====================================================================

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

31 Aug 2013 - 5:48 pm | वामन देशमुख

उत्कृष्ट वाचनानंद देणारी ही लेखनमाला, माझ्या सर्वकाळ फेवरिट साहित्यांपैकी एक झाली आहे.
धन्यवाद, इस्पीकचा एक्का. असाच वाचनानंद देत राहा अशी विनंती.

-----------------------------------
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,
घेणाऱ्याने घेता घेता, देणाऱ्याचे हात घ्यावे!
-----------------------------------

राही's picture

31 Aug 2013 - 5:57 pm | राही

आवडती गोष्ट दृष्टीआड झाल्यावर वाटावी तशी हुरहूर वाटते आहे. खूपच माहितीपूर्ण लेखमाला होती ही. यापुढेही मानवंशशास्त्रावर लिखाण आपल्याकडून वाचायला मिळो अशी अपेक्षा. विशेषतः भारतीय उपखंडातल्या घडामोडींविषयी वाचायला आवडेल.

एक्कासाहेब, तुम्हाला लाख लाख धन्यवाद! इतका किचकट विषय सोपा करून सांगितलात. मानववंशशास्त्राविषयी कुतूहल निर्माण झालं आहे. सगळ्या लेखांची प्रिंट काढून, शांतपणे परत एकदा वाचून मग तुमचं डोकं चावायला व्यनि करेन. :)

आता पुढची लेखमाला कशावर?

इतका किचकट विषय नुसता सोपाच नव्हे तर अतिशय इंट्रेस्टिंग करून सांगितल्याबद्दल एक्कासाहेबांना करोडो धन्यवाद!!!! आपण तर बुवा फ्यान हाओत तुमच्या सफरींचे आणि आतापासून हटके विषयांचेही. इतिहासापूर्वीचा इतिहास कुणी कधी सांगितल्याचे अन तेही मराठीत फारसे कधीच वाचले नव्हते. अन वाचायला मिळावे अशी खूप इच्छा तर होतीच. या लेखमालेच्या रूपाने इतिहासाचा दुवा २ लाख वर्षांपर्यंत मागे गेला.

बाकी या भागापुरते बोलायचे झाले तर ती जिराफाची प्रस्तरचित्रे अतिशय जबरी आवडल्या गेली आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Sep 2013 - 5:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही मालिका रोचक बनवण्यात तुमचाही मोठा हातभार लागलेला आहे.

प्रचेतस's picture

31 Aug 2013 - 7:12 pm | प्रचेतस

अतिशय सुरेख प्रवास.
समुद्राच्या कडेकडेने आपला प्रवास सुरु करणारे मानव नंतर मात्र नदीकाठच्या प्रदेशांत स्थिर झालेले दिसतात. जगातील प्राचीन प्रगत संस्कृती नाईल, सिंधू, सरस्वती इत्यादी नद्यांच्या काठाच्या आधाराने वाढलेल्या दिसतात. कदाचित गोड्या पाण्याचा प्रचंड साठा, सुपीक प्रदेश ही कारणे असावीत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Aug 2013 - 10:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहमत.

समुद्रकाठी सामुद्रीक प्राण्यांची (मासे, शिंपले, इ.) उप्लब्धता असते आणि किनारपट्टीवरून लवकर पुढे जाता येते. ही परिस्थिती बीच कोंबर्स आणि फोराजर्स (चपखल मराठी शब्द सापडले नाहीत) साठी योग्य असते. कारण तिथले अन्न कमी वाटू लागले की जलद पुढे सरकायला बरे. समुद्राकाठच्या खारट जमिनीमुळे शेती शक्य नसते.

याविरुद्ध; नदीच्या गोड्या पाण्यामुळे आणि तिने वरच्या भूभागातून वाहून आणलेल्या गाळामुळे झालेल्या सुपीक जमिनीमुळे शेतीला योग्य परिस्थिती असते. एकाच जागेवर कायम मानवी वस्ती आणि (धान्याची आणि पाळीव प्राण्यांची) शेती या दोन्हीसाठी गोड्या पाण्याची सतत आणि मुबलक उपलब्धता अत्यंत आवश्यक असते. सुरुवातीच्या काळी उघड्या समुद्रातून लांबवर वहातूक करण्याइतकी साधने नव्हती, पण समुद्रकाठाने प्रवासासाठी वापरात आणल्या जाणार्‍या होड्या नदीतल्या निर्धोक प्रवासाला आणि व्यापाराला पुरेश्या होत्या. त्यामुळे एकाच जागी वस्ती करण्यास नदीकाठ हे सर्व तर्‍हेने सोईचे ठरले. सहाजीकच बहुतेक सगळ्या संस्कृती नदीकाठाने विकसित झाल्या.

कौस्तुभ फुले's picture

31 Aug 2013 - 9:09 pm | कौस्तुभ फुले

आपली लेखमाला आणि डिस्कव्हरी वरिल अ‍ॅन्शन्ट अ‍ॅलिअन हि मलिका एकत्र पहत आहे . बरेच गोश्टि समजायला वेळ लागला आहे. पण समजेल!

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Aug 2013 - 9:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

वामनपंडित, राही, आदूबाळ, बॅटमॅन आणि कौस्तुभ फुले: तुमच्या या सहलितल्या सहभागाबद्दल अनेकानेक धन्यवाद !

@ आदूबाळ : या छंदावर गप्पा मारणे ही तर आनंदाची गोष्ट आहे. जरूर व्यनी करा.

अतुलनियगायत्रि's picture

31 Aug 2013 - 10:49 pm | अतुलनियगायत्रि

इतकी सुंदर लेखमाला इतक्या कमी वेळात लिहील्या बद्द्ल अनेक धन्यवाद.
राही शी सहमत. भारतीय उपखंडाच्या इतिहासा बद्द्ल वाचायला नक्की आवडेल.

अशोक पतिल's picture

31 Aug 2013 - 10:49 pm | अशोक पतिल

अतिशय सुरेख प्रवास वर्णन ! एक्का जी समारोपाचा परिच्छेद वाचताना हुरहुर वाटली .आपल्या या मालिकेचे एक छान छोटेखानी पुस्तक होउ शकते. खुप कष्ट घेवुन आपण हे लिखान केलेले आहे. खुप खुप धन्यवाद !

विनोद१८'s picture

31 Aug 2013 - 11:19 pm | विनोद१८

अतिशय अभ्यासपूर्ण अशी

'मानवी महाप्रवासाचा इतिहास'

ही लेखमाला...!! धन्यवाद 'इस्पीकचा एक्का' तुम्हाला.

अशाच एका दुसर्‍या लेखमालेच्या प्रति़क्षेत.

विनोद१८

अर्धवटराव's picture

1 Sep 2013 - 7:36 am | अर्धवटराव

एखाद्या लेखमालेने किती विवीध प्रकारे मानवी मनाचे, बुद्धीचे प्रबोधन करावे??? "असंख्य" असं उत्तर या लेखमालेच्या अनुषंगाने देता येईल... मानववंश शास्त्र, निसर्ग-हवामानाचा आलेख, विज्ञानाने विकसीत केलेल्या प्रणाल्या-पद्धती, ... पार इथपासुन ते कॉम्प्लेक्स शैक्षणीक विषय शिकवताना भाषा कशी असावी, वाचकांना नेमका काय प्रश्न पडलाय याचं योग्य आकलन करुन आपल्या बुद्धीचा बडेजाव न माजवता केवळ फॅक्ट्स आणि रेफरन्सचा आधार घेऊन चर्चा कशी करावी, व्यासंग कसा करावा... अशा सर्वच आघाड्यांवर अगदी हुकमी एक्का ठरावी अशी लेखमाला.

कल्पना करा...
आजपासुन काहि आजपासुन काहि शेकडा वर्षांनंतर मानवाने आसपासचे ग्रहगोल पादाक्रांत केले आहेत... पृथ्वीवरचे मानव मंगळावर ऑनसाईट गेलेत, आणि व्हाईसे-व्हर्सा... चंद्रावर मिपाचं सर्व्हर मेण्टेन केल्या जातय... एखादा बदाम एक्का मानवाने पृथ्वी पादाक्रांत केल्याची हि लेखमाला चाळतोय, आणि हिचं कंटिन्युएशन म्हणुन मानवाने अवकाश पादाक्रांत करण्यावर एक लेखमाला लिहीतोय :) लयच भारी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Sep 2013 - 4:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपल्या सुंदर प्रतिसादाबद्दल काय म्हणावे? तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांमुळेच कहीबाही खरडायला मजा येते. पुढेही असाच लोभ असू द्यावा.

अनुप ढेरे's picture

1 Sep 2013 - 8:23 am | अनुप ढेरे

लेखमाला खूप आवडली. धन्यवाद !

तिमा's picture

1 Sep 2013 - 11:01 am | तिमा

एका चांगल्या लेखमालेचा शेवट! दीर्घकाळ हे लेखन लक्षांत राहील. भारताच्या इ.स.पूर्व ज्ञात काळापासून विसाव्या शतकापर्यंत , याबाबतही एक लेखमाला लिहावी ही विनंती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Sep 2013 - 4:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

अतुलनियगायत्रि, अशोक पतिल, विनोद१८, अनुप ढेरे आणि तिमा : आप्ल्या सर्वांना अनेकनेक धन्यवाद !

हरिप्रिया_'s picture

1 Sep 2013 - 5:55 pm | हरिप्रिया_

अतिशय सुंदर झाली लेखमाला!!

शीतयुग, मानवाचा प्रवास, अधुन मधुन झालेली पीछेहाट सगळच अद्भुतरम्य होत.

ह्या सर्व माहितीच्या खजान्या बद्द्ल खुप खुप धन्यवाद!!!

कवितानागेश's picture

1 Sep 2013 - 5:57 pm | कवितानागेश

पूर्ण वाचला हा भाग एकदाचा. सारखी वाचायला घेत होते आणि त्या जिराफाच्या चित्रापाशी येउन तेच निरखत बसत होते. एकदाचा तो जिराफ मनसोक्त बघून झाला आणि मग सगळा भाग वाचला.
एवढ्यात संपली ही मालिका?? :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Sep 2013 - 10:21 am | डॉ सुहास म्हात्रे

हरिप्रिया_ आणि लीमाउजेट : अनेक धन्यवाद !

सौंदाळा's picture

4 Sep 2013 - 2:17 pm | सौंदाळा

माहीतीपुर्ण लेखमाला.
खरं तर मी पहिला भाग वाचला पण इंटरेस्ट आलाच नाही पन जेव्हा ५ वा भाग वाचला (माझा या लेखमालेतील सर्वात आवडता भाग) आणि आधीचे सगळे भाग वाचुन काढले आणि नंतर तर वाटच बघायला लागलो पुढच्या भागांची.
पुढची लेखमाला, प्रवासवर्णन किंवा इतर काहीही लवकर लिहा.
शुभेच्छा.

लई भारी लेखमला इस्पिक राव .

प्रत्येक भाग तेवढाच भारी , माहितीपूर्ण आणि त्याच वेळेस सोप्पा केलात .

आमचा शेल्युट :)

स्मिता.'s picture

4 Sep 2013 - 3:08 pm | स्मिता.

आवडीचा, कुतूहलाचा विषय आणि लिहिणारी व्यक्ती इस्पीकचा एक्का असल्याने ही लेखमाला सुरुवातीपासून वाचली. प्रतिसाद देत नसले तरी सगळे भाग आवर्जून वाचले.
संपूर्ण लेखमालेतली भाषा सोपी आणि रोचक तर आहेच पण सोबतच्या नकाशे-चित्रांनी आकलन आणखी सोपे झाले.
अश्याच रोचक विषयांवरच्या लेखमाला आपण लिहीत रहाव्या अशी आमची इच्छा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Sep 2013 - 6:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

सौंदाळा, राव साहेब आणि स्मिता. : आपणा सर्वांच्या सुंदर प्रतिक्रियांसाठी अनेकानेक धन्यवाद !

किलमाऊस्की's picture

5 Sep 2013 - 12:29 am | किलमाऊस्की

पण इतक्यात का संपवलीत? सगळेच भाग मस्त होते. किचकट विषय सोपा करून सांगितलात. मुख्य म्हणजे भाषा ही फार सोपी होती, चित्रं पण भारीच!

पुढील लेखमालिकेसाठी शुभेच्छा!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2013 - 11:05 am | डॉ सुहास म्हात्रे

लेखमाला महाप्रवासाबद्दल होती. प्रवास संपला तशी ही लेखमाला संपली.

एका जागी स्थिर झाल्यानंतर माणसाने "माझी / माझ्या जागेची महतीच कशी ग्रेट आहे" हे पटवण्यासाठी जागोजागी जे महाउपदव्याप केले (ज्याला आपण संस्कृती आणि साम्राज्य म्हणतो) त्या प्रत्येकाची कहाणी सांगायची म्हणजे प्रत्येकी एक स्वतंत्र लेखमाला होईल :)

.

बहुतेक मिपाकरांची हीच प्रतिक्रिया असेल!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2013 - 12:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

कसचं, कसचं... हे जरा जास्तच झालं...  सगळ्यांच्या सहभागानेच ही सहल मजेदार झालीय.

सुमीत भातखंडे's picture

29 Nov 2013 - 7:28 pm | सुमीत भातखंडे

आत्ता सगळी लेखमाला वाचून काढली. जबरदस्त प्रवास आणि तितकेच जबरदस्त लेखन.
तुमच्या लेखन कौशल्याला आपला सलाम..._/\_

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Nov 2013 - 9:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

आणि

एका बैठकीत सलग सगळे भाग वाचतांना एक वेगळाच आनंद मिळत होता.

वाचल्यानंतर जे समाधान मिळाले त्याला तोड नाही.

एकदम मस्त साधना झाली.

आता तर पुढच्या हिंदूस्थानवारीत पुणे कट्टा नक्कीच करू या...

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2014 - 12:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

कधी ते बोला फक्त... कट्टा होईलच !

मुक्त विहारि's picture

4 Nov 2014 - 12:41 pm | मुक्त विहारि

तेंव्हा करू या...

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Nov 2014 - 12:30 am | डॉ सुहास म्हात्रे

नक्की ! तारीख पक्की झाली की कळवा.

विवेकपटाईत's picture

4 Nov 2014 - 1:18 pm | विवेकपटाईत

लेख मला आवडली. भारतात तथाकथित आर्य मध्य आशियातून नाही आले, एवढे तरी कळले. हिस्टरी चनेल वर ही अश्याच प्रकारची मालिका पाहिल्याचे आठवते.