मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०३ : पूर्वतयारी - आपले मार्गदर्शक

डॉ सुहास म्हात्रे · · भटकंती
===================================================================== पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)... ===================================================================== ...पण त्याआधी आपण आपल्या प्रवासाच्या प्रमुख मार्गदर्शकांची ओळख करून घेऊया. ज्यांच्या भरवशावर प्रवास करायचा त्या वाटाड्यांच्या कर्तबगारीची आणि कामाच्या पद्धतीची माहिती मिळाल्याशिवाय आणि त्यांनी दिलेल्या माहितीची विश्वासार्हता पटल्याशिवाय आपल्याला सहलीची मजा नि:शंकपणे आणि पुरेपूर अनुभवता येणार नाही. मार्गदर्शक या अगोदर सांगितलेले पृथ्वीच्या हवामानातले बदल, त्यांत होणारी जीवनाची वाटचाल (अथवा फरफट) आणि आधुनिक मानवाच्या सहलीचा मार्ग शास्त्रीय पुराव्यासकट आपल्याला दाखवणार्‍या काही खास मार्गदर्शकांची ओळख करून घेऊया. कारण त्यामुळे आपल्याला आपला प्रवास खरंच योग्य आणि विश्वासू मार्गाने चालला आहे याची खात्री पटेल आणि मग आपल्याला सहलीची मजा नि:शंकपणे लुटता येईल. यातला प्रत्येक मार्गदर्शकावर अनेक दशके संशोधन झाले आहे आणि शेकडो पुस्तके लिहिली गेली आहेत. विस्तारभयास्तव येथे आपण त्यांची फक्त तोंडओळखच करून घेणार आहोत. आपल्या सहलीचे मुख्य मार्गदर्शक खालीलप्रमाणे आहेत १. प्राचीन हवामानामुळे बनलेल्या आणि आजवर शाबूत राहिलेल्या निर्जीव खाणाखूणा २. प्राचीन प्राण्यांचे आजवर शाबूत राहिलेले अवशेष किंवा त्या अवशेषांचे ठसे (जीवाश्म) ३. १ व २ क्रमांकांच्या मुद्द्यात मिळलेल्या सजीवांच्या अवशेषांचे अथवा निर्जीव खाणाखूणांचे विश्लेषण करण्याच्या पद्धती ४. प्राचीन प्राण्यांपासून (यात मानवही आला) आज अस्तित्वात असणार्‍या प्राण्यांपर्यंत संक्रमित झालेल्या जनुकांतील दुव्यांचे विश्लेषण करणारी जनुकशास्त्राची शाखा ५. वरील सगळ्या आणि इतर पुराव्यांची सांगड घालून विश्वासू शास्त्रीय निष्कर्षांपर्यंत पोहोचवणारे मानववंशशास्त्र (Anthropology) या सहलीचे आणखीही बरेच छोटेमोठे मार्गदर्शक आहेत. पण या लेखमालिकेच्या व्याप्तीत ते सगळे बसवणे शक्य नाही. तरीसुद्धा आपल्या सहलीतील अनाकलनियता शक्य तेवढी काढून टाकून आणि शक्य तेवढ्या संशयाचे निराकरण करण्यासाठी वरच्या मुख्य मार्गदर्शकांची पुरेशी तोंडओळख करून घेणे जरूर आहे. १. प्राचीन हवामानामुळे बनलेल्या आणि आजवर शाबूत राहिलेल्या खाणाखूणा समुद्रात व भूमागावर जमत जाणार्‍या थरांमध्ये प्राचीन काळात तयार झालेल्या आणि नष्ट झालेल्या त्याकालच्या अनेक खाणाखूणा शिल्लक राहतात. उदाहरणार्थ एकमेकावर जमलेले वाळूचे थर दबून बनलेले वालुकाश्म आणि त्यांच्यात अडकलेले त्या त्या वेळेस जिवंत असलेले जीव अथवा मेलेल्या जिवांचे सांगाडे. तसेच ज्वालामुखींच्या उद्रेकांच्या वेळेस उडालेली आणि नंतर वालूकाश्मात अथवा जमिनीच्या थरांत गाडली गेलेली राख आणि इतर द्रव्ये. हे पुरावे अनेक कारणांनी जमिनीखालून बाहेर उघड होतात... उदाहरणार्थ, नदीच्या प्रवाहाने झालेली जमिनीची झीज, हिमनद्यांच्या प्रवाहाने खरवडले जाणारे जमीनीचे प्राचीन थर, उत्खननात किंवा अपघाताने सापडलेले प्राचीन अवशेष, इत्यादी. हे सगळे पुरावे धृवीय प्रदेशांतल्या हजारो-लाखो वर्षे न वितळलेल्या बर्फातही सापडतात. ध्रुवीय बर्फाचे अनेक मीटर खोलपर्यंतचे नमुने (core samples) काढून त्यांची छाननी करण्याचे तंत्र फार विकसित झालेले आहे. या बर्फात अनेक दशलक्ष वर्षांपुर्वीचे पुरावे अगदी मूळ स्वरूपात बंद आहेत. हेच तत्व वापरून समुद्रतळाचेही नमुने मिळविले जातात. हे दोन्ही प्रकारचे नमुने--- त्यांच्यात प्राचीन काळची परिस्थिती न बदलता बंदिस्त असल्याने--- शास्त्रिय संशोधनात फार महत्वाचे आणि विश्वासू पुरावे ठरले आहेत. २. प्राचीन प्राण्यांचे आजवर शाबूत राहिलेले अवशेष किंवा त्या अवशेषांचे ठसे (जीवाश्म) ह्या मार्गदर्शकांची ओळख आपल्याला शाळेच्या पुस्तकात होते. परंतू हे शास्त्र आता इतके पुढे गेले आहे की १९९७ साली इथिओपियातील हेर्टो नावाच्या खेड्याजवळ सापडलेली एका लहान मुलाची कवटी काही शे चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या २०० तुकड्यांपासून पुनःनिर्मीत करण्यात आली. ती कवटी मानवी उत्क्रांतीच्या प्रवासाच्या संशोधनातला एक फार महत्वाचा पडाव ठरली आहे. या एकाच उदाहरणावरून या शात्राच्या वाढलेल्या आवक्याची पुरेशी कल्पना यावी ३. १ व २ क्रमांकांच्या मुद्द्यात मिळलेल्या सजीवांच्या अवशेषांचे अथवा निर्जीव खाणाखूणांचे विश्लेषण करण्याच्या पद्धती यात अनेक आधुनिक शास्त्रांचा उपयोग केला जातो. या पद्धती आता इतक्या प्रगत झाल्या आहेत की लाखो-करोडो वर्षे जुन्या नमुन्याचे पृथक्करण करून त्याचे रासायनीक, जीवरासायनीक व आण्वीक गुणधर्म व वय (नमुना किती वर्षे जुना आहे) हे ठरवता येते. या प्रकारच्या काही महत्वाच्या पद्धती खालीलप्रमाणे आहेतः अ) प्राचीन जैवीक पुराव्यातील DNA चे पृथ़क्करण: या पद्ध्तीने तर प्राचीन जैवीक इतिहासाबद्दलचे ज्ञान "केवळ अंदाज / थिअरी" वरून एकदम पुढे आणून "विश्वासू पुरव्यांवर आधारलेला इतिहास" या पाहिरीपर्यंत पोहोचवले आहे. याबबतीत माहिती येथे रोचक पद्धतीने दिलेली आहे. ब) रेडिओमेट्रीक डेटींग : प्राचीन पुराव्याचे वय ठरवण्यासाठी या शास्त्राची मदत होते. पृथ्वीवर नैसर्गीकपणे बरीच किर्णोसर्गी मूलद्रव्ये अतीसुक्ष्म प्रमाणात आहेत. किर्णोसर्गामुळे रेणूंच्या अनेक घटकांचे उत्सर्जन होते आणि त्यांचे एका मूलद्रव्यातून दुसर्‍या मूलद्रव्यात परिवर्तन होते. ह्या प्रक्रियेचा वेग मोजून तो रेणू ज्या अवशेषापासून पासून मिळवला होता त्याचे वय ठरवता येते. यासाठी Uranium-lead, Samarium-neodymium, Potassium-argon, Rubidium-strontium, Uranium-thorium आणि Radiocarbon dating अशा अनेक पद्धती विकसीत केलेल्या आहेत. कोणता पदार्थ तपासायचा आहे आणि तो कोणत्या काळातला असावा यावरून कुठली पद्धत जास्त योग्य ते ठरवले जाते. ४. प्राचीन प्राण्यांपासून (यात मानवही आला) आज अस्तित्वात असणार्‍या प्राण्यांपर्यंत संक्रमित झालेल्या जनुकांतील दुव्यांचे विश्लेषण करणारी जनुकशास्त्राची शाखा मानवाच्या इतिहासात मानवाच्या सहलीच्या मार्गांचे आणि वेळापत्रकाचे खणखणीत पुरावे जनुकशात्राने द्यायला सुरूवात केली आणि मानवाच्या इतिहासातील असंख्य रहस्ये विश्वसनिय पुराव्यांसह उघड झाली. मुख्य म्हणजे मानवी इतिहासातील असंख्य रुढीवादी आणि वंशवादाच्या खोट्या भाकडकथांवर रचलेली अनेक "तथाकथीत थियरींची" असत्ये जनुकशास्त्रीय पुराव्यांनी मोडीत काढली आहेत. अश्या या खास मार्गदर्शकाबद्दल थोडी सुगमशास्त्रीय माहिती घेतल्याने आपल्या बर्‍याच शंकांचे निराकरण होईल. माणसाच्या शरीरात एकूण ५,००० ते १०,००० कोटी पेशी असतात.  (चित्र जेनुग्राफिक प्रोजेक्टच्या सौजन्याने. Photo courtesy of The Genographic Project.) माणसात तांबड्या रक्तपेशीचा अपवाद वगळता या सर्व पेशीत पेशीकेंद्र (Nucleus) असते आणि प्रत्येक पेशीच्या पेशीकेंद्रात गुणसूत्रांच्या (chromosomes) एकूण २३ जोड्या असतात.  (चित्र जेनुग्राफिक प्रोजेक्टच्या सौजन्याने. Photo courtesy of The Genographic Project.) गुणसुत्रे एकाच लांबच लांब DNA च्या अणूंनी बनलेली असतात आणि त्यांचा आकार एखाद्या लांब शिडीला पीळ दिल्यावर कसे दिसेल तसा असतो.  (चित्र जेनुग्राफिक प्रोजेक्टच्या सौजन्याने. Photo courtesy of The Genographic Project.) गुणसूत्रांतील DNA च्या साखळ्यांध्ये माणसाच्या पेशींना काम करण्यास आवश्यक असणार्‍या प्रोतीन्सचे आणि इतर गुणधर्मांचे (कातडीचा रंग, डोळ्याचा रंग, इ.) आराखडे साठवणारे भाग असतात. त्यांना जनुके (gene) म्हणतात. माणसात २०,००० ते २५,००० जनुके असतात. हजारो-लाखो वर्षांच्या कालावधीवर होणार्‍या बदलांना तोंड देण्यासाठी एक नैसर्गीक प्रकारे घडणारी एक घटना कामी आहे. ही घटना होते आहे म्हणूनच अगदी एकपेशीय अमिबापासून ते माणसाच्या उत्पत्तीपर्यंत निसर्गाच्या कार्यात कोणताही बाह्य हस्तक्षेप न होऊनही पृथ्वीवरचे जीवन केवळ अबाधित राहिले एवढेच नव्हे तर अधिकाधिक प्रगत प्राण्यांत उत्क्रांत होत गेले आहे. ती नैसर्गिक घटना म्हणजे एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जाताना प्राणी आणि वनस्पतींच्या जनुकांत (DNA च्या रचनेत) कधीमधी होणारे छोटे छोटे बदल... याला शास्त्रीय भाषेत उत्परिवर्तन (mutation) म्हणतात. ही प्रक्रिया प्रजननासाठी बनविल्या जाणार्‍या पेशींच्या निर्मितीच्या वेळेस सहजपणे होते... तिचा आजूबाजूच्या वातावरणाशी काहीही प्रत्यक्ष संबद्ध नसतो. पण तिचा होणारा अप्रत्यक्ष परिणाम असा की; अश्याप्रकारच्या हजारो-लाखों घटनांमधल्या बहुतेक निरुपयोगी असतात तर काही शरीरीक दोषही निर्माण करतात; पण त्यातले एखादे उत्परिवर्तन नवीन पिढीमध्ये असा काही फरक घडवून आणते की त्यामुळे नविन पिढीला बदललेल्या परिस्थितीला तोंड देणे शक्य होते. त्यामुळे ती पिढी प्रतिकूल परिस्थितीत तगून राहते आणि योग्य परिस्थिती मिळाल्यावर वाढून वरचढ बनते. हे न घडलेल्या प्राण्यांच्या पिढ्या बदलास यशस्वी तोंड न देवू न शकल्याने नष्ट होतात. महत्त्वाची गोष्ट अशी की या प्रक्रियेत केवळ प्राण्याच्या शारीरिक ताकदीला महत्व नसून त्याचा बदललेल्या परिस्थितीचा सामना करण्याच्या सर्वांगीण पात्रतेला महत्व आहे. आणि हीच गोष्ट डार्वीनच्या थियरीचा गाभा आहे. आवांतरः याला अपवाद सुरू झाला Homo ergaster या प्रजातीपासून ज्यांच्यापासून पुढे नैसर्गिक पद्धतीने होणार्‍या या घटनेच्यावरच केवळ अवलंबून न राहता त्यात स्वतःच्या मेंदूच्या ताकदीची भर घालून साधने बनवायला आणि निसर्गाला सक्रिय तोंड द्यायला सुरुवात केली. पण ही मेंदूची शक्तिही Homo ergaster (आणि पुढच्या सगळ्या Homo ना) या नैसर्गीक घटनेद्वारेच मिळालेली आहे ! या उत्परिवर्तनांचा अजून एक उपयोग आपल्याला झाला आहे. अशी अनेक उत्परिवर्तने एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जात जात आता आस्तित्वात असणार्‍या पिढी पर्यंत पोहोचलेली आहे. यामुळे जर आपण जर आता आस्तित्वात असणार्‍या जागोजागच्या मानवांच्या जनुकांतली उत्परिवर्तने शोधून ती जगाच्या नकाश्यावर मांडली तर त्या उत्परिवर्तनांच्या प्रवासाचा मार्ग म्हणजेच मानवाच्या प्रवासाचा मार्ग रेखांकीत होईल. परंतू हे करण्यात एक फार मोठी समस्या होती. माणसाच्या गुणसूत्राच्या २३ जोड्यांतील दर जोडीतले एक मातेकडून तर दुसरे पित्याकडून मिळते हे आपण सर्व जाणतोच. या गुणसूत्रांचे प्रदान होण्याचा काही हजार पिढ्यांचा हिशेब मांडला तर मग या सर्व गुणसूत्रांची इतकी सरमिसळ होते की शेवटच्या पिढीची जनुके कोठून कोठे कशी आली हे ठरवणे केवळ अशक्यच वाटते नाही का? पण त्यावरही शात्रज्ञांना उपाय सापडला आहे. शात्रज्ञांनी जी शक्कल शोधून काढलीआहे, ती थोडक्यात अशी: अ) पेशीकेंद्र सोडून पेशीत अजून एका ठिकाणी, मायटोकाँड्रीया मध्ये, जनुके असतात त्यांना mtDNA म्हणतात. मातेच्या अंड्याचा पित्याच्या शुक्राणूच्या डोक्याबरोबर संयोग होवून अंडे फलीत होते आणि त्या फलीत पेशीतून माणसाची निर्मिती होते, हे आपल्याला माहित आहेच. शुक्राणूंमध्ये फक्त पित्याची गुणसुत्रे असतात, मायटोकाँड्रीया नसतात. याचा अर्थ असा की mtDNA केवळ मातेकडूनच मुलांकडे जातात आणि त्यांतील फक्त मुलीच ते mtDNA पिढी दरपिढी संक्रमीत करू शकतात. याचा अर्थ असा की जर mtDNA वरची उत्परिवर्तने आपण रेखांकीत केली तर मागे जात जात आज जिवंत असणार्‍या मानवांच्या मूळ आईपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि तसेच करून शात्रज्ञ आजच्या सर्व मानवांच्या २ लाख वर्षांपूर्वी आस्तित्वात असणार्‍या केवळ एकाच आईपर्यंत पोहोचले आहेत ! ब) मानवाच्या गुणसूत्राच्या २३ जोड्यांपैकी एक फार खास आहे, ती आहे लिंग ठरवणारी जोडी... यातील दोन गुणसूत्राना X आणि Y असे संबोधतात. पुरुषांमध्ये या जोडीत X आणि Y अशी गुणसूत्रे असतात तर स्त्रियांत X आणि X अशी असतात हे सर्वांना ठावूक आहेच. याचा अर्थ असा की Y गुणसूत्र पुरुषाकडून फक्त पुरूष मुलाकडे जाते... त्याची सरमिसळ होत नाही. त्यामुळे वरच्या सारखेच Y गुणसूत्रावरची उत्परिवर्तने रेखांकीत करत मागे जात जात आज जिवंत असणार्‍या मानवांच्या मूळ पित्यापर्यंत शास्त्रज्ञ पोचले आहेत.. क) स्टॅटिस्टीक्स वापरून या उत्परिवर्तनांचे कालमापन करून कोणते उत्परिवर्तन किती वर्षांपूर्वी झाले असावे हे ही ठरवता येते. त्यामूळे ते उत्परिवर्तन ज्याचात / जिच्यात झाले तो / ती माता / माता केव्हा आस्तित्वात होते हे ठरविले जाते. हे तंत्रज्ञान वापरून आतापर्यंतच्या पुराव्यांवरून आज जिवंत असणारे जगातील सर्व मानव उत्तरपूर्व आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीत २ लाख वर्षापुवी आस्तित्वात असणार्‍या एक पुरूष आणि एक स्त्री या जोडीपासूनच निर्माण झालेले आहेत. सद्या एकूण १,५०,००० च्या वर उत्परिवर्तने वापरून हे नकाशावर माडणे चालू आहे. जर कोणाला त्याच्या पुर्वजांनी आताच्या जागेपर्यंत येईपर्यंत कसकसा प्रवास केला हे जाणून घ्यायचे असले तर https://genographic.nationalgeographic.com/ या संस्थळावर संपर्क साधून एक किट मागवून घ्यावे. त्याच्या सहाय्याने स्वतःच्या तोंडातील काही पेशी पाठवल्यास या प्रोजेक्टतर्फे त्या पेशीतील जनुकांचे विश्लेशण करून ती माहिती तुम्हाला दिली जाते. याशिवाय मानवशास्त्राच्या एका फार महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये भाग घेतल्याचे समाधान तुम्हाला मिळेल ते अलाहिदा. ५. वरील सगळ्या आणि इतर सर्व पुराव्यांची सांगड घालून विश्वासू शास्त्रीय निष्कर्षांपर्यंत पोहोचवणारे मानववंशशास्त्र (Anthropology) माववंशशास्त्र हे आपण अगोदर ओळख करून घेतलेल्या सर्व आणि इतर काही पुरावे पुरवणार्‍या शास्त्रांची सांगड घालून त्यातून मानवाच्या भूतकाळाबद्दल एकसंध उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र आहे. त्यातली काही मह्त्वाची उपशास्त्रे खालील प्रमाणे आहेत. अ) जनुकीय मानवंशशात्र (Genetic anthropology): याची आपण वर ओळख करून घेतली आहेच. निर्विवाद पुरावे देण्याच्या याच्या क्षमतेने आजच्या घडीला या शात्राने मानववंशशास्त्रातील मानचे पान पटकावले आहे. ब) पुरातत्त्व मानववंशशास्त्र (Archaeological anthropology): प्राचीन मानवी अवशेषांचे पुरावे आणि जनुकीय पुरावे जर जुळून आले तर मग त्यापेक्षा अधिक विश्वसनीय काय असणार. शिवाय हे जुळणे हे दोन्ही शास्त्रे विश्वासार्ह मार्गावरून चालली आहेत याचा एक मोठा पुरावा असतो. क) भाषिक मानववंशशास्त्र (Linguistic anthropology): भाषेला मानवी जीवनात आणि संस्कृतीत किती महत्वाचे स्थान आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. प्रवास करताना मानव आपली भाषा बरोबर घेऊन गेला आणि जपत राहिला. त्यामुळे आदिभाषेपासून निर्माण होणार्‍या भाषा आणि त्यांची आधुनिक भाषांपर्यंत झालेली वाटचाल आपल्याला मानवाचा प्रवासाचा अभ्यास करण्यास मदत करतात. आजच्या जगातले ४५% लोक ज्या भाषा बोलतात त्यांना "इंडो-युरोपिअन भाषा" असे म्हणतात. हे का? याचे उत्तर आपल्याला आपल्या प्रवासात मिळेलच ! आपल्या मार्गदर्शकांचा इतका पूर्वपरिचय झाल्यावर आता त्यांच्या विश्वासार्हतेची खात्री पटायला हरकत नाही. त्यामुळे यापुढे प्रवासात जी काही आश्चर्यकारक माहिती मिळणार आहे तिची मजा नि:शंकपणे घेणेही सुकर होईल. तर कसा कंबर आणि पुढच्या भागापासून अनेक सहस्त्र किमी चा आणि २ लाख वर्षांच्या मुदतीचा प्रवास करायला तयार व्हा ! (क्रमशः ) ===================================================================== महत्वाचे दुवे १. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens २. https://genographic.nationalgeographic.com/ ३. http://www.smithsonianmag.com/ ४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration ५. http://www.bradshawfoundation.com/ ===================================================================== पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)... =====================================================================

वाचन 39522 प्रतिक्रिया 0