पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०५ : पहिली महाआपत्ती आणि दुसर्‍या सफरीची सुरुवात (११५,००० ते ७५,००० वर्षांपूर्वी)

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
23 Jul 2013 - 11:46 pm

=====================================================================

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...

=====================================================================

...असो. आतापर्यंत आपली शास्त्रीय पृष्ठभूमी बर्‍यापैकी मजबूत झाली आहे. पुढच्या भागापासून आपण आपले लक्ष केवळ पुढच्या प्रवासाची मजा घेण्यावर केंद्रित करू शकू.

आफ्रिकेतून सर्वात पहिला बाहेर पडणारा जथा १२०,००० वर्षांपूर्वी इथिओपियातून निघाला आणि नाईल नदीच्या काठाने उत्तरेकडे जात जात सिनाईमार्गे लेव्हांतमध्ये पोहोचला हे आपण मागच्या भागात पाहिले आहेच. बराच काळपर्यंत या जथ्यापासून सर्व युरोपियन आणि बहुतेक आशियाई लोकांची उत्पत्ती झाली असा समज होता. मात्र नंतर हाती आलेल्या पुराव्यांनी असे सिद्ध झाले की तो जथा लेव्हांतच्या पुढे जाऊ शकला नाही. एवढेच नाही तर साधारण ९०,००० वर्षांपूर्वीपर्यंत त्यातले सर्वजण नष्ट झाले. कारण त्या जथ्यातील मानवांच्या जनुकांचा पुढे कोठेच ठावठिकाणा लागत नाही. या सर्वनाशाची काही कारणे खालीलप्रमाणे असावीत:

१. ९०,००० वर्षांच्या आसपास हिमयुगाचा कहर झाला होता, त्याने पृथ्वीच्या वातावरणातले बरेच बाष्प शोषून घेतले होते. त्यामुळे केवळ लेव्हांतच नव्हे तर उत्तर आफ्रिकेचा परिसरही रखरखीत वाळवंट झाला होता. अश्या तऱ्हेने परतीचा मार्ग बंद होऊन लेव्हांतमध्येच अडकून पडलेले उष्णप्रदेशीय वर्षारण्याची सवय असलेले मानव हिमयुगाच्या थंडीचे आणि वाळवंटाचे बळी झाले.

२. थंडीच्या कडाक्यामुळे पूर्वीपासून युरेशियात प्रस्थापित झालेल्या नियांडरथालनाही दक्षिणेकडे स्थलांतर करावे लागले... यामुळे ते लेव्हांतमध्येही घुसले. थंडीला सरावलेल्या आणि संख्येने अधिक असणार्‍या नियांडरथाल आदिमानवांपुढे उष्ण हवामानाची सवय असलेल्या मोजक्या संख्येच्या आधुनिक मानवांचा निभाव लागला नाही.

कारणे कोणती का असेनात, मात्र मानवाच्या आफ्रिकेबाहेरच्या पहिल्या सफरीचा दुर्दैवी अंत होऊन त्या जथ्याचा सर्वनाश झाला हे नक्की. कारण ९०,००० वर्षांपूर्वींनंतर ४५,००० वर्षांच्या कालावधीत लेव्हांत अथवा युरोपमध्ये आधुनिक मानवाच्या काहीच खाणाखुणा मिळत नाहीत. त्यानंतर एकदम ४५,००० वर्षांपूर्वी तेथे 'क्रो मॅग्नन' मानव अवतीर्ण झाल्यावरच आधुनिक मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे परत सुरू झाले. या नविन मानवाने मात्र नियांडरथालवर मात करून हळू हळू सर्व युरोप पादाक्रांत केला. तो कोठून आणि कसा आला त्याबाबत आपण नंतर त्या कालखंडात जाऊ तेव्हा विस्ताराने बघू.

तर मग, ९०,००० वर्षांपूर्वी निसर्गाच्या एका फटक्याने मानवाची कथा मूळपदावर आली आणि त्याचे परत अस्तित्व फक्त आफ्रिकेतच शिल्लक राहिले...

लेव्हांतमध्ये हे निसर्गाचे भयानक नाट्य संपत आले होते त्याच सुमारास उत्तर आफ्रिकेत तयार झालेल्या वाळवंटामुळे वेगळे पडलेल्या दक्षिणेकडील मानवांना त्याच हवामानाच्या बदलाने आफ्रिका सोडण्याची अजून एक संधी उपलब्ध करून दिली. रक्तसमुद्राचे (Red Sea) दक्षिण टोक फक्त २५ किमी रुंद आणि १३७ मीटर खोल आहे. तेथील असंख्य खडकांमुळे या भागाचे नाव बाब अल मंदाब (Gates of Grief उर्फ दु:खाचा दरवाजा) असे पडले आहे.

हिमयुगाच्या वाढणार्‍या कडाक्याने ध्रुवीय प्रदेशांत खूपसे पाणी बर्फरूपात अडकून राहू लागल्याने अगोदरच कमी असलेली बाब अल मंदाबची रुंदी आणि खोली अजूनच कमी कमी होत चालली होती. त्यातच त्या बदललेल्या हवामानाने वाळवंटी उत्तर आफ्रिकेला जवळ असलेल्या इथिओपियामध्येही अन्नाची कमतरता भासू लागली होती. मात्र रक्तसमुद्राच्या दुसर्‍या किनार्‍यावरील येमेनमध्ये अजूनही थंड आणि पाणथळ जागा शाबूत होत्या. या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे इथिओपियातील मानवांना उथळ समुद्र पार करून पलिकडे जाणे भाग पडले.

अशा तर्‍हेने मानव ८५,००० वर्षांपूवी आफ्रिकेतून दुसर्‍यांदा बाहेर पडून मध्यपूर्वेच्या दक्षिण समुद्रकिनार्‍यावर पोहोचला...

आफ्रिकेतल्या जंगलातील आणि गवताळ प्रदेशातील प्राणी आणि वनस्पतींना खायला सरावलेल्या मानवांना हवामानात होणार्‍या फरकाने विरळ होत जाणार्‍या जंगलातून समुद्रकिनार्‍यांवर येणे आणि खाण्याच्या सवयी बदलणे भाग पाडले होते.

१२५,००० वर्षापूर्वीपासून मानवांना समुद्रातून मिळणार्‍या अन्नाची चांगली सवय झाली होती याचे पुरावे समुद्राच्या किनार्‍यावर सापडलेल्या शिंपल्यांच्या अवशेषांवरून आणि ते काढण्यासाठी दगडापासून बनवलेल्या साधनांवरून दिसते. याच सुमारास आधुनिक मानवाच्या मेंदूची वाढ जोराने सुरू झाली. यात या नवीन प्रकारच्या आणि भरपूर मिळणार्‍या अन्नाचा सहभाग होता. कारण जमिनीवरच्या प्राण्यांची शिकार करणे हे श्रमाचे आणि जोखमीचे काम होते. त्यापेक्षा मासेमारी करून अथवा शिंपल्यापासून अन्न मिळवणे खचितच सोपे आणि कमी धोकादायक काम होते. बाब अल मंदाब पार केल्यावर तर एका ठिकाणचे अन्न कमी होत असे तेव्हा किनारपट्टीवरून अजून थोडे पुढे जाऊन वस्ती करणे, तेथील अन्न कमी झाले की नंतर तिथून थोडे पुढे जाणे अशी मजल दरमजल वाटचाल चालू झाली होती... या जीवनपद्धतीला "बीच कोंबिंग" असे म्हणतात.

या सफरीच्या वेळेस मात्र सराव झालेले हवामान आणि अन्नाची चांगली सोय यामुळे मानव बहुतांश समुद्रकाठ पकडूनच पुढे जात राहिले. बाब अल मंदाब पार करून मानव अरेबियाचा दक्षिण किनारा, भारताचा प्रथम पश्चिम किनारा मग पूर्व किनारा, तेथून ब्रह्मदेशाचा किनारा असे जात पुढे सुमात्रा, जावा आणि शेवटी परत किनारपट्टीने वर वळून बोर्निओमार्गे साधारण १०,००० वर्षांनंतर चीनच्या दक्षिण किनार्‍यापर्यंत पोहोचला.

हा मार्ग पाहताना हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्या काळाच्या समुद्रातल्या कमी पाण्यामुळे आजचे आणि त्या काळाचे समुद्रकिनारे यांत खूप फरक होता. आजच्या घडीला ते समुद्रकिनारे १०० ते १३० मीटर खोल पाण्यात बुडालेले आहेत. आजच्या इंडोनेशिआतील बरीच बेटे त्या काळी एकमेकांना जोडलेले (सलग) भूभाग होते. त्यामुळे ही बर्‍याच लाब अंतराची सफर काहिश्या सोयीस्कर भौगोलीक परिस्थितीत झाली असे म्हणायला हरकत नाही.

या मानवांनी बरोबर आणलेल्या मायटोकाँड्रियल DNA च्या अनेक उत्परिवर्तनांपैकी L3 नावाचे एकच उत्परिवर्तनच आज मानवांत शिल्लक आहे. त्यामुळे त्याला Out-of-Africa Eve line असे म्हणतात आणि ते उत्परिवर्तन ज्या स्त्रीकडून मानवाला मिळाले त्या सैधांतिक स्त्रीला (ही इव्ह म्हणजे सापडलेला सांगाडा अथवा जीवाश्म नाही तर जनुकशास्त्रिय सिद्धांत आहे) आफ्रिकेबाहेरच्या सर्व मानवजातीची (आशियन, ऑस्ट्रेलियन, युरोपियन आणि मूल अमेरिकन यांची) जननी समजले जाते.

हे सर्व मानव एकाच काळात आफ्रिकेतून बाहेर पडले की बर्‍याच कालावधीत एका मागोमाग एक अश्या अनेक जथ्यांनी बाहेर पडले याबाबत शास्त्रज्ञांचे एकमत होत नव्हते. प्रथम "एकच जथा" थियरीला बहुमत होते पण नक्की उत्तर कोणालाच माहित नव्हते. जनुकीय शास्त्राने या कोड्याचे निर्विवाद उत्तर दिले. १९२३ साली एका ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञाला एका ऑस्ट्रेलियन मूलनिवासीने भेट दिलेल्या केसांतील जिनोम सन २०११ मध्ये वेगळा केला गेला आणि तो आशिया, आफ्रिका आणि युरोपमध्ये राहणार्‍या मानवांच्या जिनोमबरोबर पडताळून पाहण्यात आला. त्या जिनोमचे आफ्रिकन माणसाच्या जिनोमशी सर्वात जास्त साम्य होते. याचा अर्थ असा की ऑस्ट्रेलियात गेलेले तेथील मूलनिवासींचे पूर्वज पहिल्या जथ्यांमधले होते आणि नंतर एका मागोमाग एक बाहेर पडलेल्या अनेक जथ्यांतील मानव आशिया व युरोपमध्ये पसरले.

ऑगस्ट २०१२ मध्ये "बीच कोंबिंग लाइफस्टाइल" थियरीला एक हलकासा सुखद धक्का बसला. त्या महिन्यात शास्त्रज्ञांना लाओसच्या उत्तर भागातील एका चुनखडीच्या गुहेत आधुनिक मानवी कवटीचे तुकडे सापडले. त्यांचे वय ६३,००० ते ४६,००० वर्षांच्या मध्ये कोठेतरी असल्याचे ठरवले गेले. म्हणजे एकंदरीत हे दुसर्‍या सफरीतले प्रवासी अगदीच भित्रे नव्हते म्हणायचे ! कारण समुद्रकिनारा सोडून शेकडो किलोमीटर आत जात त्यांनी लाओस, चीन, व्हिएतनाम आणि थायलंडमधील डोंगर पालथे घातले होते असे दिसते !

(क्रमशः )

=====================================================================

महत्त्वाचे दुवे

१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/

=====================================================================

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...

=====================================================================

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

24 Jul 2013 - 1:46 am | राघवेंद्र

छान चालु आहे प्रवास, सोप्या भाषेत तुम्हि भरपुर शिकवून जात आहात.
पु. भा. शु.

प्रचेतस's picture

24 Jul 2013 - 9:04 am | प्रचेतस

अतिशय सुरेख सफर.
धन्यवाद ह्या जबरदस्त मालिकेसाठी.

मन१'s picture

24 Jul 2013 - 9:07 am | मन१

म्हणणजे इतक्या सार्‍या उचापतींनंतर, अपघात आणि प्रलयांनंतर माणूस इथवर पोचला म्हणायचं.
मालिका उत्तम सुरु आहे. वाचनखुणेत टाकतो आहे. तिसरीमध्ये आम्हाला "माणसाची गोष्ट" ह्याच नावाचा विषय होता. त्यातच पहिल्यांदा ह्या गोष्टींची ओळख झाली होती. त्या सर्वांची आता आठवण झाली.

अनुप ढेरे's picture

24 Jul 2013 - 11:07 am | अनुप ढेरे

मस्त लेखमाला...

हरिप्रिया_'s picture

24 Jul 2013 - 12:40 pm | हरिप्रिया_

छान सुरु आहे आपली सफर.
मज्जा येत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jul 2013 - 1:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

राघव८२, वल्ली, मन१, अनुप ढेरे आणि हरिप्रिया_ : आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

अतिशय जबरी.....एकदम मजा येतेय वाचायला!!!! दिलेले दुवेही आता सवडीने उघडून बघेन, बहुत धन्यवाद एक्कासाहेब!

जयंत कुलकर्णी's picture

24 Jul 2013 - 2:26 pm | जयंत कुलकर्णी

व्वा ! सुरेख !

कवितानागेश's picture

24 Jul 2013 - 7:17 pm | कवितानागेश

मजा येतेय वाचायला... :)

शिल्पा ब's picture

24 Jul 2013 - 7:20 pm | शिल्पा ब

माझ्या ७ वर्षीय लेकीला नियांड्राथॉल भयंकर आवडले. त्याच्या डॉक्युमेंटर्‍या बघायला आवडतात.
असो. हा लेख पण छानंच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jul 2013 - 9:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन, जयंत कुलकर्णी, लीमाउजेट आणि शिल्पा ब: सहलितील सहभागासाठी धन्यवाद !

अर्धवटराव's picture

24 Jul 2013 - 10:25 pm | अर्धवटराव

हा विषय किती रंजक पद्धतीने समजाऊन सांगता येतो याचं चपखल उदाहरण.
जय हो एक्काभाय.

अर्धवटराव

मोदक's picture

24 Jul 2013 - 11:05 pm | मोदक

सहमत!!!!

एक्काजी - सगळीकडे प्रतिसाद देत नसलो तरी सर्व लेख वाचतो आहे याची नोंद घ्यावी! :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jul 2013 - 10:22 am | डॉ सुहास म्हात्रे

अर्धवटराव आणि मोदक : आपल्या दोघांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

पैसा's picture

6 Aug 2013 - 6:48 pm | पैसा

मस्त! थरारक प्रवास!

आनंदी गोपाळ's picture

14 Aug 2013 - 12:09 pm | आनंदी गोपाळ

आवडली.
*
एक लिहिण्यातली गडबड वाटली ती दुरुस्त करता येईल का?
>>
१२५,००० हजार वर्षापूर्वीपासून
<<
हा असा उल्लेख या व आधीच्याही लेखांत आलेला आहे, एक लाख २५ हजार हजार वर्ष असे ते वाचावे लागते आहे, जेव्हा सव्वा लाख हाच आकडा अभिप्रेत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Aug 2013 - 5:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनेक धन्यवाद ! मुद्राराक्षसाची डुलकी काढून टाकली आहे !