पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०९ : तिसरी महाआपत्ती आणि वांशिक विलगन (२२,००० ते १९,००० वर्षांपूर्वीपर्यंत)

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
19 Aug 2013 - 1:12 am

=====================================================================

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...

=====================================================================

...दुसरा मार्ग पहिल्याच्या उत्तरेकडून आणि पूर्णपणे जमिनीवरून अथवा बर्फावरून प्रथम सरळ पश्चिमेकडे गेला आणि नंतर खाली वळून १९,००० ते १६,००० वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर पेन्सिल्वानिया आणि दक्षिण कॅरोलायना येथे पोहोचला.

तिसरी महाआपत्ती

इतक्या मोठ्या प्रवासात सगळे काही सुरळीत होईल अशी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही आणि जेवढा प्रवास मोठा तेवढे प्रचंड उलथापालथ घडविणारे प्रसंगही येणारच हे पण अपेक्षित आहेच. मात्र अश्या महाआपत्ती मानववंशावर दर वेळेस काही खास फार दूरगामी परिणाम करून जात होत्या. अश्याच एका महाआपत्तिची सुरुवात २२,००० वर्षांपूर्वी झाली आणि अर्थातच तिच्यात नेहमीप्रमाणेच हवामानाने मुख्य खलनायकाची भूमिका बजावली.

२२,००० वर्षांपूर्वी आतापर्यंतच्या शेवटच्या हिमयुगाचा शेवटचा अतिथंड कालखंड ((Last Glacial Maximum) सुरू झाला. जसजसा थंडीचा कडाका वाढू लागला, तसतसे जमिनीचे स्वरूपही बदलू लागले. उत्तरेकडची अतिथंड प्रदेशाची रेखा खाली सरकत ५५ अंश अक्षांशापर्यंत खाली आली (सद्याच्या काळात ही रेखा, जिला आर्क्टिक वर्तूळ म्हणतात, ६६ अंश अक्षांशावर आहे). तिच्या उत्तरेकडील सर्व जमीन बर्फाच्या जाड थराने झाकून गेली आणि तेथे आर्क्टिक (बर्फाळ) वाळवंट झाले. अर्थातच तेथील बहुतेक सर्व वनस्पती आणि प्राणी जीवन उद्ध्वस्त झाले. हाच प्रकार सर्व उंच पर्वतराजी असलेल्या (हिमालय, आल्प्स आणि पायरेनेस) प्रदेशांत होऊन तेथील अतीथंड भूभाग विस्तारले. ज्यांना थोड्यांना जमले ते मानव दक्षिणेकडे सरकत राहिले. पण निसर्गाच्या तडाख्यात सापडलेल्या या अतीथंड भागांतील मानवासकट बहुतेक सर्व जीवन नष्ट झाले. प्रतिकूल परिस्थितीत अडकलेल्या या मानवांतील काही छोटे मानवसमूह काही मोजक्या ठिकाणी (मुख्यतः ५५ अंश अक्षांशाच्या जवळपास) त्याच्या मेंदूच्या ताकदीवर थंडीपासून संरक्षण करत आणि मिळेल त्या अन्नावर गुजराण करत तगून राहिले... हे उत्तरेकडचे निर्वासित मानव (refugees) जेथे तगून राहिले त्या ठिकाणांना glacial refuges असे म्हणतात. या प्रत्येक रिफुज मधल्या मानवांचा संबद्ध इतर रेफुजेसमधल्या मानवांपासून पूर्णपणे तुटला होता.

हवामानाच्या प्रभावामुळे बर्फाळ प्रदेशात बनलेली जी रेफुजेस (refuges) खूप संकुचित आणि स्पष्ट सीमा असणारी होती, ती खालच्या नकाश्यात तांबड्या ठिपक्यांनी दर्शविली आहेत...

Refuses (२२-१९)

युरोपातील refuges खालीलप्रमाणे होती...

१. पायरेनीज पर्वताच्या दोन्ही बाजूस असलेला आताच्या स्पेनमधील बास्क विभाग: आजही बास्क लोक जनुके, भाषा आणि संस्कृतीने आजूबाजूच्या लोकांपेक्षा वेगळे आहेत. स्पेनपासून वेगळे होण्यासाठी चाललेल्या त्यांच्या चळवळीने ते मधून मधून बातम्यात असतात. तेथील प्राचीन टोकदार दगडी हत्यारे (Solutrean) दक्षिण रिफुजेसमधील मानवांच्या हत्यारांपेक्षा (Epi-Gravettian) खूप वेगळी होती. ही कारागिरी त्यांना बहुतेक उत्तरपश्चिम युरोपातून हवामानाच्या फरकाबरोबर दक्षिणेकडे सरकलेल्या मानवांपासून मिळालेली होती.

२. आताच्या इटलीमध्ये अनेक छोट्या पण एकमेकाशी संबद्ध असलेल्या टोळ्यांच्या स्वरूपात.

३. आताच्या युक्रेनमध्ये काळ्या समुद्राच्या व कार्प्याथियन पर्वताच्या उत्तरेस आणि Dnepr व Don या नद्यांच्या काठावरच्या प्रदेशात.

४. कार्प्याथियन पर्वताच्या दक्षिणेस असलेला आताच्या स्लोवाकियातला एक छोटा भाग.

५. मोल्डावियातल्या Dnestr नदीच्या खोर्‍याचा भाग.

हवामानाचा प्रभाव उत्तरेकडच्या भागात खूप प्रखर असला तरी तो त्या भागापुरताच मर्यादित नव्हता. धृवप्रदेशात अडकलेल्या पाण्यामुळे कमी झालेल्या पावसामुळे बहुतेक सर्व पृथ्वीच्या जीवनावर परिणाम झाला. दाट वर्षारण्ये असलेल्या भागांच्या ठिकाणी जेथे थोडाबहुत पाऊस टिकून होता तेथे झुडुपे असलेले गवताळ प्रदेश निर्माण झाले आणि जेथे पावसाचे मोठा अभाव झाला तेथे रखरखीत उष्ण वाळवंटे निर्माण झाली.

आफ्रिकेचा उत्तर भाग उष्ण ओसाड वाळवंट झाले; पश्चिम किनार्‍यावरिल विषुववृत्तावरचा थोडासा भाग पुरेश्या पावसामुळे वर्षारण्य टिकवून होता; आणि उर्वरित सर्व आफ्रिकेचे फार तर खुरटी झुडुपे असलेल्या गवताळ (कालाहारी) प्रदेशात रूपांतर झाले. या खुरट्या झुडूपे असलेल्या गवताळ भागांत एकमेकापासून संबद्ध तुटलेल्या मानवी वस्त्या (scrubby refuges) तयार झाल्या. पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतल्या मानवांचा संबंध तर सहारा वाळवंटाच्या प्रसरणाने पूर्णपणे तुटला.

५५ अंश अक्षांशाच्या दक्षिणेकडच्या इतर सर्व आशियाचे गवताळ जमिनीत रूपांतर झाले. फक्त दक्षिणपूर्व आशिया आणि चीनच्या दक्षिण भागातील वर्षारण्ये पावसामुळे टिकून राहिली. संपूर्ण भारतातील अरण्ये नष्ट होऊन तेथेही गवताळ प्रदेश झाला. या सर्व गवताळ प्रदेशांत जागोजागी एकमेकापासून संबद्ध तुटलले मानवांचे गट (scrubby refuges) निर्माण झाले.

हिमयुगाच्या प्रभावाने खाली गेलेल्या समुद्राच्या पाण्याच्या पातळीमुळे दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियातील समुद्रकिनार्‍यांवर मोठमोठे नवीन भूभाग उघडे झाले. अर्थातच थंडीपासून दूर पळणारे मानव तेथे पसरले. थंडीच्या कडाक्यापासून बचाव करत मध्य आशियातील काही मानव पुर्वीच्याच चार महानद्यांच्या काठावरच्या मार्गांनी पण आता उलट दिशेने दक्षिणेकडे परत फिरले. पण यातले फार थोडेच हा प्रवास यशस्वीपणे करू शकले. कारण जनुकीय पुरावा सांगतो की दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियातील बहुतेक सर्व मानव या निसर्गाच्या प्रकोपातून उरलेल्या मूळ स्थानिक लोकांपासूनच आलेले आहेत.

ऑस्ट्रेलियातील सर्व अरण्ये नष्ट झाली आणि त्यांचे वाळवंट किंवा फार तर गवताळ प्रदेशात रूपांतर झाले. तेथील उरलेल्या मानवी जथ्यांचा संबद्ध एकमेकापासून तुटला.

अमेरिका खंडाला हवामानाचा मोठा फटका बसला. तेथील सर्व जंगले नष्ट झाली आणि रखरखीत उष्ण अथवा बर्फाळ थंड वाळवंटे निर्माण झाली. मात्र आश्चर्यकारकरीत्या ५५ अंश अक्षांशाच्या उत्तरेस असलेल्या बेरिंगियामध्ये दोन glacial refuges तगून राहू शकली ! मात्र त्यांच्या दक्षिणेकडे अमेरिकेच्या पूर्वकिनार्‍यावरील थोडेसे मानव सोडता इतर सर्वजण नष्ट झाले.

वांशिक विलगन

हवामानाच्या या सगळ्या उलथापालथी काही शतके चालू होत्या. काही ठिकाणी हे परिणाम प्रखर आणि फार कमी वेळेत तर काही ठिकाणी हळू हळू झाले. बहुतेक वनस्पती, प्राणी आणि मानव नष्ट होत राहिले. ज्यांना जमले ते जीव दक्षिणेकडे स्थलांतर करत राहिले. या शिल्लक उरलेल्या (उत्तरेकडच्या स्थलांतरित आणि अगोदरच दक्षिणेत वसलेल्या) जीवांत तगून राहण्यासाठी अर्थातच जीवनमरणाची स्पर्धा झाली असणार... यात प्राणी-मानवात ही स्पर्धा जितकी झाली असणार तेवढीच किंवा त्यापेक्षा काकणभर जास्तच स्पर्धा सुपीक मेंदू असणार्‍या मानव-मानवांत झाली असणार.

या सगळ्याची परिणती जीवांची संख्या कमी होण्यात झाली... यात जैविक प्रजाती कमी होण्याबरोबर शिल्लक उरलेल्या प्रत्येक प्रजातितील सदस्यांची संख्या चिंताजनक म्हणावे इतकी कमी होण्यात झाली. उरलेले मुठभर मानवी समूह केवळ छोट्या संखेचे झाले इतकेच नाही तर एकमेकापासून मोठ्या भौगोलिक अंतराने पूर्णपणे विभागले गेले... ते अगदी काही हजार वर्षांनी हवामान सुधारेपर्यंत. अर्थातच या प्रत्येक छोट्या समुहातली जनुकीय उत्परिवर्तने स्वतंत्रपणे होत गेली आणि त्यांचे बाह्यरूप एकमेकापासून वेगळे करत राहिली.

आफ्रिकेतून बाहेर पडलेला मानव पूर्वी हळू हळू पुढे सरकत असताना एक प्रकारची मानवी साखळी बनत गेली होती. मागे स्थायिक झालेल्या आणि पुढे गेलेल्या मानवांचा संपर्क पूर्णपणे तुटत नव्हता... किंबहुना एकमेकाचे नातेवाईक असल्याने त्यांची देवाण घेवाण चालूच असणार. त्याचबरोबर आफ्रिकेतून एकामागोमाग एक बाहेर पडणार्‍या जथ्यांच्या पुढे जाण्याबरोबर ही सरमिसळ अधिकच होत गेली असणार. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे शेजारच्या मानवा-मानवात एकदम वेगळे बाह्यरूप दिसण्याइतपत बदल न दिसता असा बदल फार मोठ्या अंतरावर असलेल्या आणि फार मोठा काळ संबद्ध नसलेल्या मानवांमध्येच होत होता. या पद्धतीला प्रथम धक्का दिला तो तोबा ज्वालामुखीच्या उद्रेकाने... त्याने मानवजमातिची पौरात्य आणि पाश्चिमात्य अशी खूप वेगळे बाह्यरूप असलेल्या मानवांत विभागणी केली.

शेवटच्या हिमयुगाच्या तडाख्याने तर मानवी स्थलांतराची पद्धतीच पूर्णपणे बदलून टाकली. जनुकशास्त्रिय पुरावे असे सांगतात की या हिमयुगाच्या तडाख्याने वेगळे झालेले मानवी समूह हवामान सुधारू लागल्यानंतरही फार दूर जाण्याचे टाळत आपापल्या खंडांत फक्त आजूबाजूलाच विस्तारले आणि त्यांनी आपल्या वेगवेगळ्या संस्कृती निर्माण केल्या. अगदी ५०० वर्षांपूर्वीपर्यंत त्यांनी आपल्या भूभागात येऊ पाहणार्‍या नवख्या लोकांचा यशस्वी सामना केला... किमान इतपत की त्यामुळे स्थानीक जमातींत जनुकीय आणि बाह्यरुपात फार सरमिसळ होऊ दिली नाही. म्हणजे अगदी आधुनिक वसाहतवादाचा उदय होईपर्यंत एका खंडाचे/उपखंडाचे लोक मोठ्या संख्येने दुसर्‍या खंडात/उपखंडात स्थलांतरित होऊ शकले नाहीत. अशा तर्‍हेने स्वतंत्रपणे होणार्‍या जनुकीय उत्परिवर्तनांमुळे व स्वतंत्र सामाजिक विकासामुळे प्रत्येक मानवी समूहाचे बाह्य (शारीरिक), भाषिक आणि सांस्कृतिक वेगळेपण वाढत जाऊन आज अस्तित्वात असणारे वेगवेगळे मानव वंश निर्माण झाले. मात्र हे जनुकीय फरक स्वतंत्र जीनस/स्पेसीज (genus/species) तयार होण्याच्या जवळपासही पोहोचत नाहीत. त्यामुळे देश, भाषा, वंश, रंग, चेहेरपट्टी, अंगकाठी, इ. वरवरची आवरणे जरी वेगवेगळी "दिसत" असली तरी थोडीशी कातडी खरवडली की आपण सगळेच आफ्रिकेतून बाहेर पडून निसर्गाच्या कुंभमेळ्यांत एकमेकापासून दुरावलेले Homo sapien sapien भाऊबंदच आहोत !

गंमत अशी की "थोडीशी कातडी खरवडणे" हा एक वाक्प्रचार असला तरी जनुकशास्त्रिय तपासणीसाठी हीच सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे !!!

(क्रमशः )
.

माहितीची सलगता कायम ठेवण्यासाठी हा भाग जरा लहान ठेवला आहे. मानवाच्या सफरीचा पुढचा महत्वाचा अध्याय दोन भागात विभागला जाऊ नये याकरिता हे आवश्यक होते.

=====================================================================

महत्त्वाचे दुवे

१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/

=====================================================================

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...

=====================================================================

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

19 Aug 2013 - 4:15 am | अर्धवटराव

एक शंका :)

उत्तरेकडे एव्हढा हाहाकार माजला असताना माणसाने वेळीच स्थलांतर का नाहि केलं? अतिथंड कालखंड जाणावण्या इतपत तीव्र होत असताना मानवाने आपला तंबु फार अगोदर हलवायला हव होता ना... कि त्या काळी माणासाला कुठल्या दिशेला प्रस्थान करायचे हेच कळले नाहि?

स्थलांतरीत मानवाने स्थानीक मानवासोबत भिडण्यालायक मानवसंख्या त्या काळी होती का?? दहा-पंधरा लाख लोकांनी स्थलांतर केलं तरी त्यांचा स्थानीकांशी संबंध येण्याचे चान्सेस कमि असावेत... अवाढव्य इक्वेटर वर एव्हढी मानव संख्या म्हणजे किस झाड कि पत्ती...

अर्धवटराव

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Aug 2013 - 3:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

या भागातल्या कालखंडाच्या आधीपर्यंत मानव केवळ छोट्या छोट्या भटक्या टोळ्यांमधेच फिरत होता आणि हवामान व अन्न ही दोन मह्त्वाची कारणे त्याला जिकडे नेतील तेथे प्रतिक्रियेच्या (reactionary behaviour) स्वरुपात जात होता. विचारपूर्वक आखलेला मार्ग चोखाळत नव्हता. त्यामुळे हवामानाचा अगोदर अंदाज बांधून त्याप्रमाणे स्थलांतर असा काही प्रकार झाला नाही असेच दिसते. त्यामुळे स्थलांतरातही हवामान आणि प्रवासाच्या धोक्यांमुळे बरीच प्राणहानी होऊन केवळ मोजकेच लोक दक्षिणेला पोहोचू शकले असावेत अन्यथा त्यांची जनुके आजच्या पिढ्यांत जास्त प्रमाणात सापडली असती.

त्याकाळची सर्व मानव जमातीची लोकसंख्या काही लाखातच असावी आणि या आपत्तीने ती काही हजारांपर्यंत खाली आली होती. हवामान सुधारल्यावर ती वाढू लागली... पण प्रत्येक टोळीतील मोजकेच मानव जिवंत राहिल्याने व शिवाय हजारो वर्षे इतर टोळ्यांच्या संपर्काशिवाय राहिल्याने त्यांची संतत्ती एकसारखी पण इतर रेफुजेसमधल्या टोळ्यांपेक्षा वेगळी दिसायला लागली.

शिल्पा ब's picture

19 Aug 2013 - 4:21 am | शिल्पा ब

✴✴✴✴✴ mast

सुनील's picture

19 Aug 2013 - 8:38 am | सुनील

शेवटच्या हिमयुगाच्या तडाख्याने तर मानवी स्थलांतराची पद्धतीच पूर्णपणे बदलून टाकली. जनुकशास्त्रिय पुरावे असे सांगतात की या हिमयुगाच्या तडाख्याने वेगळे झालेले मानवी समूह हवामान सुधारू लागल्यानंतरही फार दूर जाण्याचे टाळत आपापल्या खंडांत फक्त आजूबाजूलाच विस्तारले आणि त्यांनी आपल्या वेगवेगळ्या संस्कृती निर्माण केल्या

ही राष्ट्र आणि राष्ट्रीयत्व ह्या आजच्या संकल्पनांची प्राथमिक अवस्था म्हणावी काय?

लेखमाला सुरेख चालू आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Aug 2013 - 3:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

बहुतेक होय. हजारो वर्षे एकाच भूभागाला जखडून राहिल्याने त्याच्या स्वामित्वाची भावना झाली असावी. मात्र माझी जमीन, माझा देश वगैरे भावना नंतर जमिनीचा उपयोग शेतीसाठी सुरू झाल्यावर तिच्यातून मिळणारे फायदे कायम ठेवण्यासाठी आल्या असाव्यात. नंतर सुधारलेल्या हवामानामुळे संख्येने आणि भूभागाने विस्तारलेल्या जनसमुदायाला एकत्र आणणारे नायक तयार होऊन राष्ट्र आणि राष्ट्रीयत्व ह्या संकल्पनांची सुरुवात झाली असावी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Aug 2013 - 3:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

कृपया, "हजारो वर्षे एकाच भूभागाला जखडून राहिल्याने त्याच्या स्वामित्वाची भावना झाली असावी." हे वाक्य "हजारो वर्षे एकाच भूभागाला जखडून राहिल्याने आणि तो भूभाग जगण्यासाठी अत्यावश्यक असल्याने त्याच्या संरक्षणाची आणि स्वामित्वाची गरज निर्माण झाली असावी." असे वाचावे.

प्रचेतस's picture

19 Aug 2013 - 9:28 am | प्रचेतस

अतिशय सुरेख प्रवास.

सौंदाळा's picture

19 Aug 2013 - 9:44 am | सौंदाळा

हेच म्हणतो..
वाचतोय.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Aug 2013 - 9:46 am | विश्वनाथ मेहेंदळे

आजवरचे सगळे भाग वाचले. मधले बरेच दिवस मिपावर येणे नसल्याने १-६ भाग एका दमात वाचता आले होते. आता येतील तसे वाचतो आहे. दर वेळेस प्रतिसाद दिला नाही तरी वाचतो आहे. जबरदस्त लेखन आहे. आजवर जालावर मी वाचलेल्या लेखमालिकांतील सर्वोत्कृष्ट मालिकांपैकी एक ही आहे.

अनुप ढेरे's picture

19 Aug 2013 - 11:29 am | अनुप ढेरे

आजवर जालावर मी वाचलेल्या लेखमालिकांतील सर्वोत्कृष्ट मालिकांपैकी एक ही आहे.

सहमत.

खबो जाप's picture

19 Aug 2013 - 2:24 pm | खबो जाप

+१

कवितानागेश's picture

19 Aug 2013 - 11:47 am | कवितानागेश

भारी चाललाय हो प्रवास. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Aug 2013 - 3:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

शिल्पा ब, वल्ली, सौंदाळा, सुनील, विश्वनाथ मेहेंदळे, अनुप ढेरे, खबो जाप आणि लीमाउजेट : आपल्या सर्वांना सहलितील सहभागासाठी अनेक धन्यवाद !

आनन्दा's picture

19 Aug 2013 - 3:29 pm | आनन्दा

खरंच.

अमेरिकन त्रिशंकू's picture

19 Aug 2013 - 5:07 pm | अमेरिकन त्रिशंकू

अक्षांश आणि रेखांश यात थोडी गडबड वाटते आहे.
अक्षांश = लॅटिट्यूड = आडव्या रेघा ; विषुववृत्त = शून्य अक्षांश; उत्तर ध्रुव = ९० अंश अक्षांश
रेखांश = लाँजिट्यूड = उभ्या रेघा; ग्रीनिच = शून्य अंश रेखांश
हे लक्षात घेता खालचे वाक्य बरोबर वाटत नाही.
उत्तरेकडची अतिथंड प्रदेशाची रेखा खाली सरकत ८५ अंश रेखांशापर्यंत खाली आली (सद्याच्या काळात ही रेखा, जिला आर्क्टिक वर्तूळ म्हणतात, ६६ अंश रेखांशावर आहे).

८५ अंश अक्षांश हे उत्तर गोलार्धात ६६ अंश अक्षांशाच्या उत्तरेला असणार.
तुमच्या नकाशामध्ये सुद्धा ८५ अंश अक्षांश (तुम्ही नकाशावर पण रेखांश लिहिले आहे) खूप दक्षिणेला दाखवले आहे. ८५ अंश अक्षांश म्हणजे उत्तर ध्रुवाच्या खूप जवळ हवे.

बाकी लेखमालिका उत्तम.

राही's picture

19 Aug 2013 - 6:17 pm | राही

हेच लिहावयाचे होते.
बाकी लेखमाला उत्तमच. जालावर आणि मराठी छापील वाङ्मयातही फारसा हाताळला न गेलेला विषय सुबोध आणि रंजक पद्धतीने मांडला आहे. विषयाचे नावीन्य आणि मुद्देसूद मांडणी यामुळे सर्वच भाग अतिशय वाचनीय होत आहेत. आता हळूहळू आम्हांला ओळखीचा असा कालखंड या लेखमालेत सुरू होईल तेव्हा ती आम्हांला अधिकच स्वारस्यपूर्ण वाटेल यात संशय नाही. त्या भागांच्या प्रतीक्षेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Aug 2013 - 6:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

अमेरिकन त्रिशंकू आणि राही : नजरचुकीने झालेला मोठा टंकणदोष दाखवून दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद ! योग्य दुरुस्ती केली आहे.

बॉस, तुमची लेखमाला अत्यंत बारकाईनं वाचावी लागते इतकी भरगच्च माहिती आहे त्यात, दुर्दैवानं प्रत्येकवेळी लॉग इन करता येईलच याची खात्री नसते ( कुणाचाही पीसी चाळायची लय वाईट खोड आहे पब्लिकला ) त्यामुळे मी वाचत होतो, आहे आणि असेनच.. उपयुक्त लेखमाला :)

मालोजीराव's picture

19 Aug 2013 - 7:47 pm | मालोजीराव

.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Aug 2013 - 8:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

आनन्दा, चाफा आणि मालोजीराव : अनेक धन्यवाद !

शैलेंद्रसिंह's picture

19 Aug 2013 - 8:43 pm | शैलेंद्रसिंह

थोडे विषयांतर होईल, पण प्रश्न विचारायची वेळ कदाचित योग्य आहे. Ancestral north indians (ANI) आणि ancestral south indians (ASI) ह्यांची निर्मीती ह्याच काळात झाली का?
ASI ह्या काळात भारतातच राहत होते का?
खुप सुरेख माहिती मिळतेय तुमच्या लेखातुन. धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Aug 2013 - 10:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

ह्याबद्दलची माहिती सहाव्या भागात आली आहे. हा तोबा ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्यानंतर झालेल्या घटनांचा परिणाम आहे.

शैलेंद्रसिंह's picture

20 Aug 2013 - 7:12 am | शैलेंद्रसिंह

आता लिंक लागली. म्हणजे ASI हे तोबा च्या उद्रेकानंतर आग्नेय आशियातुन भारतात सरकले. ASI आणि ANI ह्यांचे admixture ही खुप अलीकडची घटना असल्याचेही वाचण्यात आले.
http://blogs.discovermagazine.com/gnxp/2013/08/indo-aryans-dravidians-an...

आणखी एक शंका होती. तुम्ही M haplogroup बद्दल लिहिले नाही. L3 ला दोन मुली होत्या. M आणि N. M चा उगम भारतात आहेत असं म्हटलं जातं. भारताच्या ६०% लोकांमधे M haplogroup आढळुन येतो आणि आफ़्रिकेत तो खुप कमी आढळुन येतो. Out of Africa थिअरीत ह्याचं काय स्पष्टीकरण दिलं आहे? कि Out of Africa थिअरीला M चा भारतीय उगम मान्यच नाहीये? ह्यासंदर्भात अधिक माहिती मिळेल का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Aug 2013 - 3:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

L3 च्या दोन मातृवंशावळी M आणि N. त्यापैकी N मध्ये R आणि तिच्यामध्ये U आणि पुढे तिच्यामध्ये U5 मातृवंशावळी निर्माण झाल्या.

M उत्परिवर्तन फक्त दक्षिण आशिया व दक्षिणपूर्व आशियात असून या उत्परिवर्तनाचा मानवाच्या तोबोत्तर उलट (पूर्व ते पश्चीम) प्रवासाचा मार्ग नक्की करण्यासाठी कसा उपयोग झाला ते सहाव्या भागात आले आहे.

शैलेंद्रसिंह's picture

20 Aug 2013 - 10:35 pm | शैलेंद्रसिंह

अच्छा म्हणजे L3 भारतात आली आणि तिने M ला जन्म दिला.
पण असंही वाचण्यात आलंय की मदागास्कर मधे M24 आणि उत्तर आफ़्रिकेतील काही भागात M1 हे तुलनेने तरुण उप उत्परिवर्तने आढळुन आलेली आहेत, म्हणजे भारतातुन मानव पुन्हा आफ़्रिकेत गेला की भारतीय प्लेट, आफ़्रिकन प्लेट आणि मदागास्कर प्लेट एकत्र असतांना M उत्परिवर्तन घडुन आले?

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Aug 2013 - 11:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारतीय प्लेट, आफ़्रिकन प्लेट आणि मदागास्कर प्लेट एकत्र असतांना M उत्परिवर्तन घडुन आले? ह्या प्लेट जोडलेल्या होत्या तो काळ २० कोटी अथवा जास्त वर्षांपूर्वीचा आहे. त्यामानाने माणसाचा सगळा काळ गेल्या दोन लाख वर्षांचा आहे आणि तो अफ्रिकेतून बाहेर पडून आशियात आला तो काळ जास्तीत जास्त ९०,००० वर्षांपूर्वीचा आहे आणि M उत्परिवर्तन ६०,०००वर्षांपूर्वी आस्तित्वात आले. अर्थात मानवाचा एकूण इतिहास भूपृष्टांच्या हालचालींच्या मानाने यकश्चित आहे... त्यांचा एकमेकाशी काहिही संबद्ध नाही.

M भारतातून M1 मध्य आशियात सुपीक चंद्रकोरीच्या भागात व तेथून परत आफ्रिकेत उतरलेल्या एका छोट्या जथ्यातून तेथे गेले. मात्र हा मानवाच्या एकूण प्रवासातला मोठा टप्पा नाही. आफ्रिकेतली मूळ उत्परिवर्तने L आणि त्याचे उपभाग आहेत... त्यातले फक्त L3 हे आफ्रिकेबाहेर पडलेल्या आणि आज आस्तित्वात असणार्‍या मानवांत आहे.

खालील चित्रात उत्परिवर्तनांचा एकूण प्रवास दाखवला आहे (जालाच्या सौजन्याने) ...

शैलेंद्रसिंह's picture

21 Aug 2013 - 2:59 am | शैलेंद्रसिंह

खुप खुप धन्यवाद. हळु हळु चित्र स्पष्ट होतंय.
आणखी एक शंका आहे. मातृवंश सांगणारे मायटोकॉन्ड्रियल म्युटेशन्स सांगतात की भारतीय मातृवंश भारतातलाच आहे. पण भारतीयांच्या Y chromosomes मधे (जो पितृवंश दर्शवितो) जी mutations दिसतात त्यानुसार भारतीयांचा पितृवंश भारतीय नाही असं दिसुन येतं. हे खरं आहे का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Aug 2013 - 9:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

आज आस्तित्वात असणार्‍या सगळ्या मानवांचे मूळ पूर्वज (Y chromosome Adam उर्फ सैद्धान्तीक मूळ पुरुष आणि Mitochondrial Eve उर्फ सैद्धान्तीक मूळ स्त्री हे दोन्ही) फक्त आणी फक्त आफ्रिकनच आहेत.

उत्परिवर्तने फक्त त्यांच्या उप/उपौप वंशावळी (हॅप्लोगृप) कोणत्या भूभागात आस्तित्वात आल्या आणि कोणत्या भूभागांतून प्रवास करत कोठपर्यंत पोहोचल्या हे ठरवायला मदत करतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Aug 2013 - 5:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

ASI आणि ANI ह्यांचे admixture ही खुप अलीकडची घटना असल्याचेही वाचण्यात आले.
यासंदर्भात तुम्ही दिलेल्या लिंकपेक्षा (जी मला उगाचच भडक केलेली आणि त्यामुळे अनेक डिस्क्लेमर्ससह असलेली आढळली) ही मी अगोदरच दिलेली सहाव्या भागातील लिंक पहा. तीच माहिती जास्त स्पष्ट आणि समतोलपणे दिलेली आहे.

मात्र या दोन्हीतल्या "In ancient times, over 4000 years ago, there were two separate populations based in north and south India with no mixing." या वाक्याला अजून इंडिपेंडंट पियरची पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे ती अजूनतरी एक थियरी आहे. शिवाय हे मानले तर मग तोबानंतरच्या ७०,००० ते ४,००० वर्षांपूर्वीतच्या भल्यामोठ्या कालखंडात भौगोलिकदृष्ट्या जवळ राहणार्‍या ASI आणि ANI यांचा संबद्ध अजिबात का आला नाही हा प्रश्न बाकी राहतोच.

स्रुजा's picture

20 Aug 2013 - 6:29 am | स्रुजा

एकूण एक भाग वाचते आहे आणि नवीन भागांची आतुरतेने वाट पण पाहते आहे . फार च इंटरेस्टिंग आहे हे सगळं . तुमच्या वाचनाला दाद द्यायलाच हवी .

तुमचा विस्तृत वाचन आहे म्हणून ही लेख मला एवढी सुंदर झाली आहे . म्हणून खास वाचनाला दाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Aug 2013 - 5:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनेक धन्यवाद !

किलमाऊस्की's picture

22 Aug 2013 - 9:39 am | किलमाऊस्की

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

विलासराव's picture

22 Aug 2013 - 11:52 am | विलासराव

वाचतोय. लेखमाला आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Aug 2013 - 5:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

हेमांगीके आणि विलासराव: धन्यवाद !

वसईचे किल्लेदार's picture

22 Aug 2013 - 9:18 pm | वसईचे किल्लेदार

एक नंबर एक्का राव. जयंतकाका, हेमांगीके आणि आता तुम्हि... मिपा वरुन कधिहि हलु नयेसं लेखन.
पुढील प्रवासास शुभेच्छा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Aug 2013 - 3:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

मोदक's picture

24 Aug 2013 - 1:52 am | मोदक

वाचतोय..

पुढील लिखाणाच्या प्रतिक्षेत!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Aug 2013 - 12:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

तिमा's picture

24 Aug 2013 - 11:29 am | तिमा

हे शेवटचे हिमयुग जर २२००० वर्षांपूर्वी झाले तर आता पुढचे कधी अपेक्षित आहे ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Aug 2013 - 1:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

हिमयुगाची शास्त्रीय व्याख्या म्हणते की असा काळ की त्यांत दीर्घ काळाकरिता वातावरण इतके थंड असते की त्यामुळे पृथ्वीच्या फार मोठ्या भागावर आणि मोठ्या पर्वतराजींमध्ये (हिमालय, आल्प्स, इ) बर्फाचे मोठे थर साठतात/ वाढतात. या व्याख्येप्रमाणे आपण अजूनही शेवटच्या हिमयुगातच आहोत.

हिमयुगात सतत एकदम थंड वातावरण नसते तर जरा जास्त थंड कालखंड (glacials) आणि जरा कमी थंड कालखंड (interglacials) असतात. सद्या आपण २६ लाख वर्षांपूर्वी सुरू झालेल्या Pliocene-Quaternary glaciation नावाच्या आतापर्यंतच्या शेवटच्या हिमयुगाच्या १०,००० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका interglacial मध्ये आहोत.

खालील चित्रात हिमयुगाचे कालखंड दिसत आहेत (जालाच्या सौजन्याने)...
.

.

हिमयुग कसे सुरू होते याबद्दल शास्त्रज्ञांत पूर्णपणे एकमत नाही. मात्र काही कारणे त्या प्रक्रियेवर परिणाम करतात ती अशी:

१. पृथ्वी स्वतःभोवती २३.५ अंश तिरक्या अक्षाभोवती फिरते त्यामुळे निरनिराळे ऋतू होतात हे सर्वांना माहिती आहेच.

२. पृथ्वी त्या अक्षाभोवती सरळपणे न फिरता थरथरत फिरते (वॉबल)... साधारणपणे जसा भोवरा फिरताना दिसतो तशी.

३. पृथ्वी सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेत न फिरता लंबगोलाकार कक्षेत फिरते आणि त्यामुळे तिला मिळणार्‍या सूर्याच्या ऊर्जेचे प्रमाण तिच्या सूर्यापासून असणार्‍या अंतराप्रमाणे कमीजास्त होते.

वरच्या १ ते ३ कारणांमुळे पृथ्वीच्या वेगवेगळ्या जागांवर पडणार्‍या सूर्याच्या ऊर्जेचे प्रमाण कमीजास्त होऊन बर्फाचे थर कमीजास्त जाडीचे होण्यात होतो. या सगळ्या प्रक्रियेला Milankovitch cycles असे म्हणतात.

४. मोठ्या कालखंडावर पाहता सूर्यापासून उत्सर्जित होणारी ऊर्जा कमीजास्त होताना दिसते.

५. मोठ्या कालखंडावर होणारी भूपृष्ठाची हजारो किलोमीटरची हालचाल सूर्याच्या पृथ्वीवर पडाणार्‍या ऊर्जेला पकडून ठेवण्याची क्षमता बदलतात.

६. वरच्या कारण ५ आणि पृथ्वीच्या फिरण्यातल्या बदलाने समुद्रातील थंड आणि गरम पाण्याचे प्रवाह त्यांची दिशा बदलून बर्फाचे प्रमाण कमी अथवा जास्त होते.

७. पृथ्वीच्या एखाद्या मोठ्या भूपृष्ठाची उंची (पृथ्वीच्या बदलांच्या भाषेत) एकाएकी कमीजास्त होणे... उदा भारतीय प्लेट युरेशियन प्लेटला धडकून हिमालय तयार झाला आणि तिबेटचे २४ लाख चौ किमी चे उंच आणि थंड पठार तयार झाले.

८. मधूनच होणारे ज्वालामुखींचे मोठे उद्रेक आणि त्यामुळे होणारे वातावरणावरचे परिणाम. हे कधी आणि किती क्षमतेचे होतील आणि त्यांचा वातावरणावर नक्की काय परिणाम होईल यांचा नीट पत्ता अजून तरी लागलेला नाही.

९. जर वातावरणावर प्रचंड परिणाम करण्याएवढी मोठी एखादी उल्का पृथ्वीवर आदळली तर तिचे होणारे परिणाम. हे आपण मधून मधून बातम्यांत वाचत असतो... पण हे कधी होईल याच नक्की पत्ता कोणालाच नाही.

१०. मानवाची पर्यावरणातली ढवळाढवळ : काही शात्रज्ञांच्या मते खनिज तेलाच्या वापराने झालेल्या आणि सतत होत असणार्‍या बदलाने वातावरणाचे तापमान वर जात आहे आणि त्यामुळे पुढचे हिमयुग साधारणपणे १५ लाख वर्षे पुढे गेले आहे !

हुश्श ! ही झाली फक्त काही महत्त्वाची कारणे ! यावरून तुमच्या ध्यानात आले असेलच की हे हिमयुग कधी संपेल आणि पुढचे कधी सुरू होईल याबाबत अजून बरेच अज्ञान आहे. शिवाय यातील काही गोष्टी इतक्या अनिश्चित आहेत की आताच नक्की अंदाज बांधणे शक्य नाही.

पैसा's picture

24 Aug 2013 - 9:47 pm | पैसा

मी तुमचा लेख मुद्दाम उशीरा वाचते. कारण मग प्रतिक्रियांमधे आणखी खूप काही वाचायला मिळते! फारच सुंदर लिहिता आहात!

किलमाऊस्की's picture

25 Aug 2013 - 6:12 am | किलमाऊस्की

मी पण :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Aug 2013 - 11:43 am | डॉ सुहास म्हात्रे

पैसा आणि हेमांगीके: धन्यवाद !

माझा मूळ हेतू लेखातील माहिती सर्व वाचकांसाठी मनोरंजक (सुगम शास्त्रीय) व्हावी हा आहे. त्यामुळे काही किचकट तांत्रिक मुद्दे मूळ लेखात मुद्दाम टाळतो आहे. गाळलेल्या एखाद्या गोष्टीबाबत जर कोणाला रस असेल तर त्याच्याशी प्रतिसादात चर्चा करायला मजा येते आहेच.

सहलीतला सहभाग असाच चालू ठेवावा.