रविकर

Primary tabs

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
9 Jul 2008 - 5:03 am

सकाळी सकाळी खिडकीतून येणारी
अवखळ तिरीप पापण्या चाळवते,
आणि दाखवून तुझी पाठमोरी आकृती
लगेच शिरते तुझ्या कुरळ्या केसांत.
न गुंतता तिथेच माझ्या बोटांसारखी
अलगद उतरते तुझ्या कानावरती.
चकाकतो एक थेंब - शिंपल्यातला मोती.

तो कवडसा जेमतेम गाल गोंजारतो
आणि घाईत तुझ्या खांद्यावर उतरतो
खरपूस कांतीवर माखतो वर्ख सोन्याचा
बेमुर्वतपणे, होय! माझ्यादेखत!

तुझ्या कमरेवर टेकतो, नाही राहात
तिथेच रेंगाळत माझ्या मिठीसारखा.
डौलदार ढुंगण वस्सकन लख्ख
करतो हा उजेड - अरसिक, मख्ख.
तुझ्या मांड्या, पोटर्‍या, पाय
पादाक्रांत करणार काय
हा चक्रवर्ती सूर्यनारायण?
संपत नाही उपभोगूनही मी
ते सर्वस्व जिंकणार का पण
हा उपभोगशून्य स्वामी?

रात्री जोखड म्हणून झटकलेले
पांघरूण पुन्हा घेऊया ओढून.
वाढवू दिवसाच्या मोंगलाईतून
स्वराज्य क्षणाचे काळोखलेले.

कविता

प्रतिक्रिया

ही कविता आता प्रकाशित करतो आहे.

सहज's picture

13 Jul 2008 - 8:04 am | सहज

शेवटच्या ४ ओळी वाचुन पोरं व्हायच्या अगोदरचे दिवस आठवले. गेले ते दिन गेले :-(

कवितेते तो शब्द वापरायला मिळावा म्हणुन त्या लेखाचा खटाटोप होय. :-)

कमाल आहे, परवा बेलाने पावसाचे प्रताप काव्यले आज इथे सुर्याचे असे वागणे. चलो लेट्स स्क्रु द नेचर इटसेल्फ. गो ग्लोबलवार्मींग!!!

बाय द वे जरा पडदे नीट लावले असते तर ह्या कविते पासुन वाचलो असतो ना राव. जा आता तुझं घर उन्हात.. कृ. ह. घ्या.

विसोबा खेचर's picture

13 Jul 2008 - 8:56 am | विसोबा खेचर

तुझ्या कमरेवर टेकतो, नाही राहात
तिथेच रेंगाळत माझ्या मिठीसारखा.
डौलदार ढुंगण वस्सकन लख्ख
करतो हा उजेड - अरसिक, मख्ख.
तुझ्या मांड्या, पोटर्‍या, पाय
पादाक्रांत करणार काय
हा चक्रवर्ती सूर्यनारायण?

ओहोहो! धन्याशेठ, साला कविता अंगावर आली हो! जोरदारच लिहिलं आहे तिच्यायला! जियो....!

डौलदार ढुंगण, मांड्या, पोटर्‍या, पाय पादाक्रांत करायची कल्पना लै भारी! बाकी तिची आकृती पाठमोरी असल्यामुळे सुडौल स्तनांचा उल्लेख miss झाला नायतर चक्रवर्ती धनंजयने तिथेही काहितरी पराक्रम करून ठेवला असता! :)

असो, एक अतिशय उच्च दर्जा असलेली कविता वाचायचा आनंद मात्र निश्चित मिळाला!

आपला,
तात्यानारायण.

सर्किट's picture

13 Jul 2008 - 9:15 am | सर्किट (not verified)

कुणी ( अगदी मालकही) काहीही म्हणॉत, धनंजय, ह्या कवितेचा दर्जा कोसळलाय, ढासळलाय. सुरुवात छान झालीय.

परंतु नंतर उगाच काहितरी कोंबायचे म्हणून कोंबल्यासारखे वाटतेय.

दुसरे क्डवे बघ. "तो कवडसा"....

जान कुर्बान करावेसे वाटणारे.

आणि तिसरे कडवे फक्त मिसळपावासाठी बनवलेले वाटणारे. (म्हणजे हे फक्त येथेच चालते, म्हणून खास येथेच ..)

ढुंगण, वस्सकन आणि डौलदार ह्यांची जोडी (तिडी) कशी व्हायची ?

उजेड, माड्या , पोटर्‍या ह्यांचाही काहीच परस्पर संबंध लागत नाही.

त्याच्याच शेवटी सर्वस्व जिंकणे आणि उपभोगशून्य स्वामी ह्या सुंदर संकल्पना अगदीच विरून जातात.

हे कडवे म्हणजे, ओंकारनाथ ठाकुरांच्या तराण्या आधी हिम्मेश रेशमियाला त्याचा तथाकथित आलाप म्हणायला लावले, असे आहे. का ? तर म्हणे इथल्या लोकांन हली तेच आवडते.

- सर्किट

विसोबा खेचर's picture

13 Jul 2008 - 9:40 am | विसोबा खेचर

ओंकारनाथ ठाकुरांच्या तराण्या आधी हिम्मेश रेशमियाला त्याचा तथाकथित आलाप म्हणायला लावले,

ओंकारनाथांच्या तराण्यापेक्षा हिमेशचा आलाप अधिक बरा! अर्थात, हे माझं व्यक्तिगत मत आणि व्यक्तिगत आवड!

बाकी चालू द्या...

आपला,
(ओंकारनाथांचं गाणं मुळीच आवडत नसलेला) तात्या.

सुरुवातीपासून शेवटपर्यंत सूर्यप्रकाशाबद्दल भावना बदलत गेलेल्या आहेत. खाली घाटपांड्यांनी घेतलेला अर्थ मला अभिप्रेत होता.

> कवडसा म्हंता म्हंता त्यो भाद्दर सुर्य क्वाँची क्वॉंची आंग भाजुन काढतोय!

"अवखळ -> अलगद -> घाई -> बेमुर्वत -> वस्सकन -> अरसिक -> लख्ख/मख्ख -> पादाक्रांत -> उपभोगशून्य" हे त्या बदलत्या भावनांतले टप्पे आहेत.

शरिराच्या अवयवांची नावे मात्र सर्वच त्या वासनामय वातावरणात कामवर्धक आहेत. त्या मनःस्थितीत ढुंगण, मांड्या, पोटर्‍या, पाय या कल्पनाही माझ्यासाठी सुंदर/डौलदार आहेत. शारिर शृंगाराच्या प्रसंगात त्यांचा उल्लेख नैसर्गिक विचारांचा उल्लेख आहे. माझ्या मनात तरी ते शब्द कुरळे केस आणि खरपूस कांतीइतकेच वासनालोलुप आहेत, वासना-विरक्त करणारे नाहीत. (प्रकाशाबद्दलच्या भावनांच्या अवरोहातील 'वस्सकन', 'अरसिक', 'मख्ख', - इतकेच काय 'लख्ख'सुद्धा - हे सर्व या वासनेच्या तंबोर्‍याशी विसंवादी आहेत, पण तोच तणाव अभिप्रेत आहे.)

सकाळी उठता उठता "वासना" आणि "चला उठू रोजच्या कामाला लागू" या दोन्ही भावना एकत्र आणि विसंगत उद्भवणे - हा अगदी दररोजचा अनुभव नसला तरी बर्‍यापैकी सामान्य असावा (मला आणि लोकांनाही). त्यामुळे हा उत्कट-विसंवादी अनुभव साहित्याचा विषय असण्यास काहीच हरकत नसावी. पण याची शैली काय असावी याबद्दल मी अजून शोधाशोधच करतो आहे. त्यामुळे तुमचे समीक्षक विचार हवेहवेसे आहेत, हे सांगणे नलगे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jul 2008 - 10:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ.धनंजय,
कविता आवडली, म्हणजे कवडसाही तिच्या एखाद्या अवखळ प्रेअसीच्या सहवासासाठी जरा चावटपणा करतो असे वाटते. तिच्या अंगाखांद्यावरवर मुद्दाम रेंगाळतो. अर्थात तो कवडसा आपल्याच नादात आणि आनंदात गर्क आहे.

बाकी मलाही वाटलं डौलदार ढुंगण, मांड्या, पोटर्‍या, कवडस्याने हे सर्व पादाक्रांत करण्यासाठी त्याला अशा विविध आकार, उकाराची गरज असेल का नसेल कोणास ठाऊक ? पण त्यांना वगळूनही रविकिरणाने ते सर्व उपभोगले असते असे वाटते. आणि कविता अधिक गडद आणि तितकीच सुंदर झाली असती असेही वाटले.

डौलदार... पासून ते पोट-या पाय पर्यंत कविता शब्दातून निसटली असे वाटले, कोणास तिथून खरी कवितेत जान आली असेही वाटू शकेल. :)
असो, कविता छान आहे.

-प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(मुक्तछंदाचा चाहता )

कोलबेर's picture

13 Jul 2008 - 10:39 am | कोलबेर

कविता आवडली. 'उजेड' हा भावनाशून्य आणि गद्य असल्याने कमरेवरती न रेंगाळता तो खाली गेल्यावर 'वस्सकनच ढुंगण उघडे करणार', ही शब्द रचना आवडली.
कवितेची सुरूवात - कलाटणी - शेवट ही कल्पना नाविन्यपूर्ण वाटली. सुंदर कविता!

रात्री जोखड म्हणून झटकलेले
पांघरूण पुन्हा घेऊया ओढून.
वाढवू दिवसाच्या मोंगलाईतून
स्वराज्य क्षणाचे काळोखलेले.

हे तर सहीच.

- कोलबेर

ऋषिकेश's picture

13 Jul 2008 - 10:44 am | ऋषिकेश

कल्पना-संकल्पना आवडली
बाकी कविता ठिक! किंचित लांबली आहे व थोडी शब्दबंबाळ वाटली (वैयक्तीक मत)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

बेसनलाडू's picture

13 Jul 2008 - 11:28 am | बेसनलाडू

धनंजय,कविता फारच आवडली.कविता शारीर वाटली,तरीही उपभोगशून्य जगन्नारयाणानेही घेतलेला उपभोग पाहिल्यावर वास्तविक उपभोगी,उपभोगण्यात माहीर व्यक्तीचा जो सात्विक किंवा जो काही संतापबिंताप,उद्विग्नता वगैरे जे काही होईल,तो/ते छानच मांडलाय/मांडलंय.आणि कविता शारीर असल्यानेही काहीशी शब्दबंबाळ झाली/वाटली असण्याची शक्यता आहे.असो.
कवितेचा एकूण प्रणयी आणि सौंदर्याविष्कारी बाज लक्षात घेता ढुंगण हा शब्द अप्रस्तुत वाटतो.त्या ठिकाणी नितंबासारखा पर्यायी शब्द अधिक चपखल बसला असता,असे वाटते.संदर्भ आणि लेखनाचा एकूण बाज/मूड यांवर आधारीत शब्दयोजना असावी,तर कविता अधिक भिडेल/भिडते हे माझे मत.त्यामुळे ढुंगण,नितंब,बूड आणि गांड हे शब्द संदर्भ आणि मूडनुसारच योजले जावेत,अन्यथा त्यांचा आस्वाद घेता येत नाही तर आउट ऑफ प्लेस/कॉन्टेक्स्ट वाटल्याने ते खुपतात.तात्यांनी म्हटल्याप्रमाणे एखादा शब्दही काही वेळा पूर्ण कविता/संबंधित कडवे अंगावर आल्यासारखे वाटण्यास कारणीभूत ठरू शकतो.
तात्यांनी सूचित केलेल्या सौंदर्यविशेषांकडेही दुर्लक्ष झाल्याचा मुद्दा एकूण कवितेच्या,मूडच्या संदर्भात विचार करण्याजोगा असाच आहे.आणि तुमच्यासारख्या प्रतिभावंत कवीच्या लेखनातून अशा बारीकसारीक गोष्टींची,चपखल शब्दयोजनेची अपेक्षा केली गेली,तर त्यात नवल वाटू नये.
असो. हे एक कवी आणि वाचक/आस्वादक म्हणून माझे मत.बाकी पसंद अपनी अपनी,खयाल अपना अपना.
(मुद्देसूद)बेसनलाडू

कोलबेर's picture

13 Jul 2008 - 12:28 pm | कोलबेर

प्रकाशाचा अरसिक मख्खपणा 'ढुंगण' ह्याच शब्दातुन अचूक प्रतित होतो असे मला तरी वाटले. प्रियकराला दिसतात ते आकर्षक नितंब, भावनाशून्य अरसिक उजेडाल दिसले ते ते 'ढुंगण'. चपखल शब्दयोजना वाटली.

बेसनलाडू's picture

13 Jul 2008 - 11:31 pm | बेसनलाडू

असहमत.कविता ही भावनाशून्य उजेडाने म्हटली/लिहिली नसून कवीने स्वतः लिहिली/म्हटली आहे.भावनाशून्य उजेडाला ढुंगण दिसले तरी भावूक/संवेदनशील कवीला नितंबच दिसावे.उजेडाचे भावनाशून्य असणे दाखवण्यासाठी 'वस्सकन्' पुरेसे आहे,ढुंगणाची गरज नाही.
(असहमत)बेसनलाडू

कोलबेर's picture

14 Jul 2008 - 2:11 am | कोलबेर

भावनाशून्य उजेडाला ढुंगण दिसले तरी भावूक/संवेदनशील कवीला नितंबच दिसावे.

कविता रुक्ष उजेडाच्या पर्स्पेक्टीव्ह मधून लिहिलेली असल्याने तसेच कवीला त्याच्या मनातील 'चीड चीड' ही भावना दाखवायाची अस्ल्याने 'ढुंगण' हाच शब्द चपखल बसतो. जर 'वस्सकन' हा शब्द इथे खटकत नसेल तर 'ढुंगण' हा का खटकावा ते समजले नाही. ढुंगण हा बाथरुम वर्ड/ खाजगी शब्द आहे ह्या एकमेव कारणामुळे तो खटकला असे वाटते पण कवीतेतील मूड आणि कवीची प्रतिभा पाहता कवीला इतकी मुभा असावी असे वाटते.

बेसनलाडू's picture

14 Jul 2008 - 3:33 am | बेसनलाडू

तुमच्या मते ज्या भावनेतून ढुंगण हा शब्द योजला आहे,त्या भावनेचा विचार केल्यास ढुंगणाला इतर (चपखल बसणारे) समानार्थी शब्दही आहेतच.मात्र भावनाप्रधान/सौंदर्यप्रधान कामुकता आणि वखवखलेली वासना यांपैकी उजेडाच्या वासनावृत्तीचा किंवा रुक्ष उपभोगाचा विचार केला तर ढुंगण हा शब्द मला योग्य वाटत/ला नाही. एखाद्या मातकट विजारीवर जसा किरमिजी बुशकोट जात नाही,तसा वस्सकन् बरोबर ढुंगण हा शब्द जात नाही हेच खरे.कोणता जातो,हे आतापर्यंत कळले असेलच :) त्यामुळे ढुंगण येथे चपखल वाटत नाही.
(सूचक)बेसनलाडू

धनंजय's picture

14 Jul 2008 - 5:51 am | धनंजय

कोलबेर आणि बेसनलाडू दोघांची मते माझ्यासाठी मौल्यवान आहेत. "ढुंगण" हा शब्द निवडावा की नाही, हा निर्णय मला सर्वात कठिण होता याची प्रांजळ कबुली मीच देतो. इथे मलाच ही निवड करणे कठिण जात आहे, तर एका वाचकाला एक, दुसर्‍याला दुसरा पर्याय योग्य वाटणे साहजिकच आहे.

ओळ रचताना त्याच्याबद्दल आलेले साधकबाधक विचार मी खाली एका प्रतिसात दिलेले आहेत.

"ढुंगण" शब्द वापरावा की नाही याबद्दल मी मिसळपावावरच एक चर्चाविषय टाकला होता. त्यात असेही दिसून आले, की नितंब शब्द नेमक्या अर्थाने मराठी बोलणार्‍यांत मृतप्राय आहे - इरावती कर्वेंना कॉलेजात पोचेपर्यंत अर्थ माहीत नव्हता (पण त्यांना ढुंगण शब्दाचा अर्थ माहीत होता). अर्थ ठाऊक नसल्याने कित्येक अभावित विनोद झाल्याची उदाहरणे त्या चर्चेच्या प्रतिसादात लोकांनी दिली. त्यामुळे माझ्या वैयक्तिक विचारांत अगदी हळुवार प्रेमप्रसंगांतही नैसर्गिकपणे "नितंब" शब्द येत नाही, "ढुंगण" शब्दच येतो. याबद्दल मला शब्ददारिद्र्याची विशेष लाज वाटत नाही. म्हणजे "ढुंगण" हा शब्द माझ्यासाठी तरी बाथरूमवर्ड आणि ब्यूटिफुल-ऍस या दोन्ही संदर्भांत आहे. माझ्यासाठी मोठा प्रश्न आहे तो "ढ"काराच्या ओबडधोबड ध्वनीने होणार्‍या रसभंगाबाबत.

नितंब : माझ्या वापरातील शब्दाशी अप्रामाणिक पण संस्कृत कवींनी काव्यमय केलेला, उच्चारास गोड
ढुंगण : ओबडधोबड पण सध्याच्या मराठीत, आणि रोजच्या विचारांत सामान्यपणे येणारा शब्द

यातली बरोबर निवड मी केली की नाही याबाबत मी अजूनही साशंकच आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Jul 2008 - 11:45 am | प्रकाश घाटपांडे

कवडसा म्हंता म्हंता त्यो भाद्दर सुर्य क्वाँची क्वॉंची आंग भाजुन काढतोय! त्येच्या पेक्षा तो भिजवनारा पाउस बरा!
अंगे भिजली जलधारांनी
ऐशा ललना स्वये येउनी
आलिंगन देती
तेचि पुरुष भाग्याचे
(अभागी)
प्रकाश घाटपांडे

प्रमोद देव's picture

13 Jul 2008 - 8:03 pm | प्रमोद देव

हे काव्य पाडगावकर आणि ढसाळांनी मिळून लिहिलेले वाटतेय. त्यामुळे फसगत झालेय.
कुणाची तरी एकाची शैली वापरली असती तर त्या पद्धतीने आस्वाद घेता आला असता.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धनंजय's picture

13 Jul 2008 - 11:35 pm | धनंजय

हा विषय हाताळणारी ही कविता माझ्यासाठी खूप प्रायोगिक आहे. त्यामुळे सर्वांनी केलेले मार्गदर्शन मला हवेच होते. या विषयावर माझे मराठीत वाचन फार कमी आहे, त्यामुळे मनावर कुठले शैली-संस्कार झालेले नाहीत. प्रमोद देव म्हणतात तसे - एकाच वेळी मनात पाडगावकर आणि ढसाळ यावेत अशा खर्‍याखरच्या भावना, म्हणजे एकाच वेळी हळुवार आणि राकट प्रेमवासना, आपल्यात उठू शकतात. शिवाय दिवस भराभर उगवल्यामुळे शारिर वासना आणि कोमल भावना दोन्ही गवसणीत गुंडाळाव्या लागणार त्याबद्दल चीड, हीसुद्धा सांगायची आहे. तेव्हा शैली कुठली वापरावी हे कोडेच आहे.

कवितेची "कथा" पाठमोर्‍या आकृतीपर्यंत सीमित ठेवली आहे हे तात्यांचे निरीक्षण १००% खरे आहे.
(म्हणजे ही कविता बे एरिया मराठी लिटरेचर कन्व्हेन्शन मध्ये वाचण्यास हरकत नसावी.) यातला सोवळेपणा 'भंपक' नाही, पण कथावस्तूला धरून आहे. समोरून आकृती दिसत असती, तर साखरझोपेतल्या त्या चेहर्‍यावरच्या भावात मी अडकणे क्रमप्राप्तच होते (नाहीतर ती माझ्या आयुष्यातली सत्य घटना आहे यावर माझाच विश्वास बसला नसता) - आणि इथे फक्त "मी"च्या मनातली घालमेल सांगायची आहे.

बिरुटेसर, तुमचे म्हणणे बरोबर आहे, (सहज हेसुद्धा म्हणतात) कवडसा किंवा पाऊस कधीकधी असा मस्त काही उपभोग घेऊन जातात - दिल खुश. याबद्दल बेसनलाडू यांची कविता काय बहारदार उतरली आहे (छचोर). मात्र कधीमधी आपल्याला असा प्रसंग येतो - पहाटे उठल्या-उठल्या कोवळ्या प्रकाशात कामदेव करणी करतो, पण अगदी पाच मिनिटात लख्ख प्रकाश पडतो आणि गुरासारखे हाकायला लागतो - "चल उठ! नीघ ऑफिसला!" तेव्हा त्या जुलमी अरसिक उजेडाचा असा राग येतो! या कवितेत पांघरूण ओढायची गोष्ट असली, तरी ९९% "उठून-ऑफिस" हाच घटनाक्रम जिंकतो.

"डौलदार...पोटर्‍या" हा भाग सर्वात बोचरा आहे खरे. बेसनलाडू म्हणतात त्याप्रमाणे "'नितंब" शब्द वापरावा की नाही याबद्दल खूपच मागेपुढे-मागेपुढे करत होतो. संस्कृत शब्द वापरण्यास माझी ना नाही. मागे एका सुनीतात सरळसरळ संभोगाच्या घटनाक्रमाचे वर्णन होते तिथे भाषा थोडी संस्कृतप्रचुर वापरली होती, रूपकेच रूपके वापरली होती. (उद्या सकाळी : संभोगाच्या आणि मलमूत्राच्या बाबतीत मला थोडासा सामाजिक संकोच आहे...). पण असे उगाच वाटत होते - की ती कविता नैतिकबोधाची असल्यामुळे तिच्यातला संभोगही फारच "थियोरेटिकल" वाटत होता. इथे मला रोजव्यवहारात मन हेलकावणारा रतिविचार सांगायचा होता. ढुंगण, मांड्या, पोटर्‍या (म्हणजे टठडढणची कठोर बाराखडीच) हे अवयव माझ्या रोजच्या रतिसुखाबद्दलच्या सौंदर्यविचारात येतात. मी रोज विचार करताना केवळ उच्चार मऊ करण्यासाठी "नितंब", "रंभोरू" वगैरे मनातही आणत नाही. मनात आपले रोखठोक मराठी शब्दच येतात (किंवा इंग्रजी शब्द - पण तेही रोजचेच ओबडधोबड बट-थाइज-काव्ह्ज, खास गुबगुबीत लॅटिन शब्द नाहीत). रोजचा विचार करताना या शब्दांत लालसा भरलेली आहे, लिहिताना मात्र या शब्दांना ओबडधोबड म्हणायचे - काहीतरी अप्रामाणिकपणा खटकत होता. पण तरी टोचणारे टठडढण ध्वनी वापरून मी रसभंग केला का? याबाबत माझे मत सारखे उलटसुलट होत आहे. या विषयाबद्दल उत्तम कवींचे कवन वाचून मनाची मशागत केल्याशिवाय उपाय नाही.

सर्किट (वर उत्तर दिलेले आहे), ऋषिकेश, कोलबेर, घाटपांडे यांना मनापासून धन्यवाद. दिवसाच्या रहाटगाडग्याबाबत, आधी कोवळा असला तरी शेवटी प्रेम/वासना भाजून काढणार्‍या सूर्याच्या बाबत तक्रार करायची आहे, हाच अर्थ मला अभिप्रेत आहे.

चित्रा's picture

14 Jul 2008 - 9:26 am | चित्रा

"उपभोगशून्य स्वामी" ही कल्पना आवडली.
मी आधी म्हटल्याप्रमाणे कविता शब्दांच्या वापरामुळे बोल्ड वाटली, माझ्यापुरते विचारल्यास. बर्‍याचदा शब्द साधे वापरल्यास पचायला जास्त अवजड जातात, आणि कवितेपेक्षा आपल्याला कसल्या भावना या शब्दांच्या वापरामुळे झाल्या, अशा विचारात माणूस पडतो. हे होऊ द्यायचे नसल्यास कवितेत प्रचलित, अंगावर न येणारे शब्द वापरता येतात पण मग कविता 'गुळगुळीत' होते. त्यामुळे यातील काय पर्याय वापरायचा ह्याचा तुमचा निर्णय मला योग्य वाटला.

बाकी कवितेचा माझा अभ्यास कमी असल्याने जास्त काही लिहीत नाही. फक्त बोरकरांच्या "पाठमोरी पौर्णिमा"ची आठवण झाली, सुदैवाने पुस्तक जवळ आहे, त्यामुळे ती कविता लगेच मिळाली. त्यात "कुंतल, कटी" असे काहीसे अवघड शब्द वापरले आहेत, पण तरी कवी आपल्या भावना पोचवण्यात यशस्वी झाला आहे आणि कविता शांत शृंगाररसातली म्हणता यावी अशी आहे. तुमच्या कवितेतील आशय त्याचप्रकारे पोचतो आहे, फक्त तो थेट आहे.

चित्तरंजन भट's picture

20 Jul 2008 - 2:09 am | चित्तरंजन भट

अत्युत्तम कविता. शेवटच्या चार ओळीत जोम निघून जातो.

धोंडोपंत's picture

20 Jul 2008 - 6:55 am | धोंडोपंत

बेसनलाडवाच्या मुख्य अभिप्रायाशी सहमत.

कविता छान आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

आपला,
(वाचक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com