रविकर
लेखनविषय:
सकाळी सकाळी खिडकीतून येणारी
अवखळ तिरीप पापण्या चाळवते,
आणि दाखवून तुझी पाठमोरी आकृती
लगेच शिरते तुझ्या कुरळ्या केसांत.
न गुंतता तिथेच माझ्या बोटांसारखी
अलगद उतरते तुझ्या कानावरती.
चकाकतो एक थेंब - शिंपल्यातला मोती.
तो कवडसा जेमतेम गाल गोंजारतो
आणि घाईत तुझ्या खांद्यावर उतरतो
खरपूस कांतीवर माखतो वर्ख सोन्याचा
बेमुर्वतपणे, होय! माझ्यादेखत!
तुझ्या कमरेवर टेकतो, नाही राहात
तिथेच रेंगाळत माझ्या मिठीसारखा.
डौलदार ढुंगण वस्सकन लख्ख
करतो हा उजेड - अरसिक, मख्ख.
तुझ्या मांड्या, पोटर्या, पाय
पादाक्रांत करणार काय
हा चक्रवर्ती सूर्यनारायण?
संपत नाही उपभोगूनही मी
ते सर्वस्व जिंकणार का पण
हा उपभोगशून्य स्वामी?
रात्री जोखड म्हणून झटकलेले
पांघरूण पुन्हा घेऊया ओढून.
वाढवू दिवसाच्या मोंगलाईतून
स्वराज्य क्षणाचे काळोखलेले.
वाचन
19265
प्रतिक्रिया
0