'लेह' वारी, भाग ३

मनराव's picture
मनराव in भटकंती
26 Dec 2012 - 11:59 am

'लेह' वारी, भाग २

आयुष्यात पहिल्यांदा, धो धो कोसळणाऱ्या पावसात, इतका वेळ गाडी चालवली असेल. पावसाने भरलेला तिसरा दिवस पुन्हा जवळपास ६०० km अंतर कापून संपला होता.

सकाळी जरा उशिराच जाग आली. आज तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी त्या मनाने जरा कमीच गाडी चालवायची होती (फक्त १५० km). छान सगळं आवरलं आणि दोघेही निघालो. आज आपण ठरलेल्या ठिकाणी लवकर पोहोचणार म्हणून झक्कास वाटत होतं. काळजीच काही कारण नव्हतं. पण असा एकही दिवस जाईल तर शपथ!!! चौथा दिवस पण कायम स्वरूपी आठवणीत राहील असाच निघाला. रोज सकाळी निघताना टाकी फुल करणे आता नियम झाला होता. आदल्यादिवशी पोहोचता पोहोचता दोघांच्याही गाड्यां मधलं पेट्रोल संपत आलं होतं म्हणून मग पानिपत सोडून २-३ km पुढे गेल्यावर एका पेट्रोल पंपावर थांबलो. तुषारने पेट्रोल भरल्यावर मी पेट्रोल भरायला पुढे झालो. पेट्रोल भरून झालं आणि कस कुणास ठाऊक??? पण टाकीच झाकण बंद करताना माझा जोर झाकणासकट त्याला लावलेल्या चावीवर पण पडला आणि चावी मोडली. झाला का बाल्या आता...!!! अर्धी चावी हातात आणि अर्धी चावी झाकणात. आता पुढे काय ???... तुषारला झालेला प्रकार सांगितला... "तरी तुला म्हणत होतो, आणखी एक चावी बरोबर घे, तर मला उडवून लावलंस.... कशाला पाहिजे एक्स्ट्रा चावी वगैरे? आता बस बोंबलत...." इति तुषार. हि आणि अशी आणखी काही वाक्य ऐकून घेण्याशिवाय माझ्या कडे दुसरा पर्यायच नव्हता. गुमान ऐकून घेत होतो आणि आता पुढे काय ? हा विचार करत होतो. पहिला विचार मनात आला "वाट लागली आता ट्रीपची.... गाडी चालू कशी करायची??? इथेच थांबावं लागतंय आता", पण भानावर आलो. पेट्रोल पंपावर चावी तयार करणारा कुठे मिळेल का? याची चौकशी केली तर समजलं, मागे ३ km पानिपत मध्ये एक आहे, तो मिळाला तर ठीक नाही तर नाहीच.. आली का पंचाईत....?. बरं परत उलटं, गाडी घेऊन जायचं तरी कसं?? गाडी ढकलत...??? शक्यच नाही. ३ km!!! तेहि आहे त्याच्या पेक्षा २५-३० किलो जास्त वजन असलेलं धूड ढकलत कोण नेणार? डोक्यात चक्र गरागरा फिरत होतं. एकदा वाटलं तुषारला पाठवून त्यालाच(चावी वाल्याला) इकडे घेऊन यावं पण स्वतःचं दुकान सोडून कोण येणार एवढ्या लांब? तुषार म्हणाला थांब आपण गाडी चालू करू, ते सुद्धा चावी न वापरता आणि घेऊन जाऊ चाविवाल्याकडे. हि आयडिया आवडली. त्याने लगेचच स्क्रूड्रायवर काढला, पुढचा दिवा उघडला आणि इग्निशन वायर शोधली. आता इग्निशन डायरेक्ट करायचे होते म्हणजे आणखी एक वायर हवी होती. ती कुठून आणणार?? असलं काही होईल अशी कल्पनाच नव्हती त्यामुळे आमच्या कडे ती नव्हती. म्हणून मग पेट्रोल पंप वाल्यालाच मागितली. कुठून तरी शोधून त्याने एक छोटीशी वायर आणून दिली (ती मी अजून जपून ठेवली आहे). ती वापरून इग्निशन चालू केलं, गाडी चालू झाली. अर्धी चावी अजूनही टाकीच्या झाकणातच होती. लगेच परत उलटा पानिपत मध्ये आलो. आम्ही दोघेही मिळून चावीवाला शोधत होतो. थोडं फिरल्यावर त्याचा ठावठिकाणा समजला आणि त्याला गाठला. किती बरं वाटलं त्याला पाहिल्यावर !!!. लगेचच दोन चाव्या तयार करायला सांगितल्या ( न जाणो परत अशी वेळ आली तर गडबड नको..). तुषारने पण त्याच्यासाठी आणखी एक चावी तयार करायला सांगितली.

चावीवाला आणि मी.
Chavi

चाव्या तयार होतात तो पर्यंत मग शेजारच्या टपरी वर कटिंग मारली आणि पानिपतचा बाजार पहात बसलो. अजूनही पानिपत मध्ये माणसाने ओढल्या जाणाऱ्या रिक्षा वापरल्या जातात. रिक्षा ओढणारी ती माणूसरुपी आकृती पाहून कोणालाही कीव येईल अशीच सगळी माणसं दिसत होती. हात पायाच्या कड्या झालेल्या तरी रिक्षा ओढत होते. मनात विचार आला जग कुठे चाललंय आणि हे शहर अजून एवढे मागे का? असो... या विषयावर पुन्हा कधीतरी...
पानीपत बाजार..
Panipat1
पानीपत बाजार
Panipat2

भर चौकात दोन काळ्या बुलेट थांबलेल्या असल्यामुळे, लोकं वळून वळून गाड्यांकडे आणि आमच्याकडे बघत होती. एक दोन जण जवळ येऊन चौकशी पण करून गेले. बोलता बोलता एकाने तर "तुम जो ये कर रहे हो, इसमे समजदारी वाली बात कोई भी नाही" असा शेरा पण मारला. मी हि त्याला "हम जो कर रहे है, उसमे छुपा हुआ मजा क्या है?? वो खुद किये बिना आपको समज नही आयेगा" असं सडेतोड उत्तर दिलं. पुढेही बरीच चर्चा झाली पण जाऊदेत. या सगळ्या उद्योगात एक दीड तास गेला आणि अखेर चाव्या तयार झाल्या.

Paratha

तडक निघालो चंडीगडकडे. पुन्हा पानिपत सोडल्यावर ५० -६० km नंतर एके ठिकाणी खाण्यासाठी थांबलो. आलूप्याज पराठा, दाल मखनी आणि दही. लाजवाब चव होती. माणसाने पराठा खावा तर हरयाणा, पंजाब मधेच. भरपेट खाऊन झाल्यावर जे निघालो ते डायरेक्ट चंडीगडलाच थांबलो. पानिपत - चंडीगड रोड एकदम चकाचक होता. एकही खड्डा नाही. कालच्या रस्त्यावर गाडी चालवण्याचा त्रास भोगला होता पण आज मात्र गाडी चालवण्याचा उपभोग घेत होतो. दुपारी १ ला चंडीगडला पोहोचलो. बुलेटच्या सर्विस सेंटरला आधीच फोन करून कळवलं होतं. चंडीगड म्हणजे एकदम नियोजन करून बांधलेलं शहर. सगळे रस्ते जवळ जवळ काटकोनात आणि सगळी कडे सेक्टर्स पाडलेले आहेत. तरी त्या नवीन शहरात सर्विस सेंटर शोधण्यात अर्धा तास गेला. अखेर ते मिळालं आणि आपली गाडी पुन्हा नवी होणार याचा आनंद झाला. त्या बरोबर तुषारला पुढच्या ब्रेकची नवीन लिवर मिळणार याचा त्याला जास्त आनंद झाला होता. बिचारा घरून निघाल्या पासून चार दिवस अर्ध्या लिवरवर ब्रेकचं काम भागवत होता. हात दुखत असून सुद्धा सहन करत होता. कृष्णाला फोन करून चंडीगड मध्ये दाखल झाल्याचं कळवलं.

Gadi

चांगले २-३ तास थांबून दोनीही गाड्या सर्विस करून घेतल्या. चमचम करणारी गाडी बघून खूप बरं वाटत होतं. कामावरून सुटल्यावर कृष्णा घ्यायला आला आणि मग आम्ही दोघे त्याच्या पाठोपाठ त्याच्या घरी गेलो. गप्पा रंगायला सुरुवात झाली. आम्ही जवळ जवळ १० वर्षानंतर भेटत होतो. कॉलेजच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. गप्पा मारताना, फक्त एकच रात्र राहणार आहे हे कळाल्यावर गडी नाराज झाला पण परतीच्यावेळी पुन्हा चंडीगड मुक्काम दोन दिवस करेन असं सांगितल्यावर स्वारी खूष झाली. दोन दिवसात चंडीगडला पोहोचणार होतो पण चार दिवस लागले होते. जे काही ठरवलं होतं तसं काहीच होत नव्हतं. पण याची फिकीर कोणाला? लेहला जायचं, एवढं ध्येय होतं आणि आम्हाला फक्त तेच दिसत होतं (पक्षाच्या डोळ्याप्रमाणे). बाहेर जाऊन मस्त जेवण केलं, पुन्हा घरी आलो (यावेळी रूम नव्हती, घर होतं) आणि झोपलो. दिवसाची सांगता छान चांगली झाली होती.

कृष्णाला ७.०० ला कामाला जायचं असल्याने सकाळी लवकर उठलो. लगेच आवरलं आणि कृष्णा बरोबरच बाहेर पडलो. कृष्णा हायवे पर्यंत सोडायला आला होता. आज मनालीला पोहोचायचं ठरलं होतं. अंतर ३०० km, म्हणजे रोजच्या पेक्षा कमीच, त्यामुळे आजचा मुक्काम ठरलेल्या ठिकाणीच होणार हे निश्चित वाटत होतं. नाष्टापाणी न करता, तसेच चंडीगड सोडला आणि एक दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सुरु झाला. दिसाड पावसात चिंब भिजणे काय असते? ते आम्हाला विचारा. धो धो पावसात शिमला रोडने पुढे गेल्यावर पिंजनौर मध्ये शिमल्याकडे जाणारा रस्ता सोडून डावीकडे बद्दी मार्गे स्वारघाट कडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो. जस जसं बद्दी जवळ यायला लागलं तस तसं पावसाचा जोर कमी झाला. मधेच एके ठिकाणी आम्हाला TVS मोटर्सचा कारखाना दिसला. दोन अडीच तास गाडी चालवल्यावर एका ढाब्यावर थांबलो. भरपेट जेवण केलं आणि निघालो. आता कुठे खरा प्रवास सुरु झाला होता. स्वारघाटच्या डोंगररांगा दिसू लागल्या होत्या. स्वारघाटकडे जाताना जो घाटरस्ता सुरु झाला तो झालाच. एका नंतर एक डोंगर चढत होतो, उतरत होतो. वासुंधरेने हिरवा शालू नेसला होता. वर निरभ्र आकाश आणि आजूबाजूला हिरवळ पाहून मनाला प्रसन्न वाटत होतं.

Nisarga1

Nisarga2

घाटरस्ता धरल्यापासून, रस्त्याच्या बाजूने नदी दिसायला सुरुवात झाली, कधी ती उजव्या बाजूला असायची तर कधी डाव्या बाजूला, कधी ती आमच्या बरोबर वाहायची तर कधी आमच्या विरुद्ध. कधी ती संथ वाहत होती, कधी खळखाळाट करत धावत होती. कशीही असो आणि काहीही होवो तिने साथ काही सोडली नाही. जस जसं स्वारघाट जवळ यायला लागला तस तसं डोंगर आणखी उंच होऊ लागला आणि ढग खाली येऊ लागले. आपल्याकडे पावसाळ्यामधे, सह्याद्रीत हे दृश्य सगळीकडेच पाहायला मिळतं पण आम्हाला ते उत्तरेत पाहायला मिळत होतं. ढगातून वाट काढत आम्ही पुढे जात होतो. हवेतला गारवा हवा हवासा वाटत होता. बघता बघता स्वारघाटला पोहोचलो. थोडा वेळ थांबलो. डोळे भरून आजू बाजूचा निसर्ग पाहून घेतला आणि पुढे निघालो.

सकाळ पर्यंत चमकणारी... काही तासातच स्वारघाटला पोहोचल्यावर हि अशी झाली.
RE

Nisarga5

Nisarga7

घाट रस्ता असल्यामुळे, दुहेरी वाहतूक सुरु झाली होती. एकतर दुहेरी वाहतूक, त्यात जास्तीजास्त ट्रकवाले, आणखी कहर म्हणजे खड्डेमय रस्ता. त्यामुळे गाडी चालवण्याचा वेग बराच कमी झाला होता. तरी उतारावर थोडा वाढायचाच. जमेल तिकडे खड्डे चुकवत, जमेल तिथे जमेल त्या वाहनांना मागे टाकत पुढे सरकत होतो. असेच जात असताना एका उतारावर घोळ झाला आणि मी पडलो. पुढे बऱ्यापैकी अंतरावर एक ट्रक चालला होता आणि मी त्याच्या पाठोपाठ. अचानक एक खड्डा चुकवता न आल्यामुळे त्यातून हळू जावं म्हणून मी जोरात ब्रेक दाबला आणि तिथेच चूक केली. तो इतक्या जोरात दाबला गेला कि गाडी स्लीप झाली आणि मी पडलो. मागून तुषार येत होता, त्याचही मित्रप्रेम अगदी त्याच वेळेला उफाळून आलं आणि तोही लगेच गळाभेटीला आला. मी पडलो होतोच, तोही पडला. फरक इतकाच कि त्याची गाडी पडली पण तो अडवा नाही झाला. नशीब तेव्हा मागे कोणतीहि गाडी नव्हती. नाही तर काही खरं नव्हतं. असो... तुषारने उठून त्याची गाडी बाजूला घेतली. मी हि तो पर्यंत गाडीचं इंजिन बंद करून गाडी उचलण्याचा प्रयत्न करत होतो. तळ हाताला खर्चटलं होतं बाकी काही विशेष लागलं नव्हतं. गाडीला लेगगार्ड असल्याचा फायदा झाला (पाय वाचले होते). तो परत येई पर्यंत जाणारी येणारी वाहन काही झालच नाही, अशा तोर्यात निघून जात होती. तुषार आणि मी दोघांनी मिळून माझी गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. तोंड-हात धुतले, पाणी प्यायलो, दोनीही गाड्यांना काही झालं का? ते पाहिलं आणि तिथेच १०-१५ मिनिटे थांबलो. सगळकाही नॉर्मल झाल्यावर तिथून निघालो आणि पुढे एके ठिकाणी चहासाठी पुन्हा थांबलो. चहा घेतला, थोडा आराम केला आणि पुढे निघालो. आता गाडी जास्तच लक्षपूर्वक चालवत होतो. बराच वेळ वळणा वळणाच्या रस्त्यावर गाडी हाकून झाल्यावर एके ठिकाणी छोटं धारण ओलांडून
पुढे गेलो. थोडंसं वर चढल्यावर एके ठिकाणी चहासाठी थांबलो.
Nisarga3
या बाजूने धरणाचा नजारा छान दिसत होता. पुन्हा १० - १५ मिनिटे आराम केला आणि निघालो. संध्याकाळचे ४ वाजले असतील. सकाळ पासून अनुभवलेला रस्ता बघून मनालीला पोहोचायला रात्र होणार हे निश्चित होतं. पण मनाने निर्धार केला होता, काहीही झालं तरी मनाली मुक्काम चुकवायचा नाही. कारण तो चुकला तर आधीच चुकलेली गणितं आणखीनच चुकणार होती. रस्त्याच्या बाजूला असलेल्या नदी बरोबर आमचा प्रवास सुरूच होता. जाता जाता एके ठिकाणी भोगदा आला. लांबीने साधारण २-२.५ km पण रुंदी ने तसा लहानच होता. पुढे चाललेल्या मोठ्या गाडीला ओवरटेक करायला सुद्धा जागा नव्हती. भोगदा पार झाला आणि जगच बदलल्या सारखं वाटू लागलं.

Nisarga4

मनाली लांब असून सुद्धा जवळ वाटू लागली. नदीच्या पाण्याचा खळखळाट वाढला. पाण्याचा तो अजब नादब्रह्म बराच वेळ आमच्या बरोबर होता. तो निसर्ग मनात साठवत हळू हळू पुढे जात होतो. थोडं पुढे गेल्यावर आधुन मधून लांब जाऊन जवळ येणारी नदी खूपच जवळ आली. इतकी कि कोणत्याही ठिकाणी रस्त्याच्या कडेला गाडी लावून दोन पाऊलं पुढे टाकली कि नदीत उतरता येईल. बघता बघता कुलू पार केलं. ६.०० वाजून गेले होते. अंधार पडायला सुरुवात झाली होती. ढग दाटून आले होते त्यामुळे जास्तच अंधारून आलं होतं. आता तर मनाली आलंच असं वाटू लागलं होतं. किती तरी वेळ आम्ही मनालीचा बोर्ड दिसण्याची वाट बघत होतो पण एकही बोर्ड दिसेल तर शप्पथ. रस्ता लहान झाला होता आणि ठिकठिकाणी दगड धोंड्यांचा होता. रस्त्याच्या दुतर्फा छोटी छोटी घरं, रेसोर्ट दिसायला सुरुवात झाली होती. आम्हाला वाटलं मनालीत पोहोचलो. मग एके ठिकाणी हॉटेल मध्ये रूमची चौकशी केली तेव्हा कळलं मनाली आणखी २० km आहे. आयला!!! आणखी अर्धा तास तरी सुट्टी नाही. जिथे थांबलो होतो तिथेच एक सफरचंदाच झाड दिसलं.

Safarchanda

इतके दिवस सफरचंद फक्त फळाच्या गाडीवर सजवलेली पहिली होती. पहिल्यांदा ती झाडावर सजलेली पाहून जाम भारी वाटलं. लगेच फोटो काढून घेतला आणि पुढे निघालो. पाऊस पुन्हा सुरु झाला. सामान भिजू नये म्हणून लवकरात लवकर मनालीत पोहोचून हॉटेल शोधणे गरजेचे होते. पुन्हा गाडी दामटायला सुरुवात केली. वरवर भिजलो पण अखेर मनालीत पोहोचलो. एक दोन हॉटेल बघून राहण्याची जागा निश्चित केली. सगळं व्यवस्थित आवरलं, घरी फोन करून सगळा रिपोर्ट देणे आणि रोजचा हिशोब करणे या नित्यनियम बनलेल्या दोन गोष्टी केल्या, गप्पा मारत मस्त जेवलो आणि झोपलो.

क्रमशः

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Dec 2012 - 12:08 pm | प्रचेतस

मस्त सफर चाललीय.
आता इथून पुढच्या भागांमध्ये अवर्णनीय निसर्गसौंदर्य असणार हे नक्की.

बॅटमॅन's picture

26 Dec 2012 - 12:12 pm | बॅटमॅन

अजून येऊंद्यात......हा भाग टाकायला अंमळ लेट केलात, पण छान जमला आहे.

रणजित चितळे's picture

26 Dec 2012 - 12:52 pm | रणजित चितळे

पुढच्या भागांची वाट बघत आहे. एक फोटो दिसू शकत नाहीये मला

एक्दम स्पीडमध्ये वाचता वाचता अचानक

अचानक एक खड्डा चुकवता न आल्यामुळे त्यातून हळू जावं म्हणून मी जोरात ब्रेक दाबला आणि तिथेच चूक केली. तो इतक्या जोरात दाबला गेला कि गाडी स्लीप झाली आणि मी पडलो.

हे वाचून तो रस्त्यावरचा खड्डा माझ्या पोटात पडला.

असो, कधी एकदाचे लेहला पोहोच्तो असे झाले आहे.

- (भटक्या) सोकाजी

इरसाल's picture

26 Dec 2012 - 1:26 pm | इरसाल

सफर. पण तेव्हढ मधे मधे खडे येत आहेत ते टाळा जरा. (शब्दांच्या चुका )

धन्यवाद..... सापडल्या तितक्या पुन्हा सुधारल्या आहेत...

इरसाल's picture

27 Dec 2012 - 9:44 am | इरसाल

धन्यवाद

लेख संपूच नये असे वाटते, इतकी छान झालिय तुमची सफर,
पण पु.भा.प्र.

मृत्युन्जय's picture

26 Dec 2012 - 1:47 pm | मृत्युन्जय

मस्त रे मनोबा. वाचतोय. लौकर लौकर येउद्यात पुढचे भाग

सूड's picture

26 Dec 2012 - 1:50 pm | सूड

हाही भाग छान !!

रोहन अजय संसारे's picture

26 Dec 2012 - 3:13 pm | रोहन अजय संसारे

स्वारघाट वाचून स्वारगेट ची आठवण झाली असेल ना. पुढच्या भागाची वाट पाहत आहे. खूप चं छान प्रवास चालू आहे. पडलात ते वाचून जरा वाइट वाटले पण प्रवास परत चालू झाला हे वाचून खूप खूप आनंद झाला. फोटो खूप चं छान आले आहेत.

५० फक्त's picture

26 Dec 2012 - 3:50 pm | ५० फक्त

मस्त रे, लई भारी. येउदेत. अचानक ब्रेक दाबल्यावर काय होतं याचा याची देही याची गुडघी अनुभव घेतलेला आहे, त्यामुळं त्यावेळच्या तुझ्या भावना जगु शकतो.

चेतन माने's picture

26 Dec 2012 - 4:32 pm | चेतन माने

भन्नाट हा एकच शब्द सुचतो तुमचा प्रवास बघून!!! आधीचे भाग सुद्धा वाचले धमाल मज्जा येतेय.
बाकी मिपावर भटकंतीची मेजवानीच सुरु आहे. तिकडे dragonच्या देशात(एस्पिकचा एक्का) , सियाचीन ग्लेशियर(रणजीत चितळे) आणि तुमची लेह्वारी !!!!
पुभाप्र :)

मी-सौरभ's picture

26 Dec 2012 - 4:38 pm | मी-सौरभ

अजुन एक मस्त भाग :)

सरुटॉबानेकडे अजुन एक पाऊल

प्यारे१'s picture

26 Dec 2012 - 4:44 pm | प्यारे१

आन दो आन दो :)

गणेशा's picture

26 Dec 2012 - 6:12 pm | गणेशा

सफर मस्त ..
पण गाडी सोडुन दूसरे पण जास्त बोला राव .. का जळवताय सारखी गाडी गाडी बोलुन आणि तिचेच फोटो टाकुन

तिमा's picture

26 Dec 2012 - 6:24 pm | तिमा

चांगली चाललीये.
वासुंधरेने हिरवा शालू नेसला होता
हे वाचून वसुंधरेचे एक भलतेच रुप डोळ्यांसमोर उभे राहिले.

रेवती's picture

26 Dec 2012 - 8:57 pm | रेवती

ग्रेट! ग्रेट!! ग्रेट!!!
आता लवकरच पुढचे लेखन येऊदे. सगळ्या मिपाला बरोबर घेऊन सफर चाललीये.

रामपुरी's picture

26 Dec 2012 - 10:53 pm | रामपुरी

चंदीगढ - मनाली अंतर कमी वाटत असलं तरी तो प्रवास आख्खा दिवस खातो.

लेहची वाट छान दाखवताय.. पुढचे भाग येऊ द्या पटपट.

कौशी's picture

27 Dec 2012 - 8:32 am | कौशी

फोटो जरा आणि येउ द्या

उत्सुकता ताणली जाणे हा काय प्रकार असतो याचा प्रत्यय ह्या भन्नाट सफरीमधुन येतोय
कधी पुढचा भाग येतोय असे झालेय ,पुढील भागाच्या प्रतिक्षेत :)

चौकटराजा's picture

27 Dec 2012 - 8:35 pm | चौकटराजा

ते धरण म्हणजे मंडी सोडल्यावर जरासे पुढे गेल्यावर आहे तेच ना मनराव ? त्याच धरणाच्या कट्ट्यावर बसून आम्ही सिमल्याच्या हॉटेल मधे रूमवर तयार करून नेलेला उपमा खाल्ला. आपल्या प्रयत्नाबद्द्ल त्रिवार कौतुक !

मेघनाद's picture

1 Jan 2013 - 6:07 pm | मेघनाद

आपल्या एवढा नाही पण १५०० कि.मी चा कोकण प्रवास दुचाकीवरून तोही पत्नी सोबत केला आहे, त्यामुळे आपले प्रवास वर्णन वाचताना मजा येतेय, कृपया पुढील भागाची फार वाट पाहायला लावू नका.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2013 - 12:08 am | अत्रुप्त आत्मा

महान सफर,,,महान वृत्तांत...! अता पुढला भाग लवकर येऊ देत.

कौन्तेय's picture

2 Jan 2013 - 10:57 pm | कौन्तेय

याचा वाक्यागणिक पुनःप्रत्यय घेत आहे. मी २००० साली नर्मदायात्रा नि केरळ अशा बजाज कॅलिबर ट्रिपा केल्या त्यावेळचा माझा नेम सांगतो. अंधारात गाडी चालवायची नाही. सक्काळी ६ वाजता गाडी सोडायची. वाटेत मिळेल तो नाश्ता फ़क्त करायचा, पण दुपारचं जेवण कदापि नाही. शरीरास पाणी मात्र पुरवत रहायचं. संध्याकाळी पाच ते सात या दरम्यान ज्या कुठल्या जिल्ह्यात / तालुक्यात / नगरात पोहोचू तिथे मुक्काम टाकायचा नि धर्मशाळेची विचारणा करायची. साधारणतः कुठल्याही देवळात पाच - पंचवीस ते दीडशे रुपयापर्यंत मुक्कामाची सोय होत असे (त्या प्राचीन काळी). न पेक्षा लॉज. सकाळी निघताना आंघोळ न झाली तर अडचण नाही; पण संध्याकाळची कढत पाण्याची आंघोळ सक्तीची. शक्य झाल्यास जेवायच्या आधी. संध्याकाळचं जेवण स्थानिक धाब्यावरचं सगळं अन्न फ़स्त करण्याच्या आवेशात करायचं नि दिवसाचा हिशेब मांडून रात्री नवाच्या सुमारास झोपून जायचं.
सोबत मित्र असल्याने तुमची ट्रीप जास्त रंगित झालिए यात शंकाच नाही. येऊ द्या आणखी.

कौतुकास्पद आहे अशा प्रकारचा प्रवास. मात्र या निमित्ताने फार पूर्वीपासून मनात असलेला पण विचारण्यासाठी योग्य व्यक्ती भेटत नसलेला एक प्रश्न विचारतो.. कोणीही सोबत नसताना एकट्याने दूरवरची सफर करणं (बाईकने ऑर अदरवाईज) यामागे नेमकी काय प्रेरणा असते? विशेषतः असं वाटतं की माझ्यासारखे लोक केवळ कोणातरी सोबत असतानाच आणि त्या व्यक्ती /ग्रुपसोबत अनुभव शेअर करण्यासाठीच भटकंती करु शकतात. कोणी सोबत नसेल तर आपल्याला आलेले अनुभव हे जंगलात कोसळलेल्या झाडाच्या आवाजासारखे अस्तित्वातच नाहीत की काय अशी विचित्र भावना मनात येते.

कोणीतरी सोबत आहे म्हणूनच प्रवास (पर्यटन अशा अर्थाने, हपीसचे दौरे नव्हेत), अशी कल्पना मनात घट्ट असल्याने इथे भारतात येणारे फॉरेन टुरिस्ट जेव्हा आपला गट सोडून एकेकटे सॅक खांद्यावर मारुन चार दिशांना विखुरतात, आणि प्रवासानंतर एकत्र येतात, त्यांच्या तसल्या एकटेपणाच्या भटकंतीविषयी मला नेहमी उत्सुकता वाटत आली आहे..

काय भावना असतात अशा प्रबासात?

कौन्तेय's picture

4 Jan 2013 - 7:26 pm | कौन्तेय

माझ्या अनुभवानुसार कुठल्याही इतर नशेखोरीसारखी निर्निमित्त भरकटणे हीही एक नशाच असते. स्वतः ट्रेकर असल्याने तुम्हालाही हे अनुभवाने माहितच आहे म्हणा. आणि तिचं व्यवस्थित व्यसनही लागू शकतं. त्यात एकटेपणाचा चटका आणखीन वेगळा आहे. पण अशावेळी माणूस खरोखर पाशरहित असावा. बायको-पोरांना घरी ठेवून आता जर मी अशी एकट्याची मोहीम काढलीच तर ती जुनी मजा खचितच येणार नाही. माझं व्यक्तीगत तात्कालिक कारण म्हणाल तर त्यावेळेस गोनीदांच्या ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’चा माझ्यावर पगडा होता.

खुपच छान... अप्रतिम अनुभव आहे.... पुढचा भाग पण लवकर येउद्या...

नरेंद्र गोळे's picture

3 Jan 2013 - 9:23 pm | नरेंद्र गोळे

लगे रहो!

टाकीतच तुटली किल्ली, झाले थोडे ।
तरी वाटे विषाद, माणूस रिक्षा ओढे ॥
मग जमवून सारे पुन्हश्च जुळले घोडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ ७ ॥

बद्दी गेल्यावर नदीही सोबत आली ।
फिरली, चढली, कधी उतरली खाली ॥
वाटेत धुळीने मळले, वाहनी घोडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ ८ ॥

घाटात दुहेरी वर्दळ, खड्डे थोर ।
कचकचले लगाम‌, पडले दोघे वीर ॥
अवघडले रस्ते, दाटून आले थोडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ ९ ॥

कौन्तेय's picture

4 Jan 2013 - 11:28 am | कौन्तेय

नरेंद्र, तुमचे मन मोठे आहे. झटक्यात नि मनापासून दुसऱ्याचे कौतुक करण्यात तुमचा हात कोण धरणार? अर्थात्‌ मनरावांचा पराक्रमही तसाच आहे म्हणा -

रणजित चितळे's picture

5 Jan 2013 - 10:11 pm | रणजित चितळे

................