'लेह' वारी, भाग ४

मनराव's picture
मनराव in भटकंती
8 Jan 2013 - 7:19 pm

'लेह' वारी, भाग १
'लेह' वारी, भाग २
'लेह' वारी, भाग ३

अखेर मनालीत पोहोचलो. एक दोन हॉटेल बघून राहण्याची जागा निश्चित केली. सगळं व्यवस्थित आवरलं, घरी फोन करून सगळा रिपोर्ट देणे आणि रोजचा हिशोब करणे या नित्यनियम बनलेल्या दोन गोष्टी केल्या, गप्पा मारत मस्त जेवलो आणि झोपलो.

भरपूर आराम मिळाल्यामुळे सकाळी लवकर जाग आली. पाण्याचा आवाज येत होताच. आधी वाटलं कि अजूनही पाऊसच चालू आहे पण खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं तर शेजारून नदी वाहताना दिसली. पाण्याचा खळखळाट ऐकून आणि शेजारी असलेल्या डोंगरावरचा निसर्ग पाहून टवटवीत झालो.

खिडकितून बाहेर पहाताना...समोर डोंगर आणि पायथ्याशी खळखळाट करणारी नदी
Nisarga

पटापट सगळं आवरलं आणि हॉटेल सोडलं. नुसतं वाचून आणि ऐकून माहिती होतं कि इथून पुढचा प्रवास खडतर आणि आव्हानात्मक आहे. आता तो आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायचा होता. मनाली पासून लेह पर्यंत, मधे तंडी सोडलं तर, कुठेही पेट्रोल पंप नाही हे माहिती होतं आणि तंडी, मनाली पासून फार काही लांब नाही हेही माहिती होतं म्हणून मग मनाली मधेच दोनीही गाड्यांमध्ये पेट्रोल फुल भरून घेतलं, शिवाय रिस्क नको म्हणून दोन कॅन मधे आणखी ५ -५ लिटर पेट्रोल घेतलं. आणखी एक महत्वचा घटक म्हणजे पैसे. लेह पर्यंत कोणत्याही बँकेची शाखा अथवा ATM नाही. अहो ज्या रस्त्यावर बऱ्याचश्या ठिकाणी गवताची कडी सुद्धा बघायला मिळत नाही, तिथे या गोष्टींची काय गत असेल. असो... दोन महत्वाची कामं झाली आणि आम्ही निघालो. पुढे गेल्यावर लक्षात आलं कि घरी फोन केला पाहिजे, कारण BSNL पोस्टपेड व्यतिरिक्त लेह पर्यंत इतर कोणतही कार्ड चालत नाही. लगेच थांबून घरी फोन लावला. १०-१५ मिनिटे बोलून झालं, त्यात बोलताना हे हि सांगून टाकलं कि आता जर मधे फोन नाही मिळाला तर थेट दोन दिवसांनतर "लेह" मधे पोहोचलो कि फोन करेन. दोनचार निसर्गाचे फोटो काढले आणि निघालो.

मनालीतून निघताना... वाहुन गेलेला पूल
Pool

तुषार...
Tushar

Dhabdhaba

Dhabdhaba

छोटे छोटे आणि पांढरे शुभ्र धबधबे दिसायला लागले. आता कुठे निसर्गाच रूप हळूहळू उमलायला लागलं होतं आणि आम्ही हळू हळू समुद्र सपाटी पासून वर आणि मानवी जगा पासून लांब जायला लागलो होतो. जिकडे पाहू तिकडे त्याने...हो त्या निसर्गानेच सुंदर चित्र रेखाटलेलं दिसत होतं. आम्ही ते सगळं डोळ्यात साठवून पुढे पुढे मार्गक्रमण करत होतो. आता प्रवास आरामात करायचा होता, काही घाई नव्हती. वाट्टेल तिथे थांबत होतो, मनमुराद आनंद घेत होतो आणि पुढे जात होतो.

घाट रस्ता.
Ghat

मी...
Me

अवाढव्य डोंगर... ट्रक शोधा बरं....
Nisarga

Nisarga

रोहतांग पास (उंची 3,979 मीटर, 13,054 फुट) अजून लांब होता. पण त्याच्या अलीकडेच पावसाचा आणखी एक रंग पाहायला मिळाला. रंग म्हणण्या पेक्षा पाऊस आपल्याला आणखी एका प्रकारे कसा गंडवू शकतो ते पाहायला मिळालं. रोहतांग पासच्या १०-१५ km अलीकडे, रात्री धो-धो पाऊस पडून गेला होता. त्यामुळे आधीच नसलेला रस्ता अगदीच खराब झाला होता. जिकडे तिकडे चिखलच चिखल. रस्त्यावर १ - १.२५ फुट चिखल आणि त्यातून बुलेट सकट वाट काढणारे आम्ही दोघे. आम्ही तसे बरेच वर गेलो होतो, इतके कि आजू बाजूला ढग होते. ढगांमुळे हवेत गारवा होता, पण गारवा असून सुद्धा, ते धूड सांभाळून सांभाळून आम्ही दोघेही घामेघूम झालो होतो. एखादा ट्रक अधून मधून आमच्या बाजूने निघून जायचा. असेच मोठी वाहने जाऊन जाऊन जो रस्ता तयार झाला होता त्यातून कसेबसे पुढे (अक्षरश:) रांगत होतो. बुलेट वर बसून जायचं तर सोडाच. खाली उतरून, गाडी चालू करून, गियर मध्ये टाकून तिला आणि स्वतःला पुढे ढकलत होतो. ५ - १० मिनिटाला थांबत होतो. जिथे जमीन (रस्ता नव्हे) थोडी कडक असेल, तिथे गाडीवर बसायचं, नसेल तिथे खाली उतरून ढकलत जायचं. असं सारखच चालू होतं. इतक्यात एक फिरंगी जोडपं, एकाच बुलेटवर वरून येताना दिसलं. आमच्या जवळ आल्यावर ते थांबले. आम्ही एकमेकांना पहिला प्रश्न विचारला......बाबारे !!! आणखी किती वेळ असाच रस्ता आहे ? मी सांगितलं २-३ km असेल अजून, मग निवांत जा. त्याचं पण तेच उत्तर आलं, "अजून किमान ३-४ km तरी असेल, नंतर एकदम चकाचक रस्ता आहे". आणखी ३-४ km ऐकून काय म्हणावं तेच कळेना? कुठून बुद्धी सुचली आणि इकडे आलो असं वाटायला लागलं. वजन पेलून पेलून खांदे भरून आले होते. एकदा तर असं वाटलं, जाऊदे, मरुदेत...इथेच बसून राहू, जो पर्यंत रस्ता नीट होत नाही. मधे मधे BRO (Border Road Organisation) वाले रस्ता दुरुस्त करताना दिसत होते. पुन्हा पाऊस पडला कि सगळी मेहनत वाया जाणार हे माहिती असून सुद्धा तिथल्या लोकांसाठी, पर्यटकांसाठी ते अथक परिश्रम घेत होते आणि पुढेही घेत राहणार होते. असो... एके ठिकाणी तर मला त्यांनी मोलाचा सल्ला पण दिला. मी आपला गाडीवर बसून जाता यावं म्हणून कडे कडेने (दरीच्या) जात होतो. तिथे जमीन थोडी कडक होती म्हणून, पण अचानक एके ठिकाणी रस्ता खचला असल्यमुळे पुढे जाता येईना. गाडीवरून खाली उतरलो आणि काय करावं हा विचार करत होतो. तुषार अजून मागेच होता. तो तिकडे अडकल्यामुळे त्याने माझ्या मदतीला येणे शक्यच नव्हते. मागे फिरायचा पर्याय पण नव्हता. एकच पर्याय होता, गाडी चिखलात घालणे. पण ते तरी कुठे जमत होतं. आधीच हात पाय दुखत होते, त्यात दरीच्या कडेचा भाग उंच, ज्याच्यावर मी गाडी सकट उभा, एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला गाडीच्या पलीकडे फुटभर चिखल. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी गत झाली. तेव्हाच ते BRO वाले देवा सारखे धावून आले. त्यांनी गाडी ढकलायला मदत केली आणि मी चिखलात उतरलो. जाता जाता एक जण सांगून गेला. "काहीहि झालं तरी दरीच्या कडेने जाऊन नका, फुकट पडून मराल. त्या पेक्षा मधून जा, चिखलातून, काही होणार नाही". हे ऐकल्यावर पुन्हा काय मी गाडी कडेला न्यायची डेरिंग केली नाय. असाच एके ठिकाणी आराम करायला थांबलो होतो, तेव्हा आणखी एक जण वरून खाली ट्रेक करत उतरत होता. तो आमच्या जवळ आला आणि
इसम: मी मेकॅनिक आहे. आत्ताच एकाची क्लच प्लेट बदलून येतोय. तुम्हाला काही मदत हवी आहे का ?
मी: नको रे बाबा, अजून तरी गाडी धडधाकट आहे. काही प्रोब्लेम नाही.
इसम: तुम्हाला या चिखलातून गाडी काढून देऊ का ?
मी (मनात): तुला पैसे देऊन गाडी इथून बाहेर काढायची असती तर इथे कशाला मारायला आलो असतो. जा निवांत तू खाली.
मी: नको आम्ही जाऊ जमेल तसं.
इसम: हे घ्या माझं कार्ड!. काही लागलं तर फोन करा.
मी (मनात): तुला फोन लावायला नेटवर्क तर हवं ना !!!
मी: बरं!!!
तो कार्ड देऊन झपझप खालच्या प्रवासाला लागला आणि आम्ही वरच्या प्रवासाला. कधी गाडीवर, कधी चालत असं जवळ पास ७-८ km हा खेळ चालू होता. तो पट्टा ओलांडून जायला आम्हाला २.५ ते ३ तास लागले.

चिखलमय..
Chikhal

चिखलमय...
chikhal

Road

road

road

Road

वाटसरु मी.
Me

हि वाट दुर जाते.. स्वप्नातल्या गावा......
Road

BRO कामगार.......
BRO

पुढे मग रस्ता चांगला लागला आणि आम्ही एके ठिकाणी थांबलो. जेव्हा त्या भंगार रस्त्यावर होतो, तेव्हा चीखलात लपलेल्या दगडांचा अंदाज न आल्याने गाडीच्या इंजिनला आणि सायलेन्सरला बऱ्याच वेळा मार लागला होता. पण दर वेळेस थांबून ते बघणं जीवावर यायचं म्हणून मग असं निवांत थांबल्यावर सगळं पुन्हा चेक केलं. फार काही विशेष झालं नाहीये समजल्यावर जीव भांड्यात पडला. फक्त एका कॅन मधून पेट्रोल हळू हळू गळतय हे लक्षात आलं. नक्की कुठून ते काही कळलं नाही. दोनीही गाड्यांमध्ये भरपूर पेट्रोल आणि दुसरा कॅन होता, तो अर्धा भरलेला, त्यामुळे त्यात पेट्रोल टाकून हेन्काळून सांडणार म्हणून मग पहिला कॅन रिकामा पण करता येईना. थोडं पेट्रोल चांगल्या कॅन मधे टाकलं आणि बाकी तसच घेऊन जायचं ठरलं. म्हंटल गाडीत टाकू अजून थोडं पुढे गेल्यावर. मग थोडा वेळ गप्पा मारत बसलो. बोलताना तुषारने सांगितल कि येताना तो एका मोठ्या दगडावर गाडी सकट चढला होता, पण नशीब चांगलं म्हणून फार काही न होता गाडी खाली घेऊन सुखरूप आला. हे नंतर ऐकायला छान वाटलं पण त्याने जे काही त्या वेळेला अनुभवलं ते त्याचं त्यालाच माहिती. सकाळी निघाल्या पासून काही खाल्लं नव्हतं आणि एवढी मेहनत केल्यावर भूक पण खूप लागली होती. मग अशा अडनानिड वेळी उपयोगी पडेल म्हणून तुषारने आणलेल्या सुक्यामेव्यावर ताव मारला. अर्धा तास घालवला आणि पुढे निघालो. पुढचा रस्ता लई म्हणजे लईच भारी होता. आता वर्णन करण्यापेक्षा फोटोच बघा.

Road

Road

Nisarga

वातावरणात बदल....
Nisarga

Nisarga

Nisarga

Road

Dongar

सगळं डोळ्यात आणि मनात साठवून आम्ही पुढे जात होतो. दोघेही थोड्या फार अंतराने मागे पुढे रहात होतो. पेट्रोल कॅनच हेन्काळणं थांबलं होतं, पण पेट्रोल तरीही बाहेर येतच होतं. एकतर पेट्रोल मिळण्याचे वांदे आणि हे भरभर उडून गेलं तर जायचं कसं ? शेवटी एके ठिकाणी थांबलो आणि तो गळका कॅन दोनीही गाड्यांमध्ये रिकामा केला तेव्हा कुठे बरं वाटलं. प्रवास मस्त चालू होता. कधी एखादि जागा आवडली म्हणून तो थांबायचा, कधी मी थांबायचो आणि कधी आम्ही दोघेही थांबायचो. सकाळी झाली तेवढी गडबड, धडधड पुरे नव्हती कि काय, कि आणखी एक घोळ माझ्यासाठी झाला. एकदा मी फोटो काढायसाठी थांबलो आणि हा गेला पुढे निघून. फोटो काढून झाल्यावर मीहि मागोमाग आलो आणि एके ठिकाणी रस्त्याला दोन फाटे फुटले तिथे थांबलो. आमचे महाशय कसलीही खुण मागे न सोडता कोणत्या रस्त्याने गेले याचा काहीच पत्ता लागत नव्हता. आजू-बाजूला दऱ्या डोंगरांशिवाय काहीच नाही. बरं सावलीला तिथे एक झाड सुद्धा नाही. न कोई आगे , न कोई पिछे, १०-१५ मिनिटे एकटाच त्या जागी थांबलो होतो. कुठून जावं हा विचार करत बसलो. तेव्हा मागून एक गाडी आली. त्यांना हात करून थांबवलं.
मी: केलोंगचा को कहाँ से जानेका ?.
ड्रायवर: कौनसा भी रस्ता ले लो. दोनो उधरही जाता है !
मी (मनात): झाली का पंचाईत? आमचे साहेब कुठून गेलेत कुणास ठाऊक ?
मी: कौनसा रस्ता से ज्यादा गाडी जाती है ?
ड्रायवर एका फाट्या कडे बोट दाखवून, दुसऱ्या फाट्याने निघून गेला. आयला मला एक रस्ता सांगतोय आणि स्वतः दुसऱ्या रस्त्याने जातोय. पुन्हा तिथे १० मिनिट थांबलो. मागून एक ट्रक आला आणि ड्रायवर ने दाखवलेल्या रस्त्याला वळला.

Truck

मग काय आधीच्या आणि ह्या दोनीही ड्रायवर विश्वास ठेवून ट्रक गेला त्या दिशेने पुढे जायला सुरुवात केली. म्हंटल बघू हा शहाणा (तुषार) भेटला तर ठीक नाही तर संध्याकाळी सापडेलच, जातोय कुठे या वाळवंटात? धुळीने माखलं जाऊ नये म्हणून पटकन ट्रकला ओवरटेक केलं आणि पुढे गेलो. रस्त्यात तो(तुषार) दिसतोय का बघत होतो आणि फाट्यावर थांबला नाही म्हणून शिव्या घालत होतो. बराच पुढे गेल्यावर बंधू एके ठिकाणी फोटो काढताना दिसले तेव्हा कुठे जीवात जीव आला. त्याच्या जवळ गेलो, थांबलो, चार शिव्या घातल्या आणि सोबत चार फोटो काढले. पुन्हा अस काही करायचं नाही हे बजावलं आणि पुढे निघालो. एकदा थांबून पुन्हा पेट्रोल भरण्याचा कार्यक्रम झाला. दुसरा कॅन पण रिकामा केला आणि पेट्रोल उडून जाण्याची काळजी मिटली. सकाळी निघाल्यापासून सुक्यामेव्या शिवाय काही खाल्लं नव्हतं, हॉटेलचा तर पत्ताच नव्हता. साधारण दोन वाजता एक गाव दिसलं. गाव कसलं १५-२० कुटुंब रहात असतील एवढेच लोक. पण महत्वाचं कारण तिथे हॉटेल, ढाबा काहीही म्हणा ते होतं. मेनू ठरलेलाच. मिक्स डाळीची उसळ, पोळी, भात आणि वरण. पोटभर जेवलो आणि जेवण झालं कि चहा प्यायला. ते गाव दरीत होतं, त्यामुळे उन असून सुद्धा हवेत गारवा होता आणि गार वातावरणात गरम गरम चहा पिण्यात काय मजा असते ते सांगायलाच नको. थोडा आराम केला आणि पुढे निघालो.
पुन्हा तेच चालू. हवे तिथे थांबणे आणि निसर्गाचा आनंद लुटणे. असेच पुढे जाताना एके ठिकाणी आम्हाला रस्त्यावर ओढा लागला. रस्त्यावरून थंडगार पाणी वहात होतं. वाचून आणि फोटो पाहून माहिती होतं कि लेहला जाताना खूप ओढे ओलांडावे लागतात आणि हा आमच्यासाठी पहिला होता. पुढेहि खूप ओलांडले, त्यातल्या त्यात हा बऱ्या पैकी चांगल्या रस्त्यावर होता. थोडक्यात ओढा चांगल्या रस्त्यावरून वाहत होता तरीही तुषारने खाली उतरून ओढा ओलांडण्यात काही अडचण आहे का आणि कुठून कसं जायचं ते पाहिलं. मग तो आधी गेला आणि त्याने क्रोस केल्यावर मी हि त्याच वाटने चाकावर चक (पायावर पाय सारखं) ठेवून गेलो.
Odha

Road

Nisarga

Road

आधी वाटलं बर्फ आहे...पण झुम करुन पहिलं तर पाणी वहात होतं...
Dongar

पांढर्‍या पायघड्या...
Rasta

हिला विसरुन कसं चालेल.
Bullet

Road

Daridongar

खळखळाट....
Khalkhalat

केलोंगची वेस...
Keylong

View

Road

पुन्हा उतरणे...
Road

Road

पुढे तंडी आलं. तंडी म्हणजे शेवटचा पेट्रोल पंप. म्हंटल बसेल तेवढं पेट्रोल भरू आणि जाऊ पुढे. सोपस्कार म्हणून जेमतेम पेट्रोल भरलं आणि पुढे दवडू लागलो. बघता बघता केलोंग मागे पडलं. पुढे जीस्पाला थांबायच ठरवलं होतं. जीस्पा जवळ पोहोचायला आम्हाला सहा वाजले. केलोंग पासून पुढे जीस्पा पर्यंत रस्ता काही ठिकाणी सोडला तर एकदम चकाचक होता. दिवस मावळला नव्हता पण पुन्हा एकदा अंधारून आलं. दुसरं काय असणार, पावसाचं लक्षण. देवाचा धावा सुरु केला. दिवसाच्या शेवटी भिजायची अजिबात इच्छा नव्हती. जीस्पात पोहोचलो तेव्हा थेंब पडायला सुरुवात झाली. जर्किन, हेल्मेट, बूट होते त्यामुळे बाकी कुठे काही जाणवत नव्हतं पण हातात हातमोजे (काहींसाठी ग्लोव्ज) घातले नव्हते. बोटं सुन्न करून टाकली त्यांनी, एवढे थंड होते ते थेंब. पावसा पासून वाचावं, पटकन निवारा मिळावा म्हणून एका हॉटेल मध्ये घुसलो. पोराने गरजू व्यक्तींना ताडले होते आणि एक रूमचा १२०० भाव सांगून अडून राहिला. घासाघीस केली पण पठ्या मानायला तयार नव्हता. मग काय त्याला भिक न घालता तिथून निघालो आणि पुढे गेलो. थंड थेंब थेंब पाऊस सुरु होताच पण आम्हाला भिजवेल एवढा नव्हता. पुढे HPTDC (आपल्या MTDC सारखं) दिसलं. ५०० रुपये भाडं. काहीही आढेवेढे न घेता रूम बुक केली आणि पटकन सामान सोडून आत घेऊन गेलो. जाता जाता तिथल्या माणसाकडे जेवणाची चौकशी करून ठेवली. दुर्गम भाग असल्यामुळे हॉटेल जास्त वेळ चालू ठेवत नाही असं कळल. सगळं काही पटापट आवरायला घेतलं. आवरत असताना पाऊस भूर भूर सुरु झाला आणि आवरून झालं तरी तो पडतच होता. तो उघडण्याची वाट पाहत बसलो. चांगला तासभर बरसून झाल्यावर त्याने विश्रांती घेतली. मग आम्ही बाहेर पडलो, हॉटेलवाल्याने आमच्यासाठी हॉटेल चालू ठेवलं होतं. मॅगी आणि ब्रेड ओम्लेट शिवाय काही पर्याय नव्हता. मॅगीची ओर्डर दिली आणि बसलो गप्पा मारत. स्वतःच्या फोन वरून घरी फोन लावण्याचे अनेक निष्फळ प्रयत्न झाल्यावर हॉटेल वाल्याचा फोन वापरला, सुखरूप असल्याची आणि इतर माहिती दिली. तिकडे फक्त आणि फक्त BSNL पोस्टपेड चालतं हे लक्षात ठेवावे. असो.... गरम गरम, चटपटीत मॅगी खाऊन थोडा वेळ बसल्यावर हॉटेलवाल्याचा निरोप घेतला आणि आम्ही दोघे रूमवर आलो. सगळा हिशोब केला आणि नव्या दिवसाची नवी सफर करण्यासाठी झोपी गेलो.

क्रमश:

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

8 Jan 2013 - 7:41 pm | दिपक.कुवेत

छान चाललेय सफर्...पुढचे भाग पण पटापट टाका. सगळे फोटो पण छान आलेत...खरचं असा निसर्ग पाहुन थकवा कुठल्याकुठे पळत असेल!

फोटो पाहूनच अफाट हेवा वाटला! लिहिलेलं नंतर निवांत वाचते :)

रणजित चितळे's picture

8 Jan 2013 - 7:45 pm | रणजित चितळे

येथले रस्त्यांचा रखरखाव बॉर्डर रोड ऑर्नायझेशन , हिमांक तत्सम फौजी संस्थाच करतात. छान छान रस्त्याच्या कडेला बॅनर्स लावलेले असतात.

लवकर टाका भाग - पण मला माहित आहे एवढी चित्र द्यायची म्हणजे वेळ लागतो. त्या बरोबरर लिहायचे पण असते. आपण डायरीत रोज लिहायचात का?

नाही डायरी लिहित नव्हतो... आठवून लिहित आहे... त्यामूळे वेळ लागतोय... :(

कपिलमुनी's picture

8 Jan 2013 - 7:47 pm | कपिलमुनी

मस्त सफर घडवलीत !!

काय सान्गावे महाराजा तुझे लेखन सामर्थ्य...भन्नाट लिहिले आहेस आणि अनुभवले आहेस. बाकि रोहतान्ग पास ला बर्फ नव्हता का? मला मनाली ते रोहतान्ग पास ह्या मार्गावरचा आमचा प्रवास आठवला..अरे एकदम सोल्लिड घाट आहे.
पेट्रोल पम्पावरुन मला आठवले कि आम्हि प्रवास केला तेव्हा (१९९५ सालात) आम्हाला ह्या विषयी काही कल्पना नव्हती कि वर पेट्रोल पम्प नाही आहे म्हणुन..आणि दुर्दैवाने आमच्या गाडीतले पेट्रोल रोहतान्ग पास वर जवळपास सम्पले. नशीबाने तिथे आम्हाला एक ओळखीचा टाक्षीवाला भेटला (आमची दिल्लीत ओळख झालेली, जणु काही ह्या कठीण प्रसन्गासमयी त्याची मदत व्हावी म्हणूनच...) आणि त्याच्याकडुन पेट्रोल घेवुन मग आलो परत मनाली ला. तो जर भेटला नसता तर मात्र कठीण होते. असो... आता तुमच्या पुढिल भागाची प्रतिक्षा करतो.

कौन्तेय's picture

9 Jan 2013 - 7:29 am | कौन्तेय

केदार, जाता जाता म्हणून ज्या योगायोगाचा तुम्ही उल्लेख केलाय तो प्रसंग फार महत्वाचा आहे. भटकत असताना मलाही असे दे-जा-वू अनुभव येऊन गेलेत. दैवी योजनांवर विश्वास ठेवायचा नसला तर ठेवू नये पण अविश्वासाच्या तात्पुरत्या टांगणीने (सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ) आयुष्य जास्त चविष्ट होते हेही सत्य आहे!

खुप छान फोटो... लवकर येउद्या पुढचा भाग

मदनबाण's picture

8 Jan 2013 - 9:04 pm | मदनबाण

आहाहा... फोटो पाहुनच फार समाधान वाटले ! :)
तुमचे भाग वेळ मिळेल तसे पाहतो/वाचतो आहे. :)
एकदा तरी मला लेह-लढाक येथे जायचेच आहे...आणि हे फोटो पाहुन तर इच्छा अजुनच तीव्र झाली आहे. :)
(निसर्ग प्रेमी) :)

फोटो पाहून डोळे निवले, तुमचं लिहिणंही एकदम मस्त आहे. आवडेश.

बादवे, तो ट्रक कुठेय ते दाखवा की..

बादवे, तो ट्रक कुठेय ते दाखवा की..
फोटोच्या डाव्या बाजुला खाली जी भिंत दिसते ना... त्याच्या वरच्या बाजुला आहे तो ट्रक्.(म्हणजे मला तरी तिथेच दिसला,अजुन कुठे असेल तर... ठावूक नाही. ;))

इनिगोय's picture

8 Jan 2013 - 10:16 pm | इनिगोय

दिसला दिसला! तिथेच आहे.

नरेंद्र गोळे's picture

8 Jan 2013 - 9:56 pm | नरेंद्र गोळे

शाब्बास वीरहो!

तो चिखल पाहून मला कान्हा-किसलीतल्या जंगल रस्त्यावरील फूट फूट जाडीच्या धुळीची आठवण झाली.
जिच्यात आमची जीपही होडीप्रमाणे चालत होती.

सश

ना एटीएम, न पंपही कुठला जेथे ।
ना फोनही चाले, निसर्ग सोबत जेथे ॥
मार्गी झुळझुळती, शुभ्र खळाळत ओढे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ १० ॥

मग पाऊस दावी, नवेच तेवर आपले ।
रस्तेही चिखलमय, त्यातही पत्थर ओले ॥
दरी-कडा टाळल्या, त्यावर होते रोडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ ११ ॥

मग रस्ता भेटे नीट, त्यावरी सुटले ।
भर दुपार, रस्ते कड्यावरून कोसळले ॥
बर्फ दूर वाटे, ओघळती जणू ओढे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ १२ ॥

कधी रौद्र, प्रसंगी दृश्य रम्यही झाले ।
रस्त्यातून फुटती पाट, हिमाचे नाले ॥
कधी वाट रोखते, क्वचित पाणी थोडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ १३ ॥

मनराव's picture

10 Jan 2013 - 12:19 pm | मनराव

मस्त गोळे साहेब.....

नरेंद्र गोळे's picture

8 Jan 2013 - 9:59 pm | नरेंद्र गोळे

दोन तिनदा कस काय उमटलय देव जाणे!

नीलकांत बघा रे बाबा तूच.

सोत्रि's picture

8 Jan 2013 - 10:01 pm | सोत्रि

चिखलातल्या रस्त्याचे वर्णन वाचता वाचता माझेही खांदे भरून आले. :)

- (वाचन प्रवासी) सोकाजी

पैसा's picture

8 Jan 2013 - 10:10 pm | पैसा

लै भारी तुमची सफर आणि त्याचं वर्णनसुद्धा. फोटोंबद्दल तर काही बोलायलाच नको!

कौशी's picture

8 Jan 2013 - 10:13 pm | कौशी

फोटो तर अप्रतिम आलेत.

उत्तम चोरगे's picture

8 Jan 2013 - 10:50 pm | उत्तम चोरगे

खूप वाट बघायला लावता राव. पुढचा भाग लवकर येउं द्या.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jan 2013 - 12:14 am | अत्रुप्त आत्मा

__/\____/\____/\____/\____/\____/\____/\____/\__

फोटो बघून "आर्यानां वेजो" ची आठवण झाली. कधीकाळी आद्य वैदिकांचे आजेपणजे असाच प्रदेश सोडून भारतभर पसरले होते.

डोळे एकदम निवले क्षणार्धात.

मोदक's picture

9 Jan 2013 - 3:16 am | मोदक

ज ह ब ह रा....

वर्णन, फोटो, सफर सगळे एकापेक्षा एक आहेत. तरी सतत लक्ष जातं त्या चिखलातल्या ओढग्रस्तीकडे!
साष्टांग दंडवत -

दीपा माने's picture

9 Jan 2013 - 8:05 am | दीपा माने

जबरी ड्रायव्हिंग आहे. मीही अशा प्रकारच्या ड्रायव्हिंगचा इथे अमेरिकेत अनुभव घेतलाय. अशा ड्रायव्हिंगचे चालवतेवेळी जेव्हढी भिती वाटत नाही तेव्हढी नंतर काढलेले फोटो पाहताना वाटते हे मात्र अगदी खरे आहे. तुमच्या सर्व सफारींना शुभेछा.

लई म्हंजे लईच भारी, इथं पंचर झालेली गाडी १-२ किमी ओढायला जीव जातोय आणि असल्या चिखलमय झालेल्या रस्त्यातुन गाडी ढकलत न्यायची हे काय खायचं काम नाय.

लई लई आभार.

स्पा's picture

9 Jan 2013 - 11:40 am | स्पा

चायला बुलेट खेचत न्यायचं म्हणजे लैच
तुफान अनुभव आहे बे ..

आपली तर तंतरली असती ब्वा , तेंव्हा ..
आणि आमच्या यामाची *ड लागली असती ती वेगळीच
अशा ठिकाणी बुलेटच हव्यात , १५० CC च काम नाय हे
मनराव कमाल केलीत राव :)

धन्यवाद सगळ्यांना...... पुढचा भाग लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन....

अफाट आहे हे सर्व... अद्भुत जगात फिरुन आलात रे.. हेवा वाटतो आहे प्रचंड... हपीसात बसून पाहवत नाहीये आता आजुबाजूच्या कामाकडे..

स्पंदना's picture

9 Jan 2013 - 11:36 am | स्पंदना

हिला विसरुन कसं चालेल.

ही एकदम भावल.

आत्ता ३रा अन ४था असे दोन्ही भाग वाचले. लय भारी.

टुकुल's picture

9 Jan 2013 - 12:03 pm | टुकुल

आमच्या स्वप्नातली सफर,,, सुंदर फोटोज आणी मस्त वर्णन

--टुकुल

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jan 2013 - 12:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रवास वर्णन एक नंबर. चिखलातला प्रवास वाचुन घाम फुटला बसल्या जागी. पण तिकडे जायची हौस पण आली आहे. साला एवढी सुट्टी कशी काय म्यानेज केलीत ते सांगा. एवढ्या लांब जायच तर साला बुलेट ला पर्याय नाही अजिबात. फोटो झकास आले आहेत. स्पेशली १ आणि ३ क्रमांकाचे फोटो आवडले. पुढचा भाग लौकर येउदे :).

(मनोमन लेह लडाख ला जाऊन काकडलेला) आनिरुद्ध.

मृत्युन्जय's picture

9 Jan 2013 - 12:34 pm | मृत्युन्जय

मस्तच रे मनोबा. लव्कर टाक बाबा पुढचे भाग.

मृत्युन्जय's picture

9 Jan 2013 - 12:36 pm | मृत्युन्जय

मस्तच रे मनोबा. लव्कर टाक बाबा पुढचे भाग.

च्यायला पहिला प्रतिसाद फक्त विषयातच दिसतो आहे तोसुद्धा अर्धा. असे का म्हणे?

काय तो निसर्ग निव्वळ अप्रतिम !
पण ते टीचभर रस्ते अन तेही कुंपन अन सुरक्षा भिंतीविरहीत अन बाजुच्या खोल दर्या पाहुन कापरं भरल अशा धोकादायक निसरड्या रस्त्यावरुन प्रवास करणे मानल बुवा तुमच्या इच्छाशक्तिला :)

ह भ प's picture

10 Jan 2013 - 9:47 am | ह भ प

जळून जळून खाक झालोय..

मस्तच रे मनोबा.. निसर्गाच्या दोन रुपांचे इथे चांगलेच दर्शन घडवलेस..

- पिंगू

वा! पुढील भागांसांठी शुभस्य पंथानं सन्तू :)

शुभास्ते पंथानः सन्तु | असं हवं का? (दहावी संस्कृत पेपर होऊन बावीस वर्षं झाली, त्यामुळे चुभूदेघे)

होय होय.. बरोबर आहे शुभास्ते.. तरी लिहितानाच वाटात होतं काहितरी चुकतंय म्हणून
बाकी, मला संस्कृतचा दहावीचा पेपर देऊन तुमच्याहून कमी वर्षा होऊनही आमची ही दशा.. ;)

रोहन अजय संसारे's picture

10 Jan 2013 - 11:53 am | रोहन अजय संसारे

भन्नाट प्रवास चालू आहे तुमचा. खूप खूप छान फोटो काडले आहेत. निसर्ग बगून जाणायची इच्चा आहे.गाडी चे पण फोटो टाका असतील तेवढे. आणि पुढचा भाग लवकर टाका .

बाईकने सातार्‍यापर्यंत जातानाही आमची पार्श्वभूमी वेदनामय होऊन जाते. लेह या भागात आयुष्यात एकदा तरी जायचं आहे. तेही पॅकेजटूरसोबत शक्यतो नाही.

बाईकने जाण्याइतका दम अस्मादिकांमधे कधी नव्हता आणि आता पुढे कधीही येणार नाही. मग दुसरा पर्याय म्हणजे कारने जाण्यासाठी हे किती खडतर आहे? की अधिकच अवघड आहे (अरुंद, खराब रस्ते इ इ)?

४ X ४ ड्राईव्ह ला पर्याय नाही असं आहे का? की नेहमीची कार जाऊ शकेल ?

कारने जाण्याचा पर्याय आहे.... पण माझ्या महितीनुसार तिकडे कार चालवण्यासाठी वेगळं लायसन्स काढावं लागतं.... इकडच्या लायसन्सला मान्यता नाही. तिकडे रस्ते धोकादायक आहेत म्हनून असेल बहुदा.......

४ X ४ असेलेली कार केव्हाही चांगली...कारण चिखलात/मातित फसली तर निघण्याची निदान आशा तरी असते........ पण नेहमीची कार फसली तर मग काय खरं नाय बुवा..... :). एवढं असुन सुद्धा एक जण रिस्क घेऊन मारूती ८०० घेऊन वर आलेला मि पहिला आहे...

चेतन माने's picture

10 Jan 2013 - 2:45 pm | चेतन माने

तो ट्रक Chameleon सरड्यासारखा त्या डोंगरात लपला आहे . रस्ता लई डेंजर , तुमचं साहस लई भारी आणि फोटो लई झक्कास आलेत राव. क्या बात ही पुढचा भाग लवकर येउद्या
:) :) :)

सविता००१'s picture

10 Jan 2013 - 3:16 pm | सविता००१

खूप सुंदर फोटो आणि लिखाण. भन्नाट आहे एकदम. झकास. :)

मी-सौरभ's picture

10 Jan 2013 - 3:19 pm | मी-सौरभ

आधिक काय बोलणे ??

पिंपातला उंदीर's picture

10 Jan 2013 - 5:01 pm | पिंपातला उंदीर

हेवा, हेवा आनि हेवा

तिमा's picture

10 Jan 2013 - 9:23 pm | तिमा

चिखलाचे फोटो बघून त्यातून तुम्ही बुलेट कशी ओढली याचे आश्चर्य वाटले. अफाट साहस आहे हे. बाकी एचपीटीडीसी मधे उतरलात हे चांगलं केलं.
मनालीहून सक्काळी ४ वाजता निघून संध्याकाळी लेह गांठणारे महाभाग टॅक्सीवाले आहेत, त्यांच्या बरोबर कोणी जाऊ नये. प्राण कंठाशी येणे, म्हणजे काय, याचा भरपूर अनुभव येतो.

रोहन अजय संसारे's picture

19 Jan 2013 - 10:50 am | रोहन अजय संसारे

पुढचा भाग लवकर टाका,खूप वाट पाहायला लावता.