'लेह' वारी, भाग २

मनराव's picture
मनराव in भटकंती
17 Dec 2012 - 12:29 pm

'लेह' वारी, भाग १

पहिला मुक्काम चुकलाच होता, त्यामुळे पुढचे मुक्काम बदलेले. मग पुढच्या दोन तीन दिवसाचा प्रवास आराखडा बांधला, कुठे थांबायचं, काय करायचं (साहेबाच्या भाषेत प्लान A, प्लान B वगैरे वगैरे) ठरवलं आणि सकाळी लवकर निघायचं ठरवून झोपलो. जवळपास ६०० km गाडी चालवून प्रवासाचा पहिला दिवस संपला होता.

अता पुढे.......

डोळे उघडले तेव्हा ६.०० वाजले होते आणि ठरलेल्या प्लानचे पुन्हा १२ वाजले होते. आवरून निघता निघता ७.३० झाले. मग नाष्ट्याचा बेत पुढे ढकलून निघालो, म्हंटल सांच्याला जयपूरला पोहोचलो तरी बेहत्तर. रोड एकदम चकाचक होता त्यामुळे एका त्रासातून सुटका झाली होती. दोन तास तुफान गाडी चालवल्यावर एके ठिकाणी (गावाचं नाव लक्षात नाही) न्याहरीसाठी थांबलो. गाडीवरून उतरलो आणि हॉटेल वजा दुकानाबाहेर भजीची वाट बघत आम्ही थांबलो.
Bhaji
गरम गरम भजी आणि चहा. लाजवाब नाष्टा !!! आम्ही तिकडे हातातोंडाची लढाई करत होतो आणि इकडे गावकरी लोक दोनीही गाड्यांभोवती जमा झालेले. काय दिमाखात त्या दोघी उभ्या होत्या म्हणून सांगू..!!! आणि गावकऱ्यांच्या तोंडावर आश्चर्यमिश्रित ते भाव !!!. कोणी म्हणे डीझेल वर चालत असेल, कोणी त्याची किंमत किती? याचा विचार करत होता, गाडी जवळ उभं राहून आपापसात कुजबुज चालू होती. असो... नाष्टा झाल्यावर गाडी जवळ गेलो तेव्हा सगळे बाजूला झाले. यावेळी स्टार्टर वापरायचा सोडून मुद्दाम गाडीला किक मारली. थोडा भाव खायला चान्स मिळत असेल तर कोण सोडेल? पहिल्या किक मध्येच धडधड धडधड करायला लागली आणि धडधडीचा दमदार आवाज करत तिथून आम्ही एकदम शान मधे कल्टी मारली. उदरभरण झाले होते त्यामुळे आता २-३ तास चिंता नव्हती. गाडी सुसाट पळत होती. पहिल्या दिवसाचा ९० ने सुटण्याचा अनुभव पुन्हा एकदा घेत होतो.
Scene
पावसाळा चालू होता त्यामुळे सगळी कडे मस्त हिरवा गालीचा पसरलेला आणि त्यात सरळसोट टार रोड. त्या वातावरणात बघता बघता कधी उदयपुरला पोहोचलो कळलंच नाही. उदयपुर मधे शिरताना सीमेवरचं बांधकाम पाहून आपण राजस्थान मध्ये आहोत हे लगेच जाणवलं. उदयपुर गावात शिरायच्या आधीच बाह्यवळण रस्त्याला वळलो आणि चित्तोडगडचा मार्ग धरला. साला तो रोड पण झक्कास.

उदयपूर मधे स्वागत....
Udaipur

उदयपूरच्या दुसर्‍या वेशीवर...
Udaipur

वेशी वरचा दरवाजा...
Udaipur

थोडसं नक्षीकाम....
Darwaja

मुंबई सोडल्यापासून गोल्डन क्वाड्रीलॅट्रल काय चीज आहे याचा km - km वर (पदापदावर सारखं) अनुभव घेत होतो. भाजप सरकारच्या काळात सुरु झालेली आणि नंतर प्रत्यक्षात आलेली हि कल्पना खरच स्तुत्य आहे. भूक तशी फार लागली नव्हती म्हणून मग एके ठिकाणी फक्त चहा प्यायला आणि पुढे प्रवास सुरु केला. चित्तोडगडला सुद्धा बगल देऊन आम्ही आमचा मोर्चा किशनगड कडे वळवला. वाटत होतं जयपूरचा ठरलेला मुक्काम आज होणार म्हणजे होणार.

दिल्ली अभि दुर है...
Image

Rest
कंटाळा आला कि थोडा वेळ थांबणे. चहा वगैरे मारणे आणि पुढे जाणे. दोन दिवस हेच चालू होते आणि पुढे दोन आठवडे हेच करणार होतो. संध्याकाळचे ६.०० - ६.३० वाजत आले तेव्हा नासिराबादच्या अलीकडेच पोहोचलो होतो. पुन्हा एकदा ढाब्यावर थांबलो, तोंड धुवून फ्रेश झालो आणि चहा मागवला. ढाब्यावर काही ट्रकवाले जवळ आले. पुन्हा चौकशी सुरु झाली? विचारपूस करताना "फौज में हो क्या?" हा प्रश्न आला. तसा हा आधी काही ठिकाणी थांबलो तिथे हि आला होता, पण तेव्हा आम्ही खरं उत्तर दिलं होतं. या वेळी मात्र तुषारने "हां, फौज में है, जम्मू जा रहे है" असं बिंदास सांगून टाकलं. असो... चहा प्यायला आणि सुटलो किशनगडकडे. ७.०० वाजले किशनगड जवळ पोहोचायला. सूर्य मावळून गेला होता तरी आम्ही गाडी चालवत होतो. एकच दिवस नियम पाळून आम्ही तो लगेच दुसऱ्या दिवशी मोडला होता. जयपूर आणखी १०० km लांब होते. अंधार असून सुद्धा जोरात गाडी चालवायची खुमखुमी अजून गेली नव्हती. मनात ठरवलं होतं, आज उशीर झाला तरी चालेल, पण जयपूर गाठायचच. पण एके ठिकाणी गडबड झाली. जोरात चाललो असतानाच एका ट्रेलरला ओवरटेक करताना धडाधड एका पाठोपाठ एक, असे एकदम चारपाच मोठ्या मोठ्या खड्यात गेलो. माझ्या पाठोपाठ तुषार पण त्याच मार्गाने. म्हंटल आता काही खर नाही, जातोय त्याच्या (ट्रेलरच्या) खालीच. गाडी सांभाळता सांभाळता नाकी नऊ आले. तेव्हा जाणीव झाली कि आपण आता थांबलं पाहिजे. एकतर अंधार त्यात असे खड्डे पुन्हा येऊ शकतात, म्हणून मग किशनगडच्या थोडसं पुढे एक चांगलं हॉटेल बघितलं आणि गाडीला विश्रांती द्यायचा निर्णय घेतला. तुषार जाऊन रूम बघून आला. ८००/१००० रुपये एक रूम. बोंबला, फक्त ८ -१० तासासाठी १००० रुपये मोजावे लागणार होते. पण नाईलाज होता. दुसरं हॉटेल शोधण्याची अजिबात इच्छाहि नव्हती आणि तेवढा वेळाही नव्हता. दिवसभर गाडी चालवून दमल्यामुळे निदान झोप तरी शांत लागावी म्हणून रूम घायायचं ठरवलं. तुषार पूर्ण व्यवहार करून येई पर्यंत मी सगळं समान गाडी वरून उतरवलं. उशीर झाला होता म्हणून पटापट सगळं आवरलं आणि जेवायला आलो. जेवलो, दिवसभराचा सगळा हिशोब मांडला, तिसऱ्या दिवशी निदान चंडीगड तरी गाठू असं ठरवलं आणि परत रूमवर आलो. दार उघडून बघतो तर काय, सगळी कडे किडेचकिडे. एकतर हॉटेल हायवे वर त्यात पाऊस पडून गेलेला, रूम सगळीकडून बंद असून सुद्धा हे कुठून कसे प्रकट झाले कुणास ठाऊक? हॉटेल मालकाला बोलावून सगळा प्रकार दाखवला आणि रूम बदलून घेतली. दुसऱ्या रूम मध्ये पण तीच तऱ्हा पण किड्यांच प्रमाण थोडं कमी होतं म्हणून फायनल केली. किड्यान पासून सुटका हवी म्हणून मग दिवा मालवला, एका कोपऱ्यात फोनची टॉर्च लावून बिनधास्त झोपलो.. ६९० km प्रवास करून आजचा दुसरा दिवस संपला होता.

दिवस नंबर ३
सगळे किडे टॉर्चकडे गेल्यामुळे झोपेच खोब्र नाही झाल. आपसूकच उठायला नेहमी प्रमाणे उशीर झाला अन सगळं आवरून निघता निघता ८.०० वाजले. आज चंडीगड मुक्काम ठरवला होता. होईलच याची शाश्वती नव्हती. सकाळी ८.०० ला जे निघालो ते डायरेक्ट १०.१५ ला ढाब्यावरच थांबलो. जेव्हा थांबलो तेव्हा आम्ही जयपूर बाह्यवळण मार्गावर होतो. नाष्ट्याला काय??? विचारलं तर काहीच नाही, फक्त जेवण मिळत म्हणाला. मग काय जेवायचं ठरलं.
म्हंटल आता जेवलं कि परत ३.०० वाजे पर्यंत काळजी मिटेल. मसुराची झणझणीत उसळ, फुलके, लोण्याचा एक मोठ्ठा गोळा, दाल फ्राय आणि भात. मारला अडवा हात दोघांनी पण. प्रत्येक फुलक्याला भरपूर लोणी लावून आत्मा तृप्त होई पर्यंत जेवलो आणि थोडा आराम करून निघालो.

या ढाब्यावर जे २-४ फोटो काढले तेवढेच.....पुन्हा फोटो काढायला रात्रच उजाडली.....कशी ? ते वाचालच....
Dhaba

थोडसंच पुढे गेलो असू, तर समोर आभाळ भरून आलेलं दिसलं. सगळीकडे अंधारून आलेलं. एक दिवस (दुसऱ्या दिवशी) रेनकोट पासून सुटका मिळाली होती पण आज ती मिळेल असं समोर बघून बिलकुल वाटत नव्हतं. पावसाचे मोठे मोठे थेंब पडायला सुरुवात झाली तेव्हा एका झाडाखाली थांबून रेनकोट चढवला. गाडीला किक मारली आणि निघालो. जस जसं पुढे जाऊ लागलो, पावसाचा जोर आणखी वाढू लागला. तो इतका वाढला कि पहिल्या दिवसासारखच पुढे १०० -१५० फुटा पलीकडे दिसायचं बंद झालं. समोर एक खिंड दिसत होती. मनात वाटत होतं, खिंड ओलांडली कि जोर कमी होईल, पण कसलं काय, खिंडी पलीकडे तर पाऊस आणखी वाढला. समोरचं दिसण्याचं प्रमाण आणखी कमी झालं. आमच्या दोघांमधलं अंतर फार फार तर १० फुट ठेवलं असेल आम्ही. पावसाचे थेंब हेल्मेटवर टनाटन आदळत होते. मधूनच २-४ थेंब हेल्मेटला हि न जुमानता आत येत होते. चेहरा सगळा ओला झाला होता. दोन दोन जर्किन घातले होते तरी अख्खा भिजलो होतो. एवढं असून सुद्धा गाडी ७०-७५ ने हाकतच होतो. पण हे कितीवेळ करणार? थोडं पुढे गेल्यावर आमचा जोर कमी झाला पण पावसाचा आहे तसाच होता. जरा वेग कमी केला तर ती बुलेट सुद्धा भूकभूक करायला लागली. म्हंटल आता या पावसात हि जर बंद पडली तर आपलं काही खरं नाही. धड कोणी मदतीला पण थांबणार नाही असा तो भाग होता. तसाच तिचा कान पिळत, तिला चालू ठेवली आणि पुढे जात राहिलो. थोड्याच वेळात तिची भूकभूक बंद झाली आणि मला हायसं वाटलं. पाऊस मात्र अजून चालूच होता. आज कसली परीक्षा देव घेत आहे ? हाच विचार राहून राहून मनात पिंगा घालत होता. चंडीगड लांबच राहिलं आम्ही निम्म्यात तरी पोहोतोय कि नाही अशी शंका येऊ लागली. अखेर बराच वेळ भिजत गाडी चालवल्यावर त्याला आमच्यावर दया आली आणि तो थांबला. थांबला कसला??? आम्ही त्याभागातून पुढे आलो म्हणून आमच्यासाठी थांबला. तिकडे तू धुमाकूळ घालतच असणार. पुढे पुढे जात होतो. एके ठिकाणी नदीचा पूल आला आणि अख्या पुलावर तळं साचलेलं. रस्त्यावर जवळ-जवळ एक फुट पाणी असेल . दुसरा पर्यायी रस्ता नव्हताच. घातली गाडी मग पाण्यात. आधी तुषार गेला आणि त्याच्या मागे मी. मोठ्या गाड्या जात आहेत त्यांना पाहून, रस्त्याचा अंदाज घेत घेत पुढे जात होतो. सायलेन्सर मध्ये पाणी जाऊ नये म्हणून जोरात जोरातरेझ करत होतो. पण एके ठिकाणी समोरच्या गाडी मुळे तुषार थांबला, सायलेन्सर मध्ये पाणी गेलं आणि गाडी बंद पडली. त्या बरोबर आपणही लटकून ताप वाढवायला नको म्हणून मी त्याच्या बाजूने तसाच गाडी रेझ करत पुढे निघून गेलो. कसाबसा पूल ओलांडला, बाहेर पडलो आणि थांबलो. २-३ मिनिटे गेली तरी हा बहादूर अजून का नाही आला? हे पाहण्यासाठी गाडी लावली आणि चालत परत मागे जाणारच तेवढ्यात महाशय गाडी घेऊन आलेच. पुलावर जरा वरच्या भागात पाणी कमी होतं तिथे नेऊन, त्याच्या (आणि माझ्या पण) नशिबाने ती चालू झाली होती. गाडी चालू आहे हे बघून किती बरं वाटलं होतं तेव्हा. मग थोडा वेळ तिथेच थांबलो. गाडीला आणखी काही झालं आहे का बघितलं आणि पुढे निघालो.
पाऊस रिमझिम चालू होताच. दिल्लीला न जाता हरयाणा मधून रेवाडी - रोहतक - पानिपत असा मार्ग ठरवला होता. उद्देश फक्त एकच, जास्त गर्दीत न जाता लवकरात लवकर चंडीगडला पोहोचणे. पण नशिबात काहीतरी वेगळच लिहून ठेवलं होत. जस आम्ही हायवे सोडून रेवाडीच्या रस्त्याला लागलो, तसं पुन्हा पावसाचं थैमान चालू झालं. रोड एकदम खराब आणि त्यात जोरदार पाऊस. जसा सकाळी होता त्या पेक्षा जरा जस्ताच पण कमी नाही. थोडं पुढे गेल्यावर तुषारच्या बुलेटच्या मागच्या ब्रेक मधून कसला तरी विचित्र अवज येऊ लागला. २-३ वेळा थांबून पाहिलं पण काहीच कळेना. तसेच पुढे निघालो. रेवाडी सोडून पुढे झज्जर कडे निघालो होतो. रस्ता आणखीनच खराब झाला. एका मोठ्या खड्यात गेल्यावर माझ्या बुलेटच्या पुढच्या चाकातून पण काही तरी घासल्याचा अवज येऊ लागला. दोनीही गाड्यांची आणि आमची वाट लागली होती, पण नाईलाज होता. पुढे जात राहणे क्रमप्राप्त होतं. बऱ्याच ठिकाणी रोडचं काम चालू होतं म्हणून आम्हाला सारखा रस्ता बदलावा लागत होता. २-४ km जरा कुठे चांगला रोड लागलाय अस वाटू लागताच परत खड्यांच राज्य चालू व्हायचं. जयपूर जवळ, सकाळी १० - १०.३० ला जे काही खाल्लं होतं तेवढ्यावरच होतो, त्यानंतर जेवायला सुद्धा उसंत मिळाली नव्हती. त्यात सतत पाऊस चालू असल्यामुळे दोघेही नखशीकांत भिजलो होतो आणि आणखी भर म्हणजे गाडी चालवण्याचा वेग थोडा कमी झाला होता. पण त्यातही मी एक सुख शोधलं होतं. ते होतं आजू बाजूच्या निसर्गाचं. दोनीही बाजूला नजर जेईल तिथ पर्यंत हिरवीगार शेती पसरलेली होती. हिरव्या रंगा शिवाय दुसरा रंगच दिसत नव्हता. वर अंधारून आलेलं आभाळ, धो धो कोसळणारा पाऊस, आजूबाजूला हिरवीगार शेती आणि रस्त्यावर भिजत चाललेलो आम्ही दोघे. मस्त वाटत होतं. रोहतक ओलांडून पुढे गेल्यावर एक ठिकाणी आम्ही चहा प्यायला थांबलो. ६ वाजून गेले होते. आज कुठे पर्यंत मजल मारता येईल याची आमच्यात चर्चा सुरु झाली.
मी: जमलं तर जाऊ चंडीगडला...
तुषार: रस्ता असला भंगार असेल तर आपण पानिपतला सुद्धा पोहोचू कि नाही याची शाश्वती नाही.
मी: बघू रे!!! जमेल तेवढं जाऊ.
५-६ तास खड्ड्यांमध्ये गाडी चालवून बिचारा वैतागला होता, हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत. मी मात्र निसर्गात सुख शोधून रिकामा झालो होतो त्यामुळे खड्यांच काही वाटत नव्हतं. असो... आम्ही तिथून निघालो आणि पुढे गाडी चालवताना परत तेच गुऱ्हाळ चालू झालं. बघता बघता तुषारचा संयम सुटला. माझी आणि त्याची थोडी बाचाबाची झाली आणि साहेब एकदम पेटले आणि पुढे....
तुषार : "मी नाही येणार तुझ्या बरोबर. आपण वेगळे वेगळे जाऊ. तुला पाहिजे तिकडे तू जा, मला पाहिजे तिकडे मी जातो.
मी (शांतपणे): "राजे, शांत व्हा !!! अजून आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचाय, इतक्यातच नांगी टाकू नका...
तुषार: असलं कसलं प्लान्निंग रे तुझं??? रस्ता कसा आहे वगैरे माहिती करून घायायला काय झालं होतं???
मी (मनात): आता याला कोण सांगणार कि गुगल वाट्टेल ते शोधून देत नाही? त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. इथे रस्ते कसे आहेत, त्यांची परिस्थिती काय हे मी पुण्यात बसून कस शोधणार होतो ?
तुषार: अरे तीन दिवस झाले नुसती गाडी चालवतोय? पाहायला काहीच मिळालं नाही..... मी काय फक्त गाडी चालवायला आलेलो नाहीये.
मी (पुन्हा मनात): ऑ SSS !!! तीन दिवस आजू बाजूला जे सृष्टीसौंदर्य मी पाहिलं.. ज्या नवीन गोष्टी मी अनुभवल्या, मी पहिल्या त्या न पहाता याने काय डोळे मिटले होते का? आयला एवढा सगळं नवीन पाहायला मिळालं तरी म्हणतो काही पहिलच नाही.... !!! कमाल आहे याची...
मी: अबे आधी आपण पानिपतला पोहोचू मग बघू काय करायच ते.. तो पर्यंत गप्प बस आणि गाडी चालवत रहा...
सूर्य मावळला होता, ७ वाजून गेले होते. पुढचा अर्धा तास आम्ही दोघेही फक्त गाडी चालवत होतो, एकमेकांना दिवा(गाडीचा) लावून रस्ता दाखवत होतो. हे सगळ गपचूप चालू होतं, एकही शब्द न बोलता. पानिपतचा बायपास आला तेव्हा तिकडे न वळता सरळ शहरात शिरलो. अंधारात गाडी चालवल्यावर काय होते हे माहित असल्यामुळे चंडीगडचा मुक्काम पुढे ढकलला होता. पाहिलं हॉटेल शोधलं, ते खूप महाग वाटलं. म्हणून आणखी दोन चार हॉटेलं पहिली तर पाहिलं हॉटेल स्वस्त वाटायला लागलं, मग १५-२० मिनिटे फिरून परत त्याच हॉटेल मध्ये गेलो. रूम बुक केली आणि सगळ ओलं-कच्च समान घेऊन आम्ही दोघे रूम मध्ये गेलो.
इतका वेळ शांततेत गेल्यामुळे साहेबांचा पारा उतरला होता आणि ते नॉर्मल वागू लागले होते. आम्ही ओलं झालेलं एक एक समान बाहेर काढून ठेवत होतो. पाहता पाहता सगळी बॅग रिकामी झाली. काही गोष्टी भिजू नयेत म्हणून प्लास्टिक पिशव्यांमध्ये ठेवल्या होत्या, त्या सुद्धा ओल्या झाल्या होत्या. लाडूच्या पिशवी मध्ये साधारण २० एक रव्याचे लाडू असतील त्यांचा सगळा मिळून एकच लाडू झालेला (पुढे काही दिवस आम्ही एकच लाडू थोडा थोडा खात होतो). पोह्याचा चिवडा आणला होता. त्या पिशवीत थोड्या चिवड्याच उपीट झालं होतं (कसं ते समजून घ्यावे). जी माझी परिस्थिती होती तीच तुषारची पण होती. त्याच्या कडे गाडीचे पार्टस होते, कसे ?? तर भिजलेले. एक एक काढून चांगलं पुसून गड्याने एका कडेला ठेवले. अख्या रूम मध्ये समान पसरलं होतं.
Room
बरचसं समान प्लास्टिक पिशव्यांमध्ये असून सुद्धा, साला, त्या पावसाने आमच्या सकट एक पण गोष्ट कोरडी सोडली नव्हती. सगळ काही वाळावं म्हणून AC लावला, पंख लावला आणि बसलो गप्पा हाणत. दिवसभराच्या त्रास बद्दल. पुढच्या प्रवास बद्दल. झालेल्या भांडणा बद्दल. एका वरून एक विषय निघत होते. भूक कधीच पळून गेली होती. हॉटेल मध्ये जेवायची सोय होती पण जास्त भूक नसल्यामुळे जेवायला रुमच्या बाहेर जायचा मूड नव्हता. तुषारने काही पराठे आणले होते.... म्हंटल बाहेरून लोणचं अणु आणि खाऊ पराठे. पण बाहेर कोण जाणार??? दोघेही कांटाळलेलो.... पुन्हा भांडण व्हायची चिन्हे. मग एक शक्कल लढवली. रिसेप्शनला फोन लावला आणि त्यांच्या कडूनच लोणचं (फुकटात) मागवलं. तोही खुश आणि मीही खुश. मग काय पराठे हाणले. मोठ्या लाडूचा छोटा छोटा भाग खाल्ला, सोबतीला पोह्याचा चिवडा होताच. जेवण रुपी नाष्टा आटोपल्यावर पुढच्या दिवसाची रूपरेषा ठरली. चंडीगड १५० km होते. चंडीगडला सकाळी लवकर पोहोचायचं. गाडी सर्विसिंग करून घ्यायची (लगेच तेव्हा सर्विस सेंटरला फोन लावून येणार असल्याची माहिती दिली), कृष्णाला (माझा मित्र) भेटायचं आणि त्याच्या कडेच राहून आराम करायचा, अस ठरलं. आम्ही येत आहोत हे मी कृष्णाला आधीच सांगितलं होतं त्यामुळे हॉटेल शोधायची भानगड नव्हती. बस, ठराव मंजुर झाला आणि पलंगावर अडवा झालो. कधी झोप लागली ते कळलंच नाही. आयुष्यात पहिल्यांदा, धो धो कोसळणाऱ्या पावसात, इतका वेळ गाडी चालवली असेल. पावसाने भरलेला तिसरा दिवस पुन्हा जवळपास ६०० km अंतर कापून संपला होता.

क्रमश:

प्रतिक्रिया

भन्नाट!!! आता पाणपतवारी सांगा कशी काय होतेय ती :)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

17 Dec 2012 - 1:15 pm | घाशीराम कोतवाल १.२

लय भारी !

आहाहा.. स्वप्नवत भटकंती आहे ही.. जणू आम्हीच तिथे हजर आहोत आणि भिजलो आहोत..

पहिल्या फोटोतली ती गोटाभजी आणि गुजरातेतच मिळणारी पिठलंवजा चटणी पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या..

झकास चालू आहे सफर.. उत्सुकतेने पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.

बाकी अशा लाँग टूरमधे कठीण प्रसंगी, अंधारात, बिकट हवामानात दोन ठिकाणांच्या मध्यावर असताना वाहनातून चित्रविचित्र आवाज किंवा आचके ऐकू येऊ लागले की जो काही तणाव मनात उत्पन्न होतो तो म्हणजे वर्णनातीत असतो.

वा! वाटच पहात होतो या भागाची..
मस्त! हा भाग अधिक खुललाय.. असेच पुढील भाग अजून खुलोत.. फॉर्म गवसतोय!

मी-सौरभ's picture

18 Dec 2012 - 12:13 pm | मी-सौरभ

सहमत

कपिलमुनी's picture

17 Dec 2012 - 1:45 pm | कपिलमुनी

अशी ट्रिप म्हणली थोडा तूतू मीमी होणारच !!
पन नंतर यामुळे नाती घट्ट होतात !!

पुढच्या भागात अजून फोटो अपेक्षित :)

नुसत्या वर्णनानच चिंब भिजायला झाल. खुपदा भिजलेय अश्या पावसात. एकदा सातार्‍याच्या अलीकडे रेड्यांची पाठ फोडणारा पाऊस कसा असतो ते अनुभवलय.
मस्त चाललेय सफर. फक्त सारखा चहा तेव्हढा मला खटकतोय. बाकी तुमचे रुसवे फुगवे, गाडीच्या तक्रारी अगदी मस्त वाटतय वाचायला.

बॅटमॅन's picture

17 Dec 2012 - 2:14 pm | बॅटमॅन

अहो त्यांना "सोत्रि" फील आणायचा असेल ;)

(चहामुक्त) बॅटमॅन.

मनराव's picture

17 Dec 2012 - 3:32 pm | मनराव

अमच्यासाठी चहा = अमृत... म्हणुन थांबेल तिथे बाकि काही नसलं तरी चालेल पण चहा फिक्स असतो....

छोटा डॉन's picture

17 Dec 2012 - 1:48 pm | छोटा डॉन

भन्नाट सफर आहे, मनापासुन वाचतो आहे.
और भी आने दो, पुढच्या भागाची वाट पहात आहे.

- छोटा डॉन

सूड's picture

17 Dec 2012 - 1:50 pm | सूड

मस्त !! वाचतोय.

मृत्युन्जय's picture

17 Dec 2012 - 2:20 pm | मृत्युन्जय

झक्कास चालली आहे की सफर. साले असले अनुभव आयुष्यात कधी घेतलेले नाहित (आणि आता जमेल्सए वाटतही नाही) त्यामुळे लय खंत वाटतीय. तुझी ट्रिप झक्कास झाली असे दिसतेय भावड्या. अभिनंदन. आणि ही मालिकी पुर्णे केली नाहिस तर खोपच्यात घेइन एवढे लक्षात ठेव :)

आणि आता जमेल्सए वाटतही नाही) त्यामुळे लय खंत वाटतीय

अगदी हीच भावना रे मृत्युंजया.. पूर्वी अनेक धाडसं केली आहेत हे आता अद्भुत वाटायला लागलं आहे. आपणच का ते? असा प्रश्न जुने फोटो पाहून पडतो.

नेमका कोणत्या वयोगटात आपली शारिरीक अवस्था कोसळायला लागते हे शोधण्याच्या प्रयत्नात आहे. पण तिशीनंतर बहुधा एकदम बिघडत जात असावं.. फिटनेस ठेवणारे मात्र भाग्यवान असू शकतात..

५० फक्त's picture

17 Dec 2012 - 3:39 pm | ५० फक्त

+१,तरीसुद्धा कधी कधी.

रोहन अजय संसारे's picture

17 Dec 2012 - 2:59 pm | रोहन अजय संसारे

भन्नाट प्रवास. पुढचा भाग लवकर येउदे.लेह ला जायचि आशा पक्कि होत आहे मानत.पावसात गाडी चालवायला जाम माजा येते.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Dec 2012 - 3:21 pm | अत्रुप्त आत्मा

दर एका दिवसाला वाट्टेल त्या परिस्थितित ६०० कि.मि... ???

मनराव ,,,सध्या आपण कुठे आहात? आंम्हाला कळवा.साष्टांग नमन घालुन दर्शन घ्यावयाचे आहे...
पियुशा's picture

17 Dec 2012 - 3:46 pm | पियुशा

भन्नाट अन रोचक !! पू.भा.प्र :)

नरेंद्र गोळे's picture

17 Dec 2012 - 3:49 pm | नरेंद्र गोळे

दरदिवशी करावे सहाशे किमी फस्त ।
तो दिमाख, रस्ते स्वप्नरंजनी मस्त ॥
वेशींवर दिसती मिनार, बुलंद कवाडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ ३ ॥

ते पाऊसकाळी किडे सर्व घर भरती ।
अकल्पित खड्डे उरात धडका भरती ॥
त्याचे, स्वारांना मुळी नव्हते वावडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ ४ ॥

ते प्रशस्त धाबे, मसूर-फुलके-लोणी ।
तो पाऊस वाढे, पुलात चढले पाणी ॥
रस्ते कसले ते, खणलेले जणू खड्डे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ ५ ॥

ते भिजले कपडे, ओले सर्वही झाले ।
डगमगू लागले, विश्वासाचे इमले ॥
मग भरता पोटे, धैर्य हळूहळू वाढे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ ६ ॥

इर्शाद गोळेकाका!!!! येकच नंबर.

इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे,

+११११११!!!!

मनराव's picture

17 Dec 2012 - 4:47 pm | मनराव

+११११११

या पुढं लेहला जाणा-या कुणीतरी ही कविता प्रिंट करुन तिथल्या प्रत्येक धाब्यावर / हॉटेलात वगैरे लावावी, अगदी समीर,त्याचा मित्र आणि गोळेकाकांच्या फोटोसहित, म्हणजे त्यानंतर असं धाडस करुन तिथं जाणा-यांना माय मराठीत अशी कौतुक करणारी कविता वाचुन छान वाटेल.

मोदक's picture

18 Dec 2012 - 12:57 am | मोदक

"कुणीतरी" कशाला ५० राव..?

चला आपणच जावूया, बुवा बुलेट घेताहेत असे शिक्रेट मुंबईथ्रू कळाले आहे.

एक बुलेट + एक अ‍ॅव्हेंजर आणि चार जण. :-)

चला जावुया, तिथं जाउन यायला ५२ दिवसांची रजा देखील लागणार नाही.

मोदक's picture

19 Dec 2012 - 12:01 am | मोदक

ऑ :-o

५२ दिवस रजेचा विचार केलात म्हणजे तुम्ही चालत येणार होता का..?

Dhananjay Borgaonkar's picture

17 Dec 2012 - 3:57 pm | Dhananjay Borgaonkar

मस्त सफर चालली आहे. अतिशय ओघवतं लिखाण आहे. आवडेश. पुढील भाग लौकर टाका प्लीज.

गणेशा's picture

17 Dec 2012 - 3:57 pm | गणेशा

एकदम क्लास भटकंती .. आनुभवलेल्या सृष्टीसौंद्र्याची आनखिन लिहुन भर घालावी

दादा कोंडके's picture

17 Dec 2012 - 4:12 pm | दादा कोंडके

छान अनुभव!

असल्या सफरीवर मी डबलसीट बसून यायला तयार आहे. ;)

कपिलमुनी's picture

17 Dec 2012 - 5:06 pm | कपिलमुनी

पण नेणार कोण ;)

सुधीर's picture

17 Dec 2012 - 5:24 pm | सुधीर

असल्या सफरीवर मी डबलसीट बसून यायला तयार आहे.

मला पण. बाईक चालवता येत नाय आपल्याला.
डबलसीट नाही तर नाही. छान लिहिलय वाचून पण चांगली सफर होतेय.

दादा कोंडके's picture

17 Dec 2012 - 6:21 pm | दादा कोंडके

त्यासाठी रोज सकाळी गाडी पुसून ठेवणे वगैरे सारखी कामं करायला तयार आहे. :)

तिमा's picture

17 Dec 2012 - 5:40 pm | तिमा

तुम्ही इतकी हिंमत दाखवली , खरं तर फौजेतच जायला हवं होतं.

पैसा's picture

17 Dec 2012 - 6:28 pm | पैसा

तुम्हा दोघांबरोबर भटकंती केल्यासारखं वाटतंय!

सोत्रि's picture

17 Dec 2012 - 11:12 pm | सोत्रि

ह्या सफर मालिकेच्या गाडीचा दुसरा गियर व्यवस्थित पडला आहे. पुढचे गियर असेच व्यवस्थित पडू देत!
जी काही सर्व्हिसिंग करायची असेल ती करुन घे नाहीतर मृत्युंजय बरोबर मीही त्या कोपच्यात असेन हे घ्यानात ठेव.

- ( मनोबाची सफर एन्जॉय करणारा ) सोकाजी

प्यारे१'s picture

17 Dec 2012 - 11:15 pm | प्यारे१

सही जा रहेला है भिडू.... आन दो आन दो!

- सयाजीच्या रुफ टापावरुन पडण्याच्या तयारीत ;) प्यारे१

किसन शिंदे's picture

17 Dec 2012 - 11:35 pm | किसन शिंदे

पावसात चिंब भिजलेला दुसरा भाग...

पुढचा भाग कवा??

रेवती's picture

17 Dec 2012 - 11:51 pm | रेवती

एकदम भन्नाट आहे सफर.
पुढचे लेखन लवकर येऊ द्या. मी काही असल्या पावसात जाण्याचे धाडस करणार्‍यातली नाही म्हणून वाचायलाच मजा येतीये.

कुलभूषण's picture

18 Dec 2012 - 12:06 pm | कुलभूषण

भाग २ पण तसाच उत्कंठावर्धक....पुढील भागाच्या प्रतीक्षेत...
पण मनराव एक सांगा...एप्रिल चा पहिला आठवडा trip च्या दृष्टी ने तिथे कसा असेल.....?

एप्रिल मधे 'लेह'चा रस्ता ९९% खुला झालेला नसतो.......आणि असलाच तरी तेव्हा जाण्यात मजे पेक्षा त्रास जास्त होइल... कारण बर्फवृष्टीमुळे दर वर्षी बर्फ काढुन रस्त्याची डागडुजी करावी लागते.. नविन रस्ता तयार करावा लागतो म्हणालं तरी चालेल. हे काम एप्रिल संपताना किंवा मेच्या सुरुवातिला होतं.......जुन, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे चार महिने 'लेह'ला जायचा सिझन असतो....

अभ्या..'s picture

18 Dec 2012 - 12:23 pm | अभ्या..

मनोबा लगे रहो. चांगला मॅप देतोयस.
उपयोग व्हणार आहे.

खूप खूप धन्य्वाद सगळ्यांना.....!!!

ह भ प's picture

18 Dec 2012 - 1:24 pm | ह भ प

दर दिवसाला वाट्टेल त्या परिस्थितित ६०० कि.मि?
आमचा शि.सा.न.वि.वि. घ्यावा..
वर्णन अत्युत्तम..
फटू झबरा..

दीविरा's picture

18 Dec 2012 - 2:06 pm | दीविरा

खूपच बहारदार सफर,असे काही लिहले आहे की वाह वाह !!

पुढचा भाग लवकर येऊ द्या.

कौस्तुभ खैरनार's picture

18 Dec 2012 - 5:43 pm | कौस्तुभ खैरनार

आमची पण बाईक वर फिरण्याची ईछा नि॓माण झाली आहे.

गोमट्या's picture

19 Dec 2012 - 1:46 pm | गोमट्या

बाकि मनरावांना परत एकदा सलाम, आणि शुभेच्छा. वाट पाहतोय पुढिल भागाची.

jaypal's picture

19 Dec 2012 - 11:21 am | jaypal

अवाडले. पुढिल लिखाणास आणि भटकंतीस शुभेच्छा

तर्री's picture

19 Dec 2012 - 2:58 pm | तर्री

प्रवासा प्रमाणे प्रवाही लेखन....पुढचा भाग येवू द्या लवकर !

रणजित चितळे's picture

20 Dec 2012 - 6:36 am | रणजित चितळे

छान मस्त लेख. मी सियाचीन ग्लेशीयर वर लेख टाकत आहे. त्यामुळे आपल्या लेहला ते कॉम्पिमेंट होईल असे वाटते.

कौन्तेय's picture

2 Jan 2013 - 10:35 pm | कौन्तेय

तिसरा भाग येऊनही या दुसर्‍या भागावर कमेंट टाकतोय याला कारण आहे. ते म्हणजे भर पाण्यातून बुलेट नेताना बुडालेल्या सायलेन्सरमधे मामुली पाणी जाण्यामुळे जरी गाडी बंद पडली तरी ती कालांतराने आपणहोऊन सुरू होऊ शकते! लगेच इंजिनच्या शस्त्रक्रीयेची भिती बाळगण्याची गरज नाही - हा महत्वाचा मुद्दा भेटला.
बाकी वृतांत लई झ्याक -