'लेह' वारी, भाग १

मनराव's picture
मनराव in भटकंती
11 Dec 2012 - 10:57 am

Test

आयुष्यभर आठवणीत राहील असा अमोल ठेवा (६५०० km, १९ दिवस) शब्दात बांधण्याचा प्रयत्न करतोय.
हा तर... !!! गेल्या वर्षी मी आणि तुषार भीमाशंकरला गेलो होतो. दिवसभर झालेल्या गप्पांमध्ये दोन विषय लक्षात ठेवण्यासारखे झाले. १: बुलेट घ्यायची आणि २. लेह ला जायचं. पुढे मग साधारण महिना दोन महिने गेले असतील आणि तुषारचा फोन आला.

तुषार: समीर !!! मी पाडव्याला बुलेट बुक केली.
मी: काय SSS सहीच.. एकदम...!!! थांब मी पण बुक करून टाकतो. आयला परवा परवा पर्यंत माझ्या समोर पल्सर २२० ची महती गाणारा प्राणी अचानक बुलेट बुक करून आलास पण. भारीच !!! करणारच शेवटी आपली चॉईस हाय ;)

पुढे अश्याच शिळोप्याच्या (आईचा ठेवणीतला हा शब्द) गप्पा झाल्या आणि दोन दिवसांनी मी पण जाऊन बुलेट बुक केली. ट्रीपमध्ये चर्चा झालेला एक विषय हातावेगळा झाला होता. बुलेट १० महिन्यांनी मिळणार होती. आता वेध लागले होते दुसऱ्या विषयाचे. "Mission लेह" चे. त्यानंतर वर्षभर जेव्हा जेव्हा भेटलो, बोललो तेव्हा तेव्हा, किमान एकदा तरी लेह वारीची चर्चा व्हायची. पहिले ७-८ महिने काही वाटलं नाही पण जेव्हा गाडी कधी मिळणार याची चौकशी सुरु केली तेव्हा गाडी मिळायला एक दोन महिने जास्त वेळ लागणार म्हणून डीलर कुणकुण करू लागला आणि आम्ही "आम्हाला गाडी लवकर द्या !!! लेह ला जायचय" म्हणून भूनभून करायला लागलो. अखेर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मुहूर्त लागला आणि दोघांनाही एकाच दिवशी गाड्या ताब्यात मिळाल्या. लेहला यंदा १००% जायचं अस ठरवलं असल्यामुळे गाड्या पळवायला सुरुवात केली. कारण २-३ सर्विसिंग (निदान ३००० - ४००० km तरी ) शिवाय गाडी घेऊन जाता येणार नव्हते. ४-५ लांब ट्रीपा मारल्या आणि तो कोटा भरून काढला.
Map
मधल्या काळात कुठून जायचं, कसं जायचं आणि काय काय समान न्यायचं/घ्यायचं या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधून काढली. काही अनुभवाचे आणि काही फुकट असे भरपूर सल्ले मिळाले. सारं काही ऐकून (पटेल ते घेऊन) अखेर १८ ऑगस्टला निघायचं ठरवलं. १७ ऑगस्ट उजाडला. तुषारला फोन केला, घेऊन जाण्याचं सगळं समान गोळा झाल्याची खात्री केली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.०० ला निघायचं ठरलं. ट्रेकिंगसॅग मध्ये सगळं काही भरून ठेवलं आणि झोपलो. पहाटे ४.०० ला उठून अर्ध्या तासात आवरलं आणि सॅग गाडीला बांधायला खाली आलो. सगळे प्रयत्न करून सुद्धा, ती मोठी पिशवी गाडीला नीट बांधता येईना. १० - १५ मिनिटे आणखी प्रयत्न केला पण काही जमेना मग सरळ ट्रेकिंगसॅग न्यायचं रद्द केलं. परत वर गेलो आणि ट्रेकिंग सॅग रिकामी करून सॅडल बॅग (फोटो मध्ये दिसेलच) मध्ये सगळं समान भरलं.
Bike
पंक्चर काढण्याचं कीट, गाडीचे आणखी काही लागणारे पार्ट, कपडे आणि बाकी किरकोळ भरपूर गोष्टी मिळून अंदाजे ३० किलो वजन भरेल एवढं समान होतं आणि ते परत व्यवस्थित लावायचं होतं. या सगळ्या प्रकारात अर्धा पाउण तास गेला आणि तुषारला उशीर होतोय म्हणून फोन करायचा राहिला. इकडे हा बाबाजी ५.३० लाच निगडी नाक्यावर येऊन उभा राहिला होता आणि दर ५ मिनिटांनी फोन करत सुटला होता. मी इकडे पळापळ करून (३० किलो घेऊन) घामाघूम झालो होतो आणि मध्ये मध्ये याचे फोन. कसंबस गाशा गुंडाळला आणि ६.०० ला घरून निघालो. १८ ऑगस्ट उजाडण्या आधीच निघण्याचा बेत फसला होता. ढगाळ वातावरण होतं पण पाऊस पडत नव्हता म्हणून मग आणखी उशीर न करता रेन कोट नुसताच बरोबर घेतला. पण नशिबात काही वेगळच लिहिलं होतं. घर सोडून १-२ km झाले असतील आणि तो (पाऊस) आला. मग न थांबता तसाच भिजत निगडी नाका गाठण्याचा ठरवलं आणि १५ मिनिटात तिथे पोहोचलो. आमच्यावर मुक्त तोंडाने फुले उधळण्यासाठी, साहेब आमची वाट बघत उभे होतेच. गुमान सगळं ऐकत मी अख्खा रेनकोट चढवला पण त्या शहाण्याने बडबडीच्या नादात नुसतेच जर्किन घातले. मी आपला हो हो म्हणत निघू म्हणालो आणि आवरत घेतलं. देशाच्या उत्तर टोकाचा प्रवास सुरु झाला होता.
देहूरोड येई पर्यंत पावसाचा जोर वाढला आणि आम्ही थांबलो. श्रीमंत गाडी थांबवून उतरले, गाडी साइडस्टॅंडला लावली आणि रेनकोट घालू लागले. कशी कुणास ठाऊक पण आम्ही गप्पा मारत असतानाच त्याची गाडी साइडस्टॅंडच्या विरुद्ध दिशेला कलंडली आणि पडली. मी मागेच उभा होतो पण, आधीच वजनदार (मी नव्हे, गाडी) आणि त्यात आणखी ३० किलो वजन जास्त असलेलं ते धूड मागे उभा राहून सांभाळणे केवळ अशक्य होतं. तरी लगेच पुढे झालो आणि जमिनीला आलिंगन दिलेली गाडी झटक्यात उचलली. "माझ्यात एवढं बळ कुठून आलं ?" माझं मलाच आश्चर्य वाटलं. गाडी पडली आणि त्याची पुढच्या ब्रेकची लिवर अर्धी तुटली. ती वाकून वजन न पेलवल्यामुळे तुटताना मी अगदी हतबल होऊन पहिली होती. प्रवासामध्ये अडथळ्यांची परीक्षा सुरु झालीच होती त्यात आणखी भर पडली. थोडसं वाईट वाटलं पण काय करणार, अर्धी तुटकी ती कांडी टाकली बॅग मध्ये आणि निघालो पुढे. लोणावळ्यात थोडावेळ थांबलो, पाऊस पण थांबला होता,सगळीकडे कसं हिरवागार टवटवीत होतं. गाड्या पुन्हा एकदा चेक केल्या आणि निघालो.
Bike2
घोडबंदर मार्गे अहमदाबाद हायवे पकडायचा आणि मग तो धरून, थेट उत्तरे कडे प्रयाण करायचे असं ठरवलं होतं. मुंब्र्या पर्यंत न चुकता आलो, टोल नाका पार करून हायवेला लागलो. आधी एकदा घोडबंदर मार्गे विरारला गेल्यामुळे, एक २-३ km पुढे गेल्यावर आपण रस्ता चुकलो आहोत कि काय असं वाटायला लागलं. "तो मी नव्हेच" असं तो (रस्ता) ओरडून ओरडून सांगत होता आणि तेच बरोबर होतं. तुषारला रस्ता चुकलोय असं खुणेने सांगितलं आणि एक ठिकाणी चौकशी केली तर कळलं आम्ही आग्रा हायवेवर आहोत. झालं कल्याण... असो..थोडी विचारपूस केल्यावर पुढून भिवंडी मार्गे रस्ता आहे हे कळलं, पण भिवंडीच्या गर्दीतून आणि खराब रस्त्यावरून जाण्यात वेळ जाणार होता म्हणून मग हो-नाही करता करता मागे वळायच ठरलं. परत ठाण्यात येऊन घोडबंदर रोडला लागलो. आता रस्ता ओळखीचा वाटू लागला. लोणावळ्याहून निघाल्यावर कुठेही थांबलो नव्हतो. पोटात कावळे ओरडण्याबरोबर नाचायलाही लागले होते आणि वर ढग गडगडायला लागले होते. सगळीकडे अंधारून आलं होत. सकाळचे ९.३० वाजलेले असून सुद्धा संध्याकाळी ७.०० चं वातावरण होतं. थोडी विश्रांती घ्यावी म्हणून मग एक हॉटेल बघून थांबलो. रेनकोट वगैरे काढून ठेवताना नजर हॉटेलचा अंदाज घेत होती (साफ सफाई स्वच्छता वगैरे वगैरे). हॉटेलचा मालक अस्सल मुस्लीम पेहराव, डोक्यावर टोपी इत्यादी गोष्टी घातलेला. म्हंटल मुस्लीम असला म्हणून काय झालं, हॉटेल तसं बर दिसतंय. नित्यनियमा प्रमाणे काय काय मेनू मध्ये आहे, ते (पाठ झालेलं) त्याने सांगितलं. ऑर्डर गेली "एक कांदा उत्तपा आणि इडली सांबर". लगेच ती ५ मिनिटात आली सुद्धा पण घोर निराशेला बरोबर घेऊनच, अगदीच बकवास चव. बाहेर पाऊस धो-धो सुरु झाला होता आणि मी काहीतरी चांगलं खायचं सोडून बेचव उत्तपा खात होतो. तुषार पण वाकडतिकडं तोंड करून समोर आहे ते गप गिळत होता. माझा उत्तपा थोडा खाऊन झाल्यावर या महाराजांनी सांगितलं, "दोनीही गोष्टींना मटणाचा वास येतोय". त्यातल्यात्यात तुषारला तर जास्तच. त्यात हा प्राणी सगळे प्राणी खातो तरीही त्याला वास सहन होत नव्हता. का कुणास ठाऊक पण मला तसला कसलाही वास आला नाही. तसच अर्ध पोटी खाणं टाकलं, चहा प्यायला आणि रेनकोट घालून भर पावसात तिथून निघालो. १०.०० वाजले तरीही मुंबापुरी अजून फार काही लांब गेली नव्हती. आजचा पहिला मुक्काम होता घरापासून ८५० km लांब उदयपूरला, म्हणून मग सुसाट गाडी हाकायला सुरुवात केली. रस्ता एकदम चकाचक, ८०-९०-१०० km तशी वेगाने दोन बुलेट पळत होत्या. पाऊस धो-धो कोसळत होता, समोरचं १०० - २०० फुटाच्या पलीकडे काहीच दिसत नव्हतं, इतका तो जोरदार कोसळत होता. तो थांबायचं नाव घेत नव्हता आणि आम्ही थांबायचा काही प्रश्नच नव्हता. चकाचक रस्ता असला तरी उतार चढ असल्या मुळे ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली होती. अंगावर उडणाऱ्या पाण्याची फिकीर न करता भरधाव त्यातून आम्ही निघून जात होतो. एका पाटोपाठ एक ट्रक मागे टाकत आणि मधूनच एखाद-दोन चारचाकी सप्पकन आम्हाला मागे टाकून पुढे जात होत्या. अगदी महाराष्ट्राच्या सिमे पर्यंत हाच खेळ चालू होता. महाराष्ट्र सिमे जवळचा टोल नाका येई पर्यंत दुचाकी अगदी बोटावर मोजण्या इतक्याच (आमच्या दोन सोडून) दिसल्या. टोल नाक्याला पोहोचलो तेव्हा पावसाचा जोर कमी झाला होता, मग तिथेच एक रिकाम्या लेन मध्ये गाड्यांना आणि स्वतःला विश्रांती देण्यासाठी थांबलो.
Stop
चांगली १५-२० मिनिटे आराम केल्यावर पुढचा प्रवास चालू केला. आमचा नाष्टा झाला होता पण गाडीचं काय? सकाळी निघाल्या पासून ३०० km झाले असतील तरी ती अजून उपाशीच होती, म्हणून मग थोडं पुढे गेल्यावर एक पंप दिसला आणि आत वळलो. पंप मस्त धुवून काढून, हार फुलांनी सजवलेला होता. पूजा अर्चा झालेली होती. पंपाकडे जाताना, दोन विचित्र माणसं, दोन काळ्या बुलेट, ते सुद्धा MH-14 पासिंगच्या, इकडे कुठे आल्या म्हणून लोकं कुतुहुलाने आमच्या कडे बघत होती. आम्ही आपलं गेलो आणि दोनीही टाक्या फुल करून घेतल्या. इतक्यात पंपाचा मालक बाहेर आला. कुठून आलात, कुठे चाललात वगैरे चौकशी केली. त्याला त्याच्या प्रश्नांची आश्चर्यकारक उत्तरं मिळाल्यावर गड्याने आमचे नाव पत्ते वगैरे लिहून घेतले. पंपाला एक वर्ष पूर्ण झालं म्हणून ही सजावट, पूजा वगैरे आहे असं त्याच्या कडून कळलं आणि सोबत सामोसे चहाचा नाष्टा पण मिळाला. सामोसे म्हणजे माझा जीव कि प्राण... अहाहा... !!! क्या बात... !!! पावसात भिजून आल्यावर गरम गरम सामोसे आणि चहा... वा... वा... एकदम मस्तच ! चांगले दोन तीन सामोसे हाणले. आणखी घेणार होतो पण "ऊस मुळा सकट खाऊन नये" हा वाक्प्रचार आठवला आणि स्वतःला आवरलं. सकाळच्या बेचव नाष्ट्याची उणीव याने भरून काढली. खाऊन पिऊन झाल्यावर निघायच्या वेळेला गोधरा मार्गे उदयपूरला जाण्याचा सल्ला मालकाने दिला. गाडीचं जेवण आणि आमचा नाष्टा दोनीही झालं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. गाडीचा वेग ताशी ९० -१०० km ठेवला होता. त्याच्या वर गेला तर बुलेट इतका थरथराट करते कि हातासकट अख्या शरीराला मुंग्या यायला लागतात. ९० ने सुटणे म्हणजे काय याचा शब्दशः अनुभव घेत दुपारी २.३० - ३.०० पर्यंत गाडी दामटत होतो. पोटात पुन्हा कावळे डिस्को करायला लागले म्हणून थांबलो. जेवलो ( तेवढीच गाडीला पण विश्रांती) आणि पुन्हा निघालो. संध्याकाळचे ६.०० वाजत आले तेव्हा बडोद्याची वेस दिसायला लागली. गोधरा मार्गे जायचं असल्यामुळे बडोद्याच्या बायपास वर अहमदाबाद रोड सोडला आणि एका गंभीर घटने मुळे उजेडात आलेल्या गावाचा (गोधाराचा) रस्ता धरला. उन्हं उतरायला लागली होती आणि उदयपूर अजून चिक्कार लांब होतं. घरातून निघताना, "रात्री गाडी न चालवण्याची सक्त ताकीद दिली गेली होती (दोघांनाही)". स्वतःच्या आणि गाडीच्या तब्यतीसाठी ती अमलात आणायची ठरवलं होतं. ज्या गावाबद्दल नुसत्या बातम्याच वाचल्या, ते कसं असेल, तिथली लोकं कशी असतील आणि आपण तिथेच रहायचं का? याचा हिशोब मनात सुरु झाला. पण आम्हाला गोधरा सुद्धा गाठता आलं नाही. अंधाराचं साम्राज्य पसरलं, तेव्हा आम्ही गोधरा पासून ५३ km अलीकडे "हलोल" मध्ये होतो. मग तिथेच पहिला मुक्काम पडला. सकाळी निघायला झालेला एक दीड तास उशीर, आग्रा रोडची गडबड आणि त्या धुडाला (बुलेटला) घेऊन १०० km ताशी वेग मर्यादा ओलांडता न येणे या मुळे ठरलेल्या योजनेचा (उदयपूरला पोहोचण्याचा) बट्याबोळ झाला होता. असो...त्या छोट्याश्या गावामध्ये एक छोटेखानी हॉटेल शोधलं, खोल्या चांगल्या असल्याची खातरजमा केली आणि तिथेच थांबण्याचा निश्चय केला. लगेच घरी फोन फोनी करून सगळा रेपोर्ट दिला आणि रिकामा झालो. मस्त फ्रेश झालो आणि जेवलो. हॉटेल लहान होतं पण जेवण मात्र अप्रतिम होतं. साधीच ऑर्डर दिली. दाल फ्राय, जीरा राइस, रोटी, पनीर टिक्का, मटर पालक. त्यात जोडीला ताक. अक्षरशः पोट भरून एक एक पदार्थ हाणला आणि तृप्त झालो. पहिला मुक्काम चुकलाच होता, त्यामुळे पुढचे मुक्काम बदलेले. मग पुढच्या दोन तीन दिवसाचा प्रवास आराखडा बांधला, कुठे थांबायचं, काय करायचं (साहेबाच्या भाषेत प्लान A, प्लान B वगैरे वगैरे) ठरवलं आणि सकाळी लवकर निघायचं ठरवून झोपलो. जवळपास ६०० km गाडी चालवून प्रवासाचा पहिला दिवस संपला होता.

क्रमशः

प्रतिक्रिया

१ प्रश्न गाड्या इथुन चालवत नेण्यामागे काही कारण होते का, कारण शक्यतो तिकडे जाणारे झुकझुक गाडीत नेतात म्हणुण विचारले.....

मनराव's picture

11 Dec 2012 - 11:49 am | मनराव

>>गाड्या इथुन चालवत नेण्यामागे काही कारण होते का<<<
अंगात मस्ती... तिकडुन तर सगळेच जातात....... इथुन जाण्यात अणखी मजा........

तिमा's picture

11 Dec 2012 - 6:16 pm | तिमा

आपल्या अफाट साहसाला कोपरापासून दंडवत! सुरवात झकास झाली आहे. लेखनशैली पण छानच. संपूर्ण वर्णन वाचायला खूपच मजा येईल.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Dec 2012 - 11:18 am | अत्रुप्त आत्मा

खत्तरनाक हो मनराव... आंम्ही तुमची बुलेट भक्ति अनुभवलि आहे...ती या अख्ख्या लेखमालेत प्रकट होणार हे नक्की... लै जबर्‍या वाट्टय वाचताना...आणी आंम्ही कामानिमित्त केलेल्या गोव्यापर्यंतच्या आंडदांड ट्रीप पण अठवल्या http://www.freesmileys.org/smileys/smiley-transport026.gif

ओल्द मोन्क's picture

11 Dec 2012 - 11:19 am | ओल्द मोन्क

छान प्रवासवर्णन....

श्री गावसेना प्रमुख's picture

11 Dec 2012 - 11:21 am | श्री गावसेना प्रमुख

च्चान च्चान
गाडी सोडुन फोटु येउ द्या की च्चान च्चान फोटु काढले असतील ना

विलासराव's picture

11 Dec 2012 - 11:25 am | विलासराव

असे एकएकटे जाण्यापेक्षा मला आवाज द्यायचा होता ना.
जाउद्या आता .
वाचतो तुमची कहाणी.

Dhananjay Borgaonkar's picture

11 Dec 2012 - 11:29 am | Dhananjay Borgaonkar

पहिल्या फोटोच सगळं काही सांगुन जातो. कातील आहे फोटो. पुढचे भाग लौकर येउदेत.

भोचक प्रश्ण - नॉर्मली लोकं पुण्याहुन अंबाला/दिल्ली पर्यंत रेल्वेने जातात आणि तिथुन पुढे बाईकने जातात. तुम्ही पुण्याहुनच बाईकने जाण्याचे काय प्रयोजन होतं.

इरसाल's picture

11 Dec 2012 - 11:34 am | इरसाल

पण सांभाळा. वेगाच्या नादात, तेही पावसाळ्यात ८०-९०-१००. घरी कोणीतरी आपली वाट बघत असतं.

पियुशा's picture

11 Dec 2012 - 11:43 am | पियुशा

पू.भा.प्रतिक्षेत :)

सूड's picture

11 Dec 2012 - 11:44 am | सूड

पुभाप्र !!

मोदक's picture

11 Dec 2012 - 11:56 am | मोदक

झकास..

वाचतोय... :-)

जबर्‍या!! मिपावर एक्प्लोरर्स लै खतर्नाक हैत :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Dec 2012 - 1:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेखन आवडले. खास तुम्हाला आलेल्या अनुभवांनी वर्णनास खुमारी आली आहे.

रेल्वेने काय सगळेच जातात. तुमची बाईकने जाण्याची कल्पना आणि त्यासाठी केलेली सज्जड १२+ महिन्यांची प्रतिक्षा व तयारी जबरी वाटली !

जरा जास्त फोटो टाकलेततर अजून मजा येईल. अर्थात बाईकवरून जाताना आजूबाजूकडे कमी लक्ष देता येते. शिवाय फोटो काढायला थांबायला लागून थोडा प्रवासाचा वेळही वाढतो हेही खरे.

एक न मागीतलेला सल्ला : बाईक ऊत्तम चालवता आहात हे नक्कीच. पण निदान पावसाने निसरड्या झालेल्या व व्हिजीबीलीटी सुमार झालेल्या रस्त्यावर बाईक कमी वेगाने हाकणे स्वास्थ्याच्या (स्वताच्या व टूरच्यापण) बरे असते. अर्थात हे मी काही फार वेगळे सांगत नाही. तुम्हाला माहीत आहेच !

पुभाप्र.,,

ऋषिकेश's picture

11 Dec 2012 - 1:48 pm | ऋषिकेश

चांगली सुरवात.. पुढील प्रवासात वाचक म्हणून तरी सहप्रवासी होण्यास उत्सूक :)

याच विषयावर अजित हरिसिंघानी (अनुवाद सुजाता देशमुख) यांचं 'बाईकवरचं बिर्‍हाड' हे पुस्तकही वाचनीय आहे.
ते देखील अशाच आंतरजालीय लिखाणासारख्या शैलीतलं पुस्तक आहे आनि प्रवासही पु़णे ते जम्मु व्हाया लेह असा बाईकवरून केलेला प्रवास रोचक आहे. लेखकाची सुक्ष्म निरिक्षणशक्ती, प्रसंग, खुमासदार वाक्ये यांनी पुस्तक वाचनीय झालं आहे.

त्या पुस्तकाचं मलपृष्ठ म्हणतं:
प्रसिध्द गिर्यारोहक सर एडमंड हिलरींना कुणीतरी एकदा विचारलं, की जीव एवढा धोक्यात घालून तो हिमालय चढायचाच कशासाठी? त्यावरं त्यांचं उत्तर होतं, ''कारण तो तिथे आहे म्हणून!'' कोणत्याही प्रकारच्या वेडया साहसाला त्यामुळेच 'का' हा प्रश्न कधी कुणी शहाण्या माणसानं विचारू नये.
नाहीतर अशी पुस्तकंच जन्माला येणार नाहीत.

५० फक्त's picture

11 Dec 2012 - 4:01 pm | ५० फक्त

आली आली आली,

जेवढी प्रतिक्षा तुला बुलेटसाठी करावी लागली तशाच प्रतिक्षेनंतर तुझी लेखमाला आली.

धन्यवाद.

प्रचेतस's picture

11 Dec 2012 - 4:02 pm | प्रचेतस

झकास रे मनराव.
पुढचा दिवस लवकर येऊ देत.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

11 Dec 2012 - 4:06 pm | घाशीराम कोतवाल १.२

मायला मनराव जबरदस्त होणार ही लेखमाला बाकी दिल्ली वा जम्मु वरुन बाईक नेणार्यांचे अनुभव वाचलेत पण तुमचा प्रवास जबर्दस्त झाला असेल ना..येवु द्या वाचतो आहे

सुधीर's picture

11 Dec 2012 - 5:36 pm | सुधीर

नुसत्या पुणं-मुंबई प्रवासाने मी थकतो (कार किंवा बसने). येवढ्या मोठ्या प्रवासाची (ती पण बाईकने) कल्पनापण नाही करू शकत राव. तुम्ही तर एका दिवसात थेट गुजरात अर्ध गाठलात. भारी! लवकर-लवकर लिहा.

नरेंद्र गोळे's picture

11 Dec 2012 - 5:38 pm | नरेंद्र गोळे

वा! राव,
मराठी मनाला अटकेपार झेंडे रोवण्याची प्रेरणा देणारे सशक्त कर्तब तुम्ही केलेले आहेत.
त्या साहसास माझा मानाचा मुजरा!

हे वेड म्हणू की तरूण मनाची ओढ ।
काळजात धडकत्या मस्तीचेच कवाड ॥
ते उघडून, गेले दुरून, पोहोचले तिकडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ धृ ॥

किती येवो पाऊस, खुशाल चुकू दे रस्ता ।
कधी तरफ तुटू दे, नाश्ता देवो चकमा ॥
ठरते धारिष्ट्या दैव धार्जिणे, जिकडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ १ ॥

किती पल्ला मोठा, वेग नव्वदीवरचा ।
तो पाऊसकाळ अन्‌ रस्ता ओला सगळा ॥
गेले, अबलख वारूपरी दुचाकी उडवित वेडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ २ ॥

मनराव's picture

11 Dec 2012 - 5:59 pm | मनराव

वाह!! वाह !!

कपिलमुनी's picture

11 Dec 2012 - 6:23 pm | कपिलमुनी

लै भारी !!!
लौकर लौकर टंका ...अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे..

प्यारे१'s picture

11 Dec 2012 - 6:39 pm | प्यारे१

सुप्परलाईक्ड...!

लवकर लवकर (३१ डिसेंबरपूर्वी) पूर्ण लेखमाला आल्यास सयाजीला प्यार्टी देण्यात येईल. (सयाजीला म्हणजे सरुटॉबाने मध्ये नेऊन मनरावला 'एकट्याला')

मी-सौरभ's picture

11 Dec 2012 - 7:16 pm | मी-सौरभ

या प्यार्टीला अस्मादिकांची उपस्थित रहान्याची ईच्छा आहे (स्वखर्चानेच)

तुमच्या प्रतिसादावर लक्ष ठेवून आहे!

;-)

मी-सौरभ's picture

12 Dec 2012 - 12:28 pm | मी-सौरभ

का रे बाबा??

मोदक's picture

12 Dec 2012 - 7:16 pm | मोदक

कट्ट्यासाठी.

येणी पिराब्लेम? ;-)

मी-सौरभ's picture

13 Dec 2012 - 10:58 am | मी-सौरभ

तुला बी थम्स अप ऑण द रॉक्स माझ्याकडुन

वाचन चालु आहे.. पुढचा भाग लवकर येऊद्या.

?

रुस्तम's picture

11 Dec 2012 - 8:28 pm | रुस्तम

झकास... लै भारी !!!

सोत्रि's picture

11 Dec 2012 - 8:31 pm | सोत्रि

123

मनोबा, तुझ्या साहसाला हा माझा मानाचा मुजरा!
सहसा क्रमशः असलेल्या प्रत्येक भागांवर प्रततिसाद द्यायला आवडत नाही पण ही मालिका त्याला अपवाद असेल.

- (मनोबाच्या साहसाने भारावलेला) सोकाजी

रेवती's picture

11 Dec 2012 - 8:38 pm | रेवती

भारीच! वाचतीये. गाड्या ताब्यात मिळण्यासाठी वाट पहावी लागली पण सार्थक झाले म्हणायचे.

सुनील's picture

11 Dec 2012 - 11:38 pm | सुनील

वाचतोय. हा भाग मस्त. पुभाप्र.

श्रीरंग_जोशी's picture

12 Dec 2012 - 2:36 am | श्रीरंग_जोशी

मोहिम असावी तर अशी :-).
लेखनशैली पण छानच.

अवांतर - परराज्यांतून दुचाकी घेऊन येणार्‍यांना ट्रॅफिक पोलिसांकडून नेहेमी टोकले जातांना पाहिले आहे.
असा काही अनुभव आला का या प्रवासात?

मस्त अनुभव आहे आणि लिहिले पण छान आहे, पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.

दादा कोंडके's picture

12 Dec 2012 - 2:49 am | दादा कोंडके

साष्टांग दडवत!
पुढचे भाग पटापट येउद्या.

-(पुण्यावरून लोहगडला बाईकवर जाउन आजारी पडलेला) दादा

अभ्या..'s picture

12 Dec 2012 - 3:00 am | अभ्या..

मनराव तुमच्या या साहस यात्रेला आणि विशेष म्हणजे बुलेट्प्रेमाला सलाम.

(तुमच्यासारखाच बुलेटप्रेमी)
अभिजीत

अन्तु बर्वा's picture

12 Dec 2012 - 9:43 am | अन्तु बर्वा

छान प्रवास वर्णन! पण एक दुरुस्ती. तुम्ही जी बाइक इथे वापर्लीय ती "बुलेट" नाही. ती रोयल एन्फिल्ड "क्लासिक ३५०" आहे.

बुलेट ही आहे...

http://pi3.priceindia.in/bike/wp-content/uploads/2008/09/royal-enfield-b...

बाकी पु.भा.प्र.

अभ्या..'s picture

13 Dec 2012 - 2:55 am | अभ्या..

क्लासिक ३५० असु द्या नायतर डेझर्ट स्टॉर्म असू द्या
आमच्या द्रुष्टीने जे धडढधडत आसतंय ना साडेतीनशांचं हिरीवरचं ईंजान नेकेड क्रोम फिनीशवालं ते बुलेट आसतय. :)
ब्याककीकला खुबा हलावणारं आन चालू झाल्यावर सगळ्यांना वळून बघायला लावणारं भूत म्हणजे बुलेट आसतय.
कुठल्याबी ट्राफिकवाल्याला जे थांबवायचं डेरींग नसतंय ते धूड म्हणजे बुलेट आसतय.

अन्तु बर्वा's picture

13 Dec 2012 - 9:25 am | अन्तु बर्वा

चीअर्स!

मनराव's picture

13 Dec 2012 - 10:52 am | मनराव

+११११११११११११११११११११

दादा कोंडके's picture

13 Dec 2012 - 1:51 pm | दादा कोंडके

जे धडढधडत आसतंय ना साडेतीनशांचं हिरीवरचं ईंजान नेकेड क्रोम फिनीशवालं ते बुलेट आसतय

खरंय!

-(रोज कोलगेटनी दात घासणारा) दादा

किसन शिंदे's picture

13 Dec 2012 - 3:15 pm | किसन शिंदे

मी तर मामाच्या फट..फट..फट करत चालणार्‍या येझडी गाडीलाही बुलेटच म्हणायचो.

:) बुलेट, येझ्दी आणि राजदूत या तीन गाड्या म्हणजे अस्मादिकांसाठी दबंगईचे प्रतीक होत्या कधीकाळी.

गवि's picture

14 Dec 2012 - 5:11 pm | गवि

त्याची गियर लिव्हर उलटी करुन किक मारायची असते तीच ना?

थोडे दिवस आणली होती वापरण्यासाठी बदली म्हणून, तर पायाच्या अंगठ्याचं नख मुळापासून उचकटलेलं किक मारताना फूटरेस्टवर आपटून.. नंतर दोनतीन आठवडे वेदनेचा डोंब. पूर्ण अंगठा काळा पडायला लागला तेव्हा डॉक्टरांनी जबरदस्तीने पकडून स्पिरिट लँपवर गरम करुन नख पुरतं उखडलं.....

येझ्दीचं नाव घेतलं तरी अजून कळ मस्तकात जाते (पायाच्या अंगठ्यापासून..).

अभ्या..'s picture

14 Dec 2012 - 5:22 pm | अभ्या..

जळळत नाही लौकर ;) आजच्या गाड्यासारखे प्लास्टीक पार्ट नव्हते तिला.
गवि ती जावा. इंडोनेशिअन जावा. त्याची टाकी चंपर्ड नसायची. बुलेटसारखीच गोल असायची. जावा यझदी दोन सायलेन्सरवाली असायची ती पण २५० सीसी टूस्ट्रोक.
येझदीला तशी गिअर लिव्हर होती पण नंतर सेपरेट केली. येझदीचे बरेच मॉडेल होते स्टँडर्ड, मोनार्क वगैरे. अगदी साल २००४ पर्यंत आंध्रात डीलर्स होते येझदीचे. अजून रॉकेलवर चालवतात काहीजण पेट्रोलची पिचकारीतून गुट्टी देऊन.

नाही, जावा नाही. येझ्दीच. दोहोबाजूंनी चपटी टाकी आणि समोर स्टेपनी (पुढच्या चाकाच्या वर. फूटगार्ड असतो तशा प्रकारे.).

माझ्या मित्राच्या बाबांची साठच्या दशकातली होती ती गाडी, किंवा जे काही होतं ते.

अभ्या..'s picture

14 Dec 2012 - 5:51 pm | अभ्या..

दोहोबाजूंनी चपटी टाकी

मग यझदीच. राईट यू आर. सॉरी आयम.
बादवे गवि माझापण विचार चाललाय.
एखादी जुनी उचलून करावी मॉडीफाय. ;)
कायदा काय म्हणतोय? चालतेय का टू स्ट्रोक?
फ्रीसेल रॉकेलवर वापरायला काय प्रॉब्लेम आहे?

आयडिया ठीके. फक्त किकनजीकचे फुटरेस्ट काढा.

दादा कोंडके's picture

14 Dec 2012 - 6:29 pm | दादा कोंडके

फ्रीसेल रॉकेलवर वापरायला काय प्रॉब्लेम आहे?

पुर्वी बहुतेक गवळ्यांकडे यझ्दी गाड्या असायच्या. लहानपणी आमच्या गवळ्याच्या गाडीचा डू-डू-डू-डू आवाज मैलभरावरूनच यायचा. आणि गाडीचा अशक्य धूर यायचा तो त्या टाकीतसुद्धा दुधच भरत असावा.

- (अंगा पेक्षा बोंगा मोठ्ठा दिसेल म्हणून बुलेट न वापरणारा) दादा

कौन्तेय's picture

12 Dec 2012 - 11:55 am | कौन्तेय

मनराव, तुसी ग्रेट हो!
सन २०००मधे आपुन नर्मदा यात्रा केलीए एकट्यानं. नि खाली कोचीन बिचीनही तेही एकट्यानं. महाराष्ट्रात बरीच भटकंती केली. हापिसच्या कामानिमित्त गोव्याला सहासात वेळा. सगळं एकट्यानं. पण तेव्हा बजाज कॅलिबर होती नि खिशात पैका नव्हता. आता बुलेट आहे नि पैसाही, पण लांबचा पल्ला मारण्याची जिगर आहे की नाही म्ह्यायती नाही. त्यामुळेच तुमची ही सफ़र वाचताना आसूया, मत्सर, स्फ़ूर्ती, पोकळी, हेवा, अभिमान, नॉस्ट्याल्जिआ असं काय काय वाटायला सुरुवात झाली आहे. भरपूर शुभेच्छांसकट एकच म्हणायचे "चरैवेति"! माझी आहे एप्रिल २००७ला घेतलेली बुलेट एलेक्ट्रा ५एस. डाव्या पायाने गियर टाकण्याजोग्या या नव्या बुलेट्सबद्दल माझ एक निरीक्षण असं की इलेक्ट्रिक स्टार्ट वा आणखी काही सर्किट्समुळे याच्या वायरिंग्जमधे चारपाच ठिकाणी फ़्यूज उडण्याची व्यवस्था आहे. एकदा ते व्हायला लागलं की बाकी गाडी ठणठणीत असूनही रस्त्याच्या बाजूला उभे राहून डोक्यावरचे केस उपटण्यापलिकडे काऽही करू शकत नाही. मग सगळी वायरिंग्ज सर्किट आकृत्या समोर ठेवून ट्रेस करायची नि दोष काढायचा असा एकदा अनुभव आला. त्यावरून उगीच भिती बसलीए की ही गाडी लांबच्या ट्रिपांच्या कामाची नाही. तर या बाबतीत काय अनुभव आला तो जरा सांगून आमच्या मनातली भिती काढा ना -

फ्युज उडण्याची शक्यता ग्रहित धरुन अम्ही दोन तीन फ्युज बरोबर घेउन गेलो होतो पण तशी वेळ कधी आली नाही........ दुसरी गोष्ट म्हणजे....शक्यतो इलेक्ट्रिक स्टार्ट न करणे. (तसही एन्फिल्ड किकस्टार्ट करण्यात जी मजा आहे ति इलेक्ट्रिक स्टार्ट मधे नाही.....). बाकी लांबच्या ट्रिपसाठी कोणतीहि ठणठणीत गाडी चांगलीच.... पण ति जर बुलेट असेल तर क्या केहने... तुम्हाला आता गाडीची इत्यंभुत माहिती झालीच आहे त्यामुळे भिती सोडा आणि निर्धास्त पणे भटका...... :)

अन्तु बर्वा's picture

13 Dec 2012 - 3:11 pm | अन्तु बर्वा

तुम्हि नशिब्वान आहात की तुम्च्याजवळ कास्ट आयर्न इन्जिनची बुलेट आहे. नविन बुलेट्स (२००२) नंतर्च्या कुठ्ल्यही इतर बाइक इतक्याच रीलायबल आहेत. फक्त त्यांची व्यवस्थीत काळजी घेणं गरजेचं आहे. मी १९८९ ची कास्ट आयर्न बुलेट ३ वर्श वापर्ली. दोनदा पंक्चर आणी एक्दा गीअर केबल तुटणे ह्याशिवाय मला कसलाही दुसरा प्रोब्लाम आला नाहि. मी जवळ जवळ ६०००० कीमी कवर केले त्या बाइक वरुन.

//त्यावरून उगीच भिती बसलीए की ही गाडी लांबच्या ट्रिपांच्या कामाची नाही//

खरं तर जो पर्यन्त तुम्हि बुलेट वरुन लांबचा प्रवास करत नाहि तो पर्यन्त तुम्हाला बुलेट्ची खरी मजा कळणारच नाहि.

ट्रस्ट मी, बुलेट इज द ओन्ली बाइक वीच ह्याज सोल.

अभ्या..'s picture

13 Dec 2012 - 3:57 pm | अभ्या..

बुलेट इज द ओन्ली बाइक वीच ह्याज सोल.

अंतू दादा लाखबार सहमत.
सध्या १९९० ची आहे रिकंडीशन्ड. पण आठवड्यापूर्वीच केलाय आक्सीडेंट लहानसा.
आता तीन महिने तरी विरह आहे बुलेटचा. :(

मनराव's picture

12 Dec 2012 - 12:11 pm | मनराव

सगळ्यांना धन्यवाद....

गवि's picture

12 Dec 2012 - 12:46 pm | गवि

थरारक मोहीम...

पुढचा भाग वाचण्यासाठी प्रतीक्षा करत आहे. लवकर येऊ देत. फार ताण नको उत्सुकतेला.

अवांतरः वरील प्रतिसाद अजून एक मिनिटाने टाकला असतात तर १२/१२/१२ १२:१२ ला पडला असता..

सुरुवात 'श्री' ने करावी तसा बुलेटचा पहिला सुंदर फोटो लावलात, व्वा !! आणी त्यानंतरच वर्णन तर मस्तच.

--टुकुल

आधी सगळ्या प्रतिसादांना नमन.
अन आता मनराव्..अगदी मनाच्या वाटेने चालताय राव. भाग्यवान आहात. असेच रहा.
बा द वे माझा नवराही त्याच्या बाइकवर असच प्रेम करायचा. अगदी बायलीपेक्षा जास्त लक्ष बाइकवर असायच.

बॅटमॅन's picture

12 Dec 2012 - 5:13 pm | बॅटमॅन

जळका वास आलाच ;) =))

पुढाच्या भागाची आणि त्यातल्या अप्रतम फोटोंची उत्कंठतेने वाट पाहत आहे. :)
लवकर लिहा बरं... :)

किसन शिंदे's picture

13 Dec 2012 - 12:20 am | किसन शिंदे

झक्कास!!!

लेखमालिकेची आतुरतेने वाट पाहत होतोच आता पुढचे भाग पटाकन टाकत चल.

बाबा पाटील's picture

13 Dec 2012 - 12:28 am | बाबा पाटील

खुप दिवसांची अतृप्त इच्छा तुमच्या प्रवास वर्णनामुळे उफाळुन आलीय.....विचार करतोय या वर्षी दक्षिण भारत फिरावा...

बांवरे's picture

13 Dec 2012 - 6:39 am | बांवरे

पैला फोटू लै भारी !
झक्कास , लिहीत रहा.

पप्पुपेजर's picture

13 Dec 2012 - 6:46 am | पप्पुपेजर

माझी पण खूप इच्छा आहे पाहू कधी जमते तर,तुमचे अनुभव वाचण्यास उत्सुक .

पिंगू's picture

13 Dec 2012 - 12:26 pm | पिंगू

झक्कास रे मन्या..

नि३सोलपुरकर's picture

13 Dec 2012 - 1:56 pm | नि३सोलपुरकर

___/\____
झक्कास...मनोबा मस्त एकदम.
पु.भा.उ.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Dec 2012 - 3:11 pm | निनाद मुक्काम प...

पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत
जास्त वाट पाहायला लावू नका
अशी आर्जव करत आहे.
बुलेट सावकाश चालवतांना जसे घरी तुमची कोणीतरी वाट पाहताय हे तुमच्या ध्यानी होते.
तसे ही लेखमाला लिहितांना कोण तरी पुढच्या भागांची वाट पाहत आहे हे ध्यानी असू द्या ,आणि ही लेखमाला बुलेटच्या वेगात पुढे न्या.

गोमट्या's picture

13 Dec 2012 - 3:42 pm | गोमट्या

मनराव,सलाम तुम्हाला, आणि पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

रणजित चितळे's picture

13 Dec 2012 - 4:34 pm | रणजित चितळे

मस्त. पुढचे भाग येऊ द्या.

मी येथे पोस्टींगला होतो त्यामुळे जास्त जिव्हाळा ह्या भागाचा.

सध्या मी सियाचिन बद्दल लिहायला घेतले आहे. पुढच्या आठवड्यात देणार आहे मि पा वर

रोहन अजय संसारे's picture

15 Dec 2012 - 10:04 am | रोहन अजय संसारे

पुढचा भागाची आतुर्र्तेने वाट पहात आहे. लौकर लौकर लेखन करा. लेह लधाक आणि ते पण रोयल एन्फिल्ड वरून हा माझा पण आवडीचा विषय आहे.

हिरवळ's picture

16 Dec 2012 - 2:05 am | हिरवळ

टु गुड.... तुमच्या बरोबर आम्ही देखील लेहवारी करायला निघालो आहोत की काय असे वाटावे एवढे जीवंत वर्णन्...आहाहा..मजा आला...

संचित's picture

10 Feb 2014 - 1:48 pm | संचित

मनराव भारी लिहिलंय. आम्ही ४ मित्र तयारी करतो आहे लेह ला जाण्याची. एकूण ८ दिवसातून २ दिवस बाईक च्या सफरीसाठी ठेवले आहे. पण जरा प्रोब्लेम आहे. श्रीनगर ते लेह असा प्रवास २ दिवसात केला तर लेह ला गाडी सोडून पुढे जाता येईल का? आंतरजालावर बुलेट घेऊन फिरण्याची गोष्ट बरेच ब्लॉग करत असले तरी बाईक किरायाने देणार्यांचे नेमके संपर्क अजून तरी मिळाले नाहीत.