'लेह' वारी, भाग ६

मनराव's picture
मनराव in भटकंती
6 Feb 2013 - 4:16 pm

'लेह' वारी, भाग १
'लेह' वारी, भाग २
'लेह' वारी, भाग ३
'लेह' वारी, भाग ४
'लेह' वारी, भाग ५

असेच उनाडक्या करत वेळ घालवला आणि रात्री एका हॉटेल मधे जेवलो. जेवण झाल्यावर शतपावली करताना घरी फोन करून सगळा रिपोर्ट सांगितला, रूम वर गेलो, हिशोब केला आणि झोपलो.

सकाळी लवकर उठलो पण आरामात सगळं आवरल. आजचा दिवस खारदुंगलाच्या नावावर केलेला. खारदुंगला, जगातला सगळ्यात उंच (१८३८० फुट) रोड. तसं बघितलं तर मेरीस्मेक'ला' (भारतातच आहे) आणि खारदुंगला यात मतभेद आहेत पण जास्त प्रसिद्ध आहे तो खारदुंगला. तुम्हाला इतक्या वेळा प्रत्येक शब्दामागे 'ला' 'ला' कशाला लावतात हा प्रश्न नक्कीच पडला असेल. मलाही पडला होता. तर 'ला' म्हणजे पास किंवा डोंगर माथ्यावरचा रोड. खारदुंग हे गाव आहे आणि त्या गावाला जाणारा पास म्हणून खारदुंग'ला'. असो... निघाल्या पासून ठरलेल्या योजने प्रमाणे आम्ही 'लेह'ला पोहोचलो नव्हतो. एक दिवस 'लेह'ला पोहोचायला उशीर झाला होता त्यामुळे खारदुंगलाच्या पुढे नुब्रा व्हॅलीत जायचा बेत पुढच्या वारीवर ढकलावा लागला. मग खारदुंगलाला (लेह पासून ४० km) जाऊन परत येण्याचे ठरले. आरामात ८.०० ला निघालो. आज इकडे पोहोचलेच पाहिजे, हे झालंच पाहिजे असं कसलंही बंधन नव्हतं. निसर्गाचं अगदी रुक्ष पण तेवढंच मोहक अस वेगळच रूप अनुभवत होतो. मस्त रमत गमत खारदुंगलाला पोहोचलो.

१.
1

२.
2

३.
3

४.
4

५. खारदुंगलाला पोहोचलो तो क्षण.
5

तिथे जेव्हा पोहोचलो तेव्हाच्या भावना शब्दात व्यक्त करता येणार नाहीत. कर्ण्यावर (लाउड स्पीकरवर) अखंड काही तरी संगीत चालू होतं. काय होतं ते नाही समजलं पण वरती असलेल्या बुद्ध मंदिरात चालू होतं. दोनीही गाड्या लावल्या एका बाजूला आणि हिंडायला लागलो. आम्ही डोंगर माथ्यावर होतो. एके ठिकाणी अजूनही बर्फ होता. आम्ही उशिरा ट्रीप प्लॅन केल्यामुळे आम्हाला आता पर्यंत रस्त्यावर कुठेही बर्फात हिंडण्याचा चान्स मिळाला नव्हता. जरा महिनाभर लवकर आलो असतो, तर जेवढे सगळे ओसाड डोंगर पहिले, ते सगळे बर्फाने झाकलेले पाहायला मिळाले असते. तेव्हाच पुढची वारी लवकर करून हि खंत भरून काढायच ठरवलं. तर आयुष्यात पहिल्यांदा बर्फात पाय ठेवत होतो. लई भारी वाटत होतं. जाम थंड होता तो. थोडा वेळ बर्फात घालवला आणि वर बुद्ध मंदिरात गेलो. दर्शन घेतलं आणि खाली उतरलो. मग तिथे असलेल्या एकुलत्या एक कॅफेटेरिया मधे गेलो. भूक लागलेली होतीच. गरम गरम मॅगीवर ताव मारला आणि चवदार मोमोज खाल्ले. त्यावर गरम गरम वाफाळलेला दोन कप चहा प्यायला. मस्त नाष्टा झाला. पुन्हा बाहेर येउन हिंडण्यात वेळ घालवला. तिथे एक मेजरसाहेब भेटले. नाव आठवत नाही पण गप्पांमधे पुण्यातून गाडी चालवत आलो आहोत आणि परत तसेच जाणार आहोत हे कळल्यावर त्यांनी आमचे फोटो काढून घेतले. ते जेव्हा पुण्यात होते तेव्हाच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यांच्या बरोबर आणखी थोडं बोलून झाल्यावर तिथून निघालो. पाय निघत नव्हता पण आम्ही तिथून परत जाण्याचा निर्णय घेतला. तिथे एक देवीचं (बहुतेक दुर्गादेवी) देऊळहि आहे. निघताना न चुकता देवीच्या देवळात जाऊन आलो आणि मग निघालो.

६. नुब्रा व्हॅलीत जाणारा रस्ता
6

७.
7

८. जगातील सर्वात ऊंच कॅफेटेरीया.
8

९. हमारा बजाज तिथे सुद्धा होती. :)
9

१०. मॅगी स्टोरी.
10

पुन्हा नुब्रा व्हॅलीत जाण्यासाठी येणार असा निश्चय करून खारदुंगलाला राम राम ठोकला. परत रमत गमत खाली उतरायला सुरुवात केली. पण आमच्या निघण्या अगोदरच भारतीय सेनेतील ट्रकची एक मोठी फ्लीट निघाली. नाही म्हणायला एक दोन ट्रॅव्हलसवाल्या गाड्या हि होत्याच. त्या सगळ्यांनी समोरील सगळा रस्त्या धुळीने व्यापून टाकला. नाईलाज होता पण त्या धुळीच्या ढगात शिरून एक एक गाडीला मागे टाकत आम्ही पुढे निघालो. एक ट्रक मावेल एवढाच रस्ता होता. मग ज्या ठिकाणी थोडीशी जास्त जागा असेल तिथे सैनिकी ट्रक थांबत होते आणि आम्हाला पुढे जायला संधी देत होते. असे करत करत सगळे ट्रक आम्ही मागे टाकले आणि मग सुसाट पुढे निघालो. सुसाट म्हणजे तशी ५० - ६० चा वेग. तिथे एवढा वेगही सुसाटच असतो. एके ठिकाणी तुषारला दरी मधे चेंदामेंदा झालेला ट्रक दिसला. ट्रक असा नव्हताच, फक्त अस्ताव्यस्त पडलेल्या भागांमुळे ट्रक असेल असा कयास बांधला. तिथे थोडा वेळ थांबलो आणि पुढे निघालो. खाली यायला जास्त वेळ लागला नाही. आता लगेच रूम वर जाण्यापेक्षा बाकी गोष्टी पण पाहून घेऊ म्हणून मग 'शांती स्तूप' पाहायला गेलो. 'लेह' मधल्या गल्ली बोळातून वाट काढत काढत आम्ही तिथे पोहोचलो. दुपारचे २.०० वाजले असतील. तिथली फरशी चांगलीच तापली होती. चटके बसत होते. 'शांतीस्तूपा' बद्दल माहिती वाचली होती पण नीटशी आठवत नाही आता. तिथे एक तासभर थांबलो आणि 'लेह'चा राजवाडा पाहायला गेलो. पुन्हा गल्ली बोळांची मदत घेऊन राजवाड्या जवळ आलो. हा राजवाडा भारतीय पुरातत्व विभाच्या अखत्यारीत येतो. 'लेह'चा राजवाडा बांधलाय दगडमातीचाच पण साधारण १०० खोल्या असलेला राजवाडा आजही दिमाखात उभा आहे. बाहेरून जरी तो एक मोठ्ठच्या मोठ्ठ घर वाटत असला तरी तो राजवाडा आहे हे आत गेल्यावर जाणवत. काळाच्या ओघात बरीच पडझड झाली असली तरी काही जुन्या खुणा तिथे सुबत्ता नांदत होती याची साक्ष देतात. या खोलीतून त्या खोलीत अस करत तो सगळा नऊ मजली राजवाडा पाहण्यात साधारण तासभर गेला.

११. फ्लीट.
11

१२. शॉर्टकट मारायचा का ???
12

१३.
13

१४. मोड्लेला ट्रक.
14

१५.
15

१६. मी.
16

१७. 'लेह'चा राजवाडा १
17

१८. शांती स्तुप
18

१९. 'लेह'चा राजवाडा २
19

२०. राजवाड्यातुन दिसणारा गाव
20

२१.
21

राजवाडा बघून झाल्यावर रूम वर जाऊन आराम करायचे ठरले. मस्त रमत गमत लेहच्या मार्केट मधील रूम वर आलो आणि पसरलो. थोडावेळ आराम केला, फ्रेश झालो आणि पुन्हा निघालो फेरफटका मारायला. 'लेह'ला आल्यावर आमच्या प्रवासाचा टी शर्ट करून घ्यायचं ठरवलं होतं. चौकशी करत करत एका दुकानात पोहोचलो. कारागिराने केलेली आधीची कामे पहिली आणि लगेच प्रत्येकी दोन, अशी ४ टी शर्टची ऑर्डर देऊन टाकली. दोन दिवसांनी घायायला येतो अस सांगितलं आणि बाहेर पडलो. उगाच इकडे तिकडे प्रेक्षणीय स्थळे बघत भटकत राहिलो. निवासी लोकांपेक्षा तिथे अनिवासीच जास्त आढळले. त्यातही परदेशी अनिवासी जरा जास्तच. हे दुकान बघ ते दुकान बघ करत ८.०० वाजले तेव्हा जेवायला जायला पाहिजे अस शरीराने खुणावलं. आमच्या गेस्टहाउसच्या पोऱ्याकडून दोन-चार चांगल्या हॉटेलची माहिती घेतली होतीच. त्यातलच एक निवडलं आणि घुसलो आत. आत गेलो चारीही बाजूला फिरंगी लोकं आणि एक देशी जोडपं. लख्ख उजेडा ऐवजी, लाईट गेल्यावर मिणमिणते दिवे लावतात तसं अंधारं वातावरण. आयला कुठे आलो अस झालं. आलोच आहेत तर खाऊ दोन घास आणि निघू अस ठरवून बसलो जेवायला. मी पनीर हंडी आणि तुषारने मटन (तिकडच्या स्पेशल शेळीचं मटन) हंडी मागवली. चवीला जेवण बरं होतं म्हणायला हरकत नाही. जेवलो आणि पुन्हा रूमवर आलो. हिशोब करायचा कंटाळा आला होता म्हणून मग ते सोडून पसरलो. कधी झोप लागली ते कळलच नाही. जाग आली ते सकाळी गजर वाजल्यावरच.
सकाळी नाष्टा वगैरे करून आरामात १० ला निघालो. निघताना पेट्रोल कॅन तेवढे हॉटेलवर ठेवले आणि दुसऱ्या दिवशी येतो म्हणून त्यांचा निरोप घेतला. पहिला पेट्रोल पंप गाठला आणि दोनीही गाड्यांच्या टाक्या फुल करून घेतल्या. तिची काळजी मिटली. आज जायचं होतं सुप्रसिद्ध 'पँगोंग लेक'ला (१४२७० फुट). पहिल्यांदा या तलावाचे फोटो पहिले तेव्हाच 'लेह'ची ओढ लागली होती आणि ती आज आम्हाला इथ पर्यंत घेऊन आली होती. ३ इडीयट्स मधे तर हिची झलक पण पाहायला मिळाली. तर पँगोंग लेक, 'लेह' पासून साधारण १५० km आहे. बरेचसे प्रवासी सकाळी लवकर निघतात आणि तो रम्य तलाव ओझरता पाहून संध्याकाळी परत 'लेह'ला येतात. पण आम्ही तिथे रहायचा निश्चय केला होता आणि म्हणूनच आम्ही आरामात १० ला निघालो. पूर्ण दोन दिवस याच्यासाठीच राखून ठेवले होते. १५० km फक्त अवाढव्य आणि ओसाड डोंगर पाहणार होतो. पण ते पाहण्यात सुद्धा एक मजा आहे. हवे तिथे थांबत होतो, सगळं काही डोळ्यात साठवत होतो आणि पुढे जात होतो. हळू हळू डोंगर चढत होतो. गारवा चांगलाच जाणवायला लागला होता. दगडधोंड्या मधून वाट काढत आम्ही बघता बघता चांग'ला'ला पोहोचलो. घड्याळात तेव्हा १२.०० वाजले होते. चांग'ला', खारदुंगला नंतर जगातला दुसरा उंच रोड. अशा स्पेशल ठिकाणी पोहोचलो कि काही वेगळाच आनंद होतो जो शब्दात व्यक्त करता येत नाही. चांग'ला' वर एक मिलिटरी कॅफे आहे. यात्रेकरूंसाठी (हो आमच्या सारख्या लोकांसाठी हि नुसती सफर नसून यात्राच) इथे पाहिजे तितका चहा फुकटात मिळतो. मस्त चव आहे तिथल्या चहाची आणि त्यात एवढ्या वर न काही खत पिता आलं तर तो चहा आणखीनच चवदार लागतो. चांग'ला'वर थोडा वेळ घालवला. तिथे आम्हाला बरेच पुणेकर आणि पेणकर भेटले. चार पाच वेगवेगळे ग्रुप होते. मिलिटरीने तिथे चांग'ला', खारदुंग'ला' एम्बोस केलेले किचेन्स, टी शर्टस, टोप्या विकायला ठेवलेले असतात. तिथे ते सगळं सामान घेण्यासाठी झुंबड उडाली होती. आम्हीहि हात मारून प्रत्येकी दोन तीन टी शर्टस आणि १०-१५ किचेन्स घेतल्या. पेणकरांबरोबर तर काही ओळखी पण निघाल्या. त्यांच्या बरोबर थोड्या गप्पा मारल्या, चांग'ला' बाबांचा आशीर्वाद घेतला आणि पुढे निघालो.

२२. चांगला ला जाताना रस्ता
22

२३.
23

पुन्हा दगड धोंड्यातून वाट काढत थोडं खाली उतरलो. खाली उतरल्यावर मात्र रस्ता एकदम चकाचक झाला. मस्त वाटलं तिथे गाडी बुंगाट पळवायला. दोनीही बाजूला उंचच उंच डोंगर आणि मध्ये दरीतून जाणारा रस्ता. मधून मधून एक नदी साथ देत होती. काही ठिकाणी मधेच चोहीकडे हिरवंगार तर बऱ्याच ठिकाणी नजर जाईल तिकडे सगळं ओसाडच ओसाड. इतकं कि गवताची काडी पण दिसणार नाही. शृष्टीची किमया बघत 'टांगत्से' (मध्ये लागणारं एक छोटं गाव) कडे दवडू लागलो. खूप भूक लागली होती म्हणून कधी एकदा टांगत्सेला पोहोचतो असं झालं होतं. अखेर तिथे पोहोचलो. एका छोट्या हॉटेल वजा घरात थांबलो. मेनू एकच ठरलेला, "मॅगी". या मॅगीने, प्रवासात सगळीकडेच आम्हाला तारून नेलंय. तर मस्त गरम गरम मॅगीचा आस्वाद घेतला. १०-१५ मिनिटे आरामात घालवली आणि मग पुढे निघालो.

२४.
24

२५.
25

२६. नागमोडी वळणारा तुषार.. ;)
26

२७. विश्रांती तर हवीच कि ओ..
27

२८. याक
28.

वाळवंटी प्रदेशातून निवांत पुढे जाताना अचानक समोर 'पँगोंग लेक'ने दर्शन दिलं. ठरवलेलं लक्ष्य अगदी दृष्टीपथात होतं, ५ मिनिट तिथे थांबलो आणि लगेच निघालो ते लक्ष्य गाठायला आणि पोहोचलो सुद्धा. 'पँगोंग लेक', समुद्र सपाटीपासून एवढ्या उंच एक सुंदर तलाव, निसर्गाची ती रंगांची मिसळ पाहून कोणीही माणूस दंग नाही झाला तरच नवल. तिथे राहण्याचा आणि ते सगळं पाहण्याचा अनुभव केवळ अप्रतिम आहे. हा तलाव ३०% भारतात तर उरलेला चीन आणि तिबेट मधे आहे. पण या ३०% ला कितीही वेळ पहिलं तरी मन भरत नाही असा तो आहे. खाऱ्या पाण्याच्या या तलावात जीवन (मासे किंवा इतर जलचर प्राणी) नाही. असो... आम्ही तिथे ४.०० वाजता पोहोचलो. गाड्या अगदी तलावाच्या काठावर नेल्या आणि शानमधे तिथे लावल्या. थोडा वेळ मजा मस्ती करत तिथे घालवला आणि मग राहण्याची सोय बघायला लागलो. तो तलाव जिथे सुरु होतो, तिथे जेवणाची सोय असलेले काही छोटे स्टॉल्स आहेत. त्यांच्या कडेच काही टेण्ट्स आणि खोल्या राहण्याकरता मिळतात. मग तिथल्याच एकाला पकडला, राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली आणि गेलो परत धडधड करत हिंडायला. तलावाच्या कडे कडेने दगडी गोट्यांमधून, गाडी आणि स्वतःला सांभाळत पुढे पुढे जात होतो. कुठे पाय वाट, होती, कुठे नुसतेच गोटे. स्वतःचीच वाट शोधत तसेच गाडी हाकत जाताना पुढे एके ठिकाणी गेलो आणि अडकलो. १-२ फुट खोल आणि २ -३ फुट रुंद असलेला मोठ्ठा ओढा समोर होता, ज्यातून खळखळ करत वितळलेल्या बर्फाचं पाणी तलावाला येउन मिळत होतं. एकदा गाडी घालण्याचा विचार मनात आला पण लगेच तो आवरला. फालतू डोक्याला ताप करून घेण्यापेक्षा मागे वळलेलं बरं असा ठराव पास झाला आणि आम्ही मागे आलो. नंतर नंतर मला कंटाळा आला, असे उलट सुलट हिंडण्याचा आणि आमच्या साहेबांना नेमका त्याच वेळी हुरूप आला होता. जिकडे तिकडे गाडी पळवत सुटला होता. माझ्या कंटाळ्याच मुख्य कारण होतं मुंग्या. गारठ्यामुळे हातापायाला मुंग्या आल्या होत्या. सुन्न झाले होते दोनीही आणि त्यात मी कसाबसा गाडी चालवत होतो. तुषारला आणखी पुढे १० km जाऊन पुन्हा मागे यायची इच्छा होती आणि मी रूम वर जाऊ म्हणून कोकलत होतो. ३-४ km गेल्यावर त्याला म्हणालो आपण उद्या सकाळी पुन्हा जाऊ तिकडे आजचा प्रवास थांबवू इथेच. गड्याला ते पटलं म्हणून मग आम्ही रूम वर परत आलो. रूम मधे गेलो तेव्हा जरा बरं वाटलं. पण बलाकलावा (गाडी चालवताना घालण्याची काळ्या कापडाची माकडटोपी) काढली आणि चेहऱ्याची त्वचा कोणी तरी ओढतय असं वाटू लागलं. पुन्हा ती घातली आणि बसलो निवांत. त्या बाबाजीला त्याच्या चेहऱ्यावर काहीच फरक पडत नव्हता. तुषार म्हणाला मी बाहेर चक्कर मारून येतो तलावा जवळ तू बस इथेच, काही नाही होत आणि तो निघून गेला. मुंग्यांनी माझा पिच्छा काही सोडला नव्हता. काही केल्या जाईनात. दोन दिवस आधी तुषारची वेळ खराब होती आणि आता माझा नंबर होता. थर्मल वेअर बरोबर आणलेले तेही चढवले पण तरीही काही उपयोग नाही झाला. जाग्यावर बसलो होतो तर जास्तच चेव आला त्यांना (मुंग्यांना), म्हणून मग हालचाल करू लागलो. थोडी हालचाल केली तेव्हा त्या थोड्या कमी झाल्या. मग म्हंटल इथे बसून काय करायचं, आपणही जाऊ बाहेर हिंडायला. कुलूप लावलं आणि चप्पल घालून मीही तुषार गेला होता तिकडे गेलो. उगाच तलावाच्या कडे कडे ने भटकत, गप्पा मारत वेळ घालवला आणि परत स्टॉलवर येउन बसलो. माझी हालत बघून तिथल्या एका ट्रेकरने कोल्हापुरी चप्पल काढून बूट घालण्याचा सल्ला दिला. म्हणे पायातूनच गारठा अंगात जातोय, त्यांना वाचव, मुंग्या आपोआप पळून जातील. मी आपला इमाने इतबारे त्याचा सल्ला ऐकला आणि पुन्हा रूम वर बूट घालायला गेलो. इकडे तुषार भटकण्यात आणि फोटो काढण्यात मश्गुल होता. इतक्यात काल खारदुंगलाला दिसलेले आमच्या सारखेच दोन बुलेट वेडे (जसजीत आणि राहुल) आपापल्या बुलेटा घेऊन आले. थोड्यावेळा पूर्वी तलावाजवळ आम्ही त्यांना पुढे गेलेलं पाहिलं होतं तेव्हाच ओळखलं होतं. पण तेव्हा वाटलं ते पुढे थांबतील पण नाही ते पुन्हा मागे आले होते आणि तेही नेमके आमच्या इथेच मुक्कामासाठी. खारदुंगलाला नुसतीच तोंड ओळख झाली होती. मी बूट घालत असताना जसजीत अगदी जुनी ओळख असल्यासारखा आत आला.

जसजीत: क्यों भाई, एकही दिन में लेट गये !, तेरे पार्टनर ने बताया कि हालत खराब है !
मी: ज्यादा नही रे, थोडे गुजबंप्स आये है. बाकी कुछ नही! (इथे बोलताना मुंग्यांना पर्यायी हिंदी शब्द शोधत होतो पण शेवटी विंग्रजीच मदतील धावून आली).
जसजीत: कोई नाही रे, चल कुछ नाही होता ! अपनेआप ठीक हो जायेगा !

आणखी दोनचार वाक्य टाकून तो शेजारच्या खोलीत सामान ठेवायला निघून गेला. मग आम्ही दोघेही बोरोबरच बाहेर पडलो. तिकडे राहुल आणि तुषारची चांगली ओळख झाली होती. आता चौघेजण मिळून हिंडत होतो. काल ते दोघे खारदुंगला वरून पुढे नुब्रा व्हॅलीत गेले होते आणि आज सकाळी तिकडून निघून इथे पोहोचले होते. असे करण्याचा विचार माझ्याही मनात आला होता पण आम्हाला आराम जास्त महत्वचा वाटला. नुब्रात गेलो असतो तर नुसतीच पळापळ झाली असती आणि लेह पहायचं राहिलं असतं आणि म्हणूनच तो विचार रद्द केला होता. असो..त्यांनी काढलेले फोटो बघूनच नुब्रात जाऊन आल्याच समाधान (न होणारं) मानलं. पुढे भरपूर गप्पा झाल्या. स्टॉलवर आलो आणि जेवणाची ऑर्डर दिली. गप्पा मारताना हॉटेलवाल्या कडून कळलं कि तलाव थंडीत पूर्ण गोठतो. इतका कि त्या बर्फावर ट्रक आणि इतर गाड्या हि आरामात चालवता येतात. त्याने स्वतःहि तलावावरून गाडी चालवल्याचं सांगितलं. तो बाकी गोष्टी सांगताना आम्ही फक्त त्यांची कल्पनाच करत होतो. मस्त जेवलो आणि पुन्हा रूम वर गेलो. रूम वर जाताना रस्त्यात माझी कॅमेरा केस पडली. तिच्यात कॅमेरा पण होता. लगेच कॅमेरा काढूनवरवर पहिलं, काही झालं नाहीये याची खात्री केली आणि पुढे गेलो. रात्री पुन्हा बाहेर पडलो. काय सुरेख वातावरण होतं. मस्त चांदणं पसरलेलं आणि आजूबाजूला एकही मानव निर्मित दिवा नाही. होता तो फक्त चंद्र प्रकाश. खूप मस्त वाटत होतं. त्यात त्या दोघांकडेही उच्च प्रतीचे कॅमेरे होते. मस्त फोटो काढले त्यांनी. आम्ही आपले साधेसुधे फोटो काढण्यासाठी कॅमेरा चालू केला. पाहतो तर लेन्स अर्धीच बाहेर आली आणि आली ती परत आत न जाण्यासाठीच. धड आतही नाही आणि बाहेरही नाही अशी मधल्यामध्ये अडकून बसली. मघाशी कॅमेरा पडला तेव्हाच त्याची वाट लागली होती फक्त ती कशी हे आत्ता या घडीला कळलं. फोटो काढण्याचा सगळा उत्साहच मावळला. तसाच अर्धवट चालू अर्धवट बंद कॅमेरा, केस मधे टाकला आणि त्यांची कलाकारी बघत बसलो. घरी रिपोर्ट सांगायला आज सुट्टी होती. जिथे वीजच नाही तिथे फोनचा काही प्रश्नच नव्हता. 'लेह' मधून निघतानाच दोन दिवसांनी फोन करेन अस सांगून निघालो होतो. तर पुढे थोडा वेळ घालवला आणि मग झोपायला गेलो. आधीच वाट लागली होती म्हणून मग खबरदारी म्हणून झोपताना एक क्रोसिन घेऊन मगच झोपलो.

२९. वाळवंटी रस्ता.
29

३०.
30

३१. पॅंगोंग लेक, पहिलं दर्शन.
31

३२. लेक आणि तुषार, दोघे आजुबाजुला
32.

३३.
33

३४.
34

३५.
35.

३६.
36

३७.
37

३८.
38

३९.
39

४०
40

४१.
41

४२. जिथे अडकलो तो ओढा
42

४३.
43

४४. अम्ही रहिलो त्या खोल्या.
44

दुसऱ्या दिवशी उठलो आणि पुन्हा हिंडायला चौघेही बाहेर पडलो. कालचा होणारा त्रास पळून गेला होता. पुढे एक १० km जाऊन, सगळं पाहून परत यायचं होतं. आता चार बुलेट धडधड आवाज करत निघाल्या होत्या. जाम भारी वाटत होतं. ३ इडीयट्सच शुटींग जिथे झालं त्या जागी जायचं ठरलं होतं. शोधत शोधत, दगडधोंड्यातून वाट तयार करत तिथे पोहोचलो. पुढे दगड संपले आणि भुसभुशीत वाळू सुरु झाली. मी आपला गाडी ताणत जितक्या आत जाता येईल तितक्या आत जायला लागलो. हे तिघे मात्र मागे राहिले आणि आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघू लागले. "हा नक्की करतोय तरी काय? गाडी मातीत फसत चालली आहे, तरी ओढतोच आहे.असा विचार करत होते". जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी बराच आत गेलो होतो आणि गाडी ढकलून बाहेर काढण्याशिवाय मार्ग नव्हता. मी गाडी लावली आणि उतरलो. ते तिघे मागेच गाड्या लावून चालत आले. तुषार म्हणाला आधी इथे काय वेळ जायचा तो जाऊदेत. निघतानाच गाडी बाहेर काढू. मग दिली गाडी सोडून तिथेच आणि गेलो सगळे तलावाकाठी. अगदी क्षणाक्षणाला दृश्य बदलत होतं. मधेच ढग दाटून यायचे, कुठल्यातरी शिखराला घेरून टाकायचे, पुन्हा वेगळे व्हायचे. मधेच कुठेतरी एकटाच ढग अख्या डोंगराला सावली खाली झाकून टाकायचा निष्फळ प्रयत्न करायचा. एक न अनेक गोष्टी आम्ही अनुभवत होतो. खूप मस्त वाटलं तिथे. पण किती वेळ थांबणार. "वापस घर भी जाना है", असं म्हणून निघण्याचं ठरवलं. तुषारने आणि मी, माझी गाडी ढकलून जमीन जिथे कडक होती तिथे आणली आणि मग पुन्हा आम्ही सगळेच एका मोठ्या छत्री खाली आराम करायला गेलो. गप्पा मारताना जसजीत ने सांगितलं, "काल रात्री दोन वाजता एक फिरंगी जोडपं, बुलेट घेऊन आलं". भर दिवसा आम्ही ज्या तोडक्या मोडक्या रस्त्यावरून आलो त्या तिथून हे लोकं रात्रीच्या अंधारात आले हे ऐकून त्यांच्या प्रती ईर्ष्या निर्माण झाली. रात्रीच्या काळोखात लांब लांब पर्यंत कोणताही प्राणी नाही. चंद्र प्रकाश सगळी कडे पसरलेला आणि त्यात एकाच बुलेट वर समोर दिसणाऱ्या खडकाळ रस्त्यावरून एकमेकांना चिकटून जाणारे फक्त ते दोघेच. कसलं भारी वाटलं असेल त्यांना ते वातावरण अनुभवायला? असो.. आणखी अशाच काही गप्पा मारत तिथे थोडा वेळ घालवून आम्ही परत रूम वर आलो. सगळा गाशा गुंडाळला, हिशोब मिटवला आणि निघालो.

४५.
45

४६.
46

४७.
47

४८.
48

४९. ३ इडियट्स वाली जागा.
49

५०.
50

५१.
51

५२.
52

५३.
53

५४.
54

काल येताना दोन बुलेट होत्या आणि आता चार बुलेट होत्या. वातावरणात धडधड आवाज घुमत होता. एकमेकांबरोबर चुरशी चालू झाली. कधी कोण पुढे. कधी कोण माघे. सुसाट निघालो होतो. जेव्हा परत जायची ओढ असते तेव्हाची ती मानसिकता असतेच. अंतर नेहमी कमीच वाटत रहातं. अंतर तेवढच, रोड पण तोच पण परत येताना अस वाटलं चांग'ला' पर्यंत रोड चांगला होता. मोजक्याच एक दोन ठिकाणी थांबलो असू. पहिला मोठ्ठा ब्रेक घेतला तो चांगलालाच. दगडी आणि अवघड रस्ता गौण वाटला तेव्हा. खूप मजा आली तिथे पोहोचे पर्यंत. पुन्हा अप्रतिम चहाचा आस्वाद घेतला आणि निघालो. आता थांबण्याचा काही चान्स नव्हता, वाटेत असेलेलं सगळं पाहून झालं होतं त्यामुळे थेट 'लेह' गाठायचं होतं. पुन्हा सनाट निघालो आणि 'लेह'ला पोहोचलो. पुढे ते त्यांच्या रूमवर आणि आम्ही आमच्या रूमवर गेलो. फक्त येताना जसजीत आणि मी जेवायचं ठरवलं होतं त्या प्रमाणे आम्ही परत एक हॉटेल मधे भेटलो. तुषार आणि राहुल, भूक नाही म्हणून आलेच नाहीत. आम्ही दोघे मस्त जेवलो, गप्पा झाल्या आणि पुन्हा संध्याकाळी भेटू अस म्हणून निरोप घेतला.

५५. लेह ला परत येताना वाटेत एके ठिकाणी याला टिपण्यासाठी थांबलो होतो.
55

संध्याकाळी तुषार आणि मी, 'लेह' भटकायला बाहेर पडलो. आजचा शेवटचा मुक्काम होता. उद्या 'लेह'ला अलविदा करायचं होतं. घरच्यांसाठी काही मिळतंय का ते पाहत होतो. तुषारने त्याच्या लेकीसाठी आणि पुतण्यासाठी लडाखी पोशाख घेतला. शिवाय महिला मंडळासाठी पण खरेदी केली. मीही आई, बहिण आणि बायकोसाठी काही खरेदी केली. दोन चार दुकानात कॅमेरा दुरुस्त करता येइल का? याची चौकशी केली पण एकही जण हात लावायला तयार होइना. फक्त एकाच ठिकाणी दुकानदार पहातो म्हणाला पण तेव्हा मि घरी गेल्यावर बघु असा विचार केला आणि नको म्हणालो. पुढे मग आम्ही टी-शर्ट वाल्याकडे गेलो. ४ टी शर्ट्सची ऑर्डर पूर्ण झाली होती. झक्कास दिसत होते ते. ते घेउन मग आम्ही जसजीत आणि राहुलला भेटायला गेलो. पुन्हा काही गप्पा झाल्या, शेवटी त्यांचा निरोप घेतला. ते श्रीनगर वरून आले होते आणि मानली मार्गे दिल्लीला जाणार होते आणि आम्ही अगदी विरुद्ध दिशेला. मनालीला जाताना रोहतांग पासला काळजी घ्या असा सल्ला त्यांना दिला आणि आम्ही परत आमच्या रूमवर आलो. थोडा वेळ टीव्ही बघितला आणि परतीच्या प्रवासाचा आराखडा बांधत दोघेही झोपलो.

क्रमश:

टीपः फोटो खुप आहेत पण सगळेच इथे देणे अशक्य आहे. बाकीचे फोटो तुम्हाला इथे मिळतील.

प्रतिक्रिया

मस्त! सुरेख! अगदी जराही मानवी स्पर्श नसलेलं तळं पाहुन मन अगदी भरल. लिखाण अन वर्णनाची हातोटीपण सुरेखच.
तुमची झालेली मैत्री, फिरंग्यांबद्दल वाटलेला मत्सर सगळच आवडल.
कॅमेराला भावपुर्ण ....!

सामान्य वाचक's picture

6 Feb 2013 - 5:55 pm | सामान्य वाचक

खूप छान लिखाण आणि फोटो.

सुखी's picture

6 Feb 2013 - 5:57 pm | सुखी

जबराट

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Feb 2013 - 6:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकदम मस्त वर्णन आणि फोटो...

शिवाय हे सगळ बुलेट उडवत करण्याचा आनंद काही वेगळाच असणार ! हे जगावेगळं निसर्गाचं रूप आयुष्यभर आठवत आणि सुखवत राहील तुम्हाला.

पुभाप्र.

इनिगोय's picture

6 Feb 2013 - 6:08 pm | इनिगोय

...बर्फात पाय ठेवत होतो. लई भारी वाटत होतं. जाम थंड होता तो.

हे वाचून गंमत वाटली.

अजून क्रमशः आहे हे छानच :) छान लिहिता तुम्ही.

केदार-मिसळपाव's picture

6 Feb 2013 - 9:28 pm | केदार-मिसळपाव

जाम थंड होता तो.
भा. पो.

आत्ता पर्यंतचे सर्व भाग वाचले... काय जबराट अनुभव घेतलात तुम्ही. :)
फिंरंगी मंडळींबरोबरच तुम्हा २घांचा देखील मला हेवा वाटतो आहे.कधी या ठिकाणी जायला मिळणार ? :(
सगळेच फोटो सुंदर आहेत,४८ वा फोटो मला विशेष आवडला ! अगदी पार्‍याचा तलाव वाटला तो फोटो पाहताना. :)
पुढच्या भागाची वाट पाहतो आहे...

ऋषिकेश's picture

6 Feb 2013 - 6:12 pm | ऋषिकेश

लय भारी मनराव!
खरं सांगायचं तर हेवा आणि कौतूक दोन्ही वाटतं :)

काय मस्त! अगदी हेवा वाटतो आहे तुमचा! कधीतरी मलाही लेह लडाखला जायचे आहे.. कधी योग येतो आहे पाहू.

मृत्युन्जय's picture

6 Feb 2013 - 6:20 pm | मृत्युन्जय

खुपच सुंदर रे मनोबा. बराच मोठा भाग आहे. हापिसात कामातुन ब्रेक घेत घेत वाचला. आवडला. आपल्याला तुमची सफरच आवडली. लैच दण्णाट.

अप्रतिम!!!!!!! निव्वळ अप्रतिम!!!!!!बाकी शब्द नाहीत _/\_

तिमा's picture

6 Feb 2013 - 7:14 pm | तिमा

सुंदर फोटो आणि अफलातून जिगर. आमच्या ट्रीपची आठवण झाली.

परतीलाच रोहतांग पास डेंजर आहे म्हणे! तुमचा अनुभव वाचायला आवडेल.

मनराव's picture

7 Feb 2013 - 10:35 am | मनराव

पाऊस पडुन गेला असेल तर रोहतांग कसाही डेंजरच आहे..... अम्ही मनालीतुन लेह ला आलो... भाग ४ मधे सापडेल तिथली आमची आणि रोहतांगची परिस्थिती....

मी-सौरभ's picture

6 Feb 2013 - 7:42 pm | मी-सौरभ

पुन्हा एकदा...

लेखन नेहमीप्रमाणेच आवडले. फोटू किती आवडले ते सांगू शकत नाही. पेंगाँग लेकजवळचे सगळे म्हणजे सगळे फोटू आवडले पण ५३ क्रमांकाचा फोटू निदान चारदा पाहिला तरी समाधान होत नाहीये.

केदार-मिसळपाव's picture

6 Feb 2013 - 9:30 pm | केदार-मिसळपाव

तुम्ही नुसतेच लिहीत नाहि आहात तर आम्हा मिपा करान्ना सोबत घेउन फिरत आहात...

धन्यवाद..

अत्रुप्त आत्मा's picture

7 Feb 2013 - 12:41 am | अत्रुप्त आत्मा

या भागाचाही एक नमस्कार राखिव........!

भारी वर्णन.. मस्त रे मनराव.

:)

nishant's picture

7 Feb 2013 - 1:38 am | nishant

तुम्चे फॉटॉ बघुन आणि वर्णन वाचुन, अत्ता ऊठुन लेहला लगेच निघवे असे वाट्त आहे... जबरदस्त अनुभव !!

अग्निकोल्हा's picture

7 Feb 2013 - 1:47 am | अग्निकोल्हा

जबरा भटकंती !

मनराव's picture

7 Feb 2013 - 10:30 am | मनराव

सगळ्यांना धन्यवाद...... !!!

पैसा's picture

7 Feb 2013 - 10:46 am | पैसा

फोटो, वर्णन सगळंच मस्त!

विटेकर's picture

7 Feb 2013 - 10:55 am | विटेकर

धन्यवाद .. तुमची हातोटी सुंदर आहे आणि अनुभवही भन्नाट !
आवडले .. खूप लिहा आणि खूप खूप फिरा ..
फार सुंदर आहे आपली मातृ भू !

अजूनही क्रमशः वाचून खूप बरं वाटल......

नरेंद्र गोळे's picture

7 Feb 2013 - 1:24 pm | नरेंद्र गोळे

वा! सुरेख. वाटचाल आणि वृतांत दोन्हीही. आवडले.

अनावृत्त भूमीवर उतरून मेघही आले ।
कधी ऊन, सावली कधी, हवाही चाले ॥
खार्दुंग लागले गाव अन्‌ तेथील पाडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ २७ ॥

दरी नुब्रा, नव्हती तेथून फारशी दूर ।
पण आधी खर्चला होता दिसही एक ॥
मग नुब्रा जाण्या लावती “ब्रेक”ही थोडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ २८ ॥

किती उंच उंचीवर, खिंडीत रस्ता चाले ।
पाहता पाहता खार्दुंग ला ही मिळाले ॥
मग बर्फ आढळता, पाहून झाले वेडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ २९ ॥

लेहच्या पाहिला राजाचाही महाल ।
नऊ मजली अन्‌ शंभर खोल्यांसहित ॥
इथेच उलगडे स्विस मॅगीचे कोडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ ३० ॥

परतीची वाट वळवळे, सर्प जणू थेट ।
चांग’ला’ लागता पुन्हा सुटती “बुंगाट’ ॥
नागमोडी रस्ता, पर्वती नक्षी काढे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ ३१ ॥

पँगाँग तळ्य़ावर निरव शांतता बोले ।
कधी ऊन पसरले, कधी मेघही आले ॥
थंडीत गोठता, अंशही पाणी न सोडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ ३१ ॥

मन स्वैर उडाले, फिरून परतून आले ।
पाठी मग गाड्या, उत्साही वीर निघाले ॥
रोखती कुठेशी वाट, हिमालयी ओढे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ ३२ ॥

ते तळे समोर अन्‌ हवामान ते ढळते ।
मनमोहक सारे, कशास जावे कळते ॥
थांबले कितीही तरी, उगाच वाटे थोडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ ३३ ॥

जरी उजेडी दिवसा, गब्रू रंजीस आले ।
ती फिरंगी जोडी रात्री मार्गही चाले ॥
पाहून फिरंगी युगुला, पडले कोडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ ३४ ॥

रोहन अजय संसारे's picture

7 Feb 2013 - 2:05 pm | रोहन अजय संसारे

पहिला आनंद झाला ते क्रमश वाचून. एकदम मस्त चालला आहे प्रवास.
तिकडे माग्गी आणि दाल भात याशिवाय काही भेटत नाही जेवायला आसे एकले होते ते खरे आहे का ?
फोटो खूप छान आले आहेत. तलाव तर एकदम स्वप्नात पहिल्या सारखाच आहे.
पुढील प्रवासा साठी शुभेचा. आणि हो पुढचा भाग लवकरात लवकर येउदे हि विंनती.

लेह मधे काय पहिजे ते मिळेल... पण आजुबाजुच्या परिसरात हिंडायला गेला कि मॅगी आणि डाळभातच मिळतं..

अशा प्रवासात डायमॉक्स ठेवायची बरोबर. खूप्च मुंग्या वगैरे येऊ लागल्या - विरळ हवेच्या त्रासामुळे चेहरा, हातांपायांना मुंग्या येतात - तर अर्धीच घ्यायची एका वेळी. अर्थात, डॉ चा सल्ला घेऊनच बरोबर न्यावी.

मनराव's picture

7 Feb 2013 - 6:10 pm | मनराव

हो तिहि ठेवली होती.. आणि नुसतीच ठेवली नाही तर घेतली पण होती....फक्त लिहायच राहिलं :(

प्रचेतस's picture

7 Feb 2013 - 6:11 pm | प्रचेतस

लै मजा केलीत राव. :(

माम्लेदारचा पन्खा's picture

7 Feb 2013 - 9:05 pm | माम्लेदारचा पन्खा

या भागातले फोटो पाहून तिथे न जाताही गेल्याचा आनंद मिळाला........
आयुष्यात बाकी काही लक्षात राहो न राहो....हा प्रवास तुमच्या कायम स्मरणात राहील......
अजून अनेक नव्या ठिकाणी जाण्याची तुम्हाला संधी मिळो हीच शुभेच्छा

लई म्हंजे लईच भारी, एक प्रश्न, क्यामेरात घालायला कार्डं किती नेली होती आणि काय साइझची.?

अशोक सळ्वी's picture

10 Feb 2013 - 11:44 pm | अशोक सळ्वी

फार छान लि़खाण, अविस्मर्णिय प्रवास!

पूनम शर्मा's picture

23 Feb 2013 - 5:01 pm | पूनम शर्मा

खूपच सूंदर .... उर्वरित भाग कधी येणार वाट बघत आहोत.

मुक्त विहारि's picture

23 Feb 2013 - 10:25 pm | मुक्त विहारि

झक्कास..

सगळे भाग वाचून झाले की मग प्रतिक्रिया देतो..

सुमीत भातखंडे's picture

27 Feb 2013 - 3:28 pm | सुमीत भातखंडे

सुंदर प्रवास...फोटो तर निव्वळ अप्रतिम

जुइ's picture

27 Feb 2013 - 11:16 pm | जुइ

अप्रतिम, सगळे भाग उत्तम आहेत.

कुलभूषण's picture

3 Mar 2013 - 9:13 pm | कुलभूषण

भाग ७ टाका राव एकदाचा....

पूनम शर्मा's picture

5 Mar 2013 - 3:16 pm | पूनम शर्मा

भाग ७ कधी टाकणार आहात .....