कुत्रं...

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
4 Jul 2012 - 5:20 pm

मी लहानपणापासून राजीखुषीने, विशेषतः आईबापांच्या राजीखुषीने आणि नशापाणी न करता कुत्री आणि मांजरं पाळत आलो आहे. मांजरांची पिल्लं बिल्ल्यांसारखी शर्टावर लटकावून मी लहानपणी हिंडायचो. ती नखांनी शर्टला घट्ट पकडून असायची.. पण असं जास्त वेळ करता यायचं नाही. लटकता लटकता ती पिल्लं हळूहळू वर चढत जायची..मग खांद्यावर चढून कानाशी कापसाचे मांजरगोळे हुळहुळायला लागले की मी परत त्यांना पकडून शर्टाला अडकवायचो.

मांजरांना मी सुकी कोळंबी आणून घालायचो. कोळंबीचा पुडा घेऊन घरात शिरलं की जिथ्थे कुठे मांजरं बसली असतील ती हर्षवायूने ओरडत पायात यायची.

एखादं मांजर गरीब स्वभावाचं निघायचं, बाकी सर्व एकजात स्वार्थी आणि वखवख करणारी.. शिवाय काम झालं की झंडा ऊंचा करुन चालते होणारी..इन जनरल मांजर जात नालायक.. त्यांच्याविषयी याहून जास्त लिहायची त्यांची लायकी नाही.

म्हणून मग कुत्री..

पण कुत्र्यांमधेही भरपूर दुर्गुण असतात.. कदाचित मांजरापेक्षा जास्त..

कितीही कुलवान कुत्रं असलं तरी ते रस्त्यावर फिरायला नेल्यावर शी किंवा तत्सम गलिच्छ पदार्थात तोंड घालतंच. त्यासाठी त्याला मारहाण केली तर ते निरागस चेहरा करुन आपल्याकडे पाहात राहतं.

आंघोळ घालण्यासाठी कुत्र्यांना नेताना त्यांना वधस्तंभाकडे नेत असल्यासारखी त्यांची धडपड असते. गळ्याला फास लागेपर्यंत उलटे खेचत राहतात. त्यांना जवळजवळ फरपटतच नळस्तंभाकडे न्यावं लागतं. आंघोळ झाली रे झाली की तत्क्षणी ते नाकाच्या शेंड्यापासून शेपटाच्या टोकापर्यंत एका लयीत थुर्रर्रर्रर्रर्र करुन आपल्या बेसावध अंगावर सुडाचे शिंतोडे उडवतात. त्यानंतर मात्र ते अंगात वारं शिरल्यासारखे इकडून तिकडे पळत सुटतात. आंघोळीनंतर इतका आनंद होत असताना ती करण्यापूर्वी इतका दंगा करण्याचं कारण तेच जाणोत.

संधिवात, वार्धक्य, स्लिपडिस्क,फुटका गुडघा,कपाळमोक्ष इत्यादिंच्या कचाट्यात न सापडलेल्या लोकांनी डॉबरमन, ग्रेट डेन असे वासराएवढे कुत्रे पाळले तर एखाददोन वर्षांत ते वरीलपैकी एका पीडेने बाधित झालेच पाहिजेत. मालक इमानदारीत फिरायला नेत असतानाही तेवढ्यात जीव खाऊन पुढे खेच घेण्याचं कारण समजण्यासाठी कुत्र्याचा जन्मच घ्यावा लागेल.. ही जीवघेणी खेच कमी पडली तर आपल्या या श्वानविशेषाला आसपास कुठेतरी एखादं मांजर, डुक्कर दिसावं..बस्स..मग मनगट तुटो वा साखळी तुटो.. शिवाय श्वानवाहकाच्या मणक्यात गॅप पडलीच पाहिजे..

शिवाय ही वासरुछाप कुत्री दणादणा खातात. दिवसाकाठी पाचसहा अंडी, अर्धा किलो मटण साताठ भाकर्‍या असं भदाडभर खाद्य पैदा करुन त्यांना घालावं लागतं. इतर कोणाच्या जिवावर सोडून जाता येत नाही. त्याचा बकासुरी आहार पाहून दोन दिवसात तुम्हाला घरी परत बोलावण्यात येतं. शिवाय या राक्षसी कुत्र्यांना खाण्याची जराही नजाकत नसते. थाळीला पोचे येईपर्यंत त्यावर तुटून पडतात. भसाभसा खाताना हे जितकं सांडतात त्यावर एका छोट्या केसाळ कुत्र्याचं जेवण निघेल. नंतर यांच्या नाकाभोवती अन्नाचा गोळा चिकटलेला असतो आणि त्यांना त्याचं भान नसतं..

काही मोठ्या आकारातल्या जातींचे कुत्रे एकाच मालकाच्या सोबत राहतात आणि त्याने खायला दिल्याशिवाय खात नाहीत. त्यामुळे त्याच्या लाडक्या मालकाच्या गैरहजेरीत हे त्याची आठवण काढून सुरात रडतात. उपाशी राहतात. अन्न सोडून खंगायला लागतात. की मग मालकाला झक मारत कामधाम सोडून घरी यावं लागतं.

मालक थोड्या दिवसांच्या गॅपने घरी आलेला दिसला तर दरवाजातच या कुत्र्यांना प्रेमाचं महाप्रचंड भरतं येऊन ते गुर्ब गुछ असे आवाज काढत मालकाच्या पोटाखांद्यावर पुढचे दोन पंजे ठेवतात. मालक किरकोळ असला तर कुत्र्याच्या तीसचाळीस किलोच्या प्रेमाने तो खाली कोसळतो, पण कुत्र्याचा मात्र मालकाला पाडण्याचा उद्देश नसतो. या धोबीपछाड अवस्थेत मालकावर कुत्री आपली जीभ वापरु इच्छितात. जितकं कुत्रं मोठ्ठाड तितकी त्याची जीभ लांब अन लपलपीत. मोठ्या कुत्र्याची जीभ "लप्प" अशा एका फटकार्‍यात मालकाचा संपूर्ण चेहरा भिजवू शकते आणि अशावेळी एकाच फटक्यात हे होत असल्याने बचावाची संधी मिळत नाही.

कुत्री अत्यंत म्हणजे अत्यंत लोचट असतात. यासाठी एक साधा प्रयोग करुन खात्री करता येईल. स्वत:च्या पाळीव कुत्र्याला चुक चुक करून बोलवा. तो नक्कीच तातडीने तुमच्या अंगाशी येऊन चिकटेल. मग त्याला जोर लावून दूर ढकला. तुम्ही जितक्या जोरात दूर ढकललात तितक्याच जोरात स्प्रिंग अ‍ॅक्शनसारखा तो तुम्हाला परत येऊन झळंबेल. असं कितीदाही ढकलून पहा. तुम्ही थकाल पण कुत्रा लोचटपणात हार जाणार नाही.

इमानदारी हा शब्द कुत्र्यांच्या बाबतीत तितकासा बरोबर नाही. इमानदारी या शब्दात चाकरीचा भास होतो. अन्नाच्या बदल्यात आपल्या मालकाशी एकनिष्ठ राहणं असा काहीसा गुण.. पण कुत्री तर आपल्या मालकावर साली अगदी अन्नाशिवायही अतोनात प्रेम करतात.. एकदम निरपेक्ष.. फार त्रास होतो..सवय नसते आपल्याला आणि मग आणखीच त्रास.

हे सर्व सहन करता येईलही.. पण कुत्र्यांचा सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे ती मरतात. तेच्यायला माणूस जाण्याहून वाईट प्रकार... मुळात फार जास्त प्रेम लावायचं असेल तर मग नंतर मरण्याला काय अर्थ आहे? आणि मरायचंच तर का लावतात माया? बेअक्कल प्राणी..

..तेव्हा अजून कुत्र्याच्या मोहात पडला नसाल तर आता यापुढे कुत्री आणून पाळू नका इतकंच..

भाषामुक्तकविचारप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

हम्म
सुरुवातीला वाटल कि गविनी मांजर कुत्रांची तुलना लिहीलीय
पण शेवटच्या दोन परिच्छेदात गवि टच जाणवला
त्या दोन परिच्छेदांचा अनुभव स्वत घेतलाय

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jul 2012 - 5:39 pm | अत्रुप्त आत्मा

नेहमी प्रमाणे गवी स्टाइल... एक नंबर ... झक्कास...!

सुहास झेले's picture

5 Jul 2012 - 11:23 pm | सुहास झेले

अगदी अगदी.... गवि रॉक्स :) :)

मृत्युन्जय's picture

4 Jul 2012 - 5:41 pm | मृत्युन्जय

शेवटच्या दोन परिच्छेदात लेखाचा सूरच पालटला की. खासच,

मुक्त विहारि's picture

4 Jul 2012 - 5:43 pm | मुक्त विहारि

सूंदर.

मन१'s picture

4 Jul 2012 - 5:49 pm | मन१

मस्तच. वरती जाईनं म्हटल्याप्रमाणं शेवटचे दोन परिच्छेद खास गविशैलीचे. मस्तच.
पुलंचं "पाळिव प्राणी आणि पक्षी" ऐकल्यावर काहीही नाविन्य न घेता हे त्याच लाइनवर जातय की काय असं वाटलं, पण सुदैवानं तसं झालं नाही.

कापसाचे मांजरगोळे हुळहुळायला लागले

शब्दश: चित्र समोर उभे करणारे शब्द, वाक्य.:-

त्यांना जवळजवळ फरपटतच नळस्तंभाकडे न्यावं लागतं.

नळस्तंभ ह्या शब्दाला सलाम!

गुर्ब गुछ
रुक्ष व्याकरणात अर्थवाही क्रियाविषेषणे असं काहिसं शिकलो होतो. त्याचं जिवंत प्रात्यक्षिक म्हणजे हा शब्द. थेट "झपूर्झा" च्या तोडिचा.

जितकं कुत्रं मोठ्ठाड तितकी त्याची जीभ लांब अन लपलपीत. मोठ्या कुत्र्याची जीभ "लप्प" अशा एका फटकार्‍यात मालकाचा संपूर्ण चेहरा भिजवू शकते आणि अशावेळी एकाच फटक्यात हे होत असल्याने बचावाची संधी मिळत नाही.

हे म्हणजे पुन्हा एकदा शब्दश: चित्र समोर उभे करणारे शब्द, वाक्य.

खूपच आवडलं.

अचूक निरीक्षणातून उतरलेला जबरा लेख शेवटी अंमळ हळवा करून गेला.
बाकी मांजरं पण लोचटपणात कुत्र्यांहून बिलकुल कमी नाहीत. लाडीगोडीने अगदी पाठ खाजवत हैराण करतात.

मन१'s picture

4 Jul 2012 - 5:57 pm | मन१

त्यांचा लोचटपना नि मैत्री पोटभरेपर्यंतच. नंतर त्यांना माणसाशी दोस्ती करण्यात काही इंटरेस नसतो.
कुत्री पोट भरले तरी, भुकेले असले तरी माणसाशी खेळायला, दंगा करायला तयार असतात. तसाच काहिसा प्रकार घोड्यांचा. ते नंतर कधीतरी.
आमच्या ब्राउनीचं सगळ्यात गमतीशीर काही वाटत असेल तर ते म्हणजे पठ्ठ्या त्याच्याकडं लक्ष दिलं नाही की स्वतः ची शेपूट पकडायला जाउन एकटाच गरागरा फिरत बसायचा. खेळायला लागलो त्याच्याशी की पुन्हा शांत.

अनुभव अनुभव म्हणतात तो हाच. शब्दा-शब्दात अनुभव ओघळतोय.
एकदम गवि-स्टाईल!
स्साला, आताशा कुत्री पाळायलाच नकोशी वाटतात ती केवळ आणि केवळ गविंनी दिलेल्या कारणापोटीच.....
(एकेकाळी ३-४ कुत्र्यांना अंगाखांद्यावर खेळवून खांदा दिलेला) प्रास

आगाऊ कार्टा's picture

4 Jul 2012 - 6:03 pm | आगाऊ कार्टा

लेख सुंदरच आहे पण "इन जनरल मांजर जात नालायक.."
हे पटले नाही. कारण...
१) मुळात मांजर हा अतिशय स्वच्छ राहणारा प्राणी आहे. त्यामुळे त्याला आंघोळ वगैरे घालायची भानगड नाही.
२) मांजराला फिरायला घेऊन जावे लागत नाही.
३) मांजर सहसा चावत नाही. चावले तरी जखम होईल इतकी ताकद नसते. समजा झालीच जखम तरी इंजेक्शन घ्यावे लागत नाही.
अर्थात हे मी गावठी मांजरांबद्दल बोलतोय. पर्शियन कॅट वगैरेंबद्दल आपल्याला काही महिती नाही.
आमच्या कोकणातल्या आजोबांच्या घरी कायम ४-५ मांजरे असतात (सध्या ८ आहेत).
त्यामुळे घर कौलारू असून सुद्धा ऊंदीर औषधाला सुद्धा मिळत नाही.
त्यचबरोबर फुरसे, मण्यार, घणस यांसारख्या सरपटणार्‍या विषारी जनावरांची देखील भिती नसते.

गवि's picture

4 Jul 2012 - 6:28 pm | गवि

तुम्ही मांजर कसं पाळण्यास सुलभ, उपयोगी, सेफ आणि स्वच्छ आहे हे सांगितलंत. नालायकपणाचा यातल्या कशाशी काही संबंध नाही.. तो वेगळाच गुण.. ;)

आनंदी गोपाळ's picture

5 Jul 2012 - 9:26 pm | आनंदी गोपाळ

अज्ञानात सुख असते म्हणे.
हे वाचा: http://en.wikipedia.org/wiki/Cat_scratch_disease

अतीशय स्वच्छ मांजरीची 'शी' काढण्याचा प्रसंग कधी आला आहे का तुमच्यावर?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2012 - 6:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकुन एक अनुभव घेतले आहेत. आणि लिहिलंही एकदम मनातलं. कुत्री पाळण्याचा नाद असल्यामुळे लेख आवडला. सध्या जर्मन शेफर्ड आहे. लंबर एकची कामचुकार आहे. कोणी आल्यागेल्यावर भूंकत नाही. फार क्वचित तिला जवाबदारीची आठवण येते. पण, आता जीव लावला आहे, सोडता येत नाही सोडणार नाही.

पामेलियन, डॉबरमन, आणि आता जर्मनशेफर्ड,आता ग्रेट डॉन किंवा वासरुसारखं मोठं हवंय. कोणाकडे हाय का ? :)

-दिलीप बिरुटे

बिरुटेसर, पाठदुखी लावून घ्यायचा विचार दिसतोय का?

कोणी आल्यागेल्यावर भूंकत नाही.

कुत्र्याचं भुंकण्याचं प्रमाण त्याच्या शरीराच्या आकाराच्या व्यस्तप्रमाणात असल्याचं निरीक्षण आहे. माझं डॉबरमन कुत्रं शांत असायचं. फार झालं तर एकदाच भफ्फ करायचं घशातल्या घशात. तेवढ्यानेही समोरच्याचं पाणी व्हायचं.

जवळच्या घरात ग्रेट डेन होता तो तर भुंकायचा नाही की पळायचा नाही. नुसता गेटची पूर्ण लांबी अडवून शांत आडवा झोपायचा.. बस्स. तेवढ्याने गेटबाहेरचाही ट्रॅफिक थांबायचा..

उलट पोमेरियन पहा.. उगाच ब्यॅक ब्यॅक ब्यॅक ब्यॅक कंटिन्युअस....आणि आलेला मनुष्यही घाबरण्यापेक्षा वैतागतो जास्त अशा किटकिटीने..

मन१'s picture

4 Jul 2012 - 9:33 pm | मन१

तसच ते वोडाफोनच्या जाहिरातीतले कुत्रेही भुंकायला लागले की लैच डोकं उठवतात. भुंकताना आवेश तर इतका की बैलाच्याही अंगावर धाऊन जातील आणि बैलानं नुसती मुंडी हलवली तरी धूम पळत माघारीही फिरतील!

आमचा ब्राउनी हा पामेरियन. एकदा घरात नियमित घुसणार्‍या मांजराच्या मागे लागला. मांजर धुम्म पळत सुटले. मांजर पुढे हे आणि हे बुद्धु मागे. आख्ख्या घरात हैदोस सुरु. कपाटाच्या मागची फट्,बाथरूम शेजारचा पॅसेज्,,पलंगाखालची रिकामी जागा अशा सर्व जागीए घुसून ह्यांचा लपंडाव सुरु झाला. शेवटी अंगणात एका भिंतीच्या कोनाड्यापर्यंत मांजर पळत गेले आणि आमचे साहेब मागे मागे वॅक वॅक करत आवेशात त्याच्या मागं. मांजराला पळायला जागाच उरली नाही. ब्राउनी अगदि फूटभर अंतरावर उभा आणि......
...
आणि एकदम मांजरानं नखं काढली.फिस्सकन ते वसकले. शेपूट ताठ झाली. त्याचे शरीर कडक झाले. त्याच्या निस्त्या "म्याsssव" ला सुद्धा विलक्षण धार आली. तो अवतार एवढा जबरदस्त होता की ब्राउनीची बोबडी वळली आणि तोच उलट्या पावली धूम पळत सुटला.
काही मिनिटांसाठी कुत्रे पुढे आणि मांजर त्याच्या पाठलागावर असा अद्भुत सोहळा ह्याची देही ह्याची डोळा पहायला मिळाला!!

=)) =))
किस्सा आवडला मनोबा

सेम असाच किस्सा मीपण घडताना पाहिला होता :) लै खत्रा!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2012 - 10:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पामेरियन लै शेपूट घालू कुत्रं आहे. पण, याचा आव असा की याच्या समोर कोणी आलं तर फाडून खाईल. :)

-दिलीप बिरुटे

मृत्युन्जय's picture

5 Jul 2012 - 10:52 am | मृत्युन्जय

काही मिनिटांसाठी कुत्रे पुढे आणि मांजर त्याच्या पाठलागावर असा अद्भुत सोहळा ह्याची देही ह्याची डोळा पहायला मिळाला!!

तुमच्या घराच्या जागी शनिवारवाडा बांधायला घ्या मग आता ;)

मृत्युन्जय's picture

5 Jul 2012 - 10:52 am | मृत्युन्जय

काही मिनिटांसाठी कुत्रे पुढे आणि मांजर त्याच्या पाठलागावर असा अद्भुत सोहळा ह्याची देही ह्याची डोळा पहायला मिळाला!!

तुमच्या घराच्या जागी शनिवारवाडा बांधायला घ्या मग आता ;)

बॅटमॅन's picture

5 Jul 2012 - 11:06 am | बॅटमॅन

माझ्या माहितीप्रमाणे तो किस्सा ससा आणि कुत्रे असा होता. चूभूदेघे.

मृत्युन्जय's picture

5 Jul 2012 - 12:32 pm | मृत्युन्जय

हो. तसाच आहे. पण हा बाजीरावाचा शनिवार वाडा थोडेच आहे. हा मनरावांचा शनिवारवाडा आहे ना. इथे कुत्रा मांजर असु शकते. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Jul 2012 - 12:33 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत आहे... 'मना'च्या खेळात काहीही घडू शकतं की! ;)

बॅटमॅन's picture

5 Jul 2012 - 12:59 pm | बॅटमॅन

रैट्ट यू आर स्सार :)

मन१'s picture

5 Jul 2012 - 3:58 pm | मन१

शनिवार ऐवजी "मनीमार वाडा " (म्हंजे जिथं मांजरीनं (कुत्र्याला) मार दिला ती जागा) बांधायला घ्यावा म्हणतोय.

बॅटमॅन's picture

5 Jul 2012 - 4:58 pm | बॅटमॅन

चला यमकहरामी कुठचे ;)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

5 Jul 2012 - 11:06 am | मिसळलेला काव्यप्रेमी

वाघ मागं मी पुढं, वाघ मागं मी पुढं, वाघ मागं मी पुढं,
:D :D :D :D :D

अर्धवटराव's picture

5 Jul 2012 - 11:35 pm | अर्धवटराव

असा प्रसंग जर व्हॉडाफोन कुत्र्याच्या नशिबी आला तर त्यांना डिस्ल्केमर टाकावं लागेल... नेटवर्क फॉलोव्स एव्हेरीव्हेअर, एक्सेप्ट रागावलेल्या मांजरी :D

अर्धवटराव

म्हणून मी कुत्री आणि मांजर पाळण्याच्या भानगडीत पडत नाही. एकदा ससे पाळले होते. नातेवाईकाच्या लग्नासाठी गेलो असताना कुत्र्यांनी माझ्या लाडक्या सश्यांचा फडशा पाडला होता.

म्हणून आता कुठलाही पाळीव प्राणी घरात पाळण्याची इच्छा होत नाही.

गणपा's picture

4 Jul 2012 - 6:24 pm | गणपा

मस्त लेख गवि.
आवडला.

स्वाती दिनेश's picture

4 Jul 2012 - 6:29 pm | स्वाती दिनेश

लेख छानच, खूप आवडला..
स्वाती

उदय के'सागर's picture

4 Jul 2012 - 6:30 pm | उदय के'सागर

मस्तं लेख :)

बाकि >>.तेव्हा अजून कुत्र्याच्या मोहात पडला नसाल तर आता यापुढे कुत्री आणून पाळू नका इतकंच..>>>
कुत्र्याच्या मोहात तर मी लहानपणीपासुनच आहे, पण आई-बाबांनी कधी परवानगीच दिली नाहि... अता तर पक्कं वाटतय की पाळावचं एखादं क्युटसं, छोटुसं कुत्रं :) ... ते कुत्र्याचे छोटे छोटे पिल्लं किती 'गोग्गोड' असतात नै :)

स्मिता.'s picture

4 Jul 2012 - 6:30 pm | स्मिता.

गमतीजमतीत सुरुवात होवून लेख संपतांना हळवे करून गेला. लेखात लिहिलेल्या तमाम कारणांमुळे कोणताच प्राणी पाळावासा वाटत नाही.

बॅटमॅन's picture

4 Jul 2012 - 6:35 pm | बॅटमॅन

मस्त लेख...वल्लीने म्हटल्याप्रमाणे शब्दाशब्दातून अनुभव ओघळतोय. कुत्र्यांपेक्षा मांजरं देखणी पण तितकीच नालायक (स्वार्थी, माणसासारखी ;)). कुत्र्यांसारखे निरपेक्ष प्रेम कोणी करू शकत असेल असे नाही वाटत. आमच्या शेजार्‍यांचे कुत्रे त्याला रात्री मोकळे सोडले की कायम आमच्याच अंगणात ठाण मांडायचे. त्याला त्याच्या घरात फार प्रेम मिळत नसावे, ते कायम आमच्याचकडे.

इतके असले तरी अलीकडे कुत्र्यांची फारच भीती वाटते- तेदेखील एकदाही कुत्रे चावले नसताना. कशी घालवावी कळत नाही. काही अंशी यशस्वी झालोय, पण नाही गेली अजून.

गोंधळी's picture

4 Jul 2012 - 8:33 pm | गोंधळी

तुम्च्या दुव्यांनी मजा आणली.
मस्त.

बॅटमॅन's picture

4 Jul 2012 - 8:37 pm | बॅटमॅन

पाहिले, मस्त आहेत सर्व. डॉबरमॅनची जीभ ओढणारी झाशीची राणी तर खत्राच आहे :)

सुहास झेले's picture

5 Jul 2012 - 11:34 pm | सुहास झेले

हो नं राव... कसली गोड पोरगी आहे आणि तो डॉबरमॅन एकदम रावडी :) :)

योगप्रभू's picture

4 Jul 2012 - 7:32 pm | योगप्रभू

नालायकपणाचे म्हणाल तर कुत्रा/मांजर परवडले, पण माणसाइतकी नालायक आणि हरामखोर जात दुसरी आढळणार नाही. मला एक नीतिकथा आठवते.

मुनी शिष्यांना सांगत होते, ' कुत्रा बाह्यात्कारी घाणेरडा असतो. धुळीत लोळतो, नको तिथे तोंड घालतो, केसात पिसवा असतात, अंघोळीचा कंटाळा. पण मनाने एकदम चांगला. निष्ठावान, आज्ञापालक आणि मायाळू. तेच मांजराचे बघा. अत्यंत मुलायम त्वचा. दिवसातून सत्रावेळा चाटूनपुसून अंग साफ करणार. अंगावर एक किडा राहू देणार नाहीत. लाळ गाळणार नाहीत, पण मनाने लबाड. सांगितलेले ऐकणार नाही, मालकाच्या घरचे चोरुन खायला काही वाटणार नाही. अगदी विरुद्ध स्वभाव.'
'गुरुदेव! माणसाचे काय?' एका शिष्याने विचारले.
त्यावर गुरुंनी मौन धारण केले.

(अवांतर - मांजर आज्ञा पाळत नाही आणि त्यामुळे त्याला शिकवणे कठीण. याच कारणाने चित्रपटांत एकवेळ कुत्रा, माकड, हत्ती यांच्याकडून काम करुन घेणे सोपे, पण मांजर सहसा आढळत नाही. मात्र मागे 'कॅट फ्रॉम आउटर स्पेस' नावाचा जुना इंग्रजी चित्रपट पाहिला होता. त्यात मांजराने इतके सुरेख काम केले आहे.)

रच्याकने - लेख छान लिहिलाय गवि.

>>>मांजर आज्ञा पाळत नाही आणि त्यामुळे त्याला शिकवणे कठीण

सर्कशीतही याच कारणामुळे मांजरे नसतात.

>>दिवसातून सत्रावेळा चाटूनपुसून अंग साफ करणार.

लहानपणी माझ्याकडे मांजरे यायची मारामार, चुकूनही आले की शेपटी ओढून घेणे, कान मागे घडी करून घेणे, जीभेचा खरखरीत पणा तपासून घेणे अशी शिक्षा मिळत असल्याने ते सहसा दूरच पळायचे.
एकदा मी अभ्यास करताना शेजारी येवून बसले व स्वत:चे हातपाय चाटून स्वच्छ करणे सुरू झाले. मी आगाऊपणा करत स्वच्छ झालेल्या पायावर बोट फिरवले, मांजराची शिस्त बिघडली! पुन्हा तो पाय चाटून काढला. मग पुन्हा मी बोट फिरवले, मग पुन्हा स्वच्छता.. असे ३ / ४ दा झाल्यावर ते वैतागून निघून गेले. :-D

अर्धवटराव's picture

5 Jul 2012 - 11:39 pm | अर्धवटराव

>> .. असे ३ / ४ दा झाल्यावर ते वैतागून निघून गेले
-- असेच एखादे मांजर मिपावर येऊन गेले असावे काय?

अर्धवटराव

प्रभाकर पेठकर's picture

4 Jul 2012 - 8:01 pm | प्रभाकर पेठकर

मस्तं लेख.

कुत्रा पाळण्याची तीव्र इच्छा आहे. पण आता निवृत्ती नंतरच. संध्याकाळी दोन पेग घेणारा डॉबरमन शोधतो आहे. स्साला, संध्याकाळला कंपनी हवी.

मन१'s picture

4 Jul 2012 - 9:34 pm | मन१

फुकटात पाजणार असाल तर पिणार्‍यांची कमी नाही. ;)

नर्मदेतला गोटा's picture

4 Jul 2012 - 10:04 pm | नर्मदेतला गोटा

संध्याकाळला कंपनी हवी.

हे हे हे म्हणजे निवॄत्तीनंतरही कंपनीत जाणार

चतुरंग's picture

4 Jul 2012 - 8:01 pm | चतुरंग

लेख आवडलाच पण माझ्या बोरिसच्या आठवणीने आतल्याआत रडायला झालं!
ते दु:ख फार वाईट. तुमच्यासोबत शेवटपर्यंत राहणार! :(

(बोरिसच्या आठवणीने व्याकूळ)रंगा

jaypal's picture

4 Jul 2012 - 9:01 pm | jaypal

d

jaypal's picture

4 Jul 2012 - 9:00 pm | jaypal

;-)

कौशी's picture

4 Jul 2012 - 9:50 pm | कौशी

शेवट मन हळ्वे करून गेला...आवड्ला.

लेख आवडला.
आमच्याकडच्या पॉमरेनियनला चॉकोलेट फार आवडायचे.
तो गेल्यावर घरचे माणूस जावे तसे सगळेजण रडले होते.
२५ जुलैला वाढदिवस आहे.
आपण त्याला पाळले आहे की त्याने सगळ्या मेंब्रांना दावणीला बांधले आहे ते कळत नाही. ;)
मुलगा म्हणतोय आणखी एक आणू. म्हणजे पुन्हा दहा बारा वर्षांनी एक म्हातारपण बघणे आले.
नकोच ते!

चित्रगुप्त's picture

4 Jul 2012 - 10:15 pm | चित्रगुप्त

श्वान-पालनाचा अनुभव नाही, पण लेख एकदम आवडला.
काही श्वान-चित्रे:



Jean-Léon Gérôme - Diogenes

Horace Vernet - The Wounded Trumpeter

सर्व चित्रे विक्कीपिडिया वरून साभार.

JAGOMOHANPYARE's picture

4 Jul 2012 - 10:14 pm | JAGOMOHANPYARE

मांजरांबद्दल वाइट लिहिल्याबद्दल निषेध

दादा कोंडके's picture

4 Jul 2012 - 10:18 pm | दादा कोंडके

खरंच, कुत्र्याच्या दूर्गुणाबाबत सहमत.

च्यायला एकच कुत्रं पाळलं होतं. दहाच्या वर वर्षे जगलं होतं. लहानपणीच्या प्रत्येक आवठणीला चिकटून बसलंय.
ते मेल्यावर वेड्यासारखं रडलो होतो सगळेच. आठवडाभर नीट जेवण गेलं नाही कुणाला. जीव लावलेल्या कुत्र्याची मौत न बघितलेल्यांना हे दु:ख कळणारच नाही, सोडा. :(

विवेक मोडक's picture

5 Jul 2012 - 4:22 pm | विवेक मोडक

जीव लावलेल्या कुत्र्याची मौत न बघितलेल्यांना हे दु:ख कळणारच नाही
या वाक्याशी १००% सहमत

पैसा's picture

4 Jul 2012 - 10:24 pm | पैसा

कुत्री आणि मांजरं पाळून भरपूर दु:ख सहन करून झाली. पण शहाणपण येत नाही. मांजरं आहेतच.

मी लहान असताना एक गावठी मस्तवाल कुत्री होती पाळलेली. तिला कधी बांधून ठेवली किंवा आंघोळ घातली तर ती इतका धिंगाणा करायची आणि मातीत जाऊन लोळायची की २/३ आंघोळींच्या प्रसंगांनंतर तिला बांधणे आणि आंघोळ घालणे दोन्ही प्रकार बंद करून टाकले. वैताग म्हणजे नंतर बया लोकांच्या कोंबड्या मारायला शिकली. कंटाळून कोणीतरी तिला विषारी कोंबडी खायला दिली आणि ती मरून गेली. पण अजून तिची आठवण येते.

मांजरं नालायक हे खरंच, पण नियमाला अपवाद अशी एक मांजरी आमच्याकडे होती. गावातलं भाड्याचं घर सोडून आम्ही रत्नागिरीला रहायला गेलो. पण आईची नोकरी चालू होती म्हणून ते घर भाड्याने ठेवलं होतं. आई तिथे दुपारी डबा खायला जायची. आम्ही घर सोडल्यावर तिथली मांजरी शेजार्‍यांकडे रहायला गेली. पण रोज दुपारी आई घरी आली की दारात वाट बघत असायची आणि तिचं जेवण होईपर्यंत बसून रहायची. मग तिला गेटपर्यंत पोचवून निघून जायची. ३ एक वर्षं तरी हा क्रम चालू होता. शेवटी ती मांजरी एका बसखाली येऊन दुर्दैवीरीत्या मेली, मग आईने त्या घरात जायचं पण हळूहळू बंद केलं.

मांजरांच्या गोष्टी सांगायला बसले तर एक लेख काय लेखमालिका लिहावी लागेल! म्हणून इथेच थांबते. गविंच्या लेखाबद्दल काय बोलावं? नेहमीप्रमाणे खास!!

गवि, अतिशय उत्तम लिखाण अर्थात पुन्हा एकदा.

पैसातै, मांजरांच्या बाबतीत तुम्ही लिहिलंय त्याला १००० वेळा सहमत वय वर्षे ०.६ ते २७, जवळपास प्रत्येक गोष्ट मांजरांबरोबर शेअर केलेली आहे, अंथरुण, पांघरुण, खाणं, सुख, आनंद, दुख, अपयश सगळं सगळं, एवढ्या अनुभवावरुन सांगतो कुत्र्यापेक्षा मांजर शतपटीनं चांगली, खरीखुरी प्रामाणिक, उत्तम गुरु निदान दुनियादारी शिकवायला तरी.

कुणीतरी म्हणलंय तुम्ही कुत्र्याला पाळता पण मांजर तुम्हाला पाळतं, शब्दशः खरं आहे, पण मांजरासारखा मालक भेटणं यालाही नशिब लागतं. अनुभवावरुन सांगतो ज्या घरात मांजरी आपली पिल्लं ठेवायला त्याच घरात जाते जे त्या एरियातलं सर्वात सुरक्षित घर असतं, आमच्या घरात गेला बाजार १५-१८ वेळा बाळंतपणं केलीत मांजरींची. तेवढा थोडाच काळ मांजरी तुमच्याकडं सुरक्षेची, खाण्याच्या सोईची थोडीशी लाचार मागणी करतं, पण इतर वेळा मांजराचा माज बघण्यासारखा. नुसत्या नजरेनं आणि मान हलवुन समोरच्याचा अपमान करणं हे मांजराएवढं कुणालाच जमणार नाही.

पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात सकाळी चुकारपणे येणा-या उन्हाच्या तिरपेत सगळं अंग ताणुन पडलेली मांजर पाहणं, मांजराच्य पोटाला हात लावुन येणारा गुर्र्र आवाज ऐकणं, त्याच्या तोंडात बोट देउन उगाच मांजर चावली तरी काही होत नाही अशी शान दाखवणं ( हा प्रयोग आपापल्या जबाबदारीवर करावा, मांजराचा दोन सुळ्यात जो गॅप असतो तिथं बोट व्यवस्थित ठेवता येणे ही एक कला आहे, मांजराने बोट चावल्यास मी जबाबदार नाही) असे खुप खुप आनंदाचे क्षण दिलेत या प्राण्यानं हा खरोखर आनंदाचा क्षण असतो, ते म्हणतात ना ' do not live like king, rather live like you don't bother who the king is' याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे मांजर.

अगदी पैसातै म्हणतात तसं, मांजरांबद्दल लिहायला बसलो तर दोन चार लेख होतील, पण आधी खुप रडु येईल म्हणुन त्या वाटेलाच जात नाही.

आमच्या मांजरीचे नाव पिंटी "होते" :-(

आईला वाळवण राखण्यासाठी कधीही अंगणात लक्ष ठेवावे लागले नाही. ही असताना काय बिशाद चिमण्यांची वाळवणाकडे फिरकण्याची..
न कळत्या वयात "पिंटी माझी उशी" असे म्हणत बर्‍याचदा तिच्या पोटावर डोके ठेवून झोपलो होतो, बिचारीने कधीही पंजा मारला नाही, दात लावणे / चावणे वगैरे दूरच.
साप / उंदीर / चिमण्या वगैरे लिलया मारणार्‍या या महामायेने एकदा कावळा मारला, मग चार दिवस घरात तळ ठोकून बसावे लागले. ही बाहेर पडली की कावळे काव काव करत पाठलाग करायचे. :-)
आजूबाजूचे बरेच गावठी कुत्रे "एकाक्ष" असायचे, कुत्रे मागे लागले की ही चवताळून त्यांच्या डोळ्यांवरच हल्ला करायची.

एकदा चार-पाच कुत्र्यांनी एकत्र मिळून आमच्या बालपणीचा हा धागा क्रूरपणे तोडला. :-(

फिर हमारे घर मे "बॉबी" आयी..
मग कांही वर्षांनी "बंटी"...
आणखी कांही वर्षांनी "रूप्या व सोन्या"..

एका लैच लाघवी मांजराचे जाणे जिव्हारी लागल्यानंतर मांजराला लळा लावणे मुद्दामहून बंद केले... परत मांजर पाळणे नको आणि परत तो त्रासही नको. :-(

मन१'s picture

5 Jul 2012 - 3:56 pm | मन१

आमची घारोळीही अशीच "शाणी" होती. फक्त ती शक्यतो हल्ला वगैरे करायची नाही. कुठलाही कुत्रा मागे लागला की थेट ७-८ फूट उंच कंपाउंडवर टुण्णकन दोन उड्यांत पोचायची. वरती जाउन शांतपणे कुत्र्याकडे तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकत उभी.
कुत्र थकेस्तोवर बोंबलायचं, भुंकायचं, आणि आल्या पावली परतही जायचं. मनोरंजन करुन घेउन ही महामाया पुन्हा लगेच खाली यायला तयार.
टिप १ :- आम्ही हिला पाळली नव्हती. पण शुभ्र पांढरी ती बळेच घरात घुसून लाड करुन घ्यायची. कितीदाही हाकलले तरी वर्षातून दोनदोन वेळेस येउन पिले टाकायची. एक्दा का पिले टाकली की आम्हालाही मग तिला हाकलायला कसेसेच व्हायचे. निवांत मुक्काम टाकून बसायची माळ्यावर नाही तर पायरीच्या आडोशाला.

सोत्रि's picture

4 Jul 2012 - 10:43 pm | सोत्रि

एकदम अपेक्षेप्रमाणे खास 'गवि' टच असलेला लेख!

एकंदरीतच पाळीव प्राण्यांची आवड नसल्यामुळे, लेख वाचून, बरें झाले असे काही करायची आवड नाही असे वाटून गेले.

- (गवि'पंखा') सोकाजी

परिकथेतील राजकुमार's picture

6 Jul 2012 - 5:57 pm | परिकथेतील राजकुमार

येच बोल्ता हय. 'एकदम अपेक्षेप्रमाणे खास 'गवि' टच असलेला लेख!

बाकी एकदाच लहानपणी घरी 'कुत्रे पाळायचे का ?' असे विचारून 'तुम्हाला पाळतोय ते काय कमी आहे का ?' असे कान तृप्त करणारे उत्तर मिळवले होते. त्या दिवसापासून आपल्याला घरी साखळीने बांधत नाहीत आणि जेवायला पे-डीग्री देत नाहीत ह्या आनंदात आयुष्य घालवत आहे.

अर्धवटराव's picture

7 Jul 2012 - 12:34 am | अर्धवटराव

तुमचे आणि आमचे तीर्थरूप एकाच शाळेतुन शिकले कि काय... अगदी हेच उत्तर आम्हि आमच्या पिताश्रींकडुन ऐकले होते.

अर्धवटराव

जेनी...'s picture

7 Jul 2012 - 1:26 am | जेनी...

:D

लेख उत्तम.
मला स्वताला कुठलेच प्राणी आवडत नाहीत. पण माझ्या चुलत बहिणीकडे कायम मांजरी असतात. एकदा त्यांच्या नात्यात कोणाचेतरी निधन झाले म्हणून काका काकू तिकडे गेले होते, बहिण एकटीच घरी होती. त्यावेळी नववी दहावीत असेल. त्यांची मांजर कधीच रात्री राहायची नाही. त्या दिवशी ती पूर्ण रात्र माझ्या बहिणीच्या शेजारी बसून होती. सकाळी काका काकू आले तेंव्हा गेली.

शिल्पा ब's picture

5 Jul 2012 - 12:29 am | शिल्पा ब

मला माल्टीज, ऑस्ट्रेलियन शेपर्ड आवडतात...जमेल तेंव्हा पाळेन.
कत्र्यांकडुन लहान मुलांवर हल्ले झाल्याचं वाचलंय त्यामुळे अजुन पाळलं नाही..शिवाय घरमालकीण पण नाहीच म्हणतेय. :(

श्रीरंग_जोशी's picture

5 Jul 2012 - 1:13 am | श्रीरंग_जोशी

गवि - दर वेळी तुमचं लेखन वाचलं की आमच्या पंख्याला दोन अधिक पाती लागतात.
लेख उत्तमच झालाय. विशेषतः शेवट तर डोळ्यांच्या कडा ओलावणारा....

आम्ही देखील कुत्र्याचे पिल्लू पाळायची चेष्टा एकदाच (अपघाताने) केली होती. काही आठवड्याचे असताना मोठ्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले ते पिल्लू तात्पुरता आसरा देणाऱ्यांनी सोडून द्यायचे ठरवले होते. माझ्या भावाने हट्टाने त्याला घरी आणले. लौकरच त्याची जखम भरली व त्याने आम्हा सर्वांना लळा लावला. दुर्दैवाने पूर्वीच्या जखमेच्या प्रथमोपचाराच्या वेळी धनुर्वाताचे इंजेक्शन न दिल्यामुळे ते काही आठवड्यातच दगावले. त्यानंतर कधीच पुन्हा कुत्रे पाळायची इच्छा झाली नाही.

इकडे अमेरिकेत तर प्रत्येक दुसऱ्या घरी कुत्रे असतेच. बरेचदा त्यांना फिरवत असलेले त्यांचे मालक / मालकीण इतरांनाही लाड करू देण्याची संधी देतात. अर्थातच हे काम मी आवडीने करतो.

या अगोदरच्या गावी राहत असताना बरेचदा संध्याकाळी एक वृद्ध जोडपे न्यू फौन्डलंड जातीचे २ कुत्रे फिरवत असत. त्या कुत्र्यांना धावताना काय वेगाने चालतानाही कधी बघितले नाही. एक जण तर अधून मधून पदपथावर बसकण मारायचा.

खालील छायाचित्र जालावरून साभार...

बन्या बापु's picture

5 Jul 2012 - 1:19 am | बन्या बापु

__/\__/\__

उत्तम लेख , अनुभव वाचुन हात जोडले ...

आम्ही सध्या पाळीव प्राणी घरात आणणे बंद केले आहे. पक्षी आहेत पण त्यांचा इतका लळा लागत नाही.

अवांतर:

आमचे शर्माजी आपल्या श्वानकुमारिकेला घेऊन डॉक्टरकडे गेले checkup साठी ( स्वत:च्या नाही.. कुत्रीच्या) आणि झीट येऊन पडले डॉक्टरच्या अगाध विद्वत्तेपुढे... का तर डॉक्टर म्हणाले.. "शर्माजी तुमच्या श्वानकुमारिकेला जुळे होणार आहे.. :-O "

( श्वान प्रजातीमध्ये जुळे होतात म्हणजे नक्की काय होते हा नवीन चर्चेचा विषय. )

बन्या बापु

अगदी शेवटी मन उघडे केलेत.

सुनील's picture

5 Jul 2012 - 7:45 am | सुनील

लेख आवडला. शेवट खूपच भावूक.

असं म्हणतात, मांजराचा जीव असतो तो वास्तूत, माणसात नव्हे तर, कुत्र्याचा जीव असतो तो माणसात, वास्तूत नव्हे.

शिवाय या राक्षसी कुत्र्यांना खाण्याची जराही नजाकत नसते. थाळीला पोचे येईपर्यंत त्यावर तुटून पडतात. भसाभसा खाताना हे जितकं सांडतात त्यावर एका छोट्या केसाळ कुत्र्याचं जेवण निघेल. नंतर यांच्या नाकाभोवती अन्नाचा गोळा चिकटलेला असतो आणि त्यांना त्याचं भान नसतं..

राक्षसी कुत्र्यांबद्दल ठाऊक नाही पण आमचा "टफी" मात्र जेवण त्याच्या ठरलेल्या थाळीत वाढेपर्यंत असा शांतपणे बसून राहतो -

मुक्त विहारि's picture

5 Jul 2012 - 4:57 pm | मुक्त विहारि

काय गोड पिल्लू आहे...

मला माझ्या "स्वीटी"ची आठवण आली.

ती पण खा म्हटल्या शिवाय खात नाही..

सुनील's picture

6 Jul 2012 - 12:11 am | सुनील

काय गोड पिल्लू आहे...

धन्यवाद! त्याचं "टफी" हे नाव अगदीच विजोड आहे :)

टफी एकदम क्युट आहे सुनिल राव . :)
पण टफी च्या मालकिणीचा फोटो का अर्धाच टाकलाय ??
फोटो क्रॉप का केलाय तुम्ही ??
हे नै आवडलं बॉ :(

सुनील's picture

7 Jul 2012 - 2:05 am | सुनील

:)

नगरीनिरंजन's picture

5 Jul 2012 - 7:34 am | नगरीनिरंजन

बोलता बोलता अलगद खपली काढलीन.

मी_आहे_ना's picture

5 Jul 2012 - 9:36 am | मी_आहे_ना

लहानपणी बाबांच्या एका मित्रानी आम्हाला एक कुत्र्याचं पिल्लू (टॉमी) दिलेलं, पण जसं जसं २-३ महिन्यांत ते मोठं व्हायला लागलं, तसं तसं आजी आणि आईच्या त्राग्यानी त्याला एका ओळखीतल्या शेतकरी कुटुंबाकडे सुपूर्द केलं, तरीही पुढचं एखादं वर्ष मित्रांबरोबर त्याला भेटायला जात असू ते आठवलं.
गविंच्या हृदयस्पर्शी लि़खाणाला सलाम!

उदय's picture

5 Jul 2012 - 10:18 am | उदय

लेख आवडला. कुत्रा आवडतो, अशा सर्वांसाठी १ कविता देतो इथे. (कविता इंग्रजीमध्ये आहे, क्षमस्व).

I want my children to have a dog
Or may be two or three
They'll learn from them more easily
Than they will learn from me.

A dog will teach them how to love,
And have no grudge or hate
I'm not so good at that myself
But a dog will do it straight

I want my children to have a dog,
To be their pal and friend
So they may learn that friendship
Is faithful to the end.

There never yet has been a dog
That learned to double cross
Nor catered to you when you won
Then dropped you when you lost.

- Poet unknown to me.

अर्धवट's picture

5 Jul 2012 - 1:18 pm | अर्धवट

अप्रतिम कविता..

बाळ सप्रे's picture

5 Jul 2012 - 10:14 am | बाळ सप्रे

मांजराना मासे खाउ घालण्याचं वर्णन एकदम पर्फेक्ट..
लहानपणी आमच्याघरी देखिल ३ मांजरं होती.. घरात कोणी खात नसलं तरी मांजरांसाठी मासे आणयचो कधीतरी..
कुठेही असली तरी धावत येत.. माशांची पिशवी उंचावर धरली की ३-४ फूट उंच उड्या मारत .. अधाशीपणे खात असतं..

"हुळहुळणारे मांजरगोळे" शब्दप्रयोग देखिल आवडला..

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Jul 2012 - 10:21 am | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम!

हे सगळं वाचून आमच्या घाटपांडे काकांची आठवण आली. त्यांना त्यांच्या 'भूभू' बद्दल अक्षरशः तल्लिन होऊन बोलताना ऐकलं आहे. तरीही एकदा तरी कुत्रा पाळायची इच्छा आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

10 Jul 2012 - 7:55 pm | प्रकाश घाटपांडे

ऐ कुत्रा नाही म्हणायचे रे! भुभु म्हणायच कानाला कस गोड वाटते! :)

एखादं मांजर गरीब स्वभावाचं निघायचं, बाकी सर्व एकजात स्वार्थी आणि वखवख करणारी.. शिवाय काम झालं की झंडा ऊंचा करुन चालते होणारी..इन जनरल मांजर जात नालायक.. त्यांच्याविषयी याहून जास्त लिहायची त्यांची लायकी नाही.

लेख आवडला पण या वाक्यावर तीव्र आक्षेप !
(भु-भु + २ इटु़कल्या माउंचे लाड करणारी पियु ) :)

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Jul 2012 - 10:59 am | बिपिन कार्यकर्ते

लेखात मांजरांविषयी जे काही लिहिलं आहे त्याच्याशी मी सहमत आहे.

पियुशा's picture

5 Jul 2012 - 11:06 am | पियुशा

बि.का. यु टु ? :(
हे पहा आमच गोडुल :)



बिपिन कार्यकर्ते's picture

5 Jul 2012 - 11:10 am | बिपिन कार्यकर्ते

पण शेवटी मांजरच ना? छ्या:

सुधीर's picture

5 Jul 2012 - 11:12 am | सुधीर

पण कुत्र्यांचा सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे ती मरतात. तेच्यायला माणूस जाण्याहून वाईट प्रकार... मुळात फार जास्त प्रेम लावायचं असेल तर मग नंतर मरण्याला काय अर्थ आहे? आणि मरायचंच तर का लावतात माया? बेअक्कल प्राणी..

जबरा!
लळा लागलेल्या कुठल्याही प्राण्याबाबत असाच अनुभव येतो.

पियुशा's picture

5 Jul 2012 - 11:13 am | पियुशा

असो......... एखाद्याला नै आवडत मांजर तर नाही ,बळजबरी थोडीच आहे .
शेवटी ज्याची त्याची आवड :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

5 Jul 2012 - 11:19 am | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त झालाय लेख.
आमच्या घरी वडलांना कुठलेही पाळीव प्राणी चालत नाहीत.
त्यामुळे कधीही कुठलाही प्राणी पाळला नाही.
नाही म्हणायला लहान भावाने Fish Tank आणून काही मासे ठेवले होते.

एकदा त्याने लहान असतांना वडलांना विचारले होते, आपण कुत्रा पाळूया कां? त्यावर वडील म्हणाले,
"हो आण ना, पण मग तू आणि तो कुत्रा दोघेही घराबाहेर.. " :D
तेव्हापासून परत हा विषय कधी निघालाच नाही घरात.

पण लहानपणी कल्याणला वाड्यात रहात असतांना एक वाघ्या नावाचा कुत्रा होता. कुत्रा.एकच वाड्याचा पाळीव कुत्रा.
त्याच्याशी खुप मस्ती केली आहे, अगदी त्याच्या पाठीवरुन एका बिर्‍हाडातून दुसर्‍या बिर्‍हाडात जायचो... कधीच चावला नाही कि नखं मारली नाहीत त्याने, पण बाहेरच्या/नविन लोकांना वाड्यात शिरणे मुश्कील करून सोडायचा.

गविंचा लेख म्हणजे डोळे झाकून मस्त...
पण एकंदरच प्राणी गटाबाबत तिटकारा वाटतो.
पाळणारांच्या कौतुकाबद्दल तर जास्तच. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Jul 2012 - 3:37 pm | विश्वनाथ मेहेंदळे

हा आध्यात्मिक तिटकारा आहे का हो ? ;-)
नाही, म्हणजे आध्यात्मिक पातळीवरून तिटकारा करता येतो असे गृहीत धरतो आहे .

रा वन मधील दिलदारा सारखे "ओ तिटकारा तिटकारा मस्तीभरला तिटका ऽरा!!" असे भजन कल्पून डोळे पाणावले ;)

प्यारे१'s picture

5 Jul 2012 - 4:54 pm | प्यारे१

हा आध्यात्मिक नाही, मूर्ख लक्षणांतील तिटकारा आहे.... मर्यादेविण पाळी सुणे (कुत्रे) | तो एक मूर्ख||

नवर्‍याच्या वर कुत्र्याचे लाड नि कौतुक.
त्यात त्या प्राण्यांचं नैसर्गिक राहणीमान आपण बिघडवतो आहोत त्याचा काही आचपेच नसणं इ.इ. बर्‍याच गोष्टी समाविष्ट आहेत... पोरं दत्तक घ्या की त्यापेक्षा! ;)

बाकी, प्राणी हे किती झा लं तरी प्राणीच. त्यांना राख्या बांधणं, भाऊबीज करणं , .... , ..... ( आपापल्या कुवतीप्रमाणे गा जा भरा. ) असे ही प्रकार ठाऊक आहेत.

(विमे, गविंचा धागा हायजॅक नको करायला आपण! ;) )