'एक्कड की सार?' ऑटोवाल्याचे शब्द कानावर पडले तसा मी भानावर आलो. 'सार... मिटरसे चलते सार?' 'हा जुबिली हील्स जाना है चलो' ऑटोत बसलो तसा परत मुसळभार पाऊस सुरू झाला. काल दिवसभरापासून याने पिच्छा पुरविला होता. २७ तासांचा शिणवणारा प्रवास त्यात कडी म्हणजे तिनहीवेळा जेवणात खावा लागलेला 'राइस', सोबतीला कुणीच नाही आणि प्रत्येक स्टेशनवर थांबा घेणारी ट्रेन अरेरे सगळच 'सोनेपे सुहागा'. गेल्या महिनाभरापासून या राइसने नाकी नऊ आणले होते. त्रिवेंद्रमचं एक महिन्याचं ट्रेनिंग कसं पटकन संपलं काही पत्ताच लागला नाही. या काळात ट्रेनिंग कमी आणि संपूर्ण केरळचं टुरिंग मात्र मस्त झालं. कोचीन, त्रिवेन्द्रम, मुन्नार, अल्लेप्पी, बॅक वॉटर, कन्याकुमारी(तमिळनाडू), पेरियार एकही केरळचा भाग सोडला नाही. दिवसा नाममात्र ट्रेनिंग आणि संध्याकाळी त्रेवेंद्रम दर्शन नंतर जोपण हिंदी सिनेमा लागला असेल तो पाहून उशिरा रात्री हॉटेलला परतणे हाच नियम झाला होता. त्रिवेंद्रमला आल्यापासून पोळी काय असते ते विसरायला झालं होतं, सुरूवातीच्या दिवसात २-३ हॉटेल भटकून 'चपाती'च्या मृगजळाच्या शोधात शेवटी 'परोटा' खाउनच निभावावं लागलं. पुढे पुढे तर पोळिबद्दल विचारणाच सोडली. नारळाच्या तेलात बनविलेल्या अगम्य आणि अद्भुत भाज्या, जाड आणि स्थूल बांध्याचा भात, सोबतीला पोटभर रस्सम व ते पिताना हमखास येणारा ठसका यातच मग स्वर्ग शोधायला लागलो. 'चला एकाच महिन्याचा तर प्रश्न आहे' या एका भाबड्या आशेवर हे सर्व निमूटपणे सहन केलं.
ट्रेनिंग संपायला आलं होतं. नियुक्तीसाठी प्राधन्यक्रमवारीत पूणे व मुंबई हे दोनच पर्याय मी दिले होते. परतीचं पुण्याचं confirm तिकिटपण तयार होतं. शेवटच्या आठवड्यात नियुक्तीच्या ठिकाणांचे यादी लागली आणि अस्मादीकांचे नाव हैद्राबादच्या यादीत बघून काय स्थिती झाली ती शब्दात सांगणे केवळ अशक्य. तासभर HR वाल्यांशी माथापच्ची करून एकच कळलं की पुणे - मुंबईच्या जागा संपल्यात म्हणून दुसरं जवळच ठिकाण म्हणून हैद्राबादला नियुक्ती केली गेली जी पुढील २ वर्षे बदलता येणार नाही. मनातल्या मनात HR आणि देवाला धन्यवाद देऊन मी तलवार म्यान केली. आमच्या २०० जणांच्या बॅचमधे केवळ ४ नशिबवंताना(३ स्व्खुशीनी व उरलेला मी) निझामाच्या मुलखात वास्तव्याची संधी दिली गेली होती. यापूर्वी माझा व दक्षिण भारताचा संबंध केवळ इडली - दोसा व रजनिकांतपुरताच होता. पण या नियुक्तिमूळे आमचे 'दक्षिणायन' सुरू झाले होते.
'सार याहासे किधरकू जानेका?' मी बाहेर डोकावलं पण एक चिटपाखरूसुद्धा न्हवतं. होते नुसते आलिशान बंगले प्रत्येक बंगल्यात कमीत कमी २ माहागड्या गाड्या रस्त्यावर नावालापण दुकान नाही ना ऑटो. मी हैद्राबादच्या उच्चभ्रु अशा फिल्मनगर मध्ये उभा होतो. शेवटी फिरून परत त्याच जागेवर दोनदा आल्यावर ऑटोवाला संतापला 'क्या तोबी बाता करते सार...आज तो पक्का मेरी बारात निकालते तुमे' शेवटी एका चैकीदाराला पत्ता विचारून कसाबसा ऑफिसच्या अतिथीगृहात पोचलो. दुमजली (बंगला)अतिथीगृह एक्दम झकास होते. मला टेरेसची खोली मिळाली दिमतीला खानसामापण होता. टेरेसवर रपारप पडणर्या पावसात कॉफी पीता पीता दुरवर पसरलेले हैद्राबाद अगदी शांत वाटत होतं.
ही अतिथीगृहाची जन्नत केवळ ३ दिसांपूर्तीच होती त्या आधीच काहीतरी मार्ग काढणं गरजेचं होतं. पण... हैद्राबादमधे कुणीकुणी ओळखीचं नसल्याने आता काय ह प्रश्न होताच. पण तो सुद्धा मार्गी लागला. थोडीफार फोनाफोनी कररून कळलं की माझ्याच कॉलेजातील एक जण इथे हैद्राबादमधे रूजू झाला होता त्याचा नंबर व पत्ता शोधून काढला. कॉलेजमधे असताना हाय हॅलो व्यतिरीक्त कधीच बोलणं न झालेलं नसल्याने सरळ तुझ्या फ्लॅटवर राहायला येऊका हे विचारायाला जीभ वळत न्हवती पण 'करता क्या न मरता'. थोडे आढे वेढे घेऊन त्यानी होकार दिला आणि आमचा मुक्काम फिल्मनगर मधुन आमीरपेटला हलला.
हैद्राबादची नाडी गवसायला फारसा वेळ लागला नाही. हिन्दी जवळपास सगळ्यांनाच कळत असल्याने सर्वात मोठा भाषेचा प्रश्ना सुटला होता त्याला अपवाद केवळ बिल्डींगचे वॉचमन. आपण जितके हिंदीचे सोपे शब्द वापरून बोलायचा प्रयत्न करावा तितके अस्खलित तेलुगू बोलून समोरच्याला कोंडीत पकडल्याचा आसुरी आनंद मी त्यांच्या चेहर्यावर कित्तेकदा बघितलेला आहे.
स्वतःची गाडी नसल्याने शेअर ऑटोने ऑफीसला जाणे ओघाने आलेच. याच शेअर ऑटोंमधून चालकाच्या शेजारी जीव मुठीत धरून प्रवास करता करता जोरजोरात सुरू असलेली तेलुगू गाणी ऐकून हळूहळू तेलुगू सिनेमाच्या गाण्यांचा फॅन झालो. त्या काळात प्रदर्शीत झालेल्या बहुतांश तेलुगू सिनेमातील फेमस गाणी मी मुखपाठ केली होती.तसेच सगळे हिट तेलुगू सिनेमे बघण्याचा सपाटा लावला.
आंध्रामधे सगळी मजाच मजा.प्रत्येक दुसर्या व्यक्त्तीचे नाव श्रीनीवास(उर्फ स्रिनी), प्रत्येक तिसर्या व्यक्तीचे नाव श्रीकांथ किंवा क्रिष्णा असल्याने ऑफीसात खूप गोंधळ उडायचा. खाण्याच्या पदार्थांची नावे पण विचित्र उदा. पप्पु(फोडणीचे घट्ट वरण), पुनुगुलु, बिसी बिल्ला बाथ, टोमॅटो बाथ, कुबानी का मिठा, शाही टुकडा, पेसारट्टू, मैसूर बोंडा, मिर्चीका सालन वगैरे वगैरे. कोणताही पदार्थ ऑर्डर करण्या आधी पहीले दिखाओ फिर खिलाओ हे सुत्र वापरल्यास चांगले. वस्त्यांची नावे हमखास 'पेट' 'पुर'किंवा 'गुडा' या शब्दांनी संपणारी उदा. आमिरपेट, बेगमपेट, हफिजपेट, बल्कम्पेट, कोत्तापेट, युसुफगुडा, नारायणगुडा, हबसीगुडा, लालागुडा, माधापुर, मियापुर, कोंडापुर. सुरुवातीला इथे बर्याच बायकांची केसांची बॉयकट बघुन इथे स्त्रीवर्ग पुढारलेला आहे असा तर्क केला होता पण नंतर कळले की तिरूपतीला केशदान केल्याने इतक्या विपुल बॉयकट बघायला मिळतात.
हळूहळू मित्रांचा ग्रुप जमला दर विकांताला हैद्राबाद पालथे घालणे व हैद्राबादी व्यंजनांचा आस्वाद लुटणे हे आमचे आद्यकर्तव्य बनले. रामोजी, झू, चारमिनार, सालारजंग, बिर्ला मंदीर, लुंबिनी गार्डन, इट स्ट्रीट, दुर्गम चेरूवू, गोवळकोंडा या सर्व स्थळांचा कैक वार्या झाल्या. काहीच नाही तर चलो हैद्राबाद सेंट्रल... खरेदी, पोटपूजा, नेत्रसुख(मी सिनेमा म्हणतोय बरं काय :-)) सब कुछ एकाच जागी.
नाही म्हणायला थोडा भाषेचा त्रास झालाच. काही जागी तेलुगू नसल्याचे कारण दाखवून घर भाड्याने देणे नाकारले गेले तर कधी कधी तेलुगू शब्दांचे अर्थ न कळल्याने गमती पण घडल्या. ऑफेसमधे मित्रांकडून तर ऑफेसला येता जाता रेडिओ ऐकून तेलुगू शिकायला सुरूवात केली होती. शब्द मजेशीर वाटायचे जसे पेर = नाव तर पेरूगू = दही, पालू=दूध, निलू=पाणी, चत्ता = कचरा, चिकू = झाडणी. एखादा नविन शब्द किंवा वाक्य शिकल्या बरोबर लागलीच त्याचा वाक्यात उपयोग करायची खुमखूमी असायची. एकदा असाच बसने प्रवास करताना कंडक्टरला मोठ्या तोर्यात आवाज दिला 'बाबू ओक्क अमिरपेट कावाली'. म्हतार्या कंडक्टने व इतर प्रवाश्यांनी एकदा माझाकडे निरखून पाहीले. कंडक्टरनी तिकिट दिले. थोड्या वेळाने इतर प्रवाश्यांना तिकीटे देऊन झाल्यावर माझ्याजवळ आला व म्हणाला 'तू हैद्राबाद मधे नविन आलेला दिसतोस' 'होय २-३ महिने झालेत' 'हे बघ बेटा, बाबू हे आपल्यापेक्षा वयानी लहान व्यक्तीला म्हणायचे मोठ्यांना, अन्ना किंवा भैय्या म्हटले तरी लोकं समजुन घेतील आणि हो इथे सगळ्यांना हिंदी कळतं' त्याच्या या हितोपदेशानंतर मी अर्थातच तेलुगू बोलण्याचा नाद काही प्रमाणात कमी केला.
जसजसा वेळ गेला तसतसा ऑफीसात कामाचा व्याप वाढला. कधीकधी विकांतालापण ऑफीसात कळ्फलक बडवावा लागू लागला. मित्रांचा ग्रुप जसा बनला होता तसाच हळूहळू तुटला काही कंपनी सोडून गेले, काहींची बदली झाली ,काही ऑनसाइटला गेले. उरलेल्यांची लग्ने झाल्याने ते आपापल्या संसारात रमू लागले.
या हैद्राबादमधे खूप काही पहिलं वहिलं अनुभवलं. पहिला पगार, पहिली स्वतःच्या पैशाने मित्रांना दिलेली पार्टी, पहिली स्वतःची बाइक, टी.व्ही. आणि बरच काही. बघता बघता कधी ६-७ वर्षे या सुंदर शहरात भुरकन उडून गेली कळलच नाही. नियुक्तीचा आदेश हातात पडल्यावर माझी झालेली स्थिती आठवून अजूनही मला हसायला येतं. एकेकाळी परकं वाटणारं हे निझामी हैद्राबाद कधी मला नकळत आपलसं करून गेलं आणि माझा भाऊचा अण्णा कधी झाला कळलच नाही.
प्रतिक्रिया
23 May 2012 - 5:51 pm | प्रचेतस
हैद्राबादेच्या आठवणी ताज्या केल्यास रे. अर्थात फक्त ४ दिवस तिथे असल्यानेफार मजा करता आली नाही.
पण बावर्ची, पॅराडाईझ बिर्याणी, चटनीज्, कराचीची बिस्कुटं, लुंबिनी पार्क, बिर्ला मंदीर, गोवळकोंडा, सालारजंग, चारमिनार इ. ठिकाणी जाता आलं.
अंग्रेज पहिल्यांदा हैद्राबादेतच पाहिला.
अजूनही तिथल्या आठवणी येऊ देत.
23 May 2012 - 5:53 pm | बॅटमॅन
क्या यारो पूरा हैड्रबाड खडा कर दिये आखोके सामने!! अक्कडा ४मिनारलु सलीम फेकूके साथ मिले क्या रे तुम लोगां?
24 May 2012 - 12:07 pm | अमृत
चित्रपट बघून इतका जास्त प्रभावित झालो होतो की मित्रांबरोबर चारमिनार भागात ते हॉटेल शोधत खूप भटकलो. पण नंतर कळलं की ते शूटींग दुसर्याच कुठल्या भागात झालं होतं :-)
त्या चित्रपटातील सर्वाधिक आवडलेलं पात्र म्हणजे अर्थातच सलिमफेकू :-)
अमृत
24 May 2012 - 12:12 pm | प्रचेतस
आपल्याला इस्माईलभाय.
24 May 2012 - 9:09 pm | बॅटमॅन
माझी सर्वात फेव्हरीट पात्रे तीचः सलीम फेकू (चारमिनारचा जॅक स्पॅरो) आणि इस्माईलभाई!!!!!
23 May 2012 - 5:58 pm | सुप्रिया
मस्त! मजा आली वाचायला.
23 May 2012 - 7:15 pm | रेवती
जुन्या आठवणी.
मस्तच!
मी पुन्हा कधीही हैदराबादला जायला तयार आहे.
लेखन आवडले.
23 May 2012 - 7:18 pm | प्रभाकर पेठकर
अतिशय सुरेल लेखन. वाचकांना गुंगवून ठेवण्याची कला अवगत आहे तुम्हाला. ह्या धावत्या वर्णना नंतर एक एक ठिकाणाचे वैशिष्ट्य आणि छायाचित्रांकित लेख यावेत अशी अपेक्षा आहे.
24 May 2012 - 10:50 am | जे.पी.मॉर्गन
> अतिशय सुरेल लेखन. <
+१.
"सुरेल" हा शब्द अगदी योग्य आहे! एखादं सुंदरसं गाणं ऐकल्यावर होतं तसं मन प्रफुल्लित झालं. खूप छान लेख मालक. शब्दांमधला "सच्चेपणा" भावला!
पुढच्या लेखाच्या प्रतीक्षेत.
जे.पी.
24 May 2012 - 1:50 pm | प्रभाकर पेठकर
'सुरेल' शब्दाचे योजन त्याच भावनेतून केले आहे. लिखाणातून जी मनस्विता जाणवते त्यातून एखाद्या गाण्याचे सुरच मनाशी रुंजी घालीत आहेत अशी तरल अवस्था अनुभवास येते.
23 May 2012 - 7:26 pm | चौकटराजा
आन्ना , तुम्ही लोका बसा मधी बसले की नाय ? स्नो वल्ड मधी दोन्शे रुपया घालून फसले की
नाय? रमजान च्या मयन्यात रातभर भटकून खिशाला चाट लावला की नाय? सालारजंग मधली ओलेती बाईचे चित्र पाहून हसले की नाय ?
24 May 2012 - 12:16 pm | अमृत
सुरवातीच्या दिवसात बसमधे पिवळ्या सीट बघून काही कळायचं नाही नंतर कळलं की त्या सीटस् स्त्रीयांसाठी राखीव आहे तसेच सीटच नाही तर अर्धी बस व बसचे पुढचे दार पण :-) १-२ दा पुढल्या दारानी उतरायचा प्रयत्न केला पण वाट काढताना आई-बहीणींनी दिलेल्या दुवांमुळे तो प्रयत्न हाणून पाडला गेला. बाकी इतर प्रश्ननां काय उत्तर देणार फक्त :-)
अमृत
24 May 2012 - 7:35 pm | रेवती
शिनुमाची तिकिटं काढायला अजूनही बायकांची व पुर्षांची वेगळी रांग असते काहो?
दोन दिवसात तेलुगु शिका नावाचे पुस्तक माझ्या वडीलांनी आणून दिले होते.
ते पाहून बसवर काय लिहिलय हे समजेपर्यंत बस निघून जायची.
बाबा तर रोज घरकामाला येणार्या बाईकडून दोन दोन मुळाक्षरं शिकायचे.
मला तर सगळी अक्षरं आधी सारखीच वाटायची.
एकदा आठवणी सुरु झाल्या की धबधब्यासारख्या कोसळतात.
25 May 2012 - 1:45 pm | अमृत
वेगळी रांग नसते पण इतर चित्रपटगृहात मात्र असते. बाकी मी तेलुगू लिपी शिकण्याच्या मागे लागलो नाही कारण त्याचा निकाल आधीच माहिती होता. :-)
अमृत
23 May 2012 - 7:39 pm | जोशी 'ले'
क्रमश: राहिलयं का?..
मस्त लिहलय :-)
23 May 2012 - 7:44 pm | पैसा
"क्रमशः राहिलंय काय" असंच वाटलं!
23 May 2012 - 8:56 pm | मेघवेडा
अमा मियाँ.. बहोते अच्चा लिक रेले तुम.. ओर पार्ट होना..
2 Jun 2012 - 3:59 am | नंदन
असेच म्हणतो. अधिक विस्ताराने वाचायला आवडेल.
24 May 2012 - 8:18 am | स्पंदना
ऐसा लगताय अण्ण तुमना खुंदल खुंदल के मारा ये हैदराबादने। अब छोडनेकु जी नही करता होयेगा ?
24 May 2012 - 8:48 am | ५० फक्त
मस्त लिहिलंय, या सुट्टीत जायचा विचार आहे, तुमचं मार्गदर्शन घेईनच.
24 May 2012 - 12:17 pm | अमृत
सर्वतोपरी मदत करायला तयार आहे.
अमृत
24 May 2012 - 12:43 pm | विसुनाना
अमृतअन्ना (अमृतबाबू म्हणणार होतो...), आमच्या हैद्राबादमधील तुमच्या वास्तव्याचा धावता लेखाजोखा आवडला. :)
स्वतःच्या गावाबद्दल लोक ते गाव सोडल्यानंतर लिहितात.
नव्या वास्तव्याच्या गावाबद्दल लोक त्या गावाची बर्यापैकी ओळख झाल्यावर लिहितात.
आम्ही दोन्हीतही मोडत नसल्याने हैद्राबादबद्दल लिहीत नाही. ;)
24 May 2012 - 1:10 pm | स्मिता.
लेख छान झालाय, आवडला. आमची अशीच गत बंगलोरात झाली होती. सुरुवातीच्या वर्षात तिकडून पळून यावसं वाटत असतांना हो-नाही करत तिथे चार वर्ष कशी गेली आणि बंगलोर माझं कधी झालं ते कळलंच नाही. सोडून येतांना अगदी रडायला आलं होतं.
उगाच अवांतरः त्रिवेंद्रमला ट्रेनिंग म्हणजे तुम्ही टिसीएस मधले दिसताय.
24 May 2012 - 1:52 pm | निखिल देशपांडे
अमृतराव...
छान लिहिलंत...
बाकी एक महिन्याचं त्रिवेंद्रमच ट्रेनिंग आणि एच आर ने घातलेला घोळ बघून एक कंपनी चटकन डोळ्यासमोर उभी राहिली.
25 May 2012 - 1:48 pm | अमृत
:-)
अमृत
24 May 2012 - 2:27 pm | टिवटिव
मस्त! मजा आली वाचायला. छान लिहिलय...
२ वर्ष होतो हैद्राबाद ला पण कधि बोर झाला नाही...अर्थात घर फक्त ५ तासांवर हेहि एक कारण होतं...
24 May 2012 - 2:53 pm | पियुशा
मस्त लेख :)
24 May 2012 - 4:28 pm | सूड
सुंदर लेख !!
( कधीकाळी नावं ठेवलेल्या शहराच्या प्रेमात पडलेला) सूड
2 Jun 2012 - 8:06 pm | विश्वनाथ मेहेंदळे
बा*** **द :-)
24 May 2012 - 10:00 pm | पिवळा डांबिस
सुरेख वर्णन.
लेख आवडला!
हैद्राबादला जाण्याचा कधी प्रसंग आलेला नाही, पण कधीतरी जायला आवडेल...
25 May 2012 - 1:52 pm | पप्पुपेजर
माझी पण हैद्राबाद मधली २ वर्षे कशी निघून गेली माहितच पडली नाहीत ...खूपच सुंदर लिखाण !!!+१
रात्री अपरात्री नेकलेस रोड वरून मारलेल्या बाईक राईड्स अजून हि विसरल्या जात नाहीत :)
25 May 2012 - 1:54 pm | मृत्युन्जय
मस्त.
25 May 2012 - 1:55 pm | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम! बेष्ट! मजा आलीच. माझाही हैद्राबादमधला छोटा पण मस्त मुक्काम आठवला. तिथल्या त्या आंध्रा मेस... तो भाताचा डोंगर... वा! अजून बरंच काही लिहायला स्कोप आहे हां! आणि तुमची शैलीही मस्त आहे. लिहा हो!
25 May 2012 - 1:58 pm | यकु
खूपच सुंदर लिहिलंय.
पिडांकाकांसारखंच म्हणतो, हैद्राबादला जाण्याचा कधी प्रसंग आलेला नाही, पण कधीतरी जायला आवडेल... :)
25 May 2012 - 2:02 pm | दिपक
सुंदर !!! पहिल्या वाक्यापासुन शेवटपर्यंत पकड घेणारे लिखाण. अजुन आले असते आवडले असते. :-)
2 Jun 2012 - 8:30 am | शिल्पा ब
आवडेश.