सह्याद्रि वाहिनीवर अमित वैद्य या पुणे स्थित कलाकाराची अॅकॉर्डियन वादनाची झलक दाखविणारी मुलाखत पाहिल्यानंतर वर्तमानपत्रात अशाच कार्यकमाची जाहिरात ही पहायला मिळाली.व कार्यक्रम विनामुल्य असल्यामुळे चिंचवड ते पुणे असे अंतर काटण्यास मन लगेचच तयार झाले. मोदक पुण्यातून आपले काम आटपून कार्यक्रमाच्या जागी भेटणार होता. मी दुपारी साडेतीनच्या सुमारास निघालो. रविवार
असल्याने रस्त्यावर रहदारी बेताचीच. साडेचार चे सुमारास पुण्यात पोहोचून मग डेक्क्नवर इकडे तिकडे भटकत टाईम पास चा कार्यक्रम केला.व नव्यापेठेतील गांजवे चौकात आलो. पत्रकारभवन शेजारी कार्यक्रम होता म्हणून अंदाजानेच एका इमारतीत घुसलो,. तिथे काही माणसे लगबगीने जिना चढून जाताना दिसत होती. मी खाली वावरणाच्या एका कर्मचार्यास विचारले " निवारा " हॉल वरच आहे ना : त्याने खुणेनेच रस्ता दाखविला. एका हॉल मधे गेलो. तर तिथे मंचावर मागे बॅनर लावले होते " सुधारक मुस्लिम समाज " व काही माणसे पहिल्या एक दोन ओळी व्यापून बसली होती. "काही तरी तारीख वगैरे बघायला आपली चुकली की काय?" अशी शंकेची पाल मनात चुकचुकली. तेवढ्यात एक जण टिपिकल वादकाचा पोषाख घालून आला व त्याने एक दार उघडले. मी त्याच्या पाठोपाठ आत घुसलो तिथे ही एक सभागृह होते. बॅनर होते " गाणी तुमची आमची ० सीडी प्रकाशन " म्ह्टले च्यायला हे काहीतरी भलतंच झालंय . म्हणून पुन्हा खाली आलो व त्या मघाचच्या माणसाला पुन्हा विचारले " अहो. अॅकॉर्डियन वादनाचा कार्यक्रम इथेच आहे ना ? त्याने मी काय बोललो याचा अंदाज घेऊन तो मला एकदम म्हणाला - मी बहिरा आहे !
मग पुन्हा तेथील हपिसात गेलो व समजले मला हवी असलेली जागा ती नाही . पण त्या लोकानी कसे जायचे ते सांगेतले व मी साडेपाचच्या सुमारास " निवारा हॉल" या इच्छित स्थळी पोहोचलो. पुढच्या दोन तीन रांगा भरलेल्याच होत्या. पन्नाशी, साठी उलटलेली माणसे एकटी वा सपत्निक आलेली दिसत होती. मी लगेचच मोदकला फोन लावला व मी जागा धरतो. तू लवकर ये असे सांगितले तसे अत्रुप्त आत्मा व ते असे दोघेजण पाचेक मिनिटात पोह्चत आहेत ई माहिती त्याने दिली.
मंचावर श्री अमित वैद्य हे व त्यांचे सहकलाकार यांची लगबग चालू होती. हळू हळू दर्दींची गर्दी वाढू लागली
तेवढ्यात रा रा मोदकराव व ह भ प अ आ गुर्जी आले. व त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या खुर्चीत स्थानापन्न झाले. " आताच " चचा" ला स्टेशनवर सोडून आलो " इति मोदक राव. मग अ आ विचारते आले " ते त्यानी हातात घेतलेलं ते वाद्य कोणतं आहे. आता गुर्जी माझी फिरकी मारताहेत हे मला कळत नव्हतं का ? पण मी ही निष्पाप चेहरा करून " त्याला अॅकॉरर्डियन म्हणतात " अशी अनमोल माहिती पुढे केली
कार्यक्रमाला सुरूवात म्हणून वसंत बापट यांचे नितांत सुंदर " गगन सदन तेजोमय " ही प्रार्थना निवडली होती. मूळ गीतात नसलेल्या काही आकर्षक जागा घेत सौ केतकी अमित वैद्य यानी बहार आणली. त्या स्वत: " टोमॅटो" या विषयावर पी एच डी करत आहेत व संगीत विशारद आहेत ही माहिती अमित यानी दिली.
मग कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री केर्सी लॉर्ड यांची ओळख करून देण्यात आली. ते तबला पेटी शिकत , निष्णात अॅकॉरर्डियन वादक असे झाले. इथपासून भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ व अनमोल योगदाना बद्द्ल त्यांचा प्रवास " दादासाहेब फाळके " पारितोषिकापर्यंत चा उलगडून दाखविण्यात आला.
त्यांच्या हस्ते मग दीपप्रज्वलन होऊन
http://a8.sphotos.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash4/398232_377899862246518_10..." width="800" height="600" alt="" />
केर्सी यांचा देऊन स्वागत सत्कार करण्यात आले
http://a4.sphotos.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash3/526073_377900665579771_10... " width="800" height="600" alt="" />
त्यांच्या हस्ते मग विविध कलाकारांचा ही सत्कार झाला.
कार्यक्रमास खर्या अर्थाने सुरुवात झाली.
फ्रेंच म्युझिक कॅफे या संगीत संस्कृतीची झलक दाखविणार्या " इन डिफरन्स : या हळूवार रचनेने अमित यानी सुरवात केली.
त्यानंतर १८२९ मधे जन्मलेल्या माउथ ऑर्गनच्या ( जन्म १८२३ ) या वयाने लहान पण आकाराने मोठ्या भावंडाचा म्हणजेच अॅकोर्डियन या वाद्याचा वैद्य यानी उगम ते आजचे अॅकोर्डियन असा प्रवास कथन केला. एका बाजूला स्वरपट्या मधे हवा भरण्यासाठी बेलो व डाव्या हाताने कॉर्डस ( एका पेक्शा अधिक सूर एका वेळीस वाजविणे) ची एकशे वीस बटणे असे हे वाद्य सुमारे दहा किलो वजनाचे असते. काही वादक उभ्याने वाजवत असले तरी बरेचसे वादक ते मांडीवर घेऊन वाजवितात. मधल्या बेलोच्या भागावर काही उपकरण जोडून , पिकोलो, ओबो, क्लरेनेट,ई सात आठ वाद्यांचा स्वरधर्म यातून काढता येतो.(change of tone ) .
भारतीय अॅकोर्डिनिस्ट चे पितामह म्हणून श्री गुडी सिरवाई यांना मानले जाते..आपण जर बार बार देखो हे चायना टाऊन मधील गीताचा विडिओ पहाल तर त्यात मागच्या ऑर्केस्ट्रात अॅकोर्डियन वाजविणारे चस्मिस गृहस्थ म्हणजे गुडी आहेब.यानी त्या जमान्यातील जवळ जवळ सर्वांकडे हे वाद्य वाजविले होते.त्याना सलाम म्हणून चांद खिला वो तारे हंसे, आवारा हू ई गीते अमित यानी वाजविली.
अमित यानी मग पाश्त्यात्य संगीत पद्धती भारतात कशी रुजली हे विशद केले.कोलकता ही ब्रिटीशांची आद्य राजधानी असल्याने तिथे प्रथमम प्रसार झाला . पण दुसरी शाखा या संगीताचा वारा घेऊन गोव्यात उतरली.त्यामुळे बंगाल भागातील एस्डी आरडी, सलीलदा, अनिल विस्वास याना पाश्च्यात्य संगीत कलेचे ज्ञान झाले, उत्तरेतील नौशाद, नय्यर, मदनमोहन , प्यारेलाल ,यानी हे ज्ञान गोव्याकडून आलेले अंथनी गोन्साल्वीस किंवा सबॅस्टीयन डिसूझा यांचाकडून घेतले. सुफी संगीत ,भारतीय धुपद धमार ते ख्याल अशा एका उत्कांत कला शाखेचा पाश्चात्य कलेशी झालेला संगम म्हणजे आपले हिंदी फिस्म संगीत,
यातही पूर्वी प्रथम टप्यात मुख्या चाल main melody) j जशी सरकायची तसाच मागचा वाद्यमेळ वाजायचा. नंतरच्या टप्यात ( हा टप्पा बराच काळ टिकला) मुख्य चाल व तिला आधारास पात्र अशी हारमनी मागे वाजत असे.पुढच्या टप्प्यात दोन स्तर हारमनीचे एक मेन मेलडीचा व एक काउंटर मेलडीचा असा प्रकार चालू झाला. व हा प्रकार शंकर जयकिशन व एल पी यानी मोठ्या प्रमाणावर वापरला
याचे उदाहरण म्हणून वैद्य यानी दिलके झरोकोमे तर त्यांचे शिष्य ( त्यांच्या पेक्शा वयाने मोठे असलेले) श्री नवाथे यानी कौन है जो सपनोमे आया हे गीत वाजवून टाळ्यांच्या गजराला निमंत्रण दिले.
तत्पूर्वी वैद्य यानी ऑर्केस्ट्रा म्हणजे वाद्यव्रंद वाजवायची जागा असा या शब्दाचा मूळ अर्थ सांगितला. व त्याचे प्रकार म्हणजे
सिफंनी, कनसर्ट,चेंबर , कोरल ( कंठवृंद ),, ऑपेरा( संगीत नाटक) , बॅले ( संगीतसह नृत्य) वगैरे आहेत हे कथन केले. नंतर निरनिराळ्या हॅटस म्हणजे निर्निराळ्या वृत्ती असे कल्पून किशोर कुमार साठी हाफ तिकट मधले , राजकपूर साठी जागते रहो मधील जिंदगी ख्वाब है, देव साठी अच्छा चलो जी मै हारी ( नाजूक नायिका हळॉवार पणे तर ताठा नायक जोरकस पणे बेलोचा वापर करीत) गुरूदत्त साठी बाबुजी धीरे चलना व " आशा" वादी नय्यर साहेबांसाठी हावडा ब्रीज मधले आईये मेहरबान हे गीत " ये "ह्या अक्षरावरील आंदोलनासकट वाजविले.
भारतातील पाश्च्यात्य संगीत व भारतीय राग यांच्या मेळाचे प्रतिनिधी म्हणजे दिनकर अमेंबल व सलील चौधरी. वरील चित्रात सलीलदा
व उजव्या कोपर्यात सलीलदांचे आयकॉन मोसार्ट.
स्ररते शेवटी " मूळ कथा परकीय" असे खास विशेष असलेल्या कल्पक आरडी साठी चला जाता हू मेरे ही धुनमे.... हे गीत सौ केतकी,चिरंजीव वैद्य व वनमॅन ऑर्केस्ट्रा वर साक्षात अमित वैद्य यानी सादर केले.
हाउस फुल सभागृह आता हळू हळू रिकामे होउ लागले. मी स्वतः वैद्य यांच्या डाव्या हाताशी मुद्दाम पणे करीत " डावा हात डावा नसतो" या माझ्या मल्लीनाथीचा अर्थ त्यांच्या लक्शात आल्यावर "मलाही या डाव्या शेकहॅड मधे आनंद आहे "असे श्री अमित हंसत म्हणाले. ( डाव्या हाताने १२० बटणांवर कॉर्डस वाजविणाराच खरा अॅकॉर्डियनिस्ट असतो) .
जाता जाता- श्री मान राजश्री अत्रुप्त आत्मा यानी मिपावर रिपोर्ट साठी श्री अमित वैद्य यांची परवानगी घेतली. मी 'दादासाहेब फाळके 'विजेते श्री केर्सी लॉर्ड याना वाकून नमस्कार केला व त्याना हळूच विचारले
"ओपीबरोवर कॅस्टानट वाजविणारे कावस आपले कोण ? " माय फादर " असे पटकन ते म्हणाले. आय हॅव आस्लो वर्कड फॉर ओपी,:केर्सी पुढे म्हणाले, एका मित्राच्या कृपेने केर्सी महाशयांबरोवर मी असे प्रकाशचित्र काढून घेतले.
बाहेर आलो, मोदक व अ आ बरोबर स्माएल्या आवरा वगैरे वर हास्य गप्पा झाल्या व तिघेही मार्गस्थ झालो. चिंचवडला येताना गाडीवरच शिटी वाजवून गाउ लागलो ....कौन है जो सपनोमे आया....... कौन है जो दिलमे समाया....... खरंच आजच्या संध्याकाळीने मनात घर केले खरे.
प्रतिक्रिया
7 May 2012 - 4:54 pm | प्रचेतस
वृत्तांत झकास.
बाकी 'इहलौकिक जग हे अर्धसत्य आहे' असे म्हणत येणारे पारलौकिक जगातील अत्रुप्त आत्मे सध्या ह्याच इहलौकिक जगातील गाण्यांमध्ये भलताच रस घेऊ लागलेले दिसतात.
7 May 2012 - 5:28 pm | अत्रुप्त आत्मा
@बाकी 'इहलौकिक जग हे अर्धसत्य आहे' असे म्हणत येणारे पारलौकिक जगातील अत्रुप्त आत्मे सध्या ह्याच इहलौकिक जगातील गाण्यांमध्ये भलताच रस घेऊ लागलेले दिसतात. >>> आंम्ही अर्ध्या सत्याशी नेहमीच प्रामाणिक रहात असतो,मग ते इहलोकातील असो,वा परलोकातील
चौरा-काका-रिपोर्टींग छान झालय... रेकॉर्ड केलेला कार्यक्रम लवकरच अप्लोडवतो :-)
7 May 2012 - 7:34 pm | चौकटराजा
माझ्या कड्च्या ५ mp4 youtube वर अप्लोड होत नाहीयेत . तुम्ही टाका !
7 May 2012 - 5:34 pm | यकु
लेख झकास आहे.
अर्थातच त्यातल्या खाचाखोचा माहित नाहीत म्हणून नुसताच वाचला - जुन्या संदर्भांमुळे फारसं काही कळलं नाही.
7 May 2012 - 5:36 pm | बहुगुणी
वृत्तांत इतका चांगला आहे की कार्यक्रम सदेह अनुभवता आला नाही याचं वैषम्य वाटलं नाही. प्रत्यक्षात या कलाकारांना in action पहायचं जमेल तेंव्हा जमेल, तोपर्यंत त्यांच्या सीडीज कुठे मिळतील याची काही मिळाली तर आवडेल.
चौकट राजे साहेबः वृत्तांकनाबद्दल धन्यवाद!
7 May 2012 - 5:39 pm | निश
चौकटराजा साहेब, अतिशय मस्त माहीति दिलीत.
अॅकॉर्डियन कसे असते ते माहीत होते. पण त्याची माहिति आज कळली त्या साठी तुमचे मनापासुन आभार.
7 May 2012 - 7:30 pm | मराठी_माणूस
खुप छान.
7 May 2012 - 7:34 pm | अन्या दातार
छान वृत्तांत.
त्या गांजवे चौकात असलेल्या २-३ जागांमुळे कार्यक्रम कुठे आहे याचा अनेकदा गोंधळ होतो. यामुळेच लोक गांजून जातात म्हणून त्या चौकाला गांजवे चौक म्हणतात का हो??
(गांजवे चौकात गांजलेला) अन्या
7 May 2012 - 8:32 pm | प्रदीप
एका चांगल्या कार्यक्रमाची, तसेच अॅकॉर्डियनविषयी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
पुण्यात अलिकडेच 'अॅकॉर्डियन फॅन क्लब ऑफ पुणे' तर्फे, शंकर ह्यांच्या २५ व्या पुण्यतिथीच्या निमीत्ताने, शंकर- जयकिशन ह्यांनी हिंदी चित्रपट संगीतासाठी वापर करून अजरामर केलेल्या अॅकॉर्डियन्सच्या गीतांचा कार्यक्रम साजरा झाला. त्याचा नेटका वृत्तांत इथे वाचावा:
http://www.indianexpress.com/news/strung-together/944721/1
ह्या क्लबचे एक संस्थापक नितीन देशपांडे हे गृहस्थ आहेत. त्यांच्या पत्नि शिबानी, ह्यांनी हा कार्यक्रम व्हावा ह्यासाठी बराच पुढाकार घेतला होता, दुर्दैवाने एक महिन्यापूर्वी त्यांचे अपघाती अकाली निधन झाले. तरीही श्री. देशपांडे ह्यांनी कार्यक्रम नेटाने पार पाडला.
शंकर- जयकिशनच्या संगीताने भारावलेल्या मुंबईतील वसंत खेर, कृष्णकुमार गावंड ह्या दोघा तरूणांनी ७६ साली झपाटा ह्या त्यांच्या संस्थेतर्फे 'सिंफनी' हा केवळ शं-जंच्या गीतांचा ऑर्केस्ट्रा निर्मीला. त्याचे तेव्हा अनेक गावोगावी सुमारे ३०० प्रयोग झाले. ह्या निर्मीतीचे एक प्रमुख सूत्रधार वसंत खेर ह्यांचे गेल्या महिन्यात मुंबईत अल्प आजाराने अकाली निधन झाले.
दिनेश घाटे, अरून पुराणिक, शंकर अय्यर इत्यादी काही उत्साही माणसांनी 'स्वर आलाप' ही संस्था मुंबईत गेल्या काही वर्षांत स्थापन केली आहे. ५० ते सुमारे ९० च्या दशकांतील हिंदी चित्रपट संगीतासाठी ज्या अनेक वादकांनी त्यांच्या कलाकारीने सजवले, त्यांच्या कार्याचे डॉक्युमेंटेशन करणे, तसेच त्यांचे सत्कार घडवणे, त्यावेळी शक्य असल्यास त्यांच्या जाहीर मुलाखती घेणे, अशी कामे ही संस्था करत आलेली आहे. 'The Unsunag Heroes' हा त्यांचा काही वादकांच्य मुलाखतींचा समावेश असलेला ग्रंथ आता उपलब्ध आहे.
मुंबईतच नित्यनेमाने मनोहर अय्यर नावाचे गृहस्थ 'Keep Alive' हा जुन्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम सादर करतात. मला वाटते, दोन महिन्यातून त्यांचा एक कार्यक्रम असतो, प्रत्येक कार्यक्रम नव्या विषयावर आधारीत असतो, त्याचाही अलिकडे बराच बोलबाला झाला आहे.
8 May 2012 - 7:07 am | ५० फक्त
उत्तम रिपोर्ट, मोदकचा फोन आला होता पण जमणार नव्हतं, त्यामुळं मिस केलं असं वाटतंय. बाकी तुम्ही मजा केली असं दिसतंय.
8 May 2012 - 12:52 pm | परिकथेतील राजकुमार
असे अनेक शब्द मम हृदयास खुपले. मातृभाषेत लिहावे अशी विनंती.
8 May 2012 - 4:38 pm | चौकटराजा
मधे चौ रा , एका बाजूने मन्या फेणे व दुसर्या वाजूने परा चौरांची रस्सीखेच करताहेत अशी स्माईली टाका.
8 May 2012 - 4:43 pm | चौकटराजा
आपल्या चषम्यातून किलो व डेक्कन हे शब्द कसे सुटले. की या शब्दांचा जन्म कसब्यातील पारावर झाला ?
8 May 2012 - 1:52 pm | मुक्त विहारि
छान लिहिला आहे व्रुत्तांत...
8 May 2012 - 4:43 pm | मदनबाण
छान वॄत्तांत ! :)
8 May 2012 - 8:15 pm | तिमा
अॅकॉर्डियन हे माझे आवडते वाद्य आहे. ते शिकण्याचा एक अयशस्वी प्रयत्नही मी केला होता. पुण्यात असतो तर कार्यक्रम नक्कीच चुकवला नसता.
लेख माहितीपूर्ण.
9 May 2012 - 8:29 am | सुहास झेले
अप्रतिम वृत्तांत... कार्यक्रम मिसलो :(
:) :)
9 May 2012 - 12:02 pm | संजय क्षीरसागर
तुम्ही आणि अआनी धमाल आणली आहे, मनःपूर्वक धन्यवाद!
9 May 2012 - 1:09 pm | सस्नेह
सुरेख वृत्तांत अन अॅकॉर्डिअन या वेगळ्या वाद्याचा परिचय. ! अ. आ. यांच्या लेखातून अधिक तपशीलवार परिचय करून घेऊन तपशीलवार प्रतिक्रिया देत आहे. धन्यवाद.
10 May 2012 - 4:04 pm | अत्रुप्त आत्मा
चौ.रा. काका- माझी रेकॉर्ड केलेल्या कार्यक्रमाची लिंक इथे देऊन ठेवतो हो...
म्हणजे इकडे आलेल्यांपैकी ज्यांना प्रोग्रॅम ऐकायचाय,त्यांना ऐकता येइल.. :-)
http://www.misalpav.com/node/21601