कडाक्याच्या थंडीमुळे रिक्षाचालकाचा मृत्यु

बरं झालं आत्ताच रिक्षा रिझर्वला लागली ते. नायतर आतमध्ये पॅसेंजर बसलेले असतांना रिक्शा रिझर्वला लागली म्हणजे पॅसेंजर नको ते उगाच बोलतात. इतर ठिकाणी टाईमपास करत तासभर थांबतील पण रिक्षा रिझर्वला आली की पेटोलकॉक रिझर्वकरेपर्यंत देखील थांबायची त्यांची तयारी नसते. आता रात्रीचे दहा वाजत आले आहेत. पटकन जवळचा कांतीशेटचा पेट्रोलपंप बंद व्हायच्या आता पेट्रोल भरून घेतलं पाहीजे. नाहीतर उगाच लांब हायवेला जावून पेट्रोल भरावे लागेल. अन टाइमाची खोटी होइल ते अलग. रात्री अकराची लोकल सापडली पाहीजे. त्यात बरेच पॅसेंजर मिळतात लांब लांब जाणारे.

आज सुपरवायझर राणे उगाचच तणतणत होता. म्हणे जॉब कमी निघाले. हॅ. जॉब काढणे म्हणजे पोरं काढणं आहे का? घातला की निघाला? साला, मॅनेजमेंटचा पंटर. कामकाज येत नाही लाळघोटेपणा करून मोठा झाला. तरी बरं फिटर सलिम माझ्या बाजूने बोलला. नायतर उगाचच मेमो देत होता तो भडवा. अरे तुला जॉबची एवढीच काळजी आहे तर उभं रहा म्हणावं शॉप फ्लोअरवर, अन चालू कर लेथ मशीन. मग बघ काय होते ते. सालं एकतर स्टोअरमधून रॉ मटेरीयलही आपणच काढून आणा. त्यात त्याची काही मदत होत नाही. आपणच उगाच इतरांची कामं करतो. उद्यापासून असली सामाजीक विकासाची कामं बंद केली पाहीजे.

हा पहा डोक्यात विचार करता करता पेट्रोल पंप आला.

"काय रघू, थंडी काय म्हणते बाबा? तुझं काय पेट्रोल जाळलं की उबच उब."

"काय रामभाऊ? पंप जाळायचा काय आम्हाला? अन आज उशीर केला तुम्ही यायला?"

"लांब निगडी-प्राधिकरणातलं भाडं होतं. त्याला सोडून आलो. दिडशे ऑईल टाक अन तिन लिटर पेट्रोल टाक. ह्या बाटलीत अर्धा लिटर दे. जवळ असलेलं बरं. लवकर आवर अकराची लोकल यायची वेळ होईल. अजून मला चिंचवड रेल्वे स्टेशनवर पोहोचायचं आहे."

"जाल हो. हे काय झालंच."

"हे घे पैसे. चल दे बाकीचे पैसे लवकर. तुलाही पंप बंद करायचा असेल अजून."

"हो ना. हे घ्या उरलेले १२ रुपये परत."

चला. आता कुणी पॅसेंजर मिळते का ते बघू नाहितर सरळ रेल्वे स्टेशन पर्यंत जातो. गिर्‍हाईक मिळालं पाहिजे. उगाच खाली रिकामी रिक्षा फिरवण्यात काही पॉइंट नाही. पेट्रोल काय वाढलं आहे. रिक्षा काही परवडत नाही. त्यात पुन्हा मेंटेनंन्स अन पोलीस आहेतच. नको तेव्हा पकडतात.

"काय रामभाऊ, आज थंडी तर फार वाढलेली दिसते आहे" रेल्वे स्टेशनवर रमेश खंदारे या रिक्षावाल्याने मला आवाज दिला. हा खंदारे बोलून चालून बरा माणूस आहे. भेटल्यावर बोलतो तरी.

"बोला खंदारे, काय म्हणता? आज बराच धंदा केलेला दिसतोय?"

"नाही हो भाऊ. सकाळी थोडाफार झाला. पण दुपारी घरीच जावं लागलं. मुलगा फार तापला होता. मग त्याला घेवून दवाखान्यात वेळ गेला संध्याकाळपर्यंत. सकाळी झालेली कमाई दवाखान्यात अन औषधपाण्यात गेली. आता बघतो वाट शेवटच्या लोकलची अन निघतो घरी मग. तुम्ही काय नाईट मारणारे लोकं. त्यात तुमची नोकरीही चांगली चालली आहे."

"नाही रे बाबा, आम्ही छोट्या कंपनीत कामं करतो. एकदम बजाज-टेल्को नाही काही. आहे ती नोकरी टिकवायची अन संसार चालवायचा. उगाच नाही रात्रीही जागायची हौस कुणाला असते? पण रिक्षाचा आधार आहे हे नक्की."

"लोकल आली वाटतं. मी मिळेल ते भाडे घेतो अन पळतो."

माझीही तिच इच्छा आहे बाबा. पण मला सकाळपर्यंत थांबून धंदा करण भाग आहे. पैशाचा प्रश्न आहे. बघूया आज किती मिळतात ते.

आता कुणी रिक्षात येईल तर थोडाफार आधार तरी होईल आजच्या दिवसाला म्हणजे रात्रीला. पण येवढ्या मरणाच्या थंडीत कोण कशाला येईल? आपण वाट तर बघू. नाहीच मिळालं गिर्‍हाईक तर रिक्षातच झोप घेवू. पहाटेच्या गाडीतून येणार्‍या प्रवाशांची वाट पाहत थांबू मग.

अरे ह्या दोन बायका इकडेच येताहेत. त्यांनाच विचारू.

"बोला ताई, कुठे जायचं आहे?"

"भोसरी"

"भोसरीला पण कुठे जायचं आहे?"

"आदर्श नगर. नाशिक रस्त्याला आहे."

"अरे बापरे ते तर फारच लांब आहे, ताई. डबल भाडं द्यावं लागेल. ४०० रुपये होतील. नाहितर आसं कराना, तुम्ही नाशिक फाट्यावर उतरा अन तेथून PCMT पकडा. शेवटच्या पाळीसाठीच्या गाड्या मिळतील अन तुम्हालाही परवडेल ते."

"आम्हाला आदर्श नगरच्या थोडं आत जायचं आहे. दगडांच्या खाणी आहेत तेथे. तेथपर्यंत बस जात नाही अन आदर्श नगरहून इतक्या रात्रीच्या रिक्षाही मिळत नाही खाणींपर्यंत जायला. म्हणून आम्ही नेहमी रिक्षानेच जातो. तुम्हाला यायचे असेल तर सांगा नाहीतर आम्ही दुसरी रिक्षा बघू."

"तसं नाही ताई. मला तर धंदा करायचाच आहे ना. त्यासाठीच येवढ्या रात्रीचा उभा आहे रिक्षा घेवू. बोला तुम्ही काय देणार?"

"हे बघा काका, ३५० रुपये घ्या अन लवकर चला. आम्हाला घाई झालेली आहे."

ही तरूण स्त्री जास्तच बोलणारी दिसते आहे. वयस्कर स्री घासाघीस करत नाही अन ही करते आहे.

"अहो ताई, एकतर रात्रीची वेळ आहे, अन तुम्हाला आदर्श नगरच्याही आतमध्ये जायचं आहे. मी सांगीतलेले भाडे एकदम बरोबर आहे. इतर रिक्षावाले असते तर त्यांनी ४५० रुपयांच्या खाली ऐकलेही नसते."

"बरं बरं चला निघूया आता. फक्त रिक्षा लवकर चालवा अन आम्हाला घरापर्यंत सोडा."

चला बरेच लांबचे भाडे मिळाले. दोन्ही बायकांमध्ये एक तरणी आहे अन एक वयस्कर आहे. काय नाते असावे बरं यांचे? अन त्यांच्याकडे सामानदेखील नाही. फक्त दोघींकडे पर्स आहेत. दोघींचे कपडे देखील पांढरे सफेद आहेत. कोणत्यातरी बाबाच्या नादी लागलेल्या दिसतात. अंगावर दागदागीने जवळपास नाहीतच. हल्ली काय दागीने तर घालतच नाही, अन असले तरी ते नकलीच असतात. बहूतेक आई अन मुलगी दिसत आहेत. न जाणो कदाचीत सासू सुनदेखील असू शकतात. जावूद्या आपल्याला काय नसत्या चौकशा. आपली रिक्षा चालू करून त्यांना सोडून यावे हेच उत्तम. हि शाल अंगावर पांघरून घेतो अन ह्या माकडटोपीचा फार उपयोग होतो असल्या थंडीत. आश्चर्य आहे, एवढ्या थंडीतही ह्या दोघींनी काहीच कसे पांघरले नाही?

"काहो ताई, एवढी थंडी आहे, पण तुम्ही काहीच कसे पांघरले नाही? अंगावर स्वेटरदेखील नाही."

"अहो रिक्षावाले तुम्ही पुढे बघून रिक्षा चालवा ना. आम्हाला काही थंडी वाजत नाहीये अन वा़जणारही नाही. तुम्ही नसती काळजी करू नका आमची."

हि पोरगी फार आगावू दिसते आहे. माणूसकी म्हणून विचारले तर म्हणते थंडी वाजत नाही. तरूण रक्त आहे म्हणून. पण ह्या वयस्कर स्रीलाही थंडी नाही वाजत? फारच आश्चर्य आहे. जावूद्या. आपल्याला काय त्याचे. आपली रिक्षा बरी अन आपण बरे.

पण मला या दोघींचे आश्चर्य वाटते. त्यांना भोसरीला जायचे होते तर पिंपरी स्टेशनला का नाही उतरल्या ह्या? अन डायरेक इतक्या लांब रिक्शा? जावूद्या. आपल्याला काय भाडे मिळाल्याशी मतलब. अन आजकाल पुण्यात पैसेवाले लोकं जास्तच झाले आहेत. मन मानेल तितके कमावतात अन उडवतात देखील तितकेच. त्यांच्यामुळेच आपल्यासारख्यांना दोन पैसे मिळतात म्हणा. चला आपण आपली रिक्षा चालवू निट.

काही काही पॅसेंजर फार मवाळ असतात अन काही काही फार मवाली असतात. आपण रिक्षा चालवतांना असल्या अनेक नमुन्यांना बघतो. अर्थात त्या प्रवाशांनादेखील आपल्या रिक्षावाल्यांचे नमुने पहायला मिळतात म्हणा. काही रिक्षावाले फसवतात. रात्री बेरात्री असल्या वेळी रिक्षातून ह्या दोन बायकांनी रिक्षातून प्रवास करणे म्हणजे फारच डेरींग आहे. माझ्या जागी एखादा लुबाडणारा रिक्षावाला देखील त्यांना भेटू शकतो. त्या बदनाम रिक्षावाल्यांमुळे इतर चांगल्या रिक्षावाल्यांचे नाव खराब होते, अन मग सारे रिक्षावाले एकाच माळेचे मणी असे इतरांना वाटते. आमच्यात पण काही चांगले रिक्षावाले असतात. पण ते समाजाला थोडेच दिसतात? जावूद्या. आपण फार विचार करतो.

चला विचार करता करता भोसरी गेलीदेखील.

"ओ ताई सांगा आता कुठे घेवू?"

"सरळ चला हायवेने. नंतर उजव्या हाताला आदर्श नगर लागेल. तेथे सांगतो."

ह्या वयस्कर स्त्री चा आवाज फारच भसडा आहे. कानांना ऐकवत देखील नाही.

चला आता यांचे ठिकाण जवळ येत चालले आहे. थंडी पण असल्या सुनसान रस्त्यावर जास्त वाजते.

अरे यापैकी वयस्कर स्त्रीचे केस एकाएकी पांढरे कसे दिसायला लागले? अन थोडी जास्तच वयस्कर दिसते आहे समोरच्या आरशात, नाही? जावूद्या आपल्याला काय? रस्त्यात तिने मेकअप उतरवलेला दिसतो. अन त्या तरूण स्त्री कडे पहायचे म्हणजे एकतर मान वळवली पाहीजे किंवा आरसा थोडा तिरका केला पाहीजे. नको. ते बरे दिसत नाही. अन तिने मघाशीच सांगितले की पुढे बघून रिक्षा चालवा म्हणून. फारच राग येतो वाटतं तिला तिच्या चेहेर्‍याकडे कुणी पाहीले की.

"ओ ताई सांगा आता कुनीकडे न्यायची रिक्षा ते?"

"अहो आता उजवीकडे वळवा अन सरळ चालवा दगडांच्या खाणीकडे. तिकडेच राहतो आम्ही."

"अहो ताई हा एरीया फारच सुनसान आहे हो. आजूबाजूला काही सोसायट्या किंवा घरे देखील नाहीत. तुम्ही कशा काय एवढ्या सुनसान भागात राहतात? त्यातच ही दगडांची खाण. फारच भितीदायक वातावरण दिसते आहे येथे. थोडं माझ्या मनाचं चांगलं सांगतो तुम्हाला. तुम्ही बायामाणसांनी असल्या रात्रीच्या वेळी प्रवास करायला नको. काय आहे की वेळ सांगून येत नाही. कुणी चोर भामटा, लुबाडणूक करणारा, अब्रू घेणारा, भुते-खेते, हडळी असली संधी पाहतच असतात."

"बरोबरच आहे तुमचं. एकट्या दुकट्याचं काम नाही या भागात. चोर लुटारू तर असतीलच येथे कुणी सांगाव भुतेही राहत असतील."

चला. ही तरूण स्त्री समजूतदार निघाली. आपण समजत होतो तसली ती नव्हती तर.

"रिक्शावाले काका, जरा वळून मागे बघा तरी एकदा. आम्ही दोघीही कोण आहोत ते लगेच समजेल तुम्हाला."
--------------------------------------------------------------------

कडाक्याच्या थंडीमुळे रिक्षाचालकाचा मृत्यु

पुणे (दि. १५ फेब्रुवारी): भोसरी -नाशिक रोडवर काल रात्री घडलेल्या घटनेत एका तरूण रिक्षाचालकाचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यु ओढवला. या प्रकरणी भोसरी पोलिस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार श्री. कांबळे हे करत आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती घेतली असता भोसरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री. बैजनाथ सांगळे यांनी सांगितले की, "रात्री १२:३० च्या सुमारास एका अज्ञात इसमाने भोसरी -नाशिक रोड जवळील आदर्श नगरातील सैलानी दर्ग्याजवळ एक रिक्षा रस्त्यात वाहतूकीला अडथळा येईल अशी उभी असून त्यात एक रिक्षाचालक बसलेला आहे व तो काहीच हालचाल करत नाही अशी खबर दिली. आम्ही त्वरीत घटनास्थळी गेलो असता त्या स्थळी रिक्षा क्र. MH12-5327 स्त्यात मधोमध उभी होती. त्यात रिक्षाचालक बसलेल्या स्थितीत मृत्यू पावलेला आढळला. रिक्षाच्या कागदपत्रांवरून व रिक्षाचालकाच्या ओळखपत्रावरून तो मृतदेह रिक्षाचालक श्री. रामभाऊ पाटील यांचा होता. त्यांच्या शरिरावर मारहाण केल्याची वा रक्त आल्याची कोणतीही खुण दिसली नाही. आम्ही त्वरीत पंचनामा करून मृतदेह जिल्हा सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला असता शवचिच्छेदनाच्या अहवालात मृत्यूचे कारण 'कडाक्याच्या थंडीमुळे शरीर काकडल्यामुळे हृदय बंद पडून मृत्यू' असे दिलेले आहे. सदर मृतदेह रामभाऊ पाटील यांच्या नातेवाईकांकडे पहाटे सोपविण्यात आला. या प्रकरणी भोसरी पोलिस स्टेशनात अकस्मित मृत्यू म्हणून नोंद झालेली आहे."

श्री. रामभाऊ पाटील हे चिंचवड एमआयडीसी मधील एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होते. ते मुळचे सातारा जिल्ह्यातले रहिवासी होते. दिवसपाळी झाली की ते कुटूंबाला दोन पैसे मिळावेत म्हणून रात्रीची रिक्षा चालवत असत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले व आईवडील आहेत.

गेल्या आठवड्यापासून येथील थंडीचे प्रमाण वाढले असून कालचे तापमान ३ अंश सेल्सीअस नोंदवले गेले आहे. तापमानाचा हा गेल्या २२ वर्षातील निचांक आहे. सध्याच्या कडाक्याच्या थंडीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत.

लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

भन्नाट आहे.
शीर्षकावरून वाटलं होतं सामाजिक-आर्थिक काहितरी असावं, पण हे रसायन काहितरी वेगळंच होतं.
बाकी >>>>>आश्चर्य आहे, एवढ्या थंडीतही ह्या दोघींनी काहीच कसे पांघरले नाही? अवांतरः हडळींना उडता येत नाही काय?

एकदम फर्स्ट क्लास ष्टोरी पाभेभौ..... एरवी सुद्धा बायकांना थंडी कमीच वाजते... Smile

अवांतर : ऐसेभी पैलवानके साथ पंगा कायकू लेनेका

अमृत

"बोला ताई, कुठे जायचं आहे?"

"भोसरी"

हा हा हा हा हा हा हा हा हा......!!!!!!

||सध्या भारतात दाढ्या कुरवाळणाऱ्या तर महाराष्ट्रात शेंड्या पिरगाळणाऱ्या लोकांना अनुक्रमे धर्मनिरपेक्ष व पुरोगामी असे म्हणतात.|| .

लै भारी.
आता चिंचवड स्टेशनावरून रात्री बेरात्री येणेजाणे बंद केले पाहीजे. Smile

--------------------------------------------------------------
उत्तरतो हिमवन्तो दाहिणतो सालिवाहणो राञा
समभारभरक्लान्ता तेण न पल्हत्थ पुहवी ||

तुमच्या तर सोसायटी समोरच स्मशानभुमी आहे ना..? जपा मग Wink

समोर नाही हो, बरीच लांब आहे तशी.
पण दगडखाणी मात्र हमसास नसल्याने भिण्याचे काही कारण नाही ब्वा. Wink

--------------------------------------------------------------
उत्तरतो हिमवन्तो दाहिणतो सालिवाहणो राञा
समभारभरक्लान्ता तेण न पल्हत्थ पुहवी ||

मला सुद्धा आता असच वाटतंय.. बादवे कुठे राहता तुम्ही चिंचवड मधे?

हो हो. चिंचवडमध्येच. Smile

--------------------------------------------------------------
उत्तरतो हिमवन्तो दाहिणतो सालिवाहणो राञा
समभारभरक्लान्ता तेण न पल्हत्थ पुहवी ||

:bigsmile: :bigsmile: :bigsmile:

जाम घाबरलो आहे.....थंडीत पण घाम फुट्ला आहे....

+१

तुम्हाला हा सर्व प्रकार रामभाउ पाट्लाने स्वतः सांगीतला कि काय ....? Wink

बापरे, म्हणजे भुतेखेते खरंच असतात. भीती वाटली वाचून.;)
लेखन उत्तम Smile

=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=

" I'm not a HANDSOME guy, but I can give my HAND-TO-SOME one who needs help. Beauty is in heart, not in face." ----- Dr. A. P. J. Abdul Kalam.

खतरनाक... वेगळंच काही...

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

मागे काही दिवसान पूर्वी देव वर श्रद्धा कि अंधश्रद्धा या वर एक धागा प्रकाशित केला गेला होता..त्यावर बरायचं मिपा करांनी देव या संकल्पनेवर तोंद्स्य्ख घेतलेले होते... परतू अश्या भूत खेताच्या गोष्टी तेच मिपाकर अगदी चवीने ऐकत आहेत...हा दुतोंडी पण नवे काय? असली काल्पनिक गोष्टी सांगून अंधश्रद्धेला खतपाणी घालणे असे नवे काय?? कुठे आहेत अनिस वाले? Blum 3
अवांतर:- असल्या भुक्कड कथा लिहून मिपा वर देण्या पेक्ष्या "संध्यानंद" ला देत जावा...

||सध्या भारतात दाढ्या कुरवाळणाऱ्या तर महाराष्ट्रात शेंड्या पिरगाळणाऱ्या लोकांना अनुक्रमे धर्मनिरपेक्ष व पुरोगामी असे म्हणतात.|| .

परतू अश्या भूत खेताच्या गोष्टी तेच मिपाकर अगदी चवीने ऐकत आहेत

ओ आम्हाला आवड्तात आम्ही वाचतो,तुम्हाला नाय आवड्त तर नका वाचु .उगाच दुतोंडी वगैरे बोलायच काम नाय .. Wink

संबंधित मिपाकरां तर्फे तुम्चा तिव्र निषेध.... Wink

अवांतर:- असल्या भुक्कड कथा लिहून मिपा वर देण्या पेक्ष्या "संध्यानंद" ला देत जावा...

मग इथे काय देणार ..? जिलब्या..? :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

आहे. शेवट असा असेल असं सुरुवातीला वाटलं नव्हतं .

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

शेवट असा असेल असं सुरुवातीला वाटलं नव्हतं .

अहो , यातच तर खरी गंमत (भुताटकी) आहे ना Wink

कल्पनाविलास चांगला आहे. पण बराचसा नेहमीच्याच वळणावरून गेला.
शीर्षक वाचून रिक्षावाल्यांच्या आयुष्यातली आपण सहसा बघत नाही ती बाजू दिसेल असे वाटले होते.

शीर्षक वाचून रिक्षावाल्यांच्या आयुष्यातली आपण सहसा बघत नाही ती बाजू दिसेल असे वाटले होते.

सहमत...

= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो =

शंभर वेळा सहमत

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

काय पाभेशेठ आहटची आठवण झाली काय?
म्हणजे डायरेक बातमीच.. त्या भुतांनी डायवरला काय केल ते पुढच्या भागात काय?

-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।

>>>>त्या भुतांनी डायवरला काय केल ते पुढच्या भागात काय?

ते काय ठाऊक नाय पण आता 'नंतर' डायवर आणि त्या 'दोघी' मिळून डुगडुगच्या 'वडापच्या शीटा' भरत बसतात. Wink

पा.भे. लेव्हलची नाही. अशा शेकडो कथा मासिकांत आणि इतरत्रही वाचल्या आहेत.

तात्पर्य : नावात राम असून भुते घाबरतीलच असे नाही..

एम.जी.

घाबरलो हं!!

आधी वाटलं कुठल्या तरी वर्तमानपत्रातील बातमीच टाकलीय पाभेनीं पण जसं जसं वाचायला सुरूवात केली तसं कळालं कि हा मामला जरा वेगळाच आहे. Smile

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ऐकूनी साजसंगीत, मन पाखरू पाखरू
वेडावल्या या जीवा, सांगा कसा मी सावरू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

......................

नि३

भलतचं काहीतरी
फार वर्षांपुर्वी मुलुंडच्या जुन्या सबवेत असेच काहीतरी रिक्षा चालकासोबत झाले होते असे ऐकले होते ...किती खरे किती खोटे देव जाणो :O :-O :shock:

***************************************************************
People Who Love To Eat Are Always The Best People - Julia Child
***************************************************************
http://delectable-delicious.blogspot.com/

+१
मी पण ती गोष्ट ऐकलेली आहे
त्यामुळे कथेचा अंदाज आला होताच
त्याप्रमाणेच घडल

पुरी जाईचिया फुल फाकणे| त्याचि नाम जैसे सुकणे|
तैसे कर्मनिषे न करणे| केले जिद्दी|

मी ती गोष्ट ऐकलेली नाही. मला सांगता का ?

शीर्षक पाहून वाटलं कुठली बातमी आहे, मग एकदम वेगळीच धक्के देणारी कथा! छान!

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(सूचना: कोणत्याही धाग्यावर मी जे प्रतिसाद देते ती सदस्य म्हणून माझी वैयक्तिक मते असतात. )
||मर्यादेयं विराजते||

मस्त!