दुसरे महायुद्ध.....सुरवात.

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
18 Feb 2012 - 10:30 pm

दुसरे महायुद्ध.....सुरवात...
एका पुस्तकावर आधारीत.

एकंदरीत आंतरराष्ट्रीय वातावरण आणि त्यात पोलंडला जर्मनीकडून मिळणार्‍या धमक्या बघता, पोलंडवरच्या आक्रमणाचा कोणाला आश्चर्याचा धक्का बसेल असे हिटलरला बिलकूल वाटत नव्हते. उलट जर्मनीच्या लष्कराने, जे “विअमाख्ट” या नावाने ओळखले जाते, ब्लिटझक्रिग नावाची जी नवीन युद्धतंत्र अवलंबले होती त्याने पोलंडला व्युहात्मक दणका सहज देता येईल असा त्याचा होरा होता. या डावपेचात नेहमीपेक्षा काय विशेष होते ? एकतर या तंत्रामधे वेगाने हलचाली करणारे रणगाडे एकामेकांशी बिनतारी संदेश यंत्रणांनी जोडलेले असायचे. यांचाशी हलता तोफखाना-म्हणजे जो मोठमोठ्या ट्रकवर असायचा तो, ट्रकमधील पायदळही जोडलेले असायचे. एवढेच नाही तर हवाईदलाची विमानेही या दलाच्या संपर्कात राहू शकायची. हे सगळे सैन्य हालचाल करायला लागले की त्याचा वेग प्रचंड असायचा आणि त्यापुढे शत्रू टिकाव धरणे अवघड. १९१४ ते १९१८ या सालात हिटलरने पहिल्या महायुद्धातील खंदकयुद्धाचा अनुभव घेतल्यामुळे तो त्या प्रकारच्या युद्धाचा तिरस्कार करत असे. तो त्यावेळी १६-बव्हेरियन इंन्फंट्रीमधे निरोप्या होता व तेव्हापासून त्याला वेगवान हालचालींचे महत्व पटले होते. त्या काळात तोफखान्याचा मारा थांबला की खंदकातून उडी मारून दुसर्या् खंदकापर्यंत निरोप घेऊन जिवाच्या आकांताने पळत जावे लागायचे. त्याने बहुतेक त्या युद्धात एकही माणूस मारला नसेल पण त्याचे कर्तव्य तो चोखपणे बजवायचा. ती रेजिमेंटच त्याचे घर झाली होती व तेथेच राहण्यासाठी त्याने दोनदा बढती नाकारली व आपल्या सोबत्यांबरोबर तो ते युद्ध लढला. त्याने त्यातच दोन आयर्न क्रॉस मिळवले.
पहिल्या महायुद्धात चार वर्षे दोन्ही बाजूचे सैन्य खंदकातून नुसते एकामेकांसमोर उभे ठाकले होते. त्या युद्धात हिटलर २९ वर्षाचा होता आणि त्यातील अनुभवावरून त्याने मनाशी एक खूणगाठ बांधली होती आणि ती म्हणजे वेगाने हालचाली करून शत्रूला आश्चर्याचे धक्के देऊनच या विचित्र परिस्थितीवर मात करता येऊ शकते. तेच त्याने त्याच्या “माईन कांफ” या पुस्तकातही लिहिले “तीस वर्षात माणूस आयुष्यात बरेच काही शिकतो पण याचे महत्व काही वेगळेच आहे”. त्याच्या राजकीय जीवनात एक क्रांतीकारक म्हणून त्याने या धक्का तंत्राचा यशस्वीपणे अनेक वेळा वापर केलेला आढळतो. उदा. १९२३ साली त्याने जो “बीअरहॉल” उठाव केला त्यात तसे काही होणार आहे याची त्या उठावाचा प्रमूख जनरल लुडेनडॉर्फ आणि जनरल रॉम यांनाही पूर्ण कल्पना देण्यात आली नव्हती. पण त्याचा हा डावपेच पोलंडच्या बाबतीत फसला. कारण ज्या तारखेला हे आक्रमण होणार होते त्याची तारीख २६ ऑगस्ट ऐनवेळी पुढे ढकलली गेली होती पण एका छोट्या सैन्याच्या तुकडीला हा आदेश वेळेवर न पोहोचल्यामुळे त्यांनी ठरल्याप्रमाणे त्यांना सांगितलेल्या कामगिरीसाठी पोलंडची सीमा पार केली पण नंतर त्यांना परत यावे लागले.

पोलंडवर आक्रमण करण्याची जी योजना आखली गेली होती त्या योजनेचे सांकेतीक नाव होते “फॉल वाईस” या योजनेचा एक भाग म्हणून जर्मन सैनिक आदल्या दिवशी रात्री राउबरझिव्हील पोषाखात पोलंडमधे शिरले आणि त्यांनी काही महत्वाच्या जागा ताब्यात घेतल्या. दुसर्याा दिवशी आक्रमण चालू होणार होते. गुप्त कारवाया करणार्याब जर्मन रेजिमेंटच्या एका बटालियनला आक्रमणाचा मार्ग निर्धोक करायची कामगिरी देण्यात आली. त्याला नाव देण्यात आले ’कन्स्ट्रक्शन ट्रेनिंग कंपनी ८००” ले. हर्जनरच्या २४ जवानांना कारपार्थियन डोंगर रांगातील जाब्लूंका खिंडीतील, मॉस्टी येथील रेल्वे स्टेशन ताब्यात घ्यायला सांगण्यात आले जेणे करून ७-इन्फंट्री डिव्हिजनला कसलाही अडथळा यायला नको. या रस्त्यावरील एकमेव बोगदा येथे होता आणि वॉर्सा व व्हिएना या शहरांना जोडणारा हा सगळ्यात कमी अंतराचा रस्ता होता. त्यामुळे या रेल्वेचे संरक्षण अत्यंत महत्वाचे होते. अर्थात दोन्ही देशांना.
२६ ऑगस्टच्या मध्यारात्री हर्जनर आणि त्याची माणसे सीमारेषा ओलांडून पोलंडच्या भूमीवरच्या जंगलात शिरली. दुर्दैवाने चुकामूक होऊन त्यांचे दोन गट पडले. हर्जनरच्या गटाने रेल्वे स्टेशन ताब्यात घेतले, तेथील टेलिफोन आणि टेलिग्राफच्या तारा तोडल्या पण त्यांना खरी काळजी होती ती पोलीश सैन्याने पेरेलेल्या सुरुंगांची. पण नशिबाने पोलीश सैन्याने ते अगोदरच काढून घेतले होते. त्या बोगद्याच्या पोलीश सुरक्षासैनिकांनी हर्जनरच्या तुकडीवर हल्ला चढवला, त्यात त्याचा एक सैनिक जखमी झाला. गुप्तहेरखात्याशी संपर्क नसल्यामुळे त्याला हिटलरने ही फॉल वाईस ही योजनाच पुढे ढकलली आहे हे त्याला कळणे शक्यच नव्हते. सकाळी ९.३५ वाजता हा संपर्क प्रस्थापित झाल्यावर पहिल्यांदा त्याला माघार घ्यायला सांगण्यात आली, तोपर्यंत त्याचा अजून एक माणूस जखमी होऊन पडला होता आणि या सगळ्यांची सुटका करताना उडालेल्या चकमकीत एक पोलीश सैनिक ठार झाला होता.
अडचणींवर मात करून हर्जनरच्या तुकडीने दूपारी १.३० वाजता परत सीमारेषा ओलांडली. जर्मन सरकारने पोलंडच्या सरकारकडे या बाबतीत जे स्पष्टीकरण दिले ते नमुनेदार होते. दोन देशांमधील सीमारेषा त्या जंगलात पुसट असल्यामुळे ही घटना घडली, त्यात विशेष काही नाही. ही कारवाई शांततेच्या काळातील असल्यामुळे हर्जनरने जर्मनांच्या स्वभावधर्मानुसार त्या रात्रीच्या खर्चाचे ५५ राईशमार्क मागितले. त्याच स्वभावाला अनुसरून जर्मन सैन्यातील अधिकार्यांानीही त्याला शौर्यपदक, ही कारवाई शांतता काळातील असल्यामुळे नाकारले. नंतर त्यांनी ते त्याला दिले पण ते त्याला अपशकूनी ठरले. १९४२ साली एका मोटरसायकलच्या अपघातात त्याच्या पाठीचा कणा मोडला. त्यानंतर त्यासाठी व्यायाम म्हणून पाण्यात चालताना बुडून त्याचा मृत्यू झाला.

१९३४ मधे पोलंड आणि जर्मनी यांच्यातील अनाक्रमणाच्या तहातील कलमांचा आधार घेत तो तह हिटलरने रद्द केला. त्याच्याकडून खरे तर एवढ्याही सभ्यतेची अपेक्षा नव्हती. पोलंडला जर्मनांच्या आक्रमणाची तशी थोडीफार कल्पना आली होतीच पण त्यांना ब्लिट्झक्रिगची ताकद काय आहे याची कल्पना येणे शक्य नव्हते. जर्मनी आणि इंग्लंड या दोन देशातील सामरीक तज्ञांनी मात्र यावर केव्हाच अभ्यास चालू केला होता. पोलंडमधील राजकीय तज्ञांना हे आक्रमण केव्हा व कुठे होईल याचा अंदाज बांधता येत होता पण ते कसे होईल याचा अंदाज त्यांच्या कल्पनेच्या बाहेरचे असल्यामुळे पारंपरीक पद्धतीने त्यांनी आपल्या सैन्याचा बराच मोठा हिस्सा जर्मनीच्या सीमारेषेवर आणून ठेवला. म्युनिचचा उठाव आणि झेकॉस्लोव्हाकियाचे हरण यामुळे जर्मनी आणि पोलंडची सीमारेषा १२५० मैलांवरून १७५० मैल झाली होती. एवढी मोठी सीमा राखायचे काम पोलंडची सेना करूच शकत नव्हती. तुलनेने तुटपुंजा असलेल्या सेनेमुळे पोलंडच्या सेनेचा प्रमूख मार्शल एदवार्द श्मीग्विरेझच्यापुढे दोन पर्याय होते. एक म्हणजे ही जी काय सेना होती तिचा मोठा हिस्सा पोलंडच्या आंतर्भागाचे नैसर्गिक खंदक असणार्या् व्हिस्टूला, सान आणि नारेव्ह या नद्यांच्या मागे आणून ठेवायच्या किंवा दुसरा याच सैन्याला पश्चिमेकडचा सुपीक प्रदेश आणि उद्योगांचे रक्षण करायला सांगणे. एदवार्द श्मीग्विरेझने तिसरा पर्याय स्विकारला. त्याने पोलंडची इंचन्‍ इंच भूमी लढवायची ठरवली. हे ठरवणे मोठे वीरश्री पूर्ण होते पण त्यामुळे ती सगळी सेना उघड्यावर पडली. त्याने लिथुआनिया ते कार्पेथिअन डोंगररांगांच्या सीमेवरही सैन्य तैनात करायचा प्रयत्न चालवला. एवढेच नाही तर त्याने आक्रमक धोरण स्विकारून पूर्व प्रशीयावर आक्रमणासाठी काही राखीव सैन्यही तयार ठेवले त्यामुळे त्याची १/३ सेना पोन्झिआ आणि पोलंड कॅरिडॉर येथे अडकून पडली. नेहमीप्रमाणे पोलंडच्या सैन्याने शौर्याची पराकाष्ठा केली, नाहीतर या नद्यांच्या पूर्वेला असणार्‍या क्राकोव, पोझनान, बिद्गोष्त आणि नोछ या सगळ्या शहरांवर पाणी सोडावे लागले असते. हे काहीही असले तरीही त्यावेळेचा जर्मन हेरखात्याचा मेजर जनरल फॉन मेलेंथिन याने जे म्हटले ते दुर्लक्षून चालणार नाही “पोलंडच्या सैन्याचे सगळेच डावपेच हे वस्तुस्थितीला धरून नव्हते.”

गुरवार, ३१ ऑगस्टला संध्याकाळी ५.३० वाजता हिटलरने दुसर्‍याच दिवशी पोलंडवर हल्ला चढवायचा आदेश काढला. यावेळी हा हल्ला कुठल्याही परिस्थितीत पुढे ढकलला जाणार नव्हता. शुक्रवारी पहाटे ४.४५ ला जर्मनीच्या सेनामुख्यालयाने (Oberkommando des Heres म्हणजे OKH) पूर्वीच आखेलेली योजना “व्हाइट” ही अमलात आणण्यात आली. या OKH मधे जर्मनीच्या स्थलसेनेचे प्रमूख, आर्मी जनरल स्टाफ, आर्मी पर्सनलचे कार्यालय आणि राखीवसेनेचे प्रमूख असे सेनाधिकारी होते. या OKH वर युद्धव्युह आखण्यासाठी अजून एक यंत्रणा होती. तिचे नाव Oberkommando der Wehrmacht ज्याला आपण यापुढे ओळखणार आहोत OKW या नावाने. हिटलरने जेव्हा १९३८ साली जर्मनीच्या सेनेचे सर्वोच्च प्रमूखपद स्विकारले तेव्हा त्याने OKW उभी केली. ही हिटलरच्या अधिपत्याखाली काम करायची आणि त्याचा प्रमूख होता जनरल कायटेल. जनरल ब्लॉमबर्गला त्या काळात जर्मनीच्या तिन्ही दलांसाठी एक प्रमूख नेमायचा होता परंतू नौदल आणि हवाईदलाच्या त्यावेळच्या प्रमूखांनी कडाडून विरोध केल्यामुळे ती योजना बारगळली होती पण हिटलरने ती नेट लाऊन पूढे रेटली आणि OKW चा जन्म झाला. १९३९ साली OKW मधे चीफ ऑफ आर्मी स्टाफ – ज. कायटेल, एक मध्यवर्तीय प्रशासकीय डिव्हिजन, एक सेनादलांचे प्रशासकीय कार्यालय जे ज. जोडलच्या हाताखाली होते, (हे कार्यालय हिटलरला सेनेमधे काय चालले आहे याची माहिती देत असे.) एडमिरल कॅनारिस याच्या अधिपत्याखाली एक गुप्तहेरखातेही याच्यात घालण्यात आले होते. शिवाय सेनादलांचे न्यायालय आणि वित्तव्यवहारावर लक्ष ठेवणारे एक कार्यालयही याला जोडण्यात आले होते.
व्हाईट युद्धव्युहानुसार तुलनेने कमजोर असलेल्या पोलंडच्या दोन्हीबाजूने वेअमाक्ट्च्या दोन कमांड हल्ला करून त्यांच्या सैन्याचा फडशा पाडून वॉर्सा काबीज करणार अशी योजना होती. कर्नल जनरल फेडोर याच्या नेतृत्वाखाली आर्मी ग्रूप नॉर्थ, पोलीश कॅरीडॉरमधून डॅंझिग काबीज करून पूर्व प्रशियामधे तळ ठोकून बसलेल्या ३ र्यार आर्मीबरोबर वॉर्सावर उत्तरेकडून हल्ला चढवणार तर या सेनेपेक्षा अधिक ताकदवान अशी कर्नल जनरल रुनस्टेडची आर्मी ग्रूप साउथ ही सेना पोलंडच्या संरक्षण व्यवस्थेला खिंडार पाडून पूर्वेला असणार्‍या लूव्ह या शहराला धडकणार होत्या. ते शहर घेऊन ती सेनाही वॉर्सावर पश्चिमेकडून हल्ला चढवणार, असा एकंदरीत बेत होता. पोलंडने नशिबाने तो जाब्लूंका खिंडीतील बोगदा उडवला होता नाहीतर वॉर्सावर हल्ला चढवण्याचे काम फारच सोपे झाले असते. (हा रस्ता पार १९४८ साली रहदारीला परत मोकळा करण्यात आला.)

पहिल्या महायुद्धानंतर १९१९ साली झालेल्या व्हर्सायच्या तहानंतर जेत्यांनी प्रशिया उर्वरीत जर्मनीपासून तोडण्यासाठी पोलीश कॅरिडॉरचे महत्व जाणले होते, किंबहूना त्यासाठीच तो अस्तित्वात आला होता तर जर्मनीला हा पोलीश कॅरिडॉर आणि डॅन्झींग, जेथे जर्मनवंशाची लोकसंख्या सगळ्यात जास्त होती, ही दोनही कारणे युद्ध छेडण्यासाठी पुरेशी सबळ वाटत होती. अर्थात हिटलरने मे १९३९ साली झालेल्या एका सेनाधिकार्‍यांबरोबर झालेल्या बैठकीत बजावले होते की डॅन्झिंग महत्वाचे नाही. पूर्वेला वसाहत स्थापन करण्याचे महत्वाचे आहे. या धोरणाला हिटलर “लिबनस्रॉम” म्हणत असे. याचा शब्दश: अर्थ राहण्याची जागा/वसाहत असा होतो. हिटलरला पूर्वेला जर्मनांची वसाहत स्थापन करून अन्न्धान्न्याच्या पुरवठा सुरळीत ठेवायचा होता. या कारणांखेरीज अजून एक महत्वाचे कारण होते ते त्याने १४ वर्षापूर्वीच आपल्या “माईन कान्फ” या पुस्तकात लिहून ठेवले होते. “सर्वश्रेष्ठ आर्य वंश हा कनिष्ट (यांना तो उंटर्मेंशन असे म्हणायचा) स्लाव वंशाच्या जमातीला जिंकून त्यांची भुमी ही आर्यवंशीयांच्या उन्नतीसाठी वापरेल.” त्याच्या मते हे युद्ध संपत्ती किंवा एखाद्या भूभागासाठी लढले जाणार नसून त्यामागे काही तत्वज्ञान/विचार असणार होता. हिटलरने त्याच्या या पुस्तकात हेच कारण ठामपणे मांडले होते आणि दुर्दैवाने याच कारणाने त्याचा आणि जर्मनीचा नाश झाला.................

पोलंडः

आक्रमण करणार्यां सेनेची मधली फळी कमकुवत ठेऊन बाजूचे सैन्य अत्यंत मजबूत ठेवायचे ही एक वेगळीच आणि डोकेबाज रणनिती यावेळी आखली गेली. फिल्ड मार्शल काऊंट अल्फ्रेड फॉनश्लिफिन याने हानिबालच्या केनच्या युद्धाचा अभ्यास करून जो प्रबंध पहिल्या महायुद्धाच्या अगोदर मांडला होता, त्यावरून ही कल्पना उचलली गेली होती असे म्हणतात. या कल्पनेचे मूळ कोठे का असेनात, पण या रणनितीने जर्मन सैन्याने पोलंडच्या सैन्याला खिंडार पाडून वॉर्साच्या भोवती आपले फास सगळीकडून आवळले हे खरे. त्या सैन्याला कोणी अडवू शकले नाही याचे कारण जर्मन सैनिक किंवा तो वापरत असलेली शस्त्रे हे नसून याचे खरे कारण होते वर सांगितलले “ब्लिट्झक्रिग” या रणनितीच्या चाचणीसाठी पोलंडची युद्धभूमी वापरण्यात आली. चाचणीसाठी ज्या प्रकारचे भूभाग असायला हवेत उदा. डोंगर तलाव, कालवे, नद्या इ.इ. हे सर्व मुबलकपणे उपलब्ध होते. सगळ्यात मुख्य म्हणजे लांबीला विस्त्रृत असे रणमैदान चाचनीसाठी उपलब्ध होते.
हिटलर केव्हाही पोलंडवर हल्ला चढवू शकतो याची खात्री झाल्यामुळे ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स यांनी छोट्या पोलंडला तसा हल्ला झालाच तर दोस्त राष्ट्रे युद्धात पोलंडच्या संरक्षणासाठी कटीबद्ध आहेत याची ग्वाही दिली होती. ब्रिटनचे त्यावेळचे पंतप्रधान नेव्हील चेंबरलेन यांनी ही ग्वाही दिली १ एप्रिल १९३९ रोजी. त्यांच्या या भाषणामुळे हिटलरला त्याच्या सैन्याचा खूप मोठा भाग पश्चिमसीमेवरच्या सिगफ्रिड लाईन नावाच्या संरक्षण व्यवस्थेत गुंतवावा लागला. ही एक अजून अपूर्ण असलेली संरक्षक तटबंदी होती. हिची खोली होती जवळजवळ ३ मैल आणि यात अनेक अभेद्य अशी ठाणी उभारली गेली होती. हिटलरने त्याच्या १०० डिव्हिजन सैन्यदलापैकी आपली पिछाडी संभाळण्यासाठी ४० डिव्हिजन सैन्य या सीमेवर आणून ठेवले होते. अर्थात या पैकी तीन चतुर्थांश हे दुय्यम दर्जाचे सैन्य होते आणि त्यांच्याकडे फक्त तीन दिवस पुरेल एवढाच दारूगोळा होता. त्याची सर्वोकृष्ट सेनादले, रणगाडे, आणि सगळे विमानदल हे पोलंडवर केलेल्या आक्रमणात त्याने गुंतवले होते.

व्हाईट ही युद्धयोजना ही OKH मधील युद्धनितीतज्ञांनी तयार केली होती आणि हिटलरने ती फक्त नजरेखालून घातली होती. या सुरवातीच्या काळात हिटलर आणि त्याचे सेनाधिकार्यां्मधे अत्यंत सौहार्दपूर्ण होते. सैन्याच्या हालचालीत, त्यांच्या व्युहाबद्दल तो फारसा अग्रह धरत नसे तर सर्व व्युहरचनाकारांना त्याने मिळवलेल्या दोन आयर्न क्रॉसबद्दल आदर वाटत असे. लष्करी बाबींबाबत हिटलरचा आत्मविश्वास असामान्य होता आणि तो इतर सेनाधिकार्‍याप्रमाणेच पहिल्यामहायुद्धातील अनुभवांमुळे आला होता. OKH चे चिफ ऑफ स्टाफ जनरल कायटेल आणि त्याचा सहाय्यक चीफ ऑफ वरमाक्ट ऑपरेशन स्टाफ जनरल जोडल हे दोघेही कसलेले सैनिक होते. जरी या दोघांनी प्रत्यक्ष आघाडीवरच्या युद्धात भाग घेतला नसला तरीही अप्रत्यक्षपणे या युद्धात त्यांचा सहभाग दुर्लक्ष करण्यासारखा नव्हता. तोफखान्याचा त्यावेळी अधिकारी असलेला जनरल कायटेल तर एका बॉंबवर्षावात जखमीही झाला होता. OKH मधील इतर अधिकारीही कसलेले सैनिक होते. उदा. जनरल वॉल्थर फॉनराईश्नाऊ, कर्नल जनरल वॉल्थर फॉनब्राऊकिच आणि जनरल हॅन्स फॉन क्लुग हे सुद्धा तोफखान्याचे कसलेले अधिकारी होते. जनरल पॉल फॉन क्लिस्ट व ले. जनरल मॅन्स्टीन हे कॅव्हलरीचे अधिकारी होते. ले. ज. मॅन्स्टीनही या युद्धात जखमी झाला होता. जनरल गुडेरियन हा सिग्नलमधे अधिकारी होता तर जनरल मॅक्समिलन फॉन वाईश याने तर ते सगळे युद्ध जनरल स्टाफ म्हणूनच लढले होते. सांगायचा मुद्दा काय की हिटलरल हा एक कॉर्पोरल असला तरी या सर्व जनरल्सच्या दबावाखाली तो कधीच आला नाही ना त्याच्या विचारात फरक पडला. पहिल्या महायुद्धात जरी तो एक निरोप्या म्हणून काम करायचा, त्याचे डोळे आणि कान उघडे होते त्यामुळे युद्धभुमीवरच्या सैन्याच्या हालचालीं विषयी त्याला बर्‍यापैकी माहिती झाली होती. तो जर एक जर्मन नागरीक असता तर त्याला निश्चितच सेनेमधे अधिकार्या्ची जागा मिळाली असती आणि तसे झाले असते तर तो बटालियनचा कमांडर म्हणून ओळखला गेला असता. पण त्याचे नागरिकत्व आड आले. पहिले महायुद्ध संपल्यानंतरची काही वर्षे बर्‍याच वरीष्ठ अधिकार्‍यांनी एका निमलष्करी फ्रीकोअर आणि ट्रिटी लष्कर नावाच्या सैन्यात काढली. व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीला ही दोनच लष्करे ठवायची परवानगी होती. हिटलर सत्तेवर यायच्या अगोदर या दोन्ही दलात लष्करविषयक फारच किरकोळ काम चालायचे. हिटलरला त्यामुळे या नावालाच असणार्‍या जनरल्सविषयी फार आदर होता असे मानायचे काही कारण नाही. जरी ले. कर्नल विस्टन चर्चील हे न चुकता त्याची कॉर्पोरल हिटलर म्हणून उल्लेख करायचे तरीही या बाबतीत हिटलरच्या मनात त्याच्या पदामुळे या सर्व जनरल्समधे वावरताना कुठल्याही प्रकारचा न्युनगंड नव्हता हे स्पष्ट होते................

जयंत कुलकर्णी........
मी हे पूर्ण करेन की नाही हे माहीत नाही. ..

हे ठिकाणलेखमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

मन१'s picture

19 Feb 2012 - 12:39 am | मन१

वाचतोय.
महायुद्धाची माहिती होती, पण इतकी तपशीलवार, granular details सहित नव्हती.
२६ ऑगस्टची घटना आजच समजली.

आत्मशून्य's picture

19 Feb 2012 - 2:38 am | आत्मशून्य

.

दुसर्या महायुध्धानंतर वेस्ट जर्मनीचा ताबा अमेरिका व फ्रेंचांनी घेतला. व इतिहास हा जेत्यांकडून लिहिला जातो ह्या उक्तीनुसार येथील पिढ्यांमध्ये हिटलर द्वेष तेथील शिक्षण व इतर जमेल त्या मार्गाने अंगी खोलवर भिनवला आहे.
नुकतीच जर्मनी मध्ये एक सनसनाटी घटना घडली.

दोन तरुण व एक तरुणी ही एका भाड्याच्या घरात राहत होती व त्या घरात स्फोट होऊन ते ठार झाले.
पुढे तपासणी मध्ये असे उघडकीस आले की ते नियो नाझी ह्या संघटनेचे सदस्य होते. नाझी पक्षाची पुनर्स्थापना करून त्यांचे हे नवीन नामकरण केले आहे.
गेली १५ वर्ष ही लोक भूमिगत राहून देशातील परकीय, बहुतांशी तुर्की लोकांचे थंड डोक्याने योजना बध्द रीतीने हत्याकांड करत होते.
ह्यांच्यावर पूर्वी गुप्तचर विभागाने पळत ठेवली होती. मात्र मग त्यांना क्लीन चीट मिळाली होती.

आजही ही संघटना व काही पक्ष हे बंदी असली तरी जर्मनी मध्ये कार्यरत आहेत.आणी देशातील बेकायदेशीर राहणारे नागरिक किंवा जे परकीय नागरिक अजूनही त्यांची तिसरी पिढी जर्मनी मध्ये राहून जर्मन संस्कृतीत समरस झाली नाही अश्या तुर्की नागरिकांना आपले लक्ष्य बनवितात. .
ह्या संघटनांना अर्थात जनमानसात आदराचे स्थान नाही आहे. सरकार त्यांच्यावर नेहमीच लक्ष ठेवून असते.
खुद माझ्या पत्नीचे आजोबा दुसर्या महायुध्धात रशियात गेले व तेथेच चीर निद्रा घेत आहेत. तिची आजी कधी कधी त्यावेळच्या आठवणी सांगते.

हा लेख वाचून त्या आठवणींना उजाळा मिळाला.
ह्या विषयावर अजून वाचण्यास उत्सुक आहे.
येथे हिस्ट्री वाहिनीवर २४ तास तेच दाखवत असतात. खूप काही आधी वाचले आहे. पण युद्धस्य रम्य कथा ह्या न्यायाने अजून वाचायला आवडेल

पैसा's picture

19 Feb 2012 - 8:31 am | पैसा

नेहमीप्रमाणेच तपशीलवार अति उत्तम लेख!

(फक्त शेवट क्रमशः च्या जागी "मी हे पूर्ण करेन की नाही हे माहीत नाही. .."हे पाहून बरं नाही वाटलं.)

अन्या दातार's picture

19 Feb 2012 - 9:38 am | अन्या दातार

.......

तिमा's picture

19 Feb 2012 - 11:02 am | तिमा

लेखमाला पूर्ण होईल या आशेने वाचत आहे. हिटलरला ज्यूं बद्दल एवढा द्वेष का होता त्याबद्दलही लिहावे.

५० फक्त's picture

19 Feb 2012 - 5:00 pm | ५० फक्त

माहितीपुर्ण लेख, धन्यवाद.

रणजित चितळे's picture

19 Feb 2012 - 5:29 pm | रणजित चितळे

जयंतरावांचे लेख म्हणजे मेजवानी असते.

साहेब आपण आमचा विचार करा व आमच्यासाठी पूर्ण करा.

सुहास झेले's picture

20 Feb 2012 - 12:07 pm | सुहास झेले

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेखन..... !!!!

जयंतकाका, प्लीज ही लेखमाला पूर्ण करा.... आम्हा वाचकांचा असा हिरमोड नका हो होऊ देऊ :) :)

जयंत कुलकर्णी's picture

20 Feb 2012 - 3:09 pm | जयंत कुलकर्णी

अगोदर मुसोलिनी पूर्ण करतो... मग बघूयात....
काय चेष्टा चालवली आहे रे...............? :-)

जयंत कुलकर्णी's picture

20 Feb 2012 - 3:12 pm | जयंत कुलकर्णी

....

होबासराव's picture

1 Mar 2016 - 7:53 pm | होबासराव

हा लेख वर आणतोय.

एक एकटा एकटाच's picture

1 Mar 2016 - 8:33 pm | एक एकटा एकटाच

धन्यवाद

एक एकटा एकटाच's picture

1 Mar 2016 - 8:33 pm | एक एकटा एकटाच

मस्त लेख