लेखक व समिक्षकांतील परस्पर नातेसंबंध

प्रदीप's picture
प्रदीप in जनातलं, मनातलं
7 Aug 2011 - 8:26 pm

लंडन येथून प्रकाशित होणार्‍या 'फायनॅन्शियल टाईम्स' च्या ह्या शनिवारच्या अंकात फ्रान्सिस व्हीन ह्या लेखक- समीक्षकाचा, लेखक व समीक्षक ह्यांच्यातील नातेसंबंधाविषयावर एक सुंदर लेख आला आहे.

अलिकडेच तेथील हायकोर्टाने सेरा थॉर्न्टन ह्या लेखिकेस, तिच्यावर केलेल्या एकाच टीकात्मक लेखावरून, ६५,००० पाँडाची नुकसान भरपाई बहाल केली. सदर टीकात्मक लेख डॉ. थॉर्न्टन ह्यांच्या 'Sevena Days in the Art World' ह्या पुस्तकावर, लाईन बार्बर ह्यांनी लिहीला होता. हा कोर्टाचा निकाल, फ्रान्सिस व्हीन ह्यांच्या लेखाची प्रेरणा आहे. लेखात सुरूवातीस ह्या केसचा थोडक्यात उहापोह केल्यावर व्हीन लेखक व समिक्षक ह्यांच्या नातेसंबंधाकडे वळतात. त्यांनी काही पूर्वीची व अलिकडची जहरी टीकेची उदाहरणे दिलेली आहेत. त्यातील काही मला मार्मिक वाटली, ती येथे उर्धृत करतो:

१९ व्या शतकात एकदा समिक्षक फ्रान्सिस जेफ्री ह्यांनी टॉम मूर ह्यांच्या 'Epistles, Odes and Other Poems" नामक कवितासंग्रहास 'सामाजिक त्रास' (public nuiusance) असे संबोधून वर म्हटले की ह्या कविता सीध्यासाध्या मनाच्या वाचकांची मने गढूळ करण्ञाच्या हेतूने लिहीलेल्या आहेत. ह्यावर मूरने समिक्षकास द्वंदाची आव्हान केले. पोलिसांनी हस्तक्षेप केला, आणी पुढे कवि व समिक्षकात दिलजमाई घडली.

पण अर्थात शाब्दिक द्वंदावरून कुणी हातघाईवर आले, की तो त्या व्यक्तिचा पराभव समजावा. नॉर्मन मेलर ह्याने गोर व्हिडाल ह्याला एक ठोसा देऊन पाडल्यावर, तशा पडलेल्या अवस्थेतच व्हिडाल उद्गारला "शब्दांनी नॉर्मन मेलरचा पुन्हा एकदा पराभव केलेला आहे!'

मार्क ट्वेन ह्याने जेम्स फेनिमोअर कूपर ह्याविषयी म्हटले होते "जेम्स कूपरला इंग्लिशमधून लिहीता येते असे काही जण म्हणत असत, परंतु आता ते सर्व दिवंगत झालेले आहेत!'.

विलीयम फॉकनरने मार्क ट्वेनची संभावना 'एक अतिसामान्य, (गल्लाभरू) लेखक, ह्याला युरोपात चौथी पातळी दिली जाईल' अशा शब्दात केली होती.

ही उदाहरणे देऊन फ्रान्सिस व्हीन ह्यांनी इंग्लिश वाड्मयाच्या सध्याच्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की अलिकडे लेखक व समिक्षक ह्यांच्यात अनेकदा काही न काही कारणांमुळे भेटीगाठी होतात, त्यामुळे समिक्षक तटस्थ लिखाण करू शकत नाहीत. ह्याची त्यांनी काही उदाहरणे दिली आहेत. डेव्हिड लॉज ह्यांच्या एका कादंबरीवर सॅम लेह ह्यांनी एक कडवी टीका करणारा लेख 'द स्पेक्टॅटर' मधे लिहीला. तो ज्या दिवशी प्रसिद्ध झाला त्याच संध्याकाळी एका पार्टीत त्या दोघांची प्रत्यक्ष ओळख झाली. 'तो एक आल्हादकारक गृहस्थ आहे. ह्या अगदी चांगल्या गृहस्थाच्या पाठीत खंजिर खुपसणारे मी काही लिहावयास नको होते, असे मला आता वाटू लागले आहे' अशी खंत लेह ह्यांनी नंतर व्यक्त केली.

हे असे पूर्वी होत नसे. आता तर बूकर जजेसही त्यांच्या निवडी गुण्या गोविंदाने करताहेत असे चित्र दिसू लागले आहे. ते सर्व म्हणे आळीपाळीने एकमेकांकडे चहापानास जातात!' (Even Booker judges no longer have giant bust-ups; they all go rounद to tea at one another's houses).

हे असे होणे चुकवायचे असेल, तटस्थ समिक्षा करायची असेल तर समिक्षकांनी सगळ्या लेखक-प्रकाशकांच्या कोंडाळ्यापासून मुद्दाम फटकून राहिले पाहिजे. व्हीन ह्याचे उदाहरण देतात, ते 'न्यू यॉर्क टाईम्स्'च्या समिक्षक, मिचीको काकुतानी ह्यांचे. नॉर्मन मेलर तर ह्या बाईंना 'one-woman kamikaze' म्हणतात. अलिकडच्या अनेक ज्येष्ठ लेखकांच्या कलाकृतींची ह्या बाईंनी अगदी तटस्थ 'दखल' घेतलेली आहे. परंतु ह्यांतील कुणीही बाईंना रस्त्यात भेटल्या तर ओळखणार नाहीत! पण काकुतानी बाई आता अगदी 'endangered species' आहेत की काय, अशी शंका लेखकाने व्यक्त केलेली आहे.

आपली मराठी साहित्यसमिक्षा पूर्वापार कितपत तटस्थ होती, आणी आता तिच्याविषयी काय म्हणता येईल, असा प्रश्न माझ्या मनात आला. पूर्वी आचार्य अत्र्यांनी अनेक लेखकांवर घणाघाती टीका केलेली आहे (ना. सी. फडके, भाऊ पाध्ये, आनंद साधले ही त्यातील काही नावे). इतरस्त्र काय परिस्थिती होती, व आता ती काय आहे? ती, जर व्हीन ह्यांनी प्रचलित इंग्लिश वाड्मयासंबंधी व्यक्त केलेल्या परिस्थितीसारखीच असेल, तर त्याची कारणे काय असावीत?

ह्याच प्रमाणे आपल्य येथील काही मार्मिक टीकांची उदाहरणे कुणास माहिती असल्यास ती उर्धृत करावीत.

(मराठी संस्थळाव्बरील साहित्याचा ह्या संदर्भात समावेश कृपया करू नये. प्रकाशकांनी प्रसिद्ध करण्यासाठी दखलपात्र ठरवलेल्या साहित्यावरील टीकेपुरती ही चर्चा मर्यादित असावी, ही अपेक्षा करतो).

वाङ्मयसाहित्यिकसमाजविचारआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

सहज's picture

8 Aug 2011 - 6:38 am | सहज

मुळ लेख वाचला नाही, पण रोचक विषय आहे.

वेगवेगळ्या इकोनॉमीक पॉलीसीवरील अभ्यासगटाचे सदस्य, क्रेडीट रेटींग देणार्‍या संस्थेतील लोकांची भाषण, रिसर्स यांचे स्पॉन्सर बरेचदा टॉप (करप्ट) बँकींग संस्था असतात. इतकेच नव्हे तर हार्वड सारख्या हुच्चभ्रु गणल्या जाणार्‍या संस्थातील प्राध्यापकांचे उत्पन्न कसे कुठून येते हे पहाता. आजकाल छापून येणारी मते अजिबातच विश्वासार्ह नाही असे सकृतदर्शनी वाटते. हा विषय वेगळा आहे पण तत्वे/ ढासळती मुल्ये एकच. प्रकाशकांनी पुस्तकाची चर्चा घडावी खप वाढावा, म्हणुन मुद्दाम वादंग निर्माण करणारे लेख येउ द्यावेत. अर्थात किमान कुठले पुस्तक वाचले न वाचले, लेखकाला शिव्या दिल्या, लेखकाने शिव्या दिल्या कोणाला फारसा फरक पडू नये पण पॉलीसी मेकींग मधे खोटी / हितसंबध जपणारी मते /लॉबींग याचे परिणाम दूरगामी (ग्लोबल)होतात. बर जास्त खोलात गेल्यावर दोन्ही बाजू असे आमचे तेव्हा तसे मत होते म्हणुन मोकळे होतात हा भाग त्याहून वेगळा.

बाकी नंदन, चिंतातुर जंतू यांचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक.

माहिती आणि प्रस्ताव आवडला! मूळ लेख देखील वाचायला आवडेल (जरी त्याचा प्रस्तावाशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी).

आचार्य अत्र्यांची टिका ही समिक्षकाची टिका म्हणून धरायची का हा एक प्रश्नच आहे, :-) पण त्यांनी संबंधितांच्या वाड्मयावर टिका केली आहे हे नक्कीच. आनंद साधल्यांचे माहित नाही, पण ना सी फडक्यांचे प्रसिद्धच आहे.

मला आत्ता पटकन उदाहरणे आठवत नाहीत पण नावे ठेवतो, जेणे करून इतरांनाही काही आठवू शकेल. त्यातील एक नाव म्हणजे माधव मनोहर. त्यांच्या टिका कडक असायच्या असे आठवते. नाट्यसमिक्षक कमलाकर नाडकर्णींच्या बाबतीतही तेच आठवते. (मला वाटते नंतर ते मटा मध्ये चित्रपट समिक्षा देखील करत. चांदनीची अत्यंत उप्रोधीक समिक्षा आठवते. अर्थात त्याबद्दल तक्रार नाही. ;) ) तेच शिरीष कणेकरांच्या बाबतीत. गंगाधर गाडगीळांनी देखील समिक्षा केल्या आहेत. त्यांचे "आजकालचे साहित्यिक" नावाचे पुस्तक देखील आहे, पण ते वाचलेले नाही... दूरदर्शनवर कधी कधी काही दिग्गज विविध गोष्टींची त्यांच्या कार्यक्रमात समिक्षा करत - मला वाटते त्यात सुहासिनी मुळगावकर पण असायच्या... नाट्यावलोकन करताना सुरेश खरे गोड बोलत समोरच्याची विकेट घेयचा प्रयत्न करायचे ते देखील आठवले. :-)

एकदा गजरा या दूरदर्शनवरील कार्यक्रमात यावर उपरोधीक नाटीका झाली होती. त्यात एक समिक्षक (मला वाटते नाडकर्णींनी का गाडगीळांनी ते काम केले होते) हे एका नाटककाराबरोबर नाट्यसमिक्षा करत असतात (रत्नाकर मतकरींनी ते काम केले होते). नाटकावर सडकून टिका करत असताना, लंगड्याचे काम करणारा कसा नीट लंगडला नाही, अमूक एका वेळचे सतारीची धून कशी चुकली होती आणि नंतर कुठेतरी एकदा (नामके वास्ते कौतूक करायचे म्हणून) कशी चांगली होती ते सांगितले. त्यानंतर नाटककार शांतपणे सांगतो, लंगडणारा खरेच लंगडा होता, आवडलेली सतारीची धून ही एका उमेदवारीतील कलाकाराने वाजवलेली आहे, तर न आवडलेली रवी शंकर यांचे रेकॉर्डींग होते!

असो.

सन्जोप राव's picture

8 Aug 2011 - 9:20 pm | सन्जोप राव

याच लेखाची व्याप्ती वाढवून कोणताही कलाप्रकार व त्यावर होणारी टीका याबाबत मूळ कलाकार आणि टीकाकार यांच्यात होणार्‍या संवादावर चर्चा झाली तर अधिक आनंद होईल.
बाकी नंतर.
अवांतरः लेखाच्या शीर्षकातल्या समिक्षक मधील 'मी' र्‍हस्व का लिहिली आहे याबाबत कुतुहल आहे. समीक्षा मधील 'मी' तर दीर्घच असते. या शब्दाचे असे रुपांतर होताना दीर्घाचे र्‍हस्व होते का? जाणकारांनी खुलासा करावा.

नितिन थत्ते's picture

8 Aug 2011 - 10:20 pm | नितिन थत्ते

मूळ कलाकार आणि टीकाकार यांच्यात कलाकृतीबाबत चर्चा व्हावी ही अपेक्षा स्तुत्य आहे. त्याने कदाचित गैरसमजांपासून बचाव होईल.

पण तशी चर्चा न झाली तरच कलाकृतीचा आस्वाद घेणार्‍या तिसर्‍या व्यक्तीचं मत काय हे लक्षात येईल.

>>लेखाच्या शीर्षकातल्या समिक्षक मधील 'मी' र्‍हस्व का लिहिली आहे याबाबत कुतुहल आहे
हा प्रश्न इथे फाऊल आहे त्यामुळे संजोप राव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी. ;)

विकास's picture

9 Aug 2011 - 1:10 am | विकास

हा प्रश्न इथे फाऊल आहे

ती पण एक समीक्षाच आहे. :-)

रामदास's picture

9 Aug 2011 - 12:26 am | रामदास

चिं.त्र्यं. खानोलकर आणि विजय तेंडुलकर यांच्या लिखाणावर झालेली टिका आठवली .विंदाच्या विरुपिकेवरून उठलेले वाद ही आठवले .या चर्चेत जास्त भर घालू शकत नाही बरेचसे संदर्भ केवळ आठवणींवर भर देऊन चर्चा करणे या धाग्यावर अन्याय करणे होईल.

चिंतातुर जंतू's picture

9 Aug 2011 - 11:39 pm | चिंतातुर जंतू

मूळ लेख इथे वाचता येईल. कोर्टानं नुकसानभरपाईचा आदेश देण्यामागचा कळीचा मुद्दा पाहिला, तर हे लक्षात येईल की समीक्षकानं चुकीची माहिती पुरवली म्हणून लेखकाला नुकसानभरपाई मिळाली. या खटल्यामुळे लेखक-समीक्षक संबंधांत काही मूलभूत फरक पडेल असं म्हणूनच वाटत नाही.

राहता राहिला मराठी समीक्षेचा मुद्दा. एखादे म.वा.धोंड किंवा माधव मनोहर सोडता मराठीत फारशी मूलगामी समीक्षा झाली असं वाटत नाही. बर्‍याचदा समीक्षेच्या नावावर निव्वळ शेरेबाजी खपवली जाते. काही वेळा चांगलं रसग्रहणात्मक लिखाण केलं गेलं. 'मला आवडते ते..' अशा प्रकारचं ते लिखाण असतं. तेंडुलकरांचं 'रातराणी', 'हे सर्व कोठून येते?' किंवा 'फुगे साबणाचे' यातलं काही ललित लिखाण यात मोडेल, किंवा एलकुंचवारांचं नुकतंच प्रकाशित झालेलं 'पश्चिमप्रभा'ही यात मोडावं. ही पाश्चिमात्य जगात रूढ असणार्‍या अर्थानं समीक्षा मात्र नाही, हे लक्षात घ्यायला हवं.

तटस्थ समिक्षा करायची असेल तर समिक्षकांनी सगळ्या लेखक-प्रकाशकांच्या कोंडाळ्यापासून मुद्दाम फटकून राहिले पाहिजे.

मिचिको काकुतानीबद्दल आदरच आहे, पण असंच असलं पाहिजे असं मला वाटत नाही. 'टाईम्स लिटररी सप्लीमेंट'मध्ये अनेक वर्षं समीक्षकाचं नाव अज्ञात राखलं जाई. अनेक गाजलेले लेखक त्यात समीक्षा लिहीत, पण नक्की कोण कुणाला काय शब्दांत फटकारतं आहे, हे चांगलंच गुप्त ठेवलं जाई. त्याच ठराविक वर्तुळात (प्रस्तुत लेखात म्हटल्याप्रमाणे "beguiling literary salons of Soho and Bloomsbury" वगैरे) वावरूनही समीक्षकाला खणखणीत समीक्षा लिहिता यावी, यासाठी हा संकेत पाळला जाई. कधीतरी हा संकेत मागे पडून समीक्षकाचं नाव देण्याची पद्धत सुरू झाली. पण दोनही परिस्थितींत टी.एल.एस.मधला समीक्षेचा दर्जा चांगलाच वरचा राहिला. त्यामुळे मूळ मुद्दा असेल तर तो समीक्षकाच्या मूलभूत कौशल्याचा, संपादकांच्या साक्षेपाचा आणि वाचकांच्या जागरूकपणाचा राहतो. कंपूबाजी ही थोड्याफार प्रमाणात सर्वत्र असते, पण उघडउघड कंपूबाज समीक्षा होणार नाही याची काळजी सर्वप्रथम संपादक घेतात (कोणत्या पुस्तकाचं परीक्षण कोण करेल, हा निर्णय टी.एल.एस.मध्ये त्या त्या विषयातले तज्ज्ञ संपादक घेतात.); त्यानंतर समीक्षक एक महत्त्वाची जबाबदारी म्हणून ते निर्णय स्वीकारतात, आणि तरीही काही इकडेतिकडे झालं तर वाचकांची पत्रं त्यावर अक्षरशः तुटून पडतात.

मला वाटतं हे मुद्दे बर्‍यापैकी वैश्विक आहेत, पण त्यामुळेच आपल्याकडच्या संपादकांचा साक्षेप, समीक्षकांचं कौशल्य आणि वाचकांचा साक्षेप असं सगळंच उघडं पडतं, असं म्हणायला वाव आहे.

आनंदयात्री's picture

10 Aug 2011 - 6:24 pm | आनंदयात्री

समीक्षेबद्दल चर्चा चालु असतांना हा प्रतिसाद रोचक ठरावा !!

प्रदीप's picture

13 Aug 2011 - 8:35 am | प्रदीप

चिंतातूर जंतूंचा प्रतिसाद माहितीपूर्ण व चोख आहे. खणखणीत समीक्षा प्रसिद्ध होण्यामागे जितकी समीक्षकाच्या स्वतःवरील जबाबादारीच्या भानाची जरूर आहे, तितकीच संपादकांच्या साक्षेपाची व वाचकांच्या जागरूकतेची, हे अगदी खरे आहे. चिं. जं, नी ह्याबाबतीत टा. लि. स. चे उदाहरण दिले आहे. व्हीनचा मूळ लेख वाचतांना तसेच ह्या उल्लेखावरूनही मला पुन्हा आपल्याकडील म्ह़णजे मराठी साहित्यविश्वातील परिस्थिती काय आहे, असा प्रश्न पडला.

माधव मनोहर, प्रा.पुष्पा भावे व कमलाकर नाडकर्णी हे तीन सन्माननीय अपवाद सोडता मराठीत रंगभूमिविषयीच्या समीक्षेविषयी दशकानु दशके केवळ अनास्थाच होती (आता काय परिस्थिती आहे, मला माहिती नाही). मी ह्यांचा उलेख माझ्या लेखात केला नाही कारण मी साहित्यापुरताच विचार करत होतो.

ह्या विषयावरून फायनॅन्सच्या क्षेत्रात रिपोर्ट्स करतांना ज्या मखलाशी जागतिक स्तरावर चालतात, त्यांची आठवण येणारे सहजराव एकटेच नव्हेत, मलाही ते जाणवले होतेच. आजच्याच फा. टा. त कुणी एका पत्रलेखकाने 'त्या क्षेत्रातही एखादी काकुतानी बाई आणा रे' अशी विनंती केली आहे. असो.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Aug 2011 - 6:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी साहित्य समीक्षा मला वाटतं त्या मानाने खूप तटस्थ आहे. किरकोळ टीका आणि मराठी साहित्याच्यासंबंधी वाद खूप असले तरी मराठी साहित्य समीक्षेचा शे-दीडशे वर्षाची परंपरा पाहता त्या मानाने मराठी समीक्षकांनी जवाबदारी पाळली आहे असे मला वाटते. मराठीतील पहिला समीक्षा ग्रंथ म्हणून ज्या का.बा.मराठे यांच्या 'नावल व नाटक' याविषयीच्या निबंधाचा उल्लेख केला जातो तिथपासून तर साहित्याच्या स्वरुपाचा विचारापासून म्हणजे ’कला की जीवनवाद’”लयतत्त्वाचा सिद्धांत’’काव्य’”पोत’ ’सौंदर्यविचार’ ’लेखन तंत्र’ श्लील-अश्लील, ते ’दलित साहित्य’ म्हणायचं की ’आंबेडकरी वादी’ साहित्य म्हणायचं इथपर्यंतंच्या समीक्षकांनी समीक्षण करतांना जराही तोल ढळू दिलेला नाही असे मला वाटते. बाकी, मर्ढेकर,पु.शी.रेगे,माधव आचवल, गंगाधर गाडगीळ, वा.ल.कुलकर्णी. द.भी.कुलकर्णी, डॉ.सुधीर रसाळ, डॉ.बाळकृष्ण कवठेकर या सर्वांनी साहित्य समीक्षेच्या बाबतीत भान ठेवलेले आहे असे मला वाटते.

मराठी साहित्य विषयाचा तपशीलवार अभ्यास करणार्‍यांना 'मराठी साहित्य समीक्षेची मूलतत्त्वे' हा एक स्वतंत्र पेपर असायचा. जराशी शोधाशोध केली तर लेखक आणि समीक्षक यांची गुंतागुंत संदर्भाद्वारे जरा मोकळी करता येईल असेही वाटते.

-दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Aug 2011 - 6:37 pm | बिपिन कार्यकर्ते

रोचक लेख आणि चर्चा!

काकुतानी बाईंचे उदाहरण वाचताना, त्या केवळ फटकून राहतात म्हणून तटस्थ आहेत असे नसावे असे वाटले. कधी कधी अति फटकून राहण्यामुळे तुसडेपणा येऊन त्यायोगे तटस्थता ढळण्याची शक्यता आहेच.

धनंजय's picture

15 Aug 2011 - 9:15 pm | धनंजय

चर्चा आवडली