शिट्टी अन सोडा

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
2 May 2011 - 9:57 pm

उन्हाळा धगधगू लागला की पोटातली भगभग थंड करण्याकामी चौक गाठावा लागायचा. तिथे मन्सूरभाईचा दाढीमय चेहरा आपल्या हातगाडीभोवती जमलेल्या गर्दीतून कधीतरी झळकायचा. तो सतत आपल्या कामात गर्क असलेला दिसायचा. भर उन्हात काहिली कमी करावी म्हणून पावलं आपोआप मन्सूरभाईच्या गाडीकडे वळायची.
त्याची हातगाडी म्हणजे रंगीबेरंगी थंड पेयांचं आगरच होतं. बर्फाचा तुकडा किसून छोट्या ग्लासात काडीसह दाबायचा व अखंड बाहेर काढून त्यावर तिरंगी वेगवेगळ्या बाटल्या उपड्या करुन रंगकाम केले की झाला दिलचाहा बर्फाचा गोळा तयार! तो काडीने आडवा धरुन त्यातील थंड गोड पाणी सुर्रऽऽ करुन पिणे म्हणजे रणरणत्या दुनियेत शितलतेचा अमृतवर्षाव ठरायचा. ती शीतल गोडी चाखायला आबाल वृद्धांबरोबरच तरुण पोरींचीही तिथे झुंबड उडे. प्रत्येकाच्या फर्माईशीनुसार खट्टा मिठा, तिरंगा मिठा, ब्लैक स्टॉबेरी, काला खट्टा, ऑरेंज मिठा अशा हरतऱ्‍हेच्या स्वादात बर्फाचा गोडमिठाळ चवबंदिस्त गोळा मिळे.
त्याच्याकडे अजून एक चमत्कारीक शीतपेय होतं की ज्यासाठी आम्ही आटापिटा करीत मन्सूरभाईच्या गाडीभोवती गराडा टाकायचो. आमची टवाळखोर झुंड लांबूनच दिसली की बाया बापुड्या, तरुण पोरी भरारा बाजूला होऊन गाडी उघडी पाडीत. मग आम्ही आमच्याच गुर्मीत शर्टाची बटने काढून गळ्यातल्या साखळ्या उडवित त्याच्या हातगाडीवर यायचो. मन्सूरभाई तसा गरीब माणूस. आम्हीही काही फार श्रीमंत नव्हतो. परंतु त्याला आमची टोळधाड आलेली पाहून धडकीच भरे! कारण आमच्यासारखं पिपासू गिऱ्‍हाईक म्हणजे त्याचा खासा गल्ला! त्यामुळे आम्ही दिसताच तो दुप्पट वेगाने कामाला लागायचा...
आमचं शिट्टीच्या सोडावॉटरवरचं प्रेम त्याला पूरेपूर ठाऊक होतं. मग तो पलिकडच्या बॉक्समधून भराभरा दहा बारा सोडा वॉटरच्या विशिष्ट आकाराच्या बाटल्या बाहेर काढायचा. हातगाडीच्या मधोमध ठेवलेल्या आडव्या सिलिंडर मधला गैस ऑन करुन मशिनमध्ये दोन बाटल्या आडव्या उभ्या फिक्स करुन उजव्या हाताने हँडल गरागरा फिरवायचा. त्यामुळे सिलिंडरमधील गैस बाटल्यात भरला जाऊन घडाळासारख्या डायलवर बाटल्यांमधील वाढते प्रेशर दिसे. इच्छित आकडा गाठला की बाटल्या सोडवून थंडाव्याला ठेवायचा. अशी बराचवेळ बऱ्‍याच बाटल्यांची उचल पटक करेपर्यँत त्याला अक्षरशः घाम फुटे.
नंतर एक चिल्ड बॉटल बाहेर काढून उभी ठेवायची. तिचा आकार वेगळाच असे. ती बॉटल तिच्या मानेवर चेपवलेली असायची व तिच्या अरुंद गळ्याला एक रबरी टणक गोटी आतील सोडा वॉटरच्या गैसयुक्त दाबाने इतकी फिट्ट बसलेली असे की साध्या बोटाच्या दाबाने आमच्यातील कोणताही पैलवान तिला खाली दाबू शकायचा नाही. त्याकरिता मन्सूरभाईकडे एक खास सागवानी विटी किंवा खुट्टी होती. ती बाटलीच्या तोंडात घालून वरून तळहाताने बुक्की मारायची, फुस्स आवाजाने गैस बाहेर पडू लागल्यावर मन्सूरभाई अशाप्रकारे बेताने खुट्टीवर दाब देई की सुंईऽऽऽ अशी जोराची शिट्टी वाजे. हीच त्याची खासियत. शिट्टीचा आसमंत चिरणारा आवाज कानात साठवून घेत ग्लासात फसफसणारा सोडा घटाघटा पिणे किंवा सरळ ती बाटलीच तोंडाला लावून एका दमात संपविणे ही खरी मर्दानगीची निशाणी वाटायची. घोटघोट रिचविण्यात सोडा पिण्याची मजा नसते. त्यातील गैस असंख्य बुडबुड्यांतून बाहेर पडण्यापूर्वीच उदरात सामावून घ्यावा लागतो, आणि मग नाकतोंडकानातून बाहेर पडणाऱ्‍या ढेकरांच्या वाफा सर्व बाजूंनी अनुभवून सोडणं ही तर खरी मूळ सोडापाण्याची नशा!
अशा चढाओढीनं बाटल्याच बाटल्याच रिचवणे व सुंई सुंई शिट्ट्या ऐकत राहणे असा कडक उन्हाळ्यातील आमचा एक ठरलेला खाक्या असायचा. एवढ्या बाटल्या प्राशून निघतांना पोट पार सपाट झालेलं असायचं अन् खिसाही उताणा पडलेला दिसायचा...

समाजजीवनमानअनुभवआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

3 May 2011 - 5:41 am | आत्मशून्य

आइस्क्रीम सोडा प्यायला खरच मज्या यायची शाळेत.... आणी सोबत बर्फाचा गोळा म्हणजे राडाच.

टारझन's picture

3 May 2011 - 10:42 am | टारझन

क्या दिवटे साब .. बडे दिणो के बाद ..
मधल्या काळात तुमच्या लेखांची खुप उणिव जाणवली .. :) अजुन येऊ द्यात विविधांगी लेखण

चिगो's picture

3 May 2011 - 4:25 pm | चिगो

सोडा-लेमन नाही तेवढं आवडत.. पण बर्फाचा गोळा आणि आईस-प्लेट खायला भौत आवडायचं, अजूनही आवडते..
बढीया लिहीलयंत.. थंडगार आठवणी जाग्या झाल्या...

गणेशा's picture

3 May 2011 - 4:52 pm | गणेशा

छान लिहिले आहे .. आवडले