शब्दांच्या पलिकडले !

स्पंदना's picture
स्पंदना in जनातलं, मनातलं
6 Mar 2011 - 8:50 pm

मंडळी नुकत्याच तुम्ही 'शरद्जींच्या' दोन कविता वाचल्या. त्याच दोन पत्रांची उलगड माझ्या शब्दात, 'गुरु आज्ञा शिरसावंद्य मानुन' मी इथे द्यायच धाडस करते आहे. प्रयत्न गोड मानुन घ्यावा!

बरचस सांगता येत नाही! बरचस बोलताही येत नाही ! ना डोळ्यातून डोकावण्याची मुभा असते या 'बरचस' ला! पण हे ' बरचस ' तुटत ही नाही, मिटत ही नाही ! मंडळी कल्पना करा, पन्नास वर्षापुर्वी गुंतलेल्या दोन जीवांची! बरचस जीवन उंबर्‍याच्या आत व्यतित करणार्‍या तुमच्या माझ्या आज्जीच्या वेळच्या काळाची! कुठ काहिस वादळ उठल , पण त्या वादळाला बाहेर येण्याची मुभा नसल्यान मनाच्या आतच; त्यान तांडव मांडल्यान व्याकुळ 'ती 'अन व्याकुळ 'तो'! आतल्या आत आवर्तीत होणाऱ्या या भावनेच पुरेपूर दर्शन घडत या दोन कवितात.
त्याच पत्र याव, न याव हा गुंता तिचा तिलाच सुटता सुटत नाही आहे. पहिल्या प्रेमाच , वा त्या काळाला अनुसरून घडलेल्या एकमेव प्रेमाच हे रूप! असं झालं असत तर ? या प्रश्ना पाशी येऊन थांबणार ! वारंवार गिरक्या घेत राहणार! मनाच्या आतील एक वावटळ !
पहिल्या पत्रात मजकुराचा कुठेही उल्लेख न येता 'त्याच दिसण , त्याच वागण ' उलगडत जात.

पत्र पत्रासारखेंच
पण त्यांतहि
काना-मात्रा-वेलांटीची ऐट गुंतवणारी,
अक्षरांचा उभट गोलपणा आश्वासन देणारा,
सुटे पणांत थोडी बेपर्वाई,
कांहीसा मोकळेपणा

आहे माणूसच पण तरीही रुबाबदार! तिला भुरळ घालणाऱ्या व्यक्तिमत्वाचा. लुभावणारा. जडलेला जीव दोघांच्याही लक्षात येण्या आधीच कदाचित त्यांच्या मध्ये दुरावा आला असावा. त्या पत्रातल्या औपचारिक मजकुरातही ती पहाते ते त्याचे स्वभाव विशेष! ऐटदार, थोडस बेफिकीर पण तरीही आश्वासित व्यक्तिमत्वाचा तो! त्याच्या या व्यक्तीमत्वावरच तर भाळली असावी ती! अन आपणाला ती आवडली हे दाखवण्याचा त्याचा मोकळे पणा तिला भावून गेला असावा.

प्रथम सप्रेम नमस्कारच
पण उपचार वगळणारा, "स"ला सार्थ करणारा;

काय सांगाव या भावने बद्दल? शब्द तेच पण आतला अर्थ फक्त तिच्या साठीचा, तिला जाणवणारा, कदाचित प्रथमच उच्चारलेला. आजकाल प्रेमाच्या नावाखाली जो धुमाकूळ चालतो त्याच्या अगदी विरुद्ध भावना या! कदाचित टोकाचा ठरावा असा संयम जाणवतो या सारया कवितेत!

विरामचिन्हें-अविरामचिन्हें
बरेंचसें झाकणारीं;
तुटक तुटक सांगणारीं;
शेवटी लोभ असावा या विनंतींतहि
"असावाच"चा आर्जवीपणा
आणि आग्रह: जाणत्यालाच समजणारा.

स्वत:च्या भावनेचा जाहीर उच्चार करणं हे ज्या परिस्थितीत ती आहे त्या परिस्थितीत अशक्य प्राय आहे. अन ही असली भावना मांडायची तरी कशी? या गोंधळामुळच की काय बराचसा मजकुर तुटक तुटक वाटतो. किंवा ताटातुट दर्शविणारा ही असेल हा तुटक तुटक पणा! पण मग त्याच्या या भावनेची साथीदार तरी कोण? तिच्या शिवाय आणखी कोणाकडे उच्चारेल तो हे सर्व? म्हणूनच तिला सांगायचा अट्टाहास . अन जनात जरी साध्य नसलं तरी मनात तरी हा लोभ अभंग ठेव हीं विनवणी ! आर्त होऊन लिहिलेलं, मनाचा एक भिजला कोपरा दाखवणार असं हे पत्र वाचून ती हीं तेव्हढ्याच ओढीन लिहायला बसते. पण लिहिणार काय? औपचारिक लिहिता लिहिता तो बरच सांगून गेला, पण हिच्याकडे ते औपचारिक शब्द सुद्धा साथीला नाही आहेत, . जणु अजुन तिची तिलाच ही भावना पुरी उलगडलेली नसावी की काय? अश्या मुग्ध अवस्थेत लिहाव तरी काय? त्याच पत्र आल या कल्पनेनही धपापणार उर सावरत, तरीही ती पत्र लिहावयास बसते. मायन्यातला मजकूर लिहिल्यावर काय लिहाव हे न सुचल्यान सार पत्र ती कोरच ठेवते

सप्रेम प्रणाम
विनंति विशेष;
पुढे लिहावया
उरला न श्वास.

विनंति विशेष ...
मधे पत्र कोरें !
कोर्‍यांत अव्यक्त
रामायण सारें.

निदान दाखविण्या साठी चे चार शब्द लिहायलाहीं तिचा श्वास अडखळतो. आशा एकच ! तो समजेल . कोर पत्र जरी नाही समजला तरी निदान शेवटी लिहिलेल्या,' लोभ असावा नंतर कापऱ्या हाताने तिची सही नेहमी सारखी नाही आहे' हे त्याला उमजेल हीं भावना . त्यातही लोभ असावा इतुकेच.....तीही मागताना तेव्हढंच मागते की तुझ्या मनात खोलवर कुठे तरी माझ्यासाठी ..... जागा , ओलावा राख. बस इतकंच ! दुसर काही नको.

लोभ असावा,हें
इतुकें शेवटी --
इतुकेंच --- थांबे
हात सहीसाठी :

..जाणो वाचणारा
जाणेल का पण ?
व्यथेत कापलें
सहीचें वळण.

कदाचित हीं पडखाऊ वृत्ती खुप जणांना नाही भावायची. कुणी म्हणेल वेळीच त्यांनी योग्य तो निर्णय घेऊन हीं अवस्था टाळायची होती! कुणी म्हणेल जे आयुष्य समोर आहे त्यात तिने रममाण व्हाव. कुणी म्हणेल जर लग्न झालं असेल तर हीं प्रतारणा ठरू शकते.
पण मंडळी हे मन आहे, स्वत:च्या सुद्धा ताब्यात न राहणार! अन या भावना आतल्या आत पुन्हा पुन्हा हाताळत राहणार! त्यावर ताबा मिळवण जे रथी-महारथींना नाही जमल ते या दोन जीवांना कस जमाव? आपल्या भावनेन घरच्यांना, समाजाला ढवळून काढायला ते कृपण नाही आहेत, ना हीं पळून-पळवून न्यायला ते दोघे स्वत:ला राजपुत्र वां राजकन्या समजताहेत. एका साध्या मनाच्या दोन जीवांचा हा आतल्या आत चाललेला स्वत: बरोबरचा संघर्ष, घालमेल! कवियत्री 'पद्मा' सार्थ शब्दात रंगवताहेत दोन विरहित जीवांचा शब्दाविना संवाद साधण्याची तडफड.!

__/\__
अपर्णा

कलावाङ्मयसाहित्यिकसमाजआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

मितान's picture

6 Mar 2011 - 9:09 pm | मितान

मस्त ! :)

नगरीनिरंजन's picture

6 Mar 2011 - 9:59 pm | नगरीनिरंजन

खूप छान! पाकळी पाकळी उलगडून लिहीलंय!

हरिप्रिया_'s picture

7 Mar 2011 - 9:23 am | हरिप्रिया_

खूप मस्त लिहिलंय...
इतक सुंदर रसग्रहण..मला तर आवडत्या मराठीच्या बाईंच्या तासाची पण आठवण झाली...

अवलिया's picture

7 Mar 2011 - 2:16 pm | अवलिया

मस्त !

पैसा's picture

8 Mar 2011 - 8:15 pm | पैसा

अपर्णाने नेहमीप्रमाणे अगदी कवितेतेल्या 'ती' च्या मनात शिरून कविता उलगडून दाखवली आहे! त्यासाठी अपर्णा, तुझं अभिनंदन! रसग्रहण अगदी मनापासून आवडलं.

कवयित्री 'पद्मा' म्हणजे 'पद्मा गोळे' यानी १९४७ ते १९६८ या २० वर्षांत फक्त ४ कवितासंग्रह लिहिले. पण सुरुवातीच्या २ संग्रहांमधे हळुवार, स्वप्नाळू प्रेमकविता आहेत. त्यात 'निहार' आणि 'आकाशवेडी' हे २ कवितासंग्रह खूप प्रसिद्ध आहेत.

या २ कवितांमधे पद्मांनी त्या काळातल्या, म्हणजे ५०/६० वर्षांपूर्वी च्या पद्धतीनेच, अगदी हळूवारपणे नायिकेच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या काळात कोणत्याच भावना चारचौघात व्यक्त करायची पद्धत नव्हती. मग नायिकेला मिळालेल्या पत्रात 'सप्रेम' आणि 'लोभ असावाच' या २ शब्दांकडेच तिचं लक्ष गेलं आणि तिने कदाचित उत्तर म्हणून जे पत्र लिहिलंय, ते पत्र 'कोरे' असावे यात विशेष ते काय? ते ज्याला उद्देशून लिहिलंय त्याला तर कळेलच!

सुहास..'s picture

14 Mar 2011 - 6:46 pm | सुहास..

ज ह ब ह रा र स ग्र ह ण !!

अजुन येउ देत ग !!

स्वछंदी-पाखरु's picture

14 Mar 2011 - 6:56 pm | स्वछंदी-पाखरु

काय अभ्यास आहे हो तुमचा!!! सुरेख छानच लिहले आहे........

आजच आईला पत्र लिहितो .......

स्व पा
साता समुद्रापार........