वषाट

मुक्त's picture
मुक्त in जनातलं, मनातलं
5 Mar 2011 - 1:33 am

परशा आपल्या शेळ्या घेवुन आज लौकरच आला होता. परश्याने शेळ्या वाडग्यात कोंडल्या. तान्ह्या-पार्‍हाट्या शेळ्या वेगवेगळ्या बांधल्या. वाडग्याचा झोपाटा पध्दतशीर लावुन झपाझप टांगा टाकीत म्हणजे जवळजवळ पळतच तो घराकडे निघाला.

कधी घरी जाईन अशी अनावर घाई त्याला झाली होती. त्याला कारणही तसेच घडले होते. आज दुपारी ओढ्याला पाणवठ्यावर हिवर्‍याच्(एक गाव) एक शेळ्यांचं खांड आलं होतं. त्या शेळ्यांचा आणि परशाच्या खांडाचा मेळा झाला होता. त्या गडबडीत हिवर्‍याच्या खांडातलं एक बकरु चुकून परशाच्या खांडात आलं होतं.

परशा घरी आला त्यावेळेस तात्या, परशाचा बाप ओट्यावर बिडी फुंकीत बसला होता. सर्वांगावर पिठ माखल्यामुळे तो पांढर्‍या अस्वलासारखा दिसत होता. तात्याची गावात एकमेव पिठाची चक्की आहे. त्याचे नाव लक्ष्मण महादु आहे पण घरी दारी सर्वांचा तो तात्या आहे. तात्या एक नंबरचा महाबिलंदर माणुस, सगळ्या गावावरुन ओवाळून टाकलेला. नांदनारीला पळायला आणि पळनारीला नांदायला लावणारा माणुस म्हणजे तात्या. बोलुन चालुन अघळपघळ असलेला तात्या बोलता बोलता कधी कुणाला डाव टाकील ते समोरच्याला चितपट झाल्याशिवाय कळायचे देखील नाही. बायांच्या बाबतीत जरा सैल असलेल्या तात्याचा बुक्यावाल्या बायांवर विशेष लोभ आहे. गावात अशा काही ठराविक ठिकाणी तात्याचे खटके आहेत. तात्याचे तिथे राजरोस येणे जाणे चालु असते. जसा सणाच्या दिवशी देवांअगोदर दैत्याला नैवेद्याचा पहिला माण असतो तसे लग्न जमवाजमवीची, जमीन वाटपाची अथवा कुणाची भांडणं-मारामार्‍या/वादावादीच्या बैठकीत तात्याला अग्रपुजेचा मान असतो. कोणात भांडणं लावुन दे, मारामार्‍या घडव असे त्याचा नित्याचा उद्योग. हे सर्व घडलेच तर कोर्टकचेर्‍या-वकिल या गोष्टींनाही त्याचा पुढाकार. नेहमीच अशील पुरवत असल्याकारणाने तात्याच्या तालुक्याला मोठमोठ्या वकिलांच्या चांगल्याच ओळखी आहेत. तसा तो 'झाडाखालचा वकिल' म्हणुन उभ्या गावात सुपरीचीत आहे. एकुनच गाव तात्याला वचकुन आहे.

धावपळ करीत परशा घरी येईपर्यंत त्याला दम लागला होता. दम टाकीत तो तात्यासमोर उभा राहीला. तात्याने त्याच्याकडे पाहीले न पाहीले करुन बिडीचा लांबलचक झुरका मारला नि नाकातुन धुराच्या नळकांड्या काढीत बोलला.

"कारे, आज लै येरवाळीच आला?"

"..........."

"आजुन दिवस कासराभर वरे न तु घरी आलाय. काय भानगडे?"

"तात्या, आज चुकुन याक बकरु आलय आपल्या खांडात."... परश्या.

तात्याने सावरुन बसत विचारले. "कॉन्चं?".

"हिवर्‍याचं." परश्या.

"हिवर्‍याचं, कॉन्चं?". ..तात्या.

"तो बुटनेर नाहीका?".... परश्या.

"कोन्तारे?"... तात्या.

"ते... इजदर्‍याच्यावर वावरं नाही का? शिवंच्या तिकुन...... परश्या.

" हां.... हां. त्या बुटनेरचय का?"... तात्याच्या डोळ्यात चमक आली.

झटदिशी तात्याने विचारले. " काये?.. पाठे का बोकड?"..

" बोकडे "... परश्या.

एवढे बोलणे झाले. क्षणभर तात्याने आभाळाकडे पाहीले आणि झटकन बिडी भुईत मुरगाळली. त्याचे डोळे लकाकले. डोक्यात विज चमकून गडप झाली. तसा तो परश्याला म्हणाला.

"परश्या.. गड्या एक काम कर आता....."

"काय?". परश्या.

" पटकण जा. जिजाबाला सांग, आज आमच्या घरी रातच्याला वषाट हाये म्हणुन. जेवायला ये म्हणावा. तसाच पुढं जाय आन भाऊदुकानदाराला सांग. मंग सावकाराच्या घरुन तसाच खालच्या आळीला जाय. बाळू वाण्याला, सुका म्हाळूला, द्त्तूबाला सांग राच्च जेवायला या म्हणावा. काय? "

हा म्हणुन परश्या निघाला तितक्यात घाईघाईने, तात्या म्हणला..

"अरे ये बांबलीच्या. थांब निट ऐकुन घे. लई बोभाटा नको करु. सगळ्यांना बईतवार सांग. निरोप देवुन लगेच घरी ये. नाहीतर बसशील तिकडच खेळंत ".... आन येता येता सेल्समन्लाबी बोलावल्य म्हणुन सांग......

हां हां म्हणत निरोप द्यायला परश्या धुमाट पळत सुटला.... आणि तात्याही उठला. अजुन बरेच कामे करायची होती.

तात्याने हातपाय धुतले. तोपर्यंत चांगलच अंधारुन आलं होतं. कपडे घालुन तो सरुबाईच्या अड्डयावरुन खंबा आणायला निघाला होता पण परश्याला एक महत्वाचे काम सांगायचे राहीले होते. म्हणुन तो परश्याची वाट पहात बसुन राहीला. सरुबाई ही एक रांडाव बाई होती आणि तीची गावातच बाजुला हाडकीत हातभट्टी होती. सरुबाई तात्याची खास होती नि तात्या सरुबाईचा पेश्शल होता.

तितक्यात परश्या सगळ्यांना आवातनं देवुन धापा टाकीत घरी आला. तात्याने परशाला घरात बोलावले आणि खाजगी आवाजात विचारले.

"आला का? सगळ्यांला आवातनं देवुन?" .. तात्या.

"हां."

"मंग आता एक काम कर. जाफरभाईच्या घरी जाय आण परस्पर सल्याला घेवुन जाय वाडग्यात. आन् ते हिवर्‍याच बकरु कापुन आन घरी.सल्ल्याला सांगु नको ते चुकारीचं बकरु आहे म्हणुन. काय?" तात्या. आपल्याच घरात इकडे तिकडे पहात घोगर्‍या आवाजात पुढे बोलला.

"सुमडीत काम झाल पाहीजे. वाडग्याच्या आजुबाजुला घरं हायेत. कोन्ला बकराचा आवाज नाही आला पाहीजे."

आता हे ऐकल्यावर परश्या गडबडला. कारण बकरु कापायच म्हणजे ते ओरडनारच. पण तात्याला अशा फालतु शंकांमधे बिलकुल रस नसतो. उलट एखादी शिवी बसेल म्हणुन परश्याने काहीही न बोलता जाफरभाईच्या घराचा रस्ता धरला. आता सगळीकडे अंधारगुडुप झाला होता. सलीम्/सल्ल्या हा जाफरभाईचा छोकरा. परश्याचा समवयस्क.

परश्याने सल्ल्याबरोबर जावुन वेळेत बकरु कापून आणले. तात्यानेही सरुबाईच्या अड्डयावरुन खंबा आणला. सर्व आमंत्रित मेजवानीला उपस्थीत होते. गप्पा, हसण्याखिदळण्याचा महापूर आला होता. सर्वांनी मदिरा आणि मटनावर तडाखा उठ्वला होता. आमंत्रित वरवर तात्याचे गुणगान गात होते नि तात्याला धन्यवाद देत होते पण कापल्या करंगळीवर न मुतनारा तात्या आज एवढा कसा फळला? म्हणुन मनातल्या मनात अचंबीत होत होते. अर्ध्यारात्रीपर्यंत तात्याची प्यार्टी चालली होती. गाव सामसुम होते. ठरल्याबरहुकुम सर्व गोष्टी घडत होत्या. आणि तेही खिशास काहीही तोषीस न पडता. त्यामुळे तात्या एकदम खुशीत होता.

***********************************************
दुसर्‍या दिवशी सकाळी.

सकाळी सकाळी वेशीतल्या वडाखालच्या पारावर नेहमीचे म्हातारे आपापले उदयोग करत बसले होते. गंगाबाबा आपल्या सफेद भरघोस मिशाशी चाळा करण्याचा आपला लाडका उदयोग करत होता. काशाबाबा घोंगडीच्या दशा हातावर वळीत होता. मधुनच मोठ्याने अभंगाची एखादी ओळ गुणगुनत होता. दादापहिलवान जाड काचेच्या चष्म्यातुन, दंतविहीन बोळके उघडे ठेवुन उगीच इकडे तिकडे बघत होता. संपतगुर्जी खाली पहात कान कोरण्यात गुंग झाले होते. दाजी हवालदार आपला अगडबंब देह घेवुन नुसताच मोठमोठ्याने श्वास सोडत बसला होता.

तेवढ्यात खालच्या बाजुने बारवेकडुन कुणीतरी घाईने येताना दिसले. ती व्यक्ती चढ चढून, स्मशानभूमीला वळसा घेणार्‍या रस्त्याने थेट वेशीत पाराजवळ आली. त्याच्या चेहर्‍यावर, मानेवर घामाच्या धारा लागल्या होत्या. हाश्शहुश्श करत त्याने वर हात करुन सगाळ्यांना रामराम ठोकला आणि उपरण्याने घाम पुसत पारावर टेकला. तो हिवर्‍याचा बुटनेर होता. पारावरील सर्वांनी आपापले उदयोग थांबवुन रामराम म्हटले.

"लक्षीमन महादुचं घर कुडशिक आलं?." बुटनेर घाईला आला होता. पारावरील सगळे एकमेकाकडे पाहू लागले.

"हे काय इथच. मारुतीच्या देवळाच्या त्याआंगुन. चक्कीच्या शेजारचं त्याचच. " मिशीवरचा हात देवळाकडे करुन गंगाबाबा बोलला.

" का? काय झालं?".. दाजीने सुस्कारा टाकीत विचारले.

" काही नाही. आमचं बकरु आलय काल त्याच्या खांडात." बुटनेर चुळबुळ करीत बोलला.

"म्हंजी?". दादा पहिलवानाच्या बोळक्यातुन आवाज घुमला.

"ते... काल मेळा झाल्ताना. वढ्यावं. तव्हा फाफलून आलय ते लक्षीमनच्या खांडात." बुटनेर.

"अरारारा मंग कालच यायचंना बकरु न्ह्यायला.".. संपतगुर्जी हळहळले. पारावर क्षणभर वातावरण गंभीर झाले.

" अवो. काल कसं येनार. पोरानी मला पार राती सांगितलं. म्हणलं जावु सकाळीच. " बुटनेर.

"मंग आता भेटंल बकरु तुम्हाला." असे म्हणुन गंगाबाबा अस्सा फिस्सकन हसला की पारावर सगळेच खिदळायला लागले. दादा पहिलवान घश्यातुन खीखी करुन आपले थुलथुलीत पोट हलवत हसला. दाजी नुसताच सुसु करत अंग गदागदा हलवत हसला. संपतगुर्जीने एकदा आभाळाकडे एकदा बुटनेरकडे पाहुन घेतले नि परत त्यांनी भुईवर नजर भिडवली. काशाबाबा मात्र नुसताच एकदा बुटनेरकडे एकदा सगळ्यांकडे पाहुन हसत होता कधी गंभीर होत होता. ही काळी एक मधली चर्चा त्या काळी पाचवाल्या काशाबाबाच्या नुसतीच कानावरुन जात होती. कारण तो ठार बहिरा होता.

हा सगळा रागरंग पाहुन बुटनेर मात्र गोंधळला. झटकन उठून तो तरातरा चालत देवळाची, चक्कीची खुण लक्षात ठेवुन तात्याच्या घरी आला. तात्या नुकताच झोपेतुन उठला होता. परशा भाकर बांधून वाडग्याकडे निघायच्या तयारीतच होता. रामराम शामशाम झाला. तात्याने पाहुण्याला येण्याचे प्रयोजन विचारले. चुकारीच्या बकराबाबद मात्र त्याने कानावर हात ठेवले. वरुन परशाचा हवाला दिला. खात्रीसाठी परश्याबरोबर जावुन वाडग्यात जावुन बघुन घे असे सांगायलाही विसरला नाही. तात्याने बायकोला पाहुण्यासाठी चहा टाकायला सांगितला.

बुटनेरला मात्र चहा प्यायचाही धीर नव्हता. तो परश्याला घेवुन तडक वाडग्याकडे निघाला. रस्त्यात बुटनेरने परश्याला खोदुन्खोदुन बकराबद्दल विचारले पण परश्याने ताकास तुर लागून दिला नाही की तो बधला नाही. सावाप्रमाणे बुटनेरबरोबर चालत राहीला.

दोघेजण वाडग्यात आले. परश्याने झोपाटा उघडला तर कालचे चुकारीचे बकरु शांतपणे वाडग्याच्या एका कोपर्‍यात बसले होते. बुटनेरने त्याचे बकरु बरोबर ओळखले. पटकन खिशातून दावे काढुन ते बकराच्या गळ्यात बांधले नि तो हिवर्‍याच्या दिशेने निघाला.

एवढा प्रकार होईपर्यंत काल रात्री काय घोळ झाला याची पुरेपूर खात्री परश्याला झाली आणि तो तसाच वर हात करुन जोरजोरात ओरडत घराकडे पळत सुटला.

समाप्त.

कलाकथाविनोदप्रकटनलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

५० फक्त's picture

7 Mar 2011 - 11:33 am | ५० फक्त

आयला, मुक्त आहात म्हणजे कुणाच्याही मुक्त बोकडाचा बळी देउन वषाट करणार आहात काय ?

छान सुरुवात आहे, आणि ही टिझर टाकायची आय्डिया आवडली.

प्रतिसाद भाग - २

बरं झालं बगा, फुकाचं त्या बुटनेराचं बोकड न्हाय मारला ते, काय व्हतंया आपली नी परक्याची बोकडं वळखाया आली न्हाय ना असं व्ह्तंय,

परशाचं लगीन बिगीन झालं नाई जनु, मग करा बगु लवकर, काय हाय, हे असं लकश नसणं त्येच्यामु़ळंच व्हतंय. ( सव्ताचा अनॉभव हाये,))

बाकी, पारावरची गोष्ट भारीच जमलीया. चालु देत काय हाय तुमी लिवा आमि वाचु टला ट कला क करुन.

लवंगी's picture

5 Mar 2011 - 7:39 am | लवंगी

भाषाशैली आवडली.. पुढले भाग पटापट टाका

पैसा's picture

5 Mar 2011 - 8:02 am | पैसा

गावकरी काय करामती करतात बघूया!

प्रास's picture

6 Mar 2011 - 5:17 pm | प्रास

हे तर वळणावळणावर धक्के देणारं लिखाण.....

मजा आली.... इरसाल गावकर्‍यांचे व्यक्तिचित्रण छानच जमलेय....

लिहा, तुम्ही तुमच्या इतक्या वर्षात ऐकलेल्या सगळ्या कथा लिहा..... आम्ही वाचायला आहोतच!

पुलेशु

नगरीनिरंजन's picture

5 Mar 2011 - 10:47 am | नगरीनिरंजन

आवतान तर लै झ्याक दिलंय, वातड निघनार नाय असं वाटंतय खरं.

विंजिनेर's picture

5 Mar 2011 - 10:56 am | विंजिनेर

फुडं काय व्हनार?

श्रीराम गावडे's picture

5 Mar 2011 - 12:41 pm | श्रीराम गावडे

द मा मिरासदारांचा नाना चेंगटच रे हा तात्या. सुंदर शैली.
हे बिलंदर लेखन लवकर बाहेर येउ द्या.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 Mar 2011 - 5:10 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मला पण मिरासदारांची आठवण झाली.
पु.ले.शु.

गुड्डु's picture

5 Mar 2011 - 2:45 pm | गुड्डु

खुप छान. पुढे लवकर लवकर लीहा.वाट बघतेय.

sneharani's picture

5 Mar 2011 - 2:49 pm | sneharani

पुढचा भाग येऊ दे पटकन!

झाक लिवलय, पुढच येउ दे बिगी बिगी,

चिगो's picture

5 Mar 2011 - 3:49 pm | चिगो

वशाट लय आवडतं...
(मुक्त बोकड) चिगो

सुहास..'s picture

5 Mar 2011 - 4:02 pm | सुहास..

क्लास सुरुवात !!

प्रदीप's picture

5 Mar 2011 - 6:28 pm | प्रदीप

लेखनशैली छान आहे, नेमक्या शब्दात सगळे उभे केलेय. पुढील भागांची वाट पहातो.

पर्नल नेने मराठे's picture

5 Mar 2011 - 6:32 pm | पर्नल नेने मराठे

तात्याचे वर्णन तर सुरेखच !!!

शिल्पा ब's picture

6 Mar 2011 - 11:55 am | शिल्पा ब

पुढाल्ली गोस्ट कदी?

नांदनारीला पळायला आणि पळनारीला नांदायला लावणारा माणुस म्हणजे तात्या.
या एका वाक्यातच तात्याची कुंडली समजते. :)

क्रमशःची इतिश्री लवकरच होउ द्या.

शिल्पा ब's picture

6 Mar 2011 - 12:24 pm | शिल्पा ब

असेच म्हणेन...पण एखादा डिस्क्लेमर टाकायचा राहीलाय असं वाटतंय का?

विनायक बेलापुरे's picture

7 Mar 2011 - 2:09 am | विनायक बेलापुरे

शेवट चांगलाच धक्कादायक झालाय !
नांदनारीला पळायला आणि पळनारीला नांदायला लावणार्‍या तात्याला त्याच्या घरच्यानेच पळायला लावले.

जगाला पळायला लावणार्‍या "भाई" ना "दादा" भेटला ! ;)

मस्त !!

पैसा's picture

6 Mar 2011 - 5:16 pm | पैसा

कथा इथेच पूर्ण करून सगळ्यांची फिरकी घेतली काय! असो. कथा मस्त जमली.

स्पा's picture

7 Mar 2011 - 8:31 am | स्पा

हॅ हॅ हॅ

लय भारी रे....

डावखुरा's picture

6 Mar 2011 - 5:42 pm | डावखुरा

अप्रतिम....

श्रीराम गावडे's picture

6 Mar 2011 - 5:47 pm | श्रीराम गावडे

चांगलीच भट्टी जमलीन काय.
पण शेवट जरा अनपेक्षीत आहे.

इंटरनेटस्नेही's picture

6 Mar 2011 - 8:01 pm | इंटरनेटस्नेही

अतिशय सुंदर जमली आहे कथा. आवडली. :)
पुढील लेखनासाठी शुभकामना.

-
(वषाटप्रेमी) इंट्या सरपंच.

कलंत्री's picture

6 Mar 2011 - 9:31 pm | कलंत्री

लेख जबरा झालेला आहे. लेखाची भाषा आणि ओघ एकदम मस्त.

इन्द्र्राज पवार's picture

6 Mar 2011 - 10:19 pm | इन्द्र्राज पवार

अगदी जातिवंत अनुभव आहे....आणि लिखाणही त्याच कुळीतील असा फक्कड बेत जमवून आणलाय तुम्ही.... मजा आली वाचताना...विशेषतः संवादामुळे, असे वाटत राहिले की प्रत्यक्ष ते संवाद आपल्याच हजेरीत सुरू आहेत.

काही खटकलेल्या बाबीही सांगणे गरजेचे आहे....(अशासाठी की तुमच्याकडे मिरासदारी टच आहे, आणि तो तुम्ही आणखीन फुलवताना वाचकांच्या अशा सूचनाही ध्यानात ठेवाव्यात....)

१. "अरे ये बांबलीच्या. थांब निट ऐकुन घे. लई बोभाटा नको करु. सगळ्यांना बईतवार सांग. निरोप देवुन लगेच घरी ये. नाहीतर बसशील तिकडच खेळंत ".... आन येता येता सेल्समन्लाबी बोलावल्य म्हणुन सांग......

~ इथे "बांबलीच्या....लई बोभाटा....बईतवार..." अशी भाषा संभाषणात वापरणारा तात्या 'नीट ऐकून घे.." असे 'शुद्ध' म्हणणार नाही. मी असली व्यक्ती पाहिली आहे....ती म्हणते, "थांब, सुशेगात ऐकुन घे..." तसेच 'निरोप' च्या ऐवजी "सांगावा' हवे होते....शिवाय हा 'सेल्समन' कोण? पुढे तर कथेत तो कुठे आलेलाच नाही....आणि आलाच तर तात्या त्याला 'सेल्समन' इतके शुद्ध पुकारतील?

२. "...ऐवढ्यात खालच्या बाजुने बारवेकडुन कुणीतरी घाईने येताना दिसले. ..."
~ ग्रामीण भागात 'खालच्या बाजुने' ऐवजी 'खाल्ल्या बाजूने' असे म्हणतात. 'खालच्या' शब्दाचा अर्थ 'गुपचूप' असा होतो...'खालच्या आवाजात त्याने ते गुपीत मला सांगितले..." अशा रितीने उपयोग.

३. कथेचा शेवट मजेशीर आणि धक्कादायक आहे हे कथा रंजन आणि मांडणीच्या दृष्टीने ठीक आहे, पण वर लेखक स्वतःच म्हणतात.... "परश्याने सल्ल्याबरोबर जावुन वेळेत बकरु कापून आणले. ..." मग जर परश्या स्वतःच ते बकरे घेऊन जात आहे तर त्याचे खांड आणि खाटक्याचे दुकान एवढ्या अंतरात त्याला ते बकरे आपलेच असेल असा अंदाज का आला नाही?

असो...हे किरकोळ निरिक्षण आहे असे समजून तुम्ही या प्रांतातील पुढील वाटचाल करावी...जी यशस्वीच असेल याची मला खात्री आहे.

इन्द्रा

छान निरीक्षण...चांगल्या सूचना आहेत त्याचा मुक्त यांनी जरूर विचार करावा असेच वाटते.
बाकी, मिपाचे आजकालचे रंग पाहूनसुद्धा आपण या सूचना दिल्यात म्हणून आपल्याबद्दल आदर दाटूदाटून आलाय...

इन्द्र्राज पवार's picture

7 Mar 2011 - 1:12 am | इन्द्र्राज पवार

शिल्पा....मला वाटतं तू किंवा अदिती/मकी असाल, तुम्हीच इथे मागे एकदा मला वा अन्य कुणाला तरी चांगला सल्ला दिला होता की, आपणास ज्या ठिकाणी सहभाग घ्यावा वाटतो तिथे घ्यावा....अन्य प्रांतात लक्षही देणे नको वा तिथे ढवळाढवळही करायला नको. दिवसभराच्या कामाधंद्यातून मिळतात मोकळे दोनचार तास ते इथला आनंद घेण्यासाठी खर्च करावे असे ठरविले आहे....आणि तू पाहिलेच आहेस की, मला जे विषय आवडतात, भावतात तिथे मनमुराद प्रतिसाद द्यायचे, आनंद द्यायचा, तसाच तुझ्यासारख्याने दिलेले वरील सुंदर प्रतिसाद वाचायचे, त्यांचा भरभरून आनंद घ्यायचा....आणि समाधानी राहायचे.... बस्स !!!

बाकी अन्यत्र ज्या काही फोर-सिक्सर्स चालतात....आम्ही असलो वा नसलो, त्या चालत राहणारच.

थॅन्क्स फॉर द अप्रेसिएशन....शिल्पा

इन्द्रा

<<दिवसभराच्या कामाधंद्यातून मिळतात मोकळे दोनचार तास ते इथला आनंद घेण्यासाठी खर्च करावे असे ठरविले आहे

सर्वसाधारणपणे इथे बहुतांशी लोक हेच करतात त्यामुळेच खेळीमेळीचे वातावरण आहे....बाकी असोच म्हणायचे...आणि मी सहसा गंभीरपणे असे सल्ले देत नाही त्यामुळे दुसरेच कोणीतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही..

अरुण मनोहर's picture

7 Mar 2011 - 7:32 am | अरुण मनोहर

हा प्रतिसाद (म्हणजे इंद्रांचा) खूप आवडला.

श्रावण मोडक's picture

7 Mar 2011 - 1:37 pm | श्रावण मोडक

"थांब, सुशेगात ऐकुन घे..."
नक्की?

इन्द्र्राज पवार's picture

7 Mar 2011 - 1:59 pm | इन्द्र्राज पवार

'सुशेगात' याचा अर्थ = आरामपणे....किंवा....शांतपणे असा घेतला जातो. त्यामुळे "नीट = व्यवस्थित" असे प्रयोजन ग्रामीण बोलीत अपेक्षित नाही (किंवा नसावे). गडी दादा कोंडक्यासमान सदैव घाईगडबडीत वर्तन करण्यासारखा असला तर पाटील त्याला 'नीटपणे' असे न म्हणता 'सुशेगात' ऐकून घे....असेच म्हणेल.

पण श्रा.मो.... तुम्ही त्याऐवजी अन्य विकल्प सुचवाल तर त्याचेही श्री.मुक्त स्वागत करतीलच.

इन्द्रा

श्रावण मोडक's picture

7 Mar 2011 - 2:27 pm | श्रावण मोडक

सुशेगात हा शब्द गोव्यातला अशा समजानं विचारलं आहे. या कथेत बाकी गोवा दिसत नसल्यानं.

इन्द्र्राज पवार's picture

7 Mar 2011 - 2:55 pm | इन्द्र्राज पवार

होय, श्रामो....सुशेगातची "आयात" गोव्याच्या मातीतूनच देशावर (त्यातही कोकणमार्गाने) झाली आहे, पण कोल्हापूर-बेळगांवी मराठीमध्ये तो सर्रास 'त्या' अर्थाने वापरला जातो, म्हणून ती सूचना. महादेव मोरे आणि धाकट्या माडगुळकरांच्या लेखनात याचा उपयोग झाला आहे....(मला वाटते पु.ल. आणि दळवी यानीही तो वापरला आहे...पण या क्षणी नक्की संदर्भ आठवत नाहीत.)

बेळगांवी बोली मराठीत "पाप" हा शब्द वारंवार वापरला जातो. इथे आपल्या शुद्ध मराठी अर्थाने 'पाप' चा अर्थ वेगळा....पण तिथे तो 'बिचारा/बिचारी' या अर्थाने घेतात. उदा....'सायकलवरून ती पडली....पाप, लई लागलं असल गं तिला !"....किंवा "अरेरे, पाप, असं कसं वाईट झालं वो त्याचं ?"

हे 'पाप' कन्नड प्रांतीय मराठीत कुठून आणि कसे आले याबाबत अनभिज्ञ आहे....पण आहे प्रभावी.

इन्द्रा

इंन्द्राजी वेळ काढून सविस्तर प्रतिसाद/सुचना दिल्या त्याबद्दल आपला आभारी आहे. :)

तुमच्या सुचनाचा निश्चीतच पुढील लेखांमधे सुधारणा करण्यास मला मदत होईल.

तुम्ही सांगितलेल्या १ व २ मुद्द्यांशी सहमत आहे. पुढील लिखाणात मी काळजी घेईन.

३. " मग जर परश्या स्वतःच ते बकरे घेऊन जात आहे तर त्याचे खांड आणि खाटक्याचे दुकान एवढ्या अंतरात त्याला ते बकरे आपलेच असेल असा अंदाज का आला नाही?">>>>>> ह्या छोट्या गावात खाटकाचे दुकान नाही. त्यांनी बोकड्याला वाडग्यातच अंधारात कापले आहे. त्यामुळे ही गडबड झाली आहे.

अरुण मनोहर's picture

7 Mar 2011 - 7:34 am | अरुण मनोहर

लई झ्याक!
आनखी केव्हा लिवणार? त्वांडाला पानी सुटलंय.

जे वर इंद्रान म्हंटल आहे तेच मलाही अगदी पहिल्या दिवशी सांगायच होत, पण कदाचीत तुमचा हिरमोड होइल म्हणुन नव्हत सांगीतल. आता हाच पुरा पॅरेग्राफ बघा
>>तेवढ्यात खालच्या बाजुने बारवेकडुन कुणीतरी घाईने येताना दिसले. ती व्यक्ती चढ चढून, स्मशानभूमीला वळसा घेणार्‍या रस्त्याने थेट वेशीत पाराजवळ आली. त्याच्या चेहर्‍यावर, मानेवर घामाच्या धारा लागल्या होत्या. हाश्शहुश्श करत त्याने वर हात करुन सगाळ्यांना रामराम ठोकला आणि उपरण्याने घाम पुसत पारावर टेकला. तो हिवर्‍याचा बुटनेर होता. पारावरील सर्वांनी आपापले उदयोग थांबवुन रामराम म्हटले>>

हा एकच त्या सगळ्या लिखाणात जर्रा वेगळा वाटतो ना?
येउ द्या पुढचा भाग गोष्ट भारी आहे.

शिल्पा ब's picture

7 Mar 2011 - 8:42 am | शिल्पा ब

लै भारी रं गड्या!!

अभिज्ञ's picture

7 Mar 2011 - 8:51 am | अभिज्ञ

मस्त कथा.
भाषा शैली आवडलि.

अभिज्ञ.

प्यारे१'s picture

7 Mar 2011 - 9:59 am | प्यारे१

राम राम गंगाराम चित्रपटात गंगाराम (दादा कोंडके) एकाला गंगीची (उषा नाईक चुभूद्याघ्या) बकरी मारण्यासाठी पैसे देतात.
दुसर्‍या दिवशी काम फत्ते म्हणून अशोक सराफ आणि दादा बसलेले असतात.
गंगीची बकरी छानपैकी गवत खात येते समोरुन आणि त्याबरोबरच गंग्याची आय विचारायला येते आपला बोकड दिसला नाही कालपासून म्हणून.
तेव्हाची दादांची आणि अशोक सराफ यांची तारांबळ आठवली....!!!
(साईट ते घर या प्रवासात 'कंपणीच्या सौजन्याने' बघितला गेलेला दादा कोंडके यांचा एक नाही अर्धामेव चित्रपट)

sneharani's picture

7 Mar 2011 - 10:27 am | sneharani

मस्त कथा!

प्रदीप's picture

7 Mar 2011 - 10:42 am | प्रदीप

कथा.

पण लेखन संपादनाचे स्वातंत्र्य दिले की त्याचा कसा गैरवापर होऊ शकतो ह्याची इथे झलक दिसत आहे. मुक्त इथे नवीन आहेत आणि त्यांनी नकळत हे केलेले आहे, तेव्हा ह्यापुढील माझ्या टिकेचा रोख त्यांच्यावर नाही.

लेखकाने /लेखिकेने पहिल भाग प्रसिद्ध केला. त्यावर अनेकांनी प्रतिसाद दिले, बहुतेकांनी (मी धरून) 'पुढील भागाची प्रतिक्षा करीत आहे' असे लिहीले. ह्यानंतर लेखकाने/लेखिकेने लेखात संपादन करून पुढील भाग टाकला.

ह्या विशीष्ट लेखाच्या संदर्भात ह्या संपादनामुळे फारसे काही बिघडलेले नाही. पण सर्वसाधारणपणे एकदा प्रसिद्ध केलेला व त्यावर एक तरी प्रतिसाद आलेला लेख संपादन केल्याने बरेच प्रतिसाद निरर्थक ठरू शकतात. केवळ म्हणूनच लेखन संपादनाची सोय पूर्वी दिलेली नव्हती. आणि ते बरोबर होते.

इन्द्र्राज पवार's picture

7 Mar 2011 - 12:13 pm | इन्द्र्राज पवार

"....त्याचा कसा गैरवापर होऊ शकतो ह्याची इथे झलक दिसत आहे. ..."

+ सहमत.
'लेखन संपादन' सोय म्हणजे 'प्रतिसादा'ना ते मारक ठरू नयेत अशा धर्तीचे असतील तरच संपादकांनी दिलेल्या त्या सुविधेचा 'सु' वापर झाला, अन्यथा गैरवापर हेच त्यातून ध्वनीत होत जाईल, अन् मग एखाद्याने चांगल्या हेतूने लिखाणात सुचविलेल्या सूचना "हास्यास्पद" होतील.

उदा. 'मुक्त' यांच्या लिखाणात मला ग्रामीण साहित्य परंपरेतील काही पैलू जाणवले आणि निर्मळ मनाने मी त्याना काही बदल सुचविले....("सेल्समन" काढून टाका), तर त्यानी 'संपादन सुविधे' चा वापर करून तो शब्द लागलीच काढून टाकणे अपेक्षित नाही....तर ती सूचना पुढे ज्यावेळी ते अशाच पद्धतीचे लिखाण करतील त्यावेळेसाठी दिलेली आहे. आता इथे ते नाम काढले म्हणजे तिसर्‍या वाचकास (ज्याने मूळ धागा वाचलेला नसेल) माझा प्रतिसाद अस्थानीच वाटणार.

श्री.प्रदीप म्हणतात तसे "केवळ म्हणूनच लेखन संपादनाची सोय पूर्वी दिलेली नव्हती. आणि ते बरोबर होते....." याला दुजोरा देणार्‍यांची संख्या वाढत जाईल.

इन्द्रा

अभिज्ञ's picture

7 Mar 2011 - 12:22 pm | अभिज्ञ

माफ करा,काहितरी गल्लत होतेय.
लेख महत्वाचा कि प्रतिक्रिया?
अन टंकलेखनातल्या चुका लगोलग दुरुस्त केल्या गेल्या तर ते उत्तमच ठरणार नाही का?

अभिज्ञ.

इन्द्र्राज पवार's picture

7 Mar 2011 - 12:38 pm | इन्द्र्राज पवार

श्री.अभिज्ञ....

~ 'लेख' च महत्वाचा असतो, प्रत्येक वेळी. किंबहुना लेख तसा असतो म्हणून तर प्रतिक्रियेचे प्रयोजन.
मी (किंवा श्री.प्रदीप) यानी "संपादन" संदर्भात सूचना दिलेल्या आहेत....शुद्धलेखनाबद्दल नव्हेत.

एखाद्या नवोदित लेखकाला त्याच्या भावी वाटचालीसाठी यथामती मार्गदर्शन करणे गरजेचेच असते, पण ते त्याने सार्वजनिक ठिकाणी प्रकाशित केलेल्या लिखाणावर तात्काळ 'दुरूस्ती'च्या रूपाने अंमलात आणू नये, तसे झाले तर अमुक एकाची प्रतिक्रिया नेमक्या कोणत्या कारणासाठी होती हे नव्या वाचकाला कधीच कळणार नाही.

समजा....श्री.मुक्त यांची हीच कथा जशीच्यातशी 'म.टा.' किंवा 'रविवार सकाळ' मध्ये प्रकाशित होऊन तुमच्यामाझ्यासमोर आली असती आणि मग मी वरील प्रतिसाद तिथे दिले असते तर ती कथा वाचणार्‍यांना 'प्रतिक्रिया' देण्यामागचे कारण कळाले असते ना ! आता इथल्या 'लेख संपादन' सुविधेमुळे प्रतिक्रियेचे प्रयोजनच शून्य झाले.

इन्द्रा

प्रदीप's picture

7 Mar 2011 - 2:18 pm | प्रदीप

इन्द्रा ह्यांनी ह्यातील काही मुद्द्यांचे उत्तर दिलेच आहे. त्याव्यतिरीक्त अजूनही एक संभाव्य परिस्थिती अशी:

चर्चालेखकाने चर्चेची सुरूवात करतांना काही मुद्दे मांडले. प्रतिसादांतून त्याचे खंडन करण्यात आले, त्यामुळे चर्चाकर्त्याने ते मुद्देच मूळ चर्चेतून काढून टाकले.

हे, तसेच इन्द्रा ह्यांनी निदर्शिलेले उदाहरण(कथालेखकास त्यांनी ज्या सूचना केल्या आहेत--टंकलेखनाच्या नव्हेत--, त्या लेखकाने ह्या लेखात /कथेत/कवितेतच करून टाकल्या तर) त्या सूचना देणारा प्रतिसाद/मूळ चर्चेतील मुद्द्यांचे खंडन करणारा प्रतिसाद 'अनाथ' होईल!

मुळात, आपले लेखन, मग ते नव्या धाग्याची सुरूवात करणारे असो अथवा प्रतिसाद असो, हे बाणासारखे असावे. सोडण्यापूर्वी तपासून घ्यावे, नंतर त्याच्या गाभ्याशी खेळ करता येऊ नयेत. ज्याप्रमाणे एकदा प्रतिसादावर कुणाचा प्रतिसाद आला की तो संपादित करता येत नाही, तसेच लेखाचेही असावे.

पियुशा's picture

7 Mar 2011 - 10:57 am | पियुशा

छान लिहिलय
पु.ले.शु :)

विजुभाऊ's picture

7 Mar 2011 - 12:24 pm | विजुभाऊ

क्रमशः इथे मला कुठेच दिसले नाही.
अवांत॑रः झकास लिहलय रे भौ.
मस्त लिहीत रहा

RUPALI POYEKAR's picture

7 Mar 2011 - 2:40 pm | RUPALI POYEKAR

शेवट छान झाला

अवलिया's picture

7 Mar 2011 - 4:04 pm | अवलिया

मस्त !!

चिगो's picture

7 Mar 2011 - 4:12 pm | चिगो

मस्त कथा आहे राव... आणि शेवट पण एकदम "झटका"... :-)

वपाडाव's picture

7 Mar 2011 - 5:22 pm | वपाडाव

वषाट म्हंजे हे असतंय असं आत्ताच कळालं.
फुना यकदा न्यानात भर....
ब्येश..

गणेशा's picture

8 Mar 2011 - 4:47 pm | गणेशा

अप्रतिम कथा .. चित्र डोळ्यासमोर उभे करणारे शब्द ..
मनापासुन आवडले ..

मनापासुन प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे शतशः आभार. :)

स्वसंपादणाची सोय असल्यामुळे क्रमशः नंतर भाग दोन न करता पहिल्या भागातच पुढील लिखान डकवले आहे. ते डकवत असताना मुळ लिखानात काही ही बदल केला नाही.

पुढील लेखात भाग १, २.. अशी काळजी घेईन.

आपला नम्र
मुक्त.