ह्य ह्य..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
27 Dec 2010 - 2:05 pm

"..मला काल रात्रीच कळलं. मग पंचवटीने आलो सकाळी निघून."

"बसायला जागा मिळाली का पण?"

"हो..रिकामी होती आज एकदम..झोपून आलो..ह्य ह्य.."

"ह्य ह्य.."
...

"बरं.. काय झालं एकदम?.."

"काल रात्री चांगले होते. सकाळपासून जोक्स बिक्स करत होते. योगासनं पण केली.. रात्री पिठलं टाक म्हणाले. मग टी.व्ही. बघत बसले होते. एकदम संडासला लागली म्हणाले. त्यांना कमोड लागतं ना. ते अशोकनं आतल्या बाथरूम मध्ये बसवलंय..फोल्डिंग टाईपचं. मग जरा हात धर म्हणाले अशोकला..तेव्हाच त्याला शंका आली. ..आणि मग संडासच्या वाटेतच त्यांचा तोल गेला..काहीतरी बोलले म्हणे अशोकशी आणि एकदम डोळे फिरवले."

"बरं झालं पटकन गेले. खितपत नाही पडले.."

"हो हो..उभे कशाला राहताय..वेळ आहे अजून....बसा हो कोचावर इकडे.."
...
..
"कधी नेणार आहेत?.."
"कुसुम निघालीय जालन्याहून. तिच्यासाठी थांबलेत.."
"कुठपर्यंत आलेत? .."
"नगर क्रॉस केलंय.. ..कुसुम रडतेय नुसती रस्ताभर.."
"साहजिक आहे हो.."
..
...
"चिन्मयीचं नाव घेत होते म्हणे शेवटी..अशोकजवळ.."

"होय हो..त्यांची लाडकी नं ती..कळवलं का तिकडे समीरला?"

"नाही. ते हवाईला वेकेशनवर आहेत. उद्या स्यान होजेला परत येणार आहेत. उगीच त्यांना कळवून ट्रिपचा दुचळा व्हायचा. मधेच निघून तरी कसा येणार तो..?..आणि येऊनही तसा काही उपयोग नाही.. दर्शन तर होणार नाहीच..म्हणून आम्ही ठरवलंय की सगळं झाल्यावरच कळवू.. "

"बघा..काय उपयोग इतका पैसा कमावून? शेवटचं दर्शन नाहीच.."

"हो ना.... आयला.. बापाच्या तोंडात शेवटचं पाणी घालायला पण नाही जमलं याला ..पैसा काय चाटायचाय ??"
....
..
"अरे..अनिश..तू आता टी.सी.एस. मध्ये आहेस ना?"
"हूं .. "
" वा..!! मग फॉरेन टूर कधी आता?"

"दोन वर्ष तर चान्सच नाय..दोन वर्षांत नाय दिला ऑनसाईट तर क्विट मारणार.."

"मग आज काय रजा का?"

"हो..डेथ इन फॅमिली म्हटल्यावर दिली सी.एल. ..नायतर रोजचं प्रेशर आहेच.."
...
...
...
...

"निलगिरी तेल आहे का थोडं मावशी..मला वाटतं किंSSचित वास येतोय आता.."

"हो..आणून ठेवलीय बाटली आत्ताच..गजाकाकाकडे आहे बघ.."

"बर्फ नाही का अरेंज होणार?"

"थोड्या वेळाचाच प्रश्न आहे हो..बर्फ आणला की मग पाणी पाणी होतं सगळीकडे..पुसायला काम.."

...
...
...

"ऋजुता..कॉफी कर सगळ्यांसाठी..कितीजण आहेत आधी मोज.."

"दूध..?"

"दूध आहे फ्रीज मध्ये..आणि जायफळ घाल मस्तपैकी..त्या लाल झाकणाच्या डबीत आहे बघ.."

"बिस्कीटं द्यायची का गं?"

"नको..खरं म्हणजे काSSही द्यायचं नसतं अशा वेळी..कॉफी दे नुसती अर्धा अर्धा कप....ढप्पळभर नको देऊस.."

...
...
...

"हे पाम्फ्लेट बघा..इथे ऋग्वेदी कोणी मिळत नाहीत..सगळे यजुर्वेदीच..हे तीन हजार फक्त आजच्या विधीचे. दिवसांचं सगळं त्यांच्याकडूनच करायचं असेल तर दहा हजारचं पॅकेज आहे त्यांचं. त्यात मग सामग्रीबिमग्री सगळी त्यांची.."

"पण ऋग्वेदी कोणी नाहीच का मिळणार?"

"अगदी तसंच असेल तर हे गुरुजी गाठून देतील कोणीतरी ऋग्वेदी.. यांना पाचेकशे देऊन मोकळं करून टाकू.."

"पण दिवसांचं काही ठरवलंय का? त्यांचा स्वत:चा विश्वास नव्हता नं?"

"होय हो..पण आता कुसुम आल्यावर जे ठरवेल ते खरं.."

"करा हो दिवस..त्याशिवाय ब्राम्हणाला मोक्ष नाही.. हल्ली तिन्ही दिवस एकदम करून घेतात..रजेचा काही प्रोब्लेम येत नाही त्यामुळे.."

...
...
...

"म्युन्सिपाल्टी वाले हरामी आहेत हो..हर्स वाला निघेचना..फार कॉल आहेत उशीर होईल वगैरे नाटकं करत होता..साले शंभर रुपये दाबल्यावर काढलीन गाडी लगेच.."
"इलेक्ट्रिक फर्नेसच आहे ना?"

"नाही..ग्यास फर्नेस बसवली आहे..चांगली आहे पण..आप्पांच्या वेळी आम्ही बघितलं ना..पाच मिनिटांत राख..दुस-या दिवशी थोडी मडक्यात भरून देतात. पन्नास रुपये ठेवायचे वॉचमनच्या हातावर.."

"होय च्यायला..म्हणजे एको फ्रेंडली..पोल्युशन पण नाही.."
...
...
...

"लिफ्ट मधून खाली न्यायला प्रोब्लेम येणार आहे..जिन्यानं तरी सात मजले कसे उतरवणार??"

"असं करूया..आपण दोघेच उभ्यानं त्यांना धरून लिफ्टने खाली जाऊ.. मग तिथे ठेवू तिरडीवर"

"पाय धरा तुम्ही तिकडून..मी डोकं धरतो..उचला जोरात.."

"दारातून लिफ्ट मध्ये टर्न सांभाळून घ्या हां..हातातून सटकले तर प्रॉब्लेम होईल.."

"ह्य ह्य.."

"ह्य ह्य.."
..
..
..

............................................

............................................
पूर्वप्रसिद्धी (ब्लॉगवरः http://gnachiket.wordpress.com )

समाजजीवनमानराहणीविचारलेख

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

27 Dec 2010 - 2:17 pm | चाणक्य

ह्य ह्य...

स्वाक्षरी:

मृत्युन्जय's picture

27 Dec 2010 - 2:19 pm | मृत्युन्जय

चांगलं लिहिलं आहे असे म्हणवत नाही आणि वाईट आहे असे म्हटले तर ते खोटे ठरेल.

बाकी तुम्हाला मृत्यु या विषयाचे भयानक आकर्षण आहे असे वाटते. दहातले ८ विषय मृत्युशी निगडीत आहेत. (स्टॅट थोडेफार चुकले असेल तर क्षमस्व).

क्लिंटन's picture

28 Dec 2010 - 1:44 am | क्लिंटन

तुम्हाला मृत्यु या विषयाचे भयानक आकर्षण आहे असे वाटते. दहातले ८ विषय मृत्युशी निगडीत आहेत.

अगदी असेच.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Dec 2010 - 2:19 pm | बिपिन कार्यकर्ते

अगदी ओळखीचं... पण अजून बरंच काही असतं... विधी चालू असतानाही... आणि, सगळं आटोपलं की मग काही मोजकेच 'फुटायची वाट वगैरे बघत' उभे रहायच्या ड्युटीवर असतात तेव्हा तर गप्पांना रंग चढतो. आमच्या इथले एक गुरूजी तर पूर्वी लाकडं असायची तेव्हा मस्तपैकी चितेवर बिडी वगैरे पेटवून गप्पा मारत उभे असायचे. आता फर्नेस आहे, त्यामुळे फुटायची वाट न बघता, थेट राखच मिळते. तरीही पट्टीचे पोचवणारे थांबतातच, इतकं सवयीचं झालं आहे ते रुटिन त्यांच्या.

नेत्रेश's picture

27 Dec 2010 - 2:41 pm | नेत्रेश

"पट्टीचे पोचवणारे" हे भारीच.

स्पा's picture

27 Dec 2010 - 2:21 pm | स्पा

ह्य ह्य...

ह्य ह्य...

लिखाण चांगल आहे पण वाचुन कसतरीच वाटल.

स्वाती२'s picture

27 Dec 2010 - 8:50 pm | स्वाती२

+१

अवलिया's picture

27 Dec 2010 - 2:32 pm | अवलिया

ठीक!

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

27 Dec 2010 - 2:43 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

.......

परिकथेतील राजकुमार's picture

27 Dec 2010 - 3:10 pm | परिकथेतील राजकुमार

हम्म्म्म्म..

पर्नल नेने मराठे's picture

27 Dec 2010 - 3:28 pm | पर्नल नेने मराठे

होय... खरे अहे. बरेचदा नातेवाइक इलाज नसल्याने ह्या वेळी एकत्र येतात व अत्यंविधी आटोपला कि गप्पा मारत बसतात.. जणुकाही गेट टुगेदरच :( .

अश्या लिखाणाला प्रतिसाद तरी कसा द्यावा?

sneharani's picture

27 Dec 2010 - 3:44 pm | sneharani

हम्म...!!

सन्जोप राव's picture

27 Dec 2010 - 3:46 pm | सन्जोप राव

नाट्यछटासदृश जे काही आहे ते आवडले.

कोणाच्या तरी मृत्युनंतरचे हे असले द्रुष्य लिहायला ही खुप जीगर लागत असेन ना .. ?

लिखान आवडले ..

योगी९००'s picture

27 Dec 2010 - 7:00 pm | योगी९००

"हॅ हॅ हॅ" हे जर आपले कोणी जवळचे गेले नसतील तर नाहीतर..

बर्‍याचवेळा असे बघीतले आहे की हे "पट्टीचे पोचवणारे" उगाचच पुढे पुढे करत असतात. उगाच जवळच्यांना मोकळेपणे रडू पण देत नाहीत. असेच एका प्रसंगी पाहिले होते की मी एकाला धीर देत होतो ..म्हणजे सांगत होतो की याला मोकळेपणाने जरा रडू देत ..पण ही पट्टीची माणसे आरे उगाच त्याला जास्त रडवू नको म्हणून मला बाजूला करून त्याला मुद्दाम एक दोन कामे करावयास सांगत होती.

काही वेळा कोठे काय बोलावे याचा पाचपोच ही नसतोच..अशाच एका अंत्यसंस्काराच्या वेळी उगाच एक कोणीतरी आपण किती ग्रेट फोटो काढू शकतो हे आम्हा काही जणांना सांगत होता. त्याला असे वाटत होते की विषय बदलल्याने जरा दु:ख कमी होईल. शेवटी त्याला कोणीतरी सांगितले की बाबारे समोर चिता जळत आहे. इथे जरी माधूरी दिक्षितला फोटोसाठी बोलावलेस तरी चालू विषय लोकांच्या डोक्यातून जाणार नाही. तेव्हा जरा गप्प बसशील तर बरे होईल.

पण कधी कधी अशा प्रसंगी नकळत का होईना काही गंमती घडतात. त्याविषयी परत कधीतरी..

चिगो's picture

27 Dec 2010 - 7:20 pm | चिगो

खुप विचित्र वातावरण असतं ते... पण मृत व्यक्तिशी असलेली जवळीक किंवा नातं ह्यानुसार लोकांचं दु:ख आणि बोलण्याचे विषय बदलतात.. बाहेरच्या वर्तुळातले लोक तर हसतातही गप्पा मारतांना. नवख्या, अनुनभवी माणसांना खुप विचित्र वाटतं...

प्राजु's picture

27 Dec 2010 - 10:59 pm | प्राजु

हम्म!!!

डावखुरा's picture

27 Dec 2010 - 11:26 pm | डावखुरा

................

राजेश घासकडवी's picture

27 Dec 2010 - 11:40 pm | राजेश घासकडवी

आवडला. तुम्हाला नैसर्गिक संवाद लिहिण्याची हातोटी आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Dec 2010 - 12:17 am | निनाद मुक्काम प...

आता मरणाचि वेदना प्रेत सरणावर जाण्याच्या आधी विसरले जाते .
काही दिवसांनी जसे श्रीमंतांच्या लग्नात सुपार्या घेऊन सेलिब्रेटी नाचतात .तसे मयताला रडायला सुध्धा येतील.
(आधुनिक रुदाली )

गुंडोपंत's picture

28 Dec 2010 - 4:00 am | गुंडोपंत

मस्त रे गगन!
लिफ्टचा भाग सोडला तर अगदी मला पोहोचवल्या नंतरचे संवाद आधीच वाचल्यासारखे वाटले!
आमच्याकडेही मी गेल्यावर अशीच एक्सपर्ट मंडळी जमतील यात शंका नाही.

सर्वांना निमंत्रण अहेच पण आग्रह नाही बरंका मंडळी! ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Dec 2010 - 4:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

संवाद आवडला. रिअलिस्टीक वाटला.

हम्म...
एका नातेवाईकांच्या मृत्युनंतर काही फारच लांबचे नातेवाईक त्यांच्यात पैशाच्या व्यवहाराचं बोलत होते.
कितीही हळू बोलत असले तरी ऐकू येण्याइतपत नक्कीच असावे.

नाही. ते हवाईला वेकेशनवर आहेत. उद्या स्यान होजेला परत येणार आहेत. उगीच त्यांना कळवून ट्रिपचा दुचळा व्हायचा. मधेच निघून तरी कसा येणार तो..?..आणि येऊनही तसा काही उपयोग नाही.. दर्शन तर होणार नाहीच..म्हणून आम्ही ठरवलंय की सगळं झाल्यावरच कळवू.. "

"बघा..काय उपयोग इतका पैसा कमावून? शेवटचं दर्शन नाहीच.."

"हो ना.... आयला.. बापाच्या तोंडात शेवटचं पाणी घालायला पण नाही जमलं याला ..पैसा काय चाटायचाय ??"
....
..
"अरे..अनिश..तू आता टी.सी.एस. मध्ये आहेस ना?"
"हूं .. "
" वा..!! मग फॉरेन टूर कधी आता?"

विरोधाभास आवडला.

समीरसूर's picture

28 Dec 2010 - 10:29 am | समीरसूर

आवडला लेख. लई भारी.

अगदी जवळच्या १-२ व्यक्ती सोडल्या तर फार दु:ख कुणाला होत नसते असे मला वाटते. आणि झाले तरी ते फार टिकत नाही. सुरुवातीचे काही तास दु:खाचा आवेग असतो. नंतर मात्र सगळे त्यातून बाहेर यायला सुरुवात करतात. शो मस्ट गो ऑन. शेवटी जाणारा जातो; बाकीच्यांचा प्रवास अजून बाकी असतो.

मृत्यूनंतर लगेच पैसे-मलमत्ता-दागिने-वाटणी यांच्या गोष्टी (भांडणे) झाल्याचे पाहिले आहे. प्रेतातला माणूस मिश्कीलपणे तिरडीवरून बघत असतो. त्याची मुले, मुली, बायको, भाऊ, बहीणी भांडत असतांना त्याला मजा येत असावी. :-) खरं तर त्यावेळेला सगळ्यात सुखी तो प्रेतातला माणूस असतो.