अशोक केळकर यांना 'रुजुवात'साठी साहित्य अकादमी पुरस्कार

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in जनातलं, मनातलं
22 Dec 2010 - 6:53 pm

भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांना 'रुजुवात' या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकवाङ्मय गृहानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. वाङ्मयाची आणि कलेची आस्वाद मीमांसा आणि समीक्षा या विषयांतल्या केळकरांच्या काही लेखांचं संकलन या पुस्तकात आहे.

म्हैसूरची भारतीय भाषा संस्था (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिअन लँग्वेजेस), मुंबईची राज्य मराठी विकास संस्था, पुण्याची मराठी अभ्यास परिषद अशा संस्थांमागे केळकरांची प्रेरणा आणि त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. वैखरी, मध्यमा वगैरे त्यांची भाषाविषयक पुस्तकंही मराठीत यापूर्वी रसिकप्रिय झाली आहेत. अनेक सोपे आणि चपखल पारिभाषिक शब्द हेही त्यांचं मराठी भाषेसाठीचं एक महत्त्वाचं योगदान ठरावं. केळकरांचा आंतरक्षेत्रीय व्यासंग आणि उदार, अभिनिवेशरहित भूमिका समकालीन मराठी वाड्मयक्षेत्रात उल्लेखनीय मानली जाते. त्या निमित्तानं लोकसत्तेत आलेल्या दोन लेखांचे दुवे देत आहे.

आस्वादमीमांसेचा भाषाविद् - प्र. ना. परांजपे
भाषेचे सर्वस्पर्शित्व जाणणारा विचारवंत - नीलिमा गुंडी

त्यांचं इंग्रजीतलं लेखन या दुव्यावर उपलब्ध आहे.

अवांतर - या धाग्याला शंभर प्रतिसाद वगैरे यावेत अशी अपेक्षा नाही. मराठी आंतरजालात दत्तजयंतीनिमित्त आलेल्या लोकप्रिय लेखांच्या सुकाळामध्ये बिचार्‍या केळकरांची त्या निमित्तानं मराठी आंतरजालाला थोड्या वेळापुरती का होईना, पण आठवण/ओळख व्हावी एवढाच उद्देश आहे. इथल्या किमान काही वाचकांना ही बातमी वाचून आनंद होईल अशी आशा आहे.

संस्कृतीभाषावाङ्मयसाहित्यिकबातमीमाध्यमवेध

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

22 Dec 2010 - 6:57 pm | यशोधरा

ही बातमी वाचून आनंद होईल >> नक्कीच.
दुव्यांबद्दल आभार.

श्री. अशोककाकांचं अभिनंदन!
ते आमचे नातेवाईक आहेत म्हणून अभिमान वाटतो.!

मुक्तसुनीत's picture

22 Dec 2010 - 7:12 pm | मुक्तसुनीत

केळकरांचे अभिनंदन.
- भाषेने नातेवाईक :-)

"रुजवात" या केळकरांच्या अकादेमीपुरस्कारप्राप्त पुस्तकाची ओळख करून देणारा एक उत्कृष्ट लेख :
http://marathiabhyasparishad.org/node/93
...... आणि हा केळकरांबद्दलचा :
http://www.loksatta.com/old/daily/20090423/pvrt23.htm

ताक आमचे आणखी एक आवडते लेखक श्री. उदय प्रकाश यांनाही यंदाचा साहित्य अकादेमी पुरस्कार जाहीर झाल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला आहे.
उदय प्रकाश यांच्या एका कथेची जुजबी ओळख : http://mr.upakram.org/node/2223

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 7:28 pm | आजानुकर्ण

कालच एका मिपाकराशी झालेल्या चर्चेत केळकरांबाबत कोणीच कसे बोलले नाही हा मुद्दा निघाला होता. धनंजय किंवा चिंतातूर जंतू याबाबत नक्की काहीतरी लिहितील याची खात्री होती. या निमित्ताने या पुरस्काराचाच सन्मान झाला आहे.

इन्द्र्राज पवार's picture

22 Dec 2010 - 7:41 pm | इन्द्र्राज पवार

चिं.जं....

अभिनंदन करायचेच झाल्यास ते डॉ.अशोक केळकरांचे नव्हे तर अकादमीच्या त्या सदस्यांचे करावे लागेल ज्यानी भाषेच्या या प्रकांडपंडिताचा उशीरा का होईना उचित गौरव केला आहे. स्थानिक लोकवाङ्मय गृहात मी तब्बल ६०० रुपये किंमतीचा 'रुजुवात' हा ग्रंथराज फक्त हाताळला होता (खरेदीसाठी त्यावेळी पुरेसे पैसे नसल्याने...) आणि त्यातही प्रा० मे०पुं० रेगे यांनी ब्लर्बवर डॉ.केळकर यांच्या अभ्यासाला केलेला सलाम वाचून काढला होता. आता अंधुकसे आठवते ते हे की 'अनेक विद्याशाखांत ज्याची पाळेमुळे विस्तारलेली आहेत अशा भाषाशास्त्राचे डॉ० अशोक केळकर हे अधिकारी पंडित आहेत' अशा स्वरूपाचे प्रा.रेगे यांचे एक वाक्य.

त्यांच्या विविध विद्याशाखांतील अधिकाराकडे केवळ नजर जरी टाकली तरी भोवळ यावी इतकी विद्वत्ता "डॉ.अशोक केळकर" या नावाशी निगडित झाली आहे.

माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर केळकर पुण्यात भांडारकर रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात राहतात (पूर्ण पत्ता माहित नाही) आणि जर शक्य झाल्यास एखाद्या पुणेकर मिपा सदस्यांनी या धाग्यावरील आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोच कराव्यात ही विनंती.

साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल डॉ.अशोक केळकर यांचे हार्दिक अभिनंदन.

इन्द्रा

सुनील's picture

22 Dec 2010 - 8:43 pm | सुनील

डॉ केळकर यांचे अभिनंदन!

त्यांच्या लिखाणाचा दुवा दिल्याबद्दल चिंजं यांचे आभार मानतो.

सहज's picture

23 Dec 2010 - 6:25 am | सहज

चिंजं यांचे आभार मानतो.

..

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Dec 2010 - 10:43 pm | बिपिन कार्यकर्ते

डॉ. केळकरांचे अभिनंदन.

बातमीबद्दल धन्यवाद!

Nile's picture

22 Dec 2010 - 10:55 pm | Nile

मिपावर दत्त म्हणून उभा ठाकलो(थोडा लेट-च झालो च्यामायला!) अन चांगली बातमी वाचली. चिंतातुरजंतूंचे आभार आणि केळकरांचे अभिनंदन.

आमोद शिंदे's picture

22 Dec 2010 - 11:46 pm | आमोद शिंदे

डॉ केळकर यांचे अभिनंदन! दुव्याबद्दल चिंजं यांचे आभार.

प्राजु's picture

23 Dec 2010 - 2:49 am | प्राजु

अभिनंदन!! एकदम छान बातमी!

अमोल केळकर's picture

23 Dec 2010 - 9:31 am | अमोल केळकर

डॉ. अशोक केळकर यांच्याबद्दल माहिती नव्हती. या धाग्याबद्दल धन्यवाद
त्यांचे अभिनंदन

अमोल केळकर

राजेश घासकडवी's picture

23 Dec 2010 - 11:07 am | राजेश घासकडवी

डॉ. अशोक केळकरांचं अभिनंदन.

पात्र व्यक्तीला योग्य तो सन्मान मिळाला. हे नजरेस आणून देण्याबद्दल चिंतातूरजंतूंना धन्यवाद. यापुढे जाऊन मी त्यांना विनंती करतो की केळकरांनी मांडलेल्या संकल्पनाविश्वाचा थोडक्यात का होईना, पण आढावा घेऊन माझ्यासारख्या सामान्यांना कळेल अशा शब्दात मांडावा.

चिंतातुर जंतू's picture

23 Dec 2010 - 2:56 pm | चिंतातुर जंतू

यापुढे जाऊन मी त्यांना विनंती करतो की केळकरांनी मांडलेल्या संकल्पनाविश्वाचा थोडक्यात का होईना, पण आढावा घेऊन माझ्यासारख्या सामान्यांना कळेल अशा शब्दात मांडावा.

भाषाविज्ञान हा काही माझ्या विशेष अभ्यासाचा प्रांत नाही. त्यापेक्षा धनंजयला सांगा :-)

माझी योग्यता नाही, पण तरी प्रयत्न करून बघतो. एखादाच लेख घेऊन बघतो - पण काही महिन्यांचा अवधी हवा...

अशोक केळकरांचे लेख म्हणजे घट्ट तार्किक वीण असलेल्या "थेसिस" असतात. त्यामुळे सारांश सांगणे म्हणजे धाडसाचे आणि सम्यक-ओळखीचे काम होय.

(त्यांच्याशी मतभेद व्यक्त करायचा झाला तर त्यांनी आधीच तसा मतभेद विचारात घेऊन सांगोपांग खंडन केले तर नाही ना? हे तपासून बघावे लागते...)

धमाल मुलगा's picture

23 Dec 2010 - 9:25 pm | धमाल मुलगा

>>एखादाच लेख घेऊन बघतो - पण काही महिन्यांचा अवधी हवा...
काय हो हे? एव्हढी वाट बघायला लावणार होय?

सर्वात आधी दुवा दिल्याबद्दल चिंजं यांचे आभार !

अशोक रा केळकर (मराठी),
बशीर बद्र (काश्मिरी),
राहामाथ तारीकेरे (कन्नड),
केशदा महांता (आसामी) यांनाही
समीक्षात्मक पुस्तकांसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
वरिल सर्व मान्यवरांचे अभिनंदन !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Dec 2010 - 4:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

डॉ. केळकर यांचे अभिनंदन. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या लिखाणाशी अल्प परिचय करून देण्याबद्दल चिंजंचे आभार. धनंजय यांच्या लेखाची वाट पहात आहे.

नंदन's picture

24 Dec 2010 - 5:18 am | नंदन

बातमी. येथे दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.