भेग .. भाग १

गणेशा's picture
गणेशा in जनातलं, मनातलं
14 Sep 2010 - 4:42 pm

दिनांक : ११ सप्टेंबर २०१०, गणेश चतुर्थी.
------

ए पावश्या, अर्र कीती वेळ गिल्लासच धूत बसशील, च्या उकळ बिगी बिगी, एष्टी आता पोहचल इथ. लवकर दुकान चालू करत नाय ती नाय अन पुन्हा अस एष्टी च्या टायमाला उशीर करतोयास बघ.

झालच आप्पा, आता चहाच गरम करायला ठेवतुय बघा.. अन लवकर येवून काय करता, पहिली एस्टी दहा ला येते गावात, मग सकाळी उठून कशाला उगा दुकान उघडायचे.
अन अप्पा, दहा च्या टायमाला स्टँड कसा गजबजुन येतोय बघा, आल्या आल्या गजबज असली की मग दिवस भर शीन येत नाय काम करायचा. काय ?

ये येडझाप, अर्र स्टँड कुठ र दिसतुया तुला? च्या वर ध्यान दे आधी.

स्टँड मंजी बघा अप्पा,

इथ शेजारी २ वडापावच्या गाड्या उभ्या आहेत, बघा शाळेत जाणारी २-४ पोर, अंगावर न झेपणार दप्तर घेवून वडापाव खात आहेत. २-४ किराण्याची दुकाने रस्त्याला लागुनच उभी आहेत. लाल्या पाणवाल्याच्या इथ बघा, तंभाखू चोळणारी लोक दिसत आहेत का नाय ? अन गावातून येणारी गाडी समोरच्या छोट्या रस्त्यावरून येवून आपल्या गाडी समुरच थांबती, मग हेच स्टँड झाल नव्ह का ?

हात तुझ्या, स्टंड कसा असतू ते तालुक्याला जावून बघ एकदा पावश्या, इथ कुत्र रोडच्या बाजुला उभ राहत तशी रोजचीच एष्टी थांबते दिवसात २-३ दा.

आली बघा एस्टी अप्पा, आयला गवरमेंट सुधारलं म्हणा की, टायमावर एस्टी स्टँडाला लावली.
घ्या, ह्यो च्या घ्या. माणस उतरली बी बघा, चला आज सकाळी सकाळी मस्त धंदा हुनार बा ?
आयला अप्पा.. कोण हो उतरलीया ही? नव शहराकडचं दिसतया कोणी तरी.. नवी मास्तरीन आली की काय गावात?
पावश्या.. खरच की, अन बघ कशी भीरी - भीरी बघतीया इकड तिकड.. कोण असल र.
ओ अण्णा SS, च्या नाय घेतला आज?
दम आलो र, वाईच गायछाप घेत होतू.
पावश्या.. कोण र मडडम आलीया गावात ?
अर पावश्या इकडच येतीया बघ.

-

किती तरी दिवस फक्त ठरवत होते गावाला जायचे म्हनून.. आज तो योग आला होता. एस. टी मधून उतरल्यापासुन मन ठाव घेत होत एक आपलेपणाच्या.. जीव्हाळाच्या नात्याच. उतरल्यावर कोण ओळखीच दिसल अस वाटत होत. पण कोणीच ओळखू येईनात. १५ वर्षात गाव कीती परक झाल्याप्रमाणे वाटत आहे.

एक चहा देता का ?
देतो की मॅडम,
नव्या दिसतायात गावात? कुणीकड जायचय तुम्हास्नी?
अं? मी मध्येच अडखळले. कोणीकडे जायचे हे मलाच माहीत नव्हते. काय बोलू?
नाना पवारांच्या घरी जायला हाच रस्ता आहे ना ? मी आपोआप बोलून गेले
हा, हीच वाट जाती सरळ तिकडं.

पावश्या. अर्र स्पेशल च्या दे बाईस्नी.. शहरातून आल्यात जणू - अप्पा

च्या कसा झालाय मॅडम? तसा पावश्या म्हणजे च्या स्पेशालिस्ट हाय. आपल्याकडचा चहा जगात कुठच मिळणार नाय, आणि बघा..
एकदम छान झालाय त्याचे बोलणे मध्येच तोडत मी बोलले.. काय टाकलय रे यात.
तुम्हास म्हणून सांगतो मॅडम, गवती च्या लावलाय मी घरा शेजारी, तोच टाकलाय बघा. कस एकदम घरघुती च्या हाय ना आपला. तस नव गिर्हाइक आल ना माझ्याकड की पार जूणं झाल तरी ते येतच राहत बघा.
पावश्याचे उलटे मागे टाकलेले काळेभोर केस कात्री लवकर केसाला लागत नसल्याची खात्री देत होते. अंगाने काडी पहिलवान आणि खुप कमी वयात काम करायला लागल्याने चेहर्यावरचे प्रोढ भाव जरी दिसत असले तरी बोलण्यातून पोरकट मन हळूच डोकावत होते.

अरे पावश्या, कीती पैसे झाले चहाचे?

तस बघा ७ रुपये झाल्यात स्पेशल चे, पण तुम्ही नानांच्या पाहुण्या आहेत तर राहुद्या, म्हणजे कसय बघा, आपुन मनाचा राजा माणुस हाय अशी आजुबाजू च्या गावात ख्याती हाय आपली. अण तुम्ही तर इथल्याच म्हणल्यावर मग काय घ्या? अव पण इथल्या म्हणाताय, पण कवा दिसला नाय नव तुम्ही? मग?
मी सात रुपये पावश्याच्या हातावर ठेवले. आणि नंतर सांगते अस म्हणून वस्तीचा रस्ता धरला. तस तर कधी एकदा मी वस्तीवर जातेय असे झाले होते.

वस्ती..? जेथे काही ही झाले तरी माणसे आपली पायेमुळे सोडत नाहीत ती वस्ती.. हं, स्वताशीच मनात खिन्न हसून मी मलाच पुन्हा पुन्हा सांगत होते. १५ वर्षापुर्वीचे गाव.. वस्ती.. मनात साठवून मी इथवर आले होते. वाटेवर चालताना ते सगळे दिवस हळुच मनाला स्पर्श करून जात होते. पहिल्या सारखा बाज मात्र दिसत नव्हता.

मंद वाऱ्याची झुळूक, शेतातिल ज्वारीची सळसळणारी पाती, मोगऱ्याची फुले, तळ्याकाठची निरव शांतता अन हळूच तीला भेदून उडत जाणारा तो पक्षांचा थवा.. हं सगळ्या कलप्ना उरल्या आहेत येथे अन सगळे वाऱ्यावरती विरून गेल्या सारखे वाटते आहे. पण.. माझ मन आजही त्या पुर्वीच्या पाउलखुणा शोधत आहे.

मध्ये हळूच मागे पाहिले, तर कोणीच नव्हते.. माझ्या सावलीखेरीज, अन ती ही काळीकुट्ट पडली होती कदाचित भुतकाळातील गोष्टींच्या प्रभावामुळे.. पण तरीही उगाच त्या गोष्टींचा पुल बांधताना माझ्याच अस्तित्वाशी ती संबंध सांगत होती.

वाटेवरच्या मुरमाची तांबुस-पांढरी माती, उगाच कधी तरी सुधारणेची एक खुण दाखवत होती, रस्त्याच्या कडेला असणारी कोरपडीची झुडपे काटे लपवून शांत उभी होती. एवल्याश्या रस्त्यावरून २-४ सायकलवरची माणस लांबूनच माझ्या कडे पाहत पुढे जात होती.

पावलागणिक मागील एक एक आठवण सर्रकन डोळ्यासमोर तरळून जावू लागली आणि तितक्यात वस्ती वरची पांढरी माळवदाची घरे लांबून दिसू लागली. पाय आनखीनच जोरात पुढे ओढत होते. नजर सगळ्या गोष्टी टिपून आठवणींशी उगाच स्पर्धा करू पाहत होती.

वर्षांनुवर्षे सातत्याने जमीनीत पाय रोवून आपल्या अस्तित्वाची पीढ्यान पीढ्या साक्ष देणारे ते वडाचे झाड आता तिथे नव्हते, बारवाची पडझड होऊन पाण्याच्या ऐवजी कुजलेल्या पाला पाचोळ्याचा खच तेथे पडलेला दिसत होता.
थोडीशी पुढे गेल्यावर झोपडीवजा घराच्या अंगणात आजाराने जायबंदी झालेले आजोबा दिसले.. चेहरा ओळखीचा वाटला म्हणून थोडे पुढे गेले अजून...

नाना SS मनाने मनातल्या मनात आनंदाने हंबरडा फोडला.. हो आनंदाने.. आनंद मग तो क्षणीक का असेना स्वर्ग सुख देवून जातो.. पण नानांची केवीलवाणी अवस्था पाहून हाच आनंद क्षणभंगूर ठरला..

" या अंगणात पाउल टाकल परत तर तंगड मोडील " हे नानांच वाक्य आठवल. सरकण डोळ्यासमोरून ते चित्र काळाला भेदून डोळ्यासमोरून निघून गेल.

तितक्यात शेजारून ओळखीचा असा आवज आला.. कोण..? कोण हाय तिकड.. कुनास्नी शोधून राहिलात...?

क्रमशा:

-

हे ठिकाणमाध्यमवेधलेख

प्रतिक्रिया

चांगली सुरुवात :)
मग पुढे काय झालं ?

आपला आभि's picture

15 Sep 2010 - 2:45 am | आपला आभि

छान सुरुवात आहे .. अगदी गावात गेल्यासारख वाटलं .....

कथेमधे काही वेळा ग्रामीण पात्रांच्या तोंडी ग्रामीण भाषा बोलताना अचानक शुद्ध शहरी शब्दोच्चार, वाक्यरचना विचित्र, अयोग्य वाटतात. उदा नटरंग चित्रपट, इथले इतर काही लेख.

पण तुम्ही ग्रामीण पात्रांना पूर्ण ग्रामीण व शहरी व्यक्तिरेखेला पूर्ण शहरी संवाद लिहिले आहेत. हा अचूकपणा आवडला :)

आभार ,
खरे तर मी स्वता बर्या पैकी ग्रामीण बोलतो, जी ग्रामीण भाषा मी वापरली आहे ती बारामती शेजारील माझ्या खेडेगावातील आहे, मी ही बर्यापैकी त्याच लईत बोलतो इतके नाही येथे लिहिल्या प्रमाने पण माझे ओळखीचे तसेच बोलतात गावाकडील . पुण्या शेजारील गावात वाढलो असलो तरी शुद्ध भाषा मला जास्त बोलता येत नाही. हि खंत आहे.
पण माझ्याच भाषेत लिहायला सोपे गेले त्यामुळे.

बाकी थोड्या फार लिखाना मुळे , जॉब मुळे शहरी भाषा बोलावीच लागते. त्यामुळे तो पणा पण आलाय थोडा फार.
-

खुपच सुंदर..... पुढचे भाग लवकर येऊ दे..

जानम's picture

15 Sep 2010 - 8:00 pm | जानम

येउ द्या...छान ...