पहिला अनुयायी (बाबागिरीच्या साबणाचा गिऱ्हाइक) असा मिळवावा

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
22 Aug 2010 - 1:26 am

श्री. श्री. अदितीअम्मा देवी यांनी 'पहिला अनुयायी कसा मिळवावा' यावर काथ्याकूट टाकला, त्यावर खूप मोठी चर्चा झाली, श्रद्धा, अंधश्रद्धा, नास्तिकपणा वगैरे विषय चघळले गेले. 'कुंभार थोडे गाढवं फार, त्यामुळे हे सोपं असतं' किंवा 'अमुक बाबाला नशीबाने असे अनुयायी मिळाले' वगैरे आख्यायिका झाल्या. तरी अदितीच्या 'पहिला अऩुयायी कसा मिळवावा?' मूळ प्रश्नाला उत्तरं मिळालीच नाहीत. ती देण्याचा हा प्रयत्न. तो धागा जवळपास 200 पर्यंत गेल्याने इथे त्याची नवीन सुरूवात करतो आहे. पामरावर श्री. श्री. अदितीअम्मा देवी यांचा कोप होणार नाही अशी आशा. (इथे मी बाबा हा शब्द पूज्य पिता या अर्थाने वापरलेला नसून, अदितीदेवींप्रमाणेच 'भोंदू बाबा' या अर्थाने वापरला आहे. तुम्ही सध्या वापरत असलेला बाबा जर भोंदू नसेल, तर तुमची या लिखाणाला काहीच हरकत नसावी. शेवटी भोंदूपणा व अस्सलपणा हा एखाद्याने सांगितलेलं तत्वज्ञान किती खरं आणि उपयोगी आहे यावरून ठरतो. रामदासस्वामींसारख्या देशभक्त, प्रगल्भ विचारांच्या व्यक्तिमत्वांवर शिंतोडे उडवण्याचा हेतू नाही. माझा रोख स्वार्थासाठी लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या व भक्तांचा गैरफायदा घेऊन कोट्यवधींची मालमत्ता करणाऱ्या बाबांवर आहे.)

उत्तर तसं कठीण नाही. फक्त ते जाणून घेण्यासाठी बाबागिरी (भोंदू बाबागिरी - दर वेळी मी भोंदू हे लिहीत बसत नाही) हे एक प्रॉडक्ट आहे, ते खपवण्याचा, म्हणजे गिऱ्हाइकं शोधण्याचा हा प्रश्न आहे हे लक्षात घ्यायला लागतं. त्यापुढचं मग सोपं होतं. एखादा साबण विकण्यासाठी जे करावं लागतं तेच करायचं.

१. मुळात एखादा साबण बनवायचा. त्यासाठी फॅक्टरीची आवश्यकता नाही. तो घरगुती बनवता येतो. फॅक्टरी खर्चिक असते. ती पहिले काही साबण विकून झाल्यानंतर बनवता येते. साबणाचा वास, रंग, पोत आपल्या प्रकृतीप्रमाणे बदलायचा.
२. साबणाची कृती फारशी कठीण नसते. विशेषतः बाबागिरीच्या धंद्यात. माझ्याकडे साबण आहे, आणि तो वापरलास की तुझं मन निर्मळ होईल हा विश्वासच साबणापेक्षा महत्त्वाचा असतो. तो विश्वासच खरं तर मनाचा साबण बनतो. तो धृढ करण्यासाठी साबणाचा भास निर्माण करणारं काहीतरी घ्यावं - मंत्र, वाक्य - मग ते निरर्थक असलं तरी चालेल. (अर्थं शब्दानुधावन्ते). काहीही व्रत वगैरे चालेल. स्वतःची महती सांगणारी स्तोत्रं किंवा फक्त स्वतःच्या नावाचा जप उत्तमच. अंगारे धुपारे वापरण्याबद्दल काही मतभेद आहेत. कशाला उगाच फिजिकल एव्हिडन्स ठेवावा? काही बाबा तर आपले शब्दसुद्धा स्वतः जाहीर करत नाहीत. भक्तांकरवी लेख लिहवून घेतात. तर काही बाबा साबूदाण्याच्या गोळ्यांसदृश पदार्थ वापरतात. पण त्या पुढच्या गोष्टी झाल्या. सुरूवातीला काहीही द्या.
३. मग इतर मार्केटिंगप्रमाणेच प्रॉडक्ट विकण्यासाठी दुकानांत द्यावं आणि जाहिरात करावी. सुरूवातीला स्वतःचं स्थायी स्वरूपाचं दुकान घेऊ नये. ते खर्चिक असतं. एकदा जम बसला की स्वतःची दुकानं टाकता येतात. फ्रॅंचाईजी देता येते. नंतर मठ, मंदिरं वगैरे बांधून एखाद्या साध्या गावाचं तीर्थक्षेत्र करून टाकता येतं. पण हे फारच पुढचं झालं. सुरूवातीला एखादा हॉल घेऊन स्वतःच्या मतांचा प्रकाशनसमारंभ करावा.
४. सर्वप्रथम 'तुम्हाला गंभीर प्रश्न आहेत, सध्या समाजाचा नैतिक ऱ्हास चाललेला आहे. माणसाचा आत्मा हरवला आहे' वगैरे बोलावं. त्यानंतर 'मला सगळं ज्ञान आहे, मला शरण या, मी तुमच्या सर्व चिंता मिटवू शकतो/ते' असं जाहीर करावं. तुम्ही प्लासिबो थिअरी वापरत असल्यामुळे हे खोटं बोलणं हा उपचाराचा भागच आहे. ऑपरेशनच्या आधी भूल घालायला बंदी आहे का? तसंच. आणि वेदना, व्याधी असलेल्याला कायम भूल देऊनच ठेवणं उत्तम नाही का? लक्षात ठेवा विश्वासानुसार सत्य बदलतं. ज्यांना शंका असेल त्यांनी सोशल रिलेटीव्हीजमचा अभ्यास करावा. तुमचं मन निर्मळ करण्याची गरज आहे, व माझ्याकडे साबण आहे हा संदेश समर्थपणे दिला की झालं.
५. स्वतःकडे ज्ञानाची कमतरता असल्यामुळे, तुम्हाला ज्ञान आहे की नाही याची शहानिशा न करताच काही लोकं तुमच्याकडे आपोआप खेचले जातील. तुम्हाला वंदन करतील. यात नैतिक दृष्ट्या काहीच चूक नाही. आता तुमच्या भूलथापांना बळी पडून काही मठ्ठ लोकं तुम्हाला भक्ती, पैसे (आणि इतरही बरंच काही) देऊ करायला लागले तर तो तुमचा दोष कसा? किंबहुना तुम्हाला या गोष्टी हव्या असतात, त्यांच्याकडे त्या जास्त आहेत. तुमच्याकडे बुद्धी आहे, त्यांच्याकडे ती कमी आहे - हा इंबॅलन्स दुरुस्त करून तुम्ही जगातली विषमता नष्टच करत आहात. मनात मळ असलेल्यांना महागाचा का होईना, पण साबण पुरवणे ही आजची गरज आहे.

एवढं तुम्ही केलं की झालं. प्रॉडक्ट लॉंच करण्यासाठी तुम्हाला हे वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी करावं लागेल. पण पद्धत तीच. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना, तसंच. फक्त इथे प्रयत्नांती भक्त, इतकंच. पण बाबागिरी करायची असेल तर भक्त हे तुम्हाला परमेश्वराप्रमाणेच. खरं तर ते जे भक्ती, पैसे, वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी वगैरे (आणि इतरही बरंच काही) देतात तो खरा तुमचा परमेश्वर. तो त्यांच्या पाकीटात, पर्सेसमध्ये, स्विस-नॉनस्विस बॅंकांमध्ये (व इतरही ठिकाणी) असतो, म्हणून मूर्तीच्या दगडालाही देव म्हणावं त्याप्रमाणे भक्ताला (त्यांना दगड मनातल्या मनातच म्हणा) देव मानावं.

आता हे जिज्ञासू, मनःशांतीशोधक, अतिरिक्त धनधारी तुमचे अनुयायी किंवा भक्त होण्यासाठी काय करावं? काहीही नाही. फक्त त्यांना सामान्यज्ञान वापरून आपल्याला मनाला येईल तो सल्ला द्यावा. आता तुम्ही म्हणाल की सल्ला कोणीही देतो, पण आपल्याला ज्या विषयात काही कळत नाही (म्हणजे त्या भक्ताची मनःशांती का भंगलेली आहे या विषयात) त्यात आपल्याला एक्स्पर्ट म्हणून त्यांचा विश्वास कसा कमवायचा? उत्तर सोपं आहे. त्या सल्ल्यात तथ्य असण्याची गरज साबूदाण्याच्या गोळ्यांमध्ये औषध असण्याइतकीच असते. विश्वास कमवण्याचा व प्रत्यक्ष ज्ञान असण्याचा काहीएक संबंध नाही. या उत्तराचं स्पष्टीकरण संख्याशास्त्रातनं मिळतं. पण त्यासाठी संख्याशास्त्र जाणण्याचीही गरज नाही. मी एक कल्पनाप्रयोग सांगतो, त्यातून सगळं स्पष्ट होईल.

एका माणसाने १०२४ लोकांना पत्रं पाठवली. निम्म्या लोकांना सांगितलं की क्ष स्टॉक आज वर जाईल. निम्म्यांना तो खाली जाईल असं सांगितलं. दररोज तो अशी पत्रं पाठवत राहिला. फक्त दरवेळी त्याने सगळ्यांना रॅंडमली निवडून वर वा खालीची उत्तरं पाठवली. निम्म्यांना वर, निम्मी खाली. एवढंच. शून्य बुद्धीमत्ता वापरून. असं आठ वेळा केल्यावर

४ लोकांना लागोपाठ ८ अचूक उत्तरं
३२ लोकांना ८ पैकी ७ बरोबर भाकित
११२ लोकांना ८ पैकी ६ बरोबर भाकितं

म्हणजे सुमारे पंधरा टक्के लोकांना त्याच्याकडे अतिशय अचूक भाकितं करण्याची शक्ती आहे असा विश्वास सहज बसला. आता या १४८ पैकी किमान पन्नास लोकांनी जर खरोखरच त्याच्या सल्ल्याप्रमाणे पैसे लावले, तर त्यातले सुमारे १२ लोक लागोपाठ दोनवेळा पैसे कमावतील. हे त्याचे पहिले अनुयायी/भक्त. मग त्यातले काही पैसे त्याच्या चरणी अर्पण करतील. इतकंच नव्हे तर ते आपल्या अनेक श्रीमंत मित्रांकडे त्याचे गोडवे गातील. पुरावा म्हणून तुमची १० पैकी ८ ते १० वेळा बरोबर आल्याचे 'चमत्कार' सांगतील. त्यानंतर मग त्याचं भाकीत चुकलं तर ते स्वतःलाच दोष देतील. कारण एव्हानात्याचं बरोबर हे त्यांनी जीवनातलं त्यांना गवसलेलं सत्य म्हणून स्वीकारलेलं असतं.

या उदाहरणावरून लक्षात येईल की जितक्या मोठ्या समुदायाला तुम्ही सतत संदेश देत राहाल तितक्या मोठ्या प्रमाणात तुमचा भक्तवर्ग वाढेल. कोण म्हणतं परपेच्युअल मोशन मशीन बनवणं अशक्य आहे म्हणून? हे यंत्र चालतं याचं कारण लोकांचा सत्य म्हणून मान्यता देण्याचा दृष्टीकोन. सत्य हे खूप लोकांना 'चालताना मातीवर आपल्या पाऊलखुणा उमटाव्या, व मागे वळून पाहाताना त्यातं पाणी साठून चंद्राचं प्रतिबिंबं दिसावं' तसं दिसतं. जितकी लोकं जास्त तितक्या पाऊलखुणा जास्त, व तितकीच जास्त चंद्रबिंबं.

काही आणखीन ट्रिका
- आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख असेल असा पेहेराव. दाढीमिशा, भस्माचे पट्टे, रुद्राक्षाच्या माळा, भगवे किंवा पांढरे कपडे वगैरे तर ट्राइड अॅंड ट्रू गोष्टी आहेत. हे म्हणजे साबणाचा रंग, वास, आकार साधारणपणे इतर साबणांसारखाच करण्यासारखं झालं. आपली वेगळी ओळख असली पाहिजे, पण पूर्ण वेगळं असता कामा नये.
- भाकितं करताना जितकी गुळमुळीत करता येतील तितकी करावी. म्हणजे '२० नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता तुला हिरव्या गाडीचा धक्का लागून तू अपंग होशील' असं म्हणू नये. 'पुढच्या तीन महिन्यात तुझ्या जिवाला धोका संभवतो. तू अमुक कर्म नियमितपणे केलंस तर तो धोका टळेल.' असं म्हटलं की धोका झाला तर तो कर्म योग्य पद्धतीने न केल्यामुळे व धोका झालाच नाही तर तो बाबांच्या कृपेमुळे अशा दोन्ही डगरींवर पाय ठेवता येतो.
- चमत्कार वगैरे स्वतः करण्याच्या फंदात पडू नये. 'संडासात गेलो होतो. नळाला पाणी नव्हतं. बाबांचा धावा केला. पाणी आलं.' वगैरे चमत्कार भक्तच सांगत फिरतात.
- एकदा धंदा चालायला लागला की मग तुमचे पाचशे भक्त असले तरी 'माझ्याकडे दोन लाख लोकं आहेत' असं मंत्री, राजकारणी वगैरे लोकांना सांगावं. एकदा असले चारपाच लोकं तुमच्या गळाला लागले की मग जन्माची ददात मिटते. राजकारण्यांना तर मळ स्वच्छ करण्यासाठी साबणाची नितांत गरज असते.
- कधी कधी तुसडेपणाचाही फायदा होऊ शकतो. गोनिदांनी एक किस्सा सांगितला आहे. एका साधू दिसणाऱ्याने भविष्य सांगायला सुरूवात केलं. पहिल्या माणसाला त्यांनी 'दूर हो माझ्या नजरेपासून. असलं पाप मनात घेऊन येणाऱ्याचं तोंडदेखील मला बघायचं नाही.' असं म्हटलं. झालं, नंतर ज्यांना त्यांनी स्वीकारलं ते खंदे भक्त झाले.

मी हे जे लिहिलं त्यावरून हे सगळं खूपच सोपं आहे असं वाटेल. तर ते तितकं सोपं नाही. उत्कृष्ट घरगुती साबण बनवणं खूप सोपं असतं पण तो लोकांच्या गळी उतरवणं, त्याचं मार्केटिंग करणं हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. (त्यापेक्षा सर्कारी नोकरी खूपच सोपी...) त्यासाठी मुळात भरपूर जनसंपर्क, मिठ्ठास वाणी, ओघवती भाषा आणि छाप पडेल असं व्यक्तिमत्व लागतं. पण सगळ्यात आवश्यक गोष्ट म्हणजे प्रचंड आत्मविश्वास. कुठच्याही धंद्यापेक्षा या धंद्यात अत्यंत कमी भांडवल लागत असल्यामुळे इथे कॉंपिटिशन पण भरपूर आहे.

असो. साध्या वाटणाऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला गेलो आणि पाल्हाळ लावून बसलो. ही सगळी सीक्रेटं सांगितल्याबद्दल आमची बाबा क्लबची 'बिगिनर्स मेंबरशिप' रद्द होईल की काय अशी भीती मात्र नाही. कारण खरा भक्त हा असल्या तर्काला बळी पडत नाही. जितके तर्कट लोक बाबांपासून दूर राहातील तितकेच साबणाचे खरे गिऱ्हाईक बाबांजवळ पोचतील...

समाजजीवनमानविचारमाहिती

प्रतिक्रिया

आळश्यांचा राजा's picture

22 Aug 2010 - 1:40 am | आळश्यांचा राजा

परफेक्ट. भोंदूगिरी म्हणजे काय ते अगदी नेमके सांगितलेले आहे. कुणाचीही टवाळी न करता. श्रद्धेला धक्का न लावता. ग्रेट!

लिहिण्याची शैली आणि ह्यूमरविषयी मी काय बोलावे!

सहज's picture

22 Aug 2010 - 7:00 am | सहज

अगदी हेच.

राजाभाउ's picture

22 Aug 2010 - 2:36 pm | राजाभाउ

मी ही हेच म्ह्णतो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Aug 2010 - 8:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्तम लेखन.

अवांतर : प्रास्ताविकातील नामोल्लेख आणि संदर्भ टाळूनही लेखनाचा दर्जा उच्चच राहिला असता असे वाटले.

-दिलीप बिरुटे

आमोद शिंदे's picture

23 Aug 2010 - 8:44 pm | आमोद शिंदे

अवांतर : प्रास्ताविकातील नामोल्लेख आणि संदर्भ टाळूनही लेखनाचा दर्जा उच्चच राहिला असता असे वाटले.

किती पाणी घालायचे तर्री मधे दर्जा राखायला?

चित्रा's picture

22 Aug 2010 - 4:36 pm | चित्रा

कुणाचीही टवाळी न करता. श्रद्धेला धक्का न लावता.
लेख उत्तम आहे.

टवाळी करूनही सांगता येते आणि टवाळी न करताही सांगता येते. माझ्या मते टवाळी न करता सांगितलेले हे दूरगामी फायद्याचे ठरते.

प्रियाली's picture

22 Aug 2010 - 4:56 pm | प्रियाली

टवाळी करूनही सांगता येते आणि टवाळी न करताही सांगता येते. माझ्या मते टवाळी न करता सांगितलेले हे दूरगामी फायद्याचे ठरते.

हेच आम्ही विज्ञाननिष्ठ बाबांना परोपरीने समजावतो. :) लेख उत्तम

आळश्यांचा राजा's picture

22 Aug 2010 - 9:08 pm | आळश्यांचा राजा

'विज्ञाननिष्ठ बाबा' शब्द खासच!

टवाळी करून प्रबोधनाचा हेतू राहतो दूर, उलट श्रद्धावंत दुखावले जाऊन ते आजिबातच न ऐकण्याच्या मोडमध्ये जातात. हसत खेळत चिमटे काढत , टवाळी न करता, श्रद्धेचाच आधार घेत प्रबोधन कसे करावे याचा गाडगेबाबा हा उत्तम नमुना आहे.

राजेश घासकडवी's picture

23 Aug 2010 - 2:42 am | राजेश घासकडवी

हा शब्दप्रयोग नीटसा कळला नाही. मी बाबा या शब्दात भोंदू बाबा हे गृहित धरलं होतं. विज्ञाननिष्ठा जर खरी असेल तर भोंदूगिरी कशी होईल?

माझे विज्ञाननिष्ठेचे निकष असे -
१. थिअरी फॉल्सिफायेबल असली पाहिजे - 'अमुक तमुक जर दिसलं तर ही थिअरी, ही विधानं चुकीची व म्हणून त्याज्य किंवा अपुरी म्हणून दुरुस्त करण्याजोगी ठरतील' याला अध्याहृत मान्यता.
२. ठोस भाकितं करण्याची व ती इतरांना तपासून बघण्याची तयारी.
३. ज्या डेटावर ही थिअरी आधारित आहे, तो इतरांना तपासायला देण्याची तयारी.
४. व्यक्तिनिरपेक्षता - तपासून पाहाण्याचे निकष व्यक्तिनिरपेक्ष असले पाहिजेत.

भोंदूगिरी, बाबागिरीत, या सगळ्या गोष्टी टाळल्या जातात.

म्हणून विज्ञाननिष्ठा व बाबागिरी हे हातात हात घेऊन कसे जातात याचं उदाहरण पहायला आवडेल. (शेवटी माझी विधानं देखील फॉल्सिफायेबल आहेतच)

प्रियाली's picture

23 Aug 2010 - 4:36 am | प्रियाली

मी बाबा या शब्दात भोंदू बाबा हे गृहित धरलं होतं. विज्ञाननिष्ठा जर खरी असेल तर भोंदूगिरी कशी होईल?

ज्यांना फॅन फॉलोइंग आहे आणि (प्रसंगी ) ज्यांचे शब्द (फिरवून) भक्तगण प्रमाण धरतात आणि इतरांना पटवण्याचा प्रयत्न करतात ते माझ्यामते सर्व बाबा आहेत. (उदा. माणसाने वस्तीसाठी दुसरा ग्रह शोधावा असे गुरुंनी म्हटल्यावर ते कसे अर्थपूर्ण वाक्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न होतो.) ;) त्यांचा भोंदूगिरीचा उद्देश आहे की नाही ही पुढली गोष्ट. तसा तो नसला तरी बाबा म्हटले जाते. एक चांगले उदाहरण - गाडगे बाबा.

म्हणून विज्ञाननिष्ठा व बाबागिरी हे हातात हात घेऊन कसे जातात याचं उदाहरण पहायला आवडेल

आपण वेगळाच अर्थ काढत आहात; जो मला अपेक्षित नाही त्यामुळे सदर वाक्य लागू नाही.

राजेश घासकडवी's picture

23 Aug 2010 - 5:39 am | राजेश घासकडवी

म्हणजे तुमची बाबाची भक्ताधिष्ठित व्याख्या ही 'बाब्या'च्या जवळ जाते तर. :) पण समजावून देताना सांभाळून बरं का. नाही, विज्ञाननिष्ठ वगैरे बाब्यांचे भक्त तसे मऊ असतात, पण इतर थोर विभूतींचे भक्त जरा कठोर असू शकतात. तेव्हा कोपराने खणताना सांभाळून इतकंच. :)

हा व्याख्या स्पष्ट करून घेण्याचा खेळ मला आवडतो.

आमोद शिंदे's picture

23 Aug 2010 - 8:47 pm | आमोद शिंदे

विज्ञाननिष्ठ बाबा हे ऑक्सीमोरॉनचे मराठीकरण समजावे का?

आमोद शिंदे's picture

23 Aug 2010 - 8:26 pm | आमोद शिंदे

>>टवाळी करूनही सांगता येते आणि टवाळी न करताही सांगता येते. माझ्या मते टवाळी न करता सांगितलेले हे दूरगामी फायद्याचे ठरते.

अत्र्यांनी बुवा तेथे बाया या नाटकातून भोंदू बुवा बाबांची यथेच्छ टवाळी केलेली आहे. मला तर ती भयंकर आवडली. माझ्या विचारसरणीवर त्याचे दूरगामी परीणाम झाले. समाजातील विसंगतीवर बोट ठेवण्यासाठी त्याची खिल्ली उडवणे हा एक उत्तम मार्ग आहे.

आमोद शिंदे's picture

23 Aug 2010 - 8:31 pm | आमोद शिंदे

कुणाची टवाळी न करता श्रद्धेला धक्का न लावता इ.इ. पथ्ये पाळतच भोंदूगिरीवर बोलले पाहिजे हे म्हणजे मिसळीत तर्री न घालता खाण्यासारखे आहे. जे चुकिचे आहे ते चुकिचे आहे. आणि त्यावर कठोर भुमिका घेतलीच पाहिजे. दुखावल्या कुणाच्या बेगडी भावना आणि श्रद्धा तर त्याची पर्वा कशाला? असल्या भोंदू बुवा बाबांवर श्रद्धा ठेवणारे टवाळीच्याच लायकीचे असतात.

शिल्पा ब's picture

22 Aug 2010 - 1:45 am | शिल्पा ब

अत्यंत उप्योगी माहीती आहे...अदितीमायेने जरुर लाभ घ्यावा...अम्हाला थोडे कमिशन दिले तर इथे परदेशात अम्ही तुमचे मार्केटिंग करु.
(% विषयी व्यनि करावा.)

ब्रिटिश टिंग्या's picture

22 Aug 2010 - 2:12 am | ब्रिटिश टिंग्या

बाबा सौ सौ घासकडवी महाराजांचा जय असो!

पुष्करिणी's picture

22 Aug 2010 - 5:04 am | पुष्करिणी

अगदी छान विवेचन. मी हेच वेगवेगळ्या डाएट टेक्निकवाल्यांच उदाहरण देउन लिहायचा प्रयत्न करत होते..

ट्रिक्सवरुन आठवलं, माणसाच्या लक्षात कुठल्या गोष्टी राहतात हे जर कळले तर सगळी कोडी सुटतात.

(लहानपणीच सुटले असल्याने एक सोपं उदाहरण म्हणतो)
बरेचदा, "मी छत्री घेतली नाही की पाउस हमखास पडतोच" वगैरे घटना घडतात. इथे मनुष्य सोयीस्कर रित्या छत्री घेतलेली असताना पडलेला पाउस विसरतो, छत्री घेतलेली नसताना न पडलेला पाउस विसरतो, पण जेव्हा छत्री नसते तेव्हाचा पावसात भिजण्याचा अनुभवच तो हिशेबात घेउन अवतरणातील वाक्यं बोलतो. अशी बरीच उदाहरणं घेता येतील.

एखादी गोष्ट आपल्याला कळत नसतानाही तिच्यावर निस्सीम विश्वास ठेवणारे लोक पाहिले की हसु येते. तसे म्हणा, गुरुजींचे अनुयायी, कविता कळत नसतानाही आम्ही झालो आहोतच की. ;-)

प्रकाश घाटपांडे's picture

22 Aug 2010 - 10:12 am | प्रकाश घाटपांडे

तसे म्हणा, गुरुजींचे अनुयायी, कविता कळत नसतानाही आम्ही झालो आहोतच की. Wink

हॅहॅहॅ

तिमा's picture

22 Aug 2010 - 11:16 am | तिमा

माझ्या माहितीतले एक बाबा फार हुशार होते. (आता या जगात नाहीत) तर त्यांनी एक युक्ति केली होती. तुमच्या मनांत तुम्ही एक प्रश्न्/समस्या विचारायची (ज्याचे उत्तर केवळ हो/नाही यांत असेल.) बाबांसमोर बसून मनांत प्रश्न विचारुन बाबांच्या पाया पडायचे. बाबा फक्त हो किंवा नाही असे म्हणणार! त्यावरुन तुम्ही तुमचाच निष्कर्ष काढायचा व त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा.
अशा तर्‍हेने बाबांचे अगणित भक्त झाले होते. त्यातले अनेक उद्योगपतीही होते.

अर्धवट's picture

22 Aug 2010 - 2:39 pm | अर्धवट

आयला.. गुर्जी.. पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार..

सोडवा या संसारातल्या तापत्रयापासुन..

एक अगदी खरा अनुभव सांगतो - काल संडासात गेलो होतो, पाणी नव्हतं. घासुगुर्जींचा धावा केला धोधो पाणी.. आता मी फोटोच लावुन ठेवलाय.. पाणी जातच नाय.. ;)

मी-सौरभ's picture

23 Aug 2010 - 6:52 pm | मी-सौरभ

तुमचा पहिला अनुयायी अर्धवट आहे मग त्याला पूर्ण मोजून चालेल का??

:)

डॉ.श्रीराम दिवटे's picture

22 Aug 2010 - 2:44 pm | डॉ.श्रीराम दिवटे

उत्तम लेख...
तिरकस बाण लागतोच.

पैसा's picture

22 Aug 2010 - 3:12 pm | पैसा

आचार्य प्र. के. अत्रे यांच्या पुस्तकांमध्ये असले बरेच नमुने भेटतात.

प्रियाली's picture

22 Aug 2010 - 5:01 pm | प्रियाली

बर्‍याचदा बाबांपेक्षा भक्तच हुशार असतो. अनेक उदाहरणातून असे दिसते की गावात सत्पुरुष आला किंवा मला साक्षात्कार झाला वगैरे सांगणारी एखादी व्यक्ती पुढे येते आणि ती बाबा नावाच्या बाहुल्याला पुढे करते. तोच पहिला भक्त. फॅन फॉलोइंग, आश्रम, मठ वगैरे जबाबदार्‍या तोच निभावतो. अशा ठिकाणी बाबांनी माया जमवली, साहित्य निर्माण केले, प्रवचने दिली असे दिसत नाही. परंतु भक्त आरत्या करतात, कवने प्रसवतात, साहित्य निर्माण करतात.

आळश्यांचा राजा's picture

22 Aug 2010 - 9:32 pm | आळश्यांचा राजा

ग्रामीण ओरीसात धार्मीक आचार हे रोजच्या जीवनात इतके रुळलेले आहेत, की देव आहे की नाही, धर्म म्हणजे काय इत्यादि शंका लोकांना पडत नाहीत. कुणी त्या उपस्थित करत नाही. देव म्हणजे घरात खरोखरच एखादा हाडामासाचा मेंबर असावा अशा पद्धतीने सर्रास वागणे असते. आश्रम मठ गावागावात आहेत. पण चमत्कारांची बुवाबाजी इथे इतकी पहायला मिळत नाही. तसेच, धर्माधारीत/ जात्याधारीत राजकारणाला पण इथे फारशी जागा नाही.

ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

हा माझा ओरीसातील एका ठरावीक भागातला चाळीस-पन्नास गावांमधला प्रत्यक्ष अनुभव आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा इतका अनुभव नाही; पण महाराष्ट्रातल्या, त्यातही पश्चिम महाराष्ट्रासारख्या प्रगत भागातल्या (म्हणजे आर्थिक संपन्नता, तसेच समाज प्रबोधनाचा इतिहास) बुवाबाजीच्या कथा ऐकल्या की हा विरोधाभास लक्षात आल्याखेरीज रहात नाही.

श्रावण मोडक's picture

22 Aug 2010 - 11:08 pm | श्रावण मोडक

गुर्जी, हे काय हो?

एका माणसाने १०२४ लोकांना पत्रं पाठवली. निम्म्या लोकांना सांगितलं की क्ष स्टॉक आज वर जाईल. निम्म्यांना तो खाली जाईल असं सांगितलं. दररोज तो अशी पत्रं पाठवत राहिला. फक्त दरवेळी त्याने सगळ्यांना रॅंडमली निवडून वर वा खालीची उत्तरं पाठवली. निम्म्यांना वर, निम्मी खाली. एवढंच. शून्य बुद्धीमत्ता वापरून. असं आठ वेळा केल्यावर

४ लोकांना लागोपाठ ८ अचूक उत्तरं
३२ लोकांना ८ पैकी ७ बरोबर भाकित
११२ लोकांना ८ पैकी ६ बरोबर भाकितं

म्हणजे सुमारे पंधरा टक्के लोकांना त्याच्याकडे अतिशय अचूक भाकितं करण्याची शक्ती आहे असा विश्वास सहज बसला. आता या १४८ पैकी किमान पन्नास लोकांनी जर खरोखरच त्याच्या सल्ल्याप्रमाणे पैसे लावले, तर त्यातले सुमारे १२ लोक लागोपाठ दोनवेळा पैसे कमावतील. हे त्याचे पहिले अनुयायी/भक्त. मग त्यातले काही पैसे त्याच्या चरणी अर्पण करतील. इतकंच नव्हे तर ते आपल्या अनेक श्रीमंत मित्रांकडे त्याचे गोडवे गातील. पुरावा म्हणून तुमची १० पैकी ८ ते १० वेळा बरोबर आल्याचे 'चमत्कार' सांगतील. त्यानंतर मग त्याचं भाकीत चुकलं तर ते स्वतःलाच दोष देतील. कारण एव्हानात्याचं बरोबर हे त्यांनी जीवनातलं त्यांना गवसलेलं सत्य म्हणून स्वीकारलेलं असतं.

नेमकं काय सांगायचं आहे तुम्हाला? यातले आकडे थोडे बदलले तर भलतंच विश्वरूप दर्शन होतंय... ;) आणि हे वर म्हटल्याप्रमाणं होत नाही असं कळल्यावर काय होतं?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Aug 2010 - 11:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेख न वाचताच मी बाबा घासकडवी पूजावाले यांची भक्त झाले आहे. आजपासून मी जालिंदर बाबांचं शोल्डर गार्ड काढून टाकलं आहे हे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे.

धनंजय's picture

23 Aug 2010 - 3:50 am | धनंजय

मस्त आणि विनोदी.

विकास's picture

23 Aug 2010 - 5:18 am | विकास

अस फार कमी वेळेस होते की एखाद्या लेखात येणार्‍या सर्व प्रतिक्रीया या एकमेकांशी विसंवादी नसतात. :-) आता हे कसे झाले ते गणिती अथवा वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करा नाहीतर तो चमत्कार आहे हे मान्य करा ;)

जर हा चमत्कार आहे हे जाहीर मान्य केलेत तर तुम्ही चमत्कारवाले बाबा (चमत्कारीक नाही!). जर तुम्हाला ते सिद्ध करता आले नाही आणि तरी देखील केवळ विज्ञानाला चमत्कार मान्य नाही म्हणून हा चमत्कार मानत नसलात तर मग तुम्ही विज्ञाननिष्ठ बाबा!

धनंजय's picture

23 Aug 2010 - 5:34 am | धनंजय

कदाचित कुठलाही विशिष्ट बाबा नाही, असे पुन्हापुन्हा म्हणण्याची काळजी लेखकाने घेतलेली आहे. त्यामुळे "तो तिकडचा आपल्याला नावडता भोंदू" म्हणून कोणीही वाचक हसून घेईल.

प्रत्यक्षात कोणत्याही एका बाबाचे नाव घेतल्यास कोणाच्यातरी श्रद्धेला आघात होईल. किंवा कुठल्या एका बाबाची फसवाफसवी बंद करायचा प्रयत्न केला तर अधिक विरोध दिसेल, असा माझा कयास आहे.

"सोप ऑपेरा"बाबत टीका आपन सहज सहन करतो, आनंदाने टीकेत भर घालतो. मात्र आपला आवडता चविष्ट "सोप" मात्र जेवण बाजूला ठेवून बघतो. तसे काही असू शकते.

विकास's picture

23 Aug 2010 - 6:14 am | विकास

अहो महाराज! ;)

मी त्या प्रतिसादात देखील टिपी करत होतो. त्यामुळे ह.घ्या.हे.वे.सां.न.ल. लिहीले नसले तरी अध्याहृत होते. राजेश यांनी पण तो तसाच (हलकाच) घेतला असे दिसत आहे आणि तुम्ही देखील तसेच घेतले असावे असे वाटते. फक्त कधी कधी प्रतिसाद वाचताना माझी अवस्था चांगदेवासारखी होते ;) म्हणून खात्री करून घेत आहे. :-)

राजेश घासकडवी's picture

23 Aug 2010 - 5:48 am | राजेश घासकडवी

गणिती अथवा वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करा नाहीतर तो चमत्कार आहे हे मान्य करा

हॅ हॅ हॅ. हे करावं लागणार नाही याची सोय ग्योडेलने केलेली आहे. काही सत्यांना सिद्धता शक्य नसते हे त्याने सिद्ध केलं होतं (हलक्यानेच घ्या). आणि तशीही आमची श्री श्री राजविज्ञानेश बाबा म्हणून प्रसिद्ध व्हायला काहीच ना नाही. :) भक्त हाच शेवटी परमेश्वर. :)

प्रियाली's picture

23 Aug 2010 - 6:34 am | प्रियाली

जय हो!
जय हो!
जय हो!
जय हो!
जय हो!

उगीच ए. आर. रेहमानचे* गाणे आठवले.

* स्पष्टीकरण दिले कारण एखाद्याला वाटायचे आम्हीही विज्ञाननिष्ठ बाबांच्या नादी लागलो म्हणून. ;)

Nile's picture

23 Aug 2010 - 11:00 am | Nile

भक्त हाच शेवटी परमेश्वर. Smile

काय हो राजविज्ञानेश बाबा, का गोंधळात टाकत आहात? कुठल्यातरी संताने म्हणले आहे की देवाची आराधना करण्यापेक्षा देवाच्या (प्रिय)भक्ताची (=क्षबाबाची)आराधना केल्याने फळ लवकर मिळते म्हणून. आता तुम्ही साक्षात बाबा, पण तुम्ही म्हणता भक्त परमेश्वर म्हणुन. आता हे गणित सोडवले तर भक्ताने स्वतःचीच आराधना करायची की काय? अहो पण स्वतःचीच व्यक्तीपुजा तर समाजात निषिद्ध आहे.

हे असं होतं आमचं, कशाचा नक्की काय अर्थ काढायचा हे कळतच नाही अन आम्ही "विपरीतच" अर्थ काढुन बसतो, मग आम्हाला सतत 'संपादनाची' गरज लागते. कुठला बाबा आम्हाला सोडवेल यातुन?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Aug 2010 - 11:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रिय मित्र श्री. निळे,

तुम्ही सध्या बाबा आणि भक्तांच्या नादी लागण्यापेक्षा आपल्या स्वतःसाठी जोगीण शोधावीत; आपले अनेक प्रश्न दूर होतील असे आमचे नवे गुरू, श्री. सौ. श्रीमंत बाबा पूजावाले महाराजे शङ्काप्रिय यांनी आमच्या स्वप्नात येऊन सांगितले आहे. आम्ही फक्त निरोपे, तेवढं काम केलं.

धन्यवाद.*

*धन्यवाद म्हणजे आपल्या धन्यतेबद्दल वाद आहे असं नाही, नाही असंही नाही!

निरोपाबद्दल शुक्रिया, त्या सत्कार्यासाठी कुठल्यातरी बाबाच्या शोधात आम्ही आहोतच.

राजेश घासकडवी's picture

23 Aug 2010 - 11:21 am | राजेश घासकडवी

नाईलभाऊ,

तुम्ही मूळ लेखन न वाचताच केवळ प्रतिसादांवरूनच मत बनवण्याची मिपावरील उज्वल परंपरा पुढे चालू ठेवत आहात असं दिसतंय. अहो, भोंदू बाबांसाठी भक्त हाच परमेश्वर हे केवळ सांगण्यासाठी. खरा परमेश्वर त्या दगड भक्ताच्या खिशात, पाकिटात, पर्सांमध्ये (व इतरही ठिकाणी) दडलेला असतो. त्याची खरी भक्ती करायची तर भक्तांना आपल्या नादी लावणं हे करावं लागतं. इथे भक्ती शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत हे तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही. असो. आम्हाला शरण या, आम्ही सगळं व्यवस्थित समजावून सांगू. तुमचं पाकीट, ब्यांकबुक वगैरे घेऊन या हे सांगणे नलगे.

तुमच्यासारखे खूप भक्त जमले की संपादकांकडेही आमची वट चालू होईल. (त्यांचाही उल्लेख मूळ लेखात थोडा वेगळा शब्द वापरून केला आहे) त्यांना मन निर्मळ करायला साबण हवाच ना शेवटी? :) मग सगळ्या विपरीताचं सुरळीत होईल.

चुकले बुवा. लेख वाचला होता पण दोन बाबांच्या सल्ल्यात गफलत झाली, भक्ताला समजुन घ्या.

तुम्ही मूळ लेखन न वाचताच केवळ प्रतिसादांवरूनच मत बनवण्याची मिपावरील उज्वल परंपरा पुढे चालू ठेवत आहात असं दिसतंय.

कधी कधी तुसडेपणाचाही फायदा होऊ शकतो

हा फायदा आता कळाला. ;-)

खरा परमेश्वर त्या दगड भक्ताच्या खिशात, पाकिटात, पर्सांमध्ये (व इतरही ठिकाणी) दडलेला असतो.

बाकी आता कळलं, पण आमची तुमच्यावर नितांत श्रद्धा असल्याने ( अनुयायी ना) आम्हाला तुमचे महावाक्य प्रमाणच वाटले. पण आम्ही तसे जात्याच श्रद्धाळु असल्याने त्या दुसर्‍या बाबाचे पण वाक्य प्रमाण वाटले. म्हणुन शंका उपस्थित केली.

आमचे कल्याण तुमच्याच हातुन होणार असल्याची खात्री पटल्याने आम्ही तुम्हास शरण आलोच आहोत, कल्याणातील ५०% हिस्सा तुमचा!

प्राजक्ता पवार's picture

23 Aug 2010 - 2:34 pm | प्राजक्ता पवार

उत्तम लेख

भडकमकर मास्तर's picture

23 Aug 2010 - 2:42 pm | भडकमकर मास्तर

फार दिवसांनी मिपावर आलो आणि मस्त लेख वाचायला मिळाला...

आम्ही करियर गायडन्स वर्गात एक असाच लेख लिहिला होता गेल्या वर्षी..
भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ५..बुवा / स्वामी / महाराज व्हा
http://www.misalpav.com/node/9416
त्याची आठवण झाली.

मन१'s picture

9 Aug 2011 - 7:16 pm | मन१

हे नजरेतुन कसं काय सुटलं बुवा?
असाच एक लेख आत्ताच गविचा दिसला इथे:-
http://www.misalpav.com/node/18754

स्मिता.'s picture

9 Aug 2011 - 7:33 pm | स्मिता.

आता गविंचा धागा वाचून याच धाग्याची आठवण झाली तोवर धागा वर आलाच!