आमची त्सेंटा आजी आणि अकिम आजोबा ह्यांना आमच्याकडे आलेल्या सर्वांची मूँहदिखाई झालीच पाहिजे असा अलिखित नियम असल्याने अदितीलाही संध्याकाळी त्यांच्याकडे घेऊन गेले.(अपवाद केसु, केसु इथे १.५ वर्ष असले तरी त्यांची आणि फ्लेमिंग कुटुंबाची भेट मात्र ह्या ना त्या कारणाने राहिलीच!) मार्सेला, आजीची मोठी बहिणही तेथे आलेली असल्याने त्यांच्याकडे बर्याच गप्पा रंगल्या.
रोमांटिशं स्ट्रासंचा उल्लेख केल्यावर लगेचच आजी चित्कारली.. तिचे जन्मगाव वालरष्टाइन हे सुध्दा रोमँटिक रस्त्यावर आहे, तेथे अजून त्यांचे ३/४ शतकांपूर्वीचे जुने घर आहे. आजीची मधली बहिण हेडी बॉबफिंगन येथे म्हणजे रोमँटिक रस्त्यावरच राहते. तिने आणि मार्सेलानेही दोन्ही ठिकाणी आम्ही जावे असा आग्रह तर धरलाच पण हेडीला फोन करुन आम्ही तेथे जाणार असल्याचेही कळवले. हेडीलाही आम्ही भेटणार याचा खूप आनंद झालेला जाणवला. झाले,रोमँटिक रोडवरच्या ह्या दोन गावांना भेट देणे तर आता आणखीच आवश्यक झाले. त्या गावांच्या रोमँटिकपणापेक्षाही वेगळ्या नात्याच्या,मैत्रीच्या बंधांनी त्यात गुरफटलो होतो.
हा बव्हेरियातला रोमांटिशं स्ट्रासं आपले नाव सार्थ करत वारुणीद्राक्षांच्या शेतातून,माइनच्या काठाकाठाने वुर्झबुर्ग पासून सुरू होऊन पार फुसनपर्यंत आल्प्सच्या पायात लुडबुड करत जातो. जवळजवळ ३६६ किमीचा हा पट्टा मध्ययुगात महत्त्वाचा व्यापाराचा रस्ता म्हणून प्रचलित होता. दोन दिवसाच्या मर्यादेत फुसनपर्यंत जाऊन भोज्जाला शिवून येण्यापेक्षा आम्ही आजीच्या वालरष्टाइनच्या शेजारच्या नॉर्डलिंगन पर्यंत जायचे ठरवले. नाजूक वळणे घेत जाणारा, आपल्या दोबाजूला द्राक्षवारुणींचे मळे आणि लालचुटुक कौलांची टुमदार घरे लेवून पिवळ्यालाल फुलांनी मढवलेले हिरवे मखमाली गालिचे अंथरुन अगत्य दाखवणार्या ह्या रोमांटिशं स्ट्रासंवरुन जाताना ऑटोबानने गाडी हाकण्याचा अरसिकपणा न करता बुंडेसस्ट्रासंने म्हणजे कंट्रीरोडने त्या रस्त्यावरचं सौंदर्य डोळ्यात आणि बापड्या कॅमेर्यात बंद करण्याचा प्रयत्न करत आमचा प्रवास चालू झाला. त्या रस्त्यांवरुन राहुलच्या आवाजातली कबिरवाणी वेगळीच शब्दातीत अनुभूती देऊन गेली. श्रामोंना त्याबद्दल भाराभर धन्यवाद देत आमच्या गप्पांची गाडी आपसूकच मिपावर वळली.
एकदा कॉफीब्रेक घेऊन, गाडीत पेट्रोल आणि पोटात सँडविचे टाकून पुढच्या रोमँटिक वळणांवर गेलो. त्या परिकथेतच शोभाव्या अशा रस्त्यावरुन आम्ही हेडीच्या बॉबफिंगनला पोहोचलो तेव्हा दुपारचा एक वाजून गेला होता. त्या चिमुकल्या गावात हेडीचे घर शोधायला आम्हाला फार वेळ लागला नाही. एका डौलदार वळणावर हेडीची बंगली आहे. दारातच हेडीची मुलगी, छोटी मार्सेला आमची वाट पाहत प्रसन्नपणे उभी होतीच. ही छोटी मार्सेला म्हटलं तरी लहान मुलगी नव्हे तर पन्नाशीची प्रौढा असेल. हेडी आणि त्सेंटाची मोठी बहिण मार्सेला हिच्या सन्मानार्थ हेडीच्या मोठ्या मुलीचे नाव मार्सेलाच ठेवले.आता एका घरात दोन दोन मार्सेला झाल्या ना.. मग ती मोठी मार्सेला आणि ही छोटी मार्सेला! हेडी, मार्सेला (ज्यु.) आणि आमची भेट बर्याच दिवसांनी होत होती. खूप दिवसांनी आपली आवडती मावशी/काकू/मामी भेटली की कसा आनंदाला आणि गप्पांना बहर येतो? तसेच झाले आमचे.. एकमेकांची ख्यालीखुशाली विचारुन झाली ,आईच्या मागच्या जर्मनीभेटीत हेडीचीही त्सेंटाच्या घरी गाठ पडली होती अशा अगदी घरगुती आठवणीही झाल्या. आई आणि तिच्या गप्पा एकमेकींना भाषांतरित करत तिची अदितीशी ओळख करुन दिली. तीही आमच्याबरोबर असल्याची खबर त्सेंटाने केव्हाच फोनवरुन दिली होतीच म्हणा!
हेडीच्या घरी ताजे, नरम ब्रेत्सेल म्हणजे मीठाचे स्फटिक लावलेले, बदामाच्या आकाराचे पाव आणि वाफाळती कॉफी आमची वाट पाहत होती. गप्पा मारता मारता तिचा समाचार घेऊन झाल्यावर हेडीचे ते चित्रातल्या सारखे दिसणारे घर पाहिले. घर कसले लहानसा व्हिलाच आहे तो! वरच्या मजल्यावरच्या मोठ्या मार्सेलाच्या बिर्हाडापासून तळमजल्यावरच्या पाहुण्यांच्या खोल्या एवढेच नव्हे तर विंटरमध्ये हिटरसाठी आवश्यक असा ६००० लिटर कपॅसिटीचा ऑइलटँकही पाहून झाला. दोन्ही मार्सेलांच्या लहानपणीचे निवडक फोटोही पाहिले. ज्या झाडाची बादली,बादलीभरुन रसाळ,मीठी सफरचंदे नेहमी खातो ते झाड पाहिले आणि तिचे किचनगार्डनही पाहिले. पावसाची रिपरिप सततच चालू होती सक्काळपासूनच, म्हणून हेडी आणि तिच्याहीपेक्षा जास्त मार्सेला हिरमुसली होती कारण तिचा बेत अंगणात ग्रील करण्याचा होता. दिवाणखान्यातल्या एक टेबलावर आम्ही तिला वेळोवेळी दिलेल्या भेटी (म्हणजे आपले लाखेचे काचकाम केलेला करंडा, हत्ती,लाकडी कोस्टर्स असंच काहीबाही..) मांडून ठेवलेल्या आवर्जून आणि अगदी कौतुकाने दाखवल्या. त्या कौतुकाने आम्हाला जरा अवघडल्यासारखेच झाले पण ते अगदी आतून, मनापासूनचे होते वरवरचे,बेगडी नव्हते हे जाणवत होते.
हेडीचे सासर आणि माहेरच्या गावात अगदी ९/१० किमी च अंतर असेल,नसेल.पण माहेरच्या घरी निघालेली ८२ वर्षाची हेडी मोहरली होती, भावूक झाली होती. आम्हाला तिकडे लवकर चलायची घाई करु लागली होती. मार्सेलाच्या गाडीमागे आमची गाडी धावू लागली. त्या चिमुकल्या पण सुसज्ज गावातली एकुलती एक शाळा, मार्केटाची जागा, प्रोटेस्टंटी सुबक चर्च असे दाखवत तिने गावात एक फेरफटका करवला आणि वालरष्टाइनच्या दिशेने आमच्या गाड्या धावू लागल्या. गेटाचे कुलूप काढताना मायेने आपला हात तिथल्या कडीकोयंड्यावर फिरवत म्हणाली, किती दिवसांनी येते आहे, हल्ली जमत नाही पूर्वीसारखं वारंवार इथे येणं. रीटा, तिची दुसरी मुलगी तेथे आठवड्यातून दोनदा कॉस्मेटिक क्लिनिक चालवते आणि घर उघडलं जातं, वावरलं जातं.
इथे आत्ता क्लिनिकची मशिनं आहेत ना ती आमची बसाउठायची खोली होती आणि वेटींग रुम आहे ना ती आईबाबांची खोली. हेडी केव्हाच त्या जुन्या घरात आणि काळात पोहोचली होती. स्वैपाकघर अजूनही तेच आहे. रिटा कॉफी बिफी करते ना इथे. ह्याच चुलीवर तेव्हा १० माणसांचा स्वैपाक घरात रोज होत असे आणि आता... ती जर्मनमध्ये "कालाय तस्मै नम:" असे उसासली आणि जिना चढू लागली. ही पाहुण्यांची खोली. आणि ती शेजारची खोली मार्सेलाची. ही मोठी खोली मी आणि त्सेंटाची. इथे मी झोपायचे आणि त्या बेडवर त्सेंटा, आतल्या खोलीत फॅनी आणि ही आमची कपाटं..ही टेबलक्लॉथची लेस माझ्या आत्याआजीने विणलीय बरं का..एकेक कपाट उघडत हेडी जणू काळाचा एकेक पापुद्राच उलगडत होती. आमचा आवाजाचा गलका वाढला ना की आई वर यायची ,तिची चाहूल लागली की मग आम्ही पांघरुणात गुडुप व्हायचो. चष्म्याआडून निळे डोळे मिस्किलपणे लुकलुकू लागले, सुरकुत्या गायब झाल्या आणि फ्रॉकातली हेडी, त्सेंटा तिथे दिसायल्या लागल्या.
तेथे असलेल्या वस्तूवस्तूंमधून आठवणींचा खजिना डोकावत होता. मागच्या अंगणातला प्रशस्त गोठा आणि त्यापलिकडे असलेले प्रचंड शिवार पाहताना हेडी परत एकदा बालपणात हरवली. वालरष्टाईनमधले आमचे हे सर्वात जुने घर, माझ्या खापरपणजोबांनी बांधलेले.. गावात बराच मान होता आमच्या घराण्याला.. आता नुसत्या आठवणी राहिल्यात..पण गल्लीत अजूनही आमच्या वेळचे काही लोकं आहेत हो, ते ओळखतात,विचारपूस करतात. क्वचित कोणी जुनी मैत्रिणही भेटते,बरं वाटतं. देश,भाषा,धर्म,पंथ सगळ्याच्या पलिकडंचं सार्वत्रिक सत्य बोलत होतं.
डोनाव-रिसमधील ऐतिहासिक महत्त्वाच्या त्या टुमदार वालरष्टाइनची सैर करायला मग आम्ही त्या दोघींबरोबर बाहेर पडलो. गावच्या मुख्य रस्त्यावरचे चर्च आणि क्रोनोग्राम पाहिला. गावातले सर्वात जुने उपाहारगृह,बेकरी,खाटीक शॉप पाहताना त्याला जोडलेल्या जुन्या आठवणी ऐकल्या.
त्या परिकथेतल्या गावातून दुसर्या तशाच गावाकडे आमच्या गाड्या धावू लागल्या. नॉर्डलिंगनच्या आमच्या हॉटेलाच्या दारात सोडून ,आमचा निरोप घेऊन हेडी आणि ज्यु. मार्सेला बॉबफिंगनकडे निघाल्या.
प्रतिक्रिया
29 Jun 2010 - 12:05 am | बिपिन कार्यकर्ते
स्वातीताई... डोळे तर निवलेच... पण तू जे आणी जसं लिहिलं आहेस ... काय बोलायचं कामच नाही.
सुरकुत्या गायब झाल्या आणि फ्रॉकातली हेडी, त्सेंटा तिथे दिसायल्या लागल्या.
क्षणभर मलाही दिसल्या. मस्तच. तुझ्या बरोबर हिंडल्याचा अनुभव येतो तू केलेली वर्णनं वाचून.
बिपिन कार्यकर्ते
29 Jun 2010 - 12:17 am | टारझन
माझ्या साठी प्रतिक्रिया टंकुन दिल्याबद्दल आभारी आहे :)
29 Jun 2010 - 12:25 am | राजेश घासकडवी
टारझनशी सहमत...
29 Jun 2010 - 12:14 am | Pain
घर कसले लहानसा व्हिलाच आहे तो.
त्याचा बाहेरून काढलेला एखादा फोटो टाका ना.
29 Jun 2010 - 10:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
बर्यापैकी पाऊस आणि वारा असल्यामुळे बाहेरून फोटो काढणं जीवावर आलं होतं. शिवाय बाहेरून पहाताना हे घर एवढं मोठं असेल असं वाटलंच नाही.
ही ८२ वर्षांची बाई एकटी त्या तिमजली घरात रहाते याचं कौतुक अजूनही ओसरलं नाही आहे; आणि नुसतीच रहाते असं नाही, सगळं कसं टापटीप, स्वच्छ आणि कलात्मकतेने मांडलेलं!
स्वातीताई, शेवटी तुला भाषांतर करावं लागलंच हां, तुम्ही काय बोलत होतात याचं! ;-)
हाही भाग मस्तच झाला आहे, पुन्हा एकदा फिरून आल्याचा आनंद झाला.
खालच्या फोटोत त्या जुन्या (वालरष्टाईनच्या) घरातली एक बेडरूम. मला जुनं फर्निचर, जुना टीव्ही, सगळंच जाम आवडलं आणि त्यातही "चोरून" फोटो काढताना आरशात बरोब्बर हेडी आज्जी सापडली.

कोण कुठल्या हेडी, मार्त्सेला, त्सेंटा आणि त्यांच्यासाठी कोण कुठली अदिती! पण मैत्रीला जात, धर्म, भाषा, वय आड येत नाहीत हेच खरं! स्वातीताई, त्सेंटा आजी आणि तिच्या बहीणींमुळे एकदम जुनं, सुंदरसा लाकडी वास असणारं घर आतून बघायला मिळालं.
नॉर्डलिंगनच्या वर्णनाची वाट पहाते आहे.
अदिती
29 Jun 2010 - 10:56 am | आंबोळी
आयला...
मी समजत होतो की फक्त स्वातीतैच इतक सुंदर लिहू शकते.... पण तिच्या बरोबर राहून तु पण छान लिहिलयस वर्णन...... एक स्वतंत्र भाग टाक तुझा....
हिंडण आणि निसर्ग सौंदर्य पहाण सर्वांनाच आवडत.... पण ते त्याच ताकदीन शब्दात उतरवण्याच्या तुम्हा दोघींच्या कसबाला दंडवत....
आंबोळी
29 Jun 2010 - 1:59 am | रेवती
मस्तच लिहिलय्स!
तुझ्याबरोबर फिरून आल्यासारखं वाटलं.
फुसनपर्यंत आल्प्सच्या पायात लुडबुड करत जातो.
हे फारच छान.
फोटू तर मस्तच!
रेवती
29 Jun 2010 - 3:10 am | नंदन
-- तंतोतंत! :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
29 Jun 2010 - 6:22 am | सहज
त्सेंटा आजीच्या लहानपणच्या घराचे वर्णन केवळ अप्रतिम!
29 Jun 2010 - 10:16 am | विजुभाऊ
स्वाती तै मस्तच लिहितेस तु.

खर्रच त्या गावातून एक छोटासा फेरफटका आम्हालाही घडवुन आणलास.
29 Jun 2010 - 10:40 am | ऋषिकेश
यावरून पुलं एका हंगेरीतील (बहुदा) गावात कुटुंबाला भेट देतात तेव्हा भेट म्हणून बटवा देतात तो ती मंडळी दिवाणखान्यात लावतात व सांगतात की हा बटवा आता माझे पणतुदेखील बघतील. ते आठवलं
वर्णन नेहमीप्रमाणे चित्रदर्शी. खूप आवडलं
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
29 Jun 2010 - 1:41 pm | भोचक
स्वाती तै, तुझी लेखनशैली खरंच. मस्तंय. तो सगळा भाग आमच्यासमोर जिवंत झाल्यासारखा वाटला.
(भोचक)
जाणे अज मी अजर
29 Jun 2010 - 1:43 pm | यशोधरा
स्वातीताई, खूप छान लिहिलंस गं, मी वाचते आहे. कधी प्रतिसाद द्यायला नाही जमलं तरी तुझं लिखाण वाचल्याशिवाय रहात नाही. :)
29 Jun 2010 - 1:58 pm | घाटावरचे भट
छान!!
29 Jun 2010 - 6:52 pm | प्रभो
मस्त गं स्वातीताई......
जर्मन व्हिजा मिळायला जर्मन फुटबॉल सपोर्टर बनावं लागेल काय??? ;)
1 Jul 2010 - 1:49 am | मेघवेडा
मग वेड्या तुला काय वाटलं, मी का झालोय जर्मन सपोर्टर? ;)
बाकी स्वातीताई, लिखाण शॉल्लीटच हां! :)
30 Jun 2010 - 12:20 am | चित्रा
देश,भाषा,धर्म,पंथ सगळ्याच्या पलिकडंचं सार्वत्रिक सत्य बोलत होतं.
छान. लेख आवडला.
30 Jun 2010 - 5:15 am | केशवसुमार
उत्तम लेख..
नेक्स्ट टाईम फ्लेमिंग कुटुंबाला नक्की भेट देणार..
पण आधी राकलेट आणि केक ..
केसु
30 Jun 2010 - 7:18 am | सुनील
सुंदर, अप्रतिम लेख आणि फोटो (अदितीच्या आरशातल्या आजीसकट!)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
30 Jun 2010 - 8:31 am | स्पंदना
खुप छान लिहिलय. दोन्ही भाग आत्ताच वाचले.ज्या गावात रहातो तिथल्या लोकांशी एकरुप होउन जाण फार महत्वाच असत.
(आदिती "आदिती" नावाच्या व्यक्तिने अस एक सारखच दिसल पाहिजे का? माझ्या ओळखीची आदिती पण साधारण अश्शीच दिसते)
निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका(योगेश २४ यांच्या परवानगीने)
30 Jun 2010 - 3:17 pm | जागु
खुप छान.
1 Jul 2010 - 12:18 am | चित्तरंजन भट
स्वातीताई, नेहमीप्रमाणेच झकास लेख व चित्रे. त्सेंटा आजी आणि अकिम आजोबा ह्यांनी किती किती दिवसांनी बघितले. बरे वाटले. त्यांना सा. न. कळवा.
3 Jul 2010 - 12:57 pm | शाल्मली
सुंदर वर्णन..!
त्सेंटा आजी आणि अकिम आजोबा ह्यांनी किती किती दिवसांनी बघितले. बरे वाटले.
असंच म्हणते..
तुमच्या गप्पा किती रंगल्या असतील याची कल्पना येते आहे..
बाय द वे.. केसूंना टूक टूक.. बराच काळ तिथे राहूनही आज्जी-आजोबांना भेटले नाहीत.. ह्या हे काही बरोबर नाही ;)
पुढच्या वृत्तांताची वाट बघत आहे..
--शाल्मली.
3 Jul 2010 - 9:15 pm | केशवसुमार
त्सेंटा अज्जींना भेटलो नसलोतरी काय झाले त्सेंटा अज्जींनी केलेले अनेक प्रकारचे केक सगळ्यात जास्त केसूंनी चापलेत हे विसरलात ..टूक टूक.
(स्मरणशील)केसू
3 Jul 2010 - 8:46 pm | अरुंधती
मस्त वर्णन आणि त्याला समर्पक असे फोटोज.... नजरेची मेजवानी! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
3 Jul 2010 - 9:27 pm | शिल्पा ब
छान लिहिलंय....आपल्या छान आठवणी असलेल्या गावात आणि घरात गेल्यावर सगळ्यांची हीच स्थिती होते...फोटो छान आहेत.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
6 Jul 2010 - 6:38 pm | llपुण्याचे पेशवेll
वाह.. फारच छान वर्णन. :)
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
9 Jul 2010 - 7:07 pm | गुंडोपंत
एकेक कपाट उघडत हेडी जणू काळाचा एकेक पापुद्राच उलगडत होती.
काय मस्त आली आहेत वाक्यांवर वाक्य!
झकास लिखाण वाचायला मिळतंय अनेक दिवसांनी.
खरे तर असे लिखाण अजून यायला हवे -
मिपाकरांनो स्वातीकडे जाणे मनावर घ्या! म्हणजे असे अजून वाचायला मिळेल ;)
परदेशात राहून इतकी छान जीव लावणारी, हक्काने आपल्या गोष्टी दाखवणारी, माणसे जोडली आहेत, हे पाहून खुप छान वाटले.
हा फार मोठा गुण आहे.
कौतुक वाटले!
आपला
गुंडोपंत