पुन्हा एकदा भ्रमणगाथा- २
लेखनप्रकार
आमची त्सेंटा आजी आणि अकिम आजोबा ह्यांना आमच्याकडे आलेल्या सर्वांची मूँहदिखाई झालीच पाहिजे असा अलिखित नियम असल्याने अदितीलाही संध्याकाळी त्यांच्याकडे घेऊन गेले.(अपवाद केसु, केसु इथे १.५ वर्ष असले तरी त्यांची आणि फ्लेमिंग कुटुंबाची भेट मात्र ह्या ना त्या कारणाने राहिलीच!) मार्सेला, आजीची मोठी बहिणही तेथे आलेली असल्याने त्यांच्याकडे बर्याच गप्पा रंगल्या.
रोमांटिशं स्ट्रासंचा उल्लेख केल्यावर लगेचच आजी चित्कारली.. तिचे जन्मगाव वालरष्टाइन हे सुध्दा रोमँटिक रस्त्यावर आहे, तेथे अजून त्यांचे ३/४ शतकांपूर्वीचे जुने घर आहे. आजीची मधली बहिण हेडी बॉबफिंगन येथे म्हणजे रोमँटिक रस्त्यावरच राहते. तिने आणि मार्सेलानेही दोन्ही ठिकाणी आम्ही जावे असा आग्रह तर धरलाच पण हेडीला फोन करुन आम्ही तेथे जाणार असल्याचेही कळवले. हेडीलाही आम्ही भेटणार याचा खूप आनंद झालेला जाणवला. झाले,रोमँटिक रोडवरच्या ह्या दोन गावांना भेट देणे तर आता आणखीच आवश्यक झाले. त्या गावांच्या रोमँटिकपणापेक्षाही वेगळ्या नात्याच्या,मैत्रीच्या बंधांनी त्यात गुरफटलो होतो.
हा बव्हेरियातला रोमांटिशं स्ट्रासं आपले नाव सार्थ करत वारुणीद्राक्षांच्या शेतातून,माइनच्या काठाकाठाने वुर्झबुर्ग पासून सुरू होऊन पार फुसनपर्यंत आल्प्सच्या पायात लुडबुड करत जातो. जवळजवळ ३६६ किमीचा हा पट्टा मध्ययुगात महत्त्वाचा व्यापाराचा रस्ता म्हणून प्रचलित होता. दोन दिवसाच्या मर्यादेत फुसनपर्यंत जाऊन भोज्जाला शिवून येण्यापेक्षा आम्ही आजीच्या वालरष्टाइनच्या शेजारच्या नॉर्डलिंगन पर्यंत जायचे ठरवले. नाजूक वळणे घेत जाणारा, आपल्या दोबाजूला द्राक्षवारुणींचे मळे आणि लालचुटुक कौलांची टुमदार घरे लेवून पिवळ्यालाल फुलांनी मढवलेले हिरवे मखमाली गालिचे अंथरुन अगत्य दाखवणार्या ह्या रोमांटिशं स्ट्रासंवरुन जाताना ऑटोबानने गाडी हाकण्याचा अरसिकपणा न करता बुंडेसस्ट्रासंने म्हणजे कंट्रीरोडने त्या रस्त्यावरचं सौंदर्य डोळ्यात आणि बापड्या कॅमेर्यात बंद करण्याचा प्रयत्न करत आमचा प्रवास चालू झाला. त्या रस्त्यांवरुन राहुलच्या आवाजातली कबिरवाणी वेगळीच शब्दातीत अनुभूती देऊन गेली. श्रामोंना त्याबद्दल भाराभर धन्यवाद देत आमच्या गप्पांची गाडी आपसूकच मिपावर वळली.
एकदा कॉफीब्रेक घेऊन, गाडीत पेट्रोल आणि पोटात सँडविचे टाकून पुढच्या रोमँटिक वळणांवर गेलो. त्या परिकथेतच शोभाव्या अशा रस्त्यावरुन आम्ही हेडीच्या बॉबफिंगनला पोहोचलो तेव्हा दुपारचा एक वाजून गेला होता. त्या चिमुकल्या गावात हेडीचे घर शोधायला आम्हाला फार वेळ लागला नाही. एका डौलदार वळणावर हेडीची बंगली आहे. दारातच हेडीची मुलगी, छोटी मार्सेला आमची वाट पाहत प्रसन्नपणे उभी होतीच. ही छोटी मार्सेला म्हटलं तरी लहान मुलगी नव्हे तर पन्नाशीची प्रौढा असेल. हेडी आणि त्सेंटाची मोठी बहिण मार्सेला हिच्या सन्मानार्थ हेडीच्या मोठ्या मुलीचे नाव मार्सेलाच ठेवले.आता एका घरात दोन दोन मार्सेला झाल्या ना.. मग ती मोठी मार्सेला आणि ही छोटी मार्सेला! हेडी, मार्सेला (ज्यु.) आणि आमची भेट बर्याच दिवसांनी होत होती. खूप दिवसांनी आपली आवडती मावशी/काकू/मामी भेटली की कसा आनंदाला आणि गप्पांना बहर येतो? तसेच झाले आमचे.. एकमेकांची ख्यालीखुशाली विचारुन झाली ,आईच्या मागच्या जर्मनीभेटीत हेडीचीही त्सेंटाच्या घरी गाठ पडली होती अशा अगदी घरगुती आठवणीही झाल्या. आई आणि तिच्या गप्पा एकमेकींना भाषांतरित करत तिची अदितीशी ओळख करुन दिली. तीही आमच्याबरोबर असल्याची खबर त्सेंटाने केव्हाच फोनवरुन दिली होतीच म्हणा!
हेडीच्या घरी ताजे, नरम ब्रेत्सेल म्हणजे मीठाचे स्फटिक लावलेले, बदामाच्या आकाराचे पाव आणि वाफाळती कॉफी आमची वाट पाहत होती. गप्पा मारता मारता तिचा समाचार घेऊन झाल्यावर हेडीचे ते चित्रातल्या सारखे दिसणारे घर पाहिले. घर कसले लहानसा व्हिलाच आहे तो! वरच्या मजल्यावरच्या मोठ्या मार्सेलाच्या बिर्हाडापासून तळमजल्यावरच्या पाहुण्यांच्या खोल्या एवढेच नव्हे तर विंटरमध्ये हिटरसाठी आवश्यक असा ६००० लिटर कपॅसिटीचा ऑइलटँकही पाहून झाला. दोन्ही मार्सेलांच्या लहानपणीचे निवडक फोटोही पाहिले. ज्या झाडाची बादली,बादलीभरुन रसाळ,मीठी सफरचंदे नेहमी खातो ते झाड पाहिले आणि तिचे किचनगार्डनही पाहिले. पावसाची रिपरिप सततच चालू होती सक्काळपासूनच, म्हणून हेडी आणि तिच्याहीपेक्षा जास्त मार्सेला हिरमुसली होती कारण तिचा बेत अंगणात ग्रील करण्याचा होता. दिवाणखान्यातल्या एक टेबलावर आम्ही तिला वेळोवेळी दिलेल्या भेटी (म्हणजे आपले लाखेचे काचकाम केलेला करंडा, हत्ती,लाकडी कोस्टर्स असंच काहीबाही..) मांडून ठेवलेल्या आवर्जून आणि अगदी कौतुकाने दाखवल्या. त्या कौतुकाने आम्हाला जरा अवघडल्यासारखेच झाले पण ते अगदी आतून, मनापासूनचे होते वरवरचे,बेगडी नव्हते हे जाणवत होते.
हेडीचे सासर आणि माहेरच्या गावात अगदी ९/१० किमी च अंतर असेल,नसेल.पण माहेरच्या घरी निघालेली ८२ वर्षाची हेडी मोहरली होती, भावूक झाली होती. आम्हाला तिकडे लवकर चलायची घाई करु लागली होती. मार्सेलाच्या गाडीमागे आमची गाडी धावू लागली. त्या चिमुकल्या पण सुसज्ज गावातली एकुलती एक शाळा, मार्केटाची जागा, प्रोटेस्टंटी सुबक चर्च असे दाखवत तिने गावात एक फेरफटका करवला आणि वालरष्टाइनच्या दिशेने आमच्या गाड्या धावू लागल्या. गेटाचे कुलूप काढताना मायेने आपला हात तिथल्या कडीकोयंड्यावर फिरवत म्हणाली, किती दिवसांनी येते आहे, हल्ली जमत नाही पूर्वीसारखं वारंवार इथे येणं. रीटा, तिची दुसरी मुलगी तेथे आठवड्यातून दोनदा कॉस्मेटिक क्लिनिक चालवते आणि घर उघडलं जातं, वावरलं जातं.
इथे आत्ता क्लिनिकची मशिनं आहेत ना ती आमची बसाउठायची खोली होती आणि वेटींग रुम आहे ना ती आईबाबांची खोली. हेडी केव्हाच त्या जुन्या घरात आणि काळात पोहोचली होती. स्वैपाकघर अजूनही तेच आहे. रिटा कॉफी बिफी करते ना इथे. ह्याच चुलीवर तेव्हा १० माणसांचा स्वैपाक घरात रोज होत असे आणि आता... ती जर्मनमध्ये "कालाय तस्मै नम:" असे उसासली आणि जिना चढू लागली. ही पाहुण्यांची खोली. आणि ती शेजारची खोली मार्सेलाची. ही मोठी खोली मी आणि त्सेंटाची. इथे मी झोपायचे आणि त्या बेडवर त्सेंटा, आतल्या खोलीत फॅनी आणि ही आमची कपाटं..ही टेबलक्लॉथची लेस माझ्या आत्याआजीने विणलीय बरं का..एकेक कपाट उघडत हेडी जणू काळाचा एकेक पापुद्राच उलगडत होती. आमचा आवाजाचा गलका वाढला ना की आई वर यायची ,तिची चाहूल लागली की मग आम्ही पांघरुणात गुडुप व्हायचो. चष्म्याआडून निळे डोळे मिस्किलपणे लुकलुकू लागले, सुरकुत्या गायब झाल्या आणि फ्रॉकातली हेडी, त्सेंटा तिथे दिसायल्या लागल्या.
तेथे असलेल्या वस्तूवस्तूंमधून आठवणींचा खजिना डोकावत होता. मागच्या अंगणातला प्रशस्त गोठा आणि त्यापलिकडे असलेले प्रचंड शिवार पाहताना हेडी परत एकदा बालपणात हरवली. वालरष्टाईनमधले आमचे हे सर्वात जुने घर, माझ्या खापरपणजोबांनी बांधलेले.. गावात बराच मान होता आमच्या घराण्याला.. आता नुसत्या आठवणी राहिल्यात..पण गल्लीत अजूनही आमच्या वेळचे काही लोकं आहेत हो, ते ओळखतात,विचारपूस करतात. क्वचित कोणी जुनी मैत्रिणही भेटते,बरं वाटतं. देश,भाषा,धर्म,पंथ सगळ्याच्या पलिकडंचं सार्वत्रिक सत्य बोलत होतं.
डोनाव-रिसमधील ऐतिहासिक महत्त्वाच्या त्या टुमदार वालरष्टाइनची सैर करायला मग आम्ही त्या दोघींबरोबर बाहेर पडलो. गावच्या मुख्य रस्त्यावरचे चर्च आणि क्रोनोग्राम पाहिला. गावातले सर्वात जुने उपाहारगृह,बेकरी,खाटीक शॉप पाहताना त्याला जोडलेल्या जुन्या आठवणी ऐकल्या.
त्या परिकथेतल्या गावातून दुसर्या तशाच गावाकडे आमच्या गाड्या धावू लागल्या. नॉर्डलिंगनच्या आमच्या हॉटेलाच्या दारात सोडून ,आमचा निरोप घेऊन हेडी आणि ज्यु. मार्सेला बॉबफिंगनकडे निघाल्या.


वाचने
9709
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
स्वातीताई..
In reply to स्वातीताई.. by बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद बीपिन जी !!
In reply to धन्यवाद बीपिन जी !! by टारझन
+१
स्वाती दिनेश
In reply to स्वाती दिनेश by Pain
बर्यापैक
In reply to बर्यापैक by ३_१४ विक्षिप्त अदिती
आयला... मी
मस्तच
In reply to मस्तच by रेवती
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुंदर वर्णन
स्वाती तै
दिवाणखान्
स्वाती तै,
स्वातीताई,
छान!!
मस्त गं
In reply to मस्त गं by प्रभो
Ja, Herr!
छान
नेहमी प्रमाणे
सुंदर
खुप छान
खुप छान.
झकास
सुंदर
In reply to सुंदर by शाल्मली
सौ.लिखाळ
मस्त वर्णन
छान
वाह.. फारच
किती छान