पुन्हा एकदा भ्रमणगाथा- १
अदिती खगोलशास्त्रीय कॉनफरन्ससाठी नेदरलँड मधील आसेन गावी येणार आणि नंतर फ्राफुमध्ये ४ दिवस राहणार असे निश्चित झाल्यापासून आमच्या भ्रमणमंडळातल्या हालचालींना वेग आला आणि "रोमांटिशं स्ट्रासं" अर्थात रोमँटिक रोड वर आमचा मोर्चा वळवायचा बेत रचला. आधी ठरले असले तरी काही अपरिहार्य कारणामुळे अभिर येऊ शकत नाही असे समजले, तरी आमच्या बेतात फारसा बदल न करण्याचे ठरवून अदितीची कॉनफरन्स (सुरु होण्याआधीच) संपवून ती फ्राफुत कधी येते याची वाट पाहू लागलो. पण तेवढ्यात अजून एक माशी शिंकली. दिनेशची एक बिझिनेस ट्रीप आडवी आली. अदितीला फ्राफु दाखवण्यासाठी दिनेश नसला तरी चालण्यासारखे होते त्यामुळे त्याला कचेरीच्या कामासाठी जाऊ देऊन मी तिला आणायला स्टेशनवर गेले. नंतरचे दोन दिवस आम्ही एवढ्या अखंड बडबडत होतो,की (सूज्ञ मिपाकरांच्या ते लक्षात आले असेलच, ) फ्रांकफुर्टातील गल्लीबोळही मिपाच्या उल्लेखाने पावन झाले आणि सतत तेच ऐकून ऐकून आईलाही मिपा आणि मिपाकरांचे , खवचे उल्लेख लक्षात यायला लागले.
जर्मनीची आर्थिक राजधानी असलेलं,युरोपातले सगळ्यात मोठे आर्थिक केंद्र असलेलं ट्रेड फेअरचं हे शहर तरीही जर्मनीतलं सगळ्यात मोठं सिटीफॉरेस्ट ह्या शहरात आहे! पुस्तकजत्रा आणि मोटारींची जत्रा हे वर्षातून एकदा येणारे धामधुमीचे दिवस.. त्या काळात हॉटेलांचे दर दुप्पट, तिप्पट होतात आणि मग येथले काहीजण आपल्याकडील जास्तीची खोली मेसंगेस्टं म्हणजे जत्रेसाठी आलेल्या लोकांना भाड्याने देतात. दुसर्या महायुध्दात अनेकदा बाँबहल्ल्याला बळी पडलेलं हे शहर जरी हिरवाईचं असलं तरी इतर गावांच्या मानाने सुंदरतेच्या बाबतीत जरा डावंचं आहे! पण तरीही ते माझं फ्रांकफुर्ट आहे, मला अर्थातच ते फार आवडतं. अदितीला फ्राफु दाखवण्याच्या निमित्ताने मी परत एकदा इथल्या गल्लीबोळातून भटकले. आई, मी आणि अदिती सक्काळीच भटकायला निघालो.ट्रामने भटकायला मजा येते हे अनुभवाने दोघींनाही पटले होते त्यामुळे शक्य तिथे ट्रामनेच आम्ही जात होतो. हाउप्ट बानहोफ म्हणजे फ्राफुचे मुख्य स्टेशन. आपल्या बोरीबंदराची आठवण स्टेशनाची दगडी बांधणीची,जुनी भक्कम वास्तू पाहून हटकून येतेच.
तेथून २ स्टॉप पुढे असलेल्या विली ब्रांड प्लाट्झ येथे युरोपियन सेंट्रल बँकेची बहुमजली इमारत आहे. ह्या बँकेतूनच युरोझोनची मॉनिटरी पॉलिसी ठरवली जाते. समोरच टुमदार नाट्यगृह आहे.
फ्राफुतली जुनी स्टॉक एक्स्चेंजची इमारतही पाहण्यासारखी आहेच पण येथली अजून एक पहाण्यासारखी इमारत म्हणजे माइन नदीच्या तीरावरची ही काचेची इमारत, वेस्टहाफन टॉवर आणि ह्या इमारतीची बांधणी अॅपलवाइनसाठीच्या खास पेल्यासारखी आहे हे तिचे महत्त्वाचे वैशिष्ट्य! युरोपियन मंडळी विशिष्ट पेल्यातून विशिष्ट पेय पिण्याबाबत फार काटेकोर असतात आणि ह्या खास अॅपलवाइनसाठीचा खास पेला तर असायला हवाच ना!
हेसनमध्ये सफरचंदे फार त्यामुळे सफरचंदाचे अनेकानेक प्रकारचे केक,मार्मलाडं आणि अॅपलवाइनची तितकीच प्रसिध्द! अॅपलवाइनला हेसिश भाषेत एब्बेलवाय म्हणतात आणि फ्राफु दर्शनाच्या रंगीबेरंगी ट्रामला एब्बेलवाय एक्सप्रेस असे सार्थ नाव आहे.
पुढच्याच थांब्यावर आहे रोमर/पाउलकिर्श म्हणजे सेंट पॉल चर्च. शहरातला हा महत्त्वाचा चौक. दुसर्या महायुध्दात येथे बरीच पडझड झाल्यामुळे येथे जुन्यानव्याचा मिलाफ दिसतो. आता हे चर्च धार्मिक कारणासाठी कमी तर प्रदर्शने आणि ख्रिसमस मार्केटासारख्या महत्त्वाच्या इव्हेंट्ससाठी जास्त प्रसिध्द आहे. तेथल्या समोरच्या मोठ्ठ्या अंगणात नाताळचा बाजार फुलतो तर एरवी त्या अंगणातले मेपल्स थकल्याभागल्या प्रवाशांवर सावली धरतात. तिथल्या पारांवर घटकाभर बसून ताजेतवाने होता येते.तेथूनच डावीकडे गेले की 'झाइल' सुरू होते. आपल्या फोर्ट भागासारखाच हा सारा शॉपिंग एरिया! येथे असलेल्या गॅलेरिया काउफहाउफ मध्ये कलात्मकतेने रचलेले जर्मन,स्वीस,फ्रेंच,बेल्जियन चॉकलेटांचे दालन प्रत्येकाला भुरळ पाडतेच, त्याला आम्ही तरी कसे अपवाद असणार?
उजव्या बाजूला गेले की मोठ्ठे मैदान आहे.बाजूची मोठी रोमरबेर्ग म्हणजे सिटीहॉलस्क्वेअरची इमारत लक्षवेधी तर आहेच पण ह्या चौकातही नाताळचा मोठ्ठा बाजार भरतो. एरवी तेथे डोंबार्याचे खेळ चालले असतात, पालं ठोकून फ्राफुच्या आठवणी म्हणून पोस्टकार्डे, टीशर्ट्स, कीचेन्स्, रंगवलेले बियरमग्ज, बेंबेल म्हणजे अॅपलवाइन सर्व करण्यासाठीचा खास जग इ. विकणारे विक्रेते काहीतरी आठवण घ्यायला मोहात पाडतात.
त्या दगडी अंगणात लक्ष वेधून घेतो तो न्यायदेवतेचा पुतळा! डोळ्यावर पट्टी न बांधता एका हातात समानता दर्शवणारा तराजू तर दुसर्या हातात चमकणारी धारदार तलवार घेतलेली ही न्यायदेवता मला नेहमीच कर्तव्यकठोरतेचे काटेकोर पालन करण्याचे प्रतीक वाटते.
त्या दगडी बांधणीच्या रस्त्यावरून उतरणीला खाली गेले की माईनचे विशाल पात्र,त्यावर डुलणार्या नौका,विहरणारी बदके,हंस,पाणकोंबड्या,तीरावर हिरवळीत उन्हे अंगावर घेत पहुडलेली तरुणाई, बाकड्यांवर निवांत बसलेले आजीआजोबा, खेळणारी,बागडणारी मुले, सायकली चालवणारे ,जॉगिंग करणारे उत्साही वीर असे उन्हाळ्यातले नेहमीचे दृश्य दिसले. पूलावर उभे राहून वारा खात, माइनचे विशाल पात्र नजरेत साठवत रेलून उभे राहिले की मन शांत शांत होतं जातं,असा कितीही वेळ तिथे जाऊ शकतो आणि तसेच त्या दिवशीही झालं. शेवटी तंद्री भंग करुन आम्ही एशनहाइमर टोअर ह्या १७ व्या शतकातल्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या त्या काळच्या वेशीपाशी गेलो. आता ही वेस गावाच्या मध्यात आली आहे पण अजूनही ती जुनी खूण दाखवणारं वेशीचे भक्कम प्रवेशदार तेथे दिमाखात उभे आहे.
अजून एक महत्त्वाची इमारत म्हणजे मेसटुर्म! शेंड्याशी पेन्सिलीसारखी निमुळती होत गेलेली ही इमारत युरोपातली सर्वात उंच इमारत होती आता तिची जागा कॉमर्सबँकेच्या टॉवरने घेतली आहे.
नेपोलियनच्या काळात फ्रांकफुर्ट अनेकदा फ्रेंचांनी काबीज केले, त्यांचे सैन्य जेथवर आले तो आल्टनिडचा ब्रिज आणि नेपोलियन जेथे २ रात्री राहिला तो बोलंगारो पलास्ट म्हणजे आताची इथली मामलेदार कचेरी दाखवली.
फ्रांकफुर्टातल्या अजून कितीतरी गोष्टी दाखवायच्या राहिल्या होत्या पण पावसाचा इतका जोर होता की आता घरी परतणे आवश्यक झाले.
जर्मनीत यायच्या व्हिसाला "शेंगनव्हिसा" असे नांव नसून "राकलेट व्हिसा" असे नाव आहे असे नंदनला प्रामाणिकपणे वाटते , त्यामुळे संध्याकाळी राकलेटचा बेत अपरिहार्यच होता.



अजून एक महत्त्वाची इमारत म्हणजे मेसटुर्म! शेंड्याशी पेन्सिलीसारखी निमुळती होत गेलेली ही इमारत युरोपातली सर्वात उंच इमारत होती आता तिची जागा कॉमर्सबँकेच्या टॉवरने घेतली आहे.
नेपोलियनच्या काळात फ्रांकफुर्ट अनेकदा फ्रेंचांनी काबीज केले, त्यांचे सैन्य जेथवर आले तो आल्टनिडचा ब्रिज आणि नेपोलियन जेथे २ रात्री राहिला तो बोलंगारो पलास्ट म्हणजे आताची इथली मामलेदार कचेरी दाखवली.
फ्रांकफुर्टातल्या अजून कितीतरी गोष्टी दाखवायच्या राहिल्या होत्या पण पावसाचा इतका जोर होता की आता घरी परतणे आवश्यक झाले.
जर्मनीत यायच्या व्हिसाला "शेंगनव्हिसा" असे नांव नसून "राकलेट व्हिसा" असे नाव आहे असे नंदनला प्रामाणिकपणे वाटते , त्यामुळे संध्याकाळी राकलेटचा बेत अपरिहार्यच होता.

प्रतिक्रिया
व्वा:
अदिती
जबरा !!
क्या बात है ... !!!
सुरेख
निषेध..
+१
छान!!
झक्कास
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हम्म!!! ठीक
अरे वा वा!!
हॅ हॅ हॅ
स्वातीताई,
बाब्बौ!!!
छान..
लैच भारी...
मस्तच.
काय
लै भारी
मस्तच!!!!
वा!
छान वर्णन
वा वा! खूप दिवसांनी लेखन घेऊन आलीस स्वातीताई!
सगळं पाहुन
अदिती,
स्वाती
क्या बात है!