निसर्गाचा हिशोब

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
9 May 2010 - 9:06 pm

आज वाळ्याच्या पडद्यांना पाणी घालताना सहज खिडकीतून बाहेर पाहिले. शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झाले होते. खिडकीच्या खाली, वळचणीच्या जागी पारव्याच्या मादीने दोन अंडी घातली होती. म्हणूनच आज सकाळपासून त्यांची खिडकीपाशी लगबग चालली होती तर! एवढे दिवस त्यांना रोज खिडकीपासून हुसकावून लावता लावता मीच जिकिरीला आले होते. त्यांचे ते खर्जातले घुमणे, पंखांची फडफड आणि खिडकीत केलेली घाण ह्यांपेक्षाही मला त्यांना तिथे आपला संसार थाटू द्यायचा नव्हता. गेल्या दोन खेपांना पारव्यांची बाळंतपणं आणि त्यांच्या पिलांची देखभाल करताना आलेल्या अनुभवांची शिदोरी तर होतीच, शिवाय खिडकीत अडचणीच्या जागी त्यांनी अंडी घातली तर धक्का लागून ती फुटणार-बिटणार तर नाहीत ना हीदेखील काळजी होती.

पण पारव्यांना तेवढे कळत असते तर मग काय! त्यांचा तरी काय दोष म्हणा! सिमेंट-काँक्रीटच्या जंगलात त्यांनी तरी कोठे संसार थाटायचा? आणि वाळ्याचा पडदा म्हणजे अतोनात गारवा.... त्यांच्यासाठी ए. सी. च जणू! घरट्याचा आभास करून देणारा वाळ्याच्या मुळ्यांचा नैसर्गिक पोत आणि आडोसा... मग काय! ह्या पारव्यांच्या जोडीला आयतेच फावले होते! त्यांचे कुंजकूजन सुरू झाले रे झाले की मी त्यांना हाकलून लावायचे. पण पठ्ठे एकतर चिकट तरी होते किंवा बुद्दू तरी! रोजच्या हाकलण्याला न जुमानता, न कंटाळता दर दिवशी हजेरी लावणार म्हणजे लावणारच!

पारव्याने खिडकीत घातलेल्या अंड्यांची बातमी घरी कळली त्याबरोबर सर्वांचे आधीच्या पारवा-स्मृतींना उजाळा देणे सुरू झाले. आमच्या आधीच्या जागेत, सहाव्या मजल्यावर पारवे हे जणू परिसराचा अविभाज्य भाग असल्याप्रमाणे वावरत. खिडक्यांच्या वळचणी जश्या त्यांना प्रिय होत्या त्याचप्रमाणे वेळी अवेळी आमची नजर चुकवून घरात शिरून कपाट, फडताळ, लोंबकळणाऱ्या वायरी यांवर स्वार होणे आणि घुमत बसणे हा त्यांचा आवडता छंद! तिथेही ते त्यांच्या अंगभूत चिकाटीचे प्रदर्शन करत. घरातल्या लपण्याच्या जागा आमच्यापेक्षा त्यांनाच जास्त ठाऊक! फक्त आम्हीच नव्हे तर शेजारी-पाजारीही त्यांचा मुक्त संचार असे. आणि आम्हाला सरावल्यामुळे असेल कदाचित, पण त्यांना आमच्या रागावण्याची भीतीच वाटत नसे. शेवटी हातात काठी घेऊन तिचे विविध आवाज करत, तोंडाने कंठशोष होईस्तो आरडाओरडा करत आम्ही व शेजारी त्यांना हाकलून लावत असू.

तरीही एकदा एका पारव्याच्या लबाड जोडीने पोटमाळ्यावर खोक्याच्या आडोशाला अंडी घातलीच! ''आलिया भोगासी'' करत आम्ही त्यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करली. पुढचे अनेक दिवस घरात काड्या, पिसे, दोरे यांचा कचरा व पोटमाळ्यावर त्यांची घाण, अशा साम्राज्यात त्यांच्या घरातल्या असंख्य फेऱ्या सहन करण्यात गेले. पिलांचा जन्म झाल्यावरही बरेच दिवस ही जोडी त्यांना अन्न भरवण्यासाठी खिडकीतून ये-जा करत असे. तोवर आमच्या दोन भिंती त्यांनी खराब केल्या होत्या. एक पिलू लवकर उडायला शिकले आणि बघता बघता स्वतंत्रही झाले. पण दुसऱ्या पिलाला बहुधा तेवढा आत्मविश्वास नसावा. ते पोटमाळ्यावरच वावरायचे. टुलूटुलू चालायचे आणि उडायची वेळ आली की आपले छोटेसे पंख नुसतेच फडफडवायचे. बाबा पारव्याला एव्हाना ह्या सुखी संसाराचा कंटाळा आला असावा, कारण तो आता येईनासा झाला होता. आई मात्र पिलाला भरवायला यायची अधून मधून. त्या पिलांचे ते गोड कर्कश स्वरातील ओरडणे ऐकणे म्हणजे आम्हाला स्वर्गानुभूतीच असायची!! कानात कापसाचे बोळे घातले तरी उपयोग व्हायचा नाही!!

शेवटी करता करता एक दिवस, आमच्या सर्वांच्या धीराची सत्त्वपरीक्षा पाहून ते चुकार पिलू उडायला लागले. पण.... आमच्या घरातला पोटमाळा त्याच्या एवढ्या परिचयाचा झाला होता की संध्याकाळी ते न चुकता घरी परतायचे व पोटमाळ्यावर चढून बसायचे. घरचेच नातवंड असल्यामुळे आम्हाला त्याला हुसकावणेही जीवावर यायचे. तरीही दिवसेंदिवस खराब होणाऱ्या भिंती व अशक्य घाण पाहिल्यावर त्याला घराचे दरवाजे खिडक्या बंद करण्याचा कठोर निर्णय घेण्यावाचून आमच्यासमोर अन्य पर्याय नव्हता! आणि हे पिलू तरी किती चलाख असावे! खिडकीपाशी दबा धरूनच बसायचे. दोन मिनिटांसाठी जरी खिडकी उघडली की महाशय आत!! आणि त्यांच्या आवडत्या स्थानी जाऊन वक्र मान करून तोंडातून आनंदाचे चीत्कार! त्यांना आमचे भयही वाटत नसे... निवांतपणे आमच्या डोक्यावरून अगदी जवळून जायचे. खांद्याला, डोक्याला त्यांचे पंख चाटून जात. ह्या वेळी आम्हीही ठाम निश्चय केला होता. त्याप्रमाणे त्यांना दारे बंदच ठेवली. यथावकाश त्या पिल्लाची घरी ये-जा एकदाची थांबली. आम्हीही सुटकेचे निः श्वास सोडले.

पण हाय रे दैवा! पुढच्याच वर्षी तारुण्यात पदार्पण केलेले पिलू आमच्या दारात आपल्या जोडीदारासह हजर! आता हे प्रकरण हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसत होती. त्यांना आमचे घर म्हणजे वडिलोपार्जित इस्टेट वाटत होती की काय? पुन्हा एकदा आमच्यावर स्वतःच्याच घराची दारे-खिडक्या बंद करून, स्वतःला कोंडून घेण्याचा प्रसंग गुदरला होता. त्या जोडीला कटवल्याची पूर्ण खात्री झाल्यावरच आम्ही मोकळे श्वास (खरोखर! ) घेतले.

आज याही घराच्या खिडकीत पारव्याच्या अंड्याला पाहिल्यावर आम्हाला सर्वांनाच आपल्या भवितव्याची काळजी वाटू लागली होती. दोन दिवस असेच गेले. रोज पारवीण काकू येऊन अंडी उबवत बसत. पारवे काका त्यांना साथ द्यायला जोडीने घुमत बसत. त्यांच्या घूत्कारांचे नाद मला रात्री झोपेत स्वप्नातही ऐकू येत. त्या अंड्यांना हालवावे का ह्याविषयी घरात तीव्र मतभेद होते. पक्ष क्रमांक १ चे म्हणणे होते की निसर्गात ढवळाढवळ करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. सबब ती अंडी तशीच राहू द्यावीत. पक्ष क्रमांक २ चे म्हणणे होते की एखाद्या खोक्यात ती अंडी ठेवली तर ती सुरक्षित राहतील व कचराही कमी होईल! पण पारवे त्या स्थलांतरित अंड्यांना स्वीकारतील की नाही ह्याबद्दल पक्ष क्रमांक २ खात्रीशीर सांगू शकत नसल्याने ''ठेविले मादीने तसेची ठेवावे'' असा विचार करत आम्हीही त्या अंड्यांची जागा बदलण्याचे टाळले.

आता इथेही कचरा करणे सुरू झाले होते. सुतळीचे तुकडे, पिसे, काटक्या, दोरे अन अजून काय काय! नशीब, खिडकीचे दार स्लायडिंग आहे. नाहीतर ती अंडी आमच्या धक्क्याने खालीच पडली असती. पण बहुधा निसर्गाला अशा अडनिड्या जागी त्या नव्या पिलांचा जन्म होणे मान्य नसावे. एके सायंकाळी जोराची वावटळ सुटली, आणि त्या सोसाट्याच्या वाऱ्यात ती दोन्ही अंडी जमीनदोस्त झाली. वावटळ, पाऊस थांबल्यावर नेहमीप्रमाणे मादी खिडकीपाशी आली. पण अंडी तर नव्हतीच! बिचारी खूप वेळ घिरट्या मारत होती. तिचा जोडीदारही तिच्याबरोबर शोधात सामील झाला होता. सगळीकडे आपल्या माना वाकड्या वाकड्या करून दोघेही त्या अंड्यांना धुंडाळत होते. मादी आपला शोक पंखांची अशक्य फडफड करून प्रकट करत होती. त्यांची ती तगमग पाहून मला वाईट वाटत होते. मानवी भाषा त्यांना काय समजणार!! तरीही मला त्यांची ती तडफड बघून उगाच करुणा दाटून आली आणि मी त्यांना चक्क मराठीतून अंडी खाली पडून फुटल्याचे सांगितलेही! पण त्या अजाण जीवांना त्यातले काहीच कळत नव्हते. त्या दिवसानंतर जवळ जवळ तीन-चार दिवस दोघेही नर-मादी खिडकीभोवती घोटाळत असत. हळूहळू त्या नष्ट झालेल्या अंड्यांचे सत्य त्यांनी स्वीकारले असावे, कारण त्यांचा खिडकीजवळचा संचार कालांतराने बराच कमी झाला.

आमच्या घरावरची पारवा-संक्रांत एकदाची टळली म्हणून मला मनात कोठेतरी बरेही वाटत होते आणि त्याच वेळेला त्या निरागस मादीचा आकांत आठवून कसेसेही होत होते. एका आईची कूस उजवायचीच राहून गेली होती. पुढील विणीच्या वेळी तिची पिल्ले जगतीलही.... पण जन्माअगोदरच काळाआड गेलेल्या ह्या पिल्लांचा हिशोब कोण देणार होते?

--- अरुंधती कुलकर्णी

http://iravatik.blogspot.com/

वावरजीवनमानराहणीप्रकटनलेखअनुभव

प्रतिक्रिया

प्राजु's picture

9 May 2010 - 9:46 pm | प्राजु

सुरूवात खूप मस्त केली आहेस..
शेवट वाचून मात्र उगाचच वाईट वाटले.
लेख आवडला हे वेगळे नको सांगायला.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

विष्णुसूत's picture

10 May 2010 - 3:45 am | विष्णुसूत

लेख आवडला.

खालील लींक्स बहुदा तुम्हाला सर्वांना आवडतील.

http://www.wildearth.tv/static/wildearth/channels/we_sidney_eagles_02.html

http://www.hornbyeagles.com/webcam.htm

sagarparadkar's picture

10 May 2010 - 5:41 pm | sagarparadkar

आम्हाला शाळेत मराठीच्या पुस्तकात "चिमण्या" नावाचा एक धडा होता ... बराचसा अस्साच होता, फक्त त्यात लेखक महाशय स्वतःच त्यान्चे घरटे काढून टाकतात ... व नन्तर आपल्याच त्या क्रुतीवर खूप दु:खी होतात ...

sagarparadkar's picture

10 May 2010 - 5:50 pm | sagarparadkar

आमच्या घरात हाच उद्योग बुल्बुल पक्षानी केला होता. हैन्गिन्ग च्या कुन्डीमधे अन्डी घातली होती टेरेसमधे, आणि आम्हालाच प्रवेश बन्द करुन टाकला होता. पण घरात मात्र त्यान्चा काहीच त्रास नव्हता.

टेरेसमधे कोणी जाउ लागला तर जोरात येउन डोक्यावर चोची मारायचे. मग आम्ही पण त्यान्ची पिल्ले मोठी होउन उडून जाइपर्यन्त प्रवेश बन्द ठेवला होता.

दाराआडूनच त्यान्च्या हाल्चाली निरखत असू ... पिल्लान्ची दर दिवसाची प्रगती पाहून आनन्द वाटत असे ...

शिल्पा ब's picture

9 May 2010 - 10:24 pm | शिल्पा ब

होना..असं काही दिसलं कि फार वाईट वाटतं कारण आपल्याला माहिती असून त्यांना सांगता येत नाही...मुंबईत असताना आमच्या ग्यालरीत ओळखीच्या कबुतराने अंड घातले आणि छान छान पिल्लू पण झाले...ग्यालरीत इकडून तिकडे करायचे ...आम्ही त्याला दाणे आणि पाणी ठेवायचो...मग बहुतेक त्याच्या आई वडिलांचे बिनसले असावे कारण "तो" नवीनच "ती" घेऊन यायचा आणि मग फडफड आईकू यायची...कश्याला कौटुंबिक वादात पडा म्हणून दोन चार दिवस दुर्लक्ष केले आणि एकदा कुतूहलाने बघितले तर त्याचा बाप एव्ह्ड्याश्या जीवाच्या गळ्यावर चोचीने मारत होता...मग काठी घेऊन त्याला हाकलले...दुसर्याच दिवशी दुपारी परत फडफड आईकू आली तर बघितले कि पिल्लाच्या गळ्यावरील पंख (?) निघाले होते...आम्ही त्याला पाणी पाजायचा प्रयत्न केला पण त्याने काही चोच लावली नाही...आम्ही त्याला टबात ठेवले आणि मिनिटभरात गोल गोल फिरून त्याने प्राण सोडले...पहिल्यांदा मी इतकी रडले असेन...कोणी गेल्यावर....मग मात्र त्या खाविसाला कधी येऊ दिले नाही...आवाज आला कि काठी घेऊनच समोर जायचे....नर शेवटी नरच आणि दुसरेपणाची ती दुसरेपणाचीच ...पक्षी असो का माणूस...

http://shilpasview.blogspot.com/

Pain's picture

10 May 2010 - 12:06 am | Pain

नर शेवटी नरच आणि दुसरेपणाची ती दुसरेपणाचीच ...पक्षी असो का माणूस...

१) आणि माद्या जणु काही सर्वगुणसंपन्न

२) दुसरेपणाची (जाणीव): पुढच्या वेळी एखाद्या अण्ड्याला हात लावा आणि पहा मादी काय करते ते..

शुचि's picture

10 May 2010 - 2:21 am | शुचि

तुम्हाला बरा बाप ओळखता आला.....कशावरून आई नव्हती? .... खी खी

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शिल्पा ब's picture

10 May 2010 - 2:40 am | शिल्पा ब

कारण अंड त्यानी घातल नव्हत...म्हणून तो बाप....आणि ती जोडी आमच्याच ग्यालरीत खाली कुंड्या ठेवायची जागा असते तिथे राहायची...
आमच्या माहितीतील बाप (कोणतेही ) पोरांना जन्म देत नाहीत...तुमच्याकडची रीत माहित नाही.
http://shilpasview.blogspot.com/

शानबा५१२'s picture

11 May 2010 - 10:19 am | शानबा५१२

ओळखीच्या कबुतराने ????? म्हणजे?

आईकू यायची??? आईकु??

भारद्वाज's picture

9 May 2010 - 10:27 pm | भारद्वाज

छान आहे लेख.
कबूतरांचा त्रास(?) आम्हीसुद्धा भोगलाय. त्यामुळे लेख वाचताना तो प्रसंग डोळ्यासमोर येत होत. पण भावुक मात्र नाही झालो. सुमारे ४ वर्षांपूर्वी आमच्या घरी कबुतरांनी घरटं बांधण्याची पहिलीच वेळ होती तेव्हा फार उत्साह होता, पण नंतर खुप घाण वास यायला लागल्यावर ठरवलं की पुढच्या वेळी मात्र घरातील भूखंड त्यांना बळकावू द्यायचा नाही. आजपर्यंत तरी यशस्वी ठरलोय.
हां चिमण्यांची घरटी टिकवून आहोत (हो,आम्ही पक्षपाती आहोत !)

युयुत्सु's picture

9 May 2010 - 10:31 pm | युयुत्सु

मस्त मस्त मस्त!

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.म्स्तस्त्मस्तसस्त्मस्त्म

शिल्पा ब's picture

10 May 2010 - 1:49 am | शिल्पा ब

दुसरेपणाची (जाणीव): पुढच्या वेळी एखाद्या अण्ड्याला हात लावा आणि पहा मादी काय करते ते

आमचं म्हणणं हे होतं कि दुसरीला पहिलीच्या बाळाबद्दल प्रेम असण्याची शक्यता कमीच, पक्षी असो कि माणूस...त्यासाठी अंड्याला कशाला हात लावायला पाहिजे?

http://shilpasview.blogspot.com/

Pain's picture

10 May 2010 - 2:13 pm | Pain

तुमच्या उदाहरणात "बाप" दोषी आहे पण तुम्ही in general नरान्वर टीपणी * केलीत. ते चूक आहे.

जर माणसाने अंड्याला हात लावला तर पक्षी (माद्यासुद्धा) ते सोडुन देतात किन्वा पिल्लू असेल तर घरट्यातून ढकलुन देतात.

शिल्पा ब's picture

10 May 2010 - 9:59 pm | शिल्पा ब

असो...बाकी मराठी माणसाने बनविलेली हि site ...http://www.birdcalls.info
http://shilpasview.blogspot.com/

शिल्पा ब's picture

11 May 2010 - 9:59 pm | शिल्पा ब

कश्यावरून? पुराव्यादाखल एखादी लिंक टाका...माहिती असेल तर कारण सांगा...आम्हालाही माहिती होईल..

http://shilpasview.blogspot.com/

शुचि's picture

10 May 2010 - 2:20 am | शुचि

खूप आवडला लेख. पारव्यांमधे इतर पक्षांसारखं घरटं करायचं कौशल्य नसतं. कशाबशा काड्यांचा ढीगारा करून अंडी घालतात.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

भारद्वाज's picture

10 May 2010 - 3:52 pm | भारद्वाज

कशाबशा काड्यांचा ढीगारा करून अंडी घालतात.

आमच्याकडे तर त्यांनी आधी अंडे दिले आणि मग आजूबा़जूने काड्यांचा support दिला...हेहेहेहेहेहे.
अवांतरः कबुतरांना झाडांवर बसण्याचंही कौशल्य नसतं का? कारण एकदाही झाडावर बसलेलं कबुतर पाहिलं नाहीये.

स्पंदना's picture

10 May 2010 - 7:51 am | स्पंदना

काय होत माहित नाही पण मन त्यान्च्या सन्सारात रमत एव्हढ मात्र खर.
मुम्बईत एकदा एक छोटुला घरट्यातुन धडपडला आणि पायर यान वर पडला. तो छोटासा आकान्त करणारा जीव मला बघवेना म्हणुन नवरोबाच्या विरोधाला न जुमानता मी त्याला हेल्मेट मध्ये घालुन (घरट मोडल होत या चळ्वळ्यान) घरट्याच्या अगदी जवळ ठेवल. परत आल्यवर त्याच्या आईन जो चीवचीवाट केला आणि नर नुसता चुक चुक असा एखदा हुन्कार भरत होता. डीट्टो मुलाना काही झाल की माझ्या घरात होणारा सीन!!शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

मदनबाण's picture

10 May 2010 - 7:59 am | मदनबाण

सुंदर लेख... :)

मदनबाण.....

"When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams."
Dr Seuss

नेहमी प्रमाणे सुंदर लेख ... पण शेवट वाचून मन अगदी गलबलले..

चर्चा वाचून शिल्पा ब अन Pain यांच्या साठी एक मत मांडावेसे वाटले. आई सारखेच वडिल ही महत्वाचे ...

बहिणाबाईच्या कवितेत पिलांसाठी घरटा सुगरण बांधते अशी ओळ आहे पण वास्तविक पाहता पक्षी निरीक्षकांच्या (प्रा.अशोक वाघ) मते सुगरण घरटे बांधते हा आपला गैरसमज आहे.

नरपक्षी ओळीने अनेक घरटी अर्धवट बांधतो. मादी त्या घरटयांची चिकित्सकपणे पाहणी करते. तिला जे घर पसंत पडते, ते घरटे नर पुर्ण करतो. हा एक बहुपत्नीत्व असलेला (सुगरण नर) पक्षी आहे. चार पाच माद्यां समवेत नर राहतो. घरटयात मादी 2 ते 4 पांढर्‍या शुभ्र रंगाची अंडी घालते, मात्र ओल्या चिखलाचे लेपन केलेले असते.

गवताची पाती व तृणधान्यांची लांब पाती यांनी विणलेले व उभ्या नळीसारखे प्रवेशद्वार असलेले हे घरटे कॉंक्रीटीच्या घरटयांपेक्षा अधिक श्रेष्ठ अन आकर्षक जाणविते .

~ वाहीदा

अरुंधती's picture

10 May 2010 - 6:20 pm | अरुंधती

उत्तम माहिती गं वाहिदा! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

स्वाती२'s picture

10 May 2010 - 5:49 pm | स्वाती२

सुरेख लेख.

अनिल हटेला's picture

10 May 2010 - 5:59 pm | अनिल हटेला

नेहेमीप्रमाणे सुंदर लेख ......
:)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

टुकुल's picture

11 May 2010 - 8:57 pm | टुकुल

नेहेमीप्रमाणे सुंदर लेख ......

अरुंधती's picture

10 May 2010 - 6:12 pm | अरुंधती

सर्वांचे धन्यवाद! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 May 2010 - 9:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरुंधतीताई, तुम्ही छानच लिहीता.

आमच्या घराला आधी एका मांजराने आमच्या इच्छेविरुद्ध मॅटर्निटी होम बनवलं. तिच्याच एका जगलेल्या पिल्लाने तर घरावरच कब्जा केला ... घरावर करायच्या आधी आम्हां घरच्यांवर तिने कब्जा केला. पुढे सात-आठ वर्ष ती मांजर आणि आम्ही घरचे असा भेदभाव राहिलाच नाही.

अदिती

विजुभाऊ's picture

11 May 2010 - 10:17 am | विजुभाऊ

पुढे सात-आठ वर्ष ती मांजर आणि आम्ही घरचे असा भेदभाव राहिलाच नाही.

हम्म..........
लै भारी कॉमेन्ट............
काळजाला भिडली