एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग -- रामोन ल्युलचे कविता-यंत्र - भाग ५ - भाष्य

धनंजय's picture
धनंजय in जनातलं, मनातलं
23 Apr 2010 - 3:01 am

अनुक्रमणिका
लेखनसार
प्रास्ताविक
शब्दखेळाची चौकट
प्रयोगनिष्पत्ती आणि विश्लेषण
भाष्य
मूळ आधारसामग्री आणि प्रयोगाचे दुवे

- - - -
भाष्य

जीवशास्त्रातील उत्क्रांतीविषयी जी आधारसामग्री आहे, ती फार विस्तृत आहे. म्हणून येथला प्रयोग एका मनोरंजक शब्दखेळाबाबत आहे. याचा फायदा म्हणजे जीवशास्त्रापेक्षा यातील आधारसामग्री मर्यादित आहे. सर्वच्या सर्व आत्त (डेटा) सहज आवाक्यात येण्यासारखे आहे. आधारसामग्री मिसळपावाच्या वाचकांनीच कौल देऊन बनवलेली आहे, त्यामुळे प्रगतीचा आणि निवडीचा हेतू काय होता, ते आपल्याला थेट समजू शकते - जैव उत्क्रांतीबद्दल हेतू सांगणारा साक्षीदार उपलब्ध नाही. प्रयोगाची चौकट पूर्णपणे मुक्तस्रोत (ओपन-सोर्स) असल्यामुळे प्रयोग सुयोग्य रीतीने झालेला आहे, हे कोणीही स्वतंत्रपणे कस लावून बघू शकते. मिळालेली आधारसामग्रीसुद्धा मुक्तस्रोत असल्यामुळे विश्लेषण करण्यासही पुरती मुक्तता आहे.

१०व्या पिढीतल्या विजेत्या वाक्याचे रसग्रहण
दहाव्या पिढीमध्ये सर्वाधिक मते मिळवलेले वाक्य खूप पिढ्यांपर्यंत जगलेले आहे. "फूल उडते आस्ते वेडे, मोहरून झोपला शाहाणा राजा."
त्यातला शब्दालंकार म्हणजे आघातस्वरांना लय आहे. "वेडे" विरुद्ध "शाहाणा" हा विरोधाभासाचा अर्थालंकार सुद्धा दिसतो आहे. पहिल्या वाक्यार्धात "वेडे" आणि दुसर्‍या वाक्यार्धात "शाहाणा" हा विवक्षित परस्परपोषक शब्दजोड असण्याची संभवनीयता फारच थोडी आहे - केवळ १%. परंतु हे संभनीयतेचे गणित या ठिकाणी योग्य नाही. अनेक यादृच्छिक वाक्ये बनवताना कुठल्यातरी वाक्यात कुठलातरी अर्थालंकार येणे त्या मानाने फारच संभवनीय होते, त्याबद्दल पुढे अधिक सांगतो.

या विरोधाभासाबरोबर असे दिसते की दोन्ही वाक्यार्धांतले लडिवाळ शब्द आणि मृदु ध्वनी एकमेकांना पोषक आहेत - "वेडे फूल", "मोहरणे". यामुळे एखादा काव्यमय अनुभव सहज मनात येऊ शकतो. उदाहरणार्थ, हे वाक्य पुढील अंगाईगीताचा भाग असू शकते -
आली बघ गाई गाई
शेजारच्या आंगणात
आंगणात पारिजात
घालतसे फूल-सडा
फूल उडे आस्ते वेडे
मोहरून झोपे शाणा राजा!

असे कुठलेही सौम्य-मधुर अर्थसंदर्भ या वाक्यातून वाचकाला स्फुरू शकतील.

पिढ्यांमध्ये वेगळ्या प्रकारचे अवयव-परस्पर-साहाय्य सापडणे
सर्व आधारसामग्री बघता असे दिसते की एक वेगळा साहाय्यभाव दिसणारे - "वेडे फूल - लाघवी राजा" घटक असलेली वाक्ये पुष्कळ यशस्वी होती. काही पिढ्यांमध्ये या वाक्यांना सर्वाधिक मते मिळाली. त्यामुळे असे दिसते, की "वेडे" हा घटक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहाय्य करू शकतो. म्हणूनच पश्चाद्-बुद्धीने फक्त "वेडे-शहाणे" याचीच संभवनीयता बघणे अयोग्य आहे.

प्रगती एकदिक् नव्हती
वाक्यांची प्रगती एक दिशेने पुढे रेटत जाणारी पूर्वहेतुक नव्हती. जर खेळाडूंना शेवटी जिंकलेल्या वाक्यांकडेच जायचे असते, तर "लाघवी" शब्द असलेली वाक्ये इतक्या पिढ्या खेळाडूंनी चालवून घेतली नसती. "वेडा-शाहाणा" जोडीलाच वेगवेगळ्या आनुषंगिक शब्दांचे पर्याय शोधले असते. दोन पिढ्यांमध्ये "शाहाणा" ऐवजी "लाघवी" असलेल्या वाक्यालाच अधिक मते मिळाली नसती.

वरील विवेचनावरून असे दिसते की (१) अवयव वेगवेगळ्या प्रकारे परस्परसाहाय्य करू शकतात, आणि त्यामुळे कुठलेतरी परस्परसाहाय्यक अवयव उत्क्रांतीमध्ये दिसतील, याची संभवनीयता पुष्कळ असते. अमुक एक शेवटी टिकलेली अवयवजोडीच किती संभवनीय आहे, हे गणित नि:संदर्भ आहे.
(२) उत्क्रांतीमधील प्रगती निर्हेतुक असते. शेवटचे वाक्य अर्थपूर्ण आणि सालंकृत असले, तरी खेळाडूंचा नेमके तेच वाक्य बनवायचा हेतू सुरुवातीपासून नव्हता.

"सहेतुक प्रगती" या गैरसमजुतीमधून आलेल्या दोन्ही टोकांच्या मताचे तार्किक दोष स्वतःच्या अनुभवातून आपल्याला दिसून आलेले आहेत.

उत्क्रांतीप्रक्रियेची कार्यक्षमता
आता आपण बघूया की या शब्दखेळात उत्क्रांतीची प्रक्रिया थोडीबहुत कार्यक्षम का ठरली? सुरुवातीचा १०*८ तक्ता बघितला, तर यातून १०८ = १० करोड वेगवेगळी वाक्ये बनू शकतात. त्यातली काही वाक्ये आस्वादयोग्य आहेत, आणि बहुतेक वाक्ये टाकाऊ आहेत. प्रत्येक वाक्य कौल देऊन पडताळणे केवळ अशक्य. दिलेल्या उत्क्रांती चौकटीमध्ये वेगवेगळ्या निवडीच्या शक्यता बघता शोध-क्षेत्र १० कोटीचे नसले तरी आदमासे ४*३९ = ~ ७५,००० वाक्ये इतके आहे. (हे गणित आदमासे आहे, वाक्यांच्या यादृच्छिक पुनरावृत्तीमुळे शोधक्षेत्र ४*३९=७८७३२ वाक्यांपेक्षा कमी आहे.) इतकी वाक्ये घेऊन सुद्धा कौल व्यवहार्य नाही. सुरुवातीपासून ज्या वाक्यांना फारसा वाव नाही, त्यांना कौल देणार्‍यांनी खुंटवले, आणि प्रत्यक्षात केवळ ३४ वेगवेगळी वाक्ये कौलामध्ये निवडीसाठी समोर आलीत. या शोधक्षेत्रात सर्व सुंदर वाक्ये येऊ शकत नाहीत - स्फूर्ती म्हणून घेतलेले विंदा करंदीकरांचे वाक्य तर या शोधक्षेत्रातच नव्हते. परंतु कोणीही आधी विचारात न घेतलेले एक अर्थपूर्ण आणि आस्वाद्य वाक्य आपल्याला या प्रक्रियेमधून सापडले. १० कोटीपैकी कुठलीही ३४ वाक्ये घेतली असती तर खचितच असे काही मिळाले नसते. हे वाक्य सापडल्याचे कारण हेच - शोधक्षेत्र केवळ ३४ नसून ~७५,००० होते.

कापडाच्या छापांचे डिझाइन करताना "कॅलायडोस्कोप" नावाचे यंत्र वापरतात. यातसुद्धा वेगवेगळे यादृच्छिक आकार तयार होतात. पैकी काही सुंदर आकार असे असतात, की कापड-कलाकाराच्या मनात ते उत्पन्न होण्याची काहीएक पूर्वशक्यता नव्हती. रामोन-ल्युलचे हे यंत्र संगणकीकृत प्रणालीत बनवले, तर एकटा खेळाडूसुद्धा हा खेळ खेळू शकेल. कवितेची किंवा लघुकथेची नवी बीजे उत्पन्न करू शकेल काय?

प्रयोगाच्या मर्यादा
हा प्रयोग मुद्दामूनच मर्यादित आवाक्याचा बनवला होता. "यदृच्छेने सहायक अवयवांची वाक्ये बनू शकतात का?" आणि "प्रत्येक पिढीत सहेतुक कौल देणारेसुद्धा अनेक पिढ्यांपुढले वाक्य सांगू शकत नाहीत, सहेतुक प्रगती करू शकत नाहीत" हे दोन मुद्देच दर्शवण्यापुरता ऐवज प्रयोगात होता. येथील माझ्या एका मित्राने सांगितले, की दोन कडवी जुळवणारा प्रयोग का नाही बनवला? माझ्या मते १०-२० पर्यायांचे कौल, फक्त दहा कौल-पिढ्या, आणि फक्त १०-२० खेळाडू -- अशी महत्त्वाकांक्षा राखणे योग्य नव्हे. जैव उत्क्रांतीचा आवाका या प्रयोगात नाही, हे खरेच.

जैव उत्क्रांती ही सेंद्रिय प्राण्यांमध्ये रासायनिक बदलांमुळे, अन्न-प्रजननाच्या स्पर्धेतल्या निवडीमुळे होते. येथील प्रयोग संगणकीय शब्दांच्या कौल-स्पर्धेमुळे उत्क्रांत झाला. या प्रयोगातून फक्त शुद्ध तार्किक तितके निष्कर्ष जैव उत्क्रांतीपर्यंत पोचवता येतील. तपशीलवार ज्ञानाकरिता जीवशास्त्रातली आधारसामग्री बघूनच परिशीलन करावे लागेल.

कोणी म्हणेल की खेळात मराठी भाषेचे व्याकरण वापरले, म्हणजे खरे तर वाक्ये यादृच्छिक निर्मितीची नव्हेत. मात्र आस्वाद्य वाक्ये ठरवण्यासाठी व्याकरणाचे कुठले नियम नाहीत. प्रयोग आस्वाद्य-वाक्यांच्या उत्पादनाबद्दल होता. जीवशास्त्रातही कार्बन-ऑक्सिजन-नायट्रोजन यांच्या रासायनिक संघटन-विघटनाच्या प्रक्रिया "व्याकरण" आहेत. पण त्या नियमामधून अवयवी प्राणी निर्माण करण्यासाठी कुठलाच नियम नाही.

इतिवाक्ये
या मनोरंजक शब्दखेळामधून उत्क्रांतीबद्दल काही ढोबळ निष्कर्ष काढण्यापुरती आधारसामग्री मिळते. "उत्क्रांती ही सहेतुक आणि प्रगतिशील आहे" या गैरसमजामधून येणारी टोकाची तत्त्वतः सिद्धांत नसल्याचे दर्शवलेले आहे.

- - - समाप्त - - -

वाङ्मयविज्ञानअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

23 Apr 2010 - 3:37 am | अरुण मनोहर

सविस्तर नंतर लिहीन. पण आधी घाईघाईने मनात सर्वप्रथम आलेल्या भावना व्यक्त करायला हे लिहीत आहे.
खरच थोर! भारी, किंवा मिपाठी भाषेत जबरा!

धनंजय, तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने हा विषय मांडला आहे. सृजनाची प्रक्रीया संगणकाला कशी शिकवता येईल, ह्या अजुनही गुढ असलेल्या प्रश्नाचा शोध घेण्याची एक वाट तुम्ही दाखवत आहात असे वाटते.
तुमचा प्रबंध वाचून मनात आणखी काही वाटा तरळू लागल्या.

राजेश घासकडवी's picture

23 Apr 2010 - 9:01 am | राजेश घासकडवी

प्रथम इतका क्लिष्ट वाटणारा खेळ तयार करून, तो दहा दिवस चालू ठेवून, नंतर त्याचं समग्र विश्लेषण करून त्यावर उत्तम भाष्य केल्याबद्दल अभिनंदन. यामागे खूप विचार व मेहेनत आहे हे उघड आहे.

पण नुसत्या मेहेनतीबद्दल श्रेय नाही. हा प्रयोग उत्क्रांतीतत्वाचं कुठचं व किती मर्यादित अवकाश व्यापणार, याचा विचार केलात, व त्याप्रमाणे तो अमलात आला या उत्तम डिझाईनबद्दलदेखील अभिनंदन.

मात्र मला अजूनही वाटतं की दोन वाक्य स्वतंत्र ठेवली असती तर केवळ वाक्यांतर्गतच नव्हे तर दोन वाक्यांमधील डायनॅमिक्सचा अभ्यास करता आला असता. अर्थात प्रत्येक प्रयोगात काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं. तेव्हा ही जर तर ची विधानं झाली.

दहा कोटी वाक्यं तयार करणं अशक्य असलं तरी त्यातल्या मोठ्या संख्येने वाक्यं चांगली की वाईट (विविक्षित निकषांवर)'तपासून' बघता येतात, हे तत्व खूपच प्रभावी आहे. कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन वगैरे एकत्र घुसळून माणूस तयार होण्याची कल्पना म्हणजे ही दहा कोटी वाक्यं तयार करण्यासारखं (अशक्यप्राय) आहे. याउलट मर्यादित पिढ्या तयार करणं, हे पुनरुत्पादनाची यंत्रणा आत्मसात झाली की सहज शक्य आहे, किंवा अनिवार्यच आहे. ही खरी उत्क्रांतीची शक्ती. ती दाखवण्यात हा प्रयोग यशस्वी झाला.

रामोन ल्यूलचं यंत्र वाक्य बनवण्याऐवजी कथाबीजं तयार करण्यासाठी वापरणं ही रोचक कल्पना आहे. वाक्याच्या व्याकरणाप्रमाणे, कथाबीजाचं व्याकरण (तोडकंमोडकं का होईना) तयार करता येऊ शकेल असं वाटतं. (किंवा व्याकरण तयार करणारं ल्यूलचं यंत्र बनवता येईल!! त्याला अधिव्याकरण लागेल...)

अरुण मनोहर's picture

23 Apr 2010 - 11:33 am | अरुण मनोहर

>>> रामोन ल्यूलचं यंत्र वाक्य बनवण्याऐवजी कथाबीजं तयार करण्यासाठी वापरणं ही रोचक कल्पना आहे<<<
राजेशजी, खुप रोचक कल्पना. असे एखादे वाक्य काढून द्या ना..

उत्तम कथाबीज मिळाले तर कथा सरासर उगवते.

नितिन थत्ते's picture

23 Apr 2010 - 12:15 pm | नितिन थत्ते

शब्दातीत......

ही मालिका हे मिसळपावचे भूषण समजावे.

नितिन थत्ते

विसोबा खेचर's picture

23 Apr 2010 - 3:01 pm | विसोबा खेचर

ही मालिका हे मिसळपावचे भूषण समजावे.

सहमत...

धन्याशेठला सलाम..

तात्या.

अक्षय पुर्णपात्रे's picture

26 Apr 2010 - 8:28 am | अक्षय पुर्णपात्रे

वरील सर्व प्रतिसादकर्त्यांशी सहमत आहे. प्रयोगाच्या नियोजनबद्ध मांडणीपासून निकालांचे समर्पक विश्लेषणापर्यंत प्रत्येक टप्पा कौतुकास्पद. उत्क्रांतीच्या प्रक्रियेची एवढी सशक्त ओळख मिपाकरांना करून दिल्याबद्दल धन्यवाद.