नशीब भाग २६ ते ३०
नशीब त्यांचे - भाग ३१ 11/6/09
बॅन्कॉक मधील पक्षांच्या किलबिलाटात फोन वाजला म्हणून उठलो, बायको शांत झोपली होती. सहल कंपनीच्या मुलीने तासाभरात गाडी घेऊन येणार असल्याची लाडक्या आवाजात मला सूचना दिली. ठीक १० वाजता आमची शहर दर्शन सहल त्या कंपनीच्या गाडीतून सुरू झाली. गाडीत मागच्या सिटवर मी बायको बरोबर बसलो, समोर ती मुलगी बसली व चालक गाडी चालवीत होता. रस्त्याने शहराची माहिती ऐकत होतो. थोड्या थोड्या अंतरावर फळभाज्या विक्रेते दिसत होते, प्रत्येक भाजी निवडलेली, प्लॅस्टिक मध्ये गुंडाळलेली होती. बायकोला फळ खाण्याचा छंद आजही आहे, तेव्हा ही होता, खरंतर प्रत्येक इराण्याला फळ खाणे श्वास घेण्या इतके महत्त्वाचे वाटते की काय अशी शंका मी बायकोला अधुनमधुन विचारीत असतो. चारपाच ठिकाणी थांबून तिने ताज्या स्वच्छ फळांचे जेवण केले, मलाही खाण्याचा आग्रह केला, मला नेहमी फक्त आजारी माणूस फळ खातो असेच वाटते.
पाच तास भटकण्यात कसे संपले कळलेच नाही. बायकोचा आनंदी चेहरा पाहून मला वेगळाच आनंद मिळाला, त्या १५ दिवसात तिचा चेहरा सारखा त्रासलेलाच होता, प्रसंगच तसे घडले होते. हॉटेलच्या जवळ आलेलो असताना सहल वाल्या मुलीने आम्हाला धक्काच दिला. माझ्या बायकोकडे हात करत तिने सरळ प्रस्ताव टाकला होता. "मी तुझी परिस्थिती समजू शकते, दोघांना शारीरिक मालीश वगैरे व्यवस्था मी करू शकते, मी पण ती सेवा देऊ शकेन हे माझे कार्ड." सहल वाल्या मुलीने माझा दंड हळूच दाबून मालीश चा स्पर्श कसा असेल ह्याची झलक देण्याचा प्रयत्न केला होता. माझी बायको माझ्या कडे खास इराणी पद्धतीचे आश्चर्य व्यक्त करीत उभी होती, खालचा ओठ वरच्या दातांनी दाबितं चेहर्यावर मिस्किल हास्य असते, मग दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर आपटून हनवटीच्या खाली धरायचे, मग तोंडाने म्हणायचे "बा:ह बा:ह चे खूब, दिघे ची मुन्धे ? बी हया" (वा: वा: फार छान, अजून काय दाखवायचे राहिले आहे? कसली भिती नाहीच !). असो, तर काय सांगत होतो, मी विषय बदलला, दिवसभर तिने आम्हाला चांगली साथ दिली, तिचे आभार मानले, सकाळी सात वाजता पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत ती निघून गेली.
आम्ही दोघेही थकलो होतो. जरा ताजे तवाने होऊन हॉटेल बाहेर पायी भटकून आलो, बायकोला थोडे चालणे फार गरजेचे होते. परत आल्यावर बायकोने पुन्हा तिचा आवडता फळ आहार संपवला तिला फक्त एग सॅन्ड्विच प्रकारच खावासा वाटला, तिथला तो जेवणाचा प्रकार मलाही फारसा आवडला नव्हता मी पण तिला साथ दिली, पण आयस्क्रिमचे भरपूर प्रकार खाऊन भूक भागवली. टि.व्ही दाखवत असलेला चार्ल्स ब्रॉन्सनचा सिनेमा बघत झोपलो.
सकाळी तयार होऊन सामानाची पेटी घेऊन खाली आलो. संध्याकाळच्या विमानाने मुंबईला परतायचे होते. हॉटेलचा हिशेब संपवला व सहलवालीची वाट बघत थांबलो, सहल संपवून तिच आम्हाला विमान तळावर सोडणार होती. पर्यटन विभागाचा लोक कलांच्या कार्यक्रमाचे स्थळ बरेच लांब होते. बायकोने त्या मुलीला कालच्या प्रकारा विषयी विचारायला सुरुवात केली, एक बाई म्हणून तिचे विचार बायकोला ऐकायचे होते. त्या मुलीचे डोळे भरून आले होते. आदल्या रात्री आम्ही तिची सेवा नाकारल्याने बरेच दिवसांनी ति तिच्या मुलांच्या बरोबर बाहेर भटकायला, जेवणाला एकत्र होती, विशेष हे की मुलांना कुशीत घेऊन झोपली होती. बायकोने तिचे वय विचारले, २० - २२ वय असावे अशी दिसणारी ३४ वर्षाची बाई होती.
वयाच्या १४ - १५ वर्षाची असताना गावाकडच्या प्रियकरानेच तिला शहरात आणून एकाला विकले होते. पाच वर्ष त्रासात काढल्यावर विमानतळावर त्या रात्री आम्हाला भेटलेल्या त्या वाटाड्याशी तिने लग्न केले होते. ( मला व बायकोला तिचे ते लग्न, नाते समजलेच नाही.) शिक्षण, घर, राहणीमान फार महाग असल्याने तिलाच नाही तर बर्याच मुलींना / बायकांना देह व्यापार हाच एक कमाईचा व्यवसाय उरला आहे, त्यात वाईट काही नसून, सरकार मान्य व्यवसायी म्हणून ति एक काम करीत होती, तिचे सरकारी ओळखपत्र तिने आम्हाला दाखवले. तिने जे सांगितले ते आम्हाला नाटक वाटणे शक्य नव्हते.
लोक कलांचा कार्यक्रम प्रेक्षणीय होता. भरपूर चित्र रिळे (फिल्म रोल) संपवली. कॅनन प्रतिमा ग्राहकाचा व भिंगांचा हाताळण्याचा आनंद वेगळाच होता. बराच वेळ एका ठिकाणी बसण्याचा बायकोला त्रास झाला. थोडा वेळ पायी भटकून विमानतळावर आलो. एक महत्त्वाचा फरक जाणवला सहलवाल्या बाईने बायकोचा हात धरला होता व दोघींनी एकमेकीचा निरोप घेतला त्यात मी नव्हतो.
बॅन्कॉकला आलो तेव्हा रात्र होती सगळे कसे शांत होते. पण आता बॅन्कॉक सोडून बाहेर जाताना दिवस अर्धा संपला होता. स्वागत कक्षातील वातावरण गावाकडच्या "रेड लाइट" भागाचे आधुनिक रूप वाटत होते. गावठी बायकां - पुरुषांची जागा एखाद्या कंपनी कार्यालयातील स्त्री - पुरषांनी घेतल्या सारखे वाटत होते, परंतु चाळे मात्र "रेड लाइट" भागातील होते. तो प्रवासातील दुसरा धक्का होता. आम्हाला चार तास त्या वातावरणातच बसावे लागले. बॅन्कॉक शहराचे माहिती पत्रक चाळताना एक वाक्य खटकले होते, "येणार्या पाहूण्यांचे सर्वतोपरी पाहुणचार करणे आम्ही आमचे कर्तव्य मानतो" त्याचा खरा अर्थ स्वागत कक्षातील वातावरण बघून समजला होता. त्या काळातील बंबई हवाई अड्ड्या वर विमान उतरले. प्रवासातील तिसरा धक्का बसला?
नशीब त्यांचे - भाग ३२ 11/7/09
दुपारचे बॅन्कॉक स्वागतकक्ष आणि रात्रीचे मुंबई स्वागतकक्ष हा वातावरण बदल, " मंमईच्या इमान तळाचा द्येखावा बघायला आलेल्या गावाकडच्या बाळ्याला गावच्या यष्टी स्टॅन्डचा बदल " जसा जाणवेल तसाच मला जाणवला. आम्ही दोघे तास भर रांगेत उभे होतो का तर विमानातून उतरल्याच्या पत्रकात ( डिसएम्बारकेशन कार्ड ) माहिती लिहिण्याचे प्रवाशांचे काम अधिकारी वर्ग करीत होता. माझ्या पासपोर्टवर शिक्का झाला, बायको परदेशिय पासपोर्ट रांगेत होती. आधिकार्या ने तिला प्रवेश नाकारताच ति खालीच कोसळली. एकतर गर्भवती बाई. प्रवासाचा थकवा त्यात दोन पायावर तास भर उभे राहणे आणि वरून प्रवेश नाकारला, मग काय पळापळ झाली. आम्हा दोघांना मुख्य आधिकार्याच्या कार्यालयात बसवले गेले, बर्याच वेळाने तो अधिकारी आला, सुदैवाने मराठी मानूस होता. " त्याचे काय आहे तुमच्या बायकोच्या प्रवास पर्वान्यात एकदाच प्रवेश आहे, तो एकदा सहा दिवसा पूर्वी झाला, आता दुसरा प्रवेश आम्ही देऊ शकत नाही. बरं एक सांगा ही तुमचीच बायकोना, नाही म्हणजे काही भानगड नाही ना ?
वाचकहो तुमची काय प्रतिक्रिया असेल मला माहीत नाही, पण त्या क्षणाला चाफेकर बंधूंची रॅन्ड साहेबाला गोळी घालण्याची मनस्थिती मी समजलो. पण मग ते छोटे बाळ, आम्हा दोघांचा तो योजनाबद्ध कार्यक्रम आठवला. "अडला नारायण गाढवाचे पाय धरी" हे पण आठवले. ति शुक्रवारची रात्र होती, शनिवार, रविवार, सोमवार सकाळ मला फलटण रोड पोलीस ठाण्यात जाऊन परत यायचे, तो पर्यंत बायकोला विमान तळावर . . . छे छे शक्यच नव्हते. चार दिवसापूर्वीच्या हॉन्गकॉन्ग प्रसंगाची पुनरावृत्ती . . नको, बायकोला हा धक्का सहन होणार नव्हता. इराण मधल्या भारतीय दूतावासाच्या लग्न नोंदणीची पत्र प्रत साहेबाच्या हातात दिली, त्या साहेबा बरोबर जरा चाय पाण्याच्या गोष्टी केल्या, त्या काळात चाय पाणी स्वस्त होते, आजकाल इन्फ्लेशनच्या जमान्यात चाय पाण्याची पण भाव वाढ झाली आहे. तर, टेबलाचा खण उघडला गेला आणि बायकोला प्रवेश परवाना मिळाला.
१० दिवस हसण्या-रडण्यात निघून गेले, मी हमाल होणार अशी दगडावरची काळी रेघ काढलेल्या मंडळींना, हमालाच्या तुलनेत कैक पटीने जास्त वैभव मी जमवल्याचे अंजन का मंजन त्या मंडळींच्या डोळ्या करता भेट देण्याचा थोडा फार आनंद मी मिळवला. बॅन्कॉक ला ग्रहण केलेली चित्र रिळे छपाईला दिली, कॅनन प्रतिमा ग्राहकाचा दर्जा बघण्यास उत्सुक होतो. बरेच काही प्रयोग केले होते. छापील चित्र व कुतूहल वाढवलेले पारदर्शि चित्र (प्रिंटेड फोटो, ट्रान्सपेरन्सी) ह्यातील फरक माझ्याच कामातून शोधायचा होता, तो मला सापडला, त्याचा आनंद मला मोलाचा होता. मुंबई पुण्यात थोडे चित्र ग्रहणाचे प्रयोग केले.
इराण मधली परिस्थिती समजून मुलाचा जन्म भारतात व्हावा असा आमचा प्रयत्न होतो, सर्व प्रकारची काळजी माझे अगदी जवळचे नातेवाईक मंडळी घेतील असे आश्वासन घेऊनच मी बायकोला भारतात आणले होते. परंतु पाल चुकचुकली व नातेवाईकांनी रंग बदलले, मी सगळ्या खर्चाचा हिशेब केला तेवढे पैसे त्यांना देण्या करता तयार ठेवले, बाळ इराणला जन्माला येण्याने काय नुकसान होण्याची शक्यता होती हे सुध्दा समजवून सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण नाही, आमच्या व बाळाच्या नशिबी जन्म स्थान इराणच होते. जे होईल ते भोगायचे असे ठरवून एके दिवशी तेहरानला परतलो. आम्हा दोघांना बाळाचे वेध लागले होते.
क्रांतिकारकांचा राग परदेशी पासपोर्ट धारकां विरुद्ध वाढू लागला. माझी पेकान गाडी विकण्याचा सल्ला प्रत्येकाने दिला. मी गाडी ३५००० ला विकली. महिन्या भरात इराण - इराक युद्ध सुरू झाले. सगळ्या वस्तूंच्या किमती ५ पटीने वाढल्या होत्या. १९८१ बाळाचा जन्म झाला. बायकोला दवाखान्यात ने आण करण्यात इराणी मित्रांनी खूपच मदत केली होती. पहिला मुलगा सगळ्यांनाच आनंदाचा क्षण होता. पहिल्या दिवशी दर तासाला ३६ चित्रांचे १ चित्र रीळ संपवले होते. मात्र १० व्या दिवशी एका प्रसंगाने आम्हा सगळ्यांनाच कधीही न विसरणारा धक्का दिला होता. मी कंपनीत कामाला गेलो होतो. सकाळच्या वेळात बायकोने मुलाला दूध पाजले व तसेच खाली ठेवले आणि मुलाने डोळे फिरवले, जोरात ओरडा सुरू झाला, तोपर्यंत मुलाचा चेहरा निळा झाला होता. त्याचा श्वास थांबला होता. बायकोच्या भावाने डोके वापरून मुलाच्या तोंडातून जोरात हवा भरली आणि पाय धरून उलटे केले, सगळे दूध बाहेर आले आणि श्वास सुरू केला होता. दवाखाना जवळच असल्याने डॉक्टर कडे नेले. तो पर्यंत मुलगा अगदी सामान्य झाला होता. मग माझ्या डॉक्टर मित्राने बायकोला दम भरला, दूध बसून पाजायचे, दूध पिणे संपल्यावर मुलाच्या पाठीवरून दाब देऊन हात फिरवायचा, ढेकर आल्यावर थोडा वेळ उभे ठेवायचे, मग खाली आडवे ठेवायचे म्हणजे दूध असे घशात अडकणार नाही.
एके दिवशी सिडनी ऑस्ट्रेलीयात राहणार्या भावाचे पत्र आले, "इराणच्या विचित्र परिस्थितीत न राहता ऑस्ट्रेलीयात ये, इथे तुझ्या कलेचे सोने होईल. सोबत आमंत्रण पत्र देत आहे ते दाखवून तुला प्रवास परवाना लवकर मिळेल. मी आईला तयारी करायला सांगितले आहे, येताना तिला घेऊन ये." तो प्रवास -
नशीब त्यांचे - भाग ३३ 11/8/09
१९८१ सिडनी विमान तळावर मोठा भाऊ आला होता. रस्त्याने सारखे वाटत होते आमचे कौतुक बघायला आमचे बाबा तेव्हा हवे होते. घरात जाताच भावाच्या को.ब्रा. बायकोचा मुद्दाम जाणवणारा बोलका (?) चेहरा आणि ते देखाव्याचे हास्य बरेच काही सांगून गेला. मी वेळ न घालवता कामाच्या म्हणजे नोकरीच्या जाहिराती बघायला सुरू केले. दोन दिवसात दोन जागा मिळाल्या परंतू कामाचा परवाना असेल तरच, हा प्रकार मला सांगितला नव्हता, परवाना प्रकारात कंपनी कोणतीही मदत करणार नव्हती. चॅनल ७ व ९ च्या स्टुडिओत काम मिळाले, कामाच्या परवान्याची जबाबदारी माझी होती. भावाने व बायकोने हा प्रकार त्यांना नवीन असल्याचे नाटक केले.
हसलब्लाड प्रतिमा ग्राहक (कॅमेरा) विक्रेत्याच्या दुकानात भटकत असताना एक माणूस उत्सुकतेने प्रश्न विचारीत होता. त्याची उतरे देणे विक्रेत्याला जमत नव्हते, त्या माणसाला पूर्ण संच (सेट) विकत घ्यायचा होता, पण त्या आधी त्याचा उपयोग कसा व किती महत्त्वाचा असतो हे जाणून घ्यायचे होते. मी पुढे गेलो, त्यांची माफी मागितली व अपेक्षित माहिती दिली. त्या माणसाला त्याचा जुना संच विकून त्या पैशात भर घालून हा नवीन संच विकत घ्यायचा होता, दोन दिवसाने परत येण्याचे आश्वासन, फोन, पत्ता देऊन तो निघून गेला. थोड्यावेळाने दुकानाचा मालक आला. त्याच्या कडून कामाच्या परवान्याची माहिती मिळवली, माझ्या भावाने दोन सरकारी माहिती पत्र पूर्ण करून दिले तर तो दुकानवाला मदत करणार होता. भावाने (बायकोला घाबरून) ते पूर्ण नाकारले.
आईच्या आग्रहानंतर भावाने त्याच्या संगणक कंपनीत मुलाखतीची तारीख मिळवली. मुलाखत घेणारा माझे कामाचे अनुभव ऐकून खूश झाला होता. त्याने सहज विचारले त्या कंपनीचा पत्ता कुठून मिळाला वगैरे. मी तितक्याच सहजतेने भावाचे नाव सांगितले, तो आवाक होऊन माझ्याकडे बघत बसला होता. कारण बोलताना तो मुलाखत घेणारा एकदा बोलून गेला होता " तुम्ही भारतीय उगीचच जरुर नसताना शिक्षण, पदव्या घेता, नवल आहे तुझ्या जवळ कोणतीच पदवी कशी नाही." मला आज अजूनही कळले नाही भावाने मी त्याचा मित्र असल्याचे का सांगितले, मुलाखती अगोदर मला कल्पना का दिली नव्हती. कामाचा परवाना मिळण्या करिता लागणारे कंपनीचे पत्र त्याने मिळवले. त्याचा काहीच फायदा झाला नाही. सिडनी सोडताना भावाच्या बायकोने " परत आलास तर बाहेर जागा बघून ये माझ्या घरात नाही," हे सांगण्याचा मोठेपणा दाखवत नात्याची ओळख दिली. (पुढे बर्याच वर्षांनी तिचेच शब्द तिलाच ऐकवायचा तिनेच छान प्रसंग घडवून आणला, मला एक समाधान मिळाले). सिडनीला आईची सोबत व भावाचे आमंत्रण, प्रवेश पत्रात त्याचा पत्ता दिला होता म्हणून मी त्याच्या घरी गेलो होतो. तसे मुंबई पासूनच मी तिचे नाटक ओळखून होतो. तिला शिकवलेली असल्याचा फार अहंकार होता / आहे, तिच्या तुलनेत मी शिकवलेला नाही. मी इराणला परत गेलो. (माझे असे त्या दोघांच्या बाबतीत समजून घेणे नात्यातली पारदर्शीता की काय नसल्याने झाले असेल, मला खात्री आहे त्यांना हे असले पारदर्शीता वगैरे पाठ्यक्रमात शिकवले गेले नसावे.)
मला सिडनीत आई सोबत आमंत्रणाचे नाटक नीट समजले. इथून माझ्यात अजून एक बदल झाला, "नशीब त्यांचे” न म्हणता "नशीब हे शिकलो" नाहीतर मी कुठे भरकटलो असतो देव जाणे. तेहरानला विमान उतरताच केव्हा एकदा मुलाला कडेवर घेतो असे झाले होते. मुला बरोबर खेळत बायकोबरोबर बोलत रात्री उशिरा झोपलो. सकाळी धावत कंपनीत गेलो. नवीन आलेल्या त्या क्रांतिकारी कंपनी प्रमुखाने मी कंपनी सोडून पळून गेल्याची तक्रार पोलिसात केली होती. प्रत्यक्षात बाहेर / प्रवेशाचा रीतसर परवाना घेऊनच मी सुट्टी घेऊन सिडनीला गेलो होतो. मी कायद्या प्रमाणे प्रवास संपताच पासपोर्ट द्यायला मुख्य कार्यालयात गेलो, कं.प्र, च्या सुरक्षा पथकाच्या माणसाने माझी मान धरून ओढत कं.प्र समोर नेऊन उभे केले. मला शिवीगाळ केली, प्रमुखाने "ह्या हिंदी कचर्याला माझ्या समोरून उचलून बाहेर फेका, पोलिसाला कळवा आणि तेहरान विमानतळावर फेकून या," असा हुकूम दिला. काय होते आहे हे कळण्याच्या आत मी अंधारी येऊन खाली पडलो. सकाळचे साडे सात वाजता ही घटना घडली, मला जाग आली ती रात्री अकरा वाजता. दवाखान्यात, बाजूला पोलीस उभे होते, माझा डॉक्टर मित्र होता, माझे काही खास इराणी मित्र पण उभे होते. माझ्या डोक्याच्या मागच्या भागातून भयानक कळा होत होत्या. पोलिस माझे निवेदन घेण्याच्या प्रयत्नात होते. माझ्या शरीरात बर्याच जागेत ठिबक नळ्या जोडलेल्या होत्या. दुसर्या दिवशी सकाळी मला पूर्ण जाग आली. डॉक्टर मित्र आणि जिल्ह्याचा पोलिस अधिकारी माझ्याशी नीट बोलले, त्यांना मला मारहाण झाल्याची शंका होती पण पुरावा सापडत नव्हता. शेवटी मानसिक धक्क्याने पोटातील आम्ल प्रमाण वाढल्याने डोक्यावर परिणाम झाला असावा असे पत्र देण्यात आले.
त्याच आठवड्यात मला एकट्याला तेहरानला विमानात बसवून मुंबईला रवाना केले गेले. विमानाचे तिकीट मला विकत घ्यावे लागले. साडेचार वर्षाचा हिशेब गुंढाळून माझे खाते बंद केल्याचे सांगण्यात आले. त्या महिन्याचा पगार देखील मिळाला नाही. विलेपार्ल्याच्या बहिणीने व मेव्हण्यांनी फार चांगली मदत केली. महिन्या भरात स्वतः:ला सावरले आणि बायको मुलाला इराण मधून बाहेर आणण्या करता प्रवेश मिळवला.
नशीब हे शिकलो - भाग ३४ 11/9/09
अक्टोबर १९८१ मी परत इराणला गेलो. ज्या कंपनी प्रमुखाने मला बाहेर फेकले त्याला तुरंगात पाठवले होते. माझ्यामुळे नाही तर त्या कंपनीत व त्या आधीच्या कंपनीत त्याने पैशाची फार मोठी अफरातफर केल्याचे उघडकीस आले होते. त्याच्या जागी नवीन प्रमुखाची नेमणूक झाली होती. त्याला जाऊन मी भेटलो, त्याने मला मशीन साझी अराक ह्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवून दिली. ( अराक हे इराणच्या एका शहराचे नाव आहे, इराक नव्हे ). पण योग बघा एका महत्त्वाच्या व्यक्ती बरोबर ७२ सरकारी अधिकारी एका बॉम स्फोटात मारले गेले. १५ दिवस देश शोकाग्रस्त झाला सगळी कार्यालये बंद ठेवली होती. माझ्या वास्तव्य परवान्याची मुदत संपणार होती. नोकरीचे कागदपत्र मिळेस्तोवर चार पाच महिने लागणार होते. मी बायको मुला सोबत इराण सोडले.
मुंबईत आलो. पार्ल्यातल्या बहिणीच्या मध्यस्तीने एक जागा मिळवली. पण कराराप्रमाणे घरात चहा व इतर खाण्याचे पदार्थ बनवण्याला मनाई होती. तीनच महिने मुंबईत राहवे लागेल असा अंदाज करण्याचे तसेच कारण होते मागील भागात वर्णन केलेल्या त्या सिडनीच्या संगणक नोकरी परवान्याचे पत्र इराणच्या ऑस्ट्रेलिया दूतावासात नोकरी व वास्तव्य अर्जा सकट जोडून आधीच पाठवलेले होते. आम्हा तिघांचे पासपोर्ट, तेहरान - मुंबई - सिडनी परतीच्या तिकीटाच्या प्रती, ए.एन.झेड बॅन्क खात्यातील ३००० डॉलर तसेच ५००० डॉलर रोख हे सगळे पुरावे पण जोडले होते. महिन्याभरात निकाल समजेल असे सांगितले गेले. पण इराण सोडावे लागल्याने माझे कागदपत्र दिल्लीला पाठवले गेले. तसे मला कळवले गेले. दिल्ली कार्यालयाने सकारात्मक उत्तर दिले. ही सगळी माहिती सिडनीला भावाला पत्राने कळवली, तीन महीने लागतील असा अंदाज त्याने दिला. इथून माझे वाट बघणे सुरू झाले.
बायकोला फक्त १ महिन्याचा वास्तव्य परवाना मिळाला होता त्याचे नविनी करणं करण्याची वेळ आली. पार्ले ते फलटण रोड पोलिस ठाणे ते सचिवालय आणि तसेच परत हा प्रवास मी, बायको व ४ महिन्याचा मुलगा असा करावा लागला. प्रत्येक ठिकाणी चाय पाणी , टेबलाचे खण असा एकूण २००० रुपयाचा फटका बसला. आज ते दिवस आठवतात तेव्हा हसावे का रडावे कळत नाही. सकाळी तोंड धुतल्या पासून चहा, नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण सगळे हॉटेल मध्ये होते. मोठ्या भावाने शिकवल्याने बहिणीला त्रास देणे टाळले होते. लहान मुलाचे दूध शेजारी नव्याने ओळख झालेली बायकोची मैत्रीण तापवून देत असे. १० महिने कसे संपले कळलेच नाही. बायकोचा वास्तव्य परवाना दर महिन्याला बदलणे आवश्यक होते २०,००० उडाले होते. त्यात आर.बी.आय. च्या एका महाभागाने माझे परकीय चलन भारतीय झाल्याचा धक्का दिला.
बायकोच्या वास्तव्य परवान्याच्या ११व्या नविनी करणं भेटीत सचिवालयात माझे संबंधित कागद घेण्याकरता वाट बघत उभा होतो. त्या कार्यालयातील लेखनिक बायका हॅन्डलूम हाउसच्या साडी सेल ला जाण्याच्या गडबडीत होत्या. मी दोन-चार वेळा त्यांना माझ्या कागदांची विचारणी केली, एक रागाने खिडकीशी येऊन खेकसली "काय हवे आहे, कशाला डोकं पिकवताय?" मी - "माझी फाइल साहेबाला हवी आहे, त्यांनी मला घेण्या करता पाठवले आहे" ति - "तुम्हाला मुंबईत मुली मिळाल्या नाहीत, परदेशात जाऊन घेऊन आलात, आमच्या डोक्याला ताप." मी - " चूक तुमची आहे तुमच्या कपाळावर लग्नाला तयार आहे लेबल नव्हते, विचार केला असता." ति - " तुमच्या जिभेला काही हाड, ओ हवालदार घाला बेड्या ह्याला." हवालदाराला चाय पाणी मिळाले होते, " ओ मुकाट ह्यांची फाइल द्या, काम सोडून साडी सेल ला निघालात." आतील अधिकारी बदललेला होता. त्याने पासपोर्ट व अर्ज बघून आम्हाला एक गोड पण चीड आणणारी बातमी दिली. मी भारतीय नागरिक असल्याने माझ्या बायकोला दोन वर्ष वास्तव्य परवाना कायद्यानेच मिळतो तो त्याने दिला. विशेष म्हणजे पोलिस अधिकारी पण बदललेला होता. पण दोन वर्षाचा परवाना २००० रुपयात मिळाला होता.
ह्या प्रसंगाने माझ्या डोक्यात वीज चमकली, मी जागा झालो, घडणार्या प्रसंगांचे अर्थ समजणे सुरू झाले. नातेवाईक, बाहेरचे सगळे माझे खेळ करण्यात मग्न होते. भरतातच नोकरी शोध नव्याने सुरू झाला. नोकर्या होत्या, माझा अनुभव प्रत्येकाला मान्य होता पण त्याचा मोबदला मात्र २५००च्या वर कोणी देण्यास तयार नव्हते. १९८३ योगायोग, मस्कत ओमानला नोकरी मिळाली. बायकोला पुण्यात भाड्याची एका खोलीची जागा मिळवली. मी ओमानला गेलो.
नशीब हे शिकलो - भाग ३५
मी शाळेत शिकत असताना मोठ्या भावाचे कपडे माझ्या मापाचे करण्याच्या प्रयत्नात शिवण काम, कापड बेतण्याचे काम व नंतर त्यातून कपड्याची नवीन पद्धत ( फॅशन ) कशी घडवता येईल, हे थोडे आईने, थोडे शिंप्याने तर थोडे पुस्तकातून शिकलो. पुढे पूर्ण सूट व सगळ्या प्रकारचे कपडे शिवण्याचा व्यवसाय पण केला. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या दुरुस्तीचा व्यवसाय पण केला. प्रत्येक व्यवसायातील कलाप्रकार मी आत्मसात केला, बर्याच गोष्टी सहज शिकता आल्या व त्यात कौशल्य मिळवता आले. चित्रग्रहणाचा (फोटोग्राफी) अनुभव कृष्ण-धवल चित्राच्या रासायनिक छपाईच्या कामात मदतनिसाचे काम करून मिळवला होता.
१९७७ला इराणला गेल्या पासून शैक्षणिक प्रमाणपत्र मिळवणे सोपे झाले. विदेशी प्रशिक्षण पोस्टाने मिळणे शक्य झाले. मूळ कारण खिशात पैसा आला होता. अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनीयाचे आय.सि.एस. चे इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे ६ वर्षाचे प्रशिक्षण मी १८ महिन्यात पूर्ण केले. कारण जो अभ्यासक्रम होता त्याच्या पेक्षा जास्त पुढचे काम मी रोज करत होतो. त्यांच्या संशयाला उत्तर देताना तसे मी पुरावे दिले होते. दर महिन्याला ५ पुस्तिका येत असत त्यातील ८० ते १०० प्रश्नांची उत्तरे मी दोन दिवसात पाठवीत होतो. त्यामुळे व्यवस्थापक संशयित झाले होते. माझ्या कामाच्या प्रतिमांचा एक संच मी त्यांना पाठवला होता. १९७९ ला इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे प्रमाणपत्र मिळवले. त्याच काळात एका प्रसंगाने चित्रग्रहणाचे (फोटोग्राफी) वेड लागले.
एकदा कंपनीच्या एका सहकार्याने चहा फराळाला माझ्याच बरोबर काही सहकार्यांना पण बोलावले होते. त्याने चित्रग्रहणाचा (फोटोग्राफी) विषय सुरू करून नवीन खरेदी केलेला एक महागडा प्रतिमा ग्राहक (कॅमेरा) दाखवायला कपाटातून बाहेर काढला. बाकी सहकारी चकीत होऊन नुसते बघत होते. मी मात्र पुढे होऊन तो प्रग्रा हाताळण्याची परवानगी मागितली. त्याने माफी मागून मला न देता कपाटात ठेवून दिला. " आता तुझ्या जवळ पैसे येतील मग तू विकत घेऊ शकतोस." मी खरोखरच मनावर घेतले.
१९७८ ला पहिला शिनॉन प्रतिमा ग्राहक (कॅमेरा) १२६०० रुपयात तेहरानला घेतला होता. तेहरान ते खोराम्दार्रेह ३०० की.मी. अंतरात ३ चित्र रिळे संपवली होती. गावातल्या स्टुडिओवाल्याशी त्यामुळे फार चांगली ओळख झाली होती. माझी काही चित्रे मोठी करून त्याने दुकानात काचेच्या मागे लावली होती. दोन प्रसिद्ध मासिकांचा सभासद झालो. आय.सी.एस. युके चित्रपत्रकारीतेचे प्रशिक्षण पोस्टा द्वारे सुरू केले, एक प्रमाणपत्र असावे म्हणून. शिनॉनचा प्रग्रा (कॅमेरा) व माझे ध्वनिमुद्रण उपकरण भारतात एका संस्थेला भेट म्हणून दिले. मग ओळीने कॅननचे ए.एल. - एव्ही - एटी असे प्रग्र (कॅमेरा) घेतले, प्रत्येक प्रग्रा चे वैशिष्ट्य त्याच्या, मर्यादा, हाताळणे शिकलो व मग ते विकले.
एका प्रतिमा चित्राला आवश्यक असणारा प्रत्येक मुद्दा लक्षात यावा म्हणून प्रयोग सुरू केले, ते समजल्यावर प्रग्रा ची बनावट पद्धत, बनावटीचे धातू त्याचे परिणाम ह्याचा अभ्यास सुरू केला. मग भिंग, झरोका, पडदा, क्षप्र (फ्लॅश) ह्या प्रत्येकाची सर्व प्रकारची माहिती परस्पर संबंध व त्याचे प्रयोग हा अभ्यास सुरू केला. बायकोने व नातेवाईकांनी मला ह्या बाबतीत वेडा म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली होती. एकदा आव्हान स्वीकारले, मग शक्यतेच्या शक्य होईल तेवढ्या मर्यादा वाढवल्या, ध्येय एकच प्रतिमा चित्रकारितेचा काढा करून रोज पिणे व त्या धुंतीत आनंद मिळवणे. म्हणूनच कॅनन ए१चा पूर्ण संच हॉन्गकॉन्गला घेऊ शकलो. पण इराणला परिस्थितीचा होणारा बदल जाणून किंमत चांगली मिळताच पूर्ण संच विकून टाकला. पेन्टॅक्सचा एक छोटा संच विकत घेऊन भारतांत परतलो. त्या काळात सुमारे ७०० चित्र रिळे छपाई सुलभ (निगेटिव्ह्ज) व ३०० पारदर्शीत रिळे (ट्रान्स्पेरन्सीज) चा साठा जमला होता, अजूनही बाळगून आहे.
[ भिंग (लेन्स), झरोका (ऍपरचर), पडदा (शटर), क्षप्र- क्षणिक प्रकाश (फ्लॅश), प्रग्र (प्रतिमा ग्राहक) ]
मी कधीच कोणत्याच स्पर्धेत नाव दिले नाही, देत नाही, देणार नाही. फार लहान होतो तेव्हा पासून वडिलांचा, मोठ्या भावाचा, बहिणीचा ( तिघे व्यवसायी कलाकार होते ) वेगवेगळ्या विषयातील स्पर्धेतून झालेला अपमान की अवमान मला नाण्याची दुसरी बाजूच दाखवते व दिसते. ते स्पर्धेचे नियम, ते प्रमुख पाहुणे, ते परीक्षक, ते बक्षीस . . . सगळे घोळकर जय हो. वाचकहो हे झाले माझे अनुभव, निश्चित तुमचे ह्या पेक्षा वेगळे असणार, असावेत.
कॅनन / सिअरस चा ८ मी.मी. चलचित्र ग्राहक ( मूव्ही कॅमेरा ) विकत घेतला. प्रत्येक लहानसहान भागाची माहिती मिळवली, एकमेकांशी असलेले संबंध समजून घेतले मग चलचित्र पद्धतीचा वापर व त्याचे प्रयोग सुरू केले. हा चलचित्र ग्राहक सिडनीला गेलो असताना विकून टाकला, कारण व्हिडिओ ग्रहण पद्धतीच्या आगमनाची चाहूल ओळखली. सिडनी वास्तव्याची फसवी आमिषे बघून मी फसलो होतो. स्वत:ला सावरताना १९८३ उजाडले. पाहू या मस्कत ओमानला काय मिळवू शकेन ?
प्रतिक्रिया
14 Jan 2010 - 9:41 am | II विकास II
आता पर्यंतचे सगळे भाग वाचले, एक सुदंर अनुभव मालिका.
ह्यावर एक पुस्तक निघु शकते,
14 Jan 2010 - 6:57 pm | चित्रा
वेगळेच अनुभव आहेत. ह्यावर अर्थातच पुस्तक काढण्याचा विचार (अजून केला नसल्यास) करावा.
अनेक भागांची आणि मोठी मालिका म्हणून अपरिहार्यपणे होते ते ह्या मालिकेबद्दलही होते आहे, की वाचायचा कंटाळा केला जातो, नकळत दुर्लक्ष होते आहे. वास्तविक असे होऊ नये. म्हणून काही छायाचित्रे असली तर तीही या मालिकेसोबत लावलीत तर लोकांचे लक्ष अधिक जाईल असे वाटते.
14 Jan 2010 - 7:13 pm | विनायक रानडे
पुस्तक कल्पना चांगली आहे. माझा पुस्तक प्रकाशनाचा फार वाईट अनुभव आहे. माझ्या विनायक उवाच http://vkthink.blogspot.com ह्या ब्लॉग वर नशीबचा भाग ५१ चालू आहे. त्याच्याशी हे जुळावे म्हणून इथे एकत्रित केले आहेत. व भाग ४९ पासून माझी संबंधीत छायाचित्रे त्यात येतात.
14 Jan 2010 - 10:07 pm | प्राजु
थक्क करणारा प्रवास आहे तुमचा.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
5 Aug 2024 - 12:20 pm | diggi12
जबरदस्त