नशीब भाग - ५२ व ५३ एकत्रित

विनायक रानडे's picture
विनायक रानडे in जनातलं, मनातलं
1 Mar 2010 - 7:39 pm

नशीब हे शिकलो - ५१

१९९० चा तो काळ होता. मोठ्या मुलाचे शाळेत शिक्षक वर्गाशी पटत नव्हते कारण मागील भागात घडलेला नाटकातील बक्षीस सोहळा. मी वर्तमान पत्रातून शिकवणी जाहिराती बघितल्या. त्यातल्या एका दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधला. बोलण्यावरून समजले बाई "मद्रासी" होती. तिने माझ्या मुलाच्या शाळेचे नाव विचारले, मी नाव सांगताच त्या शाळेतल्या मुलांना ती शिकवत नाही सांगून दूरध्वनी बंद केला. मी यादीतला दुसरा दूरध्वनी क्रमांक शोधला. बोलण्यावरून समजले बाई "बंगाली" होती. ह्या बाईने शाळेचे नाव, इयत्ता, कोणते विषय, विषय शिकवणार्‍या शिक्षकाचे नाव वगैरे विचारले. तिने सांगितलेले शिकवणी शुल्क ऐकून मी दूरध्वनी बंद केला. मी यादीतला तिसरा दूरध्वनी क्रमांक शोधला. बोलण्यावरून समजले गुजराथी बेन होती. तिची शाळेचे नाव, इयत्ता, कोणते विषय, विषय शिकवणार्‍या शिक्षकाचे नाव वगैरे फीत ऐकली पण मीच दूरध्वनी बंद केला. "मुलाने स्नेक (स्नॅक) खाऊन शाळेच्या होल (हॉल) मंदे झोपा" काढू नये म्हणून मी शिकवणी शोध तिथेच थांबवला. अहो काय सांगू खाकेत कळसा अन गावाला वळसा घातला बघा. घराजवळच राहणारा मराठी मित्र त्याच्या बायकोने माफक दरात शिकवायचे कबूल केले. हे घडले कसे तर भाजीच्या दुकानात माझी बायको व ही मित्राची बायको ज्योतसे ज्योत लावत बोलत होत्या. त्यातलीच एक ज्योत मुलाच्या शिकवणीची होती.

मी छायाचित्रणाच्या कामा करता एका कंपनीत गेलो असताना त्या प्रमुखा बरोबर बोलत होतो. त्याच्या मुलीला शाळेत कसा त्रास झाला तो सांगत होता. त्याची मुलगी सातवीत असताना आई बरोबर भारतातून ओमानला आली. एक नवीन जागा, शाळा, अभ्यासक्रम म्हणून सहकार्‍याने एक शिकवणी सुरू करून दिली. त्या वर्षी मुलगी बर्‍या गुणांनी पास झाली म्हणून आठवीत गेल्यावर शिकवणी सुरू करायला त्या शिकवणीच्या बाईने नकार दिला. ह्याने पुन्हा सहकार्‍याला विचारले, त्याने जे सांगितले त्यांवरून शिकवणीचा व्यवसाय कसा चालतो हे कळले. शिकवणी घेणारी बाई व शाळेतील शिक्षिका ह्यांचा एक गट असून पूर्ण वर्षाचा करार असतो. सगळ्या चाचण्यांचे जे प्रश्न विचारले जाणार त्याच्या दुप्पट प्रश्न शिकवणी वाल्या बाईला मिळतात. त्याचाच अभ्यास करून घेतला की यश निश्चित. शिवाय प्रश्न फुटले असे सिद्ध होत नाही. सातवीची शिकवणी वाली आठवीच्या गटात नव्हती. आठवी ते दहावीचा एक स्वतंत्र गट असतो. त्यात भागीदारी जास्त असते म्हणून शुल्क जास्त मोजावे लागते. त्या कंपनी प्रमुखाला हे मान्य नव्हते त्याने सातवीच्याच शिक्षिकेची शिकवणी चालू ठेवली. दोन महिन्याच्या चाचणी व तिमाही परीक्षेत मुलगी नापास झाल्यावर त्याला आठवीचा नवीन गट शोधावा लागला. त्याची मुलगी आठवी पास होताच त्याने तिला भारतात आजी कडे परत पाठवले. नववी / दहावीची शिकवणी शुल्क त्याला परवडणारी नव्हती. तेवढ्या खर्चात भारतात ती मुलगी दोन वर्ष आरामात राहू शकणार होती.

मला एका आयते कपडे उत्पादकाचे छायाचित्रण व चलचित्रणाचे काम मिळाले. माझा कपडे शिवण्याचा अनुभव होता म्हणून छाया चित्राद्वारे शिवणाच्या कोणत्या प्रक्रियेला जास्त महत्त्व दिले जावे हे मी सहज ठरवू शकलो. चलचित्रणा द्वारे कपडे उत्पादनातील कौशल्य फार चांगले दाखवता आले. त्या एका कामाने अजून दोन कपडे उत्पादकांनी मला छायाचित्रण व चलचित्रणाचे काम दिले. त्यानंतर एका घरगुती वीज वाहक तार उत्पादन कंपनीने जपानचा ५ एस कार्यक्रम त्यांच्या उत्पादन जागेत सुरू केला त्याचे चलचित्रणाचे काम मी केले. ति चित्रफीत उद्योग मंत्रालयाच्या एका कार्यक्रमात दाखवण्यात आली होती. योग जुळून आले होते मंत्रालयाच्या त्या कार्यक्रमाचे चित्रीकरण मीच करीत होतो. चित्रफितीच्या शेवटी माझे नाव पडद्यावर झळकले व मग टाळ्यांचा कडकडाट झाला आणि विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्याने माझ्या कामाचे व्यासपीठावरून कौतुक केले होते. त्या एका चित्रफितीने औद्योगिक वसाहतीचे चित्रीकरणाचे सरकारी काम मिळाले. त्या वसाहतीत असणारे कापड उद्योग, पाणी तापवणारी उपकरणे, प्रकाश नळ्या व्यवस्था, संगणक छपाई कागद, सगळ्या प्रकारचे तैल रंग, चार चाकी वाहनांचे बॅटरी सेल, रेडीएटर, चॉकलेट / बिस्किट अशा विविध उत्पादकांच्या चित्रफिती बनवण्याचे काम मला मिळाले. प्रत्येक कामात माझा उत्पादन क्षेत्रातील विविध अनुभवांची फार मदत झाली. त्या कंपन्यांच्या प्रमुखांनी एका चलचित्रफित तयार करणार्‍याला उत्पादन क्षेत्रातील अनुभव असावा ह्याचे कौतुक केले होते.

ओमान मधले पहिले जाहिरात निरीक्षणाचे काम मी सुरू केले व पुढे सातआठ वर्ष ते सतत चालवले होते. ओमान दूरचित्रवाणी वरून रोज संध्याकाळी ६ ते १२ ह्या वेळात दाखवल्या जाणार्‍या जाहिराती किती वाजता कोणत्या कार्यक्रमात दाखवल्या गेल्या त्याचा पुरावा म्हणून चलचित्र मुद्रण रोज न चुकता मी, बायको व मुले करत होतो. दुरचित्र संचावर जाहिरात चालू होण्या आधी व नंतर कोणता कार्यक्रम होता ह्याची ५ सेकंदाची चित्रफीत पुरावा म्हणून जाहिराती बरोबर मुद्रित करून दर आठवड्याला तयार करीत होतो. त्या जाहिरातींच्या आठवड्याच्या लिखित वृत्तांताची एक प्रत तयार करून देत असे. करारा प्रमाणे जाहिरात वेळेवर न दाखवल्याची परतफेड किंवा पुढल्या बिलात त्या किमतीची सूट माझ्या त्या जाहिरात निरीक्षणाने जाहिरातदाराला मिळत होती. तो फायदा २ ते ८ हजार रियालचा होता. ह्या निरीक्षण कामातून मला महिना १५० ते ३०० रियाल मिळत होते.

त्या काळात माझ्या आईला व तिच्या सोबतीला मोठ्या बहिणीला मी ओमानला बोलावले. ज्या आईने माझी लायकी फक्त हमाल होण्याचीच आहे असे ठरवले होते. तिने माझे वैभव जवळून पाहावे हा उद्देश होता. आई येणार म्हणून माझी माझदा हॅचबॅक परत करून माझदा स्टेशन वॅगन विकत घेतली. मी बायको व दोन्ही मुले विमान तळावर गेलो. विमानतळाच्या बाहेर एक पेट्रोल पंप आहे त्याला लागूनच एक छोटीशी टेकडी आहे त्यावर छान बगीचा बनवलेला आहे. त्यात मस्कत नगरपालिकेचे १० फुटाचे चिन्ह असून मोठ्या अक्षरात "तुमचे स्वागत" असे लिहिलेले आहे. त्याचे चलचित्रीकरण केले. त्या टेकडीवरून एअर इंडियाचे विमान आकाशात दिसताच चित्रीकरण सुरू केले व जमिनीला टेकताच बंद केले. आईच्या स्वागताकरता बायको व मुले पुढे गेली, मी चित्रीकरण सुरू ठेवले ते वादिकबिर मध्ये असलेल्या घरापर्यंत चालू ठेवले होते. आईचे, माझे मुलांचे बोलणे बायको चलचित्र मुद्रण करीत होती. आईने आमच्या करता श्री गणेश मूर्ती असलेले २ इंचाचे चांदीचे नाणे आणले होते. त्याची स्थापना करण्याकरता भिंती वर काच लावून त्यावर भगवा रेशमी रुमाल ठेवला व आई बरोबर आम्ही सगळ्यांनी श्री गणेशाची पुजा केली. त्या दिवसापासून बर्‍याच उलाढालींना सुरुवात झाली. ति कशी पाहा पुढील भागात.

नशीब भाग - ५३

आई आणि मोठी बहीण मस्कतला होती तेव्हा त्यांना माझे, बायकोचे व मुलांचे कौतुक दाखवण्यात आम्ही आनंदात होतो. पण आज झालेल्या घोळाचा विचार करताना कोणत्या चुका कशा घडल्या ते जाणवते आहे. सगळा प्रवास खर्च करून मी काय मिळवले तर त्या दोघींनी दाखवलेल्या माझ्या बायकोच्या व मुलांच्या चुकांची यादी. आमचे वागणे, बोलणे, मुलांचे संस्कार त्यांची प्रगती ह्या सगळ्याचे इतर समवयस्क नातवंडांशी तुलना करून असा काही परिणाम साधला की माझ्या मोठ्या मुलाला पुण्यात पाठवावे असे बायकोला जाणवू लागले. त्या दोघींना बायकोने तिचे चलचित्रण - छायाचित्रणाचे काम ति कसे करते हे दाखवण्या करता बरोबर नेले होते. मी आंतर्राष्ट्रीय प्रदर्शनाचे चलचित्रण - छायाचित्रणाचे काम कसे करतो. मुलाने कोणतेही प्रशिक्षण न घेता ऍपल संगणक वापरण्यात मिळवलेले यश हे, सगळे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला. ह्या सगळ्याचे तोंडदेखले कौतुक झाले. पण "काजळाचे एक गालबोट लावायला" मोठी बहीण विसरली नाही. आम्ही करत होतो ते क्षणभंगुर होते(बायको मुलांनी हा शब्द ऐकलेला नव्हता), त्या कामाला भविष्य नव्हते. तिचे मार्गदर्शन घेऊन आम्ही भारतात परतावे असे प्रयत्न तिने बायकोवर सुरू केले.

मी २० वर्षात फुकट दिलेले सल्ले सहज झटकून टाकले होते. पण त्या घटकेला योग जुळून आले होते. आई, बहीण व बायको तिघी अगदी जवळच्याच, रोज दिवस रात्र मला मुलाला भारतात पाठवण्याचे सल्ले देत होत्या. त्याच्या भविष्याचा विचार आताचं करावा लागेल, त्याला माझ्या सारखाच अशिक्षित ठेवणार की काय, असा पण टोला मारून झाला. मुलाला पुण्याला पाठवण्याचे ठरले. मी मोठ्या मुलाचा माझ्यावर असलेला विश्वास तोडण्याची फार मोठी चूक केली होती हे आज जाणवते आहे. पण हे घडणार होते व घडले म्हणूनच "शेवटी नशीब आमचे कोणाला दोष देणार?"

आवश्यक कागदपत्रे जमवली. १५ दिवसांनी आई आणि मोठी बहीण भारतांत परत जाणार होती. त्यांच्या बरोबर बायको व दोन्ही मुले पुण्याला गेली. बहिणीने, तिच्या मुलांनी व नवर्‍याने माझा मुलगा पुण्यातील चांगल्या शाळेत प्रवेश मिळवू शकणार नाही, तसेच "डोनेशन" किंमत मोजावी लागेल वगैरे बायकोला पटवून दिले. एका इंग्रजी माध्यम असलेल्या शाळेत प्रवेश मिळवला. CBSE व SSC पाठ्यक्रमातील फरक म्हणून आठवी पास झालेल्या मुलाला पुन्हा आठवीत बसावे लागले होते. काय काय मुलाला भोगावे लागणार होते ह्याची कल्पना मला अजून आली नव्हती. बायको लहान मुलाला घेऊन मस्कतला परतली होती. पुण्यात काय घडले ते ऐकून डोके सुन्न झाले. मोठ्या बहिणीने मस्कत सोडताना माझ्या मुलाची जबाबदारी घेईन ह्याचे आश्वासन दिले होते. ते पाळण्या करता नव्हते हे पटवून दिले. तिच्या नवर्‍याने मुलाची जबाबदारी घेण्याचे नाकारले होते. त्या शाळेच्याच एका वसती गृहात मुलाची सोय केली होती. वर्षाचा सगळा खर्च शाळेला दिला होता. पुण्यात पालक म्हणून बहिणीचे नाव दिले होते त्यामुळे पहिल्या ३ महिन्याचा अहवाल व प्रगती बहिणीने सगळे उत्तम असल्याचे कळवले. पण मुलगा आईशी बोलताना बर्‍याच तक्रारी करत होता. आम्ही सवय होईल अशी फसवणूक करून घेत होतो. बायकोला सहन झाले नाही, तिने पुण्याला जाण्याचे ठरवले. ति पुण्याला येणार असे कळताच मुलाकडून शिक्षकांनी व बहिणीने मस्कतहून सामान आणण्याची मोठी यादी पाठवली. मी साफ नकार दिला. त्याचा परिणाम १५ दिवसात सुरू झाला. माझा मुलगा अत्यंत बेजबाबदार, घाणेरड्या सवयी लागलेला, उलट उत्तरे देणारा वगैरे तक्रारी शिक्षकांच्या व बहिणीच्या सुरू झाल्या. सहामाही परीक्षेत नापास. दंगामस्ती मारहाण पोलिसांत मुलाविरुद्ध तक्रार वगैरे सगळ्या गोष्टी पचवाव्या लागल्या.

शाळेचे वर्ष संपायला आले मुलगा परीक्षेत नापास झाला असे सांगण्यात आले. पण काही हजाराची रक्कम दिल्यास ए दर्जा मिळेल असे मला सांगण्यात आले. मी नकार दिला, शाळेतून काढण्याची सगळी कागद पत्रे तयार केली व मुलाला मस्कतला परत आणले. विश्वास कोणावर ठेवला की विश्वास घात होण्याची शक्यता वाढते, तेच माझे झाले. सल्ला त्यांचा होता पण निर्णय माझा होता, चूक माझीच होती. मुलाने मला बघताच मिठी मारली. माझे सगळे ऐकायला तो तयार होता पण मला सोडून दूर जायला तो मुळीच तयार नव्हता. मस्कतला पुन: नववीच्या वर्गात तो जायला तयार झाला कारण आता SSC व CBSE पाठ्यक्रमातील फरक होता.
मधूनच मुलगा रडायला लागायचा. पुण्यातल्या त्या शाळेचे व वसतिगृहाचे वातावरण, जेवण, आत्याची वागणूक, शाळेतल्या मुलांची ति गावरान शिव्या मिश्रीत भाषा सगळेच चीड आणणारे घडले होते. मुलाचे एक वर्ष वाया गेले होते. नशीब म्हणायचे अजून काय?

१९९४ला बायकोला ओमान माहिती / प्रसारण मंत्र्याच्या मुलीच्या लग्नाचे छाया - चल चित्रणाचे काम मिळाले. त्यातून माही ओळख झाली त्यांच्या घरात जाणेयेणे वाढले. टीव्ही स्टुडिओत वापरणारी साधने त्यांच्या घरात होती त्याचा वापर करून मी त्यांना चलचित्र संपादन व मुद्रणाची व्यवस्था तयार करून दिली. त्यांना मी नव्याने समजलेल्या अंकित (डिजीटल) छायाचित्र व्यवस्थेची माहिती दिली. मी व्यवस्था बघितली नव्हती पण माहिती पुस्तिकेच्या आधारावर मला सगळे उमजले होते. कारण हि व्यवस्था सुक्ष्मचित्र पद्धतीचाच सुधारलेला एक भाग होता. सुक्ष्मचित्र पद्धतीचा माझा ६ वर्षाचा अनुभव होता. मी सगळे समजवून सांगण्यात यशस्वी ठरलो. योग बघा, त्यांनी २० हजार रियाल काढून दिले व एका नातेवाईकाच्या नावाने मस्कत मधील पहिल्या अंकित छायाचित्र स्टुडिओ उभारणीला सुरुवात झाली. रसायने वापरून चित्रमुद्रणाची व्यवस्था शहरात बर्‍याच ठिकाणी होती. फुजी फिल्म कंपनीचा डिएस ५०५ हा अंकित प्रतिमा ग्राहक - प्रग्रा (कॅमेरा), ऍपल मॅकीन्तॉश ८५०० संगणक व पिक्टोग्राफी ३००० मुद्रण यंत्र असा तो प्रकार होता. गोळा बेरीज ३० हजार रियालचे भांडवल हातात मिळाले. उपकरणे विकत घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. दोन महिन्या नंतर यंत्र सामुग्री मस्कतला आली. जपानचा अंकित चित्र व्यवस्था वितरण अधिकारी व शोध - नियोजन अभियंता असे दोघे मस्कतला आले होते. ते मला व माझ्या ओमानी भांडवलदार मित्राला भेटायला आले होते. वितरण अधिकार्‍याने आम्हा सगळ्यांना गोड धक्का दिला. जगातली सर्व प्रथम अंकित चित्र व्यवस्था व्यावसायिक तत्त्वावर सुरू करणारे आम्ही होतो. तीन पिक्टोग्राफी ३००० मुद्रण यंत्र तयार झाली होती त्यातले एक न्यूयॉर्कला व एक बर्लिनला प्रदर्शनाकरता विक्रेत्याकडे होते. तिसरे मुद्रण यंत्र मस्कतला आले होते. मुद्रण यंत्राचे विशेष कार्य व माझी प्रगती बघू या पुढील भागात.


ह्या इमारतीत माझा स्टुडीओ होता.


स्टुडीओतील अंकीत चित्र व्यवस्थेची साधने व जाहिरात निरिक्षणाची चलचित्र मुद्रण व्यवस्था.


स्टुडीओतील क्षणीक प्रकाश व्यवस्था.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

रेवती's picture

1 Mar 2010 - 10:42 pm | रेवती

वाचतीये.
पु. भा. प्र.

रेवती

पक्या's picture

2 Mar 2010 - 4:24 am | पक्या

विलक्षण अनुभव .
आई आणि सख्खी बहीण अशा कशा वागू शकतात - हा प्रश्न मला अजिबात पडला नाही. आ़़जी आणि आत्या चे असे वागणे माझ्या वडीलांच्या बाबतीत आम्ही अनुभवले आहे. आजीचा वडीलांशी व्यवहार तर सावत्र आईसारखा आहे.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

शुचि's picture

2 Mar 2010 - 6:14 am | शुचि

भाग आवडला ..... ओघवती भाषा. खूप नाट्य आहे. वाईटही वाटले.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मदनबाण's picture

2 Mar 2010 - 6:24 am | मदनबाण

वाचतोय...

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

हर्षद आनंदी's picture

2 Mar 2010 - 6:40 am | हर्षद आनंदी

खुप नाट्यमय प्रवास, बरेच काही शिकायला मिळत आहे.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..