एक आठवण

अनिवासि's picture
अनिवासि in जनातलं, मनातलं
14 Aug 2017 - 8:58 pm

आज १४ ऑगस्ट . बऱ्याच वर्षांनी ह्या दिवशी भारतात असण्याचा योग आला. सकाळी बाहेर गेलो असताना एक मुलगा मोटारीपाशी तिरंगा विकावयास आला आणि जुन्या आठवणी जागृत झाल्या.

८ऑगस्ट ४२ ला 'चले जाव' ची घोषणा झाली आणि त्याच रात्री काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना अटक झाली व ते तुरुंगात गेले. चळवळीचे नेतृत्व दुसऱ्या/ तिसऱ्या फळीतील नेत्यांकडे गेले. चळवळीचे स्वरूप बदलले . पण आम्हां ८/९ वर्षाच्या मुलांना फक्त एवढेच समजत होते की काहीतरी निराळे घडत आहे.

युद्ध संपले -- सर्व नेते सुटले आणि परत फरक जाणवला. ज्या नेत्यांना तुरुंगात टाकले होते त्यांना आता दिलीहून आमंत्रणे येऊ लागली. आझाद हिंद सेनेच्या रंजीत कथा ऐकू येऊ लागल्या. 'कदम कदम बढाये जा' एकदम लोकप्रिय झाले.

थोडक्यात सर्व वातावरण बदलू लागले. स्वातंत्र्याच्या गोष्टी होत होत्या पण सर्व साधारण मनुष्याला कितपत समजत होते ह्याबद्दल शंकाच आहे. प्रसारमाध्यमे आतासारखी अमाप नव्हती. पुण्यात मुख्य वर्तमानपत्रे म्हणजे 'सकाळ', 'काळ' आणि 'केसरी'. मी १३/१४ वर्षांचा होतो. मला तरी फारशी चर्चा झाल्याचे आठवत नाही. ( माझ्या वयोगटात).

जशी जशी १५ ऑगस्ट ४७ ची तारीख जवळ येऊ लागली तसे तसे वातावरण भारावलेले होऊ लागले. मला तर ते दिवस खरंच मंतरलेले होते असेच आठवते.

मी १९४१/४२ पासून राष्ट्र सेवादलाचा सैनिक होतो. जसजसा दिवस जवळ येत गेला तसतसे नवीन उपक्रम सुरू झाले. त्यातला एक म्हणजे नवीन ध्वज तयार करणे. पुण्यात भिकारदास मारुतीशेजारी एका बिल्डिंग मध्ये दलाचे एक कार्यकर्ते राहावयाचे. त्यांच्या गॅलरीत बसून कामास सुरुवात झाली. कापडाचे झेंडे शिंपी बनवत होते तर आम्ही मुले कागदाच्या पताका व झेंडे करत होतो. महत्वाचे काम नंतरच होते. ह्या सर्व गोष्टी दारोदारी जाऊन विकणे! मी दापोडी पासून केळकर रस्ता २/३ आठवड्यात कव्हर केला. का कोणास ठाऊक पण एका इराणी दुकानात पताका विकल्याचा मला फारच आनंद झाला होता.

बघता बघता १४ ऑगस्ट उजाडला. उद्यापासून आपल्या लोकांचे राज्य येणार एवढेच महत्वाचे होते. राष्ट्र सेवा दलाचा असल्यामुळे माझे विचार एकाच विचारसरणीचे होते हे मी आधीच कबूल करतो पण हे सर्वांच्याच बाबतीत होते.

त्या दिवशी एका निराळ्याच विश्वात वावरत होतो, रात्रभर गादीखाली ठेवून इस्त्री केलेली अर्धी चड्डी , पांढरा शर्ट आणि वर गांधी टोपी अशा थाटात रात्री ८/९ च्या सुमारास मंडईच्या आसपास कोठेतरी (ठिकाण आता लक्षात नाही) सगळे जण जमलो.

सगळ्यांना मशाली देण्यात आल्या. तेथून मिरवणूक सुरू झाली. इतरही अनेक लोक मिरवणुकीत होते. असे करत करत मिरवणूक कलेक्टरच्या कचेरीपर्यंत पोहोचली. 'भारतमाता कि जय', 'इन्किलाब झिंदाबाद' अशा अनेक घोषणा देत समुदाय काही निराळ्याच मूड मध्ये होता.

बरोबर १२ वाजता सर्वत्र शांतता पसरली - UNION FLAG सन्मानपूर्वक खाली आला आणि त्याची जागा तिरंग्याने घेतली. समुदाय वेडा झाला आणि...

भारत स्वतंत्र झाला!

इतिहासविचारलेख

प्रतिक्रिया

स्वानुभव आहे? म्हणजे तुमचे वय तरी किती?

अनिवासि's picture

14 Aug 2017 - 10:36 pm | अनिवासि

८५

आणि अनिवासिनी नाही. फक्त अनिवासी

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Aug 2017 - 9:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! अनिवासिंनी मिपाकरांच्या विनंतीचा मान राखून स्वतःच्या आठवणी लिहायला सुरुवात केली ! धन्यवाद !

सुरुवात तर एका भारलेल्या दिवसांच्या रोचक भागाने झाली आहे. मुख्य म्हणजे ते दिवस अनुभवलेल्या जेष्ठ मिपाकराच्या लेखणीतून ते अनुभव वाचायला जास्त मजा येत आहे. पुढचे भाग वाचायला उत्सुक आहे. लवकर लवकर टाकावे.

मोदक's picture

14 Aug 2017 - 9:48 pm | मोदक

+१११

खरेच धन्यवाद. त्यावेळी घडलेल्या गोष्टी वाचायला मिळणे पर्वणी आहे..!!

__/\__

शलभ's picture

14 Aug 2017 - 11:45 pm | शलभ

+1
छान वाटतंय वाचायला..

पिलीयन रायडर's picture

15 Aug 2017 - 12:21 am | पिलीयन रायडर

फार म्हणजे फार मस्त वाटलं हे वाचुन!! छान सुरुवात झाली स्वातंत्रदिनाची!

अजुन लिहा काका, वाट पहातोय.

सगळ्यांना मशाली देण्यात आल्या . तेथून मिरवणूक सुरु झाली. इतरही अनेक लोक मिरवणुकीत होते. असे करत करत मिरवणूक कलेक्टर च्या कचेरी पर्यंत पोहोचली. भारतमाता कि जय , इन्किलाब झिंदाबाद अशा अनेक घोषणा देत समुदाय काही निराळ्याच मूड मध्ये होता.
बरोबर १व२ वाजता सर्वत्र शांतता पसरली - UNION FLAG सन्मानपूर्वक खाली आला आणि त्याची जागा तिरंग्याने घेतली. समुदाय वेडा झाला आणि
भारत स्वतंत्र झाला.

कितीतरी वेळा वाचतोय हा भाग.

तुम्ही एक ऐतिहासीक क्षण याची देही घडताना पाहिलात. १९४७ पासून आज पर्यंत इतकी स्थित्यंतरे पाहिल्यानंतर स्वस्थ बसून पूर्वायुष्याकडे पाहताना कसे वाटते आहे?

टिपीकल मुलाखत छाप प्रश्न विचारला गेला आहे याची जाणीव आहे.. मात्र तुम्ही नियमीतपणे लिहिते व्हावे अशी इच्छा आहे.

रुपी's picture

15 Aug 2017 - 12:26 am | रुपी

अगदी!

कमी शब्दांतही किती प्रभावी लिहिलं आहे. वाचताना शहारे आले.

अभिजीत अवलिया's picture

15 Aug 2017 - 10:50 am | अभिजीत अवलिया

सहमत.

अनुभव/लिखाण आवडले ...

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Aug 2017 - 12:39 am | अमरेंद्र बाहुबली

मस्तच

जुइ's picture

15 Aug 2017 - 1:08 am | जुइ

फारच सुंदर आठवण सांगितली तुम्ही. प्रसंग अगदी डोळ्यांसमोर उभा केला.

पद्मावति's picture

15 Aug 2017 - 1:46 am | पद्मावति

खुप सुरेख.

रेवती's picture

15 Aug 2017 - 2:14 am | रेवती

सुरेख सुरुवात झालिये अनिवासीजी.
उद्या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने लिहिलत ते आवडलं.

फारच सुंदर अन सोप्या भाषेत लिहिलय. आज सर्व पेपर लेखांनी भरलेले असतील - काय मिळवलं काय गमवलं आणि तुलनात्मक इतर देश किती पुढे गेले वगैरे. या घटनेनंतर जन्म झालेल्यांना खुपच उत्सुकता असते नक्की काय झालं असेल याची. लेख , पुस्तकं वाचून काहीच कळत नाही.

१) ब्रिटिश लोक अगोदरच्या पंधरा वर्षांत काय करत होते याच्या काही आठवणी वाचायला आवडतील.

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

15 Aug 2017 - 6:00 am | योगेश लक्ष्मण बोरोले

पहाटे पहाटेच तुमचे थोडके पण उत्तम लिखाण वाचण्यात आले. मस्त वाटले. धन्यवाद. लिहीत रहा व आम्हास अश्याच मेजवानींचा परत परत लाभ मिळु द्या.

वाचून शहारे आले. _/\_ जय हिंद!

अत्रे's picture

15 Aug 2017 - 6:51 am | अत्रे

सुंदर लेख.

ज्योति अळवणी's picture

15 Aug 2017 - 7:57 am | ज्योति अळवणी

मन भरून आलं. पहिला स्वातंत्र्य दिन तुम्ही अनुभवलात. युनियन फ्लॅग खाली उतरताना पाहिलात. कितीतरी मोठी गोष्ट आहे ही. खूप छान लिहिलं आहात अनिवासी काका. असच लिहीत राहा. वाचायला खूप आवडेल

सतिश गावडे's picture

15 Aug 2017 - 9:18 am | सतिश गावडे

लेख आवडला. तुमच्याकडून स्वातंत्र्यपूर्व काळातील गोष्टी वाचायला आवडतील.

संजय पाटिल's picture

15 Aug 2017 - 11:07 am | संजय पाटिल

मस्त लेख; आवडला...
अजून वाचायला आवडेल...

स्वातंत्र्याचा खरा अर्थ तुम्हालाच माहिती असेल कारण तुम्ही ते अनुभवलं आहे . . . अजून काहीतरी असेच सांगत रहा !

कपिलमुनी's picture

15 Aug 2017 - 2:28 pm | कपिलमुनी

आवडला

अनिंद्य's picture

15 Aug 2017 - 3:47 pm | अनिंद्य

@ अनिवासि

सहज सुंदर शब्दात मांडलाय तुम्ही पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या अनुभव.
तुम्ही फार मोठ्या कालखंडाचे प्रत्यक्ष साक्षिदार आहात, तुमचे अनुभव, आठवणी, विचार वाचायला आवडतील.
वेळ होईल तसे अवश्य लिहा.

- अनिंद्य

अभ्या..'s picture

15 Aug 2017 - 3:59 pm | अभ्या..

आह्ह्ह, अप्रतिम लिहिलय.
इतक्या मोठ्या स्थित्यंतराचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आपल्यात आहे याचा अभिमान वाटला.

अनिवासि's picture

15 Aug 2017 - 4:22 pm | अनिवासि

सर्व प्रतिसाद लेखकांना मनापासून धन्यवाद.
नवीन लिहिण्यास प्रोत्साहन मिळते. गणेश लेखमालेत लिहिण्याचा प्रयत्न करत आहे,
असाच लोभ ठेवा.
अनिवासी

मराठी_माणूस's picture

16 Aug 2017 - 12:31 pm | मराठी_माणूस

कालच्या पेपर मधे आलेली खालील प्रतिक्रिया थोडी वेगळी वाटली. आपल्या कडे ३१ डीसेंबर ला रात्री दारु पीउन जे उद्योग चालतात तसे काहीसे त्या दिवशी काही ठीकाणी घडले असे म्हटले आहे (On the streets, people were behaving like rowdies, getting drunk, teasing women.)
तसेच स्वातंत्र्य मिळाल्याचा काही लोकांना (Anglophiles) आनंद झाला नव्हता हे वाचुन आश्चर्य वाटले. ह्या मधे कितपत तथ्य आहे ?

http://epaperbeta.timesofindia.com//Article.aspx?eid=31804&articlexml=Ci...

फारएन्ड's picture

16 Aug 2017 - 9:44 pm | फारएन्ड

असा थेट अनुभव क्वचित वाचायला मिळतो. अजून लिहा.

अनिवासि's picture

17 Aug 2017 - 4:43 pm | अनिवासि

मराठी माणूस
आपला प्रतीसाद खूपच इंटरेस्टिंग वाटला.टाइम्स मधील आठवणी माझ्या आठवणीना अधिकच उजाळा देऊन गेल्या.
आपण उपस्थित केलेल्या प्रश्णांना मी माझ्या आठवणी व अनुभवाप्रमाणे उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.
पहिल्या एक-दोन आठवणी जवळजवळ माझ्यासारख्याच आहेत. तुमचे प्रश्न उद्भवतात ते शेवटच्या आठवणीतून.
मला वाटते कि माझी आठवण व पहिल्या आठवणी ह्या मध्यम वर्गीय मराठी माणसाच्या आहेत. शेवटची आठवण तथाकथित उच्य वर्गीय लोकांपैकी असावी. ताज हॉटेल, तेथे चाललेल्या पार्ट्या हा वर्गच त्या काळी निराळा होता. मला तरी वाटते कि दारू पिणे सर्वसाधारण समाजात निषिद्ध मानले जात असे. कामकरी वर्गात पिणारे असत पण रस्त्यावर झिंगून जाणारे कमी. माझ्या घराच्या जवळच एक देशी गुत्ता होता पण त्याचा आम्हाला कधी त्रास झालेला आठवत नाही.
फोर्ट भागात असे काही झाले असेल तर हे मला नवीन आहे,
लेखकाला अँग्लोफिल ह्या शब्दाने काय सुचवायचे आहे? जॉन स्टुअर्ट मिल्स ची पुस्तके अनेकांनी वाचली होती . सर्व साधारण सुशिक्षित माणसाचे ते BIBLE होते. अनेकजण एथीईस्ट होते. त्यांना आनंद न होण्याचे कारण नव्हते
. तो तर लिबरल तत्ववेत्ता होता असा माझा समज आहे.
मग हे इंग्लंडला जाणारे लोक कोण होते.
मी काही वर्षांनी जेव्हा तेथे गेलो त्यावेळी मला बरेच अँग्लो इंडिअन भेटले त्यातल्या अनेकांनी कबुल केले की त्यांना ब्रिटीश गेल्यावर काय होईल ह्याची काळजी वाटत होती आणि ज्यांचे नातेवाईक अगोदरच तेथे होते ते तिकडे गेले. लेखात फ्लेड असा शब्द वापरला आहे. माझ्या माहितीप्रमाणे घाबरून पळून जायला लागणे अशा वेळी फ्लेड म्हणता येईल. येथे कोणीहि
असे वागल्याचे माझ्या माहितीत नाही. स्वतच्या फायाद्यासाठी काही लोक तिकडे गेले.
माझ्या त्या वेळच्या आठवणी आणि नंतरच्या अनुभवावर ह प्रतिसाद आधारीत आहे.

मराठी_माणूस's picture

17 Aug 2017 - 8:04 pm | मराठी_माणूस

तुमच्या सविस्तर प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. तुम्ही ज्या मध्यम वर्गीय मराठी माणसा बद्दल बोलत आहात , हा लेखक (आठवणींना उजाळा देणारा) ह्याच प्रकारात मोडतो असे खालील वाक्या वरुन तरी वाटते.
Residents of our building, Purushottam in Girgaum, had booked a truck that would take us around south Mumbai.
तसेच Anglophile हे तो स्वतःच्या कुटुंबा बद्दल म्हणत आहे.
त्या वेळेस स्वातंत्र्य चळवळीत असलेली जी नेते मंडळी होती त्यांच्या बद्दल सर्व साधारण लोकांना खुप आदर होता . आपण आजही त्यांच्या देशसेवेबद्दल / त्यागाबद्दल बोलत असतो .मग लेखकाच्या वडीलांना असे का वाटले की आता "goondaraj" येणार आहे.
आमच्या पीढींने हा स्वातंत्र्य संग्राम पाहीला नाही पण ह्या बद्दल बरेच काही वाचले आहे आणि त्या वरुन जे मत बनले आहे त्याला छेद देणारी ही आठवण आहे.

कुमार१'s picture

28 Aug 2017 - 12:36 pm | कुमार१

चांगले वर्णन.
आपल्या देशाचा स्वातन्त्र्यदिन हा मध्यरात्री का जाहीर करण्यात आला? तर म्हणे की १५ ऑगस्ट १९४७ ची सकाळ ही ‘शुभ’ नव्हती. हे विधान पूर्वी एका वृत्तपत्रात वाचले होते.
यात किती तथ्य आहे ?

अनिवासि's picture

29 Aug 2017 - 11:34 pm | अनिवासि

श्री कुमार १
सर्व प्रतिसाद वाचताना तुमचाहि प्रतिसाद वाचला पण त्याला उत्तर द्यायचे राहून गेले. क्षमस्व .
मी हि असा प्रवाद ऐकला होता पण बर्याच नंतर. ४७ च्या काळात नाही. भारत व पाकिस्तान एकाच वेळेस स्वतंत्र झाले आणि त्यामुळे दोन स्वतंत्र दिवस निवडले गेले होते. पाकिस्तानने १४ निवडला व भारताने १५. मला वाटते कि असे प्रसंग मध्यरात्रीच साजरे करतात पण हे माझे मत आहे- नक्की माहित नाही.
मला वाटते कि रुपयाचे नवे चिन्ह निवडले त्यावेळेसहि असेच प्रश्न काढले गेले होते
. ह्या पेक्षा जास्त सविस्तर उत्तर माझ्याकडे नाही.
SORRY

कुमार१'s picture

30 Aug 2017 - 11:07 am | कुमार१

आभारी आहे !

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Aug 2017 - 11:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

मध्यरात्रीनंतर पुढचा दिवस सुरू होतो... ००.००.०१ व्या सेकंदाला. याच कारणासाठी स्वातंत्र्यसोहळा १४-१५ ऑगस्टच्या मध्यरात्री (१४ संपून १५ तारीख सुरू झाल्या-झाल्या) साजरा करण्यात आला !

याच कारणासाठी जीएसटीचे "३० जून - १ जुलै च्या मध्यरात्री" उदघाटन केले गेले... म्हणजेच, जीएसटी प्रणाली १ जुलैच्या पहिल्या सेकंदापासून लागू झाली.

यशोधरा's picture

28 Aug 2017 - 12:58 pm | यशोधरा

वाचते आहे.. किती जबरदस्त अनुभव आहे हा! अजून लिहा प्लीज.

संत घोडेकर's picture

28 Aug 2017 - 3:06 pm | संत घोडेकर

अनिवासि काकांना काल कट्ट्यामुळे भेटण्याचा योग आला आणि काकांकडे अनुभवांचा जबरदस्त खजिना आहे याची जाणीव झाली. काल त्यांच्याच शब्दात जुने अनुभव ऐकणे अतिशय रोमांचकारी अनुभव होता.

सध्या शब्दातील हृदयस्पर्शी लेख !
बहुधा अनिवासीकाका मिपाचे सर्वात ज्येष्ठ सदस्य असतील !

स्मिता.'s picture

29 Aug 2017 - 2:56 am | स्मिता.

शेवटचा परिच्छेद रोमांचकारी आहे. स्वातंत्र्य मिळू अनेक वर्षांनंतर जन्मलेल्या आमच्यासारख्यानाही तिरंगा बघून भारावून जायला होते. तुमच्याकरता तर ही आठवण म्हणजे अनमोल ठेव आहे.

आणखी अनुभव वाचायला आवडतील.

१५ ऑगस्ट ४७ साजरे करणे नक्कीच भारावल्यासारखे असणार त्याची किंमत आमच्या पिढीला कदाचित कळणार नाही पण हे शब्दांकन वाचून खरेच चॅन वाटले , आभारी आहे