डॉन्याचा सेंडॉफ आणि राकलेट!

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
5 Dec 2008 - 10:50 pm

डॉन्याचा फोन आला की त्याचे ५ डिसेंबरला भारतात जायचे नक्की झाले आहे. लगेचच आमचा त्याला जर्मनीच्या चांगल्या आठवणी राहतील असा सेंड ऑफ द्यायचा विचार सुरु झाला आणि 'ती ' बातमी येऊन धडकली. भारतालाच नाही तर जगाला हादरवणारी,सुन्न करणारी.. कोणाचेच चित्त थार्‍यावर नव्हते पण डॉन्याही आम्हाला आता परत कधी भेटेल माहित नव्हते, शेवटी आम्ही २,केसु आणि डॉन्या असे एकत्र जमायचे ठरले. जेवायचा बेत काय करावा? विचार करत होते पण गोडाधोडाचं तर खाण्याची कोणाची मनःस्थितीच नव्हती. त्यात इथे हिमवर्षा आणि कडाक्याची थंडी असल्याने साहजिकच 'राकलेट' करायची कल्पना डोक्यात आली.

नोव्हेंबरमध्ये पारा शून्याकडे झेपावलेलाच असतो.ढगाळ,करड्या दिवसात सूर्यदर्शन दुर्मिळ तर होतेच पण सूर्यदेवांची पार्टटाइम ड्यूटी सुरू होते. आठसाडेआठाशिवाय उजाडत नाही आणि चारच्या सुमारालाच गुडूप काळोख! आपल्याकडे जुलैमध्ये कच्च काळ्या ढगांनी आकाश झाकोळते तेव्हा असणारा उजेड जेवढा असतो तेवढाच उजेड जवळजवळ हिवाळाभर.. सृष्टीचा शिशिरातला रंगीत पोषाख केव्हाच उतरलेला असतो.सगळीकडे फक्त करडी उदासी असते.थंडीच्या बंड्या,कोट,टोप्या,हातमोजे बासनातून बाहेर काढून बोचरे वारे ,बर्फाळ पाऊस आणि गोठवणार्‍या थंडीला तोंड द्यायला सारे सज्ज होतात.अशातच नाताळची चाहूल लागते. नाताळच्या आधीचे चार रविवार म्हणजे चार आडव्हेंट! पहिल्या आडव्हेंटपासूनच दीपमाळांनी घरे झगमगू लागतात. शहराशहरातल्या मुख्य चौकांतून नाताळबाजार भरायला सुरुवात होते. नाताळसजावटीचे सामान,ग्लुवाइन,ऍपलवाइन,वुर्ष्ट (सॉसेजेस) बरोबरच राकलेटचेही स्टॉल्स सजू लागतात.मित्रमंडळींच्या,नातेवाईकांच्या नाताळ मेजवान्या घराघरातून, कचेर्‍याकचेर्‍यातून सुरु होतात.

आमच्या कॉलनीतल्या काळेबाईंनी (ह्या फ्राऊ श्वार्झ. आम्ही त्यांना आपसात काळेबाई म्हणतो. कारण श्वार्झ= काळा..)तर काळेबाईंनी एकदा नाताळमेजवानीसाठी आम्ही दोघं आणि आजीआजोबांना राकलेटपार्टीचे आमंत्रण दिले.तोपर्यंत हा राकलेट काय प्रकार आहे ते आम्हाला माहित नव्हते.पण आम्ही चीज खातो ना? हा प्रश्न फोनवर विचारल्यापासून ही चीजशी संबधित चीज काय आहे ते पहायला आणि चाखायला आम्ही उत्सुक होतो.

जर्मनी,स्वीस आणि फ्रान्सच्या बॉर्डरवरचा हा खास पदार्थ,ज्याला थोडक्यात इन- होम बार्बेक्यू म्हणता येईल. फ्रेंच लोकं 'राकलें.. ' म्हणतात. 'ले ' चा उच्चार किंचित नाकात आणि थोडा झोका देऊन तर जर्मन आणि स्वीस 'राकलेट' असे स्पष्ट म्हणतात. ह्याकरताची पेश्शल स्वीस आणि फ्रेंच राकलेट चीजं अप्रतिम असतात. काळेबाईंच्या घरी पोहोचेपर्यंत आजीने ज्ञानदान केलेले असते. व्हाईटवाईन बरोबर राकलेट फार छान लागते,पण जर्मन बिअर आणि राकलेट सुध्दा टॉप बरं का! आकिम आजोबा सांगतात. कुतुहल मग साहजिकच शिगेला पोहोचते आणि अगदी दोनच मिनिटात आम्ही मग काळेबाईच्या घरी पोहोचतो.
'राकलेट मशिन' म्हणजे काय? तर अंडाकृती स्टीलच्या पत्र्याची टेफलॉनकोटेड प्लेट असते आणि कॉइलवर ती ठेवलेली असते. कॉइल आणि प्लेटच्या पोकळीत लहान खण केलेले असतात आणि त्या प्रत्येक खणात एक (अशी ६ किवा ८ )लहानसे टेफलॉन कोटेड पॅन असते,अगदी पानासारखे आणि अगदी भातुकलीतच शोभतील असे लहान लाकडी कालथे!

राकलेट चीजं, उकडलेले बटाटे आणि जोडीला उकडलेली अंडी, रंगीत सिमला मिरच्या, वाफवलेला फ्लॉवर, मके,व्हाइटबिन्स,मशरुम्स,राजमा.. (ही यादी आपल्या आवडीप्रमाणे आणि कल्पनेप्रमाणे हवी तशी वाढवता येते. व्हिनेगारमधले कांदे,सलामी,सॉसेजेस,सीफूड..)तर अशी सगळी जय्यत पण कच्चीच तयारी पाहून आता हे खायचे कसे? हा प्रश्न पडला होताच. कारण राकलेटच्या स्टॉलवर चीज आगीवर मेल्ट होऊ देतात आणि ते उकडलेले बटाटे,वुर्ष्ट + पावावर ओततात आणि खायला देतात ते पाहिले होते पण इथे तर काही वेगळेच दिसत होते.

" स्टॉलवर जे राकलेट मिळते ना ती पारंपरिक पध्दत. पूर्वी वालिसच्या (स्वीस मधील एक राज्य) डोंगरात,माळरानावर गुराखी कँपफायर करुन त्यावर चीज मेल्ट करुन त्या आगीतच बटाटे,सॉसेजेस इ. भाजून पावाबरोबर खात असत. तो रुचकर प्रकार जेव्हा इतरांनी चाखला तेव्हा इतका पसंत पडला की डोंगरातून राकलेट घराघरात आले. स्वीस, जर्मनी व फ्रान्सच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीच्या दिवसांत ते आवडीने खाल्ले जाऊ लागले. त्यातूनच आले मग वीजेवरचे हे राकलेट मशिन. आणि आता तर इंग्लडातही राकलेट पोहोचले आहे." इति काळेबाई, आमच्या मनातला गोंधळ काळेबाईंनी ओळखलेला असतो. मग काळेबाई आणि आजीआजोबांनी आम्हाला राकलेटचे प्रात्यक्षिक दाखवले.

एका पॅनमध्ये ह्या पदार्थातील हवे ते उदा. मके,ऑलिव्हज इ. घालायचे,त्यावर उकडलेल्या बटाट्यांचे काप ठेवायचे. मग चीजची दुलई पांघरुन पॅन मशीनमध्ये ठेवायचे.पाहिले राकलेट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत धीर धरवत नाहीच पण मग ऑलिव्हज,सॅलड खात आणि पुढच्या राकलेटची तयारी ताटलीत करायची. बटाटे सोलून,कापून ठेवायचे,बाकीचे हवे असलेले पदार्थ आपल्या प्लेटमध्ये जमवून ठेवायचे आणि एकीकडे गप्पा तर असतातच. तोपर्यंत राकलेटला मस्त गोल्डन ब्राऊन रंग आलेला असतो आणि खरपूस वासाने भूकही खवळलेली असते. लाकडी कालथ्याने ते आपल्या प्लेटमध्ये काढून घायचे .. अम्म.. वाफा येत असतात,तोंड पोळेल ना एवढे गरम खाल्ले तर.. दुसरे राकलेट तयार करुन मशिनला लावायचे आणि मग डिशमधल्या राकलेट मध्ये मीठ,मिरपूड इ. घालून ताव मारायचा.. तोपर्यंत पुढचे होतेच तयार.. असे गप्पागोष्टी करत,आस्वाद घेत गोठवणार्‍या थंडीत हे वाफाळते राकलेट मजा आणते.

घरातले सगळे किवा मित्रमंडळी एकत्र जमून ही राकलेट पार्टी करायला खूप मजा येते. ही कल्पनाच आम्हाला एवढी आवडली की दुसर्‍याच दिवशी आम्ही बाजारातून राकलेट मशिन आणले. तेव्हापासून थंडीच्या दिवसात आमच्याकडे येणार्‍या पाहुण्यांसाठी राकलेट पार्टी असतेच असते. अर्थात मीठ,मिरपूडीच्या जोडीला अस्सल व्हराडी ठेचा, तिखट ,चाटमसाला इ. पदार्थ आमच्या राकलेटमध्ये देशी रंग भरतात.

डॉन्या,केसु आणि राकलेटची क्षणचित्रे :


आपला वाटेकरी जातोय ह्या आनंदात राकलेटच्या तयारीला हातभार लावताना केसु


डॉन्याच्या प्रतिक्षेत राकलेट मशीन


नमः पार्वतीपतये हर हर महादेव!!!

जीवनमानराहणीलेख

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Dec 2008 - 10:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे व्वा! हा प्रकार भारीच दिसतोय. आवडला चीज-बटाटे+इतर भाज्या हा प्रकार.

लिखाळ's picture

5 Dec 2008 - 11:05 pm | लिखाळ

जोरदार... तू महान आहेस..

'जर्मन-भारत खाद्यसंस्कृती संगम' पुरस्कार सुरु करुन तो प्रथम तुलाच द्यायला पाहिजे :)

डॉन्याच्या चेहर्‍यावर आनंद पाहा किती आहे...
लवकरच तुझ्याकडे हिवाळी पाहुणे म्हणून चक्कर टाकली पाहिजे...
-- लिखाळ.

शाल्मली's picture

6 Dec 2008 - 3:56 am | शाल्मली

<<'जर्मन-भारत खाद्यसंस्कृती संगम' पुरस्कार सुरु करुन तो प्रथम तुलाच द्यायला पाहिजे<<
<<लवकरच तुझ्याकडे हिवाळी पाहुणे म्हणून चक्कर टाकली पाहिजे...<<
१००% सहमत.

राकलेट हा पदार्थ आणि तू केलेले वर्णन दोन्ही एकदम खमंग. :)

--शाल्मली.

चतुरंग's picture

5 Dec 2008 - 11:17 pm | चतुरंग

हा प्रकार ऐकलादेखील नव्हता खरपूस आणि खमंग लागत असणारच!
सर्व फोटू आणि वर्णन खतरनाक झाले आहे!
डॉन, केसु आणि स्वातीताई तीघांच्याही चेहेर्‍यावर आनंद दिसतोय, कारणे कदाचित वेगवेगळी असू शकतील! ;)

(राकलेट मशीन हे फक्त यूरोपातच मिळते की इकडे अमेरिकेत सुद्धा ह्याची लागण असावी?)

चतुरंग

एकदमच फंडू प्रकार आहे हा.
सगळ्या भाज्या, चीज.. म्हणजे साधारब बेक्ड व्हेज सारखं लागतं का? मी व्हाईट सॉस मध्ये करते बेक्ड व्हे.
बाय द वे.. हे राकलेट मशिन अमेरिकेत मिळतं का? पहायला हवं..

स्वगत : रविवारच्या कट्टा कम मिपा गेट टुगेदर ला हाच प्रकार करता येईल का? स्वातीताई, तात्पुरतं तिचं मशिन पाठवून देऊ शकेल का? ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

8 Dec 2008 - 12:27 pm | स्वाती दिनेश

नाही ,बेक्ड व्हेजिटेबल व्हाइटसॉस +चीजमध्ये बेक करतो ना आपण, राकलेटमध्ये कोणतेही सॉस नसते.ह्याची चव खूप वेगळी असते.
राकलेट मशिनच्या लिंक्स बहुगुणींनी दिल्या आहेतच. येथील वॉलमार्टमध्ये सुध्दा हे मशिन मिळते,म्हणजे तेथील वॉलमार्टमध्येही मिळायला हरकत नाही.
स्वगत-खूप दिवसात बेक्ड व्हेजि केल नाही,करायला हवं आता..
स्वाती

यशोधरा's picture

5 Dec 2008 - 11:52 pm | यशोधरा

छान गं स्वातीताई! एकूण डान्याने जर्मनीला मज्जा केली तर!

प्रभाकर पेठकर's picture

6 Dec 2008 - 12:00 am | प्रभाकर पेठकर

चिझचा कुठलाही प्रकार सॉल्ल्ल्लीड लागतो. पण साले डॉक्टरलोकं तेच खाऊ नकोस सांगतात. असो.

राकलेट मशिन अमेरिकेत मिळतं का?
मला वाटते पारंपारीक भट्टी (ओव्हन) सोबत ग्रीलची व्यवस्था असेल तर वरील पदार्थ सहज करता येईल.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

हे सारं सापडलं:

काही ब्रँड्स आणि त्यांच्या किंमती:

williams-sonoma

Swissmar Matterhorn
Hamilton-Beach

आणि ही रेसिपीज ची लिंक.

रेवती's picture

6 Dec 2008 - 12:21 am | रेवती

राकलेट ही कल्पना भारीच दिसतीये. रंगीत बेल पेपर्स खरोखरच छान दिसतायत.
बटाटे त्या मशीनवर का ठेवलेत?
फारच नविन माहिती मिळाली.
आवडला पदार्थ.

रेवती

स्वाती दिनेश's picture

6 Dec 2008 - 7:47 pm | स्वाती दिनेश

बटाटे मशिनवर ठेवल्यामुळे गरम राहतात,ग्रीलवर ठेवल्याने खरपूस होतात आणि उकडताना आलेला त्यातला पाण्याचा अंश निघून जातो.
ह्याच प्लेटवर इतर पदार्थ उदा. सलामी,वांग्याचे काप इ. पदार्थही ठेवून मग राकलेट पॅनमध्ये घालून घेऊ शकतो.
स्वाती

नंदन's picture

6 Dec 2008 - 12:37 am | नंदन

कल्पना आहे राकलेटची. एकंदरीत सामग्रीवरून मेक्सिकन खाण्यातल्या फहितासारखा आधी वाटला होता, पण बराच वेगळा आहे. फोटोज आणि पूरक माहितीही मस्तच.

हा खाद्यप्रकार लोकप्रिय होण्यामागची गुराख्याची गोष्ट वाचून आपल्याकडच्या हुरड्याची/पोपटीची आठवण झाली :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

6 Dec 2008 - 2:08 pm | सहज

राकलेट, फॉन्ड्यु स्व:ता तयार करणार्‍या लोकांबद्दल आदर आहे :-)

आपला वाटेकरी जातोय ह्या आनंदात राकलेटच्या तयारीला हातभार लावताना केसु

हा हा हा

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Dec 2008 - 2:31 pm | बिपिन कार्यकर्ते

हाइल स्वातीताई...

बिपिन कार्यकर्ते

यशोधरा's picture

6 Dec 2008 - 2:37 pm | यशोधरा

काय बिपिनदा, जर्मनीत जायचा बेत आहे की काय? आत्तापासूनच तयारी करताय ते? :)

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Dec 2008 - 3:32 pm | बिपिन कार्यकर्ते

असं मोठ्याने बोलायचं नसतं गं. ;)

बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश's picture

6 Dec 2008 - 3:19 pm | ऋषिकेश

चायनिज स्टीमबोट, (बहुदा)जापनिज (का कोरियन/चायनिज?) चहापान, मराठी हुरडा/पोपटी याप्रमाणे गप्पांसोबत तासनतास चालंणारा-किंबहुना चवीबरोबरच बरोबरच्या गप्पांबरोबर खुलणारा हा खाद्य प्रकार खुप आवडला...

नव्या माहिती बद्दल धन्यु!

-(गोंधळलेला) ऋषिकेश

प्रकाश घाटपांडे's picture

6 Dec 2008 - 5:04 pm | प्रकाश घाटपांडे

आमाला आदुगर वाटल की ह्ये राकेल आन घासलेट यांच्या हायब्रिड मदुन तयार झालेली काहीतरी भानगड हाय म्हनुन.
नंतर वाटल की ह्ये चाकलेट ची नवी भानगड हाय म्हनल नको ब्व्वॊ स्वातीताईच्या नादी लागायला. नाही तर कोकोवडी वानी काहीतरी व्हायच.
आमी मनानी तिथच व्ह्तो गल्लास रिकामा दिसतोय तो आमचाच

प्रकाश घाटपांडे

चित्तरंजन भट's picture

14 Dec 2008 - 8:15 pm | चित्तरंजन भट

आमाला आदुगर वाटल की ह्ये राकेल आन घासलेट यांच्या हायब्रिड मदुन तयार झालेली काहीतरी भानगड हाय म्हनुन.
नंतर वाटल की ह्ये चाकलेट ची नवी भानगड हाय म्हनल नको ब्व्वॊ स्वातीताईच्या नादी लागायला. नाही तर कोकोवडी वानी काहीतरी व्हायच.

असेच मलाही वाटले. राकलेट खाण्याएवढीच मजा राकलेट तयार होताना होणार्‍या खादाडीत असावी. अगदी माझ्या वाचण्यालाही राकलेटची चव आणि मजा आली. एकंदर सेंडॉफ झकास झालेला आणि लिहिलेला आहे, ह्याविषयी शंकाच नाही.

विसोबा खेचर's picture

6 Dec 2008 - 5:13 pm | विसोबा खेचर

सगळा मेनू झकास, फोटूही झकास.. :)

हा मनोगती केसू काय बरं करतोय तिकडे? :?

वेताळ's picture

6 Dec 2008 - 5:30 pm | वेताळ

बटाटे भाजुन खायला चांगले लागत असावेत. फोटो पांथस्थ स्टाईलने खुप मजा आली. आवडला आपल्याला राकलेट आता पांथस्थ ह्याला भारतिय पायजमा कधी घालतो ते बघायला उत्सुकता लागली आहे.
वेताळ

स्वाती दिनेश's picture

6 Dec 2008 - 9:08 pm | स्वाती दिनेश

अनवट रेसिपी फोटोंबरोबर खुलवायची पध्दत जुनीच आहे.
हे पहा- कॉम्बीनात्सिऑन, मिनी स्प्रिंग रोल्स
स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Dec 2008 - 9:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रॉकलेट झकास....!!!

शितल's picture

7 Dec 2008 - 9:51 am | शितल

स्वातीताई,
तु़झ्याकडे खास आलेच पाहिजे कसले मस्त मस्त पदार्थ तु खाऊ घालतेस ग. :)
डॉन्याच्या चेहर्‍यावर त्याची पावती मिळत आहे. :)
फोटो ही फक्क्ड. :)

मनिष's picture

8 Dec 2008 - 12:33 pm | मनिष

देवा,

बाकी राहू दे, पण लवकरच ऑनसाईट जर्मनीमधे स्वातीताईकडे जाण्याची संधी मिळू दे!!!! आमेन! :)
तोंडाला पाणी सुटलय...
- मनिष

मनिष's picture

8 Dec 2008 - 12:34 pm | मनिष

देवा,

बाकी राहू दे, पण लवकरच ऑनसाईट जर्मनीमधे स्वातीताईकडे जाण्याची संधी मिळू दे!!!! आमेन! :)
तोंडाला पाणी सुटलय...
- मनिष

धमाल मुलगा's picture

8 Dec 2008 - 2:19 pm | धमाल मुलगा

अगदी असेच म्हणतो :)

स्वातीताई, एकदम सह्हीच गं!

आमचं वेडंबागडं गावाकडचं कोकरु एकदम धाडकन परदेशात जाऊन पडलं, पण तुम्हा लोकांमुळे कसं नीट सुखात राहिलं. किती मायेनं केलंस गं त्या डान्याचं! नवेनवे पदार्थ काय खाऊ घातलेस, कुठेकुठे फिरायला घेऊन गेलीस, आणि हा असा झक्कास सेंडऑफही केलास!!!! :)

बाकी, हे राकलेट प्रकरण इथं भारतातही करता येऊ शकेल का? :?
कुणाला विचारावं बरं?

मनस्वी's picture

8 Dec 2008 - 6:45 pm | मनस्वी

एक्सलंट.. फंडू.. अप्रतिम.. सॉल्लिड.. मस्तच आहे राकलेट!
डान्याही तेल-पावडर लावून राकलेट खाण्यास सज्ज झालाय!

छोटा डॉन's picture

15 Dec 2008 - 10:36 pm | छोटा डॉन

आमचं नेहमीप्रमाणे वरातीमागुन घोडं, काय करणार त्याला पर्याय नाही.
खुप दिवस झाले मी प्रतिक्रीया टाकायचा विचार करत होतो पण ....
असो.

तर मंडळी "राकलेट" हे एकदम झक्कास प्रकरण आहे बरं का, एकदम तब्येतील निवांत बसुन आस्वाद घ्यावा असे. गडबड करत उरकण्याच्या प्रकॄतीसाठी हे नव्हेच अजिबात.
ह्याच्या तयारीलाच कमीत कमी एक दिवस जावा एवढा "सरंजाम" जमवावा लागतो असा निष्कर्ष मी ती टेबलावरची तयारी पाहुन काढला ( मी मात्र ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास उशीराने पोहचलो हा भाग वेगळा, म्हणुन आम्ही नेहमी वरातीमागुन घोडं म्हणतो. असो ).
जेवढ्या मिळतील तेवढ्या भाज्या, उकडलेल्या डाळी, तोंडी लावायचे पदार्थ, भरपुर सारे चीज + बटर ह्यापासुन ते आठवतील ते सगळे खाण्यायोग्य शाकाहारी / मासांहारी पदार्थ ह्यात वापरता येतील. त्या मशिनच्या उबेमुळे ह्या सर्व पदार्थांवर जो "खरपुस चीज" चा पापुद्रा बसला की "राकलेट" खाण्यास तयार झाल्याचे समजावे.
जीभेला मुबलक पाणी सुटलेल्या अवस्थेत आपण जेव्हा राकलेटचा पहिला घास उचलुन फुंकुन फुंकुन तोंडात टाकतो तेव्हा त्याच्या चवीने जी ब्रम्हानंदी टाळी लागते व तोंडातुन आपसुकच " व्वा ऽऽऽऽ , क्या बात है ! " अशी उत्स्फुर्त प्रतिक्रीया बाहेर पडली की बेत एकदम सेट्टलमध्ये जमला आहे ह्याची खात्री पटते.
शिवाय ह्याबरोबर काही तरी द्रव पदार्थ प्यायला घ्यावे असा प्रघात आहे पण "साधे पाणी" पिणे मात्र घोर अपराध आहे असे माझे मत आहे. मग त्याबरोबर वाईन, बीअर, तर्‍हेतर्‍हेचे फळांचे रस, आईस / लेमन टी असे काहीही चालते ( पण पाणी मात्र पिऊ नका ) ...

एक महत्वाची गोष्ट, ह्या राकलेट पार्टीला जमणारी मंडळी पट्टीची गप्पीष्ट असावीत असा एक संकेत आहे, कारण हा प्रॉग्रॅम साधारणता ३-४ तास चालनारा आहे. मग अशावेळी जर कोणी ह्यात " श्शु ऽऽऽ, शांततेच कोर्ट चालु आहे" हा प्रयोग केल्यास राकलेट पहिल्या प्रयोगालाच झोपेल. खुलत जाणार्‍या गप्पांबरोबर राकलेटची रंगत वाढत जाते. बरं, गप्पांनाही राकलेतच्या पदार्थांसारखेच "अनेकविध विषय" असणे आवश्यक आहे. मग ते गल्लीपासुन ते दिल्ली वॉशिंग्टनपर्यंत, अर्थकारणापासुन ते शिन्मापर्यंत किम्वा आपल्या सगळ्यांच्या आवडीचे असणारे आंतरजालावरील उखाळ्यापाखाळ्या उर्फ गजाल्या अशा गप्पांचा फड रंगला की मग पोट आणि मग कधी तॄप्त होते हे कळतसुद्धा नाही.

तर ह्य प्रकारे आमचा "राकलेट फड" जोरदार रंगला व माझ्या आयुष्यातील एक "अविस्मरणीय सेम्डॉफ" पार पडला.
कशा विसरतील ह्या आठवणी व त्या चवी ? छे, अशक्यच आहे हे. शिवाय विसरण्याची इच्छा आहे कुणाची ???

आपल्या गावाकडे ज्या "हुरडा पार्ट्या " रंगातात ना त्याचलाच हा प्रकार, फक्त पदार्थ वेगळे. मात्र थाट, सरंजाम, अंदाज, रंगत व सर्वात महत्वाचे म्हणजे लाभणारे मानसीक समाधान हे त्याच पातळीवरचे. हां, फक्त खाणारा मात्र चवीचा, पट्टीचा आणि खवय्या असावा ही अट दोन्हीकडेही सारखीच. मोजुनमापुन, उद्याची काळजी करत, रक्तदाब वजन कोलेस्तेरॉल अशा गोष्टी मोजत खाणार्‍यासाठी ह्या गोष्टी नव्हेतच.
असो. फार लांबड लागली .

>> डॉन, केसु आणि स्वातीताई तीघांच्याही चेहेर्‍यावर आनंद दिसतोय, कारणे कदाचित वेगवेगळी असू शकतील!
रंगाशेठ, त्या वेळी मात्र आनंदाचे कारण युनीक होते. राकलेतच्या चवीने लागलेली ब्रम्हानंदी टाळी ...!
बास, बाकी काय आपल्याला माहित नाही ....

>> चिझचा कुठलाही प्रकार सॉल्ल्ल्लीड लागतो. पण साले डॉक्टरलोकं तेच खाऊ नकोस सांगतात.
+१, सहमत आहे पेठकरकाका ...
त्या नतद्रष्ट डोक्टरांना एकदा बोलवाच राकलेट खायला,आपला ऍप्रन, स्टेथोस्कोप तात्पुरता टेबलाखाली लपवुन ही मंडळी राकलेट खायला बसतील जिभल्या चाटत.

>>आपला वाटेकरी जातोय ह्या आनंदात राकलेटच्या तयारीला हातभार लावताना केसु
छ्या ऽऽऽ, ह्याच्याशी मात्र असहमत ...!
ह्या ट्रीपमध्ये जी काही "धमाल , मज्जा " आली त्याचे जवळपास ४० % श्रेय केसुशेठ यांना जाते.
काय गप्पा रंगल्या होता विचारता, अगदी खल्लासच ...!

>>बाकी राहू दे, पण लवकरच ऑनसाईट जर्मनीमधे स्वातीताईकडे जाण्याची संधी मिळू दे!!!! आमेन!
असेच म्हणतो. आमेन ...!!!

>>आमचं वेडंबागडं गावाकडचं कोकरु एकदम धाडकन परदेशात जाऊन पडलं, पण तुम्हा लोकांमुळे कसं नीट सुखात राहिलं. किती मायेनं केलंस गं त्या डान्याचं! नवेनवे पदार्थ काय खाऊ घातलेस, कुठेकुठे फिरायला घेऊन गेलीस, आणि हा असा झक्कास सेंडऑफही केलास!!!!
अगदी शब्दशः सहमत रे धमाल्या, मी सुद्धा कधीकधी विचार करतो की जर ही लोकं नसती तर काय झालं असतं माझं जर्मनीत.
४ पोटार्थी लोकं जसं "(शब्दश : ) दिवस ढकलुन " येतात तसाच मी परत आलो असतो, पण ही मायेची माणसं भेटली आणि मला जणु दुसर्‍या घरातच राहिल्याचे सुख मिळाले.
जे काही ४ चांगले दिवस उपभोगायला मिळाले ते ह्याच मायेच्या माणसांमुळे ...
मी आता ह्याबद्दल स्वातीताई, दिनेशदादा, केसुशेठ, लिखाळभौ आणि शाल्मली वैनी ह्यांचे आभार मानणार नाही कारण "धन्यवाद" हा शब्दच फार "थीटा" आहे ह्या भावना व्यक्त करण्यासाठी. असाच लोभ राहुदेत ही इच्छा मात्र जरुर व्यक्त करतो ...

एवढे सगळे झाले ह्याचे प्रमुख कारण म्हणजे "मिसळपाव.कॉम" वरील वातावरण, त्यामुळेच हे ॠणानुबंध जुळाले, मिपाचे सुद्धा आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत.

बाकी माझ्या भारतातुन जाण्यापासुन ते तिकडे सेंडॉफ होऊन परत येण्यातल्या बहुसंख्य प्रसंगाचे साक्षीदार राहणार्‍या व नेहमीच उत्कट प्रेमाचा वर्षाव करणार्‍या "समस्त मिपाकरांचे" आभार ...!

लेखापेक्षा माझी प्रतिक्रीयाच मोठ्ठी होत चालल्याने नाईलाजाने इथे थांबतो, बाकी सगळे "एक फर्मास लेख" लिहुनच, नक्की ...!
आमेन ..!!!!

छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना ,

लिखाळ's picture

15 Dec 2008 - 10:56 pm | लिखाळ

मस्त प्रतिसाद रे !
स्वातीताई आणि दिनेशदादा यांच्या उत्साहाला आणि स्नेहाला सीमा नाही.
आम्ही दोघेसुद्धा फ्राफुच्या भेटीनंतर असेच भारवलो आहोत.
-- लिखाळ.

शाल्मली's picture

15 Dec 2008 - 11:08 pm | शाल्मली

स्वातीताई आणि दिनेशदादा यांच्या उत्साहाला आणि स्नेहाला सीमा नाही.
आम्ही दोघेसुद्धा फ्राफुच्या भेटीनंतर असेच भारवलो आहोत.

अगदी अगदी असेच म्हणते. १००% सहमत. स्वाती ताई आणि दिनेश दादा दोघंही खूपच अगत्यशील आहेत.
डॉन्याचा प्रतिसादही एकदम मनापासून आलेला.. आवडला.
डॉन्या- परत ये रे जर्मनी दौर्‍यावर.. आम्ही वाट बघत आहोत..:)
--शाल्मली.

छोटा डॉन's picture

15 Dec 2008 - 11:15 pm | छोटा डॉन

>> स्वाती ताई आणि दिनेश दादा दोघंही खूपच अगत्यशील आहेत.
प्रश्नच नाही ...!
नशिबाने अशी माणसे भेटतात गं, नाहीतर आपण पाहतोच की आजच्या जगात माणुस किती रिझर्व्ह्ड झाला आहे ते .. :)

>>डॉन्या- परत ये रे जर्मनी दौर्‍यावर.. आम्ही वाट बघत आहोत..
परत एकदा आमेन ...!
प्लानिंग नुसार परत "एप्रिलमध्ये" येण्याचा मानस आहे.
संधी मिळाली तर एका पायावर येईन ( विमानामध्ये बसुन ) ... :)

छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना ,

स्वातीताई आणि दिनेशदादा यांच्या उत्साहाला आणि स्नेहाला सीमा नाही.

+१

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Dec 2010 - 12:59 am | निनाद मुक्काम प...

तडक सासू ला फोन केला म्हटले मला राकलेत पार्टी हवी .तेव्हा कधी येता आहात ? नाताळ का नवीन वर्षाला ?(तिच्या बोलण्यातली खोच कळली )आम्ही हॉटेल वाली मंडळी ह्या टायमाला सुट्टी नाही (
बाकी फोटो झकास व वर्णन मुद्देसूद (ते काही आपल्याला जमत नाही )
लोकल बियर शक्यतो जोडीला हवी .असे माझे मत झाले .कारण जर्मनीत प्रत्येक स्थानिक भागाची एक बियर असते .त्याची वेगळीच एक चव असते .( भूमिपुत्रांना त्याबद्दल प्रखर अभिमान असतो )
माझी बायको हा सरंजाम पाहून बेहद खुश .कारण त्यांचे गाव सुध्धा फ्रेंच हद्दीपासून २ तासावर आहे .

आंसमा शख्स's picture

14 Dec 2010 - 9:53 am | आंसमा शख्स

भारी दिसते आहे. राकलेट करून पाह्तो आता. पण आमही शेगडीवरच भाजतो राखेत. खमंग बनते जास्त.