मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डॉन्याचा सेंडॉफ आणि राकलेट!

स्वाती दिनेश · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
डॉन्याचा फोन आला की त्याचे ५ डिसेंबरला भारतात जायचे नक्की झाले आहे. लगेचच आमचा त्याला जर्मनीच्या चांगल्या आठवणी राहतील असा सेंड ऑफ द्यायचा विचार सुरु झाला आणि 'ती ' बातमी येऊन धडकली. भारतालाच नाही तर जगाला हादरवणारी,सुन्न करणारी.. कोणाचेच चित्त थार्‍यावर नव्हते पण डॉन्याही आम्हाला आता परत कधी भेटेल माहित नव्हते, शेवटी आम्ही २,केसु आणि डॉन्या असे एकत्र जमायचे ठरले. जेवायचा बेत काय करावा? विचार करत होते पण गोडाधोडाचं तर खाण्याची कोणाची मनःस्थितीच नव्हती. त्यात इथे हिमवर्षा आणि कडाक्याची थंडी असल्याने साहजिकच 'राकलेट' करायची कल्पना डोक्यात आली. नोव्हेंबरमध्ये पारा शून्याकडे झेपावलेलाच असतो.ढगाळ,करड्या दिवसात सूर्यदर्शन दुर्मिळ तर होतेच पण सूर्यदेवांची पार्टटाइम ड्यूटी सुरू होते. आठसाडेआठाशिवाय उजाडत नाही आणि चारच्या सुमारालाच गुडूप काळोख! आपल्याकडे जुलैमध्ये कच्च काळ्या ढगांनी आकाश झाकोळते तेव्हा असणारा उजेड जेवढा असतो तेवढाच उजेड जवळजवळ हिवाळाभर.. सृष्टीचा शिशिरातला रंगीत पोषाख केव्हाच उतरलेला असतो.सगळीकडे फक्त करडी उदासी असते.थंडीच्या बंड्या,कोट,टोप्या,हातमोजे बासनातून बाहेर काढून बोचरे वारे ,बर्फाळ पाऊस आणि गोठवणार्‍या थंडीला तोंड द्यायला सारे सज्ज होतात.अशातच नाताळची चाहूल लागते. नाताळच्या आधीचे चार रविवार म्हणजे चार आडव्हेंट! पहिल्या आडव्हेंटपासूनच दीपमाळांनी घरे झगमगू लागतात. शहराशहरातल्या मुख्य चौकांतून नाताळबाजार भरायला सुरुवात होते. नाताळसजावटीचे सामान,ग्लुवाइन,ऍपलवाइन,वुर्ष्ट (सॉसेजेस) बरोबरच राकलेटचेही स्टॉल्स सजू लागतात.मित्रमंडळींच्या,नातेवाईकांच्या नाताळ मेजवान्या घराघरातून, कचेर्‍याकचेर्‍यातून सुरु होतात. आमच्या कॉलनीतल्या काळेबाईंनी (ह्या फ्राऊ श्वार्झ. आम्ही त्यांना आपसात काळेबाई म्हणतो. कारण श्वार्झ= काळा..)तर काळेबाईंनी एकदा नाताळमेजवानीसाठी आम्ही दोघं आणि आजीआजोबांना राकलेटपार्टीचे आमंत्रण दिले.तोपर्यंत हा राकलेट काय प्रकार आहे ते आम्हाला माहित नव्हते.पण आम्ही चीज खातो ना? हा प्रश्न फोनवर विचारल्यापासून ही चीजशी संबधित चीज काय आहे ते पहायला आणि चाखायला आम्ही उत्सुक होतो. जर्मनी,स्वीस आणि फ्रान्सच्या बॉर्डरवरचा हा खास पदार्थ,ज्याला थोडक्यात इन- होम बार्बेक्यू म्हणता येईल. फ्रेंच लोकं 'राकलें.. ' म्हणतात. 'ले ' चा उच्चार किंचित नाकात आणि थोडा झोका देऊन तर जर्मन आणि स्वीस 'राकलेट' असे स्पष्ट म्हणतात. ह्याकरताची पेश्शल स्वीस आणि फ्रेंच राकलेट चीजं अप्रतिम असतात. काळेबाईंच्या घरी पोहोचेपर्यंत आजीने ज्ञानदान केलेले असते. व्हाईटवाईन बरोबर राकलेट फार छान लागते,पण जर्मन बिअर आणि राकलेट सुध्दा टॉप बरं का! आकिम आजोबा सांगतात. कुतुहल मग साहजिकच शिगेला पोहोचते आणि अगदी दोनच मिनिटात आम्ही मग काळेबाईच्या घरी पोहोचतो. 'राकलेट मशिन' म्हणजे काय? तर अंडाकृती स्टीलच्या पत्र्याची टेफलॉनकोटेड प्लेट असते आणि कॉइलवर ती ठेवलेली असते. कॉइल आणि प्लेटच्या पोकळीत लहान खण केलेले असतात आणि त्या प्रत्येक खणात एक (अशी ६ किवा ८ )लहानसे टेफलॉन कोटेड पॅन असते,अगदी पानासारखे आणि अगदी भातुकलीतच शोभतील असे लहान लाकडी कालथे!
राकलेट चीजं, उकडलेले बटाटे आणि जोडीला उकडलेली अंडी, रंगीत सिमला मिरच्या, वाफवलेला फ्लॉवर, मके,व्हाइटबिन्स,मशरुम्स,राजमा.. (ही यादी आपल्या आवडीप्रमाणे आणि कल्पनेप्रमाणे हवी तशी वाढवता येते. व्हिनेगारमधले कांदे,सलामी,सॉसेजेस,सीफूड..)तर अशी सगळी जय्यत पण कच्चीच तयारी पाहून आता हे खायचे कसे? हा प्रश्न पडला होताच. कारण राकलेटच्या स्टॉलवर चीज आगीवर मेल्ट होऊ देतात आणि ते उकडलेले बटाटे,वुर्ष्ट + पावावर ओततात आणि खायला देतात ते पाहिले होते पण इथे तर काही वेगळेच दिसत होते. " स्टॉलवर जे राकलेट मिळते ना ती पारंपरिक पध्दत. पूर्वी वालिसच्या (स्वीस मधील एक राज्य) डोंगरात,माळरानावर गुराखी कँपफायर करुन त्यावर चीज मेल्ट करुन त्या आगीतच बटाटे,सॉसेजेस इ. भाजून पावाबरोबर खात असत. तो रुचकर प्रकार जेव्हा इतरांनी चाखला तेव्हा इतका पसंत पडला की डोंगरातून राकलेट घराघरात आले. स्वीस, जर्मनी व फ्रान्सच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीच्या दिवसांत ते आवडीने खाल्ले जाऊ लागले. त्यातूनच आले मग वीजेवरचे हे राकलेट मशिन. आणि आता तर इंग्लडातही राकलेट पोहोचले आहे." इति काळेबाई, आमच्या मनातला गोंधळ काळेबाईंनी ओळखलेला असतो. मग काळेबाई आणि आजीआजोबांनी आम्हाला राकलेटचे प्रात्यक्षिक दाखवले.
एका पॅनमध्ये ह्या पदार्थातील हवे ते उदा. मके,ऑलिव्हज इ. घालायचे,त्यावर उकडलेल्या बटाट्यांचे काप ठेवायचे. मग चीजची दुलई पांघरुन पॅन मशीनमध्ये ठेवायचे.पाहिले राकलेट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत धीर धरवत नाहीच पण मग ऑलिव्हज,सॅलड खात आणि पुढच्या राकलेटची तयारी ताटलीत करायची. बटाटे सोलून,कापून ठेवायचे,बाकीचे हवे असलेले पदार्थ आपल्या प्लेटमध्ये जमवून ठेवायचे आणि एकीकडे गप्पा तर असतातच. तोपर्यंत राकलेटला मस्त गोल्डन ब्राऊन रंग आलेला असतो आणि खरपूस वासाने भूकही खवळलेली असते. लाकडी कालथ्याने ते आपल्या प्लेटमध्ये काढून घायचे .. अम्म.. वाफा येत असतात,तोंड पोळेल ना एवढे गरम खाल्ले तर.. दुसरे राकलेट तयार करुन मशिनला लावायचे आणि मग डिशमधल्या राकलेट मध्ये मीठ,मिरपूड इ. घालून ताव मारायचा.. तोपर्यंत पुढचे होतेच तयार.. असे गप्पागोष्टी करत,आस्वाद घेत गोठवणार्‍या थंडीत हे वाफाळते राकलेट मजा आणते.
घरातले सगळे किवा मित्रमंडळी एकत्र जमून ही राकलेट पार्टी करायला खूप मजा येते. ही कल्पनाच आम्हाला एवढी आवडली की दुसर्‍याच दिवशी आम्ही बाजारातून राकलेट मशिन आणले. तेव्हापासून थंडीच्या दिवसात आमच्याकडे येणार्‍या पाहुण्यांसाठी राकलेट पार्टी असतेच असते. अर्थात मीठ,मिरपूडीच्या जोडीला अस्सल व्हराडी ठेचा, तिखट ,चाटमसाला इ. पदार्थ आमच्या राकलेटमध्ये देशी रंग भरतात. डॉन्या,केसु आणि राकलेटची क्षणचित्रे :
आपला वाटेकरी जातोय ह्या आनंदात राकलेटच्या तयारीला हातभार लावताना केसु
डॉन्याच्या प्रतिक्षेत राकलेट मशीन
नमः पार्वतीपतये हर हर महादेव!!!

वाचन 16632 प्रतिक्रिया 0