पाणी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
19 Oct 2014 - 10:05 am

सदर लेख प्रहार वृत्तपत्रात प्रकाशित झालेला असून त्याचा दुवा हा: http://prahaar.in/collag/257578

काही दिवसांपूर्वी एका ट्रेकला गेलो होतो. डोंगरदऱ्यांतून फिरण्याची मजा जितकी वेगळी असते, तितकीच वेगळी असते ती म्हणजे अशा भटकंतीतून होत जाणारी स्वत:ची आणि जगाची ओळख. आपल्या ‘कंफर्ट झोन’मधून बाहेर गेल्यावर, गावातून खेडय़ांतून प्रवास केल्यावर तिथलं जीवन समोर येतं, तेव्हा कळतं की प्रत्येक गोष्टीला किती किंमत आहे आणि महत्त्व आहे.

ट्रेक करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे कुठली असावी, तर ती म्हणजे ‘पाणी’. दम लागल्यावर, क्षणभर विसाव्यासाठी थांबल्यावर दोन घोट जरी घशात गेले तरी स्वर्गसुख आणि विलक्षण तजेला देतात. त्याची सर कुठल्याही एनर्जी ड्रिंकला नाही. असाच एक सुंदर, रोमांचक ट्रेक करून आम्ही पायथ्याच्या गावात परतलो होतो. तहान लागलेली होती, पाणी संपलं होतं. तेव्हा कुठे पाण्याची सोय होते का असं बघत चालत होतो आणि गावातल्या मुख्य रस्त्यालगतच एका झाडाच्या सावलीत एक हातपंप दिसला. जमिनीतून आलेल्या त्या थंडगार पाण्याची चव बाकी कशालाच नाही म्हणत आम्ही पुढे सरसावलो.

तिथे आगोदरच एक मुलगी पाणी भरत होती. शाळेत जाणारी, शाळेच्या गणवेशात असलेली ती मुलगी दप्तरात घेऊन जाण्यासाठी पाणी भरत होती. आम्ही तिथे उभे होतो. पंपाला चार-पाच हिसके दिल्यावर त्यातून पाणी येऊ लागलं. त्या मुलीने तिच्याकडच्या रिकाम्या बाटलीत पाणी भरलं, बाटली पूर्ण भरताच लगेच बाटलीच्या झाकणातही पाणी भरून घेतलं आणि ते झाकण अलगद बाटलीला लावलं आणि हातपंपातून शेवटचा थेंब पडेपर्यंत त्याखाली ओंजळ धरून ती पडणारं पाणी प्यायली. आणि मग ओले हात चेह-याला पुसून तिच्या वाटेने चालू लागली.

सुरुवातीला ते बघून फार गंमत वाटली. पण नंतर विचार केला तेव्हा त्या लहानग्या मुलीच्या या कृतीमागे किती मोठा विचार होता ते कळलं. ती शाळेत चालत जाणार असेल, उन्हात चालताना तिला तहान लागेल, शाळेत कदाचित पाण्याची सोय नसेल, शाळा सुटल्यावर पुन्हा चालत यायचं असेल, इतकं सगळं लक्षात घेऊन तिने त्या झाकणातलीही जागा न सोडता शब्दश: काठोकाठ बाटली भरून घेतली. शिवाय तिने शेवटच्या थेंबापर्यंत पडणारं पाणी वाया जाऊ दिलं नाही. इतकंच नव्हे तर हातांचा ओलावाही तिने हात, चेह-याला लावून सत्कारणी लावला.

a

गावा-खेडय़ातल्या लोकांना पाण्याची खरी किंमत असते. आपण शहरात राहतो, शहरात पाण्याचे नळही हजारो रुपयांच्या किमतीला मिळतात. त्या नळातून सतत पाणी येत असल्याने त्या पाण्याची आपल्याला किंमत नसते. एखाद दिवस पाणी आलं नाही की मात्र आपल्या तोंडचं पाणी पळतं. आपण त्यावरही उपाय काढतो. आपल्याकडे पैसे असतात, आपण टँकर मागवतो. आहे काय नाही काय! पण ‘पाणी जपून वापरावं, वाया घालवू नये’ हा त्या लहान मुलीकडे असलेला मोठा विचार मात्र आपण आपल्या आचरणात कधीच आणत नाही. कारण ते आपल्याला सहज मिळतंय, त्यासाठी वणवण करावी लागत नाहीये.

पाणी काय, वीज काय, किंवा इतर कुठली गोष्ट असेल. मिळत जाते तोपर्यंत आपण उपभोगत जातो; वाचवायचं, पुरवून वापरायचं बघत नाही आणि जेव्हा मिळत नाही तेव्हा थयथयाट करतो; जणू ती गोष्ट म्हणजे आपला हक्क आहे आणि तो आपल्याला मिळत नाही. त्या मुलीचं मनोमन कौतुक वाटत होतं, तिच्या विचारांचं कौतुक वाटत होतं. तेव्हा जाणवलं की, ही गावातली मंडळी त्या पाण्याच्या थेंबासारखी निर्मळ, नितळ असतात, शहरातले आपण त्या नळासारखे; सूट मिळाली की सांडणारे.

समाजजीवनमानविचारलेखअनुभव

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Oct 2014 - 10:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडेश :)

खटपट्या's picture

19 Oct 2014 - 10:39 am | खटपट्या

खूप छान लेख !!!

स्पार्टाकस's picture

19 Oct 2014 - 11:16 am | स्पार्टाकस

खूप छान!

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Oct 2014 - 11:47 am | माम्लेदारचा पन्खा

पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन ५-१० किलोमीटर चालणार्या बायका माणसे पाहिल्यानंतर सुद्धा जर आत काळजात कुठे काही कालवाकालव होत नसेल आणि तरीही पाणी वाचवावेसे वाटत नसेल तर खुशाल समजावे की आपण मनाने केव्हाच वारलो आहोत !

एस's picture

22 Oct 2014 - 12:21 pm | एस

एकेकाळी असे पाणी वाहिलेल्यांपैकी एक...

मधुरा देशपांडे's picture

19 Oct 2014 - 3:16 pm | मधुरा देशपांडे

लेखातील भावनांशी सहमत. पाण्याचा दुष्काळ अनेक वर्ष अतिशय जवळून अनुभवला असल्याने अधिकच रीलेट करु शकते. फक्त जिथे पाणी सहज उपलब्ध आहे त्या गावांमध्येही अपव्यय करणारे लोक आहेत. फक्त शहरातल्याच लोकांना किंमत नाही असं नाही वाटत. फुकटात किंवा कमी कष्टात पाणी, वीज मिळाले की असे जास्त घडते.

प्रभाकर पेठकर's picture

19 Oct 2014 - 3:34 pm | प्रभाकर पेठकर

ही गावातली मंडळी त्या पाण्याच्या थेंबासारखी निर्मळ, नितळ असतात, शहरातले आपण त्या नळासारखे; सूट मिळाली की सांडणारे.

ह्या विधानातील सरसकटीकरणाकडे दुर्लक्ष करून माझे विचार मांडतो.
माझे बालपण मुंबईत गेलं. माझं राहतं गाव दहिसर, मुंबईत असूनही खेडेगावंच होतं. रस्ते कच्चे होते. पाण्याचे दुर्भिक्ष होते. नळ नव्हते. विहिरी आणि नदी हे दोनच स्रोत पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध होते. उन्हाळ्यात विहिरीचं पाणी मचूळ (खारट) व्हायचं. नदी कोरडी असायची. पण, नदीत दोनफुट खोल खड्डा खणला तर जरा ओली जमीन, झरे मिळायचे. ते पाणी गोडं असायचं. घरून एक बादली आणि एक वाटी घेऊन जायचं आणि खणलेल्या खड्यात साठणारं पाणी वाटीवाटीने बरोबरच्या बादलीत भरून घरी आणायचं हा उद्योग मी स्वतः केला आहे. दुसरे, एरीयावाईज, पाण्याच्या लोखंडी टाक्या असायच्या. त्यात सरकारी टॅंकर मधून दिवसा एकदा (दुपारी ४ वाजता) पाणी भरले जायचे आणि त्या असलेल्या नळासमोर रांग लावून पाणी, हंडे-कळशा भरून आपल्या घरी न्यायचे हा उद्योगही मी आणि माझ्या मोठ्या बहिणीने केला आहे. त्या टाकीत पाणी नसलं कि लपाछपी खेळताना लपायला त्या टाकीचा आम्ही उपयोग करायचो. ८ फूट उंच आणि जवळजवळ २० फूट लांब टाकीला वर एक झाकण असायचे आत उतरायला आणि बाहेर यायला एक लोखंडी शिडी होती. ती व्यवस्था टाकी धुण्यासाठी होती पण ती कधी धुतली गेल्याची पाहिली नाही. उन्हाळा आणि लोखंडाची टाकी. त्यामुळे आंत फार गरम आणि आर्द्रतापूर्ण (ह्यूमिड) वातावरण असायचं. शिवाय लोखंड गंजल्याचा वासही भरपूर असायचा.
ह्याहून वाईट दिवस म्हणजे अशा टाक्यांची सोय दहिसरात झाली नव्हती तेंव्हा (५०च्या दशकात) प्यायचे पाणी बोरिवलीहून (५-६ कि.मी.) आणावे लागायचे. माझे वडील हातात दोन बादल्या घेऊन चालत बोरिवलीला जायचे आणि दोन्ही बादल्या भरून रेल्वे रुळांमधून चालत, पाण्याने भरलेल्या बादल्या, घेऊन यायचे.
विहिर आणि नदीवरून पाणी आणण्याचा अनुभव आणि वडीलांनी बोरिवलीहून बादल्याभरून पाणी आणलेल्या बालपणी ऐकलेल्या कथा ह्यामुळे मुंबईसारख्या शहरात राहूनही पाण्याचे महत्व लहानपणापासून जाणलेले आहे.
अकरावी एस.एस.स्सी. पर्यंत घरात वीज नसल्याने रॉकेलच्या कंदिलाला (डोळ्यांवर प्रकाश पडू नये म्हणून) जुने पोस्ट कार्ड लावून अभ्यास केला आहे. त्यामुळे वीजेचेही महत्व जाणून आहे. सर्वजणं स्वयंपाकघरात जेवायला बसले असताना बाहेरच्या खोलीत कंदील 'ढणाढणा' जळत ठेवणं (हा खास शब्द आमच्या वडिलांचा, कायम कानावर पडायचा) वडिलांना आवडायचं नाही. त्यामुळे रॉकेलची बचत करायला, ज्या खोलीत कोणी नाही त्या, खोलीतला दिवा अत्यंत बारीक करून ठेवायचा आणि गरज पडेल तेंव्हाच आणि तेव्हढाच मोठा करायचा हा आमच्या घरचा 'कायदा' होता.

बाकी, आयुष्य मुंबईत गेल्यामुळे, धाग्यावरील धो धो वाहणारा, स्टेनलेस स्टीलचा, नळ पाहून अक्षरशः भडभडून आले.

बोका-ए-आझम's picture

19 Oct 2014 - 3:37 pm | बोका-ए-आझम

सुंदर लेख.

रेवती's picture

20 Oct 2014 - 4:38 am | रेवती

लेख आवडला.

वेल्लाभट's picture

20 Oct 2014 - 10:28 am | वेल्लाभट

जॅक्स्पॅरो, खटपट्या, स्पार्टाकस, पंखा, मधुरा, बोका, रेवती,..... धन्यवाद !

पाषाणभेद's picture

20 Oct 2014 - 10:33 am | पाषाणभेद

पाण्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला (आपल्याला म्हणजे आपल्या समाजाला; एका विस्तृत अर्थाने) खरे म्हणजे कधी समजलेच नाही. आहे ते पाणी भडाभडा सांडायचे अन नसले तर बोंबा मारायच्या.
खेडेगावी उन्हाळ्यात तर पाण्याची भिषण परिस्थिती होते. सालोसाल हे चालू आहे. पण त्यात काही सुधारणा म्हणून नाही.

विम्झ's picture

20 Oct 2014 - 2:40 pm | विम्झ

सुंदर लेख.
या वर्षी गणेशोत्सवात आमच्या मंडळाने सुद्धा या विषयावरील देखावा सादर केला होता.
हि त्याची लिंक :http://www.youtube.com/watch?v=dGSj5ptQ1sM

कवितानागेश's picture

21 Oct 2014 - 3:25 pm | कवितानागेश

उत्तम लेख.

मदनबाण's picture

21 Oct 2014 - 3:40 pm | मदनबाण

लेख आवडला !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

वेल्लाभट's picture

21 Oct 2014 - 4:54 pm | वेल्लाभट

आभार! विम्झ, पाषाणभेद, मदनबाण व लीमाउजेट

आदिजोशी's picture

21 Oct 2014 - 8:35 pm | आदिजोशी

पण आम्ही नळ सुरू केला की आमच्या घरी पाणी येतं ही आमची चूक आहे का?

गावातली मंडळी त्या पाण्याच्या थेंबासारखी निर्मळ, नितळ असतात, शहरातले आपण त्या नळासारखे; सूट मिळाली की सांडणारे
हे उगाच लिहिलेले टाळ्याखाऊ वाक्य आहे. पाणी वाचवणं (ते सुद्धा नाईलाजातून) हा निर्मळ, नितळ असण्याचा पुरावा कसा काय असू शकतो?
लुळी पांगळी श्रीमंती - धट्टी कट्टी गरिबी हे जनरलायझेशन आता रटाळ झाले आहे.

आपल्याकडे एक दिवसाआड पाणी आले की बोंबाबोंब होते, वृत्तपत्राचे रकाने भरले जातात पण ग्रामीण भागात कायम ४-५ दिवसाआड पाणी येते. उन्हाळ्यात तर १० दिवसाआड पाणी आले होते या वेळी. हे मी कुठे वाचून नाही लिहिले आहे, माझे नातेवाईक आहेत तिथे म्हणून जवळून पाहिले आहे.
<strong>पाणी का वाचवायचे याचे महत्व कळत नाही हीच खरी शोकांतिका आहे.</strong> :(

वेल्लाभट's picture

22 Oct 2014 - 4:09 pm | वेल्लाभट

माझं वाक्य टाळ्याखाऊ असण्याचं काहीच कारण नाही. तुम्हाला तसं वाटण्यात, त्याचा अर्थ तुम्हाला न कळल्याचं उघड होत आहे.

तुमच्याकडे पाणी येतं ही तुमची चूक नसून ते येतं त्यामुळे उगाच जपून वापरायची काय गरज आहे? हे तुम्हाला वाटावं ही तुमची चूक आहे. अनेकदा अशीही लोकं भेटतात, ज्यांना 'आमच्याकडे सोसायटी टँकर बोलावते रोज. कद्धी कद्धी म्हणून पाणी नाही असं होत नाही' हे सांगतानाही खूप प्राउड वगरे वाटतं.

असो मुद्दा तो नाही. पाण्याची निर्मळ चव आणि त्याची किंमत जाणून ते वाचवण्याचा असलेला निर्मळ विचार आणि त्या विरुद्ध म्हणजे नळ सोडला की वाहणारं भसभस पाणी आणि मिळतंय म्हणून वाया जाऊ देण्याचा स्वभाव यांचा संबंध जोडण्याचा उद्देश त्या वाक्यात आहे. तुम्हाला तो पोचला नसल्यास माझा नाईलाज आहे.

तुमचा अभिषेक's picture

26 Oct 2014 - 9:46 pm | तुमचा अभिषेक

छान लेख, आवडला.
आज चोवीस तास पाणी असले तरी एकेकाळच्या अनुभवांवरून पाण्याची किंमत माहीत आहे. त्यामुळे साध्या साध्या गोष्टी पाळल्या जातात.

स्पंदना's picture

27 Oct 2014 - 5:36 am | स्पंदना

माझ्याकडे गरम पाण्याची सोय आहे. पण जेंव्हा आम्ही कोणीही शॉवर सुरु करतो, तेंव्हा लगेच गरम पाणी येत नाही. मग मी त्या शॉवरखाली बकेट ठेवुन गरम पाणी यायची वाट पहाते. साठलेलं पाणी एकतर बागेत किंवा वॉशेंग मशीनमध्ये वापरल जातं. बेसीनवर सुद्धा गरम पाणी याय्च्या आधी छोट्या जारमध्ये पाणी भरत, ते पाणी मी बकेटमध्ये साठवते. दिवसभरात एक ५० लिटर पाणी सहज जमत त्या बकेटमध्ये. साठवायला लागल्यावर कळल हे, तोवर नाही.

चांगला लेख होता पण शेवटचे वाक्य अगदीच कैच्या कै!

गावातली मंडळी त्या पाण्याच्या थेंबासारखी निर्मळ, नितळ असतात, शहरातले आपण त्या नळासारखे; सूट मिळाली की सांडणारे.

'सूट मिळाली' की सांडणारे हे फक्त शहरातच असतात हे काही खरं नाही. खेडेगावातील लोकांनाही या निकषावर तपासून बघा.

उदा. शहरातल्या माणसाचं आयुष्य घड्याळाला बांधलेलं असतं. तिथे त्याला सुट मिळत नाही. आता खेडेगावात येऊन बघा..सांगा किती लोक असे बांधल्यासारखे काम करत असतात. म्हणजे बारा महिने हां. फक्त पावसाळा आणि सुगीचे दिवस नाही. मग सूट मिळाली की फक्त शहरातलेच लोक सांडतात असं नाही, खेड्यातील लोकही सांडतात असं झालं.

सुट मिळाली की हेळसांड करणे हा मनुष्यविशेष आहे. त्यात शहरी, निमशहरी, खेडवळ असा काही फरक असू शकत नाही.