पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०४ : आफ्रिकेतल्या सफरी आणि आफ्रिकेबाहेरचे पहिले पाऊल (२ लाख ते १३५,००० वर्षांपूर्वी)

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
20 Jul 2013 - 12:53 am

=====================================================================

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...

=====================================================================

...आपल्या मार्गदर्शकांचा इतका पूर्वपरिचय झाल्यावर आता त्यांच्या विश्वासार्हतेची खात्री पटायला हरकत नाही. त्यामुळे यापुढे प्रवासात जी काही आश्चर्यकारक माहिती मिळणार आहे तिची मजा नि:शंकपणे घेणेही सुकर होईल. तर कसा कंबर आणि पुढच्या भागापासून अनेक सहस्र किमी चा आणि २ लाख वर्षांच्या मुदतीचा प्रवास करायला तयार व्हा !

जनुकशास्त्राने मानवाच्या उत्क्रांतीमधील अनेक जुन्या वंशवादी थियर्‍या केराच्या टोपलीत भिरकावून दिल्या आणि मानवाची उत्पत्ती २ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेमध्ये झाली असा सिद्धांत तर मांडला. पण जोपर्यंत त्याला त्या काळातल्या प्राचीन मानवी अवशेषाची साथ मिळत नव्हती तोपर्यंत सिद्धांत पूर्णपणे सिद्ध होऊन शास्त्रीय सत्य म्हणणे कठीण जात होते. विशेषतः अगोदरच प्रस्थापित झालेल्या काही सिद्धान्ताचे पुरस्कर्ते तरी ते मानणे कठीण होते. गंमत म्हणजे आफ्रिकेत उत्क्रांत होऊन आधुनिक मानवाच्या १०-१५ लाख वर्षे अगोदर जगभर पसरणार्‍या आदिमानवांचे अवशेष सापडत होते पण आधुनिक मानवाचे १ लाख वर्षांअगोदरचे शास्त्रीय कसोट्यांवर खात्रीलायकपणे खरे उतरणारे अवशेष मिळत नव्हते.

ही समस्या दूर केली इथिओपियातील ओमो किबिश नावाच्या ठिकाणावर मिळालेल्या आधुनिक मानवी अवशेषांनी. त्यांचे वय २ लाख वर्षे ठरवले गेले. नंतर इथिओपियामध्येच हेर्टो नावाच्या खेड्यात सापडलेल्या तीन मानवी कवट्यांच्या जीवाश्मांनी. Potassium-argon रेडिओ-डेटिंग पद्धतीने या जीवाश्माचे वय १५४,००० ते १६०,००० वर्षे ठरविले. हे सगळे आधुनिक मानवाचे सर्वात प्राचीन अवशेष. त्यामुळे त्यांना खास Homo sapiens idaltu ह्या सबस्पिसिजचा मान दिला गेला. यातले idaltu म्हणजे मराठीत "थोरले" ! नंतर त्यांच्या शेजारीच सन १९९७ मध्ये एका पाणघोड्याच्या कवटीचा जीवाश्म गोळा करताना एकूण दहा मानवी कवट्यांचे अवशेष, दगडी हत्यारे आणि काही प्राण्याचे अवशेष सापडले. शात्रज्ञांच्या दृष्टीने हे एक भांडारच होते. त्यातल्या एका मुलाच्या कवटीचे शेकडो चौरस मीटरवर विखुरलेले २०० पेक्षा जास्त भाग शास्त्रज्ञांनी परिश्रमाने गोळा केले आणि ते जोडून त्या कवटीची जुळवणी केली. जुळवणीनंतर असे दिसून आले की ती कवटी मुलाच्या मृत्यूनंतर साफ करून तिच्या तुटलेल्या कडा घासून गुळगुळीत बनवल्या होत्या आणि बहुतेक ती कोणत्यातरी समारंभात (worshipping ritual) वापरले जाणारे उपकरण असावे असे दिसत होते. यावरून या ठिकाणी आणि वेळेस माणूस केवळ अस्तित्वात नव्हता तर मानवी संस्कृती स्थापन होण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचे स्पष्ट होत होते. या सगळ्या पुराव्यांनी जनुकीय शास्त्राने मांडलेल्या सिद्धांतांना अवशेषांचे सबळ पुरावे मिळून त्यांचा निर्विवाद विश्वासूपणा सिद्ध झाला. मग मात्र विरोधकांनाही माघार घेऊन आपल्या संशोधनात जनुकशास्त्राचे आधुनिक हत्यार सामील करणे भागच पडले. यामुळे सर्व संशोधनात एकसूत्रीपणा आला आणि येथून पुढे जनुकशास्त्राला मानवी इतिहासाच्या संशोधनात अग्रगण्य स्थान मिळाले.

आवांतरः मानवी जीनोमवर चाललेल्या संशोधनाने भविष्यात शक्य असलेल्या अनेक शतकोटी डॉलर्सच्या फायद्यावर डोळा ठेवून औषधे बनवणार्‍या अनेक महाकंपन्याही हिरीरीने या संशोधनात उतरल्या आहेत. अर्थात यात जगावेगळे अथवा बेकायदेशीर असे काही नाही. अशा संशोधनाचा फक्त मानवाचा इतिहास माहिती करुन घेण्यापलीकडे सध्याचे मानवी जीवन सुधारण्यासाठीही उपयोग व्हावा ही इच्छाही त्यामागे आहेच. मात्र सुरुवातीला त्यातील काही कंपन्यांनी मानवी जीनोम (किंवा त्याचा भाग) पेटंट करण्याचा प्रयत्न केला. याला शह म्हणून या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या अनेक Not-for-Profit संस्थांनी स्वतःचे संशोधन public platforms वर आणि जालावर सर्वांसाठी विनामूल्य खुले करण्यास सुरुवात केली. काही बाबतीत कायद्याचे निर्णयही Not-for-Profit वाल्यांच्या बाजूने लागले आहेत त्यामुळे आता पूर्णपणे माहीत झालेल्या मानवी जीनोमच्या रचनेवर सर्व मानवजातीचा हक्क आहे. फक्त काही खास शोधपद्धती आणि जनुकिय रोगावरच्या उपचारपद्धतीचे पेटंट घेता येते.

आता येथून पुढे हा आधुनिक मानव कुठे कुठे गेला याचा शोध जास्त जोमाने सुरू झाला. पण आपल्या मूळ जागेपासून जवळ जवळ ४०,००० वर्षे तो आपली जागा सोडून जाण्याच्या फंदात पडलेला दिसत नाही. त्याचे मुख्य कारण त्या काळी झालेला हिमयुगाचा कहर हे असावे... या काळाचे "मदर ऑफ आईस एजेस" असे केले जाते. त्याने मानवाला पूर्व आफ्रिकेत केवळ खिळवून ठेवले एवढेच नव्हे तर अनेक जणांचा बळी घेतल्याने आधीच मोजकी असलेली Homo sapiens sapiens ची संख्या १०,००० पर्यंत खाली आली होती. थोडक्यात आधुनिक मानव जवळ जवळ निर्वंशतेपर्यंत (near-extinction event) पोहोचला होता आणि कसाबसा तगून होता.

मात्र १६०,००० वर्षांपूर्वी हवामानात थोडी सुधारणा होऊ लागल्यावर त्यांच्यातल्या भटक्यांची चुळबूळ सुरू झाली. त्यांचे चार गट रिफ्ट व्हॅली सोडून बाहेर पडले. सुरुवातीला ह्या सगळ्यांची जीवनपद्धती जगण्यासाठी शिकार करणे आणि फळे व कंदमुळे गोळा करणे (hunter-gatherer) याभोवती गुंफलेली होती. नक्की कशामुळे हे मानव आपली मूळ जागा सोडून बाहेर पडले याचा फक्त अंदाजच बांधावा लागतो. बहुतेक जास्त आणि सहज शिकार मिळत असलेल्या भूमीच्या शोधात हे मूळ जागेपासून दूर जात जात हळू हळू सर्व आफ्रिकेत पसरले असावे.

हे मार्गक्रमण खालील चित्रात दाखवले आहे...

१. त्यांचा एक जथा दक्षिणेकडे जात जात केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला. त्यांचे आताचे वारसदार म्हणजे आफ्रिकन पिग्मीज जे अजून hunter-gatherer आहेत आणि कालाहारी मधले Khoisan Bushmen, ज्यांच्यातले काही जण hunter-gatherer आहेत तर इतर गोपाल झाले आहेत.

२. दुसरा जथा दक्षिण-पश्चिमेस काँगोच्या नदीच्या खोर्‍यात पोहोचला. यांचे वंशज बांटू भाषा बोलतात. हे उत्तम शेतकरी बनले आणि यांनी सहाराच्या दक्षिणेकडील भागात लोखंडाचा वापर सर्वप्रथम सुरू केला. ते नंतर पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे वळले. त्यांनी सर्व आफ्रिकाभर बांटू भाषा आणि शेतीचा प्रसार केला.

३. तिसरा जथा पश्चिमेकडे जात जात आताच्या आयव्हरी कोस्ट पर्यंत पोहोचला आणि त्यांनी तेथे शेती सुरू केली. यांच्यातल्या काही उत्तरेकडे गेलेल्यांच्या वंशजांना आता बर्बर म्हणून ओळखले जाते. बर्बर पारंपरिक गोपालक आहेत.

४. चवथा जथा इथिओपियात जवळच थोडेसे उत्तरपूर्वेला गेला.

हवामान आणि अन्नाची उपलब्धता ही दोन कारणे सर्व प्राण्यांच्या स्थलांतरास कारणीभूत ठरत आली आहेत. प्राचीन मानवही याला अपवाद नव्हता असेच दिसते. आफ्रिकेच्या उष्णप्रदेशीय गरम हवेला आणि तेथील वर्षारण्यांवर अवलंबून असलेल्या जीवनशैलीला सरावलेल्या मानवाला आफ्रिकेतच भरपूर शाकाहारी आणि मांसाहारी आहार उपलब्ध होता. त्याचबरोबर त्या वेळेस उत्तरेकडे असलेल्या हिमयुगीन अतिथंड हवेमुळे त्याला आफ्रिका सोडून जाणे योग्य वाटले नसावे किंवा तसे करण्याची निकडही भासली नसावी.

याचा अर्थ असा नाही की त्या काळात धाडसी धडपडे प्रवासी अजिबात नव्हते ! मात्र सहलीची कोणतीही आधुनिक साधने उपलब्ध नसल्याने त्यांनाही हवामानाच्या भरवशावर सहलीचा आराखडा ठरवावा लागत होता. हिमयुगात तापमान खूप खाली जात असले तरी थोडे जास्त थंड (glacial period) आणि थोडे जास्त गरम (inter-glacial period) असे तापमानाचे चढउतार सतत चालू असतात. या हवामानाच्या बदलाने आफ्रिकेला इतर जगाशी जोडणार्‍या केवळ दोनच मार्गांची उघडझाप होत होती आणि सर्वसाधारणपणे एका वेळेस एकच मार्ग खुला होत असे. ते मार्ग खालीलप्रमाणे होते:

१. उत्तरेकडे "आताचा इजिप्त --> सिनाइ मार्गे आशिया": हवा गरम झाली की या मार्गाने युरेशियात शिरकाव शक्य होत असे.

२. दक्षिणेकडे "आताचा इथिओपिया --> जिबूती --> येमेन": हवा थंड झाली की धृवाजवळ गोठून अडकलेल्या पाण्यामुळे समुद्राची पातळी खाली जावून आफ्रिका ते येमेन पायी अथवा कामचलावू तराफ्यांनी जाणे शक्य होत असे.

एका छोट्या गरम हवामानाच्या कालखंडाचा फायदा घेत आफ्रिकेतून सर्वात पहिला बाहेर पडणारा जथा १२०,००० वर्षांपूर्वी इथिओपियातून निघाला आणि नाईल नदीच्या काठाने उत्तरेकडे जात जात सिनाईमार्गे लेव्हांत (Levant) पर्यंत पोहोचला हे तेथे गुहांत सापडलेल्या आधुनिक मानवांच्या सांगाड्यांवरून सिद्ध झाले आहे.

या प्रवासाचा मार्ग खालच्या चित्रात लाल रंगाने दाखवला आहे.

लेव्हांत म्हणजे आधुनिक इजिप्तच्या सिनाई पासून आधुनिक टर्कीच्या अंतोलिया राज्यापर्यंतचा भूमध्य समुद्राभोवतालचा अर्धचंद्राकृती भूभाग. यात आजचे सिनाई, जॉर्डन, इझ्रेल, लेबॅनॉन, सिरिया, इराक व टर्कीचा अंतोलिया हे भूभाग सामील आहेत. लेव्हांतला मानवी प्रवासात फार महत्वाचे स्थान आहे आणि "सुपिक चंद्रकोर" (The fertile Crescent) म्हणूनही ओळखले जाते.

या जथ्याचा प्रवासाबद्दल पुढच्या भागात अधिक माहिती येईल.

=====================================================================

आतापर्यंत आपण मानवाच्या दोन लाख वर्षांच्या प्रवासापैकी जवळ जवळ अर्ध्या काळाचा मार्ग चाललो आहोत. हा मार्ग बराच सरळ आणि साधा होता. शिवाय सुरुवातीचा काल असल्याने वेग खूप कमी होता. पुढे अजून वेगवान, जास्त धाडसी आणि यापेक्षा खूप मोठे मार्गक्रमण करायचे आहे !

आतापर्यंत बर्‍याच जणांच्या मनात "हाच मार्ग होता किंवा हीच वेळ होती हे कशावरून नक्की समजायचे?" असा विचार खचितच आला असणार. तेव्हा आताच जर ही शंका दूर केली तर हेच नव्हे तर पुढचे अधिक गुंतागुंतीचे मार्ग समजायला मदत होईल. हा लेख सुगम ठेवण्यासाठी शास्त्रीय माहितीच्या खूप खोलात न जाता या पद्धतीची केवळ तोंडओळख करून घेऊया.

प्रवासाचा मार्ग निश्चित कसा करतात?

त्या काळचा मानवाचा सुरुवातीचा प्रवास मजल दरमजल जमिनीवरून चालत अथवा तुलनेने बर्‍याच उथळ पाण्यातून चालत अथवा अत्यंत प्राथमिक अवस्थेतील तराफे व होडक्यांनी झाला आहे. त्यामुळे आजच्या सारखे भरा बॅग आणि पोचा दिवसभरता पृथ्वीच्या विरुद्ध बाजूच्या ठिकाणी असे शक्य नव्हते. हा प्रवास एका पिढीत काही किलोमीटर (शंभर किमी म्हणजे डोक्यावरून पाणी गेले !) असे. शिवाय मूळ जथ्यातले काही लोक पुढे जात असत काही वाटेवरच कायमची वस्ती करत असत कारण हा प्रवास कोण्या एका गंतव्य स्थानाला जाण्यासाठी नसून मुख्यतः राहण्यासाठी चांगले ठिकाण आणि खाण्यासाठी चांगले व सहज मिळाणारे अन्न शोधण्यासाठी होता. अर्थातच या प्रवासात मूळ स्थानापासून शेवटच्या स्थानापर्यंत मानवी वस्तीची साखळी निर्माण होत गेली. एवढ्या मोठ्या प्रवासात या साखळीला सहाजिकपणे अनेक फाटे फुटले... माणसाच्या भूमीप्रेमामुळे काही अपवाद वगळता ही साखळी आणि तिचे फाटे बर्‍यापैकी सलग राहिले आहेत. सद्याच्या सहज आणि वेगवान प्रवासाच्या काळातही जर आजच्या लोकसंखेसंबद्धीचे आकडे पडताळले तर असेच दिसते की ९०% टक्के किंवा जास्त लोक आपल्या आठवणीतल्या पूर्वजांच्या वस्तीच्या ठिकाणी किंवा त्याच्या जवळपासच राहत आहेत.

एवढ्या पूर्वतयारीनंतर आता खालील चित्र बघूया:

असे समजूया की मानवी जथा जेव्हा निघाला तेव्हा त्याच्या जनुकांत 'अ' आणि 'ब' उत्परिवर्तने होती. अर्थात ही उत्परिवर्तने पिढ्या दर पिढीत पुढे जात आज अस्तित्वात असणार्‍या पिढीपर्यंतच्या जनुकात दिसतील.

पण नंतर काही पिढ्यांमध्ये नवीन उत्परिवर्तने निर्माण होत राहणारच. समजा त्या जथ्याच्या दोन शाखा वेगळ्या मार्गांवरून प्रवास करू लागल्या आणि एका शाखेत 'क' तर दुसरीत 'ड' उत्परिवर्तन निर्माण झाले. अर्थातच ही उत्परिवर्तने पुढच्या सर्व शाखावार पिढ्यांत दिसतील.... आणि असेच प्रवासाच्या शेवटच्या स्थानापर्यंत पुढे चालू राहील.

वरच्या विश्लेषणावरून असे दिसते की आपण जर जगातल्या अनेक स्थानांवर असलेल्या आजच्या मानवांची जनुके गोळा केली आणि त्यांच्यातील उत्प्रिवर्तनांचे विश्लेषण करून ती जगाच्या नकाश्यावर त्या व्यक्तीच्या आजच्या स्थानाप्रमाणे मांडली, तर आपल्याला मानवाचे मूळ स्थान, त्याचा प्रवासाचा (फाट्यांसह) मार्ग अगदी त्याच्या वंशजांच्या आजच्या स्थानापर्यंत ठरवता येतो.

लाखो लोकांची जनुके गोळा करणे, त्यांची महत्वाची १,५०,००० उत्परिवर्तने आहेत की नाहीत यासाठी अचूक तपासणी करणे, ती माहिती जगाच्या नकाश्यावर मांडणे आणि त्यावरून विश्वासू निष्कर्ष काढणे ही वर सांगितली एवढी सोपी कृती नाही हे सांगायला नकोच ! या कामाकरिता संशोधकांचे अतुलनीय श्रम आणि खास निर्माण केलेले बरेच संगणकीय हार्डवेयर आणि सॉफ़्टवेयर कामी येत आहे.

प्रवासाचा काल निश्चित कसा करतात?

याकरिता गणितीय अथवा सांख्यिकी (statistics) पद्धत वापरली जाते. किती पिढ्यांमध्ये एक उत्परिवर्तन होवू शकेल याचे खूप निरीक्षणे करून आणि शास्त्रीय प्रतिमाने (models) वापरून शास्त्रज्ञांनी उत्परिवर्तनाचे वय नक्की करण्याची एक पद्धत बनवली आहे. मात्र हा पुरावा गणितीय असल्याने त्यावर शंभर टक्के विश्वास तेव्हाच ठेवला जातो जेव्हा त्याच्याशी जुळणारा काहीतरी सबळ जीवशास्त्रीय पुरावा मिळतो... अन्यथा त्याचे स्वरूप केवळ सिद्धांत / थियरी असेच राहते. याच कारणाकरिता जनुकशास्त्राने ठरवलेले मानवाच्या मूलस्थानाची जागा इथिओपियामधील ओमो किबिश आणि हेर्टोमध्ये आधुनिक मानवाचे जीवाश्म मिळाल्यानंतरच शास्त्रिय सत्य म्हणून पक्की झाली.

असो. आतापर्यंत आपली शास्त्रिय पृष्ठभूमी बर्‍यापैकी मजबूत झाली आहे. पुढच्या भागापासून आपण आपले लक्ष केवळ पुढच्या प्रवासाची मजा घेण्यावर केंद्रित करू शकू.

(क्रमशः )

=====================================================================

महत्त्वाचे दुवे

१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/

=====================================================================

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...

=====================================================================

प्रतिक्रिया

हा भाग आत्तापर्यंत सर्वांत जास्त आवडला आणि समजला. इतिहासापूर्वीच्या या इतिहासाचे वाचन करतानाही थरारक वाटते एकदम!

बाकी इथिओपियापासूनच सगळे मानव इतस्ततः फुटले असावेत हे रोचक आहे. साधारणपणे असे किती जीवाश्म सापडलेत "अर्ली होमो सेपियन्स" चे? म्हणजे साधारणपणे इसपू ४०,००० ते इसपू १,६०,००० पर्यंतचे किती अवशेष सापडलेत माणसाचे? थिअरी मांडायला जे पुराव्याचे रॉ मटीरिअल आहे त्याचा साईझ कितपत आहे असा एक प्रश्न. इतिहासातले सिद्धांत मांडताना पुराव्याचा साईझ कितपत मिळतो याचा काहीएक अंदाज आहे. प्रीहिस्टरीबद्दल माहिती नसल्याने आणि अभ्यासाचा विषय अजूनच प्राचीन कालखंड असल्याने याबद्दल कुतूहल वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2013 - 1:37 am | डॉ सुहास म्हात्रे

एकूण किती हे निश्चित माहिती नाही पण माझ्या वाचनात आलेले एक लाख वर्षांपूर्वीचे आधुनिक मानवी जीवाश्म १५-२० च्या वर गेले नाहीत. पण त्याकाळचे एवढे जीवाश्म संशोधनाला खूप झाले. काही हाडांच्या तुकड्यावरून आख्ख्या प्राण्याची प्रतिमा बनवण्याइतके हे शास्त्र पुढे गेले आहे. त्यातच जर जीवावशेष सापडला तर त्यातील DNA चे पृथक्करण करून, त्यावरून कृत्रीम DNA बनवून, तो प्राणी जिवीत करण्यासाठी लोकांचे हात शिवशिवत आहेत :) DNA मध्ये किती माहिती दडलेली असते हे आतापर्यंतच्या लेखांत व चर्चेत आपण पहिले आहेच.

उदाहरणार्थः

१. शनिदार (कुर्दिस्तान, इराक) येथे सापडलेला जीवाश्म वापरून बनविलेले नियांडरथाल आदिमानवाचे डोके...

२. मेट्मान् (जर्मनी) येथील नियांडरथाल संग्रहालयात बनवलेल्या नियांडरथाल पुरूष आणि स्त्री च्या मूर्ती...

(वरची दोन्ही चित्रे जालावरून साभार)

बॅटमॅन's picture

20 Jul 2013 - 1:45 am | बॅटमॅन

धन्यवाद. शास्त्र आता पुढे गेले असले तरी हे सगळे जीवाश्म सापडले तेव्हा तितके पुढे गेले असेल का? एक आपली सहज शंका.

अन निअँडरथल पाहून अजून एक शंका. थोडेसे वाचलेय, पण बरेच काही विसरलोय.

तर निअँडरथल टिपिकल युरोपियन गोरेछाप दिसताहेत. सध्याच्या युरोपियन डीएनए मध्ये निअँडरथलचा काहीही समावेश नाही की कसे? मी वाचल्याप्रमाणे अन आठवते त्याप्रमाणे आफ्रिकेतले मानव युरोपात जाण्याअगोदर निअँडरथलचा बहुधा निर्वंश झाला होता. होमो सेपियन अन निअँडरथल यांचे आपसात इंटरब्रीडिंग झाले नव्हते इ.इ.

अद्ययावत संशोधन याबद्दल काय सांगते? साधारणपणे मी वर लिहिले तसेच आहे की काही डीटेल्स मिसिंग आहेत?

होमो सेपियन अन निअँडरथल यांचे आपसात इंटरब्रीडिंग झाले होते अन अजुनही युरोपिअन लोकांमधे जास्तीत जास्त ३ % पर्यंत नियांड्राथॉलचे जीन्स सापडतात असे प्रयोगांनी सिद्ध झालेले आहे. युट्युबर थोडं शोधलं तर त्या शास्त्रज्ञाच्या प्रयोगांचे व्हीडीओ सापडतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2013 - 2:50 am | डॉ सुहास म्हात्रे

शास्त्र आता पुढे गेले असले तरी हे सगळे जीवाश्म सापडले तेव्हा तितके पुढे गेले असेल का?

अवशेष सापडले तेव्हा शास्त्र पुढे गेले नसले तरी एकदा सापडलेला पुरावा शास्त्रज्ञ जिवापाड जपतात... अगदी बँकेतल्या लॉकरमधल्या सोन्यापेक्षा जास्त ! मग जेव्हा अधिक पुढारलेली पद्धती विकसीत होते तेव्हा तो पुरावा परत तपासला जातो आणि त्यासंबद्धीच्या माहितीची विश्वासार्हता नविन माहितीप्रमाणे बदलली जाते.

असे झाल्याने एक क्रांतिकारक शोध लागलेला आहे... ही घटना मानववंशास्त्रातली एक फारच रोचक गोष्ट आणि मैलाचा दगड आहे.

अगदी पंधरावीस वर्षांपूर्वीपर्यंत आफ्रिकेत राहिलेले मानव आणि युरोपमध्ये असलेले मानव यांच्यातला दुवा सापडत नव्हता. कारण सबसहारामधील १५,००० ते ६०,००० वर्षांपूर्वीचा त्याबाबतीतला सबळ मानवी अवशेषाचा पुरावा मिळत नव्हता. पण १९९९ मध्ये दक्षिण आफ्रिकेतल्या एका युनिव्हर्सिटी प्रोफेसरने सन १९५० मध्ये त्याच्या पुर्वांपार जमिनीत नदीशेजारी मिळालेली एक जराशी विचित्र वाटणारी कवटी त्याला भेटायला आलेल्या एका पाश्च्यात्य मानववंशशास्त्रज्ञाला दाखवली. त्या एकोणपन्नास वर्षांच्या काळात कवटी मिळालेल्या जागेच्या आजूबाजूचा सगळा भाग बदलून शास्त्रीय संशोधनाला नाकाम झाला होता. यामुळे साधारणपणे ती कवटीही निरुपयोगी पुरावा समजली गेली असती. पण शात्रज्ञाच्या ध्यानात आले की कवटीच्या आतल्या मेंदूच्या पोकळीत काही carbonate sand matrix प्रकारचा गाळ अजूनही अडकून राहिलेला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत त्या चुटकीभर पुराव्यावर आणि कवटीवर केलेल्या संशोधनात खालील तथ्ये सापडली:

१. कवटीचे वय ३६,००० वर्षे आहे (हे त्या गाळाच्या रेडिओ डेटिंगने समजले)

२. कवटी आताच्या आफ्रिकन माणसाशी थोडीशीच पण सुरुवातीच्या युरोपियन माणसाशी पूर्णतः जुळते आहे.

यावरून प्राचीन आफ्रिकन मानवाचा आणि प्राचीन युरोपियन मानवाचा संबद्ध पहिल्यांदाच निशंकपणे सिद्ध झाला. हा शेवटचा पुरावा मिळून हे सिद्ध झाले की "आपण सगळेच मूलतः आफ्रिकन आहोत".

आधुनिक मानव पुंजक्या-पूजक्यांनी जागोजागी उत्क्रांत झाला आणि त्यामूळे युरोपियन ग्रेट, आशियन ओके आणि अफ्रिकन मागासलेले अशी थियरी मांडणार्‍यांची बोलती बंद झाली. त्यानंतर त्या थियरीची गोष्ट शास्त्रिय वर्तुळाच्या चर्चेतून बाद झाली आहे.

***इतर सगळे प्रश्न आपल्या प्रवासातले महत्वाचे मुद्दे आहेत. आत्ता त्रोटक उत्तरे देण्यापेक्षा ती राखून ठेवत आहे. पुढे योग्य जागी विस्ताराने येतील.***

बहुत धन्यवाद! रेसिझमची बोलती बंद करण्यासाठी या थिअरीचे निष्कर्ष खूप महत्वाचे आहेत हे बाकी खरेच.

बाकी मुद्द्यांसाठी पुढील भागांची वाट आतुरतेने पाहत आहे.

@शिल्पा बः नोंद घेतल्या गेली आहे. सर्चवून पाहतो.

प्रसाद१९७१'s picture

22 Jul 2013 - 4:30 pm | प्रसाद१९७१

खरेतर रेसिझम च्या मागे तर्कशास्त्र आहे असे च दिसतय.

जिन्स च्या म्युटेशन्स चे चित्र जे ह्या लेखात दिले आहे, त्या प्रमाणे जगभरातील मानवजातीत मधल्या जिन्स मधे बराच फरक पडला आहे.
बराच ह्याचा relative अर्थ घ्या. कारण म्हणे माणसाच्या अगदी आधीच्या पूर्वजात आणि सध्याच्या माणसात ९७% जिन्स कॉमन आहेत.
त्यामुळे ०.१% जिन्स च्या फरकानी पण खूप फरक पडु शकतो

बॅटमॅन's picture

22 Jul 2013 - 5:05 pm | बॅटमॅन

खरेतर रेसिझम च्या मागे तर्कशास्त्र आहे असे च दिसतय.

हो नक्कीच. त्याला "ट्रोल-तर्कशास्त्र" म्हणतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2013 - 6:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

खरेतर रेसिझम च्या मागे तर्कशास्त्र आहे असे च दिसतय. तर्कशास्त्रापेक्षा त्याला "तर्कटशात्र" हे नाव जास्त संयुक्तीत आहे. गोरा रंग म्हणजे जास्त सुधारलेला माणूस असे म्हणणे आणि पांढर्‍या रंगाच्या गाड्या जास्त चांगल्या असतात असे म्हणण्याइतकेच बरोबर आहे.

कारण आतापर्यंतच्या शास्त्रिय संशोधनात असे सिद्ध झाले आहे की "समान संधी दिली असता बुद्धिमत्ता आणि कातडीचा गोरेपणा याचा अर्थाअर्थी (कॉजल रिलेशनशीप) काही संबंद्ध नाही." किंबहुना (अनेकातले एक महत्वाचे कारण, अधिक परिश्रम करण्याची तयारी असल्याने) बौद्धीक स्पर्धेत कॉकेशियन (गोरे) मुलांपेक्षा आशियाई मुले आता पाश्चिमात्य देशांत वरचढ ठरू लागली आहेत. काही बाबतीत (उदा. अ‍ॅबस्ट्रॅक्ट थिंकिंग, इ) अशियाई मेंदू जास्त प्रगत आहे असे आढळून आले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2013 - 1:44 am | डॉ सुहास म्हात्रे

हे राहीलेच की !

गेल्या एक लाख वर्षातले जीवाश्म आणि जीवावशेष बक्कळ आहेत. ४०,००० वर्षांपूर्वीचे तर जगभर पसरलेले आहेत.

धन्यवाद. अन अजून एक प्रश्न म्हंजे, प्रीहिस्टरीशी संबंधित उत्खनन करण्यासाठी हीच साईट असे कसे ठरवतात? इतिहासाशी निगडित साईट्स ठरवतानाचे ठोकताळे रफलि माहिती आहेत थोडेफार-पण तिथे ग्रांथिक आधारही कैकदा असतो. इथे कैच्याकै जुना काळ असताना कसे समजते काय माहिती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2013 - 2:58 am | डॉ सुहास म्हात्रे

हा बहुदा केवळ अपघातच असतो...

जसे हेर्टोला शास्त्रज्ञ जमीन तपासत होते पाणघोड्याच्या कवटीसाठी आणि सापडला १० मानवांच्या अवशेषांचा खजिना आणि तोही सुरुवातीच्या आधुनिक मानवांच्या अवशेषांचा व हत्यारांचा... अशा प्रकारच्या एका मानवाच्या अवशेषाकरिता अनेक शास्त्रज्ञ उजवा हात तोडून द्यायला तयार झाले असते !

बॅटमॅन's picture

20 Jul 2013 - 4:40 am | बॅटमॅन

हम्म रोचक आहे खरे....

चित्रगुप्त's picture

22 Jul 2013 - 6:28 pm | चित्रगुप्त

प्रागैतिहासिक काळच्या शोधासाठी भोपाळ जवळील भीमबैठिका या जागी पुष्कळ उत्खनन केले गेले आहे. मी स्वतः अश्या एका शिविरात भाग घेतला होता. त्यावेळी स्वतः डॉ. वाकणकर तिथे होते. त्यांची तारीफ करावी तेवढी कमीच. ते स्वतः उत्तम चित्रकार होते, आणि अतिशय प्रेमाने ते आम्हाला सर्व दाखवत, शिकवत असत. भीमबैठिका चा शोध त्यांनीच लावला होता. ते भोपाळ ते नागपूर ट्रेन प्रवास करत असता त्यांना दूर विचित्र आकरचे खडक दिसले, म्हणून उतरून जंगलातून पायी जाऊन शोध घेतला. तिथे अनेक गुफाचित्रे त्यांना मिळाली. त्यावरून ही जागा प्रागैतिहासिक काळातील मानवाचे वसतिस्थान असावे असा तर्क करून केलेल्या उत्खननात पुढे अनेक गोष्टी सापडल्या. मी गेलो होतो, तेंव्हासुद्धा तिथे पोचायचे म्हणजे आधी ट्रेन, मग ट्रकवाल्यांना थांबवून त्यांचे बरोबर जाणे, मग अनेक किलोमीटर पायी जंगलातून जावे लागे. मात्र तिथले प्रचंड खडक खूप दुरूनही दिसत असल्याने रस्ता चुकण्याची भिती नव्हती. तिथे एक बाबाजी रहात असे, त्याला वाकणकरांचे नाव सांगितले, की रहाण्याची जुबबी सोय (गुफेत) करून देई.
आता भीमबैठिका कसे आहे ठाउक नाही. बहुधा सर्व प्रसिद्ध टूरिष्ट जागांप्रमाणे तिथेही कोक, बर्गर, कुरकुरे वगैरे मिळत असेल आणि त्यांच्या प्लास्टिक कचर्‍यातून वाट काढत जावे लागत असेल.
भीमबैठिका चे फोटो:
a b d h

बॅटमॅन's picture

22 Jul 2013 - 6:38 pm | बॅटमॅन

बहुत रोचक!! वाकणकरांबद्दल थोडेसे नेटवरच वाचले होते कधीतरी. तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर काम केलेत हे तर उदाहरणार्थ एकदम थोर!!

भीमबेटकाला जायची लै इच्छा आहे, बघू कधी वेळ मिळतो ते..

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2013 - 6:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद ! हा तर एक मोठा (पण दुर्लक्षित) खजीनाच पुढे आणलाय तुम्ही !

ही चित्रे (इंडीयन रॉक आर्ट /पेट्रोग्राफ) मानवी संस्कृतिच्या जडणघडणीचा एका महत्वाचा भाग आहेत. त्यांचा काळ साधारण १२,५०० ते १०,००० वर्षांपूर्वीचा आहे.

त्यांच्याबद्दल माहिती येथे आहे.

सगळी चित्रे येथे पहायला मिळतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2013 - 6:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही तिथे जावून प्रत्यक्ष जागेवर काम केले आहे याचा हेवा वाटतो. जेव्हापासून या चित्रांबद्दल वाचले तेव्हापासून मला तेथे जाण्याची इच्छा आहे.

कवितानागेश's picture

20 Jul 2013 - 2:13 am | कवितानागेश

प्रवासाची कारणे अन्न, पाणी, शिकारीसाठी प्राणी, गायींना चारा आणि शेतजमीन अशीच असावीत का?
की अजून काही?
जसे स्वतन्त्र टोळ्या पडत पडत माणसे विखुरली गेली..
किन्वा कुतुहल?
जसे की रोज या बाजूनी सूर्य येतोय तो कुठून येतोय तो पाहू... :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2013 - 3:09 am | डॉ सुहास म्हात्रे

प्रवासाची कारणे अन्न, पाणी, शिकारीसाठी प्राणी, गायींना चारा आणि शेतजमीन अशीच असावीत का? की अजून काही?

आतापर्यंत आपण बघितलेल्या काळात हीच मुख्य कारणे, त्यात स्वतःकरिता अन्न हे सर्वात महत्वाचे. कारण या काळात हे लोक मुख्यतः hunter-gatherer होते. या काळात ते छोट्या छोट्या टोळ्यांनीच भटकत होते. शेवटच्या काळात काही टोळ्या गुरे पाळणे, प्राथमीक स्वरूपाची शेती करणे, इ. करू लागल्या.

किलमाऊस्की's picture

20 Jul 2013 - 3:20 am | किलमाऊस्की

हा भाग सगळ्यात जास्त आवडला.

विनायक प्रभू's picture

20 Jul 2013 - 7:51 am | विनायक प्रभू

मिपा पद्मश्री पुरस्कार नक्की

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2013 - 11:43 am | डॉ सुहास म्हात्रे

येवढं लाजवू नका गुरुदेव ! आपल्या प्रोत्साहक प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद !

प्रचेतस's picture

20 Jul 2013 - 9:46 am | प्रचेतस

जबरदस्त भाग.
प्रतिसादही माहितीपूर्ण.

एक्काराव, हॅट्स ऑफ ह्या भागासाठी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2013 - 11:44 am | डॉ सुहास म्हात्रे

हेमांगीके आणि वल्ली : आपल्या सुंदर प्रतिसादासाठी अनेक धन्यवाद !

पुरणपोळी's picture

20 Jul 2013 - 2:38 pm | पुरणपोळी

एक्काजी,
तुम्हि खुप छान लिहिता, हातोटि आहे तुमच्याकडे. खुप मस्त विशय आणि मांड्णी.
अनेक धन्यवाद,

हरिप्रिया_'s picture

20 Jul 2013 - 10:12 pm | हरिप्रिया_

अतिशय मस्त मालिका...

लवकर लवकर येऊ द्या.. एक भाग वाचुन झाला की लगेच पुढच्या भागात काय नवीन कळणार आहे ह्याची उत्सुकता स्वस्थ नाही बसू देत आहे.

छानच लिहिले आहे एक्कासाहेब. प्रतिसादातून सुध्दा तुम्ही छान संवाद साधत पुढे पुढे जात आहात.
अशा सुरेख लेखमालेसाठी खूप खूप धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jul 2013 - 10:37 am | डॉ सुहास म्हात्रे

पुरणपोळी, हरिप्रिया_ आणि अभ्या.. : प्रवासात सामिल झाल्याबद्दल धन्यवाद !

चित्रगुप्त's picture

21 Jul 2013 - 7:34 pm | चित्रगुप्त

उत्तम मालिका.
पण काही म्हणा राव, ते थोर शास्त्रज्ञ, त्यांच्या त्या जगप्रसिद्ध युनिव्हर्सिट्या, त्याचे ते अपूर्व शोध, एकाद्या एवढ्याश्या तुकड्यावरून रचलेले मोठमोठे सिद्धांत, हे सगळे जसेच्या तसे स्वीकारणे आम्हाला कधीच जमले नाही.
कारण, दिल्लीतील आणि अमेरिकेतील म्युझियमांत प्रत्यक्ष काम करताना नाना तज्ञ मंडळींशी झालेल्या ओळखी, त्यांचेशी झालेल्या खाजगी गप्पा, आणि त्यातून कळलेले या क्षेत्रातले गडबड-घोटाळे. .. यामुळे आम्हाला महाभारत आणि असे शास्त्रीय सिद्धांत दोन्ही सारखेच वाटतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jul 2013 - 9:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

दिल्लीतील आणि अमेरिकेतील म्युझियमांत प्रत्यक्ष काम करताना नाना तज्ञ मंडळींशी झालेल्या ओळखी, त्यांचेशी झालेल्या खाजगी गप्पा, आणि त्यातून कळलेले या क्षेत्रातले गडबड-घोटाळे.

सगळ्या "खर्‍या" शात्रज्ञांना हे मान्य असतेच की आजचे शात्रिय सत्य हे आजच्या शास्त्रिय पुराव्यांवर आधारलेले आहे आणि उद्या जर आजच्यापेक्षा अधिक विश्वासू शास्त्रिय पुरावे मिळाले तर वेगळे सत्य स्विकारण्यात काहीच चुकीचे अथवा लाजिरवाणे नाही. अगोदर एका प्रतिसादाचे उत्तर देताना हे मी वेगळ्या शब्दात सांगितले आहेच. शिवाय तुमच्या प्रतिसादातही तुम्ही "तज्ञ मंडळींच्या प्रामाणिकपणाचे उदाहरण" देवून याबाबत एक ढळढळीत उदाहरण दिले आहे. श्रद्धा अथवा अंधश्रद्धेवर आधारीत मते असणार्‍यांच्या बाबतीत असे होताना कधी पाहिले आहे का?

कोणीतरी म्हणूनच ठेवले आहे की, "Science has proof without any certainty. Creationists have certainty without any proof."

अर्थात, मी वर इतके लिहीले म्हणजे कृपया "मासा गळाला लागला" असा गैरसमज करून घेतला जाऊ नये ! ;) (हे एवढ्यासाठी की तुमचे लेख आणि प्रतिसाद संतुलित असतात. म्हणून मला तरी हा एक भला मोठा गळच दिसत आहे :) "तुमच्यात लपलेला खोडकर मुलगा", दुसरे काय? ;) )

वरचा उपद्व्याप मी केवळ शास्त्रज्ञांबद्दल इतरांचा गैरसमज होऊ नये एवढ्यासाठीच केला आहे. बाकी "जग अमूक एवढ्या दिवसात निर्माण केले गेले आहे" असे म्हणणार्‍यांना आम्ही नम्रपणे "आम्हाला तुमच्या मतांबद्दल आदर आहे" असे आणि एवढेच म्हणतो.

चित्रगुप्त's picture

21 Jul 2013 - 11:09 pm | चित्रगुप्त

माझा अनुभव असा आहे, की एकादा पुरावा सापडला, आणि त्यावर संशोधन केले जाऊन काही निष्कर्ष समोर आले, तरी त्यातले कोणते जगासमोर मांडायचे, कोणते लपवायचे, किंवा मुळात नसलेले सुद्धा आहेत म्हणून जाहीर करायचे, हे फार उच्च पातळीवरून (राजकीय हेतुने प्रेरित) ठरवले जात असते. उदा. स्मिथसोनियन मधे प्रकाशित एका लेखात, अमेरिकेतल्या कोणत्याश्या समुद्र किनारी सापडलेल्या जबड्याच्या एका लहानश्या तुकड्यावरून नेटिव्ह इंडियनांचे पूर्वज हे सुद्धा अमेरिकेबाहेरून आले होते, असे 'सिद्ध' करण्यात आले होते. गंमत अशी, की ते कदाचित सैबेरियातून, युरोपातून, आफ्रिकेतून, किंवा ऑस्ट्रेलियातून सुद्धा आले असू शकतात, असे प्रोफेसर मजकुरांचे म्हणणे होते. तात्पर्य, रेड इंडियन हे सुद्धा अमेरिकेचे मूळ रहिवासी नव्हेत, हेच त्यांना सांगायचे होते. त्यामागे तात्कालीन राजकीय परिस्थितीच होती.
आपल्याइकडले उदाहरण म्हणजे समजा, ताजमहाल हा मुघल भारतात येण्याच्या अनेक शतके आधी बांधला गेला होता, याचे पुरावे मिळाले, तरी या गोष्टीला सरकारी मान्यता कधीच दिली जाणार नाही, वगैरे.
जगातील सर्वात मोठा डायनोसॉर (अर्थात सांगाडा) आमच्याच म्यूझियम मधे आहे, हे सिद्ध करण्यासाठी (आणि अर्थातच याची प्रचंड जाहिरातबाजी करून लाखो डॉलर्स चा फायदा मिळवण्यासाठी) उत्खननातून सापडलेल्या शेकडो अश्मिभूत हाडांची जुळवणी करताना, प्रत्येक मणक्याच्या मधले अंतर (हा एकेक मणका काही फुटांचा असतो) अर्ध्या-पाऊण इंचाने वाढवले, की झाले काम. हे मला ते काम प्रत्यक्षात करणार्‍या अमेरिकन तज्ञाने, त्याच्याशी दोस्ती झाल्यावर सांगितले.
सुप्रसिद्ध 'Archaeopteryx' हा बनावटी की खरा, यावर उलट सुलट मते वाचायला मिळतात.
सारांश, प्रश्न फक्त नवनवीन पुरावे समोर येण्याचा, आणि त्याप्रमाणे नवनवीन सिद्धांत मांडण्याचाच नसून या सिद्धांतांना विज्ञानेतर अश्या अन्य गोष्टींचेही अधिष्ठान असते, परंतु ही अंदरकी बात फार थोड्या लोकांनाच ठाऊक असते.
म्हणूनच म्हटले, महाभारत आणि स्मिथसोनियन मधील लेख, हे आमच्यासाठी सारखेच मनोरंजक.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2013 - 12:41 am | डॉ सुहास म्हात्रे

मुद्दा समजला आणि त्यातील खरेपणाबद्दलही संशय नाही... फक्त सहमती नाही ती सरसकटीकरणाला. काही खडे आहेत म्ह्णून सगळेच तांदूळ फेकणे योग्य नाही. शात्रज्ञही माणसेच आहेत आणि राजकारण, स्वत्वाचा गर्व, इ भावना त्यांच्यातही आहेतच.

पूर्वी युरोपच्या वांशीक वरिष्ठतेची थियरी मांडणारे शास्त्रज्ञ गोरे होते. पण वरच्या प्रतिसादात दिल्याप्रमाणे ती थियरी खोडून टाकणार्‍या पुराव्यांचा पाठपुरावा करून "आपण सर्व आफ्रिकन" हे सिद्ध करणारे संशोधकही गोरेच होते.

गेल्या काही दशकांत जनुकीय शास्त्र इतके पुढे गेले आहे आणि त्यात सर्व देशाच्या आणि वंशांच्या शात्रज्ञांचा इतका सहभाग आहे की एखाद्याचा खोटेपणा बाहेर येण्याला कदाचित थोडा वेळ लागेल पण तो नक्की बाहेर येईल. हल्ली एका जणाचे कोणतेही संशोधन इतर अनेक जणांनी (पियर्स) सिद्ध केल्याशिवाय मान्य होत नाही.

नेटिव्ह इंडियनांचे पूर्वज हे सुद्धा अमेरिकेबाहेरून आले होते, असे 'सिद्ध' करण्यात आले होते. हे खरे आहे. हे कसे आपण पुढच्या भागांत बघूच. पण नेटिव्ह इंडियनांचे पूर्वजच नाही तर सगळ्याच मानवांचे पूर्वज (फक्त काही इथिओपियन सोडून) त्यांच्या आताच्या जागी आफ्रिकेतूनच गेलेले आहेत... फरक फक्त ते किती शतके / हजारो वर्षांपूर्वी आताच्या जागेवर पोहोचले या प्रश्नाचे उत्तर कोण मूलनिवासी आणि कोण उपरे हे ठरवायला कामी येतो.

सुप्रसिद्ध 'Archaeopteryx' हा बनावटी की खरा, यावर उलट सुलट मते वाचायला मिळतात. हयाबाबतीत मत देण्याएवढा माझा अभ्यास नाही. पण याचबरोबर "माणूस चंद्रावर उतरला नाही. ती नासाची होक्स होती", "९/११ला पेंटॅगॉनवर विमान पडले नाही", "अमेरिकन संरक्षणखात्याने / सि आय ए ने त्यांना सापडलेल्या उडत्या तबकड्या आणि परग्रहावरची माणसे एरिया ५१ मध्ये वाळवंटात लपवून ठेवली आहेत",,,,,, अश्या असंख्य गोष्टी जालावर सतत घिरट्या घालत असतात. माझा कल साधारणपणे पियर रिव्ह्युव्ड / पियर कन्फर्म्ड शास्त्रिय संशोधनावर विश्वास ठेवण्याकडे आहे. आजच्या घडीला तरी तेच जास्तीत जास्त "विश्वासू" सत्य आहे.

तेव्हा तुमच्या भावनेशी सहमत पण तिच्या तीव्रतेशी नाही.

बॅटमॅन's picture

22 Jul 2013 - 1:32 am | बॅटमॅन

तेव्हा तुमच्या भावनेशी सहमत पण तिच्या तीव्रतेशी नाही.

एकदम मार्मिक अन नेमके!!! पूर्ण प्रतिसादाचे सार या वाक्यात येते.

चित्रगुप्त's picture

22 Jul 2013 - 10:34 am | चित्रगुप्त

...तेव्हा तुमच्या भावनेशी सहमत पण तिच्या तीव्रतेशी नाही...
अहो कसली तीव्रता आणि कसले काय, द्या सोडून. आम्ही आपली उर्वरीत जिंदगी मजेत घालवायची, एवढेच जाणतो.
माझ्या नोकरीच्या काळातील आणखी काही अतिसंवेदनशील असे अनुभव आहेत, पण त्यांची वाच्यता करणे अजूनही मला सुरक्षित वाटत नाही. उगाच म्हातारपणी नसती झेंगटे मागे लागायची. तेंव्हा आता या चर्चेतून आम्ही बाद.

निवांत पोपट's picture

21 Jul 2013 - 7:46 pm | निवांत पोपट

सुंदर लेखमाला! गुंतागुंतीचा विषय व्यवस्थित उलगडून दाखवला आहे.पुढच्या भागांची उत्सुकता आहे..

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jul 2013 - 9:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

दीपक११७७'s picture

4 Jan 2017 - 5:54 pm | दीपक११७७

सुंदर लेखमाला! धन्यवाद !