क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग २
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ३
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ४
क्लोंडायकला जाणारा समुद्रीमार्ग लांब पल्ल्याचा आणि खर्चिक असल्या कारणाने बर्याच स्टँपेडर्सनी प्रवासाचा पहीला टप्पा समुद्रीमार्गे तर उरलेला प्रवास जमिनीवरुन करायचं ठरवलं. याप्रकारे प्रवास करतांना सिअॅटलवरुन मोठ्या जहाजाने Dyea किंवा स्कॅगवे (Skagway) पर्यंत पोचून पुढचा प्रवास जमिनीवरुन पूर्ण करता येत असे. ज्यांच्याजवळ ओझी वहायला घोडे, गाढवं, कुत्रे इत्यादी प्राणी होते त्यांनी समुद्रीमार्गाऐवजी स्कॅगवेवरुन 'व्हाईट पास' (White Pass) चा रस्ता धरायचं ठरवलं. 'व्हाईट' पास पूर्ण करुन लेक बेनेट आणि पुढे छोटया होडीने डाऊसनपर्यंत पोचता येत असे.
स्टँपेडर्सचा पहीला गट जेव्हा जुलै महिन्यात स्कॅगवेत पोचला तेव्हा उन्हाळी पावसाने स्कॅगवेला चांगलंच झोडपलं होतं. पावसामुळे झालेल्या चिखलातून माणसंच काय पण प्राण्यांनाही वाट काढणं मुश्कील झालं होतं. थंडीसाठी म्हणून आणलेले उबदार कपडे, चादरी भिजून चिप्प झाले होते. भर पावसात सु़कं लाकूड मिळणही दुरापास्त. मुसळधार पावसाने काही दिवस असं काही स्कॅगवेला झोडपलं की काही स्टँपेडर्सनी खचून जाऊन जवळपास असणारं सामान, यंत्र, अन्नपदार्थ विकून परतीच्या प्रवासाची सोय केली. पावसाच्या या झटक्याला ज्यांनी यशस्वी तोंड दिलं त्यांच्या पुढे अजून एक संकट आ वासून उभं होतं. संकटाचं नाव होतं 'सोपी (Soapy)' स्मिथ(१) आणि त्याचं टोळकं.
(सोपी स्मिथ आणि त्याची टोळी. उजवीकडून चौथा स्मिथ.)
स्मिथ हा स्कॅगवेचा अनभिषिक्त सम्राट होता. त्याने स्कॅगवेच्या मार्शललाही मोठ्या खुबीने खिशात घातलं होतं. स्कॅगवेत त्याचे दारुचे गुत्ते होते, दुकानं होती, जुगाराचे अड्डे, तिकीटघरं होती. बंदरात जहाज उतरलं की स्मिथ आणि त्याचं टोळकं सक्रिय होत असे. एकदा का नविन स्टँपेडर जहाजातून उतरला की सर्वप्रथम टोळक्यातला 'बिली' वर्तमानपत्राचा वार्ताहर असल्याची बतावणी करुन स्टँपेडरची मुलाखत घेण्याचा बनाव करीत असे. मुलाखत घेण्याचं नाटक करता करता त्याच्याकडे कितपत पैसाअडका आहे याची मोठ्या खुबीने माहीती काढत असे. पुढचा कारभार बघायचं काम होतं 'स्लिम जिम' कडे. स्लिम जिम बंदरावर हमाल असल्याचा बनाव करीत असे. स्वस्तात बोजा उचलायचं अमिष दाखवून तो गिर्हाईकाचं सामान लंपास करीत असे. स्मिथच्याच टोळक्यातला म्हातारा 'ट्रीप' सोरडोव्ह (२) असल्याचं नाटकं करी. तो महत्त्वाची माहीती देण्याच्या निमित्ताने गिर्हाईकाला टोळक्यतल्या इतरांशी गाठ घालून देत असे आणि टोळक्यातले इतर गडी गिर्हाईकाला दारुच्या गुत्त्यावर, जुगाराच्या अड्ड्यावर नेण्याचं यथोचित काम करीत.
अलास्कात टेलिग्राफ तारा पोचण्याआधीच स्मिथने आपली टेलिग्राफ कंपनी सुद्धा काढली होती. टेलिग्राफ मशिनशिवाय तो स्टँपेडरर्सचे संदेश त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पाच डॉलरच्या मोबदल्यात पोचवत असे आणि आश्चर्य म्हणजे टेलिग्राफ मशिनशिवाय दुसर्या बाजूने उत्तरही येत असे. म्हणजे ग्राहकाला टेलिग्राफ करण्याबरोबर उत्तर मिळण्याचेही पैसे दयावे लागत. आता दारुवर पैसे उडवून, जुगारात होत नव्हतं ते हरुन स्टँपेडर कफल्लक झाला की स्मिथ स्वतः अवतरत असे. स्टँपेडरची दुखःद कहाणी ऐकून त्याचं सांत्वन करुन त्याला ख्रिश्चन धर्माच्या नावावर तो परतीचं तिकीट काढू शकेल इतके पैसे दान म्हणून देत असे. फसवणूक झालेल स्टँपेडर ही आपल्या फजितीचा फारसा गवगवा न करता स्मिथचे शतशः आभार मानत परतीची वाट धरीत असे. स्कॅगवेचा मार्शल ही स्मिथच्या बाजूने असल्याने, स्कॅगवे एक नरक बनला होता. रोज घडणारे खून , मारामार्या, चोर्या यामुळे कायदा सुव्यवस्था तर अतोनात ढासळली होती. सरतेशेवटी १८९८ च्या जुलै महीन्यात चोरीमुळे झालेल्या मारामरीत फ्रँक रीड्ने स्मिथचा खून केला. त्यानंतर 'सोपी' स्मिथच्या टोळीचं काय झालं कुणालाच ठावूक नाही. काही सुदैवी स्टँपेडर्स सोपी स्मिथसारख्या गुंडांना टाळण्यात यशस्वी ठरत त्यांच्यासाठी नाविन आव्हान तयार असे. ते म्हणजे "व्हाईट पास" पार करण्याचं.
(व्हाईट पासचा खडतर रस्ता)
क्लोंडायकला जमिनीवरुन जाणार्या रस्त्यांपैकी बर्यापैकी सोपा, कमी चढण असल्याने काही स्टँपेडर्सनी व्हाईट पासचा रस्ता धरला. 'व्हाईट पास' कमी चढणीचा असला तरी बर्यापै़की खडकाळ, दलदलीचा आणि रेती आणि वाळूने भरलेला होता. अधेमधे डोंगराळ असलेला हा रस्ता काही ठिकाणी चालायला ही अगदीच दोन फूट अरुंद होता. एखादं पाऊल जरी चुकलं तर पाचशे फूट खोल दरीत कोसळायची भीती होती. वाटेत लागणारा 'समीट हिल'ची चढण जवळजवळ हजारेक फूट, चिखलाने भरलेली होती. या रस्त्याने सामान आणि प्राणी सुरक्षितरित्या नेणं ही एक कसब होतं. आता ज्यांच्याकडे स्लेजेस (प्राण्यांच्या मदतीने सामान ओढायच्या गाड्या) होत्या. त्यांचे थोडेफार कष्ट वाचणार होते. पण तरीही अशा गाड्यांच्या मद्तीने हा रस्ता पूर्ण करायला तब्बल नव्वद दिवस लागणार होते.
आणि ज्यांच्याकडे अशा गाड्या किंवा काहीच साधन नव्हत त्यांची हालत खूपच वाईट होती. ज्यांच्याकडे वाहतुकीचं काहीच साधनं नव्हतं अशांना काही मैल अंतरावर थोडं थोडं अस करुन सामान साठववं लागत होतं. म्हणजे पहिल्या फेरीत थोडं सामान काही मैल नेऊन ठेवलं की परत तितकच अंतर मागे जाउन थोडं सामान आणायचं, मग परत मागे उरलेलं सामान आणायला.... कित्येकांनी दिवसाला ३०-४० फेर्या नुसतं सामान ने-आण करण्यात खर्ची घातल्या.
क्लोंडायक वारीवर निघालेल्या बरेचश्या स्टँपेडर्सना याआधी कधी ही अंगमेहनतीच्या कामाची सवय नव्हती, या गर्दीत बरेचसे बैठया कामाची सवय असलेले लोकं होती. त्यामुळे पाठीवरच्या बोज्याने थोडयाच वेळात अनेकांनी धापा टाकायला सुरवात केली. अतिश्रमामुळे अनेकांना वाटेत चकरा आल्या. अनेकजण रस्त्यातच बसकण मारीत. त्यातच १८९७ च्या ऑगस्टमधे सलग सहा दिवस बर्फाचं वादळ येउन ठपकलं. वादळीवारा आणि जोरदार पाऊस यामुळे पुढे जाणं तर अशक्यच होतं पण काही स्टँपेडर्सची आपल्या गटापासूनही फारकत झाली. सहा दिवस अशा फारकत झालेल्यांनी अन्न, पाणी, निवर्याशिवाय काढले. त्यांच्या आसपास असणार्या इतर स्टँपेडर्सनी कुणालाही आसरा दिला नाही. सर्वांचं मत एकच होतं. आम्ही एवढी मेहनत करुन सर्व सामान आणलंय, आम्ही का म्हणून इतरांना तंबूत जागा देऊन गर्दी करावी? निसर्गाबरोबर माणूसही निर्दयी बनला होता. त्यातल्या त्यात चोविस वर्षीय आयरीश मोली वॉल्शने(३) उदारपणे जमेल तितक्या लोकांना आसरा दिला, अन्नपाणी पुरवलं. व्हाईट पास मधल्या सर्वांचीच तिने मनं जिंकली.
(मोली वॉल्श)
व्हाईट पासवर प्रवास चालू केलेल्यांपैकी अर्धेच 'लेक बेनेट'पर्यंत पोचू शकले. बाकीचे एकूणच कंटाळून एकतर मागे फिरले नाहितर काहींना न्युमोनिया, मेनिन्जायटिस, इनफ्युएन्झा, अन्नविषबाधेने पछाडलं. व्हाईट पासवर सर्वात वाईट अवस्था होती ती प्राण्यांची. ओझं वाहून नेण्यासाठी आणलेले बरेचसे घोडे प्रशिक्षित तर नव्हतेच पण वजनाने अतिप्रचंड असं ओझं वाहण्याच्या ताकदीचेही नव्हते. बरेचसे जंगली तर काही म्हातारेही होते. अजून एक मोठी समस्या होती ती म्हणजे सामानाच्या बांधाबांधीची, स्टँपेडर्सनी याआधी अशाप्रकारचं काम कधीही केलं नसल्याने घोड्यांच्या पाठीवर कसंही सामान बांधलं गेलं होतं. अव्यवस्थित बांधणीमुळे बरेचदा घोड्यांच्या पाठीवर फोड येत असत. अतिवजनामुळे अरुंद अशा दरीत तोल जाण्याचा धोका होताच. त्यातच या जखमा आजूबजूच्या दगडांवर घासून त्यात संसर्ग होत असे. जखमांची नीटशी काळजी न घेतल्याने आणि त्या पूर्ण बर्या होऊ न दिल्याने संसर्ग होऊन अनेक घोडे तापने मॄत पावले. हे असे मृत घोडे स्टँपेडर्स विल्हेवाट न लावता वाटेतच सोडून जात असत. असे मृतदेह जमा होऊन वाट तर अडतच असे पण त्यातून पसरणार्या दुर्गंधीमुळे शेवटी मागहून येणार्या इतर स्टँपेडर्सना चालणंही मुश्कील झालं. या रस्त्याला स्टँपेडर्सनी नाव दिलं 'Dead Horse Trail'.
वाटेत पडलेले घोड्यांचे मृतदेह(१)
वाटेत पडलेले घोड्यांचे मृतदेह(२)
सरतेशेवटी व्हाईट पास पूर्ण करुन जे काही स्टँपेडर्स लेक बेनेटपर्यंत पोचले त्यांनी पुढच्या प्रवासात काही उपयोग नसल्याने जवळच्या प्राण्यांना तिथेच मोकाट सोडून दिलं. पूर्णतः वेगळ्या वातावरणात वाढलेल्या या प्राण्यांची चांगलीच गैरसोय झाली. मोकळं सोडलेल्या प्राण्यांपैकी बरेच घोडे पुरेसं खाद्य उपलब्ध नसल्याने मृत पावले.
धंदेवाईक पॅकर्स मात्र या प्रवासात प्राण्यांचं मह्त्त्व जाणून होते. एकतर अशा धंदेवाईक पॅकर्सकडे असणारे प्राणी प्रशिक्षित होते, त्यांना लागणारं पुरेसं खाद्य, पाणी, रात्री थंडीत लागणारं ब्लँकेट पॅकर्स जवळ बाळगून होते. जखमांवर वेळोवेळी योग्य मलमट्टी केली जात असे. प्राण्यांच्या पाठीवर लादण्यात आलेली ओझीही व्यवस्थित योग्य त्या वजनात बांधलेली असत. धंदेवाईक पॅकर्सनी आपल्या प्राण्यांची व्यवस्थित काळजी घेउन बक्कळ पैसा कमवला. एक धंदेवाईक पॅकर त्याकाळी दिवसाला जवळजवळ पाचएक हजार डॉलर्स कमवित असे.
एकदा का लेक बेनेटपर्यंत सुखरुप पोचल्यावर स्टँपेडर्स युद्धात जिंकलेल्या विजयीवीराप्रमाणे जल्लोष साजरा करीत. वाईट हवामान, आजारपण या सर्वावर मात करुन त्यांनी केलेली कामगिरी नक्कीच उल्लेखनिय होती. पण परिक्षा अजून संपली नव्हती...
क्रमशः
(१) 'सोपी' स्मिथ - Jefferson Randolph Smith हा 'सोपी' स्मिथ या नावाने स्कॅगवेमधे प्रसिद्ध होता. १८६० साली जॉर्जियात जन्मलेला स्मिथ धाडसीपणासाठी प्रसिद्ध होता. पोटापाण्यासाठी तो कॉलोरॅडोत दाढीचे साबण विकयचं कम करी. विक्री वाढवण्याकरीता तो जोरजोराने जाहिरात करुन गर्दी जमा करीत असे. गर्दी जमली की तो एक डॉलर, पाच डॉलरच्या नोटा मोठ्या खुबीने साबणाच्या वेष्टनात गुंडाळून ते साबण इतर साबणात मिसळत असे. मग त्या साबणांचा तो लिलाव करी. बघणारी जनता ही आपल्या हाताला नोटा लागतील या अमिषाने साबण खरेदी करीत असे. अर्थातच नोटा गुंडाळलेले साबण गर्दीतल्या स्मिथच्याच माणसांचा हाती लागत असत. मग त्याची माणसं अजून जोरजोरात ओरडून नोटा मिळाल्याचा आनंद व्यक्त करुन इतरांना उचकवित असत. स्मिथच्या साबण विकण्याच्या या तर्हेमुळे त्याला 'सोपी' हे टोपणनाव आजन्म चि़कटलं.
(२) सोरडोव्ह (SourDough) - सोरडोव्हचा अर्थ खरंतरं बेकींग सोडा आणि यीस्ट घालून आंबवलेली कणिक. बिस्कीटं, ब्रेड बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. युकान मधे सुरवातीस सोन्याच्या शोधासाठी आलेले लोकं जेवणात सोरडोव्हचा वापर करीत. त्यातुनच अशा जुन्या जाणत्या लोकांना सोरडोव्ह हे नाव चिकटलं. या सोरडोव्ह लोकांना सोनं असलेल्या भागाची चांगलीच जाण होती. ते बरेचदा नविन स्टँपेडर्सना पैशाच्या मोबदल्यात सल्ले देत असत.
(३) मोली वॉल्श - मोली वॉल्शने केलेल्या परोपकरमुळे ती व्हाईट पास भागात सगळ्यांचीच चाहती झाली होती. दोन धंदेवाईक पॅकर्स - पॅकर जॅक आणि माईक बर्ट्लेट तिच्या प्रेमात पडले. पॅकर जॅकला मोली बरोबर लग्न करायचं होतं. परंतु मोलीने पसंत केलं माईकला. लग्न करुन माईक आणि मोली सिअॅटलला स्थायिक झाले आणि १९०२ साली माईकने मोलीचा खून केला. पॅकर जॅक मोलीला कधीही विसरू शकला नाही. त्याने स्कॅकवेला तिच्या नावाने स्मारक उभारलं
संदर्भ :
१) Yukon Gold (Charlotte Foltz Jones)
२) Alaska: Celebrate the States (Marshall Cavendish)
३) Mission Klondike (James M. Sinclar)
४) Alaska : saga of a bold land (Walter R. Borneman)
५) Gamblers and Dreamers: Women, Men, and Community in the Klondike (Charlene Porsild)
६) Klondike Gold Rush Museum - National Historical Park, Seattle Unit
(लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.)
प्रतिक्रिया
23 May 2013 - 8:55 am | प्रचेतस
अतिशय सुरेख लेखमाला.
पुभाप्र.
23 May 2013 - 9:05 am | अविकुमार
हा भागही एकदम माहितीपूर्ण आणि उत्कंठावर्धक झाला आहे! पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
23 May 2013 - 9:54 am | लाल टोपी
लेखमालिका वाचत आहे. माहितीपूर्ण आणि उत्कंठावर्धक आहे.
23 May 2013 - 2:20 pm | अजो
सरतेशेवटी १९९८ च्या जुलै महीन्यात चोरीमुळे झालेल्या मारामरीत फ्रँक रीड्ने स्मिथचा खून केला.
इथे १८९८ हवे न. बहुतेक टाइपो असावा .
मस्त भाग. सोन्या साठी किती याताना सहन करत होते.
23 May 2013 - 9:21 pm | किलमाऊस्की
:-) हो, टायपो आहे. १८९८ हवं तिथे.
23 May 2013 - 9:27 pm | प्यारे१
छान सुरु आहे सीरिज.
24 May 2013 - 12:03 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्त चालू आहे वाटचाल...
पुभाप्र.
24 May 2013 - 4:37 pm | प्रसाद गोडबोले
अप्रतिम लिहित आहात...
पुढील भागाची आतुरतेने वाट पहात आहे ...कदी येकदा सोनं गावतय असं झालय .....
24 May 2013 - 11:56 pm | इनिगोय
+१.
असंच माझंही मत आहे :-)
24 May 2013 - 6:06 pm | पैसा
अगदी मस्त सुरू आहे लेखमालिका! वेगळ्याच जगाची ओळख होते आहे!
26 May 2013 - 3:43 pm | प्रभाकर पेठकर
आत्तापर्यंतचे सर्व भाग वाचून झाले. प्रचंड उत्कंठावर्धक आणि तपशिलवार लेखन आहे.
'गोल्ड रश' नांवाचा चार्ली चॅप्लीनचा चित्रपट फार वर्षांपूर्वी पाहिला होता. पण तो तितकासा (त्या काळी) भावला नव्हता. आता पुन्हा एकदा (ह्या ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर) पाहिन म्हणतो.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे.
27 May 2013 - 11:32 am | किलमाऊस्की
चॅप्लीनच्या गोल्ड रशची पार्श्वभूमी क्लोंडायक गोल्ड रशचीच आहे.
27 May 2013 - 3:57 pm | प्रभाकर पेठकर
होय, कालच आंतरजालावर पाहात होतो.
तुमचा लेख वाचल्यामुळे अनेक प्रसंगातील भयानकता आता जाणवते आहे.
अर्थात, चॅप्लीन त्यातील भयानकता विनोदाच्या अंगाने मांडतो आहे त्यामुळे बरेच सुसह्य झाले आहे पाहायला.
27 May 2013 - 10:08 am | मुक्त विहारि
आवडला...
27 May 2013 - 12:50 pm | बिपिन कार्यकर्ते
अबबबबबबबबबबबबबबब! अप्रतिम लेखमाला! निवांत वाचू म्हणून बाजूला ठेवली होती त्याचं सार्थक झालं!
दंडवत, हेमांगी! _/\_ :)
27 May 2013 - 1:07 pm | गवि
ऐला.. पुढचे भागही मस्तच..
आत्ताच्या (हायटेक संपर्क आणि दळणवळणाच्या) काळात अशी बातमी आली (द. ध्रुवानजीक, किंवा अमुक दुर्गम नदीत सोने मिळते आहे अशी) तर काय प्रकारची प्रतिक्रिया होईल असा विचार मनात आला. गहन आहे विषय.. :)
28 May 2013 - 11:34 am | किलमाऊस्की
इथे थोड्क्यात माहीती मिळेल. पण आजकाल कायदे कडक असल्याने त्याकाळची परीस्तिथी उद्भभवण अशक्य नसलं तरी थोडं कठीण आहे.
27 May 2013 - 3:33 pm | चाणक्य
चाललिये लेखमाला.
29 May 2013 - 7:42 am | जॅक डनियल्स
खूपच मस्त...डोळ्यासमोर चित्र उभे राहिले त्यावेळेच्या परिस्थितीचे !
21 Jun 2013 - 6:01 am | किलमाऊस्की
या लेखमालिकेतील पुढील लेख : क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ६