क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग २
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ३
क्लोंडायकला पोचण्यासाठी त्यातल्या त्यात सुरक्षित पण तितकाच महागडा मार्ग होता 'समुद्रीमार्ग'. या मार्गाला "श्रीमंत माणसाचा मार्ग" असंही म्हणत असत.
या मार्गाने प्रवास करतांना सिअॅटलवरून साधारण २७५० मैलाचा प्रवास करून अलास्कातल्या सेंट मायकल बंदरात प्रवासाचा पहीला टप्पा पार पडत असे. तिथून पुढे युकान नदी १७०० मैल होडीतून पार करून सध्याच्या डाउसन शहरात (जे क्लोंडायक गोल्ड रशचं मुख्य केंद्र होतं) पोचता येत असे. अनुकूल अशा वातावरणात हा प्रवास पुर्ण करायला ६ आठवडे लागत. आता या प्रवासातली मुख्य अडचण होती युकान नदी. वर्षातले फक्त दोन ते तीन महीनेच ही नदी वाहतुकीसाठी खुली असे. एकदा का ही नदी गोठली की जहाजांचा मार्ग पुढच्या उन्हाळ्यापर्यंत बंद होत असे.
बोनांझा क्रीकमध्ये सोनं सापडल्यची खबर कॅनडा सरकारपर्यंत ही पोचलीच होती. एकून प्रसंगाचं गांभीर्य आणि भविष्यातल्या अडचणी ओळखून त्यांनी लागलीच पावलं उचलली. युकान भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कॅनडा सरकारने ऐंशी पोलीस ऑफिसर्सना तातडीने या भागाकडे रवाना केलं. डोंगराळ भागात जागोजागी असलेल्या चौक्यांवर एवढ्या मोठ्या संख्येने स्थलांतर करणार्या लोकांसाठी फार काळ पुरेल इतके अन्नपदार्थ उपलब्ध नव्हतं. यावर उपाय म्हणून कॅनडा सरकारने या भागात येणार्यांसाठी काही नियम आखून दिले. यातला महत्त्वाचा एक नियम म्हणजे - या भागात येणार्या प्रत्येकाने दर दिवसाला ३ पौंड या हिशोबाने वर्षभराचा अन्नसाठा जवळ बाळगायला हवा. या नियमाचं उल्लंघन करणार्याला कॅनडाची सीमारेषा पार करू न देण्याचे आदेश होते. या सामानाची यादी सिअॅटल सोडण्याआधीच "स्टँपेडर्सना" (१) दिली जात असे. ढोबळमानाने ही यादी काहीशी अशी होती.
- १५० पौंड खारवून वाळवलेलं डुकराचे मांस
- ४०० पौंड धान्याचं पीठ
- २५ पौंड ओट्स
- १२५ पौंड बीन्स
- १० पौंड चहा
- १० पौंड कॉफी
- २५ पौंड साखर
- २५ पौंड वाळलेले बटाटे
- २ पौंड वाळलेले कांदे
- १५ पौंड मीठ
- १ पौंड मिरच्या
- ७५ पौंड वाळलेली फळं
- ८ पौंड बेकिंग पावडर
- २ पौंड सोडा
- १/२ पौंड व्हिनेगर
- १२ औंस सूप
- १ कॅन मोहरी
- ४ माणसांठी माचिसच्या काड्या
- ४ माणसांठी लागणारा स्टोव्ह
- सोने गोळा करण्यासाठी लागणारं पसरट भांडं
- ग्रॅनाइटच्या बादल्या
- मोठी बादली
- सुरी, काटा, चमचा, कप, प्लेट आणि तळण्यासाठी उथळ भांडे
- कॉफी आणि चहाची किटली
- धार काढण्यासाठी दगड (scythe stone)
- दोन कुदळ आणि एक फावडं
- एक मोठी करवत
- कातडयाचा (किंवा कापडाचा) पट्टा
- २ कुर्हाडी आणि अतिरिक्त लाकडी मुठ
- Draw knife, brace and bits, jack plane, and hammer.
- २०० फुट दोरखंड
- ५ पौंड काथ्या
- तंबू ठोकण्यासाठी ५ पौंड ६, ८, १०, १२ क्रमांकाचे खिळे.
- १० X १२ आकाराच्या तंबूचा कपडा.
- २ मेण कापडं
- ५ यार्ड मछरदाणी
- ३ जोड आतील कपडे
- १ जोड mackinaw coat आणि pant
- १ जोड रबरी रेनकोट
- १ डझन लोकरी मोजे
- १/२ डझन लोकरीचे हातमोजे
- २ overshirts
- 2 जोडी snagproof बूट
- 2 जोड्या बूट
- ४ जोडी ब्लँकेट
- ४ टॉवेल
- 2 जोड्या overalls
- जरुरी औषधं
या यादीशिवाय इतर काही वैयक्तिक सामान जसं पुस्तकं, खाणकामासठी लागणारा दारुगोळा, बंदुका इत्यादी सूचित केलं गेलं होतं. या सर्व सामानची किंमत त्याकाळी साधारण हजारेक डॉलरपर्यंत जात असे. आता हजार डॉलर्स फारसे वाटत नसले तरी २५ सेंट मधे एकवेळचं जेवणं मिळण्याच्या त्या काळात हजार डॉलर्स म्हणजे डोक्यावरून पाणी! अनेकांनी एकाच ठिकाणी सर्व सामान मिळणारी दुकानंही सिअॅटलमधे थाटली होती. फलाटावर गाडी थांबली रे थांबली की दुकानदार गर्दीत घुसून गिर्हाईकाला आपल्या दुकानातून सामान खरेदी करण्यासाठी मागे लागत. येनकेन प्रकरणाने गिर्हईक बाजूच्या दुकनात न जाण्यासाठी निरनिराळ्या सवलती देत असत.
सामान खरेदी करुन झाल्यावर एवढं सगळं सामान घेऊन एकट्या दुकट्या माणसाने प्रवास करणं धोक्याचं. मग यावर उपाय म्हणून अनेकांनी आपापले गट बनवले. गटागटाने फिरण्यामुळे अनोळख्या वाटेवर प्रवास करतांना सुरक्षितता तर मिळणार होतीच पण खाणकामाची अवजड हत्यारं ही विभागून घेता येणार होती.
१८९७ च्या उन्हाळयात या समुद्रामार्गाने अठराशे स्टँपेटर्स उत्तरेकडे निघाले आणि उन्हाळा संपायाच्या आधी प्रत्यक्षात पोचले फक्त त्रेचाळीस! बाकीचे युकान नदी गोठल्यामुळे तब्बल आठ महीने सोनेरी स्वप्न बघत वेगवेगळया ठिकाणी अडकून पडले. या अडकून पडलेल्या अनेकांमध्ये एक होता सिअॅटलचा महापौर डब्ल्यू.डी वूड. वूडने आपल्या बरोबर सोबतीला इतर अनेकजणांना घेतलं होतं. खरंतर वूडचं जहाज वेळेवरच निघाचं होतं पण वूडने जहाजात स्वत:चं इतकं सामन भरून ठेवलं की त्याने जमा केलेल्या इतर प्रवशांचं सामन ठेवायला जागा अपुरी पडू लागली. ते सामान बंदरावरच सोडून दयायचा वूडचा बेत सर्व प्रवाशांनी मिळून हाणून पाडला. सरतेशेवटी बर्याच वादविवादनंतर कसंबसं सामान कोंबून वूडचं जहाज सामान आणि प्रवासी घेऊन उत्तरेला निघालं. आता या बाचाबाचीत बराच वेळ खर्ची पडला होता. त्यातच सेंट मायकल बंदरावर पोचल्यावर लक्षात आलं की युकान नदी पार करायला छोटया होड्यांची आवश्यकता आहे. वूडने प्रवासाचा बेत आखतांना या गोष्टीचा विचारच केला नव्हता. कावलेल्या प्रवाशांनी धीर एकवटून स्वत:च नदी पार करण्यासाठी होड्या बनवायला सुरवात केली पण तोपर्यंत वेळ टळून गेली होती. सेंट मायकल बंदरावरून त्यांना पुढे सतराशे किलोमीटरचा प्रवास उन्हाळा संपायच्या आत पूर्ण करायचा होता. अर्ध्या वाटेतच युकान नदी थंडीने गोठली आणि प्रवासाचा मार्ग बंद झाला. सर्वच्या सर्व प्रवासी अडकून बसले. वैतागलेल्या प्रवाशांनी अडकून पडलेल्या ठिकाणी तात्पुरती वस्ती केली आणि तिला नाव दिलं "Suckersville".
(युकान नदी पार करण्यसाठी अशा छोट्या होड्यांची गरज भासे.)
पुढे वूड अर्ध्या वाटेतच प्रवास सोडून परतला. उरलेल्या प्रवाशांनी हाडं गोठवणार्या थंडीत कसाबसा तग धरून पुढच्या वसंतात क्लोंडायकची वाट धरली. तर काहींनी परतीचा रस्ता पकडला. सुदैवाने या प्रवासात कुठलीही मनुष्यहानी झाली नाही. पण क्लोंडायक्ला जाणार्या इतर जहाजांची कहाणी इतकी सुदैवी नव्हती.
क्लोंडायक मधल्या सोन्याच्या शोधाआधी सिअॅटल ते अलास्का या दरम्यान ७ जहाज नेमून दिलेली होती. क्लोंडायकला जाणार्यांची गर्दी वाढू लागली तसतशी जहाजांची मागणीही वाढू लागली आणि मग मिळेल ते जहाज, आगबोट, छोटया होडया जहाज मालकांनी पाण्यात उतरवायला सुरवात झाली. गंजलेली, मोडकळीला आलेली जहाजं थोडीफार डागडुजी करून वापरात आणणं सुरू झालं. आता या अशा बोटी अलास्काच्या समुद्री वातावरणासाठी मुळीच योग्य नव्हत्या. जहाजांची मागणी वाढु लागली तशी बोटीवर काम करणारा कर्मचारी वर्गाचीही चणचण भासू लागली. मग मिळेल त्याला योग्य प्रशिक्षणाशिवाय गरज भागण्यापुरती नोकरी जहाज मालकांनी दयायला सुरवात केली. जहाज चालवणारे नाविक अलास्काच्या वातावरणासाठी नवखे होते. उणे पन्नास पर्यंत खाली जाणारं अलास्काचं तापमान प्रवाश्यांप्रमाणेच कर्मचारीवर्गालाही नवं होतं. प्रवासात अचानक आलेल्या संकटाला नक्की कसं सामोरं जायचं याच प्रशिक्षण ही त्यांना दिलेलं नव्हतं. १८९८ मध्ये सिअॅटल बंदरमधून निघालेल्या जहाजांमधली दर महिन्याला साधारण तीन जहाज खडकावर आपटून बुडत असत.
पण खरंतर सुरक्षितता, आरामशीर प्रवास, सोयीसुविधा या बाबी आता नगण्यच होत्या. प्रवाशांनाही काहीही करून बोटीत घुसायला मिळणं हे परमकर्तव्य वाटत असे. बोटीत दोन पायांवर उभं रहायला मिळणं ही तर सुखाची परमावधी. जहाज मालकांनी एकच जागा दोन-तीन जणांना विकून अजूनच घोळ घातला होता. त्यातच विनातिकीट प्रवास करणारेही होतेच. आत घुसायल्या मिळाल्यानंतरही परिस्थिती फारशी चांगली होती असं नव्हे. एकतर क्षमतेपेक्षा जास्त सामान, माणसं जहाजात भरली होती आणि त्यात भर म्हणून यंत्र, प्राणी, अवजारं दाटीवाटीने कोंबली होती. असंच एक जहाज Clara Nevada बेकायदेशीररीत्या प्रवासी आणि खाणकामासाठी लागणारं डायनामाईड नेत असतांना Skagway जवळ पोचताच डायनामाईड्चा स्फोट होऊन बुडालं. सर्वच्या सर्व प्रवासी बुडाले. वाचला तो फक्त एक कुत्रा.
काही जहाजांच्या तळाशी प्राण्यांना जागा देण्यात आली होती. कर्मचारीवर्ग अपुरा असल्याने प्राण्यांची विष्ठा साफ करणं निव्वळ अशक्यच होतं. अशी घाण साचून साचून असह्य वास सुटत असे. जहाजात खालच्या भागातले लोक दुर्गंधी आणि जहाजाच्या डुचमळण्याने उलट्या करून आधीच सहन न होत असलेल्या दुर्गंधीला वाढवण्यात हातभार लावत होते. तर काही जहाजांवर प्राण्यांना वरच्या मजल्यावर (deck) ठेवलं होतं. अशा जहाजात वेगळीच समस्या उद्भवली. जहाजातल्या फुटक्या छपरातून प्राण्यांची विष्ठा खाली प्रवाशांच्या अंगावर ठिपकत असे. त्यामुळे खालचा भाग घाण तर होतच असे पण प्राण्यांबरोबर प्रवाशांनाही संसर्गजन्य रोगांनी झपाटलं. अपुर्या सुविधांमुळे प्रवासीही दिवस दिवस आंघोळ न करता रहात असत. त्यातून निर्माण होणार्या दुर्गंधीने प्रवासी त्रस्त झाले होते. त्यातच जोडीला सामान उचलण्यासाठी ज्यांनी कुत्रे बरोबर घेतले होते त्या कुत्र्यांचं रात्री अपरात्री भुंकणं, रडणं-भेकणं होतंच. काही जहाजांवर घोड्यांना इंजिनशेजारीच बांधण्यात आलं होतं, इंजिनाच्या आवाजांबरोबर घोडे बिथरून धुमाकूळ घालत. घोड्यांना खायला आणलेल्या गवताच्या पेंडया खिडकीवर जागा मिळेल तिथे कोंबल्याने सूर्यप्रकाशही अडला होता. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासीसंख्या असल्याने जहाजावरचं जेवणखाणंही अपुरं पडू लागलं होतं. जे प्रवासी जहाच्या वरच्या मजल्याचा आसरा घेऊन होते त्यांना सततच्या पावसाने, थंडीने झोडपलं. या प्रवाशांमधे आलेली न्युमोनियाची साथ खाली बसणार्या प्रवाशांमध्ये पसरण्याची भीती उत्पन्न झाली.
सोन्याच्या शोधासाठी अतिउत्साहात निघालेले बरेचसे प्रवासी पहिल्या टप्प्यातच अर्धजर्जर झाले. सोनं मिळण्याच्या आशेवर सर्वच कसेबसे तग धरुन होते. जहाजातली परीस्थिती नक्कीच वाईट होती. पण ही तर सुरवात होती. प्रवासाचा पहिला टप्पा त्रासदायक होता पण दुसरा टप्पा अजून सुरू कुठे झाला होता...
(क्रमशः)
टीपा
(१) स्टँपेडर्स (Stampeders): हा शब्द मूळ Stampede या शब्दावरून आला. प्राण्यांमधे जसं एक धावला की बाकीचे विचार न करता त्याच्या मागे धावतात आणि चेंगराचेंगरी करतात. गोल्ड रश मधेही विचार न करता सोनं मिळण्याच्या आशेने फारशी माहीती नसतांना अनेकांनी क्लोंडायकची वाट धरली. अशा क्लोंडायकवारी करणार्यांना Stampeders म्हणतात.
सिअॅटल बंदरातली गर्दी
प्रवासाला निघालेले स्टँपेडर्स
अनेक कंपन्यांनी क्लोंडायकला जाताना लागणार्या सामानाची यादी बनवली होती. त्यापैकी ही एक.
संदर्भ :
१) Yukon Gold (Charlotte Foltz Jones)
२) Alaska: Celebrate the States (Marshall Cavendish)
३) Mission Klondike (James M. Sinclar)
४) Alaska : saga of a bold land (Walter R. Borneman)
५) Gamblers and Dreamers: Women, Men, and Community in the Klondike (Charlene Porsild)
६) Klondike Gold Rush Museum - National Historical Park, Seattle Unit
(लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.)
प्रतिक्रिया
15 May 2013 - 9:10 am | श्रीरंग_जोशी
सर्व घटनाक्रम फारच रोचक आहे पण तितकाच दुर्दैवी वाटतो.
सामानाची यादी फारच काळजीपूर्वक व अनुभवाअंती बनवलेली दिसत आहे.
हा भागही आवडला व पूढच्या भागाची उत्कंठा लागून राहिलेली आहे.
15 May 2013 - 9:45 am | प्रचेतस
हेच म्हणतो.
लेखमाला अतिशय उत्तम सुरु आहे.
15 May 2013 - 9:22 am | शिल्पा ब
हा भागही माहीतीपुर्ण आहे. आजच्या जमान्यात स्टँपेडर्सच्या ऐवजी बबल्सवाले लोकं आलेत हाच फरक..डॉट कॉम असु नैतर हौसिंग असु.
16 May 2013 - 2:26 am | उपास
आणि ते पाँझी / पिरॅमिड स्कीम वाले यांनीही बाजार उठवलाय नुसता.. :) जपानी गादी आठवली विजूभाऊंची..!
लेख अतिशय उत्तम..
15 May 2013 - 9:43 am | चाणक्य
.
15 May 2013 - 10:14 am | सौंदाळा
आवडला.
वाचतोय..
15 May 2013 - 10:35 am | मनराव
आवडेश...........वाचतो आहे.....येउ द्या आणखी..........
16 May 2013 - 2:07 am | बॅटमॅन
अतिशय केअरफुली लिहिलेला लेख. मेहनत जाणवतेय एकदम!! मस्त वर्णन अन फटूही :)
16 May 2013 - 2:35 am | किलमाऊस्की
सुतारकामाशी काडीचाही संबंध नसल्याने ती यादी समजून घेतांना आणि मराठीत लिहिता लिहिता बोबडी वळली. उगाच गोंधळ नको म्ह्णून काही साहित्य जसंच्या तसं इंग्रजीतच लिहीलं.
17 May 2013 - 4:32 pm | बॅटमॅन
हे चांगलं केलंत :)
17 May 2013 - 9:21 pm | jaypal
सहमत.
16 May 2013 - 2:17 am | अभ्या..
छान आणि अत्यंत रोमांचक लिहिले आहे. धन्यवाद
फोटू पण भारीच.
16 May 2013 - 10:08 am | पैसा
झटपट श्रीमंत व्हायच्या आशेने किती जणांनी आपली जीव गमावले आणि सुखाचा जीव दु:खात घातला देवजाणे!
16 May 2013 - 1:41 pm | प्रसाद गोडबोले
रोमांचक !!
16 May 2013 - 2:03 pm | गवि
उत्तम लेखमाला. अत्यंत रोचक.
काही गोष्टी विशेषकरुन जाणवल्या (लेखनाबाबत नव्हे, घटनेबाबत):
-१७०० मैल (सुमारे २७०० किलोमीटर) निव्वळ नदीतून प्रवास हा फार मोठा पल्ला वाटतो. २७०० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी हाताने बनवलेल्या छोट्या लाकडी होड्या ? जवळजवळ तीनहजार किलोमीटर अंतर अशा छोट्या बोटीने वल्हवत जात होते? छायाचित्रात बोटीला इंजिन वगैरे दिसत नाहीये.
-सामानाची यादी पाहता प्रत्येक व्यक्तीसोबतचे वजन टनापेक्षा जास्त असावे. स्वतःच्या वजनाच्या दसपटीपेक्षा जास्त वजन आणि आकारमान वाहून नेणं हे मोठ्या बोटीने पहिल्या बंदरापर्यंत समजण्यासारखं आहे, पण त्यापुढे इतकं वजन घेऊन प्रवास करायचा तर प्रतिमाणशी पाच माणसे हा बोजा उचलायलाच लागली असणार. (पाच माणसे बोजा वहायला वापरली तर प्रतिमाणशी आवश्यक वस्तूंचं गणित बिघडणार. दाखवलेल्या लाकडी होडक्यांमधे यादीत निर्दिष्ट केलेल्या सामानासहित एक मनुष्य बसला तरी फार झालं असं वाटतं आहे.
हे काही ग्रे एरियाज गोंधळात पाडणारे आहेत.
पुन्हा एकदा.. लेखमाला उत्कृष्टच आहे.. हे तपशीलातले प्रश्न मनात उभे राहिले आहेत.
16 May 2013 - 9:53 pm | किलमाऊस्की
तपशील लिहीतांना गडबड झाली थोडी. थोडं सविस्तर लिहायला हवं होतं. हो, हा फारच लांब पल्ला होता. खरं आहे. सिअॅटलवरून सेंट मायकल बंदर हा प्रवास मोठ्या जहाजातून होत असे. नंतर युकान नदी बेरींग समुद्राला जिथे मिळते त्या चिंचोळ्या पट्टीतून मोठी जहाजं जाणं अशक्य होतं. त्यामुळे या प्रवासाकरीता छोट्या आगबोटी असत. या अशा -
सोन्याच्या शोधासाठी या भागात येण्यार्या लोकसंख्येला या आगबोटी अपुर्या होत्या. त्यातच बर्याच लोकांना पुढचा प्रवास वेगळया, छोट्या आगबोटींनी करायचा आहे याची कल्पना नव्ह्ती. जे लोकं वेळेत सेंट मायकल बंदरात पोहोचले आणि ज्यांनी अशा आगबोटीत आधीच जागा राखून ठेवली होती त्यांचा प्रश्न नव्हता पण ज्यांना आगबोटीत जागा मिळाली नाही त्यांनी वर चित्रात दिसत आहेत तशा छोट्या शिडाच्या नावा बांधायला सुरवात केली. या अशा -
हो हे खर आहे. याबाबत सविस्तर पुढ्च्या लेखात येईलच. इथे थोडक्यात लिहीते. बर्याच जणांनी सेंट मायकल बंदरात उतरल्यावर स्थानिक लोकांना सामान वहाण्याच्या कामगिरीवर ठेवलं. त्यातून बर्याच जाणांनी सोनं मिळवण्याच्या गर्दीत न धावताही बक्क्ळ पैसा जमा केला. पुढ्च्या भागांमधे येईलच सविस्तर.
तुमचे पुनःश्च धन्यवाद. जे मुद्दे लिहितांना निसटून गेले ते तुमच्या प्रतिसादाच्या निमित्ताने सविस्तर लिहिता आले.
16 May 2013 - 2:18 pm | पिंगू
झटपट श्रीमंत व्हायची गोष्ट वाचतो आहे.
17 May 2013 - 4:22 pm | अजो
मस्त लेखमाला.. पु भा प्र.. धन्यवाद.
17 May 2013 - 10:50 pm | प्यारे१
छान लेखमाला.
18 May 2013 - 2:55 am | इनिगोय
आत्ताच सगळे भाग वाचून काढले. उत्तम सुरू आहे लेखमाला.
पुलेशु.
21 May 2013 - 10:02 am | किलमाऊस्की
या मालिकेचा पुढचा भाग लिहून तयार आहे. परंतु लेखात वापरायची बरीचशी चित्रं University of Washington Photos Collection विभागाच्या मालकीची असल्याने प्रताधिकारमुक्त नाहीत. इ-पत्राद्वारे संबधित अधिकार्यांना चित्रं वापरासंबधी परवानगी विचारली आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळताच पुढचा प्रकाशित करीन.
21 May 2013 - 10:28 am | मदनबाण
सुरेख लेखमाला... :)
23 May 2013 - 9:39 am | किलमाऊस्की
या मालिकेतील पुढील भाग - क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ५