लघु कादंबरी .... करण आणि फ्रेण्ड्स...

विनीत संखे's picture
विनीत संखे in जनातलं, मनातलं
17 Aug 2011 - 2:28 pm

ही कथा मी आधीच ऑर्कुटवर पोस्ट केली होती. तुमच्या पैकी काहींनी वाचलीही असेल. पण ऑर्कुटवर मिळालेल्या टीप वापरून काही संदर्भ बदलून आज मिपावर टाकतोय... जर कथेचं अ़खंडीत रसपान करायचेच असेल तर तुम्ही इथे... https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B-UuD...
जाऊनही करू शकता...

ही कथा आहे करणची ... आपल्या तारूण्याच्या पहिल्या पायरीत उभा करण... कोवळ्या पौगंडात... तेरा ते एकोणीस अशी ही सात वर्षं आयुष्यातली सर्वात धाडसी अन स्वप्नवत. केवळ ब्लॅक आणि व्हाईटच नाही, तर ग्रे माणसं जाणण्याची ही सुरूवात. पहिल्या प्रेमाची हाक, पहिल्या चुंबनाची साद. आयुष्याची कठोर कटू सत्यं जाणून घ्यायची निकड अन ती पचवायचीही धडपड. मनातल्या बऱ्या वाईट द्वंद्वाला "आय एम कूल!" म्हणवून घालण्यात येणारी एक निष्फळ फुंकर!

करणही ह्याच द्वद्वांत कुठेतरी फसलेला. पण द्वंद्व कितीही थकवणारं असलं तरी त्याला नामोहरम करता येतं.... फक्त हवी विवेकबुद्धीची जोड... आपल्या कुटूंबाची साथ.. मित्रांची मैत्री आणि दुर्दम्य आत्मविश्वास... आपण सर्वांनी शिकावं असं काहीतरी....

---------------------------------

“आंखोमें तुम्हें बसा लिया”, टी.व्ही.वर मेनकाचं गाणं चालू होतं. निळा हिरवा समुद्र अन त्याच्या किनाऱ्यावरची ती पांढरी वाळू. त्याच समुद्राच्या पाण्यात भिजलेला कमावलेलं शरीर असलेला देखणा सुपरस्टार अनुज आणि ओलीचिंब कमनिय मेनका ह्यांचं हे मादक गाणं आजच्या घडीचं सुपरहीट गाणं होतं. कित्येक टिनेजर आणि तरूणांना मोहिनी घातलेल्या ह्या जोडीने त्यांच्या नव्या "प्यार का साथ" चित्रपटाने सफलेतेचे रेकॉर्ड्स तोडले होते. कित्येक तरूण मुली आज अनुजच्या प्रेमात अन कित्येक युवक मेनका च्या मादकतेत रंगून गेले होते.

करणही ह्याच टिनेज युवकांतला एक.

गाणं संपलं तरी करणने पडद्यावरून आपली चमकदार नजर हलवली नव्हती. तो मेनकाच्या चिंतनात उसासे टाकत, उजवा गाल तळहातावर टाकून बसला होता. मागून समीरने त्याला डोक्यावर टपली मारली.

"आऊच्च!", करण किंचाळला, "दॅट हर्ट्स!"
"मेनका!", समीरने हृदय पकडल्याचं नाटक केलं, "माय डार्लिंग! मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. माझी ४० वर्षांची म्हातारी! कवळी लाऊन सुरेख हसतेस!!!"
"दादा! गप्प बस्स हा!", करण चवताळला, "४० नाही, ३९! आणि तुलाच म्हातारी वाटते ती. परवा टीन सेन्सेशन अलिशिया म्हणाली की तिला मेनका सारखं व्हायंचय. सगळे तुझ्यासारखे नसतात. ३३ ऍण्ड स्टील सिंगल! लूक ऍट यु!" करणने जुना सूर छेडला.
"सिंगल! हह! माझ्या तर कित्येक गर्लफ्रेण्ड्स होत्या. तुझ्या वयाचा होतो तेव्हा तिघींना पटवलेलं मी... आणि बाय द वे, तुला किती गर्लफ्रेण्ड्स आहेत रे? " समीरने करणचा दुखती नस दाबली…
"ओह! येस! एक आहे ना?
पूजा प्रधान!
राईट?"

करणने डोळे वटारले...

समीरला आणखीच आवेश चढला....

"प..प्प, पूजा!.... प..प्प..प्रोजेक्टचं विचारायचं होतं.... प...प्प...पप्पी देशील का?", समीरने करणची ऍक्टींग केली. करणच्या बाजूला बसलेला त्याचा मित्र सॅवियो तोंड लपवून हसत होता. करणचं मुलींशी होणारं संभाषण त्याच्या मित्रमंडळीत आधीच थट़्टेचा विषय झालं होतं.

"काय सॅवियो! मी बरोबर म्हणतोय ना?", समीरने सॅवियोलाही मस्करीत सामिल करून घेतले.
"त्याला का विचारतोस? तो माझा मित्र आहे.", करणने सॅवियोकडे बघितलं. सॅवियोचं हास्य करण पासून लपलं नव्हतं.
"यू बोथ आर जर्क्स!", करण रागावला अन तणतणत त्याच्या खोलीत निघून गेला.

आईने पलिकडून समीरला "वयानुसार वाग!" अशी मुळूमुळू ताकिद दिली. पण सहा महिन्यांसाठी नेव्हीतून घरी आलेला समीर, प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आस्वाद घेणारा, अशी करणची थट़्टा करणं कशी सोडेल? शेवटी लहान भाऊ असतातच कशाला?

करण त्याच्या बिछान्यावरच बसून रागाने धुमसत होता. तसा इतरांनी त्याची थट़्टा करणं त्याला गैर वाटत नव्हतं पण मेनकाला ‘म्हातारी’म्हणवून समीर दादाने पुन्हा लाईन क्रॉस केली होती. मेनका करणची ड्रीमगल. करण लहान होता तेव्हाच मेनका फिल्मस्टार म्हणून नावारूपास आली. तेव्हापासूनच करण हातातले खेळणे सोडून, टिव्ही वर मेनकाची गाणी, इण्टरव्ह्यू, चित्रपट लागले की ते तल्लिनतेने बघायचा. का कुणास ठाऊक? पण तिचा चेहेरा बघताना एक वेगळाच आनंद वाटायचा त्याला. ती जाणिव अश्लील नव्हती. उलट एक कौतुक होतं. दोन वर्षांपूर्वी तिच्या "रूमानी बदन" ह्या चित्रपटावर अश्लिलतेचा आरोप करणाऱ्या काही राजकीय गुंडांनी थिएटरवर केलेल्या दगडफेकीत करणही जखमी झालेला. तरी त्याने रक्तबंबाळ अवस्थेत दुसऱ्या थियेटर मध्ये जाऊन तो चित्रपट पाहिला. त्यामुळे मेनकाला त्याच्या हृदयात लहानपणासून हळवा कोपरा लाभला होता. पहिलं पॅशनच म्हणा ना!
घरी समीरनंतर १८ वर्षांनी उगवलेलं हे शेंडेफळ आणि त्याची सोंगं घरातल्यांनी तळाहातावरच्या फोडासारखी जपली नसती तर नवलंच. करण लहान असतानाच, अगदी एक दोन वर्षाचा असेल, त्याचे बाबा हार्ट अटॅकने वारले. बिझिनेसमध्ये बराच तोटा झाला होता. मलबार हिलचे मोठे घर विकून तेव्हापासूनच आई सुलभा, मोठा भाऊ समीर अन छोटा करण हे "रूपवते कुटुंब" उपनगरात राहू लागलं. आईने बॅंकेत क्वालिफिकेशनच्या जोरावर अकांउंटण्ट म्हणून नोकरी धरली, म्हणूनच समीरचं शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकलं. करण कडून त्यांना जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या. करणला आयआयटीत जायच होतं. तसं करण अभ्यासात हुशार. त्यामुळे ती चिंता नव्हती. समीरने नेहेमी थोरला भाऊ म्हणून करणचा नीट सांभाळ केला होता. बाबा सोडून गेल्यावर १८ वर्षांच्या समीरने, अशा कठीण परिस्थितीत, आईला जमेल तेवढी मदत करून मोठा मुलगा म्हणून आपलं कर्तव्य नीट बजावलं होतं. म्हणूनच समीरने लग्नही केलं नव्हतं.

तसंही नेव्ही वाल्यांचं कौटुंबिक आयुष्य यथातथाच. काही महिने घरी काही महिने शिपवर. कुठली मुलगी अशा परिस्थितीत समीरला सांगून आली असती? तरीही, दिसण्यात ह्रितिक रोशनश्टाईल, समीर अजून अविवहित कसा हे आजूबाजूच्या लोकांना न सुटणारं कोडं होतं. आईनेही शेवटी कंटाळून नियतीसमोर हात टेकले होते. धाकट्या करणला नेव्हीत इंटरेस्ट नव्हता हे तिचं नशीब!

"मोठा आहे म्हणून काय झालं. मीही त्याच्या ल्युटिनिण्ट देशपांडेना, "चकण्या" म्हणतो तेव्हा कित्ती चिडतो तो! जर त्याला थट़्टा सहन होत नाही तर मी का सहन करावी?", करण त्याच्या कोंदट खोलीत बसून मनातल्या मनात स्वतःची बाजू मांडत होता.

तोच दारावर ठकठक झाली. समीर आणि सॅवियो आत आले.

"सॉररी ब्रो!", समीर करणच्या खांद्यावर हात टाकून बसला आणि त्याने त्याचा खांदा आपुलकीने दाबला.
"फरगेट इट यार!", सॅवियोने सांत्वनपर म्हटले.

करण काहीच बोलला नाही. दोन मिनिटं शांततेत गेली. तिघे असेच खोली न्याहळत बसले होते. तसं खोलीत बेड, टेबललँप, अभ्यासाची पुस्तकं आणि कॉंप्युटर सोडून एकच गोष्ट ठळक होती. अन ती म्हणजे भिंतींवर चिकटवलेले मेनकाचे मोठ्ठाले पोस्टर्स. डोळे बंद करूनही "सुकलेल्या फेविकॉलचा वास म्हणजे करणची खोली" असं सहज सांगता येत असे.

"चकण्या ...ल्युटिनिण्ट कमांडर ....देशपांडे.", करण म्हणाला

समीर त्यावर प्रतिक्रिया देऊ शकला असता पण त्याने करणला मनवणं जास्त महत्त्वाचं होतं. म्हणूनच तो राग गिळून समीर पुटपुटला...

"ओके! चकण्या ‘सडू’ ल्युटिनिण्ट कमांडर देशपांडे! खूष?"

करणने हसून दाखवलं. पण प्रकरण इथवरंच संपलं नाही.

(म्हणजे संध्याकाळी पिझ्झा पार्टी करायची शिक्षा समीरला ठोठवण्यात आली. अन समीरने ती आनंदात पूर्णही केली.)

*****************

भाग दोन
"काय चाल्लेय?", सॅवियोने करणला विचारलं. गेली बराच वेळ करण कॉंप्युटरवर बसून काहीतरी करत होता.
"डोमेन रेजिस्ट्रेशन करतोय मी बनवलेल्या फॅनसाईटचे... ‘मार्वलिशियस-मेनका’... कसं वाटलं नाव?"
"हम्म्म्म्म! ऑनेस्टली... ", सॅवियोने कंटाळून म्हटले, "आय डोण्ट केयर रीयली... यू नो मला मेनकाशी काहीही देणघेणं नाहीये... पण डोमेन रेजिस्ट्रेशनचे पैसे कुठून आले? मी ऎकलंयकी दीड दोन हजार लागतात म्हणून..."
"एक हजार सातशे..."
"पण आले कुठून एवढे पैसे?"
"कुठून काय? पॉकेटमनी जमवून... लास्ट मंथ वॉटर किंगडमचे मिळालेले... त्याने बराच फायदा झाला..."
"पण तू तर आला नव्हतास वॉटर किंगडमला?"
"एक्झॅटली!", करणने डोळे मिचकावले, "आईला सांगू नको पण मी एक बॅंक अकाऊण्ट ओपन केलं आणि त्याचं डेबिट कार्ड वापरतोय ऑनलाईन ट्रांस्फर साठी."
"ओह माय गॉड! एवढं मोठं कांड? फूलिंग वन्स ओन पेरेण्ट्स! यू आर सच अ वेस्ट!", सॅवियोने अविश्वासाचा भाव चेहेऱ्यावर आणला...
"ह्ह!... डोण्ट ऍक्ट सो इनोसण्ट ओके... मी त्या पैशांनी चोरून चोरून अटलिस्ट ब्रिझर तर पित नाही."
"व्हॉट़्ट डू यू मिन?", सॅवियोच्या चेहेऱ्यावर पकडले गेल्याचे भाव आले, "तू म्हणतोस की मी ब्रिझर पितो?"
"फ्रायडे सेवन्थ ऑफ फेब्रुवारी, स्पेन्सर्स गॉर्मे स्टोर, वर्सोवा... लाईम फ्लेवर बकार्डी बिर्झर... दोन बॉटल्स ... २४० रूपये... वेळ संध्याकाळी साडेसात... ", करणने यांत्रिकपणे बडबडायला सुरूवात केली...
"ओके ओके स्टॉप! ऍण्ड हाऊ डू यू नो ऑल धिस? तू तर नव्हतास तिथे?", सॅवियोच्या चेहेऱ्यावर पकडला गेल्याचा भाव आणखीच गडद झाला...
"डॅडी मम्मीपासून लपवण्यासाठी त्या ब्रिझरची पावती मॅथ्सच्या टेक्स्टबूकमध्ये लपवलेलीस... तेसुद्धा मी तुला होमवर्कसाठी दिलेल्या वहीत!"
"स्स्स्स्स्स्स्स!", सॅवियोने कपाळ पकडलं, "आय एम सच अ डम्बो..."
करणने लक्ष दिलं नाही, "ओफकोर्स यू आर! एवढी दारू प्यायल्यावर हेच होणार होतं..."
"प्लीज. ब्रिझर इज नॉट लिकर..."
"येस इट इज..."
"नो इट्स नॉट. ते फ्रूट-ज्यूस असतं. विथ ओन्ली फोर पर्सेन्ट अल्कोहॉल..."
"व्हॉटेवर! सॅवियो यू आर ऍन अल्कोहोलिक!"
"प्रॉमिस तू कुणाला सांगणार नाही..."
"जर तू पुन्हा प्यायलास तर नक्कीच सांगेन."
"नाही पिणार... ओके..."
सॅवियोचं प्रॉमिस करणला आश्वस्त करायला पुरेसं होतं पण करणच्या मनातलं मांजर क्युरियोसिटी ग्रस्त झालंच...
"एनिवेज सॅवियो...", करणला विचारू की नको असं होत असावं,
"आय मिन.. दॅट.. हाऊ डज दॅट ब्रिझर .... फरगेट ईट! … नेव्हर माईण्ड"
"दॅट ब्रिझर कशी लागते? हेच ना?", सॅवियोने मांजर हेरलंच, "का विचारतोस... मी तर अल्कोहॉलिक आहे ना? दारूड्या..."
"फाईन नाही विचारणार जा... माझी वेबसाईटच बरी त्यापेक्षा... माझ्या मेनकाची साईट... मी बनवणार आहे ती... हे बघ तिच्या नव्या पिक्चरचे फोटो... ‘इधर उधर’चे..."

सॅवियो तिचे फोटो बघायला, भुकेला सिंह ज्या उत्साहाने कोऱ्या गवताकडे जेवण म्हणून बघेल, तेवढ्या उत्साहात पुढे सरसावला. सॅवियोला मेनकात बिलकुल रस नव्हता. समीरदादा सांगतो तशी त्याला ती थोडी थोराडच वाटायची. भरपूर मेक-अप करून अन फोटो इफ्फेक्ट्स वापरून वय कमी करणे हे काही अशक्य नव्हते. पण हे सगळं करणच्या समोर बोलून दाखवण्याइतका तो काही मूर्ख नव्हता.

"छान आहे!", सॅवियो फोटोतली दूसरी हिरोईन मालविकाला बघून म्हणाला. करणने कॉंम्प्युटरवर उत्तान मालविकाला फोटोतून खोडलं अन एकट्या मेनकाची इमेज साईटवर अपलोड केली.
"परवा बॉलीवूडब्लॉग्स वर गेलेलो, तिकडे मेनकाचा फॅन क्लब आहे. तिथे मला आज सेप्शल गेस्ट म्हणून ऑनलाईन चॅटवर बोलावलंय. मी इतर नवशिक्या मेनका फॅन्सच्या प्रश्नांना उत्तर देणार आहे." करण दिमाखात म्हणाला.
"अरे पण सायन्स होमवर्क? सोलंकी मिस पट़्ट्या मारते रे होमवर्क नसेल तर!"
"माझा झालाय!"
"अरे मग इतका वेळ सांगितलं का नाहीस?"
"तू विचारलंस का?"
"तुझा होमवर्क झाला ह्याचं काय मला स्वप्न पडणार होतं? ठिक आहे. दे मग टेक्स्ट बुक. मी छापतो."
"नाहिये!"
"का? कुठे आहे?"
"दिलीय."
"कुणाला?"
"आहे कुणीतरी वर्गातल."
"कोण विनोद? हेतन? दानिश शाह? "
"नाही."

सॅवियो गोंधळला पण थोड्या वेळातच काहीतरी उमगल्यागत गाल्यातल्या गालात तिरिप आणून म्हणाला, "मित्र होय ? की मैत्रीण!
प्प.प्प...पूजा प्रधान ना?
काय?"

करण ओशाळला. त्याच्या गोऱ्या गालावर लाली चढली.

"कधी आलेली? काय बोलली? सांगना!"
"दुपारी आलेली. काही विशेष नाही. सायन्स होमवर्क केला का म्हणून विचारत होती. मी दिला!"
"आणखी काय म्हणाली?", सॅवियो उत्साहात होता.
"मी सायन्स, मॅथ्स आणि मराठीचा होमवर्क दिला... म्हणाली थॅन्क्स! रात्री परत देईन म्हणून."
"ले बिड्डू!! म्हणजे रात्री पुन्हा गुटर्गू आहे! काश मै भी मेरा होमवर्क टाईमपे करता तो मेरे भी घर लडकियां आतीं ..."
"ए आता जन्नत ट्रॅव्हेल्स सुरू नको करूस हा... आधीच नऊ वाजलेत... घरी जा बाबा... आणि काहीतरी निळं कर पांढऱ्यावर... सोलंकी मिसला कोरी वही दाखवलीस तर त्या तुला खरी ‘जन्नत’ दाखवतील.... "
सॅवियो त्रागा करत उठला, दरवाज्याशी जाऊन, "उद्या भेटूया! रात्री काय काय झालं ते सांग तेव्हा!" असं म्हणून निघून गेला.

सॅवियो नाहीये तर करणला पुढचे काही तास शांतता मिळणार होती. समीर अजून ऑफिस मधून आला नव्हता. सुट़्टीवर आला असताना समीरदादा, मनोहर मामांना कामात मदत करायला म्हणून त्यांच्या ऑफिसात जाई. "मोहिते फायनान्स कन्सल्टण्ट" चे एम.डी. "मनोहर मोहिते" हे आईचे चुलते. तिचे एकमेव जवळचे नातेवाईक...
आता समीर नाहीये म्हणजे घरी शांतता होणारच होती. तिकडे आई किचनमध्ये बिझी.

करणने बॉलीवूडब्लॉग्स.कॉम वर लॉगिन केलं. "क्रेझीकरन" ह्या नावाने प्रोफाईल बनवला. पाच दहा मेनका फॅन्स आधीच लॉगिन झाले होते. ग्रुप चॅट सुरू झाला.
ऍडमिनिस्ट्रेटर: वेल्कम टू द बिग्गेस्ट मेनका फॅन एव्हर! अवर क्रेझीकरन!!!
क्रेझीकरन: हाय फ्रेण्ड्स!
वैशाली२००२: हाय क्रेझीकरन. तू मेनकाचा फॅन कधीपासून झालास?
क्रेझीकरन: लहान असल्यापासून. आई म्हणते की मी एक दोन वर्षांचा असेन तेव्हापासूनच तिचे पोस्टर बघून बोट दाखवायचो. गाण्यांवर डांस करायचो. टि.व्ही. वर तिचे पिक्चर लागले की तीन तीन तास टि.व्ही. समोर बसून रहायचो. हलायचो नाही.
वैशाली२००२: हाऊ नाईस!!
कूल-आनंद: मेनकाचे काय फिचर्स तुला आवडतात?
क्रेझीकरन: सगळेच. तिचे डोळे, ओठ, आवाज. तिचा केस फिरवण्याचा अंदाज. डांस, ऍक्टींग सगळच!
कूल-आनंद: बूब्स, बट़्ट?
क्रेझीकरन: हाहा! बी सिरियस! त्यापेक्षाही बरंच काही चांगलं आहे तिच्याकडे.
ढोकलारॉक्स: शी इज गुजराती ना?
क्रेझीकरन: हो! तिच्या आईकडून. तिचे बाबा मराठी आहेत.
ढोकलारॉक्स: म्हणजे हायब्रिड-गुजराती?
वैशाली२००२: पण तिचे बाबा नंतर त्यांना सोडून गेले म्हणे.
क्रेझीकरन: हो खरंय ते! तिथूनच तर तिने स्वतः घराचा भार उचलला. सुरूवातीचे फ्लॉप चित्रपट तिने पैसा मिळावा यासाठीच केले.
फझ्झीफ़ातिमा: हो तिचा तो पहिला पिक्चर लवबर्ड्स. फ्लॉप!
क्रेझीकरन: अगं असं नको बोलूस. त्यातला तो आत्महत्येचा सीन आठवतोय? त्या परफॉर्मन्स मध्ये कित्ती परिपक्वता होती.
केशवकमल: मला तर तिचा पहिला हीट "ममता" आठवतो…. आणि “बेवफा”.
क्रेझीकरन: येस इंडिड! दोन्ही जासिम खान चे पिक्चर्स होते. त्यात आपल्या बाळाला सोडून युद्धावर जाणारी आई कित्ती छान रंगवली आहे तिने. असं वाटत होतं की ती त्या बाळाची खरी आई असावी. जासिम खान तिला नेहेमीच चांगले रोल्स देतो.
फझ्झीफ़ातिमा: पण त्यानंतर तिने एवढे सशक्त रोल्स केले नाहीत, ग्लॅमरसच राहिली.
क्रेझीकरन: तू तिचा तमिळ "कालक्षणम" विसरलीस. कॅन्सरग्रस्त मुलीची व्यक्तिरेखा कित्ती छान केली तिने. लोकं तर त्या चित्रपटाला तमिळमधला "आनंद" म्हणत होती.
फझ्झीफ़ातिमा: दॅट्स ट्रू!
ब्लॅकवल्चर: पण तिच्या खाजगी आयुष्याविषयी तुला किती माहित आहे?
क्रेझीकरन: मला नीट कळलं नाही?
ब्लॅकवल्चर: तिच्या खाजगीतल्या गोष्टी. म्हणजे तू तिला तिचा फॅन म्हणवतोस. तुला तिची काही गुपितं माहित असतीलच!
क्रेझीकरन: गुपितं! म्हणजे काय विचारायचे ते नीट विचार.
ब्लॅकवल्चर: ओके. मग तिचा पहिला चित्रपट कुठला?
ढोकलारॉक्स: सगळ्यांना महितीये. लव्ह्बर्ड्स!
क्रेझीकरन: नाही. एक मिनिट. तिचा पहिला चित्रपट आहे "तूफान". पण तो लव्हबर्ड्सच्या नंतर रिलीज झाला.
ब्लॅकवल्चर: छान! आता सांग तिचं शिक्षण किती अन कुठे झालं?
क्रेझीकरन: बडोद्यात. न्यू नरसी स्कूल, सेण्ट पायस मेडीकल कॉलेज, एम.बी.बी.एस. सेकंड ईयर.
ब्लॅकवल्चर: उत्तम! तिचा पहिलं अफेयर?
क्रेझीकरन: अनुज कुमारच! "ममता" पासून!
ब्लॅकवल्चर: नाही, म्हणजे फिल्मी बिझिनेस च्या बाहेर!
क्रेझीकरन: असं ऎकलं आहे की तिचा कॉलेजात बॉयफ्रेन्ड होता.
ब्लॅकवल्चर: हो. त्याचं नाव गौतम दोशी. तो आता अमेरीकेत एका मल्टीनॅशनल फार्मास्युटीकल कंपनीचा प्रेसिडेंट आहे.
क्रेझीकरन: ग्रेट! यू नो हिम?
ब्लॅकवल्चर: तिच्या वयाच्या बावीस वर्षापर्यंत तो तिच्या सोबत होता. नंतर सोडून गेला.
क्रेझीकरन: ओके. दॅट्स सॅड!
ब्लॅकवल्चर: का सोडून गेला माहितीये?
क्रेझीकरन: नाही. का?
ब्लॅकवल्चर: तिचं दुसऱ्याशी अफेयर होतं! ती प्रेगनण्ट राहिली होती त्या दुसऱ्याकडून!

करण चमकला...

क्रेझीकरन: व्हॉट रब्बीश!!!
ब्लॅकवल्चर: एवढंच नाही तर तिनं अबॉर्शन न करवता ते मूल जन्माला घातलं अन सोडून दिलं.

करण अस्वस्थ झाला. हे नवीनच होतं.

क्रेझीकरन: आय डोण्ट बिलीव्ह धिस? एनी प्रूफ?
ब्लॅकवल्चर: प्रूफ! अरे हाडामासाचा तिचा मुलगा असताना प्रूफ कशाला पाहिजे? मीच आहे तो! तिचा टाकलेला मुलगा. चांडाळणीने मला वाळीत टाकून दिले. दॅट स्लटी बिच्च!!!

करणचे हात थरथरू लागले. हे अनपेक्षित होतं. काय करावे हे न सुचल्याने करणने ताबडतोब स्पॅमर दाबला अन ब्लॅकवल्चरला ब्लॉक केले. त्याचं डोकं भणाणत होतं. त्याच्या सगळ्या संवेदना मंद पडल्या होत्या. चॅट रूममधले इतर फॅन्स ब्लॅकवल्चर ला शिव्या घालत होते. पण आधीच करणने ब्लॉक केल्याने ब्लॅकवल्चर निपचित होता थोड्यावेळातच ऍडमिनिस्ट्रेटरने त्याला चॅटरूम बाहेर हाकलले. तो लॉग आऊट झाला.

करण कितीतरी वेळ असाच मॉनिटरकडे पाहत होता. त्याच्या नावापुढचा कर्सर आता नुसतीच उघडझाप करीत होता.
"हाऊ डेयर ही!", करण रागाने शहारला होता, "मेनकाच्या खाजगी आयुष्यावर कसा कुणी असा गलिच्छ आरोप करू शकतो? नक्कीच हा कुणीतरी माथेफिरू आहे...", त्याचं मन सांगत होतं. पण एक दुसरा विचार बोलू लागला, "त्याला तिच्या जुन्या बॉयफ्रेण्डच नाव माहित होतं. जर हे खरंच असेल तर....?"

नसत्या शंकानी त्याच्या मनात कल्लोळ माजवला होता. त्याचं दैवत लांच्छनी लागलं होतं. रागात त्याच्या मुठी आवळत होत्या. रागाच्या भरात त्याला दारवरची टकटकही ऎकू आली नव्हती.

"हाय!", एक परिचित आवाज ऎकू आला, "मी आत येऊ का?".

करणने धीर धरला अन स्वतःला सावरून म्हटलं, "या प्लीज कम ईन!"

दार हललं अन एक प्रसन्न चेहेरा आत शिरला.

पूजा प्रधान!

"थॅन्क्स! तुझा होमवर्क चांगला होता. बरीच मदत झाली.", पूजा करणला त्याच्या वह्या सोपवत म्हणाली. करण पेक्षा थोडी बुटकी. तांबटभोर केस. गोल गोरा चेहेरा. पिंगट डोळे अन गुलाबी ओठ. फिकट निळ्या कुर्ता अन जीन्स मध्ये जणू एखादी बाहुलीच वाटावी. चेहेऱ्यावर नेहेमीची प्रसन्नता. आवाजात नेहेमीचा गोडवा. स्वभावात नेहेमीची शालीनता.
करणसारख्याला पूजा प्रधान सारखी मुलगी भाव देते ह्याचं करणच्या मित्रमंडळींना उगीच अप्रूप नव्हतं.

"थॅन्क्स!", करण उभा राहत म्हणाला, "आय मिन वेलकम... ऍण्ड थॅन्क्स टू!"
पूजा थोडक्यात हसली. "मी निघते!", पूजा म्हणाली अन जायला वळली.
"का?" ऎवजी "ओके!" असा करणच्या तोंडून शब्द पडला. करण आणखी शब्दांची जमवाजमव करणार तोच पूजा मागे वळली. बोलायच्या आवेशातलं करणचं तोंड दोन मिनिटं उघडंच राहिलं...
"वन अपॉन साईन हा कोसाईन असतो. तुझ्या दहाव्या गणितात कोसेक लिहिलास तू. म्हणजे ते चुकलंय. नंतर करेक्ट कर!", पूजा म्हणाली.
तिच्या पिंगट डोळ्यांत पाहत करण गुंगच झाला. गणिताच्या गोष्टीही तिच्या तोंडून गोड वाटत होत्या.
"ओके वेलकम! .. थॅन्क्स", गोंधळून करणने म्हटले. अजूनही सही शब्दांची जुळवाजुळव होत नव्हती. मेंदूचा तोंडाशी संपर्क जणू तुटल्यातच जमा होता. करणचा मेंदू, त्याचे पूजाला पाहणारे डॊळे अन तिला ऎकणारे कान, हेच सांभाळण्यात जास्त बिझी असावा!

"बाय. गुड नाईट!", तिनं मधाळ आवाजात निरोप दिला.
"बाय!" करणने हात हलवला, "हॅव स्वीट ड्रीम्स!"...
अचानक आपण तिला "स्वीट ड्रीम्स!" म्हटल्याचे जाणवून करण लाजला. आज पहिल्यांदाच करणने तीन शब्दांचं वाक्य तिच्याशी नीट म्हटलं होतं.

तिनेही त्यावर हसून दाद दिली अन रातराणीच्या फुलांच्या सुगंधासारखी ती करणच्या संवेदना दरवळून निघून गेली.

हा सुगंध समीर येईपर्यंत दरवळत होता....

*******************

(पुढचा भाग इथे ... http://www.misalpav.com/node/18855)

कथालेखभाषांतर

प्रतिक्रिया

अप्रतिम लिहिले आहे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत ...

वन अपॉन साईन हा कोसाईन असतो. तुझ्या दहाव्या गणितात कोसेक लिहिलास तू. म्हणजे ते चुकलंय. नंतर करेक्ट कर!",

या एकाच वाक्याने सरकन सगळे मागचे ज्यु. कॉलेजचे दिवस आठवले..

थँक्स .. "आय मिन वेलकम बॅक... ऍण्ड थॅन्क्स टू!"

नावातकायआहे's picture

17 Aug 2011 - 3:03 pm | नावातकायआहे

प्र.का.टा.आ.

शाहिर's picture

17 Aug 2011 - 3:11 pm | शाहिर

..

अमर's picture

17 Aug 2011 - 10:22 pm | अमर

सर्वात जास्त आवदलेलि कथा

विनीत संखे's picture

21 Aug 2011 - 8:01 pm | विनीत संखे
क्राईममास्तर गोगो's picture

18 Oct 2011 - 7:23 pm | क्राईममास्तर गोगो

तुमचे पोस्ट पाहिले त्यात ही सापडली. गेले दोन आठवडे वाचत होतो. शेवट आज ऑफिस मध्ये काम सोडून वाचला.

काय कथा आहे हो भाऊ.... मस्तच... हीला मिपावर इतका थंड प्रतिसाद कसा काय हो मिळाला?

:-०

हीला मिपावर इतका थंड प्रतिसाद कसा काय हो मिळाला? ?

त्यांनी पोस्ट चा रतीब घातला..
कथा चांगली आहे .. पण सलग पोस्ट केल्यामुळे वाचकांना वेळ मिळाला नाही ...
जालिय वाचक आणि पुस्तक वाचक या मधे हा फरक आहे ..

अवांतर : सगळ्यानांच तुमच्यासारखा "ऑफिस मध्ये काम सोडून" वाचायला जमत नाही ..

विनीत संखे's picture

19 Oct 2011 - 11:24 am | विनीत संखे

हो. तेव्हापासून मी माझ्या मोठ्या कथा मिपावर टाकणे बंद केले आहे.

किसन शिंदे's picture

19 Oct 2011 - 11:36 am | किसन शिंदे

संखे, त्या कथांची लिंक मिळेल काय??

विनीत संखे's picture

19 Oct 2011 - 12:41 pm | विनीत संखे

पाठवतो. त्यांना मी गुगल डॉक्सवर टाकले की मी तुम्हाला व्यनीने देतो.

आत्मशून्य's picture

19 Oct 2011 - 5:12 pm | आत्मशून्य

डोक्स पेक्षा त्याची पिडीएफ करून अपलोड ठेवाना. तसच जर कथा लिहली आहेच तर मिपाला फक्त कॉपी पेस्ट करायचेच तर कश्ट लागतात, केवळ प्रतीसाद नाहीत म्हणून कथा बंद करू नका आज ना उद्या लोकांना आवडेलच.

त्या कथांची लिंक मला पण व्यनी कराल का ?

विनीत संखे's picture

19 Oct 2011 - 5:31 pm | विनीत संखे

ओके मॅम

क्राईममास्तर गोगो's picture

19 Oct 2011 - 6:05 pm | क्राईममास्तर गोगो

मला पण!

क्राईममास्तर गोगो's picture

8 Dec 2016 - 6:33 pm | क्राईममास्तर गोगो

अहो विनीत भाऊ कथा डाऊनलोड कशी करू? मिसेस वाचायला मागतेय. ;-)

व्यनि किंवा प्रतिक्रियांवर तुमचा काहीच रीस्पाँस नाहिय?

ईतर कुणी डाऊनलोड केलिय का? मला ईमेल कराल?

विनीत संखे's picture

10 Dec 2016 - 7:23 pm | विनीत संखे

Mi access dilay. Plz check.

क्राईममास्तर गोगो's picture

12 Apr 2018 - 10:25 pm | क्राईममास्तर गोगो

संखे साहेब... कुठे आहात तुम्ही... तुम्हाला व्यनी केला, खरडलं ... ईमेल पण पाठवला ...

विनिता००२'s picture

12 Dec 2016 - 4:36 pm | विनिता००२

विनीतजी,
कथा चांगली आहे. पण काही ठिकाणी काही शब्द चुकीचे वापरले गेले आहेत.
उदा. हपापलेले असा शब्द वापरला आहे पण तिथे तो सूट होत नाही.

कृपया परत एकदा वाचून एडीट करावेत.

विनीत संखे's picture

12 Dec 2016 - 10:53 pm | विनीत संखे

नक्कीच बदल करेन. धन्यवाद. अजून काही बदल असतील तर व्यनि करून कळवावे.