ही गोष्ट आहे या चित्रातल्या घराची. अगदी "खेड्यामधले घर कौलारू" म्हणण्यासारखं घर. कौलारू असलं तरी खेड्यातलं नाही. चांगलं रत्नागिरीत आहे. हे घर आहे माझ्या आजोबांचं. खरं तर त्यांच्या वडिलांचं. म्हणजे माझ्या पणजोबांचं.
रत्नागिरीत वरची आळी तयार होण्यापूर्वी रहाट आगर नावाचा गाव होता तेव्हा तिथे बापटांची अनेक घरं होती. त्यातलं एक मोठं चौसोपी घर होतं माझ्या पणजोबांचं. माझे पणजोबा त्या काळात म्हणजे १९०० च्या आसपास रत्नागिरीतले प्रख्यात वकील होते. तेव्हापासून या घराला नाव पडलं "बापट वकिलांचं घर." पणजोबा म्हणजे रत्नागिरीतली मोठी असामी. बर्यापैकी पैसे बाळगून होते. केवळ हौस म्हणून उतारवयात त्यानी दुसरं लग्न केलं. शेरांत मोजण्याइतकं सोनं घरात होतं पण पणजोबा वारले आणि नंतर त्यांच्या दिवाणजीनी सगळं सोनं नाणं, मालमता हडप केली असं म्हणतात. त्यांचा मोठा मुलगा म्हणजे माझे आजोबा. घर सावत्र आईला देऊन ते घरातून बाहेर पडले.
आजोबा घरातून बाहेर पडल्यानंतर आजोबांचे सावत्र धाकटे भाऊ पोटापाण्याच्या पाठीमागे दूर इंदौर-पुण्याला निघून गेले. चौसोपी घराचा अर्धा भाग आजीच्या बहिणीला विकला गेला. त्या भागात त्यानी चाळ तयार केली. मूळ घर पडायला लागलं. तेव्हा आजोबांच्या भावांनी आजोबांना तिथे, म्हणजे मूळ घरात येऊन रहायला सांगितलं. आजोबांनी राहिलेल्या ३ खोल्यांची डागडुजी करून घराची पडझड थांबवली. घराच्या आजूबाजूला थोडी मोकळी जागा होती. तिथे एक चिंच, एक आंबा, एक माड अशी झाडं होती. आजीने तिथे एक फणस, एक माड, एक आवळी अशी आणखी काही झाडं लावली. घर परत नीट नांदू लागलं. या आजीला आम्ही 'जुनी आजी' म्हणायचो, तर आईच्या आईला 'नवी आजी'.
माझे आजोबा सुद्धा वकील. पण त्यानी जन्मात कधी वकिली केली नसावी. केली असलीच तर चालली नसेल. कारण राष्ट्रीय शिक्षणाची शाळा काढा, सावरकरांच्या समाजकार्यात सामील व्हा, ब्रिज खेळा हे उद्योग त्याना पूर्णवेळ गुंतवून ठेवत. पण घराला "बापट वकिलांचं घर" हे नाव चिकटलं ते चिकटलंच. मी लहान असताना "बापट वकिलांची नात का तू?" असं कितीतरी लोक विचारीत असत. आता ती सगळी पिढीच काळाच्या पडद्याआड झाली. पण अजूनही जुने रत्नागिरीकर बापट वकीलांच्या मुलांनातंवंडांना ओळखतात. तर आजोबांचा संसार हळूहळू वाढत गेला. माझे वडील म्हणजे 'दादा' रत्नागिरीजवळच्या बसणी नावाच्या एका गावात हायस्कूलवर हेडमास्तर म्हणून नोकरीला लागले. आईला पण त्याच शाळेत नोकरी लागली. २ काका नोकरीसाठी वर्धा इथे निघून गेले. आणखी एक काका आजीआजोबांजवळ रत्नागिरीच्या घरात राहिले. आत्याचं लग्न होऊन ती सासरी पुण्याला गेली.
बसणीला आम्ही ज्या घरात राहिलो, त्या घराबद्दल आणखी केव्हातरी सांगेन. ते पण कायमचं जिव्हारी लागून राहिलेलं घर आहे. पण आता या गोष्टीतल्या माझ्या आजोबांच्या घराबद्दल सांगते. तर दर वर्षी दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही आजीआजोबांकडे रत्नागिरीला जायचो. घराच्या अंगणात तर्हेतर्हेचे खेळ रंगायचे, पण सगळ्यात मजा यायची ती आजीच्या फडताळात आणि काकांच्या जुन्या लाकडी कपाटात काय खजिना लपवलाय हे शोधायला. तिथेच मी सगळ्यात पहिल्यांदा सावरकरांचं वाङमय आणि पुरंदर्यांच्या 'राजा शिवछत्रपती'चे खंड वाचले. वर्धेचे काका क्वचित कधीतरी यायचे. शेजारच्या जरा लांबच्या नात्यातल्या काकांकडे पण आणखी चुलतभावंडं यायची. मग आमचा पत्त्यांचा डाव घराच्या ओट्यावर रंगायचा. एक रुपया तिकिटात कुठचा लागलेला असेल तो सिनेमा बघायचा. रोज संध्याकाळी समुद्रावर जायचं. नुसती धमाल चालायची.
मध्यंतरी जागा कमी पडते म्हणून दादांनी मूळ घराला जोडून आणखी २ खोल्या बांधल्या. आणखी एक आंब्याचं कलम लावलं. काकांनी पोफळी, चिकू, पपनस, डाळिंब, सोनचाफा, प्राजक्त अशी आणखी काही झाडं लावली. घर सुखात नांदत होतं. 'आपलं घर आहे, दुसरं घर कशाला बांधा?' असं म्हणत माझ्या दादांनी लोक सांगत असतानाही दुसरं घर नाहीच घेतलं. काळाप्रमाणे आजोबा देवाघरी गेले. आमचं सुटीत रत्नागिरीच्या घरात जाणं चालूच राहिलं. पण मी दहावीत असताना अचानक दादा हार्ट अटॅकने गेले. त्यावर्षीच्या सुटीत मन गुंतवण्यासाठी मी भरतकाम शिकले. मग रंग आणि रेषांशी गट्टी जमली ती कायमची. नंतरच्या काही वर्षांत इंदिरा गांधी, सुनील गावस्कर, कपिलदेव अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींची पेन्सिल स्केचेस मी काढली.
दादांच्यानंतर आणखी ३ वर्षांत माझा मोठा भाऊ सुद्धा गेला. मग माझ्या आईने राहिलेल्या २ मुलांना घेऊन रत्नागिरीच्या घरात आसरा घेतला. मूळ घर आणि आमच्या २ खोल्या यातला दरवाजा कायम उघडाच असायचा. चुली २ असल्या तरी घर एकच होतं. दादांनी लावलेला आंबा आता चांगला धरायला लागला होता. २ चुलतबहिणी आणि आमची शिक्षणं चालू राहिली. यथावकाश आमची शिक्षणं संपून नोकर्या सुरू झाल्या. मग लग्न होऊन सगळे आपाआपल्या वाटांनी चालू लागले. पण त्यापूर्वी मला ३ नोकर्यांची कॉल लेटर्स एकाच दिवशी आली ती याच घरात. लग्नाआधी नवर्याबरोबर कोवळी मैत्री होती तेव्हा त्याला पावभाजी खायला बोलावला ते याच घरात. आणि लग्न ठरल्यावर कोजागिरीला गप्पा मारत बसलो ते याच घराच्या अंगणात. लग्नासाठी मी बाहेर पडले ते याच घरातून आणि नंतर लगेच कॅन्सरशी जीव दमवणारी झुंज देऊन आई परत आली ती याच घरात. आणखी एका वर्षात जगातलं सगळ्यात सुंदर बाळ घेऊन हॉस्पिटलमधून मी आले ती याच घरी. घराने ५ व्या पिढीला पाहिलं आणि त्याचा जीव हरखला. आणखीही भले बुरे, कधी घ्ररातल्या माणसांची परीक्षा पाहणारे अनेक प्रसंग घराने अनुभवले. कधी ते सग़ळ्याचा मूक साक्षीदार असायचं, तर कधी त्या प्रसंगातलं एक पात्र.
हळूहळू आम्ही सगळीच चुलतभावंडं आपापल्या संसारात गुरफटत गेलो. मुलांच्या शाळा सुरू झाल्या. तरी अधूनमधून रत्नागिरीला जाणं चालू राहिलं. काही वर्षानी आर्थिक स्थैर्य आल्यावर मीही रत्नागिरीत फ्लॅट घेतला. आई भावाबरोबर त्याच्या नोकरीच्या गावी निघून गेली. पण नातसुनेबरोबर कुरबूर झाली की "आपण दोघी रत्नागिरीला जाऊन राहूया" असा आग्रह नवी आजी आईजवळ धरायची ती याच घराच्या जिवावर. मग दोन्ही चुलतबहिणी लग्न होऊन नवर्यांच्या गावांना गेल्या. त्यांचे संसार वाढले, आणि घरात काकाकाकू दोघंच राहिले. दरवेळेला रत्नागिरीला गेलं की घरी एक फेरी व्हायचीच. तेव्हा मुलं पण कपाटातला आणि माळ्यावरचा खजिना शोधायची. त्यात त्यांना जुनी पत्रं, पुस्तकं, माझी खेळणी काय काय सापडायचं. त्यांनाही तेवढीच मजा यायची.
मुलं मोठी होत होती. तसं रत्नागिरीला जाणं कमी होत होतं. काका काकूचं त्यांच्या संसाराचं सुखदु:खाचं रहाटगाडगं सुरू होतंच. एकीकडे रत्नागिरीही बदलत होती. राजकीय गुंडगिरी सुरू झाली होती. जुनी घरं पाडून तिथे अपार्टमेंट्स बांधायचा धडाका चालू झाला होता. अशी अनेक घर काळाच्या उदरात गडप झाली. स्वा. सावरकर ज्या घरात रहात होते, ते घर पाडून तिथेही कॉम्प्लेक्स उभा रहाताना पाहिला तेव्हा जीव कासावीस झाला. रहाटआगर गावातल्या बापटांच्या घरांपैकी आता फक्त बापट वकिलांचं घर शिल्लक राहिलं होतं.
हल्लीच अचानक शेजारच्या रानड्यांनी त्यांचा राहता मोठा वाडा एका बिल्डरला विकला. या बिल्डरची दृष्टी शेजारच्या जागेतील बापट वकिलांच्या घराकडे न वळती तरच नवल! त्याने दूरवर असलेल्या काका आणि चुलतकाकांना चांगले पैसे देण्याची खात्री दिली. बरेच काका घर विकायला तयार झाले. त्यांना काही हासभास नसताना त्यांच्या हिश्श्याचे पैसे मिळणार आहेत. आता तिथे रहातायत त्या काकांना स्वस्तात एक फ्लॅट मिळणार आहे. त्या दोघांचं इतक्या वर्षांचं घर सोडून आता म्हातारपणात फ्लॅट तयार होईपर्यंत भाड्याच्या घरात रहावं लागणार आहे. फ्लॅट ताब्यात मिळेल तेव्हा नव्या फ्लॅट संस्कृतीशी जमवून घ्यावं लागणार आहे. ही गोष्ट वगळता, भावाच्या डोक्याचा ताप नाहिसा होणार आहे हे महत्त्वाचं. २ काकांना पैश्यांची जरूर आहे, त्यांचीही सोय होणार आहे. बिल्डरला बाजारभावाने कमीत कमी दीड कोटींचा फायदा होणार आहे. बहुजनांच्या सोयीचा असाच हा मामला आहे. म्हणजे तो चांगला असणारच. पण घर पाडलं जाणार हे कळल्यापासून मला ही रुखरुख का लागली आहे? माझ्या वडिलांचं-दादांचं स्वप्न संपणार आणि माझ्या डोक्यावरची सावली जाणार असं का बरं वाटतंय?
मुलांना जेव्हा सांगितलं तेव्हा त्या दोघांचा एकच प्रश्न होता. "पण घर कशाला पाडायचं?". या जगाचा व्यवहार कळायला त्यांना अजून बरीच वर्षं उलटावी लागतील. परवाच रत्नागिरीला जाऊन भावाला 'पॉवर ऑफ अॅटर्नी' देऊन आले. मुलीने घराचे, दादांनी लावलेल्या आंब्याचे फोटो काढले. काकूजवळ तेव्हा जास्त काही बोलले नाही. मला परत इथे यायची हिंमत होणार नाही हे कोणत्या तोंडाने तिला सांगणार होते? मुलीने आणि तिच्याबरोबर मीही सहजच, टाकून देण्यासाठी काढलेल्या कॅसेटस, अंक याच्या ढिगात आमचा खजिना शोधायचा उद्योग चालू केला. आणि उत्खनन सुरू करताक्षणी काय हाती लागलं? मी १९८२-८५ च्या काळात काढलेली इंदिरा गांधी, सुनील गावस्कर आणि इतरांची पेन्सिल स्केचेस, आणि दादा ज्या गोष्टींमुळे बापट सर म्हणून प्रसिद्ध झाले त्या गोष्टी, त्यांच्या एम्.ए. आणि बी.एड. च्या डिग्र्या! गेली कित्येक वर्षं घरी गेल्याबरोबर प्रत्येक वेळेला न चुकता मी या चित्रांचा शोध घेत असे, पण २५ वर्षं ही चित्रं मला कधीच सापडली नव्हती. यावेळेला मात्र चित्रं उचलली आणि घराच्या भिंतीवरून एकदा हात फिरवून बाहेर पडले. माझी आई शोभली असती अशा एका जुन्या मैत्रीण्-शेजारणीबरोबर थोड्या गप्पा केल्या. तिला मात्र सांगितलं, मी परत कधी इथे येणार नाही म्हणून. आणि मनात एक वादळ घेऊन परत फिरले ती अजिबात मागे वळून न पहाता, डोळ्यात आलेलं पाणी लपवीत.
रत्नागिरीहून परत आले ती एक अस्वस्थता सोबत घेऊनच. माझ्याकडे पूर्वीपासूनचे खूप आल्बम्स आहेत. त्यात दादांचा फोटो जरी नसला तरी नव्या आजीचा आहे. घरच्या गोंडस मांजरीचा फोटो आहे. सुरुवातीच्या काही आल्बम्समधे डोळ्यात स्वप्न भरलेल्या, एका नवीन लग्न झालेल्या मुलीचे आणि तिच्या प्रेमात हरवलेल्या तिच्या नवर्याचे फोटो आहेत. आणखी काही आल्बम्समधे वाढणार्या २ मुलांचे असंख्य फोटो आहेत. एका अतिशय दु:ख देऊन परत न येण्यासाठी निघून गेलेल्या गुणी बोक्याचे फोटो आहेत. या फोटोंमधे आता रत्नागिरीच्या घराचे आणि दादांनी लावलेल्या आंब्याच्या झाडाचे फोटो यांची भर पडली आहे.
आणखी ४ दिवसांत अॅग्रीमेंटचे सोपस्कार पुरे होतील. बिल्डरने १८ फ्लॅट्स चा प्लॅन सुद्धा तयार केला आहे. लगेच घर पाडलं जाईल. पणजोबांनी, आजीने, दादांनी लावलेली झाडं तोडली जातील. लवकरच तिथे १८ फ्लॅट्सवाली बिल्डिंग उभी राहील. तिथल्या ५५० स्क्वेअर फुटांच्या घरांची दारं सदोदित बंद असतील. आई किंवा काकू घरी नसली तरी शेजारी कोणाकडेही जाऊन "मला जेवायला वाढा" म्हणायची पद्धत तिथे असणं शक्यच नाही. रत्नागिरीतला 'बापट वकील यांचे घर' हा पत्ता पोस्टाच्या माहितीतून नाहिसा होईल. जगाच्या दृष्टीने येऊन जाऊन एवढाच काय तो बदल.
रत्नागिरीहून परत आल्यापासून सतत घराचा, काका काकूंचा आणि मी काढलेली स्केचेस २५ वर्षांनी आता अचानक सापडावीत याचा विचार करते आहे. इतकी वर्षं घर होतंच, पण अबोलपणे एखाद्या व्यक्तीसारखं ते माझ्या मनात येऊन राहिलं आहे हे आताच कळलं. माझ्या आजोबांचं, आजीचं, दादांचं घर आता रत्नागिरीत नसेल या विचाराने मुळातून उखडलेल्या झाडाला कसं वाटत असेल याचा अनुभव घेत होते. आणि आज सकाळी अचानक साक्षात्कार झाला, मी काढलेली स्केचेस २५ वर्षांनी सापडावीत याचा अर्थ हा, की ही या घराने मला दिलेली कोसळण्यापूर्वीची शेवटची भेट आहे. न जाणो, इतकी वर्षं घराने माझी चित्रं उराशी धरून सांभाळून ठेवली होती, पण आता मूकपणे जणू त्याने मला सांगितलंय की ही तुझी ठेव आता परत घे, माझे दिवस संपले! आणखी म्हणावं तर ही चित्रं आणि त्याच्याबरोबर दादांची डिग्री सर्टिफिकेट्स एकदम सापडावीत यातून मला जणू काही दादांनीच संदेश दिलाय की दगड मातीचं घर पडलं तरी काय झालं, त्यांचा हात माझ्या डोक्यावर कायम आहे आणि राहील!
प्रतिक्रिया
22 May 2011 - 12:22 pm | साधामाणूस
सुंदर!
22 May 2011 - 12:35 pm | मृत्युन्जय
मनातल्या भावना अतिशय सुंडर मांडल्या आहेत. तुमच्या आठवणींच्या आनंदात आणि घराच्या दु:खात मी सहभागी आहे असे समजा. :)
23 May 2011 - 5:35 am | निनाद
हेच म्हणतो. पण सहजरावांच्या सुचवण्या मनावर घ्याच!
22 May 2011 - 2:33 pm | सहज
छान लिहलेय. अर्थात हे असे घडणे स्वाभावीक आहे.
पण काही गोष्टी तुम्ही लोक ठरवून करु शकाल किंवा करु शकला असता त्याम्हणजे बिल्डरशी करार करताना
१) (ऐकायला विचित्र वाटेल पण) बिल्डींगचे नाव 'बापट वकीलांचे घर' किंवा तत्सम नाव देउन ती स्मृती जतन करता आली असती / येईल.
२) जुन्या घराचे नाव असलेली पाटी उदा. नाव - इसवीसन असा उल्लेख अपार्टमेंटच्या प्रवेश भिंतीवर करणे
३) जी झाडे वाचवता येतील ती वाचवणे किंवा दुसर्या जागी पुनर्रोपण करणे.
४) तुम्हाला जुन्या घराची आठवण येईल असा प्रदर्शनीय भाग करणे किंवा जुन्या घर/परिसरातील काही गोष्टी जसे तुळशी वृंदावन पुन्हा वापरणे. जुन्या घरातील लाकूड, दगड, मेटल वापरुन आपल्या फ्लॅट तसेच बाहेर गझीबो असे काहीसे. की ह्या जुन्या आठवणी अगदीच नष्ट न व्हाव्या.
५) एन्ट्रान्स लॉबी मधे ह्या इतिहासाची एक झलक उभारणे, फोटो, माहीती देणे.
नवीन फ्लॅट बद्दल अभिनंदन!!
23 May 2011 - 5:29 am | निनाद
फार छान सुचवण्या आहेत, सगळ्याच आवडल्या!
झकास आहे. जमल्यास नक्की करा!
ही खास आवडली. पैसाताई हे जमले तर कराच!
24 May 2011 - 5:22 am | धनंजय
छान सुचवण्या.
स्केचेस तरी आहेतच, म्हणा.
22 May 2011 - 3:20 pm | प्रास
मनोगत अगदी सुंदर उतरलं आहे. शब्दन्शब्द त्या पिढीजात घराबद्दलच्या आत्मीयतेने नटलाय.
काही गोष्टींना थोपवणं फारच कठीण होऊन जातं हेच खरं......
जुन्या घरासारखं नवं घर होणार नाही पण नव्या घरात जुनं घर टिकवण्याची जबाबदारी कदाचित तुम्हाला घ्यावी लागेल, मग मी पुन्हा इथे येणार नाही असं म्हण्टलंत तरीही......
22 May 2011 - 4:17 pm | सविता००१
खूप मनापासून लिहिले आहे पैसातै तुम्ही.
तुमच्या भावनान्शी सहमत
22 May 2011 - 4:27 pm | रामदास
जुना दात पडल्याशिवाय नवीन कसा येईल ?
(हा झाला समुपदेशनाचा भाग .जुन्या वास्तूशी जोडलेली नाळ तोडणे किती कठीण असते याची कल्पना आहे. .)
22 May 2011 - 6:57 pm | रेवती
लेखन मनापासून आणि सुंदर झालय.
अनेक बिकट प्रसंग वाचून कसेसे झाले.
डोळ्यात पाणी आले.
22 May 2011 - 7:18 pm | टारझन
थम्ब्ज अप !
22 May 2011 - 9:22 pm | नगरीनिरंजन
डोळे भरून आले वाचताना. आणि प्रत्येक गोष्ट गपागपा गिळत जाणार्या अजगरासारख्या काळाचा निष्फळ राग आला काहीवेळ.
23 May 2011 - 5:34 am | निनाद
अगदी खरे बोललात!
पण त्यापेक्षाही त्या अजगरावर स्वार असलेल्या बिल्डर लोकांचा अधिक राग येतो.
नाशकात फाळकेंचे घर इतिहास जमा झाले त्या नंतर कानेटकरांचे गेले त्याचे कुणी काही डॉक्युमेंटेशनही केले नाही. ना कुणाला खंत ना खेद!
कुसुमाग्रजांचे जात नाही कारण त्यात अनेकांना साहित्याशी असलेला संबंध दाखवणे मिरवणे सोईचे जाते. शिवाय ते घर बहुदा सरकारचेच आहे.
22 May 2011 - 9:40 pm | चावटमेला
शब्दच नाहीत, काय बोलू? आम्ही सांगलीतलं आमचं गाव भागातील घर सोडून आलो, तेव्हाची आठवण झाली..
22 May 2011 - 10:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
...
23 May 2011 - 8:23 am | माझीही शॅम्पेन
फार पुर्वी एक सुधीर जोशी , आनंद इंगळे , रसिका जोशी आणि आणखीन प्रचंड चांगले कलाकार असलेली झी-मराठी वरची मालिका आठवली ! ( नाव आठवत नाहीए)
अवांतर - शेवटी प्रत्येक गोष्ट नश्वर आहे , तुम्ही आम्ही , घर , मिपा आणि सगळेच आय-डि (डू-आयडी पकडून)
23 May 2011 - 8:36 am | स्पा
फार पुर्वी एक सुधीर जोशी , आनंद इंगळे , रसिका जोशी आणि आणखीन प्रचंड चांगले कलाकार असलेली झी-मराठी वरची मालिका आठवली
मालिकेचे नाव प्रपंच
23 May 2011 - 12:52 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मलाही पटकन "प्रपंच"चीच आठवण झाली. सुंदर लेख. रामदास काकांची प्रतिक्रियापण पटली.
24 May 2011 - 6:12 am | माझीही शॅम्पेन
शांत डोक्याने पुन्हा एकदा लेख वाचला , मला खरोखर माझीच गोष्ट वाटली ,
ठाणे स्थानका पासून हाकेच्या जवळपास २०० वर्ष पेक्षा जून घर आज पडले जाण्याच्या प्रतीक्षेत आहे.
सर्व झाडांच्या फुलांच्या आठवणी माझी धडाकेबाज पण खूप प्रेमळ आजी सर्व काही आठवल.
प्रत्येकच घरातल्या वास्त्ूपुरुष काय पाहत असेल कोण जाणे !!
(लेख आवडला - वाचन्खुण म्हणून साठवला आहे)
23 May 2011 - 8:34 am | स्पा
खास लेख...
वाचन खुण साठवल्या गेल्या आहे
एक एक घटना एकदम हळुवार मांडली आहेस
तुझी स्केचेस इथे टाकायला विसरलीस का ग? ;)
23 May 2011 - 9:12 am | अमोल केळकर
खुप छान लिहिले आहे. लहानपणी रहात होतो त्या ' कौलारु घराची ' आठवण ताजी झाली
गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी
धन्यवाद
अमोल केळकर
23 May 2011 - 9:52 am | वात्रट
निशब्द करुन टाकलत कि हो....
23 May 2011 - 12:38 pm | श्रावण मोडक
छान. आवडलं.
23 May 2011 - 1:34 pm | RUPALI POYEKAR
निशब्द....................
23 May 2011 - 1:45 pm | दत्ता काळे
छान लिहीलंय.
23 May 2011 - 2:01 pm | प्रमोद्_पुणे
छान लिहिलय.
23 May 2011 - 3:52 pm | गणेशा
तुमच्या भावनांमध्ये सहभागी आहे .. बाकी काय बोलावे ते सुचत नाहिये ...
फक्त घराने दिलेल्या शेवटच्या गिफ्ट्स आम्हाला पण दाखव ना ताई..
---
आपला असलेला वावर .. म्हणजे एक जीवंत आठवण.. आपली सोबती .. एकेमेकांचे असंख्य गुज जेंव्हा काळाच्या पडद्यात जाउ पाहते तेंव्हा खरेच खुप वेदना होताता मनाला.. आनि मग पुढच्या पीढीचे आणि घराचे कायमचे संपलेल नातं आपल्या मनात रुतुन बसते ...
23 May 2011 - 3:54 pm | विसोबा खेचर
सु रे ख..!
23 May 2011 - 4:26 pm | प्रभाकर पेठकर
'पैसा' हे लेखकाचे/लेखिकेचे नांव आणि 'एका घराची गोष्ट ' ह्या सुमार शीर्षकामुळे कथा वाचण्याची उत्सुकता वाटत नव्हती. पण पाहूया तरी काय आहे असे म्हणून कथा उघडली आणि घराच्या प्रथमदर्शनानेच पराकोटीची आपुलकी निर्माण केली.
लेखिकेने तिचे त्या घराशी असणारे भावनिक नाते अतिशय समृद्ध शब्दांत मांडले आहे. इतके की ते घर पाडणार ह्या कल्पनेने माझ्याही डोळ्यात पाणी आले.
संपूर्ण कथा वाचून हृदय पिळवटून टाकणारी अस्वस्थता अनुभवली. मनावर ताब मिळवताच विचार आला कि लहानपणापासून पाहात आलेली, त्यांचे प्रेम अनुभवत आलेली एखादी घरातली व्यक्ती असते आणि वयोमानानुसार वृद्धापकाळात अशा व्यक्तीचे निधन होते आणि दु:खाचा एक डोंगरच डोक्यावर कोसळतो. मन विदीर्ण होऊन जाते. पण आपले आयुष्य पुढे चालतच राहते. सर्व दु:खांवर काळ हेच एकमेव औषध आहे ह्या न्यायाने तसेच निसर्ग नियम स्विकारल्याने आपण ते दु:ख पचवतो. तद्वत, जिथे प्राणप्रिय व्यक्तींना मृत्यूपासून आपण रोखू शकत नाही तिथे वास्तूमध्ये इतके मन गुंतवणे त्रासदायकच ठरते.
घराचे छायाचित्र खुपच छान आहे. त्याला छानसे जलचित्रात किंवा तैलचित्रात सजवून अशा ठिकाणी लावावे कि त्याच्याशी संलग्न असणार्या सर्व स्मृती कायम ताज्या राहतील दु:खाचा कडवट पणा लवकरात लवकर विरुन जाईल.
शुभेच्छा..!
23 May 2011 - 10:41 pm | आनंदयात्री
फार छान लिहलेय. उत्कट आहे, भावनाविभोर करणारे आहे.
(आयुष्यात असा प्रसंग कधी अनुभवा लागेल याविचाराने हिरमुसलो.)
24 May 2011 - 5:48 am | आत्मशून्य
.
24 May 2011 - 6:33 am | निशदे
अतिशय प्रामणिक आणि त्यामुळेच अस्वस्थ करून टाकलंत.
तुमची घराबरोबरची भावनिक गुंतवणुक संपणार नाही याची खात्री बाळगा. निर्जिव वास्तूदेखील सजीव शरीरंप्रमाणेच (किंबहुना अधिकच) मनाच्या जवळ राहतात.
तुमच्या घराचा आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर राहो.
:)
24 May 2011 - 3:37 pm | अस्मी
ज्योतीताई अतिशय सुंदर लेख..अगदी मनापासून लिहिलायस!!
हळवं करून टाकणारा अलवार लेख..!
आणि तुझं घर तर थेट माझ्या मालघरच्या घरासारखंच आहे :)
24 May 2011 - 4:17 pm | बिपिन कार्यकर्ते
सुंदर लेखन. आवडले होतेच. लेखिका स्मरणरंजनातच अडकून पडली नाही आणि आठवणी बरोबर घेऊन येणारा भविष्यकाळ स्वीकारायला तयार झाली आहे हा सकारात्मक शेवट तर खूपच आवडला.
24 May 2011 - 4:42 pm | चतुरंग
पैसाताई, अतिशय हेलावून टाकणारा अनुभव. तुमचं खरं आहे, घर मनात कुठेतरी असतंच अदृश्यपणे वसलेलं, ते पडायची वेळ येते तेव्हा समजतं की ते आपल्याच मनाचा एक भाग होतं इतकी वर्षं! तुमच्या घरानं तुमच्या जुन्या चित्रांच्या, दादांच्या डिग्र्यांच्या रुपानं तुम्हाला आशीर्वाद दिलाय हे खरं आहे!
आमचा राहता वाडा पाडून तिथे कॉम्लेक्स झालं त्याची आठवण झाली आणि जीव गलबलला. ज्या घरात लहानाचा मोठा झालो, सवंगडी जमवले, हक्काने कोणाकडेही जाऊन जेवलो, चोर्-पोलीस, गल्लीक्रिकेट, शिवाशिवी, दगड का माती, डबा ऐसपैस जिथे तासंतास रंगले, पत्ते, कॅरम, बुद्धीबळ यांनी तहान भूक हरपली, गच्चीवरती तळपत्या उन्हात पतंगाच्या काटाकाटीत दिवस कसा बुडाला ह्याचं भान राहिलं नाही ते घर; जाड दरवाज्यामागचा सागवानी आगळ भिंतीत सारुन रात्री दार बंद करताना 'निर्धास्त रहा, मी जागाच आहे!' असा जणू आशीर्वाद देणारं घर, उन्हाळ्याच्या दिवसात हौदाजवळच्या थंडगार शहाबादी फरशीवर स्वर्गसुखाची झोप देणारं घर, माझ्या लाडक्या बोरिसचं निर्व्याज प्रेम देणारं घर, अनेक सुखदु:खाच्या प्रसंगाचं मूक साक्षीदार असलेलं घर जेव्हा पडणार असं नक्की झालं तेव्हा छातीत कोणीतरी कुदळ मारावी असं दुखलं! पाडलेल्या घरासमोरुन मला जाववत नसे. असाच एकेदिवशी अर्धवट पाडलेल्या घरात जाऊन ढसाढसा रडलो. त्या पडक्या भिंती, चुना-माती, सागवानी खांब, तुळवंट नि वासे, महिरपी कोनाडे, नक्षीचे खांब, पुरुषभर उंचीची भिंतीतली कपाटं सगळी रडताहेत असं वाटलं. बाबा मला शोधत आले आणि कशीबशी समजूत घालून घरी(?) घेऊन गेले.
वर्षं उलटली. दु:ख हळूहळू ओसरलं. बदल व्हायचेच. मन सरावतं. कधीतरी बेसावध क्षणी खपली निघते अश्रू ओघळतात आणि पुन्हा काही काळाने ते मागे पडतं.
असो. माझंच सांगत बसलो. पैसाताई, तुम्ही दोन कामं नक्कीच करु शकता - एक म्हणजे बिल्डरला तातडीने विनंती करुन झाडं आहेत तशी वाचवता आली तर उत्तम, अन्यथा उचलून दुसरीकडे रुजवता आली तर बघा.
आणि दुसरं, घरात जुनं चांगलं लाकूड असेल त्यातून तुमच्या काका-काकूंच्या नवीन फ्लॅटमधे काही सामान बनवून घेऊ शकता त्यानेही आठवणी राहतील.
तिथे पुन्हा जायचं नाही असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे पण स्वानुभवावरुन सांगतो असं करु नका. आवर्जून जा. त्याने तुमचं दु:ख कमी व्हायला मदतच होईल. त्या जागेला तुमचा स्पर्श समजतो. जुनं घर नसलं तरी आपुलकी आणि मायेचं छत्र अबाधित असतं हे तुम्ही अनुभवाल.
ह्या प्रकल्पाला मनापासून शुभेच्छा!
-रंगा
27 May 2011 - 10:42 pm | चित्रा
आपण जेथे वाढलो ते घर पाडले जाण्याचे दु:ख वेगळेच. घर आपले रहाणार नाही, ह्या कल्पनेने थोडेसे पोरकेपण आल्यासारखे होते. पण म्हणूनच एक कायम लक्षात ठेवावे लागते - जेथे आपली हक्काची चार माणसे आहेत, ज्यांच्याशी मनातले बोलता येते, तेच घर असते.
कधीकधी विंचवाच्या पाठीवरचे बिर्हाड करून राहताना आपले हक्काचे वाटणारे घर हे आपल्या मनातल्या अवकाशातच असते.
घरात जुनं चांगलं लाकूड असेल त्यातून तुमच्या काका-काकूंच्या नवीन फ्लॅटमधे काही सामान बनवून घेऊ शकता त्यानेही आठवणी राहतील.
+१. असे एक कपाट आमच्या घरात आजही आहे.
24 May 2011 - 9:49 pm | अर्धवट
खूप छान.. मस्त लिहिलय.. अगदी हळवं करुन गेलं झणभर
22 Jul 2013 - 6:05 pm | भावना कल्लोळ
पाणी आणलेस डोळ्यात …
24 May 2011 - 11:06 pm | सखी
खरचं हळवा करुन गेला लेख, कालच वाचुन गेले पण काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नव्हतं. माझ्या सुदैवाने माझे लहानपणीचे घर अजुन आहे, तिथे अंगणात मागे, पुढे कडुनिंब, औदुंबर, सोनचाफा, साग, आंबा, शेवगा अशी मोठी मोठी झाडं होती कि भर उन्हाळ्यात सुद्धा तिथे गारवा असायचा. नविन घरी जाताना यातली काही झाडं शेजा-यांना त्रास नको म्हणून तोडावी लागली. कधी मधी ते घर विकुन टाकावं, किंवा पाडुन मोठं बांधाव याची बोलणी घरच्यांमध्ये चालु असतात. काळाबरोबर बदलले पाहीजे असे कितीही वेळा मनाला बजावले तरी घर पाडायची कल्पना काळजाला घरं पाडुन जाते हे ही तितकच सत्य आहे.
वर सहज आणि चतुरंग यांनी दिलेल्या सुचनांचा जरुर विचार करा. त्याने दु:ख कमी व्हायला मदतच होईल.
26 May 2011 - 1:10 am | इंटरनेटस्नेही
अतिशय हळवे, सुंदर लेखन. वाचताना डोळ्याच्या कडा नकळत ओलावल्या.
26 May 2011 - 11:26 am | मस्त कलंदर
वाचताना प्राजुच्या तासगांवच्या घराचीही आठवण झाली!!
26 May 2011 - 1:07 pm | मितभाषी
:(
26 May 2011 - 1:47 pm | स्मिता.
पैसाताई, घराविषयीच्या भावना अगदी मनाच्या खोलवरून भरून येऊन शब्दात मांडल्या आहेत. वाचताना डोळ्यात पाणी आलं :(
जिथे लहानाचे मोठे झालो ते घर नुसतंच विकलं जाणार नाही तर ते पाडून तिथे वेगळीच वास्तू बनणार या जाणीवेनेच मनाला खरंच फार त्रास होत असला पाहिजे.
मी माझ्या घराबद्दल हा विचार करून पाहिला तर रडूच आलं आणि पुढचा विचारच करू शकले नाही.
वरच्या प्रतिक्रियांमध्ये अनेकांनी सुचवल्याप्रमाणे त्या घरातील जुन्या वस्तू तुमच्या आणि भावंडांच्या राहत्या घरांमध्ये आणून ठेवू शकता आणि झाडांचं पुनर्रोपणसुद्धा करून घ्या.
26 May 2011 - 10:34 pm | स्वाती दिनेश
फार सुरेख लिहिलं आहे ज्योती..
स्वाती
27 May 2011 - 12:47 am | प्राजु
___/\____
बस्स!
27 May 2011 - 11:13 pm | विकास
हा लेख/ह्या भावना आत्ताच वाचल्या. वास्तुचा सहवास हा जवळच्या व्यक्तीच्या सहवासाप्रमाणेच असतो. असेच आजोळचे फलटणचे घर सोडून आता अनेक वर्षे झाली, तरी अजूनही कुठेतरी मनाच्या कोपर्यात घर करून आहे.
जिथे लहानाचा मोठा झालो, ते ठाण्याचे घर जेंव्हा पाडले तेंव्हा तेथे जाऊ देखील शकलो नाही. त्या इमारतीत असलेली फक्त चार घरे म्हणजे कायमची नाती झाली होती आणि आता सगळे विखुरले तरी पुढच्या पिढ्यात देखील ती नाती तशीच आहेत. प्रत्येकानेच त्या घरात सुखदु:खाचे क्षण पाहीले पण ते सोडताना प्रत्येकाच्याच डोक्यात त्या वास्तूबद्दल कृतज्ञताच होती. बिल्डरला एकच अट घातली होती की नारळाची झाडे पाडायची नाहीत. गेल्या खेपेस ठाण्याला गेलो तेंव्हा संपूर्ण रूप बदलेल्या (आणि मला न आवडलेल्या) ठाण्याच्या त्या आता आरएम रोडवरून / आमच्या वेळच्या राम-मारूती रस्त्यावरून मुलीला सगळा भाग दाखवायला चालत नेत होतो. क्षणभर मीच गोंधळलो आणि त्यामुळे दुखावलो, की आपले नक्की घर कुठे होते. सगळेच बदलेले. पण मग ती नारळाची झाडे दिसली....
28 May 2011 - 6:03 am | गोगोल
लेख.
24 Jun 2012 - 12:32 pm | मन१
अल्लाद, अलगद आठवणींची सफर घडवून आणलित.
हा धागा स्पा च्या वाचनखुणेत सापडला, म्हणून त्याचे जाहिर आभार.
24 Jun 2012 - 1:25 pm | चित्रगुप्त
अतिशय सुंदर, भावनोत्कट लेखन.
तुमची ती स्केचेस, आणि हरकत नसल्यास ते फोटोपण इथे द्याल का?
अवांतरः
१. माझ्या माहितीप्रमाणे एका विशिष्ट (किती ते नक्की ठाऊक नाही) काळापूर्वीचे कोणतेही बांधकाम पाडायलाच काय पण त्यात बदलही करायला फ्रान्स इ. देशात सक्त मनाई असून या कायद्याचे काटेकोर पालन केले जाते. असा काही कायदा मुळात आपल्याकडे आहे का ? नसल्यास तसा प्रयत्न केला गेला आहे का? वगैरे माहिती कुणाला असल्यास द्यावी. अर्थात कायदा झाला, तरी त्याचे पालन किती केले जाणार, हा भाग वेगळा.
२. मा. आमिरखान यांनी हा विषय 'सत्यमेव जयते' मध्ये घेऊन त्याला वाचा फोडावी.
27 Jun 2012 - 9:42 pm | मुक्त विहारि
जूने जावून नविन येणारच...
त्याचे स्वागत करा, त्याच्यात पण काही तरी चांगले मिळेल...
आणि खरे सांगू का, एक गोवा सोडले तर, बाकी सगळीकडेच, हा इमारत माफियांचा त्रास आहेच.
28 Jun 2012 - 10:33 am | मराठमोळा
लेख वाचायचा राहुन गेला होता.. धागा ज्याने कुणी वर काढला त्याचे आभार..
वाचताना भारावून गेलो. काय प्रतिसाद द्यावा हेच कळत नाही.
एक अतिशय सुंदर लेख एवढंच म्हणतो.
28 Jun 2012 - 1:08 pm | बॅटमॅन
:(
कितीही अपरिहार्य असला तरी बदल तोदेखील विशेषतः अशा स्वरूपाचा आजिबात नको वाटतो. आमचे घर नजीकच्या भविष्यकाळात विकले जाणे शक्य नाही, पण मी स्वतः सध्या कधी तिथे स्थायी स्वरूपात राहू शकेन ही शक्यता ना के बराबर आहे. त्या कल्पनेनेदेखील दु:ख होते तर घरच पाडल्यामुळे कसे होत असेल याचा विचारच करू शकत नाही.
28 Jun 2012 - 8:31 pm | सुहास..
झ आणी का आणि स
कोणे एके काळी ? मातीची घरे असायची , माहीतगारांनी प्रकाश टाकावा
22 Jul 2013 - 12:49 pm | drsunilahirrao
"इतकी वर्षं घर होतंच, पण अबोलपणे एखाद्या व्यक्तीसारखं ते माझ्या मनात येऊन राहिलं आहे ..."
(y)
22 Jul 2013 - 2:55 pm | त्रिवेणी
मस्तच लेख.
22 Jul 2013 - 3:04 pm | सुबोध खरे
निः शब्द
22 Jul 2013 - 4:02 pm | आशु जोग
यावर एक उपाय. आवडत्या ठिकाणी मोकळी जागा घ्यावी. मनाप्रमाणे घर बांधावे. मुलं नातवंडं तिथे बागडतील. पुढच्या पिढ्या काय करतील याची फिकीर नको.
23 Jul 2013 - 5:47 am | नेत्रेश
त्या नविन बांधलेल्या घराला जुन्या आजोबा-पणजोबांच्या घराची सर कशी येणार?
आपण लहानपणी ज्या वास्तुत वावरलो, लहानाचे मोठे झालो, तिथेच मन अडकलेले असते.
22 Jul 2013 - 5:03 pm | अनन्न्या
हे घरही पाहिलय आणि आता ते पाडून होणारे बांधकामही! घराशी असलेलं नातं, आसपासच्या माणसांशी असलेलं नातं असं सहजासहजी तोडू म्हणून तुटणार नाहीच. तरीही एक नक्की सांगते पैसाताई, रत्नागिरीला केव्हाही ये, हक्काने जेवायला बसण्याचं एक माझं घर नेहमीच तुझं स्वागत करील.
तुझ्या दादांच्या आठवणींतल्या घराची सर त्याला नाही येणार पण रत्नागिरीशी असलेलं नातं तुटू देऊ नकोस!
22 Jul 2013 - 5:31 pm | गवि
मीही पाहिल्यासारखं वाटलं हे घर.. लहानपणी.
रत्नागिरीतच आणि अगदी याच प्रकारे घर पडून तिथे दुसरं काहीतरी कमर्शियल उभं राहिलेलं पाहण्याचा अनुभव आहे. कायकाय गाडलं जातं कसं सांगू.. म्हणून गप्प बसलो होतो धाग्यावर. आमचं तर भाड्याने राहात असलेलं घर.. ते सोडूनही पंधरावीस वर्षं झालेली. पण पत्यक्ष मालकी किंवा सध्या संबंध नसूनही हतबलता तीच...पाडण्यापूर्वी काही दिवस मी पहायला गेलो. सोडल्यापासून वीस वर्षांनी पहिल्यांदाच आणि एकदाच आलो होतो तिथे. घर कायमचं बंद केलं गेलं होतं. निर्जन वैराण आणि धूळ कोळीष्टकांनी ग्रासलेलं. वाळवी भरपूर.
वर्षानुवर्षं बंद आणि दुसर्याच्या मालकीच्या झालेल्या त्या घरात जाणं शक्यच नव्हतं. पण मागच्या दरवाज्याजवळ एका आधाराच्या खांबावर वीसेक वर्षापूर्वी मी "खाकी चड्डी पांढरा शर्ट" वाल्या शाळकरी वयात काढलेलं एक चित्र आणि खरडलेले शब्द दिसले.
आणखी वर्णन नाही करता येत.
जाऊ दे.. काळ आहे, पुढे जायचाच.. :)
23 Jul 2013 - 3:22 am | फारएन्ड
सुंदर लिहीले आहे!
23 Jul 2013 - 4:14 am | किसन शिंदे
फार म्हणजे फारच सुंदर लिहलंय!
23 Jul 2013 - 5:42 am | स्पंदना
....:(
23 Jul 2013 - 8:10 am | जे.जे.
सुंदर लिहिले आहे.
वाचून द डिसेंन्डन्ट्स या सिनेमाच्या शेवटाचि आठवण झाली.
23 Jul 2013 - 10:54 pm | आतिवास
घराच्या आठवणी एकाच वेळी अशा सुखाच्या असतात आणि त्या डोळ्यांत पाणीही आणतात..
लेख अतिशय आवडला.
23 Jul 2013 - 11:25 pm | लॉरी टांगटूंगकर
...
24 Jul 2013 - 12:14 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर ! इतर कोणाबद्दल नाही पण मनातले विचार शब्दात चपखलपणे मांडू शकणार्यांबद्दल मनात नेहमीच हेवा वाटत आला आहे !! अजून काय बोलणे?
17 Aug 2014 - 5:57 pm | सुजल
खूप छान लिहिले आहे :)
17 Aug 2014 - 8:44 pm | एस
लेख वाचून मीही किंचित हळवा झालोच नाही म्हणायला. दगडमातीचंच का होईना, त्या घर नावाच्या तशा निर्जीव रचनेशी आपण आतून कुठेतरी असे जोडले गेलेलो असतो की त्याचं तुटणं आणि त्यापासून तुटणं हे हेलावून सोडतं. मागे राहतं असं नॉस्टॅल्जिक रेंगाळणं. आपला देश, आपली माती, आपली माणसं, आपलं घर. हे जे काही 'आपलं' असतं, त्याची किंमत कशातच करता येत नसते. तशीच ती कुणाला दाखवताही येत नसते, समजावून सांगता येत नसते. नवी पिढी अशा गुंतण्याच्या सवयीतून तशी मुक्त असते. घर किंवा त्यांच्या भाषेत 'प्रॉपर्टी' ही एक 'इन्वेस्टमेंट' असते बहुधा. फारफारतर इन्कम टॅक्स वाचवण्याचा एक सरधोपट मार्ग. पण ज्यांनी 'कुणी घर देता का घर?' असं प्रत्यक्ष स्वतःच्या आयुष्यात अनुभवलंय त्यांना मात्र या दोन अक्षरी शब्दाचा जिवंतपणा, त्याची निकड आणि मोडता न येण्याइतपत त्याची झालेली सवय हे सर्व इतक्या सहजासहजी विसरता येत नाही. भविष्यकाळ तर स्वीकारायला हवाच. अगदी त्याच्या भल्याबुर्यासकट. पण म्हणून भूतकाळाचे बोट कितीही मोठे झालो तरी इतक्या कोरडेपणाने सोडून देता येत नाही ना.
चला, आपल्याला निदान घरं तरी आहेत. जगात आभाळाचे छप्पर घेऊन रोज जगणे ढकलणारे कित्येक जीव आहेत. त्यांच्याकडे पाहून स्वतःचं दुःख किंचित का होईना विसरता येतंय का हे पहायचं. बघू. तूर्त लेखास वाचनखूण लावली आहे. बोट सोडून देताना कधी कोरड्याचे पाणावले तर इथे परत येईन हे वाचायला.
17 Aug 2014 - 11:05 pm | खटपट्या
खूपच छान लेख.
पैसाताई ती स्केच काढली आहेत ती डकवता येतील का ??